संगमेश्वर तालुक्यातील लोवलेस्थित वाचकप्रिय लेखक जे. डी. पराडकर यांचे ‘चपराक प्रकाशन’कडून प्रसिद्ध होत असलेले हे सातवे पुस्तक. जेडींच्या लेखणीतून कोकणचा समृद्ध, अस्पर्श असा निसर्ग जसा दिसतो तशीच वरपांगी साधी भोळी पण अंतरी नाना कळा असणारी माणसेही दिसतात. कोकणातील प्राचीन मंदिरे, ऐतिहासिक वास्तू यांची स्पंदनेही लेखकाच्या संवेदनशील मनाला जाणवतात. ‘हळवा कोपरा’ हे पुस्तकही याला अपवाद नाही. मुळात हे साप्ताहिक स्तंभलेखन असल्याने इथे विषयांची विविधता पुरेपूर आहे.
‘पैजेचा विडा’ हा पहिलाच लेख आपल्याला भूतकाळात घेऊन जातो. पैज लावून अविश्वसनीय वाटावा असा आहार घेणारे नमुने इथे आपल्याला भेटतात. पंचवीस लाडू साजूक तुपात कालवून खाणारे अनंतराव, दोनशे गरे असणारा फणस एकट्याने फस्त करणारा सीताराम, दही आणि मिरचीच्या जोडीने तब्बल साठ वडे चेपणारे लक्ष्मणराव, उकडीचे एकवीस मोदक स्वाहा करणारे प्रभू असे अनेक अवलिये या लेखात आपल्याला भेटतात. अर्थात तो काळच वेगळा होता. त्या कष्टकरी मंडळींमध्ये हे सारे पचवण्याचे सामर्थ्य होते. आज कोणी असा अचाट उद्योग केलाच तर त्या ताटावरून इस्पितळातील खाटेवरच रवानगी होणार की!
‘लक्ष्मीची गोकर्ण’ ही कथा तर वेगळाच विषय हाताळणारी. मंदाकिनी या फुलवेडीची ही कथा. आपल्या बागेत असंख्य प्रकारची फुलझाडे, त्यात निळ्या – जांभळ्या गोकर्णफुलांची रेलचेल असताना पांढरी गोकर्ण नाही म्हणून खंतावणार्या मंदाकिनीला अखेर बर्याच प्रतीक्षेनंतर पांढर्या गोकर्णीची शेंग मिळते खरी पण खूप प्रतीक्षेनंतर उगवून आलेल्या वेलीला फूल लागायचे काही चिन्ह नव्हते. शेवटी निराश होऊन ती वेल उपटण्यासाठी हात सरसावतो पण…
जेडींच्या पुढील एका लेखाचा केंद्रबिंदू आहे चक्क एक उपाहारगृह. संगमेश्वर येथील ‘मनमोहन क्षुधाशांती गृह.’ गेली आठ दशके केवळ स्थानिकांच्याच नव्हे तर महामार्गावरून प्रवास करणार्या असंख्य प्रवाशांची रसना तृप्त करणारे हे ठिकाण. ऐंशी वर्षात हॉटेलच्या मालकीचा अनेक वेळा खांदेपालट झाला, ग्राहकांच्या पिढ्या बदलल्या पण ग्राहकांप्रती असणारी आपुलकी कधीच कमी झाली नाही. पत्रकार, डॉक्टर्स, राजकीय नेत्यांपासून ते सरकारी कर्मचारी आणि हमालांपर्यंत सर्वच समाज घटकाच्या भेटीगाठीचे हे हक्काचे ठिकाण आहे. थालिपीठ, कांदाभजी, भाजीपुरीपासून ते मोहनपुरी, बालुशाहीसारख्या गोड पदार्थांपर्यंत ताव मारणारे खवैय्ये ही या हॉटेलची शानच म्हणा ना! इतकंच काय पण प्रत्येक ग्राहकांची रुची लक्षात घेऊन न सांगता त्याच्या पुढ्यात मनपसंत चहाचा वाफाळलेला कप ठेवणारे रावजीमामा यांनी चहाचा ‘रावजी’ हा ब्रँडच करून टाकला होता. लेखक म्हणतात तसे ‘मनमोहन’ हा खरोखर कल्पवृक्ष आहे मात्र काळाच्या ओघात हा कल्पवृक्ष भुईसपाट होण्याच्या मार्गावर आहे. हे वास्तव स्वीकारताना लेखकाच्या काळजात अगदी चर्रर्र झालंय. निर्जीव वास्तूंप्रती सुद्धा आपल्या भावना किती उत्कट असू शकतात याची ही प्रचितीच आहे.
