प्रत्येक वयात आलेल्या मुलीच्या आई-वडिलांना चिंता लागते ते तिला सुयोग्य असं स्थळ व वर मिळण्याची. अर्थात माझ्याही आई-बाबांना हीच चिंता लागलेली होती. मी दत्त सांप्रदायिक प. पू. नाना महाराज तराणेकर यांची अनुग्रहित. माझे आजोबा नानांचे अधिकारी शिष्य. माझ्या आजोळी आमचे वंशपरंपरागत आलेले पेशवेकालीन राम मंदिर आणि नानांनी स्थापन केलेले दत्त मंदिर. वडिलांकडून प. पू. गोंदवलेकर महाराजांची उपासना. त्यामुळे लहानपणापासून संपूर्ण आयुष्य हे आध्यात्मिक उत्सवांमध्येच गेलेले. भजनाची नितांत आवड. आमच्या नानांच्या परिवारात तर मला ‘मीराबाई’ म्हणून संबोधत असत. त्यामुळे जशी मी मोठी झाले तशी साहजिकच प्रत्येकाच्या तोंडी हीच चर्चा असे, की ‘आता हिचं कसं होणार? ही तर टाळ कुटत बसते! हिला कोण नवरा मिळणार?’ तेव्हा मी सहज म्हणून जायचे की, ‘‘माझी काळजी नानांना! ते मला असा नवरा देतील की आम्ही दोघे मिळून टाळ कुटत बसू.’’
अनेक स्थळे आली पण आई-बाबांना काही पसंत पडली नाहीत. माझ्या अपेक्षा पण तशा पाहिल्या तर विलक्षण होत्या. एक म्हणजे आध्यात्मिक बैठक असलेले घर हवे, घरी काही ना काही परंपरा असावी, सतत जेवणाच्या पंगती उठाव्यात म्हणजे भरपूर अन्नदान होत असावे, मुलगा निर्व्यसनी आणि पूर्णपणे शाकाहारी असावा आणि सर्वात महत्त्वाचे मुलाचा बुद्ध्यांक उच्चतम असावा (हळसहखट). तसे हे कॉम्बिनेशन दुर्मीळच म्हणावे लागेल पण माझा विश्वास होता की मला माझे गुरू नक्की असं घर शोधून देतील! आणि एकेदिवशी माझ्या बाबांच्या तळेगावस्थित चुलत काकांकडून (ज्यांना दादाकाका असे संबोधले जाते) श्री. भावार्थ देखणे यांचे स्थळ आले कारण आदल्याच दिवशी त्यांच्या इथे बाबांचे म्हणजे डॉ. रामचंद्र देखणे यांचे विठ्ठल मंदिरात कीर्तन होते आणि ते देखील भावार्थ यांच्या लग्नासाठी चिंतेत होते. दादाकाका आणि देखणे हे देखील तसे नात्यातलेच. सकाळी सकाळी जेव्हा दादाकाकांचा फोन आला आणि त्यांनी सर्व माहिती दिली तेव्हा माझे बाबा देवपूजाच करत होते. नुसती माहिती ऐकूनच बाबा म्हणाले की, ‘‘शंभर टक्के इथेच तुझे होणार!’’ तेव्हा मी त्यांना म्हणाले होते की, ‘‘अहो वडील आध्यात्मातले एवढे मोठे आहेत पण मुलाला आवड असेल का? ते तर अमेरिकेत शिकून आले आहेत!’’ परंतु जेव्हा आमची पहिली भेट झाली तेव्हाच आम्हा दोघांनाही मनोमन कळले होते की हेच आहे ज्याची आपण वाट बघत होतो! मी नेहमी म्हणते की कोणाला जर खरी गुरूकृपा काय आहे हे पाहायचे असेल तर त्यांनी माझे उदाहरण पाहावे. आमच्या लग्नात मी उखाणा घेतला होता,
नाना चरणी मांडली ‘पूजा’, तोषले गुरूतत्त्व
त्यांनी दिले भावार्थ, आणि ‘पूजेला’ आले पूर्णत्त्व
भावार्थचे आत्तापर्यंतचे आयुष्य जर बघितले तर ते चमत्कारांनी भरलेले आहे. भावार्थ हे जात्याच हुशार. घरी वारकरी सांप्रदायिक कीर्तन-प्रवचनाची परंपरा असल्याने त्यांनी वय वर्षे 10 चे असल्यापासून कीर्तन-प्रवचन करायला सुरूवात केली. शालेय वयात असताना त्यांचा ओढा हा जास्त खेळण्याकडे होता. शाळेकडून ते फुटबॉल खेळत असत. साहजिकच अभ्यासात त्यांना विशेष रस नव्हता. इयत्ता नववीत असताना शाळेने आई-वडिलांना बोलावून घेतले होते की, याच्या अभ्यासाकडे विशेष लक्ष द्या नाही तर याच्यामुळे आमचा दहावीचा निकाल खाली येईल! ज्या मुलाला नववीत असताना शाळेकडून असे सांगितले जाते, तो मुलगा बारावी बोर्डात सातवा क्रमांक मिळवतो यावर कोणाचा विश्वास बसेल? बारावीनंतर त्यांनी प्युअर सायन्स करायचे म्हणून मायक्रो बायोलॉजी हा विषय निवडला कारण तेव्हा संपूर्ण महाराष्ट्रात त्याच्या केवळ 250 सीट होत्या. मायक्रो बायोलॉजी झाल्यावर ‘आगरकर रिसर्च इन्स्टिट्यूट’ मध्ये रिसर्च फेलो म्हणून त्यांना जॉबही मिळाला पण तिथे त्यांचे काही मन लागेना. त्यांना सारखे वाटायचे की बंद भिंतींमध्ये काम करण्याचा आपला पिंड नाही. मग त्यांनी एम. बी. ए. करण्याचे ठरवले. त्यासाठी Aअढचअ मध्ये उत्तम मार्क मिळवून इंडसर्च कॉलेजला प्रवेश घेतला आणि मग तिथून शिष्यवृत्ती मिळवून अमेरिकेला युनिव्हर्सिटी ऑफ व्हीस्कोन्सिनमध्ये शिकायला गेले.
हे झाले शिक्षण व नोकरीचे. कलेच्या प्रांतात म्हणाल तर वडिलांचा संत व लोकसाहित्याचा अभ्यास, घरी कीर्तन-प्रवचने-व्याख्याने-भारू
आमच्या लग्नानंतर एकमेकांच्या साथीमुळे त्यांच्या या कलागुणांना अधिक बहर आला. मुळात आम्ही दोघेही बुद्धीजीवी असल्यामुळे प्रत्येक गोष्टीवर चर्चा करून अभ्यासपूर्ण सादरीकरणावर भर देऊ लागलो. मला सर्वात आवडणारे भावार्थ यांचे गुण आणि ज्यामुळेच आत्तापर्यंत त्यांनी यशस्वी वाटचाल केली ते म्हणजे सततचा उत्तमतेचा ध्यास, कोणत्याही सूचनेचे, प्रसंगाचे, घटनांचे चटकन अवलोकन करून त्यानुसार स्वत:च्या कृतीत बदल करणे, परिवर्तनशीलता, त्याबरोबरच नवनवीन गोष्टी शिकण्याची आणि आत्मसात करण्याची वृत्ती. त्यांनी नेहमीच मला बरोबरीचे स्थान दिले आणि माझ्या विचारांचा, सूचनांचा आदर केला. आमच्या लग्नानंतर आम्ही पतीपत्नी असण्याबरोबरच एकमेकांचे मित्र-मैत्रीण, मार्गदर्शक, समुपदेशक, प्रवर्तक, प्रेरक कधी झालो हे आम्हालाच कळले नाही. आमच्या बाबांच्या (डॉ. रामचंद्र देखणे) आकस्मिक निधनानंतर तर खूपच मोठी जबाबदारी आमच्यावर आली. आमचे लग्न झाल्यानंतर घरचा पहिलाच ‘आजोबांच्या स्मृतिदिनाचा’ कार्यक्रम होता. पुण्यातील सर्वांना माहीत आहे की या कार्यक्रमात अनेक प्रसिद्ध गायक, वादक, लोककलावंत आपली सेवा रूजू करतात. हा कार्यक्रम झाल्या रात्री बाबांचे वाक्य होते की, ‘‘आता माझी काळजी मिटली. पूजा आणि भावार्थ सर्व काही समर्थपणे पुढे नेतील!’’
https://shop.chaprak.com/product/chaitanya-palavi-chaprak/
त्यांचे हे वाक्य आम्ही सार्थ ठरवू शकलो याचे मनोमन समाधान वाटते. त्यांच्या जाण्यानंतर आम्हाला खूप वेगळ्या स्तरावर सर्व लोकांनी नेऊन ठेवले. वेगवेगळ्या जबाबदार्या समोर आल्या. महाराष्ट्र शासनाच्या लोक-साहित्य समितीवर भावार्थ यांची सदस्य सचिव म्हणून नेमणूक झाली आणि नुकतीच माउलींनी भावार्थ यांची आळंदी देवस्थानच्या विश्वस्तपदी नेमणूक करून सेवेची सर्वोच्च संधी आम्हाला दिली. हे सर्व घडत असताना मागे वळून बघितल्यावर असे लक्षात येते की आमच्या सद्गुरूंनी हे सर्व पेलण्यासाठी आमच्याकडून खूप लहान असल्यापासून तयारी करून घेतली आहे. सर्व देणारेही तेच आणि करून घेणारेही तेच. तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणे,
होतें बहुत हें दिवस मानसी ।
आजि नवस हे फळले नवसी ।
व्हावी भेटी ते जाली गोविंदासी ।
आतां सेवा करीन निश्चयेसी वो ॥
या पुढील आयुष्यात देखील माउलींनी आमच्याकडून तन, मन, धन आणि बुद्धिने अशीच सेवा करून घ्यावी आणि आम्हास कधीही आपल्या पायावेगळे करू नये अशी मनोमन प्रार्थना करते आणि लेखाला पूर्णविराम देते.
-डॉ. पूजा भावार्थ देखणे
पूर्वप्रसिद्धी – ‘साहित्य चपराक’ जानेवारी २०२४