कस्तुरीगंध – प्रस्तावना

प्रा. बी. एन. चौधरी हे खान्देशातील एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व. शैक्षणिक कारकिर्दीबरोबरच त्यांनी साहित्याच्या विविध प्रांतात यशस्वी मुसाफिरी केली आहे. ‘माणूस माणूस जोडत जावा’ या सूत्रानुसार त्यांचं जगणं आणि वागणं आहे. त्यामुळेच सामान्य माणसाच्या सुख-दुःखाशी ते सहजपणे एकरूप होतात. त्याचं प्रतिबिंब त्यांच्या साहित्यातून उमटतं. प्रस्तुतच्या ‘कस्तुरीगंध’ संग्रहातील कथा म्हणजे मानवी भावभावनांवर आधारित सुसंस्कृत जगण्याची शिदोरीच आहे. मातृप्रेमात अखंड डुंबलेल्या या अवलियाच्या शब्दांचा गंध साहित्यक्षेत्रात सर्वत्र दरवळतोय आणि एक अनोखे चैतन्य निर्माण करतोय. या संग्रहातील कथा वाचताना जागोजागी त्याचा प्रत्यय आल्याशिवाय राहणार नाही. म्हणूनच साहित्याच्या प्रांतात या कथासंग्रहाच्या रुपाने दमदार भर पडली आहे. बी. एन. चौधरीनानांचे त्यासाठी प्रथम मनःपूर्वक अभिनंदन!


