समाजभूषण : ह. भ. प शांताराम महाराज निम्हण

subhavbhajan shantaram maharaj nimhan

वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ गायक ह. भ. प शांताराम महाराज निम्हण यांचा आज (दि. 11) पुण्यात अमृतमहोत्सवी सोहळा संपन्न होतोय. त्यानिमित्त ‘चपराक प्रकाशन’ने ‘सुभावभजन’ हा गौरवग्रंथ प्रकाशित केला आहे. या ग्रंथाचे संपादक आणि प्रकाशक घनश्याम पाटील यांचा हा विशेष लेख.

नमो सुभावभजन भाजना ।
भवेभकुंभ भजना । विश्वोद्भव भुवना । श्रीगुरुराया ॥

अशा मधुर आणि अर्थबोधी शब्दात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी ईशस्तवन केले आहे. यातील ‘सुभावभजन’ म्हणजे विशुद्ध भावाने केलेले भजन! विशुद्ध भाव निर्माण होण्यासाठी संतपदाला जावं लागतं. त्यासाठी साधना लागते. आजच्या काळात अशी साधना असणारी माणसे दुर्मीळ आहेत. पाषाण येथील वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ गायक ह. भ. प. शांताराम महाराज निम्हण यांनीही आपलं आयुष्य असं सुभावभजन करण्यात घालवलं. पाषाण ग्रामस्थांनी आज त्यांच्या अमृतमहोत्सवी सोहळ्याचे आयोजन केले आहे. त्यानिमित्त चपराक प्रकाशन तर्फे आम्ही सुभावभजन हा गौरवग्रंथ प्रकाशित करीत आहोत.
संतांच्या उपदेशानुसार ज्यांनी आयुष्यभर भक्तियोग जपला अशा शांताराम महाराज अर्थात अण्णांनी नैतिक अधिष्ठान जपले. वारकरी संप्रदायाची पताका खांद्यावर घेऊन हा निष्काम कर्मयोगी अभंग जगत राहिला. अतिशय सात्त्विक अंतःकरणाने त्यांनी ‘सदा नामघोष करू हरिकथा, तेणे सदा चित्ता समाधान’ हे कृतिशीलतेतून दाखवून दिले. कोणत्याही कर्मकांडांना बळी न पडता धर्म आणि आध्यात्माच्या माध्यमातून माणूस जोडता येतो, याचं ते मूर्तिमंत उदाहरण आहेत. समाज व्यसनापासून दूर जावा, त्यांच्यात ऐक्य साधावं, राग, लोभ, मोह, मत्सर असे दुर्गुण दूर पळावेत यासाठीच तर संतसाहित्य महत्त्वाचं ठरतं. त्यासाठी त्यांनी अखंड आयुष्यभर विठ्ठलभक्तिच केली. आपल्याकडे नामाचे, भजनाचे जे सामर्थ्य सांगितले आहे ते जगणारे शांताराम अण्णांसारखे वारकरी हे खरे आजचे समाजधन आहे.
सुभावभजन या गौरवग्रंथात ह. भ. प. चैतन्य महाराज देगलूरकर, किसन महाराज साखरे, बंडातात्या कराडकर, उल्हासदादा पवार, चंद्रकांत महाराज वांजळे, भावार्थ देखणे, जयवंत महाराज बोधले, प्रमोद महाराज जगताप, अभय टिळक, मारूती महाराज कोकाटे, पांडुरंग दातार, पैठण पीठाचे योगीराज महाराज पैठणकर, भागवताचार्य तुकाराम मुंडेशास्त्री, निलेश निम्हण ते सचिन पवार अशा अनेक सहृदयांनी त्यांच्याविषयी लिहिले आहे. एका तपस्वी आणि ऋषितुल्य वारकर्‍याची यथोचित दखल घेण्याची संधी प्रकाशक या नात्याने मला मिळाली, त्याबद्दल मी पाषाणकर ग्रामस्थांचाही ऋणी आहे.
महाराष्ट्राची लोकसंस्कृती व लोकपरंपरा जपण्याचे महत्त्वाचे कार्य कीर्तन परंपरेने केले आहे. त्यामुळे अत्यंत टोकाची प्रतिकूल परिस्थिती येऊनही आपला समाज वेळोवळी त्यातून तरून गेला. त्या त्या काळातील संतांनी त्यासाठी मोठं योगदान दिलं. आजच्या काळात शांताराम महाराज निम्हण यांच्यासारख्या साधकाचं यश त्यातच सामावलेलं आहे. सदाचारसंपन्न, निरपेक्ष, निःस्वार्थ जीवनशैलीचं ते प्रतीक आहेत. थोडीथोडकी नव्हे तर तब्बल साठ वर्षे नित्यनेमाने वारी करणार्‍या शांताराम महाराजांची परंपरा आणि वारसा मोठा आहे.
आपल्याकडे विठ्ठल मंदिरे गावागावात आहेत. पुण्याजवळील पाषाणमध्ये मात्र निम्हण विठ्ठल मंदिर आहे. अण्णांचे वडील सयाजीबुवा निम्हण यांनी या क्षेत्रात अतुलनीय योगदान दिलं. तीच परंपरा हे संपूर्ण कुटुंब जपत आहे. अण्णांनी रूढार्थानं कसलंही शास्त्रीय संगीत शिकलं नाही. मात्र कीर्तनात ते जेव्हा गातात तेव्हा सारेच मंत्रमुग्ध होतात. विठ्ठलाशी गायनाच्या माध्यमातून तादात्म्य पावणं, एकरूप होणं हे साधनेशिवाय शक्य नाही. पन्नास-साठ वर्षांपासून महाराष्ट्रभर त्यांनी विठुनामाचा गजर घातला. गेल्या काही वर्षांपूर्वी आकाशवाणी आणि नंतर काही वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातूनही त्यांनी कीर्तन घराघरात पोहोचवलं.
‘जे जे भेटे भूत, ते ते मानिजे भगवंत’ या संतउक्तिप्रमाणे त्यांनी माणसात परमेश्वर बघितला. आजच्या या स्वार्थाच्या दुनियेतही त्यांनी त्यांचं चांगुलपण कधी सोडलं नाही. मुख्य म्हणजे या क्षेत्रात नवी पिढी तयार व्हावी यासाठी त्यांनी अतोनात मेहनत घेतली. पाषाणमधील विठ्ठल मंदिराच्या माध्यमातून असंख्य उपक्रम राबवले. ज्येष्ठ विचारवंत बाळासाहेब भारदे यांनी त्यांचा ‘समाजभूषण’ म्हणून गौरव केला.
‘तुका म्हणे देवा । चिंतन हे तुझी सेवा ॥’ या भावनेने अखंड चिंतनात असलेल्या शांताराम महाराज निम्हण यांचा अमृतमयी अमृतहोत्सव सोहळा साजरा होतोय. भजन सेवेलाच सर्वस्व मानणार्‍या महाराजांच्या पुढील पिढीनेही हा वारसा अव्याहतपणे सुरू ठेवलाय. आजच्या काळात ही खरंच फार मोठी गोष्ट म्हणावी लागेल. असा आदर्श निर्माण करणार्‍या शांताराम महाराज निम्हण यांना उत्तम आणि निरोगी दीर्घायुरारोग्य लाभावे ही परमेश्वरचरणी प्रार्थना करतो.

– घनश्याम पाटील
प्रकाशक, चपराक प्रकाशन

हे पुस्तक घरपोच मागविण्यासाठी संपर्क 7057 292092 

किंवा खालील लिंकवरून मागवू शकता.

सुभावभजन

 

चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email - Chaprak Email ID

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

हे ही अवश्य वाचा