धक्का – संजय संत 

Share this post on:

आपल्याला आयुष्यात अनेक सुखद, दु:खद, चांगले, वाईट, हवेसे, नकोसे धक्के बसतच असतात. काही व्यक्तिगत असतात व काही सामाजिक व राजकीय असतात. सामाजिक व राजकीय हे आपल्याला जरी धक्के वाटत असले तरी ते बरेचसे पूर्वनियोजित कवा प्रयत्नपूर्वक असतात. हा एक डावपेचांचा भाग असतो. धकाधकीचे जीवन हा शब्द ‌‘धक्का‌’ यावरूनच आला असावा. मुंबईकरांना तर धक्का हा रोजच्या जीवनातला अविभाज्य घटक बनला आहे. मोकळ्या लोकल कवा बेस्ट बसमधून प्रवास करताना चुकल्यासारखेच होत असेल. धक्क्याला लागणे असाही एक वाक्‌‍प्रचार वेगळ्या अर्थाने रूढ आहे. जहाजे कवा गलबते, छोट्या होड्या यांच्या जाण्या-येण्याच्या  काठाला सुद्धा ‌‘धक्का‌’ असेच म्हणतात. नाहीतरी जहाजांना बंदरावरून एक धक्का देऊनच समुद्रात सोडले जाते. पुढे लिहिलेले माझे अनुभव हे बरेचसे व्यक्तिगत आहेत. आपणा सर्वांना सुद्धा असेच काही अनुभव येत असतील.

एप्रिल 1976 मध्ये मी दहावीची बोर्डाची परीक्षा दिली होती. तसा शालेय जीवनात मी अभ्यासात बरा होतो. साहित्य, संगीत, कला यांची आवड व समज त्या त्या वयाप्रमाणे होती. मराठी हा अत्यंत आवडीचा विषय होता. पुस्तके आणल्यावर पहिल्या महिन्यातच माझे मराठीचे पुस्तक संपूर्ण वाचून होत असे. एवढेच काय तर पुढच्या इयत्तेतील माझ्या परिचित मित्राचे सुद्धा मराठीचे पुस्तक मी वाचत असे. मला अजून आठवते; मराठीचा बोर्डाचा पेपर होता. मी मोठ्या आनंदाने पेपरला गेलो. संपूर्ण तीन तास पेपर लिहिला. काय लिहिला कुणास ठाऊक! कारण तीन तास लिहून सुद्धा मी फक्त 40 मार्कांचा पेपर सोडवला होता. काय झाले असेल हे काहीच कळले नाही. त्यामुळे माझ्या अत्यंत आवडीच्या विषयात मला मार्क होते 100 पैकी फक्त 35! पण वाचलो, कारण 35 च्या खाली मार्क मिळाले असते तर वर्ष वाया गेले असते, जे शालेय जीवनात कधीही घडले नव्हते व तशी शक्यता नव्हती. नंतर कधीही मराठीबाबत काही बोलले तर ‌‘आपले दहावीचे मार्क आठवा‌’ असा घरचा आहेर मिळत असे.

याउलट गणित हा विषय. माझे गणित कधीच चांगले नव्हते. खूप कठीण वाटायचे. दहावीला आम्हाला बीजगणित व भूमिती मिळून (75 + 75) 150 मार्कांचा पेपर असे. माझा शाळेत नेहमीच गणिताचा पेपर लवकर सोडवून होत असे कारण उत्तर येणारे प्रश्न थोडेच असत. भूमिती थोडी जमायची पण बीजगणित अवघडच! आलेख-पॅराबोला वगैरे जमायचे पण त्याची समीकरणाने कमत काढावयाची असते ते काही जमायचे नाही.  दहावीला मी त्यावेळच्या सुप्रसिद्ध नागनाथ पाराजवळच्या ‌‘नाना क्लास‌’ला जात असे. गुरुवर्य नाना आगाशे सर बीजगणित व त्यांचे चिरंजीव प्रा. अनिल सर हे भूमिती शिकवत असत. विद्यार्थ्यांना सराव होण्यासाठी बोर्डाच्या धर्तीवर वर्षात क्लासमध्ये 2/3 परीक्षा घेत असत. या क्लासच्या मुलांनी बोर्डात पैकीच्या पैकी मार्क मिळवलेले होते. क्लासच्या परीक्षेत मी कधीही पास झालो नाही. खूप कठीण परीक्षा असे पण असे असूनही मला बोर्डाच्या परीक्षेत दहावीला गणितात 150 पैकी 78 मार्क मिळाले. म्हणजे पन्नास टक्क्यांच्या वर. मी फार खूश झालो. मला तर गणितातील ‌‘रँग्लर‌’ पदवी मिळाल्याचा आनंद झाला. नाना आगाशे सर शिकवण्यात अत्यंत कडक शिस्तीचे होते पण इतरवेळी अतिशय प्रेमळ होते, व्यासंगी  होते. क्लासमध्ये शेवटची पाच मिनिटे शेरलॉक होम्सच्या गोष्टी सांगत. क्लासचे  गॅदरिग असे. त्यामध्ये इतर कार्यक्रमाबरोबर डीप्स या व्यायाम प्रकाराच्या स्पर्धा असत. आमच्यावेळी आजचा सुप्रसिद्ध तबलावादक सुभाष कामत हा पहिला आला होता. क्लासमध्ये व थिएटरमध्ये इंगजी सिनेमे दाखवीत असत. नानांकडे एक प्रायव्हेट रिक्षा होती. ती नाना स्वतः चालवत असत. मागे नातवंडाना बसवून पर्वतीला जात असत. आमच्या वाड्यातील लष्करातील निवृत्त मिशावाले फडके काका हे नानांचे  मित्र होते. क्लासच्या सर्व कार्यक्रमात व परीक्षेत ते असत. क्लासची परीक्षा झाली की फडके काका मला नेहमी विचारत की, “संज्या किती मार्क मिळाले?”

मी सांगायचो, “अजून कळाले नाहीत!”

कारण सांगण्यासारखे मार्क नसायचे. शिक्षण संपल्यावर, अनेक वर्षे नोकरी झाल्यावर सुद्धा मला अनेक वर्षे एक स्वप्न पडत असे. मी शाळेत बाकावर वसलो आहे, गणिताचा पेपर आहे व फारसे काही येत नाहीये. असो!

काही वर्षांपूर्वी मी ‌‘पं. कुमार गंधर्व : एक अखंड आनंदानुभव‌’ असा छोटा लेख लिहिला होता व एका आघाडीच्या दैनिकाला मेलवर पाठवला. माझी कुणाशी ओळख नव्हती. त्यामुळे छापला जाईल असे नव्हते पण माझ्या मनातले कागदावर उतरले होते याचा मला आनंद होता. एका रविवारी सकाळी श्री. वामनराव कोल्हटकर यांचा मला फोन आला. (वामनराव कोल्हटकर हे गणित-विज्ञान  याचे जाणकार आहेत. तसेच ते कीर्तनकार व घनपाठी वैदिक आहेत.) मी रविवारच्या झोपेत होतो. त्यांच्या फोनमुळे उठलो. मला म्हणाले, “तुझा कुमार गंधर्व यांच्यावरील लेख चांगला आहे.”

मला कळेना. तर ते म्हणाले, “वृत्तपत्र पहा.”

मग माझ्या लक्षात आले. माझा संपूर्ण लेख न काटता छापला होता.

त्यानंतर काही वर्षांनी माझे मित्र व कुमार गंधर्व यांचे शिष्य विजय सरदेशमुख यांचे निधन झाले. त्यांच्यावर मी ‌‘स्वरदेशमुख‌’ हा छोटा लेख लिहिला व एका शनिवारी दुपारी 4-30 च्या सुमारास पुन्हा त्या वृत्तपत्राकडे मेलने पाठविला. ओळख नव्हतीच.

दुसऱ्या दिवशी रविवारी माझे मित्र व तबलावादक आणि विजय सरदेशमुख यांचे मेहुणे श्री. उल्हास कुलकर्णी यांचा मला सकाळी फोन आला. “लेख छान आहे.”

मी कोड्यात! कारण कोणीही तो वाचला नव्हता. शनिवारी दुपारी पाठवून, दुसऱ्या दिवशी रविवार असून, ओळख नसताना सुद्धा हा लेख आला होता. मी उल्हास यांना विनोदाने म्हटले की, “संध्याकाळी लिहीलेले दुसऱ्या दिवशी वृत्तपत्रात छापून येणारा गोवदराव तळवलकर यांच्या नंतर मीच असेन.”

पु. ल. देशपांडे व सुनीताबाई देशपांडे यांच्याशी आमचे रामभाऊ कोल्हटकर साहेब यांच्यामुळे माझा परिचय होता. एकदा मी त्यांच्या पुण्यातील भांडारकर रोडवरील ‌‘मालती माधव‌’ इमारतीतील पहिल्या मजल्यावर असलेल्या निवासस्थानी गेलो होतो. सुनीताबाई बाहेरच्या हॉलमध्ये आलेल्या गृहस्थांशी बोलत होत्या. मी गेल्यावर मला त्यांनी ‌‘बस‌’ अशी हाताने खूण केली. बहुतेक त्यांचे बोलणे झाले असावे. आलेले गृहस्थ साधी पँट व हाफ बुशकोट, थोडे कुरळे केस कपाळाच्या बरेच मागे गेलेले, डोळ्याला नाजूक फ्रेमचा चष्मा या पेहरावात होते. सुनीताबाईंनी मला विचारले, “यांची ओळख आहे का?” अर्थात माझी ओळख नव्हतीच. मी ‌‘नाही‌’ म्हणालो. त्यावर त्यांनी त्या गृहस्थांना सांगितले की, “हे आमचे स्नेही संजय संत.”

sunitabai deshpande

मी त्यांना आदराने नमस्कार केला. वयाने मोठी व्यक्ती होती. नंतर त्यांची ओळख करून दिल्यावर कळाले की ती व्यक्ती वयाने आणि सर्वार्थाने मोठी होती. ते होते ‌‘महाराष्ट्र टाईम्स‌’चे व्यासंगी संपादक गोवदराव तळवलकर साहेब! नंतरच्या काळात आमच्या साहेबांमुळे गोवदराव तळवलकर यांच्याशीही चांगली ओळख झाली होती. ते अमेरिकेत असत. भारतात आले की पुण्यात आमच्याकडे नेहमी येत असत. एकदा ते बरेच दिवस पुण्यात राहिले होते. त्यामुळे ओळख आणखी चांगली झाली होती. परत जाताना त्यांना काहीतरी भेट द्यावी असे मनात आले पण काय द्यावे हाही प्रश्नच होता. तो माझ्या संगीताच्या आवडीने सोडविला. मी गोवदरावांना बालगंधर्वांच्या 100 पदांची सी.डी. भेट दिली. त्यानंतर ते अमेरिकेला गेल्यावर काही दिवसांनी मेल आली की, ‌‘सी. डी. छान आहे, रेकॉर्डिंग चांगले आहे. पूर्वी कोणीतरी मला बालगंधर्वांच्या पदांची कॅसेट दिली होती ते रेकॉर्डिंग वाईट होते, तुमचे मला फार आवडले, धन्यवाद!‌’

मी एका लग्नाला श्रीक्षेत्र नृसिंहवाडी (बोलीभाषेत नरसोबाची वाडी) ता. शिरोळ, जि. कोल्हापूर येथे गेलो होतो. वरपक्ष एका शहरातला तर वधूपक्ष दुसऱ्या शहरातला. तरीही हट्टाने श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथे विवाह का योजला होता, हे मला अजून कळलेले नाही. दोन्ही पक्षांपैकी कोणाच्याही गावाला कितीतरी चांगल्या पद्धतीने लग्न करता आले असते. तरीही वाडी! सर्व तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी फक्त लोकांच्या धार्मिक भावना या भांडवलावर सर्व कार्ये होत असतात. सोयींचा काहीही विचार नसतो व खर्च काही कमी नसतो.

