साधा माणूस…

Share this post on:

आजकाल कोणी साधा ग्रामपंचायतीचा सदस्य असला तरी त्याचा रूबाब पाहण्यासारखा असतो. गाडी, माडी, कार्यकर्त्यांचा लवाजमा अशा थाटात तो जगत असतो. पुणे जिल्ह्यातील मंचर या गावात मात्र दंतकथा वाटावी असा एक अवलीया राहायचा. तीन वेळा आमदार, खासदार असूनही अविश्वसनीय वाटावा असा त्यांचा साधेपणा. ते आमदार असताना त्यांच्या पत्नी मथुराबाई दुष्काळी कामावर रोजंदारीने जायच्या. गोधड्या शिवून त्या विकायच्या आणि आपला प्रपंच चालवायच्या. किसणराव बाणखेलेअण्णा हे त्यांचं नाव. ते 1989च्या लोकसभा निवडणुकीमध्ये खेड लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून गेले. त्यापूर्वी 1972, 1980 आणि 1985च्या विधानसभा निवडणुकांमध्ये ते आंबेगाव विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून गेले होते.

किस्सा ए इलेक्शन – घनश्याम पाटील

खासदार झाल्यावर ‘खेडचं धोतर दिल्लीला गेलं’, असं त्यांचं वर्णन करण्यात आलं. डोक्यावर टोपी, पांढरा शर्ट, गळ्यात माळ, धोतर आणि पायात कायम स्लिपर घालून फिरणारे अण्णा कोणत्याही अंगाने राजकारणी वाटत नसतं. त्यांच्या साधेपणाचे अनेक किस्से आजही रंगवून सांगितले जातात. आमदार, खासदार असताना विधानसभेपासून लोकसभेपर्यंत ते कायम स्लिपर घालूनच फिरत. शिवाजीनगर बसस्थानकावर उतल्यावर तिथेच धोतर अंथरून निवांत झोपत. सकाळी चालक-वाहक आल्यावर अण्णांना ते उठवत. चहा पाजत आणि मग अण्णा मंचरकडे निघत. मंचरचे बसस्थानक तर त्यांचे दुसरे कार्यालयच असावे, असे सांगितले जाई.
त्यांनी मतदारसंघातील कधीही, कुणाचाही अंत्यविधी आणि दशक्रिया विधी चुकवला नाही. एकवेळ लग्नाला गेले नाही तरी चालेल पण लोकांच्या दुःखात सहभागी व्हायलाच हवे, असे ते म्हणत. आमदार असतानाही ते सुरूवातीला बराच काळ सायकलवर फिरत. नंतर त्यांनी एक स्कुटर घेतली. त्यानंतर मतदारसंघातील लोकांनी वर्गणी काढून त्यांना जीप घेऊन दिली. त्या जीपमध्ये बसतील तेवढे कार्यकर्ते घेऊन ते सगळीकडे फिरत. सोबत एक छोटी डायरी ठेवत. त्यात लोकांची कामे, तक्रारी नोंदवून ठेवत. त्याचा पाठपुरावा करत.

 

 

 

हा लेख ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

सुलतान नावाच्या एका माणसाचा किस्सा सर्वश्रुत आहे. तो अनाथ होता. जुन्नरच्या अनाथाश्रमात वाढला. बारावी झाल्यावर त्याला एसटीचा मुलाखतीसाठी कॉल आला. त्याने तडक मंचर गाठले. तिथे धोतर आणि टोपी घालून बसलेल्या गृहस्थास त्याने विचारले, ‘‘आमदार साहेबांचे ऑफिस कुठे आहे?’’
त्या गृहस्थाने विचारले, ‘‘काय काम आहे?’’
तो म्हणाला, ‘‘मला त्यांना भेटायचे आहे. काम त्यांनाच सांगेन.’’
त्यावर ते गृहस्थ म्हणाले, ‘‘मीच आमदार किसनराव बाणखेले.’’
वरमलेल्या त्या युवकाने सगळी आपबिती त्यांना सांगितली.
ते म्हणाले, ‘‘दहा मिनिट थांब. मी आलोच.’’
अवघ्या दहा मिनिटात ते अंगावर शर्ट चढवून आले. त्याला म्हणाले, ‘‘चल त्या एसटीत!’’
बसमध्ये आल्यावर म्हणाले, ‘‘मी आमदार असल्याने मला तिकिट नसतंय, तुझं तिकिट तू काढ.’’
त्याचा कावराबावरा चेहरा पाहून ते वाहकाला म्हणाले, ‘‘याला एसटीत चिकटवायला निघालोय, द्या एक तिकिट.’’
दापोडीला उतरल्यावर ते त्या तरूणाला घेऊन तीन किलोमिटर चालत आले. तिथल्या अधिकार्‍याच्या थेट पायावर पडले आणि म्हणाले, ‘‘साहेब हा पोरगा लई गरीब हाय. अनाथ हाय. आपणच त्याचे मायबाप. त्याला काहीही करून नोकरीत चिकटवा.’’
अधिकारी गांगरले. म्हणाले, ‘‘आमदारसाहेब उठा. आम्हीच तुमच्या पाया पडायला हवं.’’
नोकरीसाठी शिफारसपत्र मागणार्‍या सुलतानला कसलीही ओळख नसताना त्यांनी थेट कामावर लावलं.
ते उशिरा आल्यावर आमदार निवासात त्यांच्या खोलीत पाच-पंचवीस माणसे झोपलेली असत. ‘आपल्या खोलीत आहेत तर आपलीच माणसे असतील’ म्हणून ते त्यांना उठवत नसत. जिथे जागा मिळेल तिथे धोतर अंथरून ते झोपत.
त्यांच्या साधेपणावर लिहायचे तर एक स्वतंत्र पुस्तक होईल. अशा नेत्यांना निवडणुकीत प्रचारही करावा लागत नसे. लोक वर्गणी काढून त्यांचा प्रचार करत. आजच्या निवडणुकीचे स्वरूप बघितले की, किसनराव बाणखेले यांच्यासारखे नेते आपल्याकडे होऊन गेले, यावर विश्वास ठेवणे कठीण जाते. त्यांच्या स्मृतिंना वंदन!
– घनश्याम पाटील
7057292092

दैनिक पुण्य नगरी, 24 एप्रिल 2024

Author: चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email -

View all posts by चपराक >

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

error: Content is protected !!