काँग्रेस पक्षात श्रेष्ठींपुढे स्वतःचे मत ठामपणे मांडू शकणार्या मोजक्या नेत्यांपैकी एक म्हणजे वसंत साठे. मुळचे नाशिकचे असलेले वसंतराव साठे वयाच्या सतराव्या वर्षी स्वातंत्र्य आंदोलनात सहभागी झाले. प्रजा सोशालिस्ट पार्टीकडून त्यांनी त्यांच्या राजकीय प्रवासाला सुरूवात केली. महाराष्ट्र राज्याच्या स्थापना वर्षात म्हणजे 1960 साली त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि काँग्रेसशी कायम एकनिष्ठ राहिले. इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या मंत्रीमंडळात त्यांनी उल्लेखनीय योगदान दिले. अकोल्यातून ते खासदार म्हणून निवडून गेले.
काँग्रेस पक्षाला ‘हात’ हे निवडणूक चिन्ह मिळवून देण्यात या मराठमोळ्या नेत्याचा मोठा वाटा आहे. इंदिरा गांधी यांचे अत्यंत विश्वासू सहकारी असलेल्या साठे यांनी माहिती आणि प्रसारण मंत्री म्हणून काम केलं. 1984 साली आशियायी क्रीडा स्पर्धा होत्या. त्याचं प्रसारण रंगीत टीव्हीवरून व्हावं असा त्यांचा आग्रह होता. त्यावेळी त्यांना अनेक अडचणी सांगण्यात आल्या. आपण आजच्या माहिती आणि तंत्रज्ञानाच्या जगात वावरत असताना आपल्याला याची कल्पनाही येणार नाही की, देशात रंगीत टीव्ही यावेत यासाठी या नेत्याने जिवाचं रान केलं होतं. दूरदर्शनच्या साध्या मनोर्यावरून रंगीत टीव्हीचे प्रसारण करता येणार नाही, असं त्यांना सांगण्यात आलं. मग साठे यांनी अमेरिकन अॅम्बेसितून त्यासाठीचं उपकरण मागवलं आणि इंदिरा गांधी यांच्यासमोर त्याची यशस्वी चाचणी केली.
देशातला पहिला रंगीत टीव्ही इंदिराजींच्या समोर त्यांनी सुरू केला खरा पण घराघरात हे उपकरण पोहोचविण्यासाठी अनेक अडचणी होत्या. हे रंगीत टीव्ही सुरू होण्यासाठी अॅन्टिन्याची आवश्यकता असायची. त्या काळी हे अॅन्टिने सिमेंटचे असायचे. त्यामुळं देशभर ते पोहोचवणं अशक्यच होतं. अधिकार्यांनी हे कारण देऊन असमर्थता दाखवली असता साठे म्हणाले, ‘अॅल्युनियमचेही अॅन्टिने असतात.’ त्यांची चिकाटी पाहून ब्लॅक अॅन्ड व्हाईट टीव्हीचे भांडवलदार निर्माते, तंत्रज्ञानाचे विरोधक यांनी त्यांना कडवा विरोध केला. त्यासाठीच्या सगळ्या मर्यादा ओलांडल्या. साठे यांचे एका पत्रकार महिलेशी संबंध आहेत असं सांगून त्यांच्या लग्नाच्या खोट्या पत्रिकाही छापल्या. या सर्वांवर साठे यांनी यशस्वी मात केली आणि देशात प्रथमच रंगीत टीव्ही सुरू झाले. आशियाई सामने रंगीत दिसू लागले आणि वसंतराव साठे यांची ‘कलरफुल नेता’ अशी ओळख झाली.
हा लेख ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
इंदिरा गांधी यांच्या पडत्या काळात वसंत साठे त्यांच्या पाठिशी ठामपणे उभे राहिले. काँग्रेसच्या जडणघडणीत त्यांनी मोठं योगदान दिलं. त्यांची पुस्तकेही वाचकप्रिय ठरली. विशेषतः ‘ममोयर्स ऑफ अ रॅशनलिस्ट’ हे त्यांचं आत्मचरित्र या नेत्याच्या परिश्रमाची जाणीव करून देतं. अयोध्या, बोफोर्स अशा प्रकरणात ते चर्चेत आले. आजच्या काँग्रेसच्या पडत्या काळात वसंतराव साठे यांच्यासारख्या नेत्याची आठवण त्यामुळेच प्रकर्षाने येते.
– घनश्याम पाटील
7057292092
दैनिक पुण्य नगरी, 5 मे 2024