पत्ररूप प्रस्तावना
श्री. जे. डी. पराडकर यांस,
स. आ.
‘प्राजक्ताचे सडे’ या तुमच्या ललित लेखसंग्रहाला मी प्रस्तावना लिहावी अशी विनंती तुम्ही मला केली. ती मी लगेच मान्य केली. याचं एक कारण असं की तुमचं काही लेखन मी आधी वाचलेलं आहे. दुसरं असं की कोणत्याही साहित्यकृतीचं दालन प्रस्तावनेच्या रूपानं खुलं करून द्यावं हे मी माझं कर्तव्य समजतो.
तुमचा हा संग्रह मी सलग वाचला. आवडला. एकूण 21 लेखांनी सजलेली ही साहित्यकृती माझ्याप्रमाणेच अन्य रसिक वाचकांना आवडेल यात शंकाच नाही. हे सर्व ललित लेख असले तरी ही सर्व ठसठशीत व्यक्तिचित्रे आहेत. प्रत्येक ललित लेखाचा एक नायक (नायिका) आहे. तुम्ही प्रत्यक्षात व्यवसायाने चित्रकला शिक्षक आहात पण हे लेख वाचताना सलग जाणवते की, तुमच्या कुंचल्याप्रमाणेच तुमची लेखणीही चित्रं साकारणारी आहे. या चित्रदर्शी भाषेमुळे तुमचे लेखन प्रत्ययकारी झाले आहे.
तुमच्या या संग्रहाचे पहिले बलस्थान म्हणजे समृद्ध आशय! कोणतीही लेखनकृती साहित्य या पदवीला पोहोचण्यासाठी तिचा आशय समृद्ध असावा लागतो. आशयाविना लेखनकृती म्हणजे नुसती फोलपटे किंवा दाण्याविना कणसे! तुमच्या सर्व व्यक्तिचित्रांमध्ये समृद्ध आशय आहे. परिसर, निसर्ग, वातावरण, वाड्या आणि वसत्या, रस्ते, गावे, डोंगर, ओहोळ, तीनही ऋतुंचे बदलते वातावरण, या सर्वांचा परिचय तुमच्या आशयातून होत असतो. त्यामुळे लेखनाला भरीवपणा प्राप्त झाला आहे. तुमच्या या संग्रहाचे दुसरे बलस्थान म्हणजे उत्तम व्यक्तिचित्रण! भाऊ काय, परकार काय, कृष्णा लोहार काय किंवा अगदी शेवटी दत्तभक्त नाना काय, सर्वच व्यक्तिचित्रे अत्यंत प्रत्ययकारी झाली आहेत. त्या-त्या व्यक्तिंची सर्व स्वभाववैशिष्ट्ये, वेषभूषा, सवयी, हालचाली, परस्पर संबंध यासंबंधी अनेक लहानमोठे तपशील ही व्यक्तिचित्रे साकारताना तुम्ही टिपली आहेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे या सर्व व्यक्ती वेगवेगळ्या सांस्कृतिक व सामाजिक पार्श्वभूमी असलेल्या आहेत. तरीही त्यांची चित्रे त्यांच्या सामाजिक, सांस्कृतिक पार्श्वभूमीप्रमाणे रंगविलेली आहेत. हे रंगविताना तुम्ही त्यांचे तपशीलवार वर्णन केले आहे. उदा. ‘भाऊ’ या व्यक्तिचित्रात तुम्ही लिहिता – ‘‘गोरा रंग, हसरा चेहरा, मिश्किल बोलणे, सर्वांच्यात मिळून-मिसळून राहणे, नात्यातील कार्यक्रमांना आवर्जून उपस्थित राहणे, वेळेचे यथायोग्य बंधन, कर्तव्यतत्त्पर परंतु हळवे मन, कुशाग्र बुद्धिमत्ता, काटकसर करून आनंदाने संसारात रमणे, कर्ज काढून कोणतीही हौसमौज न करणे, वादविवाद टाळण्यासाठी तडजोड करणे, कोणत्याही गोष्टीची हाव न धरणे, जे आहे त्यात समाधान मानणे, कोणाशीही कटुता न घेणे, दुसर्याचे दुःख आपले मानून त्यात सहभागी होणे, साधी परंतु स्वच्छ राहणी व उच्च विचारसरणी असे अनेक गुण या माणसात दडले आहेत.’’