लेखणीला कोणताही विषय वर्ज्य नसल्यामुळे एक लेख ‘खापर’ या विषयावरही मस्त जमून गेलाय. ‘खापर फुटणे’ हा शब्दप्रयोग तर आपण अनेकवेळा ऐकतो पण मुळात खापर म्हणजे काय हे आताच्या तरूण पिढीला कितपत ज्ञात आहे कोण जाणे! मातीचे मडके फुटल्यावर त्याचे जे तुकडे होतात त्यांना खापर म्हटले जाते. मडकं फुटल्यावर जशा ठिकर्या उडतात तशाच एखाद्या कामात यश न मिळाल्यास स्वप्नांच्याही ठिकर्या उडतात आणि उरतात ती खापरं. म्हणूनच अपयशाची जबाबदारी दुसर्यावर ढकलण्यासाठी खापर हा शब्द रूढ झाला असावा. खापर या लेखाचा मुख्य विषय आहे कसबा गावातील दहीहंडी. दिवसभर चालणार्या या उत्सवाचे बहारदार वर्णन मुळातूनच वाचले पाहिजे. संध्याकाळी हंडी फुटल्यावर खाली पडणारे खापराचे तुकडे मिळवण्यासाठी सारा बालचमू सज्ज असे.
हंडी फोडल्याचा आवाज आला की त्या घोळक्यात घुसून खापराचा तुकडा मिळवण्यासाठी जिवाचे रान केले जायचे. घोळक्यात शिरून आपल्याला कुठे लागेल की काय याची पर्वा न करता हाती लागणारा खापराचा तुकडा अगदी शौर्यपदक मिळाल्याच्या थाटात घरी आणला जाई. बालपणी छोट्या छोट्या गोष्टीत कसा कमालीचा आनंद असतो याची साक्षच या अगदी साधा विषय असणार्या या लेखातून मिळते.
सुसंस्कारांचे महत्त्व अधोरेखित करणारा एक लेख म्हणजे ‘दोन रुपयांची चोरी.’ बालपणी अजाणतेपणे लागणार्या वाईट सवयी वेळीच मोडून काढल्या पाहिजेत ही शिकवण या लेखातून मिळते. लेखातील काळ बराच जुना आहे. त्यावेळी शाळेत खडुइतकीच छडी ही आवश्यक गोष्ट होती. विद्यार्थ्यांकडून घडणार्या प्रमादाबद्दल त्यांना यथेच्छ बडवून काढणे हे अगदी समाजमान्य होते. आधी फटके आणि मग जमल्यास समुपदेशन अशी काहीशी प्रथाच होती. या लेखात सुभाष दोरे हा अत्यंत गरिबीत दिवस काढणारा आणि वडिलांच्या कृपाछत्राला पारखा झालेला विद्यार्थी. मोलमजुरी करून घर चालवणारी आई कष्टाने मिळवलेले चार-दोन रुपये शाळेतून येताना काही वस्तू आणण्यासाठी सुभाषकडे देत असे. पैसे सुरक्षित राहावेत म्हणून ते कंपासपेटीत ठेवले जात. एकदा मधल्या सुटीत सुभाषच्या कंपासपेटीतून दोन रुपये गायब होतात. त्याचा रडवेला चेहरा पाहून पुढील तासाच्या शिक्षिका काय घडलेय ते समजून घेतात आणि योग्य पद्धतीने चोरी करणार्या विद्यार्थ्याचा शोध घेतात आणि तो सापडल्यावर न भूतो अशी त्याची धुलाई करतात. इथे शारीरिक पीडा देणे इतकाच शिक्षेचा उद्देश नव्हता तर भविष्यात कधीही असा वावगा विचार मनातही येऊ नये यासाठी दिलेला धडाच होता. आज अशी शिक्षा मान्य होणारही नाही कदाचित. माराचा उलटा परिणाम होऊन विद्यार्थी निगरगट्टही होऊ शकतील पण आजची परिमाणे त्या काळाला न लावणे हेच योग्य.
आता अशीच ही सध्याच्या काळातील ‘कंपासचा मोह’ ही कथा पाहा. सुयश हा उंचीने जेमतेम तीन फूट असणारा खुजा विद्यार्थी. साधी सरळ वागणूक असलेला मुलगा. सर्वच शिक्षकांचा अगदी लाडका विद्यार्थी पण पुढेपुढे तो बदलत जातो. शाळेत व्यवस्थित पोषक आहार मिळत असूनही अन्य खाऊसाठी तो पैसे घालवतोय असे दिसू लागते. पाच दहा रुपयांपासून सुरुवात होऊन रोज पन्नास रुपये उधळण्यापर्यंत त्याची मजल जाते शिक्षकांच्या कानी या गोष्टी पोहोचतातच. सुयशला विचारल्यावर ‘माझी मावशी रोज खाऊला पन्नास रुपये देते’ असे उत्तर मिळते. खरंतर मावशीची परिस्थिती यथातथाच असते पण शिक्षक फारसे खोलात जात नाहीत. काही दिवसांनी त्याच्या मनगटावर स्मार्ट वॉच दिसते. चौकशी केल्यावर ‘मुंबईत कामाला असणार्या वडिलांनी घड्याळ घेतले’ असे उत्तर मिळाले. शिक्षकांना ते खरे वाटले पण काही दिवसांनी ते घड्याळ सुयशने चोरल्याचे समजले. शिक्षक सुन्न झाले. शारिरीक शिक्षा न करता पालकांशी बोलावे असे ठरले. वारंवार निरोप देऊनही पालक शाळेत आलेच नाहीत. इकडे सुयशचे धाडस वाढत गेले. एके दिवशी एका मित्राची नवीकोरी कंपासपेटी त्याने चोरली. ही चोरी एका मुलाने पाहिल्याने तो पकडला गेला. सुयशला शिक्षकांनी दोन फटकेही दिले पण पुढे काय? त्याचे पालक अजूनही शिक्षकांना भेटायला येत नाहीत. मुलांमधील गुन्हेगारी वृतीचे वेळीच उच्चाटण झाले नाही तर भविष्यात तो अट्टल गुन्हेगार होण्याचीच शक्यता जास्त आहे. सावधगिरीचा इशारा म्हणून या लेखाकडे पाहायला हवे. आपणा सर्वांनाच अंतर्मुख करणारी ही सत्यकथा आहे.
‘अंधारातील रहस्ये’ हा असाच वेगळ्या विषयाला हात घालणारा लेख. लेखकाच्या बालपणीचा काळ म्हणजे अगदी गावात वीज नसण्याचा काळ. जंगलमय भागात असणारे लेखकाचे घर म्हणजे आजूबाजूला गूढ असा अंधार. त्यातून कोकण भुताखेतांच्या गोष्टींसाठी प्रसिद्धच. त्यामुळे दिवसा कितीही शौर्याचा आव आणला तरी रात्री घराच्या मांडवात पाऊल टाकताना गाळण उडायचीच. भूत वगैरे सार्या भ्रामक कल्पना आहेत याचा साक्षात्कार जाणत्या वयात होत असला तरी बालमनावर त्याचा विलक्षण पगडा असतो. एका मे महिन्यात सर्वांसोबत लेखक अंगणात बसले असताना बागेतून रडण्याचा आवाज आला. ‘भुतं रडतायंत’ असे मोठ्यांपैकी कुणी सांगितल्यावर तर पाय लटपटायलाच लागले. ग्रामीण भागातील अशी ‘अंधारी रहस्ये’ खरी असोत वा खोटी, चर्चेचा विषय नक्कीच ठरत.
मे महिन्यात जेव्हा घरी पाहुणे मंडळी येत असत तेव्हा रात्री गप्पांची मैफल रंगत असे. मध्येच थोडी शांतता झाली की समोरील आंब्यांच्या झाडावरून ‘अं… हूँ…’ असा रहस्यमय आवाज येई. इकडे लेखकाची भीतीने गाळण उडायची. लगेचच आजोबांच्या सुरक्षित मिठीत दाखल. शेवटी आजोबाच त्यांना बाहेर घेऊन गेले आणि परस्परांना साद-प्रतिसाद देणारे हुमण पक्ष्यांचे जोडपे त्यांना दाखवले. त्या गूढ आवाजाचा उगम तिथे होता तर! एकदा असेच रात्री बाहेर पडल्यावर शेजारच्या घरात झोपाळ्यावर एक वृद्ध स्त्री केस मोकळे सोडून हातवारे करताना दिसली आणि लेखकाची किंकाळी अंगणात घुमली. ती ऐकून आजोबा धावत बाहेर आले. बॅटरीचा झोत टाकून त्यांनी पाहिले तर शेजारच्या घरी आलेली ती फटीमावशी होती. आणखी एका रहस्याचा उलगडा झाला. काळोखाच्या उदरात दडलेल्या अशा कितीतरी रहस्यांचा उलगडा होत गेला. आता अशा रहस्यात कितीही फोलपणा वाटला तरी बालपणी मात्र अमानवी गोष्टींचा पगडा मनावर नक्कीच असतो.
‘गिरगावचे फेरीवाले’ हा असाच एका वेगळ्या जगाची ओळख करून देणारा लेख. आंबेडखुर्द सारख्या निसर्गरम्य गावी ऐसपैस घरात वास्तव्य करणार्या लेखकाचा चाळीशी परिचय झाला तो बहीण लग्न होऊन गिरगावात गेल्यावर. बहिणीच्या चाळीत गेल्यावर चाळ संस्कृती ही गावच्या वातावरणाशी एकरूप झाल्यासारखी वाटली. इथेच फेरिवाल्यांची असंख्य रूपे त्यांना पाहायला मिळाली. भल्या सकाळी येणारा पहिला फेरीवाला म्हणजे वासुदेव. उतम गिरक्या घेत गाणी म्हणणारा आणि बदल्यात दान दिल्यावर ‘दान पावलं’ म्हणत कृतज्ञता व्यक्त करणारा वासुदेव हा लेखकाच्या दृष्टीने एक फेरीवालाच आहे. वासुदेव गेला की थोडयाच वेळात पूर्वी रिक्षांना जो रबरी फुग्याचा हॉर्न असे तो सायकलला लावून त्याच्या पुंगळीचा आवाज करीत इडलीवाला येत असे. त्या पाठोपाठ नारळपाणीवाला. त्याच्या आरोळीतील ना हे एकच अक्षर स्पष्ट ऐकू यायचे. प्रत्येक फेरीवाल्याची विशिष्ट हाळी हीच त्याची ओळख असे. दुपारच्या वेळी भांडीऽऽऽय असा हेल काढीत डोक्यावर भांड्यांचा हारा घेतलेले एक जोडपे येत असे. मग जुने कपडे देऊन भांडी घेण्याचा व्यवहार. त्यात बरीचशी घासाघीस चालत असे. संध्याकाळी फण्या, बांगड्या, सुया विकणारी महिला ‘सुया घे, बांगड्या घे’ म्हणत आर्जव करीत येत असे. नंतर कधी फळवाला येत असे तर कधी भेळवाला! रात्री थोडे उशिरा कुल्फिवाला असायचाच! मात्र ज्या चाळीत हे विश्व अनुभवले ती चाळही भुईसपाट होण्याच्या मार्गावर आहे. तिथे नंतर उभ्या राहणार्या टॉवरमध्ये फेरीवाल्यांना कुठले आलेय स्थान? नंतर उरणार त्या फक्त आठवणी. लेखकासाठी आणि वाचकांसाठी पण.
या पुस्तकाचे शीर्षक ज्यावरून दिलंय तो ‘हळवा कोपरा’ हाही असाच उतम जमून आलेला लेख आहे. विविध नात्यांच्या बाबतीत प्रत्येकाचं मन हळवं झालेलं असतं. प्रत्येक मनात नातेसंबधांचा एक हळवा कोपरा असतोच. ज्यांना विविध नात्यांचे प्रेम मिळत नाही त्यांनाच यामागील दुःख जाणता येईल. यातील आई आणि मुलाचे नाते कोणत्याही व्याख्येत बसण्याच्या पलीकडील असते. अर्थात नात्यातील ओढ आणि आत्मियता वयानुरूप बदलत जाते हे सुद्धा वास्तव आहे. एकत्र कुटुंब पद्धतीत ज्यांचा जन्म झालाय त्यांना नात्यांचं महत्त्व जेवढं कळतं तेवढं ते इतरांना कळणं कठीण. कालौघात एकत्र कुटुंब पद्धती नामशेष होत चाललीय तेव्हा रक्ताच्या नात्याइतकीच जोडलेली नातीही महत्त्वाची होत आहेत. या नात्यातील वीण घट्ट होण्यासाठी परस्पर विश्वास फार महत्त्वाचा असतो. याच लेखात शब्दातील सौंदर्य, नजरेतील सौंदर्य, कौटुंबिक प्रेमाचे सौंदर्य, भूतदयेतील सौंदर्य आदींचा केलेला उहापोह वाचनीय आहे. किंबहुना हा लेख म्हणते ललित लेखनाचा उत्कृष्ट नमुनाच आहे.
या संग्रहात एकूण वीस लेख आहेत. विस्तारभयास्तव सर्वच लेखांचा परामर्श घेता येत नाही. संपूर्ण पुस्तक निःसंशय वाचनीय आहे. येणार्या प्रत्येक पुस्तकाबरोबर जेडींच्या लेखणीचे सामर्थ्य वृद्धिंगत होतंय. साधीसोपी तरीही लालित्यपूर्ण शब्दरचना, भवतालचा निसर्ग आणि माणसे वाचण्याची त्यांची अद्भूत क्षमता त्यांनी आधीच्या ग्रंथातून सिद्ध केली आहेच. हे पुस्तकही याला अपवाद नाही. वाचक या पुस्तकाला भरघोस प्रतिसाद देतील याची खातरी आहे. जेडींच्या लेखणीतून असेच सकस शब्दभांडार पाझरत राहो यासाठी मनापासून शुभेच्छा!
– अरुण कमळापूरकर, पुणे
हे पुस्तक घरपोच मागविण्यासाठी फोन पे / गुगल पे क्र. ७०५७२९२०९२
अथवा खालील लिंकवरून मागवा