मी आणि आई

‘मला मुलगी होणार, 15 ऑगस्टला होणार आणि मी तिला नृत्य शिकवणार!’’ मम्मी बोलत होती. आजी म्हणत होत्या, ‘‘अगं शोभा, आत्ता तुझी प्रकृती पाहता बाळाचा जन्म 15 ला नाही होणार…’’
पण मम्मी ठाम होती! आणि झालेही तसेच! मुलगी झाली, 15 ऑगस्टला झाली आणि फक्त शिक्षण नाही तर आयुष्यच नृत्यासाठी दिले गेले… इतकी ताकदीची इच्छाशक्ती होती माझ्या मम्मीची आणि ती मुलगी मी… संयोगिता…


संयोगिता या नावामागेसुद्धा एक गोष्ट आहे. माझी मम्मी जेव्हा शाळेत होती तेव्हा मम्मीने हे नाव ऐकले होते आणि जेव्हा मी मम्मीच्या पोटात वाढू लागले तेव्हा या शाळेतील आठवणी वर आल्या आणि मग माझे नाव आत्याने नाही तर माझ्या मम्मीनेच ठेवले.
मम्मीला अजून 6 भावंडे होती. मम्मी सगळ्यात मोठी, त्यामुळे जबाबदारीही मोठी. आजोबा ट्रक चालवायचे आणि आज्जी घरचं पाहायची. आबा खूप शांत होते तर आज्जी तेवढीच कडक होती. ‘महिलांनी शिकावे’ हे आज्जीला मान्यच नव्हते आणि मम्मीला मात्र लहानपणापासूनच शिक्षणाची खूप आवड होती. म्हणजे अगदी भाकरी करताना सुद्धा मम्मी लपून छापून वाचन करत असे, इतकी. एकदा शाळेत मम्मीने एका मुलीचे नृत्य पाहिले आणि त्या नृत्याने मम्मीच्या मनात कायमचे घर बनवले आणि मग त्या घराचे दार माझ्या जन्माच्या वेळी उघडले आणि म्हणून मम्मीला मला नृत्य शिकवायचे होते.
जेव्हा माझा जन्म झाला तेव्हा मम्मीला भरतनाट्यम, कथक असं काहीही माहिती नव्हतं. तिला एवढंच माहिती होत की माझ्या मुलीला नृत्याचे शिक्षण द्यायचे आहे. मम्मीला हेमामालिनी खूप आवडायची. त्यामुळे मग हेमामालिनी जे नृत्य करते ते आपण आपल्या मुलीला शिकवू असे तिच्या मनात आले. मग मी जेव्हा अडीच-तीन वर्षांची होते तेव्हा मम्मी मला मांडीवर घेऊन दूरदर्शनवर येणारी शास्त्रीय नृत्याची मालिका दाखवायची आणि मला त्या वयात कळेल अशा शब्दांत सांगायची, ‘‘सयु.. हे बघ किती छान डान्स करतायत ते! तसा डान्स तुला करायचा आहे… ते दुसरे डान्स करतात तसा नाही तर असा करायचंय तुला!’’
तोपर्यंत मम्मीच्या आयुष्यात खूप सार्‍या घडामोडी होऊन गेल्या होत्या. मम्मीचं लग्न हे डॉक्टर आहे असं सांगून फसवून झालं होतं. त्यामुळे मम्मीला लग्नानंतर खूप अवघड गोष्टींना सामोरे जावे लागले. घर, शेती असं पाहत मम्मीचं आयुष्य पुढे जात होतं. नंतर माझा जन्म झाला. जन्माच्या वेळी मी खूप कुपोषित होते. आम्ही गोठ्यात राहायचो त्यामुळे माझी प्रकृती खूप खालावली होती. त्यातच डॉक्टरनी सांगितले, ‘‘मुलीला (मला) क्षयरोग झाला आहे.’’ मग मला इंजेक्शन्स सुरू झाली. त्यावेळी ते एक इंजेक्शन 5 रूपयाला मिळायचे. मम्मीच्या सासरच्यांनी सांगितले की आम्ही त्यासाठी पैसे देणार नाही. मग मम्मीने शिवणकाम सुरू केले आणि माझ्या त्या इंजेक्शनसाठी ती घर आणि शेतीसोबतच शिवणकामही करू लागली. असेच दिवस जात होते आणि एक दिवस जयवंतमामा घरी आले. दरवाजाला टेकून उभ्या असणार्‍या मम्मीलाच त्यांनी विचारले, ‘‘अक्का कुठंय?’’मम्मीची इतकी दयनीय अवस्था झाली होती की ती ओळखूच येत नव्हती. मामाने घरी जाऊन सगळे सांगितले आणि मग आबा आणि मोठे मामा यांनी मम्मीला कोल्हापूरला आणले.
आपल्या भारतीय स्त्रियांचं मन इतकं मोठं असतं की संसार म्हणजेच तीचं खरं घर याच विश्वासावर ती आयुष्यभर त्रास जरी झाला तरी सहन करत तिथेच राहते. तसंच मम्मीने केलं. ती सासरी परत गेली पण ‘येरे माझ्या मागल्या’ या उक्तीप्रमाणे पुन्हा त्याच अनुभवांची पुनरावृत्ती सुरू झाली. आता तिच्यासमोर माझं आयुष्यही होतं. त्यामुळे मम्मीने मी दीड वर्षांची असताना आहे त्या कपड्यांवर मला घेऊन ते घर सोडलं आणि बसची वाट पाहत थांबली. कोल्हापूरला जायला पुरेसे पैसे नव्हते तर तिथल्या एका स्त्रीने मम्मीला पैसे दिले आणि मग मम्मी मला घेऊन कायमची कोल्हापूरला आली.

