महाराष्ट्राची धडाडती तोफ अशी ओळख असलेल्या एका युवा नेत्याची पुण्यात सभा होती. त्यांच्या सभांना अलोट गर्दी असायची. व्यासपीठावर ‘सर’ अशी ख्याती असलेले ज्येष्ठ नेते उपस्थित होते. युवा नेत्याने सभेच्या सुरूवातीलाच एक किस्सा सांगितला. तो सांगताना त्यांनी संबंधित प्रत्येक नेत्याच्या आवाजाची, लकबीची हुबेहुब नक्कल केली. ते म्हणाले, ‘‘पुण्यातला एक पत्रकार दिल्लीत गेला. त्याला वाटलं आपण राजधानीच्या शहरात आलोय तर काही नेत्यांच्या मुलाखती घेऊया! तो सर्वप्रथम सोनिया गांधी यांच्या 10 जनपथवर गेला. मोठ्या मुश्किलीने त्याने तिथे युवा नेते असलेल्या राहुल गांधी यांची मुलाखतीसाठी वेळ मिळवली. त्याने त्यांना एकच प्रश्न विचारला, ‘‘राहुलजी, दो और दो कितने हुए?’’
हा प्रश्न ऐकताच राहुल विचारात पडले. ते म्हणाले, ‘‘हमारे जो घटक पक्ष है उनसे पुछना पडेगा. ममताजी, बहन मायावती, जयललिताजी, नितीशकुमार, लालूजी इन बससे बात करनी पडेगी. सोनियाजी से पूछना पडेगा. बाद में आपके सवाल का जवाब दूँगा.’’
पत्रकार निराश झाला. तो लालूप्रसाद यादव यांच्याकडे गेला. त्यांनाही त्याने विचारले, ‘‘दो और दो कितने हुए?’’
ते म्हणाले, ‘‘उसका क्या है… बिहार की सरकार अब राबडीदेवीजी देखती है. आप उन्हीसे पुछना दो और दो कितने होते है?’’
या पत्रकाराने दिल्लीतील सर्वपक्षिय नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या. प्रत्येकाला हाच प्रश्न विचारला आणि त्या प्रत्येकाने एकमेकांवर ढकलत याची बोळवण केली. त्यामुळे पत्रकाराला वाटलं, हे सगळे इतक्या सामान्य प्रश्नाच्या उत्तरासाठी टाळाटाळ करत आहेत. आपण एखाद्या अभ्यासू नेत्याला भेटूया. म्हणून त्याने पंडित अटलबिहारी वाजपेयी यांचे घर गाठले. त्यांनाही त्याने हाच प्रश्न विचारला. अटलजींनी मोठा पॉझ घेतला आणि म्हणाले, ‘‘आडवणीजीसे बोलना पडेगा. आरएसएस की राय लेनी पडेगी. बाद में मै आपको बताऊंगा दो और दो कितने होते है!’’
आता मात्र पत्रकार अस्वस्थ झाला. त्याला वाटलं, दिल्लीत फक्त मराठी नेत्यांनाच नव्हे तर मराठी पत्रकारांनाही छळलं जातं. त्यांना काहीच किंमत नसते. छोट्या-छोट्या प्रश्नांच्या उत्तरासाठीही मरमर करावी लागते. उद्विग्न आणि चिंताग्रस्त अवस्थेत असताना त्याला वाटलं आता शेवटचा पर्याय म्हणून आपल्या मराठी नेत्याला भेटूया. त्यामुळे तो शरद पवार यांच्याकडे गेला. पवार साहेबांनी त्याची अस्वस्थता बघून आस्थेनं विचारलं, ‘‘काय रे, एवढा का चेहरा उतरलाय? काय झालं? काही त्रास होतोय का? काही मदत हवीय का?’’
हा लेख ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
त्यावर चिंतातूर स्वरात तो पत्रकार म्हणाला, ‘‘काय सांगू साहेब! दिल्लीतल्या सगळ्या नेत्यांना एक साधा प्रश्न विचारला पण त्याचे कोणीच उत्तर देत नाही. आता मराठी भाषेचा अभिमान म्हणून सर्वात शेवटी तुमच्याकडे आलोय. तुम्हीच माझ्या प्रश्नाचे उत्तर द्या. दोन अन दोन किती?’’
त्यावर क्षणाचाही विलंब न करता साहेब म्हणाले, ‘‘हात्त तेरे की! इतका साधा प्रश्न होय? मला आधी सांग, दोन द्यायचे की दोन घ्यायचेत…? म्हणजे त्यानुसार तुझ्या प्रश्नाचे उत्तर मी लगेच देतो.’’
हा किस्सा ऐकताच श्रोत्यांचा हास्याचा लोट उसळला. हे ऐकून व्यासपीठावरील ज्येष्ठ नेते म्हणाले, ‘‘अरे, मीही दिल्लीतच असतो. हा पत्रकार मला का भेटला नाही? मी त्याला त्याच्या प्रश्नाचं उत्तर नीट समजावून सांगितलं असतं.’’
त्यावर हे युवा नेते म्हणाले, ‘‘त्याचा काय उपयोग? इतके अनुभव गाठीशी असताना त्याच्या लक्षात आलं होतं की, दिल्लीत असल्यानं प्रश्न तुम्हाला विचारला तरी उत्तर तुमच्या पक्षनेत्यांच्या परवानगीनेच मिळणार आहे!’’
– घनश्याम पाटील
7057292092
दैनिक पुण्य नगरी, 25 एप्रिल 2024