या संग्रहातील कथा माणसाचे चेहरे आणि मुखवटे दाखवून देणार्‍या आहेत. बर्‍याच कथा लेखकाच्या अनुभवावर आधारित बेतलेल्या असल्याने त्याला सत्याची, वास्तवाची किनार आहे. आजूबाजूला घडणार्‍या अनेक घटनांना त्यांना कथारूप दिले आहे. त्यातून माणुसकीचे दर्शन घडते. कृतकृत्याची, कृतज्ञतेची जाणीव होते. डोळ्यात आपसूक पाणी तरळते. चुकीच्या प्रवृत्तीविषयी चीड निर्माण होते आणि सत्प्रवृत्तीविषयीचा अभिमान दाटून येतो. लेखकाच्या शब्दसामर्थ्याचं आणि आपल्यातील जिवंतपणाचं यापेक्षा मोठं फलित ते कोणतं? वाचकाचे रंजन करण्याबरोबरच त्याला अंतर्मुख व्हायला भाग पाडणार्‍या बी. एन. नानांचे हे मोठे यश आहे. छोटे छोटे संवाद, काळजाचा ठाव घेणारे चित्रदर्शी प्रसंग, सामान्य माणसाविषयी काळजात दाटून आलेला उमाळा, विसंगती अचूकपणे टिपतानाच घडवलेला सद्गुणांचा स्फोट, काही कथांत खान्देशातील अहिराणी शैलीतला गोडवा आणि प्रत्येक कथेतून दिलेला सकारात्मक संदेश यामुळे या कथा त्यांचा ठसा उमटवतात.
या संग्रहातील पहिलीच लघुकथा एका भिकार्‍याची ‘श्रीमंती’ दाखवून देते आणि आपले डोळे खाडकन उघडतात. ‘निःशब्द फूल पोरके झाले’मधील विस्थापित होत असलेल्या एका अबोल फुलाची कथा, मायच्या कल्पकतेतून मिळालेले आणि यशदायी ठरलेले मोजे, ‘माय, ममता आणि आगतिकता’मधील परिस्थितीनुसार प्राधान्यक्रम ठरवणारे बाबा, मनोहारी बाळाच्या रूपात प्रसाद खात खुदकन हसणारे बाप्पा, मंगळसूत्राचे दोन अटळ ध्रुव, तिकिटासाठीच्या दोन रूपयांमुळे म्हातारीचे मिळालेले आशीर्वाद, एका अनोख्या मुलीच्या संरक्षणासाठी पुढे सरसावलेली महिषासूरमर्दिनी, दिन दिन दिवाळीतील संस्मरणीय दहाची नोट, जिभाऊंच्या कृतज्ञ आठवणी आणि त्यांचे संस्कार, भिक्षेच्या स्वरूपात माती मागून दानसंस्कार घडविणारे साधुबाबा, देवाभाऊ-धरुपदाताईंना दिलेली मायेची उब हे सगळं वाचताना आजूबाजूचा परिसर डोळ्यासमोर येतो. या घटना काही वेगळ्या नाहीत किंवा लेखकाला त्यासाठी कल्पनेचे मनोरेही उभारावे लागले नाहीत. थोडीशी निरीक्षणशक्ती असेल तर त्याला असे सुंदर शब्दरूप प्राप्त होऊ शकते.
‘‘कोणत्याही गोष्टीचा ध्यास लागला, प्रामाणिक तहान लागली तर ती भागवण्यासाठी माणूस भाव ठरवत नाही. वायफळ चर्चा करत नाही कारण त्या वेळी त्या गोष्टीचं मूल्य काय असतं हे त्यालाच कळतं. दंगलीत ज्यांचं घर उद्ध्वस्त होतं त्याला घराची किंमत मिळू शकते मात्र उद्ध्वस्त झालेल्या स्वप्नाचं मोल लावता येत नाही. व्यसनाधीन झालेल्या मुलाचा औषधोपचाराची किंमत देता येते परंतु त्याने आयुष्यात काय गमावलं याचं मूल्य कसं आकारणार? ज्याचा खर्‍या देवा-धर्मावर विश्वासच नाही तो अकलेचे तारे तोडण्यातच धन्यता मानणार…’’ हे ‘तहान’ कथेमधील तत्त्वचिंतन वाचकांची दृष्टी विकसित करणारे आहे. आटलेल्या तापीमायचं वर्णन करताना भीमा भोई त्याच्या पत्नीला म्हणतोय, ‘‘सरे, कशी दीनवाणी दिसतेय आज आपली तापीमाय? गडगंज श्रीमंत घरातील घरंदाज माउली गरिबी आल्यावर दिसते त्यासारखी.’’ दुथडी भरून वाहणारी नदी कोरडी पडते तेव्हा त्याचं किती हृदयद्रावी वर्णन या संवादातून केलंय? यातून बी. एन. चौधरी यांचं समाजभान दिसून येतं.
झोप ‘छोटा मृत्युच!’ ही कथा आपल्याला सावध करते. संकल्प कथेतील चोराचा वाल्ह्या कोळ्याचा वाल्मिकी होतो. शे. इरफान शे. मोहम्मद पठाण या माजी विद्यार्थ्याची बसमधील वर्तणूक लेखकाला अनोखी आणि समृद्ध ‘गुरुदक्षिणा’ वाटते. ‘आऊट हाऊस’ कथेतील पश्चातापाच्या अश्रूत भिजणारी सरिता झोपलेल्यांना जागे करते. ‘खिचडी’ कथेतील सुभाष हा संजयनगरच्या झोपडपट्टीत राहणार्‍या झेंडू हमालाचा मुलगा लेखकाला ‘खरा तो एकचि धर्म’ची शिकवण देऊन जातो. ‘माय आंबा’च्या रूपाने ‘मायची माया, कशी जाईल वाया?’ हे सांगताना आजूबाजूचे वास्तव टिपले आहे. ‘तस्मै श्रीगुरवे नमः’ या कथेतील दीपक पवारच्या उपचारासाठी गुरुजींनी घेतलेला पुढाकार, त्यासाठी शाळेतील विद्यार्थी, शिक्षकांसह गटशिक्षणाधिकार्‍यांनीही घेतलेला पुढाकार हे चांगुलपणावरील श्रद्धा बळकट करणारे आहे. काही प्रमाणात का होईना पण अजूनही असे गुरु असल्यानेच समाजाचा रहाटगाडा अव्याहपणे सुरु आहे. या संग्रहातील ‘मत्सरासायटीस’ ही कथा तर प्रत्येकाने वाचायला हवी. या आजाराला बळी पडलेले अनेकजण आजूबाजूला दिसून येतील. कदाचित आपणही त्याचे बळी ठरलेले असू शकतो. या आजारामुळे समाजस्वास्थ्य धोक्यात आले आहे. आपण वेळीच उपचार करून घेतले तर अनेक समस्या सुटायला आणि सामाजिक आरोग्य सुदृढ व्हायला मदत होऊ शकते.
बुवा-बाबांच्या मागे लागून आयुष्याची फरफट करुन घेणारे कमी नाहीत. ‘देव पावला’ या कथेच्या माध्यमातून मात्र बी. एन. नानांनी माणसातील देवाचे दर्शन घडविले आहे. अर्थातच ते सर्वांसाठी प्रेरणादायी आणि आदर्शवत आहे. लोकशिक्षक ही कथाही आत्मचिंतन करायला भाग पाडते. यातील पाटीलबुवा लोकशिक्षकाचे डोळे उघडतात. सर्व शिक्षकांनी, शिक्षण व्यवस्थेतील सर्व सदस्यांनी आणि नेमून दिलेले काम मर्यादित चौकटीत राहून करणार्‍या प्रत्येकांनी यापासून बोध घ्यायला हवा. संघर्ष कथेतील मंडाबाई आजच्या स्त्री स्वातंत्र्याचा अर्थ उलगडून दाखवते. ‘तेजस्विनी’ कथेची नायिका जी सणसणीत चपराक देते, तिही अनेकांना जागी करणारी आणि अनेकांचा अहंकार वितळवून टाकणारी आहे. बी.एन. नानांच्या कथा अद्भूतरम्य, गूढ, कपोलकल्पित नाहीत. त्या माता, माती आणि नाती यांचे बारकावे सांगणार्‍या आहेत. इथल्या मातीची धूळ अभिमानाने गौरंवाकित करणार्‍या या कथा समाजचिंतन करणार्‍या आणि समाजसुधारणेचा वसा घेतलेल्या आहेत.
पतीच्या उपचारासाठी पैसे मिळावेत म्हणून धावण्याच्या शर्यतीत उतरलेल्या करे आजी या संग्रहातील ‘सावित्री’ या कथेच्या माध्यमातून भेटतात. ऐश्वर्यसंपन्न माहेश्वरताईंच्या पार्टीत सरिताला भेटलेले ज्योतिषीबाबा आणि त्यांनी केलेला एक खुलासा यामुळे काय ‘परिवर्तन’ घडते ते या संग्रहात वाचायला हवे. त्याचा मतितार्थ समजून घेतला तर ढासळलेली कुटुंबसंस्था पूर्वपदावर येण्यास मोठी मदत होऊ शकते. ‘झेल्या’सोबत उंडारु नको म्हणणारी आई ‘झेल्या’ला घरी का आणि कशी बोलवते, हे मुळातूनच वाचले पाहिजे. ‘राखोया’ ही कथा ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे…!’ या जगदगुरू संत श्री तुकाराम महाराजांच्या वचनांची आठवण करून देणारी आहे.
‘शेजारधर्म’ ही या संग्रहातील एक वेगळ्या धाटणीची कथा. हिंदू-मुस्लिम ऐक्याचा संदेश देणारी आणि मैत्रीचे चिरंतन सत्य जोपासणारी दोन मित्रांची कथा ही आपल्या संस्कृतीची खरी ओळख आहे. यातील रहिममियाँ आपल्या मनात घर करून राहतात. पूर्वग्रह ठेवून द्वेषाचा डोलारा उभारणार्‍यांनी या ‘राम-रहिम’चे बंध समजून घ्यायला हवेत. ‘केल्याने होत आहे रे, आधी केलेचि पाहिजे,’ याची शिकवण देणारे समाधान मोरे गुरुजी ‘दीपस्तंभ’मध्ये भेटतात. असे अनेक शिक्षक आजूबाजूला आहेत आणि त्याबाबतच्या बातम्या अधूनमधून वाचनात येत असतात. हे असे काही वाचले आणि तरीही समाजातील अराजक, अंधाधुंदी, अव्यवस्था समोर दिसली की वाटते, खरंच ‘सज्जनांच्या टोळ्या’ एकत्र येत नाहीत. त्या आल्या तर बरेचसे प्रश्न सहजपणे सुटू शकतात.
‘बाप’ कथेतील उज्ज्वलाचा संवेदनशीलपणा, तिचा धीरोदात्तपणा महत्त्वाचा आहे. वृत्ती आणि प्रवृत्तीमधील फरक इथे दिसून येतो. आज अशा अनेक उज्ज्वला जागोजागी तयार होत आहेत ही समाधानाची बाब आहे. ‘पासपार्ट’ कथेतील विनयने जन्मदात्या आईवडिलांची फसवणूक वृत्तपत्रांतून अनेकदा चर्चेला आली आहे. या बातमीला कथारूप देऊन बी. एन. चौधरी यांनी अनेकांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातले आहे. एकवेळ पैशात झालेली फसवणूक भरून काढते येते पण कुणाच्या विश्वासाला, श्रद्धेला तडा गेला की त्यात होणारी होरपळ भयंकर असते. त्यात स्वतःच्या मुलानेच असे काही कांड केले की माणुसकीवरचा विश्वास उडतो.