मम्मी आमच्या आज्जीसारखी स्वाभिमानी होती. तिला कुणावर अवलंबून राहायचं नव्हतं. त्यामुळे आबांच्या घरापासून जवळ पण स्वतंत्र राहायला तिने सुरूवात केली आणि मग आमचा दोघींचा एकत्रित प्रवास सुरू झाला!
सुरूवातीला मम्मीने नोकरी करायला सुरूवात केली. तिचं संभाषणकौशल्य खूप चांगलं होतं त्यामुळे तिला मुंबईहून त्या काळात एक चांगली नोकरीची संधी आली होती. माझ्यासाठी तिने ती संधी सोडून दिली. आई अशीच असते ना! स्वतःची कितीही स्वप्ने असू देत पण जेव्हा आपल्याला अपत्य होते तेव्हा तेच तिचे स्वप्न आणि जग होऊन जाते अन् मग त्यासाठी ती आनंदाने त्याग करत राहते.
कालांतराने मम्मीने अनेक व्यवसाय केले. त्यामध्ये अगदी सौंदर्य प्रसाधनांपासून ते पेपर नॅपकिनच्या कारखान्यापर्यंत!
मम्मी पश्चिम महाराष्ट्रातील पहिली महिला होती जिने स्वतः पेपर नॅपकिनचा कारखाना सुरू केला होता. अगदी त्यासाठी लागणार्‍या प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टींचा अभ्यास करून अन् खूप फिरून तिने तो कारखाना उभा केला होता. त्याचबरोबर अग्निशामक सिलेंडरचा व्यवसायही तिने सुरू केला. यासाठी महाराष्ट्रात दोनच महिला काम करणार्‍या होत्या त्यातली मम्मी एक होती.
पण… मम्मीचा संघर्ष अजून संपला नव्हता त्यामुळे तिला या व्यवसायांमध्ये अपयश येत गेले. तरी देखील ती प्रत्येक वेळी नवीन जोमाने आणि प्रामाणिकपणे नव्याने सुरूवात करायची. तिला या काळात बिथरतानाही मी जवळून पाहिलंय आणि त्या बिथरण्याला मागे टाकून ताकदीने उभं राहतानाही!
आत्ता जेव्हा मी विचार करते तेव्हा वाटते की साथीदाराशिवाय मम्मीने हे सगळं कसं पेललं? कारण बाकी काही नाही पण निदान भावनिक आणि मानसिक साथ ही प्रत्येक व्यक्तिला  आवश्यक असतेच…
अशा पद्धतीने मम्मीचं जीवन सुरू असताना माझं शिक्षण सुरू झालंं होतं. पहिली शाळा इंदुमती, नंतर वाय.पी.पोवार आणि नंतर ताराराणी. कत्थक नृत्यासाठी अंबाई टँक येथे श्री. वसंतराव कुलकर्णी सर यांच्याकडे क्लासही लावला पण या काळात आम्ही घरेही बरीच बदलली. त्यांमुळे स्थिर असे  नृत्याचे शिक्षण सुरू करता आले नव्हते.

अग्निदिव्य

मी जेव्हा सहावीला गेले तेव्हा आम्ही राहायला प्रियदर्शिनीमध्ये उंचगावला होतो आणि शाळा ताराराणी. मम्मीने चौकशी केली आणि गायन समाज देवल क्लब येथे कथक आणि गायन यासाठी माझा प्रवेश निश्चित केला, जेणेकरून सर्व काही एकाच बस रूटवर असेल. इथून खर्‍या अर्थाने माझ्या कलेच्या शिक्षणाला सुरूवात झाली.

मम्मीने नेहमीच मला स्वावलंबनाचे धडे दिले. मला तिने खूप ठिकाणी शिबिरांना पाठवले. प्रत्येक ठिकाणी आधी ती मला स्वतः सोबत येऊन कसे जायचे हे दाखवून द्यायची आणि मग नंतर मला एकटीला पाठवायची. या आणि अशा अनेक अनुभवांमधून मम्मीने मला जीवनाचे शिक्षण दिले.
याच वर्षी मम्मीला शाळेत असताना ज्या नृत्याने आकर्षित केले होते त्या नृत्याचेही शिक्षण सौ. अमृता जांबोलीकर टीचर यांच्याकडे सुरू झाले. भरतनाट्यमचे शिक्षण सुरू झाले…  1998-99 मध्ये!
मम्मी मला नेहमीच सांगायची की, ‘‘सयु, आयुष्यात काहीही कर पण असं काम कर की लोक तुझ्याकडे आले पाहिजेत.’’  ती लोकमान्य टिळकांचं एक उदाहरण द्यायची, ‘‘अगदी चप्पल शिवायचं जरी काम सुरू केलं तरी ते असं करायचं की चप्पल शिवायला सगळ्यांनी आपल्याकडेच आलं पाहिजे.’’
आणि याच विचारातून पुढे भरतनाट्यमच्या प्रसारासाठी 29 जुलै 2004 मध्ये ‘सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत न थांबता 13 तास भरतनाट्यम नृत्य करण्याचा उपक्रम’ केला गेला. त्यानंतर ‘तपस्या’ नावाने 4 ते 7 डिसेंबर 2008 मध्ये सलग 66 तास नृत्य करण्याचा जागतिक विक्रम केला. 10 जानेवारी 2015 मध्ये ‘नृत्यसंस्कार’ नावाने 2100 सहभागींना भरतनाट्यमचे मूळ धडे देऊन त्यांचे एकत्रित सादरीकरण करण्याचे पहिले गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केले. त्यानंतर पाठोपाठ 31 जानेवारी 2016 मध्ये 576 नृत्यांगणांचे महाराष्ट्राच्या लोकनृत्यांची राणी असणार्‍या लावणी नृत्याचे सादरीकरण करण्यात आले. हे दुसरे गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केले, ज्याचे नाव ‘लावणी मानवंदना’ होते!
हे सर्व करत असताना खूप अडचणी, भावनिक आणि मानसिक हतबलता, आर्थिक कमतरता, कमी पडणारे मनुष्यबळ, विरोध, अडवणूक, अफवा या आणि अशा अनेक प्रसंगांमधून मम्मी आणि मी जात होतो. बर्‍याचदा ‘पैसे नाहीत’ म्हणून न जेवता झोपलो, शेजार्‍यांकडून, घरमालकांकडून, मैत्रिणीच्या वडिलांकडून पैसे उधार घेऊन नृत्याचे शिक्षण केले. नृत्याचे शिक्षण घेण्यासाठी माझे गुरू टी. रवींद्र शर्मा सर यांच्याकडे बेळगावला जावे लागायचे. यासाठी येणारा प्रवासाचा खर्च सुद्धा प्रियदर्शिनी कॉलनीमध्ये मम्मीने घर-घर मागून पूर्ण केला. ते दिवस आजही डोळे ओले करून समोर उभे राहतात.
एक सामान्य व्यक्ती काय काय करू शकत नाही ते सर्व माझ्या मम्मीने प्रत्यक्षात करून दाखवले आणि मला लहानपणापासून एकच माहिती होतं मम्मी जे सांगते ते करायचं. त्यामुळे 2008 पर्यंत मी माझे स्वतःचे विचार कधी मांडले नाहीत. मम्मी जे म्हणेल तेच करत आले पण त्याचमुळे आज मी हे लिहू शकतीये, व्यक्त होऊ शकतीये. आज माझ्या प्रत्येक विचारात, कर्मात माझी मम्मीच भरून आहे. माझ्याशिवाय तिचं अस्तित्व नाही असं ती नेहमी म्हणायची, पण खरं  सांगायचं तर तिच्याशिवाय माझंच काही अस्तित्त्व नाही!!

– नृत्यचंद्रिका संयोगिता पाटील

पूर्वप्रसिद्धी : साहित्य चपराक मासिक जानेवारी २०२४

चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email - Chaprak Email ID

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

हे ही अवश्य वाचा