या लग्नात मी असताना मला पुण्याच्या एका दैनिकाच्या ऑफीसमधून एक फोन आला की, “मुकुंद संगोराम सरांनी एक पुस्तक तुम्हाला द्यायला सांगितले आहे व अमूक एक तारखेपर्यंत याचे परीक्षण लिहून द्यावे.”

मी संभ्रमात पडलो कारण मुकुंद संगोराम माझे अनेक वर्षे चांगले मित्र आहेत पण याविषयी आमचे काहीच बोलणे झाले नव्हते. मी फोन केलेल्या व्यक्तिला विचारले, “नक्की माझेच नाव सांगितले आहे का?” तर त्यांनी होकार दिला. दुसऱ्या दिवशी पुस्तक माझ्याकडे आले. तोपर्यंत कुठले पुस्तक आहे याबद्दल मला काहीच माहीत नव्हते. पुस्तक पाहिल्यावर मला आश्चर्य वाटले. पुस्तक होते ‌‘ध्वनिमुद्रिकांच्या दुनियेत!‌’ लेखक होते माझे सोलापूरचे मित्र व ध्वनिमुद्रिका संग्राहक श्री. जयंतराव राळेरासकर आणि प्रकाशक श्री. अरुण जाखडे , पद्मगंधा प्रकाशन, पुणे. यांच्याशीही माझे मैत्रीपूर्ण संबंध होते. मी जयंतरावांना फोन केला की “तुमचा बायोडेटा पाठवा, कशासाठी ते नंतर सांगतो.”

आमची चांगली मैत्री असल्याने त्यांनी तो पाठवला. त्यावर मी परीक्षण लिहून पाठविले. ते त्या वृत्तपत्रात छापून आले. नंतर जयंतरावांना सांगितले. ते खूश झाले. त्यांना हे अनपेक्षित होते.

आजच्या मोबाईलच्या जमान्यात तार कवा टेलिग्राम हे शब्द कालबाह्य झालेले आहेत. आज त्याचा अर्थही कळणार नाही. एकेकाळी याला फार महत्त्व होते. खेडोपाड्यात संदेश जात असे. अभिनंदनाच्या तारा थोड्या व निधनाच्या जास्ती असत. त्यामुळे तार आली की नक्की वाईटच बातमी असणार हे गृहीत धरले जायचे व शोक प्रदर्शनाला सुरूवात व्हायची. मग थोडेसे हुशार असलेल्या व्यक्ती सांगायच्या ‌‘अरे आधी वाचा तरी.‌’ असा सर्व मामला होता. कट्ट कडकट्ट या सांकेतिक भाषेत तार मशिनवरून संदेश पाठवत असत. आमच्या शनिपाराच्या घरासमोर 1951 साली बांधलेली पी.एम.सी.ची बिल्डींग आहे. यात वरच्या मजल्यावर टेलिग्राफ ट्रेनगचे प्रशिक्षण देत असत. त्यामध्ये शिकणारे श्री. शाळू व श्री. शिकारखाने हे आमच्या वाड्यातल्या खोलीत भाड्याने राहत होते. मी शाळेत होतो. हे दोघे आमच्या मित्रांबरोबर क्रिकेट खेळायला येत असत. आम्ही सर्व दर रविवारी एस. पी. कॉलेजच्या ग्राऊंडवर जात असू. त्यावेळी सर्वांना खेळण्यास मुक्तद्वार असे.

त्यानंतर सुमारे 25 वर्षांनी निगडी येथील शाळू एजन्सी या प्रिमीअर पद्मिनी या चारचाकी गाडीच्या शो रूममध्ये जाण्याचा योग आला. सांगली येथील माझे साडू श्री. सुमेध हर्डीकर यांना गाडी घ्यायची होती. ते एल.आय.सी.मध्ये अधिकारी होते.

शाळू हे नाव तसे कॉमन नाही. त्यामुळे मला टेलिग्राफ ट्रेनगचे प्रशिक्षण घेणारे शाळू आठवले. गाडी घ्यायला गेलो तर तसाच चेहरा वाटला. सर्व व्यवहार झाल्यावर मी त्यांना ओळख सांगितली. त्यावर ते अचंबित झाले कारण तीच व्यक्ती होती.

कुठे टेलिग्राफ ट्रेनग आणि कुठे प्रिमीअर पद्मिनीची एजन्सी. सर्वच धक्कादायक!

पं. कुमार गंधर्व यांची गाणी ऐकणे, जमवणे, रेकॉर्ड, कॅसेट, सी.डी. सर्व स्वरूपात जमा करणे ही माझी व आमच्या मित्रांची आवड होती. त्यामुळे नव्याबरोबर जुन्या बाजाराच्या चकराही नेहमी होत असत. माझे कुमारप्रेमी ज्येष्ठ मित्र श्री. गिरीश चाफेकर व मी आम्ही एका रविवारी जुन्या बाजारात जायचे ठरविले. जायच्या आधी आमची चर्चा झाली की ‌‘कुमारजींची मालवती-मंगल दिन आज‌’ व ‌‘सोहनी भटीयार-म्हारुजी भुलो ना माने‌’ याचे रेकोर्डिंग आपल्याकडे आहे पण प्रत्यक्ष रेकॉर्ड नाहीये.

1961 साली एचएमव्ही कंपनीने प्रसिद्ध केलेली अतिशय सुंदर अशी 45 स्पीडवर चालणारी इपी रेकॉर्ड आहे. यात तबला सुप्रसिद्ध गायक वसंतराव देशपांडे (रेकॉर्डवर व्ही. देशपांडे, पुना) यांनी वाजवला आहे. त्यादिवशी आम्ही बाजारात गेलो आणि काय आश्चर्य! एका गठ्ठ्यात आम्हाला ती बरी कंडीशन असलेली रेकॉर्ड मिळाली. रेकॉर्डिंग आणि प्रत्यक्ष रेकॉर्ड ऐकणे यात खूप फरक आहे. तो प्रत्यक्ष अनुभवायलाच हवा.

पु. ल. देशपांडे आणि सुनीताबाई देशपांडे यांच्याशी माझा थोडा परिचय होता. आमचे श्रेष्ठी श्री. रामभाऊ कोल्हटकर साहेब यांच्यामुळे तो झाला होता. एके दिवशी मी सहज सुनीताबाईंना म्हणालो की, “रविवार पेठेत पुरोहित स्वीट्स नावाचे दुकान आहे. तिथे मटार पॅटीस फार छान व नेहमी फ्रेश मिळतात.”

सुनीताबाई काही एवढ्या खवय्या नाहीत, तरीही त्या म्हणाल्या की “अमुक तारखेस संध्याकाळी 7 वाजता इतके मटार पॅटीस घेऊन याल का?” मी लगेच ‌‘हो‌’ म्हटले पण त्यांच्या स्वभावाप्रमाणे त्या लगेच म्हणाल्या की “त्याचे पैसे माझ्याकडून लगेच घ्यायचे.”

मी सांगितले “अहो फार पैसे होणार नाहीत!” पण त्या थोड्याच ऐकणार? मी ‌‘हो‌’ म्हणून विषय संपविला.

ठरल्याप्रमाणे वेळेवर मी गेलो. भांडारकर रोडवरील मालती-माधव या इमारतीत पहिल्या मजल्यावर. पाहतो तर काय साक्षात ज्येष्ठ कवयित्री शांताबाई शेळके त्यांच्याकडे आल्या होत्या. मधु गानू होतेच तसेच प्रा. प्रकाश भोंडे व उदय चिपलकट्टीही होते. मी प्रसंग पाहिल्यावर दारातच पार्सल सुनीताबाईंकडे दिले व निघालो अर्थात पैसेही त्यांनी तयार ठेवले होते. ‌‘जातो‌’ म्हटले तर त्या म्हणाल्या “अहो थांबा, आज मुद्दाम तुम्हाला सांगितले होते व निमंत्रणही आहेच.”

तरीही मी संकोचून म्हणालो, “ठरलेल्या कार्यक्रमात मी कशाला?”

तरीही त्या म्हणाल्या, “तुम्हाला मला बोलवायचे आहे.”

मग माझा नाईलाज झाला. त्या दिवशी शांताबाई शेळके यांचा वाढदिवस होता. मधु गानू यांनी शांताबाईंच्या आवडीचे ‌‘सर्व‌’ आणले होते. छोटेखानी पार्टी होती. कॅम्पमधील सुप्रसिद्ध ‌‘दोराबजी‌’मधून जेवण मागविले होते. खूप मजा आली. शांताबाई, सुनीताबाई यांची कवितांची व साहित्याची जुगलबंदी ऐकायला मिळाली. शांताबाईंशी गप्पा मारता आल्या. “माझ्याकडे कवी गिरीश, यशवंत, सोपानदेव यांच्या आवाजातल्या कवितांच्या 1940 सालातल्या 78 आर.पी.एम.च्या रेकॉर्ड आहेत,” हे ऐकल्यावर शांताबाईंना अत्यंत आनंद झाला. त्या म्हणाल्या की, “मी लवकरात लवकर तुमच्याकडे येईन व ऐकेन,” असे म्हणल्यावर मलाही फार आनंद झाला परंतु योग काही आला नाही.

1984-85 सालाच्या दरम्यान आम्ही मित्रांनी सोलापूर, तुळजापूर, पंढरपूर, अक्कलकोट, गाणगापूर अशी कारने ट्रीप काढली होती. निमित्त असे झाले की माझे मित्र श्री. नितीन मुळे यांच्या कुटुंबाने पंढरपूरच्या विठ्ठलाची महापूजा करण्याचे योजले होते कारण काय ते अद्यापही माहीत नाही. महापूजा अत्यंत छान झाली. त्यावेळी इतकी गर्दी नसावी कारण आम्ही आदल्या दिवशी सुद्धा सहज दर्शन करून आलो. एखाद्या साध्या देवळात जातो तसे. दुसऱ्या दिवशी सकाळी महापूजा होती. त्यावेळी सर्व वेळ तेथे उपस्थित राहता आले. आजची धक्काबुक्की व दर्शनबारी पहिली की हे खरेच वाटत नाही. त्यामुळे त्यावेळी इतके सुंदर व मनापासून दर्शन झाल्यामुळे पुन्हा कधीही पंढरपूरला जाण्याची इच्छा झाली नाही. विशेष म्हणजे मला माझ्या आईला बरोबर घेऊन पंढरपूरला जाता आले. त्यानंतर आम्ही तुळजापूरला गेलो. चांगली गर्दी होती. आम्हा सर्वांची अशी मनोधारणा होती की फार मोठ्या लायनीत थांबायचे नाही आणि पैसे देऊन दर्शन घ्यायचे नाही. बाहेरून नमस्कार करून पुढे जायचे. एवढ्यात कोणीतरी एक व्यक्ती आमच्याकडे आली व म्हणाली, “चला तुम्हाला एका दरवाज्याने घेऊन जातो व लगेच दर्शन घडवतो.”

अर्थात आम्ही नकार दिला. त्यांनी फारच आग्रह केला. आम्ही  गेलो, दर्शन झाले आणि विशेष म्हणजे त्यांनी एकाही पैशाची मागणी केली नाही. असेही घडले होते.

पं. भीमसेन जोशी यांचा 4 फेब्रुवारी हा जन्मदिवस. तिथीने रथसप्तमी. (रथसप्तमीला आपल्याकडे घराच्या दाराबाहेर सुगड्यात दूध उतू घालविण्याची पद्धत आहे. त्यामुळे कधी घरी गॅसवर दूध उतू गेले की माझ्या मनात नेहमी येते की झाला भीमसेनजींचा वाढदिवस साजरा) एका वाढदिवसाला सकाळी त्यांच्या घरी गेलो होतो. माझ्या बरोबर आमच्या ऑफिस मधील माझे सहकारी मित्र श्री. प्रशांत भागवत यांचे वडील सुभाष भागवत होते. त्यांना आम्ही सर्वजण सुभाषमामा म्हणत असू. त्यांचा स्वभाव असा होता की, त्यांची लगेच सर्वांची मैत्री होत असे. हे कुटुंब सांगली जिल्ह्यातील किर्लोस्करवाडीचे. तेथे त्यांचा वडिलांपासून विमा प्रतिनिधीचा उत्तम व्यवसाय होता. फार मोठा जनसंपर्क. सुभाषमामा काही गाण्यातले नव्हते पण रामभाऊ कोल्हटकर साहेबांनी त्यांना खूपच आग्रह केला त्यामुळे ते आले. त्यांच्या बरोबर त्यांचे मित्र श्री. जालीहाल होते. आम्ही सर्वजण गेलो. त्यावेळी भीमसेनजींची प्रकृती फारशी बरी नव्हती; पण स्मरणशक्ती उत्तम होती. मी नमस्कार केला व माझे नाव सांगितले. त्यावर ते एकदम म्हणाले, “मी तुम्हाला ओळखतो व मला नाव माहीत आहे.” मी आनंदात. सुभाषमामा व जालीहाल यांची ओळख करून दिली त्यावर ते जालीहाल यांच्याशी कानडीत बोलू लागले व तिकडच्या काही व्यक्तिंची आठवण काढली.

1981 ते 1986 या काळात मी मुंबईला विक्रीकर खात्यात काम करत होतो. एम.पी.एस.सी.ची क्लेअरीकल / टंकलेखक या पदाची परीक्षा मी पास झालो होतो. त्यामुळे मला जेमतेम 20/21 व्या वर्षीच नोकरी मिळाली होती. बी.कॉम.ची परीक्षा झाल्यानंतर एक-दोन महिन्यातच ही नोकरी सुरू झाली. बेकार असा राहिलोच नाही. सुरूवातीला मी माझगाव येथील मुख्यालयात होतो व नंतर लालबाग-परळ येथील छोट्या ऑफिसमध्ये होतो. मी वरळी येथे ॲनी बेझंट रोडच्या मागील रोडवर, पासपोर्ट ऑफिससमोर राहत होतो. माझी मावस बहीण सौ. मनीषा जोशी यांच्याकडे. ती मुंबई महानगरपालिकेत नोकरी करत होती व माझे मेव्हणे श्री. जयंतराव जोशी हे केंद्र सरकारच्या जनगणना कार्यालयात होते. या छोट्या घरात माझी 5 वर्षे अतिशय आनंदात व सुखात गेली. मनीषा व जयंतराव म्हणजे माझे दुसरे आईवडिलच आहेत. अत्यंत प्रेमाने दोघांनी आपल्या मुलाप्रमाणे मला सांभाळले.

शनिवारी कवा दुसऱ्या व चौथ्या शनिवारी सुट्टी असल्यामुळे शुक्रवारी 5-10 च्या डेक्कन क्वीनने पुण्यात येत असे व सोमवारी सकाळी 7-10 च्या डेक्कन क्वीनने मुंबईला जात असे. त्यासाठी ऑफिसमधून शनिवारी थोडे लवकर निघावे लागत असे व सोमवारी थोडा उशीर होत असे. याची परवानगी मी घेतली होती. श्री. प्र. रा. लिमये नावाचे माझे वरिष्ठ अधिकारी होते. स्वभावाने कडक होते पण लहरी नव्हते. एक दिवस मला अचानक म्हणाले की, “शनिवारी तुम्हाला लवकर जाता येणार नाही व सोमवारी सुद्धा वेळेत यावे लागेल.”

प्रसंग बघून त्यावेळी मी काहीच विचारले नाही. त्यावेळी दुसऱ्या गाडीने जाऊन वेळेत गेलो व आलो. असे काय झाले मला कळेना कारण त्यांनीच मला परवानगी दिली होती. पुढचा शनिवार आला. लिमये साहेबांनी मला केबिनमध्ये बोलावले आणि म्हणाले “अहो 4-30 वाजत आले तुम्ही अजून गेला नाहीत! गाडी चुकेल ना!” मी संभ्रमात पडलो. मागील काही न विचारात घेत मी म्हणालो, “जातो सर!” त्यावर ते मला “हॅपी जर्नी” म्हणाले. मागच्या वेळी सरांचे कुठे काही तरी बिनसले असावे. रोजच्या जीवनात घडणाऱ्या प्रसंगांचा अधिकारी असले तरी कामावर परिणाम होतच असतो.

परळला ऑफिस शेजारी राजकमल स्टुडिओ होता. त्यामुळे फिल्म इंडस्ट्रीमधील नामवंत जाता येता सहज दिसत असत. पांढऱ्या फरकॅपमधले व्ही. शांताराम तथा शांताराम बापू त्यांच्या मागे दोन पंख असलेल्या कॅडीलॅक या आलिशान गाडीमध्ये बसलेले दिसत असत. ही गाडी त्यांच्या काही सिनेमात सुद्धा दिसते. मी त्यावेळी राहायला वरळी-प्रभादेवीच्या सीमेवर होतो. एके दिवशी सहज फिरत असताना सेंच्युरी बझारच्या सिग्नलला होतो. लाल सिग्नल असल्यामुळे गाड्या थांबल्या होत्या. एका गाडीवर नजर गेली. चेहरा ओळखीचा वाटला. थोडा ताण दिल्यावर लक्षात आले की तो त्यावेळचा सुप्रसिद्ध हिरो विनोद मेहरा होता. दादरच्या बॉम्बे फिल्म लॅबच्या आवारात पठाणी ड्रेस घातलेले अमजद खान दिसले.

नितीन रानडे हा माझा खास मित्र आहे. अनेक वर्षे आमची भेट होत नाही पण त्याने आमच्या मैत्रीत काही फरक पडत नाही. नितीन रानडे हा माझ्यानंतर दोन-तीन वर्षांनी विक्रीकर कार्यालयात मुंबई येथे रुजू झाला. तो संगीत, साहित्यप्रेमी असल्याने आमची मैत्री लगेच झाली. तो अहमदनगर येथून आला होता. तो तबला वाजवत असे व त्यांच्या मातोश्री कीर्तन करत असत. तसेच त्याचे चुलत घराणे पुण्यात होते. हा ही एक मैत्रीचा धागा होता. आमच्या ऑफिसमध्ये श्री. मधुकर परांजपे व त्यांच्या पत्नी होत्या. ते दोघे आमच्यापेक्षा खूप मोठे होते पण आवडी समान असल्याने आमची मैत्री होती. ते दादरच्या नायगाव भागात प्रसिद्ध असलेल्या अहमद सेलर इमारत समूहातील एका इमारतीत राहत होते. मी 1986 मध्ये ही नोकरी सोडली. नितीनने मात्र सेवानिवृतीपर्यंत केली. तो बदलापूर येथे राहत होता. नंतर कधीतरी मला एकदा आमच्या ‌‘कैलास जीवन‌’च्या कामासाठी अहमदाबादला जायचे होते. मुंबईहून संध्याकाळची रेल्वे होती. रविवार होता. मी पुण्याहून सकाळी नेहमीच्या माझ्या आवडीच्या डेक्कन क्वीनने दादरला गेलो. विचार केला की मधुकर परांजपे यांच्या घरी जावे, गप्पा माराव्यात व संध्याकाळी रेल्वे पकडावी. त्याप्रमाणे मी त्यांच्या घरी गेलो. मला पाहताच परांजपे काका व काकू खूश झाले. बऱ्याच दिवसात भेट झाली नव्हती. ते म्हणाले, “संजय तुला एक सरप्राईज आहे.” मला कळेना.

त्यावर ते म्हणाले, “काल रात्री आम्ही नाटकाला गेलो होतो.”

मी म्हणालो, “ठीक आहे,” म्हणजे यात काय विशेष या अर्थाने! नंतर ते म्हणाले, “आमच्या बरोबर नितीन रानडे होता.”

तरी ‌‘सरप्राईज‌’ काय आहे ते कळेना. नंतर ते म्हणाले की, “नितीन रात्री राहायला होता व आत्ताही तो इथेच आहे. जणू काही तुला भेटायलाच थांबला आहे. तुला माहीत होते का?”

त्यावेळी फोन नव्हते त्यामुळे माहिती असण्याचा प्रश्नच नव्हता. नितीन अचानक भेटल्याने मला खूप आनंद झाला व ती सकाळ खूप मजेत गेली.