हे नमुन्यादाखल एक उदाहरण आहे. या पुस्तकातील सर्व लेखांमध्ये अशाप्रकारची चित्रदर्शी उदाहरणे आहेत.
तुमच्या संग्रहाचे तिसरे बलस्थान म्हणजे तुम्ही व्यक्तिदर्शन घडविता घडविता अगदी सहजपणे वाचकांना कोकणदर्शन घडवीत आहात. कोकणाला अपरान्तभूमी म्हणतात आणि या भूमीला परशरामक्षेत्र म्हणूनही ओळखले जाते. या पौराणिक वा ऐतिहासिक ओळखीपेक्षा कोणणभूमी ही भारताची ‘कॅलिफोर्निया’ आहे असे परदेशस्थ भारतीयही सांगतात. याचा परिचय तुमच्या लेखनातून जागोजागी येतो. कोकणातील निसर्गसौंदर्याची उधळण तुम्ही तुमच्या ओंजळीत घेऊन वाचकांसमोर प्रभावीपणे सादर केली आहे. कोकणातील झाडे-वेली, साकव, पर्हे, ओहोळ, नद्या, नारळ-सुपारीच्या बागा, एवढंच काय पण तेथील धनगर वाड्यांसारख्या वस्त्या, गायी-गुरे, पशुधन यांचे यथार्थ दर्शन तुमच्या लेखनात होते. कोकणातील देवालये आणि देवस्थाने म्हणजे तर कोकणभूमीचे भक्तिमय वैभव! या वैभवाचे शब्दमय दर्शन तुमच्या लेखांतून होत आहे.
तुमच्या या लेखनाचे चौथे बलस्थान म्हणजे समाजदर्शन! प्रत्येक व्यक्ती ही एका कुटुंबाचा घटक असते. व्यक्ती आणि समाज, कुटुंब आणि समाज यांच्या आंतरक्रिया नेहमीच घडत असतात. बदलत्या काळाबरोबर या आंतरक्रियांचे रूपही बदलते. अशी बदलती रूपे तुमच्या लेखणीतून सहजपणे साकारली आहेत. कोकणात अजूनही काही प्रमाणात एकत्र कुटुंबपद्धती आहे. कोकणातला चाकरमानी मुंबई शहर गाठतो पण त्याची नाळ मातीशी जुडलेली असते. याचे दर्शन अनेक लेखांमधून होते. शिवाय कोकणी माणसाला परिस्थितीमुळे काटकसर करावी लागत असली तरी प्रसंगी दुसर्याच्या उपयोगी पडून होईल तेवढा आधार संकटग्रस्ताला, दीनदुबळ्यांना आणि विशेष करून दिव्यांगाना देण्याची त्याची परोपकारबुद्धि शाबूत असते. याच्या काही खुणा तुमच्या लेखनात सापडतात. या दृष्टीने तुमचे समाजदर्शन वाखाणण्यासारखे आहे.
तुमच्या लेखनाचे पाचवे बलस्थान म्हणजे तुम्ही कोकणचा इतिहास-भूगोल अत्यंत प्रभावीपणे चितारला आहे. काही गावे, स्थळे, देवळे, वाड्या, शाळा यांची वर्णने तर अशी आहेत की ते तुम्ही शब्दांत चितारलेले नकाशेच आहेत. या शब्दरेखांकित नकाशाचा आधार घेऊन अपरिचित माणूस सुद्धा कोकणात प्रवास करताना बरोबर इच्छित स्थळी पोचेल अशाप्रकारे तुम्ही लेखन केले आहे.
