इंदिरा गांधी यांची सभा झाली; पण…

शरद पवार यांच्यामुळे बारामती देशात नेहमीच केंद्रस्थानी राहिली आहे. 1980 साली विधानसभेच्या निवडणुकीत शरद पवार काँग्रेस एसचे उमेदवार होते. त्यांच्याविरूद्ध तिथून मारूतराव चोपडे यांनी काँग्रेस आयच्या वतीने लढत दिली. त्यावेळी शरद पवार बारामतीतून पडतील, असा कयास असल्याने ही निवडणूक देशपातळीवर चर्चेत आली होती. त्यावेळी प्रेमलाकाकी चव्हाण या काँग्रेस आयच्या प्रांतअध्यक्ष होत्या. प्रेमलाकाकी म्हणजे पृथ्वीराज चव्हाण यांच्या आई. भाई गुलाम अली जिल्हाध्यक्ष तर किरण गुजर हे बारामती शहराचे अध्यक्ष होते.

किस्सा ए इलेक्शन – घनश्याम पाटील

मारूतराव चोपडे हे धनगर समाजाचे मोठे प्रस्थ होते. ‘बारामती विधानसभा मतदारसंघात या समाजाचे प्राबल्य आहे. त्यामुळे इंदिरा गांधी यांची सभा झाली तर पवार साहेब पडू शकतात,’ अशी या मंडळींची चर्चा झाली. चोपडे यांचे छत्रपती साखर कारखान्यावरही वर्चस्व होते. त्यामुळे पवारांना पाडण्यासाठी पूर्ण ताकतीने प्रयत्न करू, असा शब्द इंदिरा गांधी यांना देण्यात आला.

पवार साहेबांनी बारामतीच्या विकासासाठी काहीच योगदान दिले नाही, असा आक्रमक प्रचार करण्यात आला. याबाबत किरण गुजर म्हणतात, बारामतीचा विकास हा 1988 नंतरचा आहे हे कोणीही नाकारणार नाही. 1980च्या दरम्यान बारामतीत कोणतीच विकासकामे नव्हती. पवार साहेबांनी जनसंघासारख्या जातीयवादी पक्षासोबत जाऊन पुलोद सरकार स्थापन केल्याने आमचा प्रचाराचा तो महत्त्वाचा मुद्दा होता.
ही सगळी परिस्थिती पाहून वसंतदादा पाटील यांच्या मंत्रीमंडळातील महाराष्ट्र राज्याचे पहिले उपमुख्यमंत्री नाशिकराव तिरपुडे यांनी आग्रह धरला की, इंदिराजींनी शरद पवार यांच्या विरूद्ध सभा घ्यायलाच हवी. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांना मात द्यायची म्हणून इंदिरा गांधी बारामतीत आल्या. जवळपास लाख-दीड लाख लोक त्याकाळी या सभेला उपस्थित होते. शरद पवार मोठ्या मताधिक्याने पडतील, असा अंदाज वर्तविला जात होता. प्रत्यक्षात मात्र त्यांना 54929 मते मिळाली आणि मारूतराव चोपडे यांना 26550 मतांवर समाधान मानावं लागलं. इंदिरा गांधी यांच्यासारख्या बलाढ्य नेत्या बारामतीत येऊनही शरद पवार मोठ्या फरकाने निवडून आले.

 

हा लेख ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

यावेळी आणखी एक घटना घडली होती. इंदिरा गांधी यांच्या सभेत त्यांच्या पक्षाचे उमेदवार असलेले मारूतराव चोपडे त्यांच्या पाया पडले. भर सभेत इंदिराबाईंच्या पाया पडल्याने त्यांच्यावर बरीच टीकाटिपण्णी झाली होती. देशाच्या आणि पक्षाच्या एक महत्त्वाच्या नेत्या म्हणून त्यांच्याकडून हे कृत्य घडले होते मात्र मतदारांना ते रूचले नव्हते.
येत्या 29 तारखेलाही देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी शरद पवार यांच्या विरूद्ध प्रचारसभा घेण्यासाठी बारामतीत येत आहेत. बारामतीतून पवारविरोधी जनमत असले, त्यांच्या विरूद्ध प्रचारासाठी कोणीही आले तरी ऐनवेळी त्यांचीच सरशी होते, असा आजवरचा अनुभव आहे. यंदा मात्र सगळीच समीकरणे बदलली आहेत. शरद पवार यांची मुलगी आणि सूनबाई अशी लढत असल्याने काय घडते ते पाहणे औत्सुक्याचे आहे.
– घनश्याम पाटील
7057292092
(दैनिक पुण्य नगरी, 23 एप्रिल 2024)

चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email - Chaprak Email ID

One Thought to “इंदिरा गांधी यांची सभा झाली; पण…”

  1. Pralhad Dudhal

    प्रसंगांनुरूप लेखन

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

हे ही अवश्य वाचा