1986 साली मी पुण्यात आलो. आयुर्वेद संशोधनालय (पुणे) प्रा. लि. या सुप्रसिद्ध मल्टीपर्पज आयुर्वेदिक क्रीम ‌‘कैलास जीवन‌’ बनविणाऱ्या कंपनीत रुजू झालो ते आजतागायत आहे. कंपनीच्या कामामुळे अनेक प्रकारच्या व्यक्ती व संस्था यांच्याशी संबंध येतच असतो. आपल्या कामाचा तो एक महत्त्वाचा भाग आहे. भारतभर कैलास जीवनच्या वितरणासाठी अनेक लहान मोठ्या ट्रान्सपोर्ट कंपन्यांशी तर रोजचाच संबंध असतो. त्यांच्याशी मैत्रीच झालेली असते.

अशीच एक मोठी ट्रान्सपोर्ट कंपनी आहे. पटेल रोडवेज. यांनी सदाशिव पेठेत, कुमठेकर रोडच्या गल्लीत एक ब्रँच काढली होती. त्याच्या ओपनगनिमित्त पूजा होती. आम्हाला निमंत्रण होते. मी व आमच्या कंपनीतील माझे सहकारी व ड्रायव्हर श्री. चंद्रकांत तळेकर आम्ही दोघे गेलो होतो. तेथे गेलो तर ओपनग व्हायचे होते.

फीत लावली होती. पटेल रोडवेजच्या कर्मचारी व अधिकारी यांनी आमचे स्वागत केले. त्यातील एक अधिकारी मला म्हणाले की, “तुमच्या हस्ते फीत कापावी असे आम्हाला वाटते.”

मला आश्चर्य वाटले. तसे काहीच ठरले नव्हते. सर्व आयत्यावेळचा मामला होता! आणि मी कोण होतो? कुणीच नाही! बहुतेक त्यांचे प्रमुख पाहुणे आयत्यावेळी आले नसावेत. मी संकोचाने ‌‘नाही‌’ म्हटले पण ते ऐकेनातच. मी हा बहुमान मला नसून माझ्या ‌‘कैलास जीवन‌’ या नावाला आहे हे जाणले आणि फीत कापली.

चंद्रकांत तळेकर हा आमचा सहकारी मूळचा कोकणातला. लांजा जवळील बेनी बुद्रुक या गावचा. 1987 साली पुण्यात आमच्या कंपनीत आला. अत्यंत छोटे गाव. आला तेव्हा सायकलसुद्धा चालवता येत नव्हती. पुण्यात आल्यावर तो सायकल येत नसूनसुद्धा डायरेक्ट तीन चाकी रिक्षा टेम्पो शिकला. माल टाकू लागला. त्यानंतर तो सायकल शिकला, मग दुचाकी, चारचाकी, मोठे टेम्पो असे सर्व शिकला. हे कौतुकास्पद होते. बेनी बुद्रुक या छोट्याशा गावात जिल्हा परिषदेच्या शाळेत तो सातवीपर्यंत शिकला. आठवीपासून गावातीलच दुसरी शाळा. जिल्हा परिषदेच्या शाळेत श्री. दैवज्ञ नावाचे शिक्षक होते. त्यांनी एक फार चांगला उपक्रम शाळेत सुरू केला होता. रोज प्रार्थना झाले की एका विद्यार्थ्याने प्रतिज्ञा सांगायची व सर्व मुलांनी ती म्हणायची.

आज मराठीत, उद्या हदीत, परवा इंग्रजीमध्ये. असे कायम चालायचे. त्यामुळे सर्व मुलांना सर्व पाठ व्हायचे.  आज 40 वर्षानंतर सुद्धा चंद्रकांत तळेकर याला मराठी, हदी व इंग्रजी भाषेतील प्रतिज्ञा अस्खलित पाठ आहे. भारतातील कुठल्याही मोठ्या शाळेत सुद्धा असा उपक्रम योजला आहे असे कधी दिसले नाही. आज आपल्याला  मराठीतील प्रतिज्ञा सुद्धा आठवत असेल असे नाही. बाकी भाषेतील तर दूरच.

पुण्यातील संगीतवाद्यांचे जुने व विश्वसनीय दुकान म्हणजे एच. व्ही. मेहेंदळे ॲन्ड सन्स. कै. श्रीकृष्ण हरी तथा कृष्णराव मेहेंदळे याचे संचालक होते. सर्वजण त्यांना अप्पा म्हणत असत. ते उत्तम गायक होते. त्यांनी पुण्यातील गोपाल गायन समाजाचे श्री. गोवदराव देसाई यांच्याकडे गायनाचे शिक्षण घेतले होते. त्यावेळी सुप्रसिद्ध भावगीत गायक गजाननराव वाटवे हे सुद्धा तेथे शिकत होते. मास्तर कृष्णराव यांच्या गायकीचा अप्पांवर प्रभाव होता. ती गायकी त्यांना आवडत असे. रामभाऊ कुंदगोळकर तथा सवाई गंधर्व यांच्या पाच-सहा मैफलीत अप्पांनी गायन साथ केली होती. एच. व्ही. मेहेंदळे ॲन्ड सन्स या दुकानाला 1940 मध्ये 60 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त पुण्याच्या लक्ष्मी रोडवरील गोखले हॉल येथे सवाई गंधर्व यांचे गाणे झाले होते. त्यावेळी अप्पांनी पहिल्यांदा त्यांना तानपुऱ्यावर व गायन साथ केली होती. या गाण्याला सभागृह तुडुंब भरले होते. आबासाहेब मुजुमदार, बापूराव केतकर, गोवदराव टेंबे अशी मातब्बर मंडळी गाणे ऐकायला होती. सवाई गंधर्व अप्पांच्या तानपुरा व गायन साथीवर खूश झाले व म्हणाले, “तुमची साथ मला सुखद झाली, पूरक झाली आणि मुख्य म्हणजे सूचक झाली.”

साथीदारांचे मनापासून कौतुक करणारे गायक तसे साथीदार हे ही आता दुर्मीळच. 1948 साली कृष्णराव मेहेंदळे यांनी ‌‘श्रीराम भजनी मंडळ‌’ भजन सुरू केले. आजतागायत ते चालू आहे. श्री. माधवराव लिमये हे सध्या प्रमुख आहेत. लक्ष्मी रोडजवळ व विश्रामबाग वाड्यासमोर असलेल्या श्री झांजले विठ्ठल मंदिर येथे दर शनिवारी रात्री दहा वाजता ते असते. अनेक वर्षांपूर्वी एका शनिवारी एक साधा धोतर, सदरा, टोपी घातलेले एक गृहस्थ भजनाला आले होते. आमच्या कोणाच्याही ते परिचित नव्हते. भजन दिसले म्हणून आले होते. काही अभंग झाल्यावर ‌‘मी अभंग सांगू का?‌’ असे त्यांनी अप्पांना विचारले. त्यांनी ‌‘हो‌’ म्हटले. त्यानंतर त्यांनी अशा काही चालीत अभंग सांगितला की सगळे अवाक झाले. त्यांचे रूप आणि अभंगाची चाल याचा मेळ बसविणे कठीण होते. चाल ‌‘बसंत‌’ रागातील वाटत होती, पण जरा वेगळी सुद्धा वाटत होती. अभंग पूर्ण झाल्यावर सर्वांना आनंद झाला. नंतर अप्पांनी सांगितले की ही चाल ‌‘परज‌’ रागातील आहे. बसंत आणि परज हे जवळचे राग आहेत. परज हे बसंतचे जणू जुळे भावंड आहे असे गोवदराव टेंबे यांनी पूर्वीच म्हटले आहे, त्याचा आज प्रत्यय आला. माझा लहानपणापासूनचा मित्र अविनाश तिकोनकर हा अनेक वर्षे भजनात पखवाज वाजवत असे. आता त्याचा मुलगा विनीत तिकोनकर हा पखवाज वाजवतो.

सुप्रसिद्ध कीर्तनकार वामनराव कोल्हटकर यांचे मित्र मंडळ कॉलनीच्या सभागृहात कीर्तन होते. साथीला तबला, पेटी असतेच! पण त्या दिवशी काही कारणासाठी त्यांना पखवाज साथीला हवा होता. त्यांनी मला विचारले, “पखवाज वादक कोणी आहे का?”

मी अविनाश तिकोनकरचे नाव सांगितले. ते ‌‘हो‌’ म्हणाले व “त्यांना निरोप दे” असे म्हणाले.

त्यावेळी आमच्या दोघांकडे साधे फोनसुद्धा नव्हते. मोबाईल तर यायचेच होते. त्यामुळे मी संध्याकाळी कोथरूडला अविनाशच्या घरी निरोप द्यायला निघणार होतो, तेवढ्यात शनिपाराजवळच्या माझ्या घरी तो हजर झाला, जणू टेलीपथी! मला आनंदाचा धक्काच बसला. त्या कीर्तनाला अविनाशने चांगली साथ केली.

महाकवी ग. दि. माडगूळकर यांचे ‌‘गीत रामायण‌’ हे अजरामर आहे. त्याचे संगीतकार सुधीर फडके यांनी ते गाऊन जगभर पोहोचवले. अनेक वर्षे रामनवमीला पुण्यात नक्की कार्यक्रम असे. यात काहीच पदे गावी लागत. एके वर्षी पुण्याच्या कर्वे रोडवरील गरवारे महाविद्यालयाच्या मैदानावर तीन-चार दिवसांचा संपूर्ण गीत रामायणाचा कार्यक्रम होता. सर्व पदे सुधीर फडके गाणार होते. मोठा कार्यक्रम होता. मोठ्या कार्यक्रमात सर्व व्यवस्था योग्यप्रकारे करणे ही तारेवरची कसरतच असते. काहीतरी कमी-जास्त होऊ शकते. अशाच एका ठिकाणी काही गैरसोय होत होती. लगेच काही अतिउत्साही प्रेक्षक उगाचच आरडाओरडा करू लागले. ‌‘कोण इथले कार्यकर्ते आहेत?‌’, वगैरे वगैरे! त्या कार्यक्रमाच्या आयोजनाच्या समितीमध्ये बाबासाहेब पुरंदरे होते. ते त्यावेळी तेथे उपस्थित होते. ते लगेच पुढे आले व म्हणाले, “मी इथला एक कार्यकर्ता आहे, मला सांगा काय आहे ते.”

हे ऐकताच उगाचच आरडाओरडा करणारे प्रेक्षक जरा वरमले. काय झाले ते बाबासाहेबांना सांगितले. अर्थातच त्यांनी योग्य त्या व्यक्तिना सांगून काम होईल याची व्यवस्था केलीच. एवढ्या मोठ्या व्यक्तिने कार्यकर्ता बनून कामाची दखल घेणे हे अतिशय दुर्मीळच. हे सर्व संघ संस्कारातून आले असावे.

मी संघात कधीच गेलो नाही. माझे खूप मित्र संघवाले होते व आहेत. यामध्ये श्रीकृष्ण तथा श्री भागवत व रवींद्र तथा अविनाश भागवत हे दोघे बंधू माझ्या शेजारच्या वाड्यात राहत होते. दोघेही माझे खूप चांगले जवळचे मित्र होते. आमच्या मैत्रीत कधीच संघ आड आला नाही. साहित्य, संगीत, कला हे विषय आमचे आवडीचे व प्रेमाचे होते. अविनाश तथा अवि भागवत याने मला सांगितलेली गोष्ट आहे. त्यावेळचे सरसंघचालक माधव सदाशिव गोळवलकर म्हणजेच गोळवलकर गुरुजी होते. ते संघ कार्यासाठी कायम प्रवास करीत असत. अत्यंत सावकाश, धीम्या लयीत पण ठामपणे आपले विचार भाषणात मांडत असत. ते उत्तम वक्ते होते. मी प्रत्यक्ष नाही पण टेपवर ऐकले  आहे. असेच एकदा गुरुजी पुण्यात आले होते व नंतर त्यांना मुंबईला जावयाचे होते. सकाळच्या डेक्कन क्वीनने ते जाणार होते. सकाळी त्यांना सोडायला अवि भागवत व इतर कार्यकर्ते गेले होते. गुरुजी आले व गाडीकडे जाताना प्लॅटफॉर्मवरील एका बाकापाशी थांबले. त्यावर एक साधा शेतकरी दिसणारा एक माणूस बसला होता. गुरुजी त्याला म्हणाले, “का हो ओळखले का?”

तो गुरुजी व सर्व गर्दी बघून गडबडला. “नाही साहेब, मी नाही ओळखले, आपण कोणी मोठे दिसता, मी साधा शेतकरी.”

त्यावर गुरुजी म्हणाले “अहो, काही वर्षांपूर्वी या नावाच्या तुमच्या गावाला काही कार्यक्रम होता. मी आलो होतो. तुम्ही पण होतात.”

हे सर्व ऐकल्यावर तो खलास झाला कारण एवढी वर्षे झाली तरी सर्व झालेली घटना गुरुजींनी तंतोतंत सांगितली होती. त्याने गुरुजींना वाकून नमस्कारच केला.

78 आर.पी.एम.च्या ग्रामोफोन रेकॉर्ड जमविणे, ऐकणे आणि त्याचा अभ्यास करणे हा माझा अनेक वर्षे आवडीचा छंद आहे. यामध्ये शास्त्रीय संगीत, नाट्यसंगीत, मराठी गीते आहेत. यामुळे माझा काही फार मोठ्या व्यक्तिशी संपर्क झाला. माझा मित्र नितीन मुळे याचे वडील नानासाहेब हे संगीताचे चांगले जाणकार होते. माझ्याकडील रेकॉर्ड त्यांना माहिती होत्या. आमची कधी कधी चर्चा होत असे. पुण्यातील सुप्रसिद्ध फडके हौद चौकातील विठ्ठलदास नारायणदास सुगंधी या अत्यंत जुन्या व नामवंत सुगंधी मालाचा व्यवसाय  असलेल्या पेढीचे शेठ गोपाळकाका सुगंधी हे नानासाहेबांचे चांगले मित्र होते. ते ही संगीताचे जाणकार होते. पूर्वी फडके हौद चौकात असलेल्या वज्रदेही मंडळाच्या गणपती उत्सवात नामवंत कलाकारांची गाणी होत असत. यावेळी कलाकारांना सुगंधी यांच्या घरी चहापानाचे निमंत्रण आवर्जून असे. नानासाहेबांनी गोपाळकाकांना माझ्याकडील रेकॉर्डबाबत सांगितले होते. त्यांना फार आनंद झाला.

एकेदिवशी नानासाहेब मला म्हणाले की, “मी गोपाळकाकांना घेऊन तुझ्या घरी रेकॉर्ड पाहायला येणार आहे.”

मला छानच वाटले पण जरा दडपण आले. एवढी मोठी जाणकार, श्रीमंत, समाजात अत्यंत मान असलेली व्यक्ती माझ्या घरी येणार होती. मी नानासाहेबांना म्हटले की “मी तुम्हाला व काकांना माझी यादी दाखवतो. त्यांना कशाला त्रास?”

त्यावर नानासाहेबांनी सांगितले की “गोपाळशेठ म्हणाले की आपल्याला रेकॉर्ड पाहायच्या आहेत, त्यामुळे आपणच त्याच्या घरी गेले पाहीजे. यादी बघता येईल पण प्रत्यक्ष रेकॉर्ड पाहण्यात जो आनंद आहे तो वेगळाच आहे आणि हे खरेही आहे.”

दोघेही ठरल्या वेळेवर आले. रेकॉर्ड पाहिल्या. काही माहिती दिली. माझे कौतुक केले व आशीर्वाद दिला. मला खूप आनंद झाला.

अशाच जुन्या रेकॉर्ड पाहताना सतारीची एक रेकॉर्ड दिसली. कलाकाराचे नाव होते प्रो. रहिमत खाँ, धारवाड. मला फार आनंद झाला; कारण ही रेकॉर्ड माझ्याकडे नव्हती व हे कलाकार कोण आहेत हे मला माहिती होते. पुण्यात राहणारे सुप्रसिद्ध सतार वादक उस्मान खान साहेब यांचे ते आजोबा होते. मालकंस व भैरवी अशी ती रेकॉर्ड होती. मी उस्मान खान यांना फोनवर ‌‘ती रेकॉर्ड तुमच्याकडे आहे का?‌’ ते विचारले. ते म्हणाले, “मला माहिती आहे पण माझ्याकडे नाही.”

मला काय वाटले कुणास ठाऊक! माझ्याकडे ती रेकॉर्ड नसूनसुद्धा मी ती रेकॉर्ड त्यांना भेट दिली. ते अतिशय खूश झाले. काही दिवसातच मला त्यांचे आभाराचे पत्र आले. हे पत्र माझे परिचित व त्यांचे जवळचे, महाराष्ट्र बँकेतले सुप्रसिद्ध शीळवादक अप्पा कुलकर्णी यांच्या सुंदर हस्ताक्षरात होते. कालांतराने या रेकॉर्डची दुसरी प्रत मला मिळाली पण ती तब्बल 14 वर्षांनी. या रेकॉर्डवर प्रो. रहिमत खाँ असे लिहिले होते, धारवाड लिहिले नव्हते. माझे मित्र सुप्रसिद्ध प्रकाशचित्रकार सतीश पाकणीकर यांच्या भांडारकर रोड, पुणे येथील एका प्रदर्शनाला उस्मान खान आले होते. बरेच दिवस झाल्यामुळे ते मला ओळखत असतीलच असे नाही असे मला वाटले. सतीश पाकणीकर यांनी माझी ओळख करून दिली. त्यावर ते म्हणाले की, “मी यांना ओळखतो” व रेकॉर्डची आठवण तर सांगितलीच पण म्हणाले, “हे पाठवत असलेले दुर्मीळ संगीत मी नेहमी ऐकतो.” दोन्ही ऐकल्यावर मला खूप छान वाटले.

 

मुंबईतील दादरच्या शिवाजी पार्क या अतिशय सुंदर एरियात श्री. विलास गोडबोले राहतात. ते सुप्रसिद्ध क्रिकेटपटू आहेत व क्लासिकल संगीताचे जाणकार व प्रेमी आहेत. अनेक नामवंत क्रिकेटपटू व गायक यांच्याशी त्यांचे जवळचे संबंध आहेत. मी पाठवत असलेले 78 आर.पी.एम. रेकॉर्डच्या रूपातील दुर्मीळ संगीत ते नेहमी ऐकतात. त्यामुळे मला थोडेसे ओळखतात. पुण्याला एक नामवंत प्राध्यापक, संगीततज्ज्ञ व क्रिकेटचे समालोचक यांच्याकडे 78 आर.पी.एम. रेकॉर्डचा उत्तम संग्रह होता. काही वर्षांपूर्वी त्यांचे निधन झाले. त्यांच्या कुटुंबीयांना तो संग्रह चांगल्या ठिकाणी द्यावयाचा होता. अनेकांचा त्यावर डोळा होता. एक दिवस श्री. विलास गोडबोले यांचा मला फोन आला व म्हणाले की, “पुण्यातील एक पत्ता पाठवत आहे, त्यावर फोन करून लगेच जाऊन भेट!” का तेही सांगितले. मला फारच आनंद झाला. त्यानंतर मी व माझे मित्र राजेंद्र ठाकूरदेसाई व अद्वैत धर्माधिकारी आम्ही तिघे त्या पत्त्यावर गेलो. ज्या व्यक्तिचा तो संग्रह होता ते आम्हा सर्वांना चांगले माहीत होते. तेथे गेल्यावर त्यांच्या कुटुंबीयांनी मला सांगितले की, “बरे झाले तुम्ही आलात! अनेक व्यक्ती आम्हाला रेकॉर्डबाबत विचारत होत्या पण विलास गोडबोले यांनी मला सांगितले आहे की या रेकॉर्ड फक्त संजय संत, पुणे यांनाच द्या! बाकी कोणालाही देऊ नका! याच्याकडे दिल्यास नीट राहतील व मुख्य म्हणजे त्या डिजिटल रूपात सर्वांना ऐकता येतील.”

विलास गोडबोले व या पुण्यातील कुटुंबाचे जवळचे संबंध होते.

एकेदिवशी आम्ही त्या रेकॉर्ड मोठ्या कारच्या डिकीत भरून आणल्या. सर्व डिकी भरली होती. विलासजी व पुण्यातील हे कुटुंब यांना आम्ही कोटी कोटी धन्यवाद दिले.

सुप्रसिद्ध गायक जगन्नाथबुवा पुरोहित तथा ‌‘गुणीदास‌’ हे गायकांचे गायक होते. त्यांच्या अनेक बंदिशी आजही प्रसिद्ध आहेत व गायल्या जात आहेत. पं. कुमार गंधर्व, राम मराठे, माणिक वर्मा, जितेंद्र अभिषेकी, सी. आर. व्यास असे अनेक नामवंत गायक प्रस्थापित झाल्यावर, स्वतःचे नाव झाल्यानंतर जगन्नाथबुवा पुरोहित यांच्याकडे शिकायला गेले होते, असे बुवांचे मोठेपण होते. जगन्नाथबुवा पुरोहित यांची एकसुद्धा 78 आर.पी.एम.ची रेकॉर्ड का निघाली नसेल याचे कारण मला आजही समजलेले नाही. दरवर्षी मुंबईत जगन्नाथबुवा पुरोहित तथा ‌‘गुणीदास‌’ यांच्या स्मरणार्थ गुणीदास संगीत संमेलन होते. ते मोठ्या प्रमाणावर सादर होत असे. भारतातील सर्व नामवंत कलाकार त्यात आले आहेत. आजही ते चालू आहे. एके वर्षी सकाळी या महोत्सवात गानसरस्वती किशोरी अमोणकर यांचे गाणे होते. मुंबईतील षण्मुखानंद हॉलमध्ये हा महोत्सव होता. मी मुंबईत गेलो होतो, त्यामुळे काम झाल्यावर या ठिकाणीही जाता आले. किशोरीताई या माझ्या आवडत्या गायिका आहेत. जुन्या षण्मुखानंद हॉलमध्ये मी गेलो होतो पण नूतनीकरण झाल्यावर गेलो नव्हतो. त्यामुळे कोठून जायचे कळले नाही. कार्यक्रम सुरू झाला होता. मुख्य दारे बंद झाली होती. बाहेर सामसूम होती. एका दाराने तर स्टेजजवळच पोचलो. तेवढ्यात समोरून सुप्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन एकटेच समोरून येताना दिसले. एकदम आनंद झाला. माझी काही ओळख नव्हती. मी नमस्कार केला, त्यांनीही केला. झाकीरभाई यांचे व्यक्तिमत्त्व इतके लोभस आहे व स्वभाव असा की माझ्याशी त्यांनी अनेक वर्षे ओळख असावी अशा रीतीने गप्पा मारल्या. अर्थात काही मिनिटे. पुण्याच्या सवाई गंधर्व महोत्सवात पूर्वी झाकीरभाई नेहमीच यायचे. शिवजी, हरिजी, रविशंकरजी तसेच जसराजजी व भीमसेनजी यांना साथ केलेली मी ऐकली आहे पण गेली अनेक वर्षे ते सवाईमध्ये येत नाहीत! कारण काय ते माहीत नाही. त्यामुळे मी त्यांना बिनधास्त विचारले की, “आप सवाई मे आजकल आते नही!” त्यावर ते हसून हजरजबाबीपणे म्हणाले की “आप बुलाते नही तो मै आता नाही.”

किशोरीताई अमोणकर या काही वर्षांपूर्वी पुण्यातील कर्वेनगर भागातील सहवास सोसायटीमध्ये बरेच दिवस राहायला आल्या होत्या. त्यावेळी काही कामासाठी त्यांच्याकडे जाण्याचा योग आला. मी व माझी पत्नी श्रद्धा आम्ही दोघे गेलो होतो. मी जायच्या आधी पत्नीला सांगितले की ‌‘ताईंचा स्व-भाव जरा वेगळा आहे. समजा काही बोलल्या तर समजून घ्यायचे.‌’ त्याप्रमाणे आम्ही ठरल्या वेळेप्रमाणे गेलो. त्यांनी आमच्याशी अशा काही गप्पा मारल्या की अनेक वर्षे आमची ओळख आहे. मी जाताना त्यांची भूप ब बागेश्री ही एल. पी.  रेकॉर्ड घेऊन गेलो होतो. अतिशय सुंदर अशी ही रेकॉर्ड आहे. ती पाहिल्यावर त्या खूश झाल्या. मी “रेकॉर्डवर सही द्याल का?” असे विचारताच लगेच सही दिली. त्यावर लिहिले ‌‘टू संजय विथ लव्ह!‌’ जणू काही त्यांनीच मला भेट दिली आहे. असो, मला आनंद झाला. बाहेर आल्यावर पत्नी मला म्हणाली, “उगाच का त्यांच्या स्वभावाची मला भीती घातलीत? किती छान बोलल्या!”

अनुभव चांगला होता. पलीकडेच सुप्रसिद्ध गायक व संगीतकार रवी दाते यांचा ‌‘मैफल‌’ नावाचा बंगला होता. तेथे किशोरीताईंचे गाणे झाले. खूप छान गाणे झाले. मोगुबाई कुर्डीकर यांचे गाणे मी प्रत्यक्ष कधी ऐकले नाही. ध्वनिमुद्रण ऐकले आहे. त्यादिवशी किशोरीताईंचे गाणे ऐकून मला मोगुबाईंची आठवण झाली.

संगीत कला विहार या मासिकाने ‌‘किशोरी अमोणकर विशेषांक‌’ काढला होता. त्याचे प्रकाशन पुण्याच्या टिळक रोडवरील टिळक स्मारक मंदिर येथे होते. अर्थात मी गेलोच होतो. अंक विकत घेतला. त्यावर सही सुद्धा मिळाली व विशेष म्हणजे त्या कार्यक्रमाला मोगुबाई कुर्डीकर आल्या होत्या. अचानक त्यांचे दर्शन झाले. त्या वयातसुद्धा अत्यंत तेजस्वी दिसत होत्या.

काही काही घटना अगदी सामान्य वाटतात पण नंतर आठवताना मात्र वेगळेच वाटते. आमची कंपनी गुजरातमध्ये ‌‘कैलास जीवन‌’ गेली अनेक वर्षे पाठवीत आहे. मी पूर्वी अहमदाबादला बऱ्याच वेळा गेलो आहे. रेल्वेने, बसने, आमचे श्रेष्ठी श्री. रामभाऊ कोल्हटकर साहेब यांच्याबरोबर गाडीने अशा अनेक मार्गांनी गेलो आहे. अहमदाबादला उन्हाळा भयंकर कडक असतो. त्यातून तिथल्या पाण्याची चव अतिशय वाईट आहे. कितीही पाणी प्यायले तरी तहान भागतच नाही. अगदी आईसकोल्ड पाणी प्यायले तर थोडे बरे वाटते. अशाच एका उन्हाळ्यात मी अहमदाबादला गेलो होतो. आम्ही पुण्याहून पाठविलेल्या कैलास जीवनच्या पेट्या आमच्या व्यापाऱ्यांकडे पोचल्या नव्हत्या. गावाबाहेर असलेल्या जकात नाक्याबाहेर ट्रान्सपोर्टच्या गोडाऊनमध्ये होत्या. त्या लगेच आणणे जरूरीचे होते. त्यामुळे मी तेथे जाऊन टेम्पो केला व पेट्या गावात घेऊन येत होतो. ओपन 3 चाकी टेम्पो होता. मी मागे पेट्या ठेऊन तेथे उभा होतो. उन्हाळा आपला प्रभाव जोरात दाखवत होता. घामाच्या धारा लागल्या होत्या. अंतर 15/20  कि.मी. होते. भर दुपारची वेळ होती. काही कि.मी. गेल्यावर टेम्पो ड्रायव्हरने अर्ध्यातच गाडी थांबवली. तो गाडीत, मी उन्हात होतो. मी जरा वैतागलोच. तो उतरून एका पानाच्या दुकानात गेला. मी आणखी वैतागलो पण त्याने सिगारेट, तंबाखू वगैरे काही न घेता थंडगार अशा आईसकोल्ड पाण्याचे काही पाऊच घेऊन आला. मला आश्चर्यच वाटले व माझा राग थंडगार झाला. मी त्याचे ‌‘पैसे किती?‌’ असे विचारून देऊ लागलो पण तेही त्यांनी घेतले नाहीत.

रसिकाग्रणी दत्तोपंत देशपांडे हे पुण्यातील एक प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व. धोतर, कोट, काळी टोपी, डोळ्याला चष्मा, एका हातात काठी आणि कधी दुसऱ्या हातात तर्जनी व मधले बोट यात तिरकी धरलेली सिगारेट असे ते नेहमी चालताना दिसत असत.

त्यांना सर्वजण पंत म्हणत असत. सवाई गंधर्व पुण्यतिथी महोत्सवाशी ते सुरूवातीपासून संबंधित होते. एम.एस.ई.बी. हे नाव धारण करण्यापूर्वी असलेल्या पूना इलेक्ट्रिक सप्लाय कंपनीमध्ये ते नोकरीला होते. लक्ष्मी रोडवरील काकाकुवा मँशन समोरील कार्यालयात ते होते व राहत होते तेथे जवळच असलेल्या घोडके पेढेवाले यांच्या समोरील इमारतीत. चौकातल्या गणपती शेजारी ही इमारत होती. तेथे जायला गणपती मंदिराशेजारून मागून रस्ता होता.

आमचे श्रेष्ठी श्री. रामभाऊ कोल्हटकर साहेब यांच्याकडे ते नेहमी येत असत. गप्पा अर्थात गाण्याच्या व कलाकारांच्या असत. त्यावेळी व्हिडीओ कॅसेटचा जमाना होता.

सुभावभजन

एके सकाळी पंत मोठ्या आनंदाने एक व्हिडीओ कॅसेट घेऊन आले व म्हणाले, “रामभाऊ यामध्ये काही खास व दुर्मीळ फिल्म आहेत. जरा बघा तरी काय आहेत त्या!” त्याप्रमाणे बघितले तर सर्व पाहणारे चक्रावून गेले. त्यामध्ये सुप्रसिद्ध गायक पं. फिरोज दस्तूर यांनी बालपणात सिनेमात काम केले होते त्याची दृश्ये होती. तबला नवाज अहमदजान थिरकवा यांची 1935 मधील तबला वादनाची फिल्म व इतर अनेक नामवंत कलाकारांच्या 1935च्या सुमाराच्या फिल्म होत्या व सर्वात कळस म्हणजे पं. कुमार गंधर्व यांनी लहानपणी गायलेल्या ‌‘गोवर्धन गिरिधारी‌’ या पदाची फिल्म होती. त्यावेळी हे सर्व अशक्य वाटणारे होते. वाडिया मुव्हिटोनने हे सर्व चित्रित केले होते. त्यावेळी पं. कुमार गंधर्व यांनाही ही फिल्म रामभाऊ कोल्हटकर साहेबांनी दाखविली होती. तो प्रसंग कल्पनातीत होता. आज यु-ट्युबवर हे सर्व सहज उपलब्ध आहे.

78 आर.पी.एम.च्या रेकॉर्ड हा मी व माझे मित्र यांच्या आवडीचा विषय आहे. बहुतेक गावच्या जुन्या बाजारात या कधी कधी मिळतात. गावोगावच्या या बाजारांना सुद्धा वेगवेगळी नावे आहेत. जुना बाजार हे सर्वनाम, मुंबईचा भेंडी बझार अथवा चोर बाजार, बेळगावातील मोडका बाजार, परदेशातील गॅरेज सेल ही विशेष नामे. पुण्यातील कॅम्प भागात पूर्वी इस्ट स्ट्रीट येथे हरीसन नावाचे एक दुकान होते. तेथे दर रविवारी जुन्या वस्तू विकल्या जात. अर्थात तेथे लिलाव होत असे. फर्निचर अत्यंत उत्तम मिळत असे. खूप गर्दी होत असे. कालांतराने ते  दुकान बंद झाले. काही लोकांची अशीही विचारसरणी होती की कितीही चांगल्या वस्तू असतील तरी लिलावातून घ्यायच्या नाहीत कारण कर्जाचे पैसे दिले नाहीत म्हणून त्या वस्तू लोकांच्या घरून उचलून आणलेल्या असतात. त्यात त्यांची भावना गुंतलेली असते.