तुमच्या लेखनाचे सहावे बलस्थान म्हणजे तुम्ही चितारलेल्या व्यक्तिदर्शनातील विविधता. भाऊ, शांत्या, शिवरामपंत, बुड्ये सर, दत्तभक्त नाना, माळावरचा व्यंक्या ही काही उदाहरणे विविधतेची म्हणून देता येतील. यातील प्रत्येक व्यक्ती स्वयंपूर्ण, स्वयंवैशिष्ट्याने वेगळी आणि अर्थातच एकसारखी दुसरी नाही. प्राजक्ताच्या झाडाखाली पडलेली किंवा प्राजक्ताच्या झाडावरील ही फुले एकाच झाडाची असली तरी प्रत्येक फूल वेगळे आहे. बी. डी. परकार यांची गोष्ट वाचताना या मुस्लिम शिक्षकाच्या व्यक्तिमत्त्वाला एक वेगळा गंध आहे हे जाणवले. ‘सांदणमामी’ हे व्यक्तिचित्र स्त्री विश्वाचं एक भावपूर्ण दर्शन घडवते. सांदण हा कोकणातील खास पदार्थ. देशावरील लोकांना किंवा आजच्या पिढीतील तरूणांनाही सांदण हा प्रकार माहीत नाही. कुणी तरी ‘सांदण’ ही नवी ‘रेसिपी’ करून बघायला हरकत नाही.
तुमच्या लेखनाचे सातवे बलस्थान म्हणजे तुमची भाषाशैली! कोकणातील खास भाषेचा उपयोग करून तुम्ही ती-ती पाने जिवंत केली आहेत. कोकणातील लोक सामान्यपणे अनुनासिकांत बोलतात, हेल काढून बोलतात. काही संवादामध्ये ही शैली आढळून येते. उदा. देशावर भाचे मंडळीना भाचे, भाचा, भाची किंवा भाचरं म्हणतात. तुम्ही त्यांना ‘भाचवंडं’ असा शब्द वापरला आहे.
मुख्याध्यापक परकार आणि रामा यांच्या संवादात रामाच्या तोंडी जी वाक्ये आहेत ती खास कोकणी शैलीतील आहेत.
‘‘नायबा, मी नका यवढाच तुना लावलीला!’’
‘‘खरा काय वो… तं मगाशी बोललत तसं करणारांव?’’
‘‘आयच्यान सांगतो मी पानाला चुना बराबर लावलीला!’’
त्या-त्या पात्रांच्या तोंडी त्यांच्या त्यांच्या व्यक्तिमत्त्वानुसार, त्यांच्या शिक्षणानुसार भाषेचा उपयोग केला आहे.
तुम्ही स्वतः कलाशिक्षक आहात. अर्थातच तुमच्या लेखनात तुमची कला तर डोकावतेच पण तुमच्या कलाप्रांतातील आवतीभोवतीची पात्रेही इथे डोकावतात. ‘प्रणयचे फराटे’ हे प्रकरण असेच कलारंग घेऊन रंगविले आहे.
श्री. पराडकर,
व्यंकटेश माडगूळकर यांनी ‘माणदेशी माणसं’ रंगविली. तशी तुम्ही कोकणातील आणि कोकण काठावरील माणसं रंगविली आहेत.
श्री. ना. पेंडसे, मधु मंगेश कर्णिक, श्रीपाद काळे, माधव कोंडविलकर अशा नामवंत लेखकांनी कोकणावर लेखन केले आहे. गो. नी. दांडेकर यांनीही काही प्रमाणात कोकण रंगविले आहे.
अशा नामवंत लेखकांची एखादी पंगत मांडली तर त्या पंगतीत किमान शेवटचा रंगीत पाट तरी तुमचाच असेल यात शंका नाही.
प्राजक्ताचे सडे,
यातील प्राजक्त सुंदर व सुवासिक प्राजक्त फुलांचा सुगंध सर्वत्र दरवळो आणि रसिकांना त्यातून साहित्यानंद मिळो, अशी मनोकामना पूर्ण करून, तुमच्या भविष्यातील लेखनाला शुभेच्छा देऊन थांबतो.
सुप्रसिद्ध साहित्यिक आणि शिक्षणतज्ज्ञ
पुस्तक घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा