प्रत्येक क्षणाची मजा घेतली – गौरव चाटी

भारतीय चित्रपटसृष्टीत, संगीत क्षेत्रात प्ले बॅक सिंगर आणि संगीतकार म्हणून काम करतोय.
25 जुलै 1994 रोजी जन्म झाला. वयाच्या 9व्या वर्षी माझ्या आईने माझ्यातील कलाकाराला ओळखले कारण रेडिओवर दुरून जरी एखादं गाणं ऐकु आलं तरीही ते कान देऊन ऐकायचो. त्यात तल्लीन होऊन जायचो. घरातले डब्बे, दरवाजे, टेबल जे मिळेल त्यावर मी ठेका धरत असे त्यामुळे आईने मला गाण्याच्या क्लासला घातले. जसजसं वय वाढत गेलं तसातसा माझा गाण्याचा अभ्यास आणि रूची वाढत गेली. इंजिनीअरिंगचं धावपळीचं शेड्युल सांभाळून मी रियाज करायचो.

माझे त्यावेळचे गुरू नागपूरातील श्री. धनराज यावलकर यांच्याकडे मी अभ्यास सांभाळत विशारदचे शिक्षण पूर्ण केले. त्यासोबतच नाट्यसंगीत, तबला यांची सुद्धा तालीम घेतली. ज्यावर्षी मी इंजिनीअर झालो त्याच वर्षी योगायोगाने मी विशारद पण झालो. हाच माझ्या आयुष्यातला खरा निर्णयाचा क्षण होता कारण  चांगल्या मार्गाने इंजीनियरिंग झाल्यामुळे साहजिकच घरच्यांची इच्छा होती की मी चांगल्या गलेलठ्ठ पगाराची नोकरी स्वीकारावी आणि आपले पुढचे दिवस आनंदात घालवावेत परंतु माझा सगळा कल, जीव माझ्या कलेवर असल्यामुळे मी अतिशय द्विधा मनस्थितीत होतो.

पुढे काय? हा मोठा यक्षप्रश्न माझ्यासमोर उभा ठाकला. निवड झालेल्या कंपनीत नोकरी करता जावे की स्वतःच्या आतील कलाकाराला जिवंत ठेवून  कलेचाच मार्ग निवडावा? माझ्यातील कलाकाराने माझ्यातील इंजिनीअरवर मात केली आणि मी कलोपासनेसाठी मुंबईला जायचा निर्णय घेतला. माझी ओढ सुफी गायकीकडे असल्याने हाच मार्ग निवडावा असा माझ्या मनाने कौल दिला आणि आईवडिलांची संमती आणि आशीर्वाद घेऊन मुंबईला पोहचलो. मुंबईत पोहचल्यावर माझा गुरूचा शोध सुरू झाला. तेव्हा दरमहा खर्च निघण्यासाठी मी वेगवेगळ्या कंपोजरकडे स्क्रॅच गाणी गायचो. (नागपूर सोडल्यावर आईबाबांकडून आर्थिक मदत घ्यायची नाही असं मी ठरवलं होतं).

हे स्क्रॅच गाता गाता अनुराग गोडबोले यांच्याकडे मला स्क्रॅच गाण्याची संधी मिळाली तेव्हा त्यांच्यासोबत बोलताना माझी सुफी शिकण्याची इच्छा आणि  मी घेत असलेल्या गुरू शोधाबद्दल त्यांना कळाले आणि मला उस्ताद मुन्नवर मासुम यांच्याबद्दल सांगितले! पण माझ्या मनात शंका होती इतका मोठा माणुस ज्याला मी फक्त फेसबुक, युट्यूबवर पाहत आलोय, ऐकत आलोय तो माणूस मला शिष्य म्हणून स्वीकारेल का? पण मनातली ही भीती मनातच ठेवून मी एक प्रयत्न करायचा असं ठरवलं आणि त्यांचा नंबर मिळवुन मी त्यांना संपर्क करायचा प्रयत्न करू लागलो.

 

 

साधारण तीन-चार महिन्यांनी माझा त्यांच्यासोबत संपर्क झाला आणि मी त्यांच्याकडे जाणे सुरू केले. ते फक्त इतकंच म्हणाले, ‘‘बेटा, अच्छा गाते हो, देखते है’’ पण अजूनही त्यांनी मला शिष्य म्हणून स्वीकारले नव्हते. मी सतत त्यांच्या पाठिमागे लागलो होतो, मला कधी शिकवता, सुरूवात कधीपासून करायची? पण नेहमी अपयशच हाती पडत होते आणि माझा गुरू शोध पूर्णत्वास येत नव्हता. एक दिवस माझे सततचे प्रयत्न पाहून त्यांनी मला बोलावले आणि सांगितले की ‘‘माझ्याकडून शिकायचं असेल तर आधीचं सगळं विसरून नवी सुरूवात करावी लागेल.’’

मी लगेच तयार झालो आणि इथुन माझ्या सुफी गायकीच्या पहिल्या सरगमची सुरूवात झाली.
6 महिन्याचे प्रशिक्षण घेतल्यानंतर उस्तादजी म्हणाले की ‘‘अब आप सिखने के काबील हो गये हो।’’त्यानंतर उस्तादजींनी मला गंडा बांधला आणि मी त्यांचा ‘गंडाबंद शागीर्द’ झालो. त्यांच्याकडून मी आत्ताही शिकतोय आणि आयुष्यभर शिकतच राहणार आहे. सुफी गायकीमध्ये मला काम करायचं असल्याने मी उर्दू भाषा शिकलो कारण उर्दू ही सुफीचा आत्मा आहे असं म्हणतात आणि बिना आत्म्याची गायकी कशी शिकणार?

उस्तादजींच्या संगतीत राहुन उर्दू शब्दांचे योग्य उच्चारण मी  अजूनही शिकतोय आणि उस्तादजींच्या अफाट ज्ञानसागरातून एक एक मोती वेचतोय.
उस्तादजींकडून शिक्षण सुरू असतानाच माझी बाकीची कामं देखील सुरूच होती कारण मुंबईसारख्या शहरात राहायचं म्हणजे पैसा तर हवाच. घरून घ्यायचा नाही हे ठरवल्याने मला कामं करावी लागणार होती त्यामुळे दिवसभर कामाच्या शोधात फिरणे, कुठे स्क्रॅच गा, एखादी जाहिरात कर असं करत संध्याकाळी मी बरेचदा कामाच्या ठिकाणाहुन पायीच उस्तादजींकडे जायचो. कधी कधी ही रपेट 4-5 किलोमीटर होत असे. एखाद्या कामाचे पैसे मिळाले तर भरपेट नाही तर मुंबईचा वडापाव तर सार्‍यांचंच पोट भरतो. या सगळ्या धावपळीत मला एक संधी चालुन आली ती म्हणजे ‘हिरकणी’सारख्या मोठ्या चित्रपटात मला पार्श्वगायन करण्याची संधी मिळाली ती देखील कव्वालीच. या कव्वालीने मला पुढे बरीच कामं मिळवुन दिली.
गुरू बोलत नसला तरी आपला स्ट्रगल बघत असतो आणि त्याचाही त्याला त्रास होतच असतो.

 

उस्तादजी सुद्धा माझी ही धावपळ, त्रास बघत होते आणि तो कमी व्हावा यासाठी त्यांनी मला मोंटी शर्मा यांची भेट घालून दिली. मोंटी शर्मा हे फिल्मी दुनियेतील मोठं नाव. त्यांनी ‘देवदास’, ‘ब्लॅक’सारख्या चित्रपटातील गाण्यांचे कंपोझिशन, अरेंजमेन्ट केले आहे. हळूहळू मोंन्टी भैय्यांकडे काम करता करता  मी त्यांना असिस्ट करायला लागलो. त्यांना असिस्ट करता करता मला बरंच काही शिकायला मिळालं. ‘गदर 2’ सारख्या मोठ्या चित्रपटात असिस्ट करण्याची, गाण्याची संधी मला मिळाली.
या ‘गदर 2’ गाण्याचा किस्सा मला सांगावासा वाटतो. सन्नीजी आणि उत्कर्ष शर्मा यांच्या एन्ट्री गाण्याचा मी स्क्रॅच गायला होता आणि ते गाणं सुखविंदरजी गाणार होते पण त्यांच्या यूएस टुरमुळे ते उपलब्ध नव्हते आणि माझ्या आवाजातील स्क्रॅच दिग्दर्शकांना आवडलं असल्याने त्यानी हे गाणं गाण्याची संधी मला दिली. गदर 2 सारख्या अजूनही बर्‍याच मोठ्या प्रोजेक्टमधे मी मोंटु भैय्यांना असिस्ट करतोय.
सध्या माझ्या या प्रवासात मी 5 मराठी चित्रपटांना संगीत दिलं आहे. अजून काही अपकमींग प्रोजेक्टला सुद्धा संगीत देतोय.

या माझ्या संपूर्ण प्रवासात मी प्रत्येक क्षणाची मजा घेतली. खूप ताणतणाव सहन केले. चढ-उतार आले पण मी प्रत्येक क्षणाला भरभरुन जगलो. नवी ऊर्जा नव्या उमेदीने पुढे जात गेलो, जातोय आणि अभिमानाने जगतोय, काम करतोय कारण माझा परिवार, माझी मित्र मंडळी, शुभचिंतक, प्रेक्षक, श्रोते यांच्या शुभेच्छा, आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत.

– गौरव चाटी
शब्दांकन – मेघना केळकर-गोरे
पूर्वप्रसिद्धी – ‘साहित्य चपराक’ जानेवारी २०२४

चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email - Chaprak Email ID

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

हे ही अवश्य वाचा