सुप्रसिद्ध लेखक व कलकत्याच्या सेन्ट्रल लायब्ररीचे अनेक वर्ष प्रमुख असलेले एक व्यासंगी व्यक्तिमत्त्व म्हणजे श्री. बा. जोशी. त्यांनी या चोर बाजाराला ‌‘चित्तचोर बाजार‌’ म्हणले आहे. जगातल्या चोर व जुन्या बाजारावर त्यांच्या पुस्तकात अप्रतिम लेख आहे. आता आवक कमी झाली पण पूर्वी जुन्या बाजारात 78 आर.पी.एम.च्या रेकॉर्डचा ढीग असायचा. किती पाहणार असे व्हायचे. तरी संपायच्या नाहीत. पाय दुखायला लागायचे पण किती हौस, त्याला मोल नाही. या ढिगात 90 टक्के हदी सिनेमाच्या रेकॉर्ड असत. काही इंग्लिश, थोड्या मराठी व शास्त्रीय. बरीच मेहनत केल्यावर त्या ढिगात रामकृष्णबुवा वझे, कुमारजी, भीमसेनजी, कवी गिरीश, यशवंत, बा. भ. बोरकर, सोपानदेव चौधरी, माधवराव पटवर्धन तथा माधव जुलियन अशी अशक्य अशी रत्नेही मिळायची. अनेक अनेक वाऱ्या फुकट जायच्या पण एखादी वेळ खूप काही देऊन जायची. मुंबईच्या भेंडी बाजारात एकदा आम्ही हौसेने पुण्याहून काही मित्र सपत्नीक व काही एकटे असे गेलो होतो. आता बाजाराची पार रया गेली आहे. 10 टक्के सुद्धा राहिलेला नाही. आजूबाजूच्या जुन्या इमारती नवीन होत आहेत.

आम्ही फार नाराज झालो. माझे मित्र व सुप्रसिद्ध गायक, नट मुंबईचे जाणकार विक्रांत आजगावकर यांना याबद्दल विचारले. त्यावर त्यांनी सांगितले की, आता जुन्या वस्तू येणे जवळजवळ बंद होत आले आहे. बाजारात मोठे बांधकाम चालू आहे. त्यामुळे बाजार संपत आहे. यानंतर त्याने एक गमतीदार गोष्ट सांगितली. तो मोठाच संग्राहक आहे. तो म्हणाला की, “आपण जमविलेल्या रेकॉर्ड व तत्सम गोष्टी जेव्हा आपली पुढची पिढी आवड नसल्यास विकून टाकेल तेव्हा बाजार पुन्हा बहरेल!”

पं. जितेंद्र अभिषेकी हे माझे अत्यंत आवडते गायक. त्यांनी संगीत दिलेल्या पदांच्या चाली अतिशय सुंदर आहेत. अनेक गायकांनी गायलेल्या आहेत पण त्याच चाली प्रत्यक्ष जितेंद्र अभिषेकी यांच्याकडून ऐकताना एक वेगळीच अनुभूती येते. ‌‘दिवस मावळता आस किनाऱ्याची‌’ हे बुवा गात असताना आपल्याला तो मावळता दिवस दिसावयास लागतो. अभिषेकी बुवा गोवा, मुंबई, लोणावळा व शेवटी पुणे येथे राहत होते. पुण्यात नवसह्याद्री सोसायटीजवळ असलेल्या स्थैर्य सोसायटीमध्ये ‌‘मांगिरीश‌’ नावाच्या बंगल्यात ते राहत होते. एका कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून बोलावण्यासाठी मी गेलो होतो. ओळख नव्हतीच पण थेट गेलो. बुवा घरी होते. नमस्कार केला व मी काही बोलणार एवढ्यात बुबा म्हणाले, “थांबा, मी आधी बोलतो.”

मला आश्चर्य वाटले. बुवा तसे मितभाषी असावेत. मी बोलावयाचे थांबलो. त्यावर ते म्हणाले, “मला तुमचे नाव माहीत नाही पण मी तुम्हाला ओळखतो. तुम्ही फार चांगले गाणे ऐकता.”

मी एकदम क्लीन बोल्डच झालो; कारण प्रत्यक्ष मी त्यांना पहिल्यांदाच भेटत होतो. मी त्यांचे आभार मानले, नमस्कार केला व निघालो, कारण मी ज्या तारखेला त्यांना ‌‘अध्यक्ष म्हणून याल का?‌’ असे विचारले त्यादिवशी ते गोव्याला जाणार होते, त्यामुळे येऊ शकत नव्हते.

पण नंतर अनेक दिवस मी या घटनेचा विचार करत होतो व बुवा असे का म्हणाले असतील याचे कोडे सुटत नव्हते. एके दिवशी ते अचानक सुटले. त्याचे असे झाले की, जुन्या लक्ष्मी क्रीडा मंदिरात पं. जितेंद्र अभिषेकी यांचे रात्री गाणे होते. त्या कार्यक्रमाला मी, वामनराव कोल्हटकर व मुकुल शिवपुत्र असे तिघे गेलो होतो. त्यादिवशी काय झाले होते कुणास ठाऊक! कार्यक्रमास अजिबात गर्दी नव्हती. अगदी खूपच कमी माणसे आली होती. मी त्यावेळी पुढे बसून गाणे ऐकत होतो. खूप कमी प्रेक्षक असल्यामुळे माझा चेहरा त्यांच्या लक्षात राहिला असावा, अन्यथा बाकी काहीच कारण नव्हते, ओळख सुद्धा नव्हती व कधी भेटलोही नव्हतो.

सवाई गंधर्व संगीत महोत्सव हे पुण्याचे तसेच अखिल भारताचे भूषण आहे. या महोत्सवाच्या अनेक आठवणी आहेत. 40 वर्षांहून अधिक काळ मी दरवर्षी या ठिकाणी जात आहे. तो एक अतिशय आनंदाचा अनुभव आहे. एके वर्षी विदुषी मालिनी राजूरकर यांनी एका वेगळ्याच रागाने गाण्याची सुरूवात केली. तो माहीत नव्हता. वेगळाच होता. त्यामुळे ऐकणाऱ्यांच्या भुवया उंचावल्या होत्या. काही वेळ ऐकल्यावर मी माझ्या मित्रांना म्हणालो की, “या रागाचे नाव ‌‘गुणरंजनी‌’ आहे.” त्यांचा विश्वास बसेना! कारण कधी ऐकलेला नव्हता. “कशावरून? तुला काय माहिती?” असे मला विचारले.

थोड्याच वेळात मालिनीबाईंनी ‌‘गुणरंजनी‌’ हेच रागाचे नाव सांगितले. सर्वजण माझ्याकडे बघू लागले. खरेतर मलाही हा राग नवीनच होता; माहिती असण्याचा प्रश्नच नव्हता पण जी बंदिश त्या गात होत्या ती रागाच्या लक्षण गीतासारखी होती. त्यात सर्व वर्णन होते व रागाचे नावही होते. नीट ऐकल्यामुळे मला ते कळले होते.

ही झाली रागाची गोष्ट! आता एक बंदिशीबाबत आहे. स्वरभास्कर पं. भीमसेन जोशी ‌‘कोमल रिषभ आसावरी‌’ राग गात होते. सर्वांना परिचित राग होता. अनेकवेळा ऐकलेला होता. तरीही माझ्या शेजारी बसलेले रसिक मला म्हणाले, “राग माहिती आहे पण बंदिश काय गात आहेत ते शब्द कळत नाहीत.” मी त्यांना बंदिशीचे शब्द सांगितले ‌‘सब मेरा वोही सकल जगतको पैदा करनहार‌’ त्यावर त्यांनी विचारले, “हे सर्व तुम्हाला ऐकू आले?” मी ‌‘हो‌’ म्हणालो. त्यांचा विश्वासच बसेना. याचे कारण असे होते मला शब्द माहीत होते. प्रत्येक कलाकार आपण एका मोजमापाने ऐकू शकत नाही. प्रत्येकाला त्या-त्या कलाकाराच्या पद्धतीने ऐकावे. उदा. भीमसेनजी यांचा बोलण्यातला आवाज अत्यंत स्पष्ट आहे. सर्व शब्द कळतात! पण गाण्यातले कळत नाहीत. या उलट पं. कुमार गंधर्व यांचे गाण्यातले शब्द स्पष्ट कळतात तर त्यांचे बोलणे पटकन समजत नाही. अर्थात हा माझा अनुभव आहे.

सुप्रसिद्ध निवेदक सुधीर गाडगीळ यांनी आपले स्व-तंत्र विकसित केले आहे. 50 वर्षे ते या क्षेत्रात आहेत. आमचे श्रेष्ठी श्री. रामभाऊ कोल्हटकर साहेब यांचे ते जवळचे मित्र आहेत. त्यामुळे ते अनेक वर्षे आमच्या ऑफिसमध्ये येत आहेत. ते आले की नेहमी गप्पा होत असतात.  सुमारे 10 वर्षांपूर्वी ते आले असताना आम्ही गप्पा मारत होतो. काही गप्पा झाल्यावर ते म्हणाले, “माझा सध्या दर पंधरा दिवसांनी एक स्तंभ चालू आहे. यावेळी मी तुझी मुलाखत घेतो. त्यासाठी मी तुझ्या घरी येतो.”

त्याप्रमाणे ते आले. काही प्रश्न विचारले. माझे रेकॉर्ड कलेक्शन, पुस्तके, इतर संग्रह याबद्दल विचारले. त्यांच्या पद्धतीने नोंदी केल्या व ‌‘संत वृत्तीचा संजय‌’ असा लेख लिहिला. मला खूप छान वाटले. तसेच 2 वर्षांपूर्वी या सर्व लेखांचे ‌‘बब प्रतिबब‌’ नावाचे पुस्तक उत्कर्ष प्रकाशनने प्रसिद्ध केले. त्यात हाही लेख होता. डॉ. शां. ब. मुजुमदार, रवी पंडित असे अनेक मान्यवर यावेळी होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात हे प्रकाशन झाले होते.

मानाचं पान

जुन्या 78 आर.पी.एम.च्या रेकॉर्ड्स, स्पूल्स मिळविणे व त्यातून जुन्या काळातील गाणी, भाषणे, मुलाखती वगैरे ऐकणे व जतन करणे आणि सर्वांना ऐकवणे हा माझा व माझ्या मित्रमंडळींचा आवडीचा छंद आहे. असेच एके दिवशी माझे मित्र ॲडव्होकेट राजेंद्र ठाकूरदेसाई काही स्पूल्स घेऊन आले. महाराष्ट्रीय कलोपासक या त्यांच्या प्रेमाच्या संस्थेच्या भांडारातील ते स्पूल्स होते. आम्ही माझ्या घरी एक एक स्पूल पाहत होतो. आजकाल स्पूल मिळाले तरी स्पूल टेपरेकॉर्डर चालू स्थितीत सापडणे महाकठीण! पण सुदैवाने माझ्याकडे तो होता. जुने स्पूल तपासणे हा एक मोठा कार्यक्रम असतो. आधी त्यावरील धूळ साफ करणे, पुसून घेणे, नंतर त्यावर लिहिलेला मजकूर वाचणे, ट्रॅक 1/2 भानगडी पाहणे! अस्पष्ट अक्षरे लावण्याचा प्रयत्न करणे आणि एवढे करून काही चांगले कार्यक्रम आहेत असे वाटले कवा तसे स्पूलच्या कव्हरवर लिहिलेले असले तर आत भलतेच कार्यक्रम ऐकू यायचे. अर्थात हा स्पूलच्या बाबतीत नेहमीचा अनुभव आहे. खोके एकाचे व स्पूल दुसरे. म्हणजे कव्हरवर एखाद्या नामवंत गायकाचे अगर वक्त्याचे नाव, कार्यक्रमाची तारीख वगैरे लिहिलेले असते व ऐकू आल्यावर एकदम इंग्लिश म्युझिक कवा ‌‘बरसात में हमसे मिले तुम साजन‌’ ऐकू यायचे. तेही संगीत वाईट नाही पण कव्हर आणि ऐकू येणारे संगीत यामध्ये झालेला अपेक्षाभंग फारच दु:ख देतो व असे वाटते की मग लिहिलेल्या कार्यक्रमाचे स्पूल कोठे गेले असेल? असो.

तर राजेंद्र ठाकूरदेसाई यांनी आणलेले स्पूल्स पाहत होतो. पाहता पाहता एका स्पूलवर लिहिले होते ‌‘बालगंधर्व मुलाखत‌’. एकदम नजरा चमकल्या! पण संयमाने विचार केला. आधी नीट पाहू! कदाचित बालगंधर्वांच्या रेकॉर्ड्स टेप केल्या असतील आणि आम्ही ऐकू लागलो. तर खरेच नटसम्राट नारायणराव राजहंस तथा बालगंधर्व यांची ती मुलाखत होती. भगवानराव पंडित व इतरांनी ती घेतली होती. बाकीच्यांची नावे त्यात नाहीत. ऐकू लागलो. वाटले किती वेळाची असेल ती मुलाखत! 10 मि., 15 मिनिटांची! पण टेप चालूच होता. नारायणराव अनेक विषयांवर अप्रतिम बोलत होते. दीड तास झाल्यावर मुलाखत संपली. आम्ही आनंदाने वेडेच झालो. बालगंधर्वांची दीड तास अप्रतिम मुलाखत!! कल्पनेच्या बाहेरची गोष्ट होती आणि मला एकदम आठवले, मी म्हणालो “राजन आज तारीख किती – 26 जून! म्हणजे बालगंधर्वांचा जन्मदिवस. वा क्या बात है.”

मग मी ती सर्व मुलाखत डिजीटलाईज केली. 1963 साली बालगंधर्वांच्या 75 निमित्त ती घेतलेली होती. 50 वर्षांनंतर आम्हास सापडली होती. डिजीटलाईज केल्यावर सुद्धा त्यावर अनेक संस्कार करणे आवश्यक होते. माझे मित्र व नामवंत गायक डॉ. दिग्विजय वैद्य यांनी त्यावर अप्रतिम संस्कार केले व प्रसारणास योग्य अशी ऑडिओ क्वॉलिटी तयार केली. त्यांचे कष्ट अपरंपार आहेत. दीड तासाचा कार्यक्रम प्रोसेस करावयाला त्यांचे कित्येक पट तास सहज खर्ची पडले असतील. यानंतर सर्वात महत्त्वाचे चिकाटीचे काम म्हणजे ते लिहून काढणे. हे काम आमचे परममित्र श्री. अद्वैत धर्माधिकारी यांनी अत्यंत मोजक्या वेळात पूर्ण केले. दीड तास मुलाखत असूनही त्याचा शेवट काहीसा विस्कळीत आहे. त्यावेळच्या रेकॉर्डिंगमध्ये काय झाले असेल कोण जाणे. एवढा मोठा खजिना हाती लागला हे आपले महाभाग्यच. अशा सर्वांच्या सहकार्याने व पद्मगंधाच्या अरुण जाखडे यांच्या रसिकतेमुळे ही मुलाखत छापून आली. अशी ही साक्षात बालगंधर्ववाणी. आता हे सर्व यु-ट्युबवर उपलब्ध आहे.

1958 साली पुण्यात एक फार मोठा ‌‘वाजपेय महायज्ञ‌’ झाला होता. एस.पी. कॉलेजच्या मैदानावर 8 दिवस तो चालला होता. या क्षेत्रातील मान्यवर वैदिक व अनेक क्षेत्रातील नामवंत व्यक्ती यात सहभागी झाल्या होत्या. फिल्म्स डिविजनने त्याचे चित्रीकरण केले होते. कालांतराने वैदिक संशोधन मंडळाने त्याची व्हिडीओ कॅसेट तयार केली होती. त्याची नंतर कोणी केलेली सी. डी. मला मिळाली. ती मी पाहत होतो. सर्व यज्ञाची थोडक्यात चित्रफित केली होती. दर दिवशी रात्री मनोरंजनाचे कार्यक्रम होत असत. त्यात गायन, कीर्तने, पोवाडे यांचा समावेश होता. सी. डी. पाहताना शेवटी यात अचानक काही दृश्ये पाहायला मिळाली. ती अशी होती की राष्ट्रीय कीर्तनसम्राट गोवदस्वामी आफळे यांचे कीर्तन आणि गायनात सरस्वतीबाई राणे आणि साक्षात संगीतकलानिधी मास्तर कृष्णराव फुलंब्रीकर. अर्थात हे सर्व काही सेकंदच होते पण फार मोठा आनंद देऊन गेले.

पं. कुमार गंधर्व नेहमीच पुणे, मुंबई येथे येत असत. सुरूवातीला ते पुण्यात सदाशिव पेठेतल्या देशमुख वाडीतील अप्पासाहेब इनामदार यांच्याकडे उतरत असत. अप्पासाहेब पूर्वी त्यांच्याबरोबर तबला वाजवत असत. नंतर अप्पासाहेबांनी तमाशा क्षेत्रात चांगले नाव कमावले होते. पुण्याच्या इंजिनीअरिग कॉलेजमधील प्राध्यापक विलास इनामदार हे अप्पासाहेबांचे थोरले चिरंजीव. ते कुमारजींचे शिष्य होते. तेथेच जवळच एका चाळीत कुमारजींचे परममित्र व सुप्रसिद्ध गायक डॉ. वसंतराव देशपांडे राहत होते. कुमारजी सकाळी सकाळी अप्पासाहेबांच्याकडून वसंतराव यांच्याकडे जात असत. मग गप्पा, चहापाणी सर्व होत असे. ती घरे खूप लहान होती पण या मित्रांची मने प्रशस्त होती. त्यामुळे सकाळी गाद्यांवर मुले झोपली आहेत, इतर घरातील कामे चालू आहेत याचा काही व्यत्यय येत नसे. विलास इनामदार हे वसंतरावांकडेही शिकले होते. त्या काळातली गायन त्रिमूर्ती म्हणजे कुमारजी, वसंतराव आणि भीमसेनजी. या तिघांनाही तानपुऱ्यावर गायन साथ विलास इनामदार यांनी केली आहे. एका रविवारी सकाळी त्यांनी मला त्यांच्या पर्वती येथील घरी ‌‘सावरे आईजय्यो‌’ कुमारजी व वसंतराव कसे म्हणतात हे फरकांसह म्हणून दाखविले होते. नंतर कुमारजी सुप्रसिद्ध लेखक व गरवारे कॉमर्स कॉलेजचे प्राचार्य शं. वा. चिरमुले सर यांच्याकडे उतरत असत. सर त्यावेळी दीप बंगला चौकाच्या पुढे डॉ. होमी भाभा हॉस्पिटलसमोर राहत होते. त्यावेळी कुमारजींना भेटायला मी जात असे. असेच एके दिवशी गेलो असता दिल्ली येथील गांधर्व महाविद्यालयाचे प्रमुख व पं. विनायकराव पटवर्धन यांचे शिष्य पं. विनयचंद्र मौद्गल्य तथा भाईजी यांची भेट झाली. ते कुमारजींचे मित्र होते. अशाच एका संध्याकाळी मी माझा मित्र विवेक महाजन याच्या घरी गेलो. तो माझ्या जवळच म्हणजे सदाशिव पेठेतील बॅ. गाडगीळ स्ट्रीट येथील गोडबोले वाड्यात राहत होता. त्याला म्हणालो, “स्कूटरवर बस, जरा जाऊन येऊ.” कुठे ते मुद्दाम सांगितले नाही. गेलो थेट चिरमुले सरांच्या घरी. तरी त्याला कळेना, कारण त्याला सर माहिती असण्याचे काही कारण नव्हते. आम्ही तेथे गेलो, दार ढकलले तर उघडले! आतून कडी नव्हती आणि समोर पाहतो तर काय, साक्षात पं. कुमार गंधर्व होते. माझी थोडी ओळख झाल्याने कुमारजींनी त्यांच्या खास शैलीत, “या संत” म्हणून माझे प्रेमाने स्वागत केले. विवेक महाजन जवळ जवळ बेशुद्ध पडण्याच्या स्थितीत होता. आम्ही आत गेलो. त्याची ओळख करून दिली व थोड्या वेळाने परत आलो.

आज 30 हून अधिक वर्षे झाली तरी विवेक महाजन अजूनही ह्या धक्क्यातून सावरलेला नाहीये. हा आनंदाचा धक्का त्याला खूप आवडला आहे.

संजय संत 

पुणे । 9604272937

पूर्वप्रसिद्धी – साहित्य चपराक दिवाळी अंक २०२३

(लेखातील अन्य छायाचित्रे – संजय संत यांच्या संग्रहातून.)

 

Author: चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email -

View all posts by चपराक >

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

error: Content is protected !!