‘झेंगट’ कथेतील ज्वानी सर आणि त्यांची विद्यार्थिनी आरूषी हेही आजूबाजूला सररासपणे दिसून येतात. असे खोडकर विद्यार्थी आणि त्यागी शिक्षक यांची एक स्वतंत्र कथामालिका होऊ शकते. रस्त्यावरील भीक मागणार्‍या मुलीच्या विनंतीला प्रतिसाद देऊन तिच्या आजीवर सुयोग्य उपचार करणारा ‘देवरूप’ कथेतील राहुल अनेकांसाठी प्रेरणादायी ठरावा. ‘काडीमोड’ कथेतील घटस्फोट विचार करायला भाग पाडणारा आहे. मुलीच्या वडिलांचा संसारातील हस्तक्षेप अनेक कुटुंबे तोडण्यास कारणीभूत ठरत असताना या कथेतून काही बोध घ्यायला हवा. ‘सौतन’ कथेतील अमिनाचा टाहो काळीज पिळवटून टाकतो. तिच्या व्यथा-वेदना प्रभावीपणे मांडण्यात बी. एन. चौधरी कमालीचे यशस्वी ठरले आहेत. ‘विश्वासघात’ या कथेतील भयाण वास्तव पत्रकारिता क्षेत्रासाठी नवीन नाही. अशा अनेक ‘विश्वासां’चा आजवर हकनाक बळी गेला आहे. त्याचे कुणालाच काही सोयरसुतक नसते. जनता, सामाजिक संस्था, राजकारणी त्यावरून चार दिवस गळे काढतात आणि पुन्हा ‘ये रे माझ्या मागल्या’ सुरू होते.
‘सूरदास’मधील कथा वाचताना माझ्या डोळ्यासमोर कण्हेरी मठाचे प्रमुख श्री काडसिद्धेश्वर स्वामी येत होते. गोमातेला असा जीव लावणारे असे काही मान्यवर आजही आपल्याकडे आहेत हे आपल्या संस्कृतीचे संचित आहे. ‘भ्रम’ कथेतील सुनीलने त्याच्या पालनकर्त्याविषयी दाखवलेली कृतज्ञता आपल्याला हेलावून सोडते. ‘एवढीच साथ होती’ या कथेतील पार्वतीबाईंची स्थितप्रज्ञता आपल्यालाही दुःखातून सावरण्याचे बळ देते. कोणत्याही प्रसंगाला धीरोदात्तपणे कसे सामोरे जावे याचे हे मूर्तिमंत उदाहरण आहे. ‘नवोन्मेश’ कथेतील सुलीची व्यथा आपल्याला अस्वस्थ करते पण त्याचवेळी शिवाचं धाडस थेट आगरकरांच्या समाजसुधारणेचा वारसा सांगते.
‘कृतघ्य’ ही या संग्रहातील शेवटची कथा मात्र आजवर विविध रूपाने वाचकांच्या, प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. ‘आपल्या वडिलांना वृद्धाश्रमात सोडताना आपल्या जन्माचं रहस्य समोर आलेला मुलगा’ या कथानकाभोवती अनेकांनी आपापल्या परीने मांडणी केली आहे. संस्काराचा धागा बळकट व्हावा यासाठी अशी मांडणी आवश्यक असली तरी काहीवेळा तेच ते विषय वेगवेगळ्या स्वरूपात मांडले गेल्याने आणि समाजमाध्यमातून ते मोठ्या प्रमाणात पसरल्याने त्यात फारसे नावीन्य राहत नाही. बी. एन. चौधरी यांनी मात्र या विषयाचीही सुयोग्य मांडणी केल्याने ही कथा वाचनीय झाली आहे.
या संग्रहातील अनेक कथांच्या बातम्या आपण वृत्तपत्रांतून वाचलेल्या असण्याची शक्यता आहे; मात्र त्यातील कथाबीज प्रेरक आणि मानवतेवरील श्रद्धा उंचावणारे, चांगुलपणाची साक्ष देणारे, चुकीच्या प्रवृत्ती उघड पाडत सावध करणारे असल्याने त्याचे मोल वाढते. या संग्रहातील प्रत्येक कथा ही आपले डोळे उघडणारी, आपली उमेद वाढविणारी आणि रंजनाबरोबरच विचार करायला भाग पाडणारी आहे. प्रा. बी. एन. चौधरी यांच्या लेखणीचे हेच सामर्थ्य आहे. त्यामुळे हा कथासंग्रह साहित्यविश्वात दखलपात्र ठरेल. त्यांच्या भावी लेखनप्रवासास माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा!

– घनश्याम पाटील
लेखक, प्रकाशक आणि संपादक

हा कथासंग्रह घरपोच मागविण्यासाठी फोन पे / गुगल पे क्र. ७०५७२९२०९२
अथवा खालील लिंकवरून मागवा

कस्तुरीगंध

चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email - Chaprak Email ID

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

हे ही अवश्य वाचा