शिक्षणाविषयी चर्चा घडविणारे पुस्तक..परिवर्तानाची वाट

शिक्षणाविषयी बरंच काही बोलले जाते..शिक्षणाचा पारंपारिक विचार सातत्याने समाजमनावर गारूड करून राहीलेला आहे. अशावेळी शिक्षणाचा खरा विचार समाजमनात रूजविण्याची गरज सातत्याने व्यक्त केली जाते.शेवटी शिक्षण ही एक प्रक्रिया आहे.त्या प्रक्रियेच्या माध्यमातून परिवर्तनाची अपेक्षा व्यक्त करण्यात येत असतात.अशावेळी शिक्षणाचा विचार समाजासमोर मांडण्याचा संदीप वाकचौरे यांच्या परिवर्तनाची वाट या पुस्तकातून करण्यात आला आहे.चपराक प्रकाशनाच्या वतीने प्रकाशित होणा-या शिक्षण मालेतील हे पुस्तकही वाचकांना शिक्षणाची नवी दिशा देण्याचेच काम करते आहे.पुस्तकाचे शीर्षक हेच मुळी शिक्षणाची नवी वाट दाखविणारे आहे.


संदीप वाकचौरे यांच्या पुस्तकातून शिक्षणाच्या संदर्भात जशी प्रश्नांची चर्चा आहे त्याप्रमाणे वर्तमानातील शिक्षणावरील उपायांची देखील ते मांडणी करता आहेत.महाराष्ट्राचे माजी शिक्षण संचालक मा.शिवाजी तांबे साहेब यांनी प्रस्तावनेत म्हटल्याप्रमाणे वाकचौरे हे वर्गात समरसून घेतलेल्या अध्ययन- अध्यापनाचा अनुभव, विद्यार्थी -शिक्षक-पालक-पर्यवेक्षकीय यंत्रणेशी असणारा सुसंवाद , प्रचंड वाचन , जाणीवपूर्वक जोपासलेला श्रवणाचा छंद,स्वतःला अद्ययावत ठेवण्यासाठी अव्याहतपणे वृद्धिंगत होत जाणारा व्यासंग यामुळे संदीप वाकचौरे यांच्यामधील प्रयोगशील शिक्षकाला गेल्या दीड दशकापासून राज्यपातळीवरील तज्ज्ञ म्हणून संधी मिळत गेली आहे. त्यामधून त्यांच्या शिक्षकत्वाचा परीघ छोट्याशा खेड्यातील शाळेपासून राज्य पातळीवरील तज्ज्ञ मार्गदर्शकापर्यंत विस्तारत गेला आहे. पत्रकारितेच्या प्रांगणात विकसित झालेला घटना प्रसंगाकडे पाहण्याचा वस्तुनिष्ठ दृष्टीकोन आणि परखडपणे मत व्यक्त करण्याची वृत्ती यामुळे त्यांच्या विवेचनाला वास्तवाचे परिमाण लाभले आहे. शिक्षण, साहित्य , समाजकारण, पत्रकारिता अशा विषयांवरील त्यांचे प्रासंगिक लेखन आणि व्याख्याने देखील विचार करायला भाग पाडतात.विविध कार्यक्रम,चर्चासत्रात विविध विषयांवर तात्विक विचार मांडण्याची संधी ही त्यांच्या व्यापक व्यासंगाची आणि शैलीदार वक्तृत्वाची द्योतक आहे.त्यामुळेच संदीप वाकचौरे हे नाव शिक्षण क्षेत्राच्या विशाल परिघाच्याही बाहेर महाराष्ट्रभर पोहचले आहे.या पुस्तकात देखील त्याच स्वरूपाचे विविध अनुभवाची मांडणी करणा-या लेखाचे दर्शन होते.आपल्याकडे सातत्याने विविध प्रकल्प,कार्यक्रम,चळवळी,मोहिमा येत असतात.अशावेळी त्यामागील भूमिका समाजमनात पेरण्याचे काम घडवण्याची गरज असते.ते काम वाकचौरे यांचे सातत्याने येणारी पुस्तके आणि प्रसारमाध्यमात होणारे लेखनाच्या प्रवासातून पेरणीचा विचार आहे.त्यामुळे पुस्तकात अशा कार्यक्रमाची ओळख,त्यामागील भूमिका आणि त्याचा परिणाम यासारख्या महत्वाच्या घटकांवर चर्चा करून वाचकांना शिक्षणातील विविधतेचा परिचय करून देण्याचा प्रयत्न केला गेला आहे.राष्ट्रीय शिक्षण धोरण केंद्राने जाहीर केले आहे.त्या धोरणांचा प्रासंगिक लेखांचे लेखन करताना गरजेप्रमाणे अनुषंगिक संदर्भ देत वाचकांना बरे वाईटाचे दर्शनही ते घडवले जात आहे. त्यामुळे वाचकांना नवे काय आहे आणि त्याचा काय परिणाम होणार आहे याचा अंदाज येण्यास मदत होते आहे.शिक्षणाचा विचार करताना केवळ परीक्षेच्व्यादारे होणा-या भरतीचा विचार हा फारसा परीणामकारक ठरणार नाही, तर त्या पलिकडे अनुभव आणि दृष्टीकोनाची गरज देखील त्यांनी अधोरेखित केली आहे. अलिकडच्या काळात माहिती तंत्रज्ञानाचा विचार शिक्षणात रूजवण्याचा प्रयत्न केला जात आहे.शाळा अधिक स्मार्ट करण्याचा प्रयत्न नमूद केला आहे.लोकांना शिक्षण स्मार्ट हवे आहे..पण ते करताना शिक्षणाच्या मूलभूत हेतू आणि ध्येयापासून आपण विचलित तर होत नाही ना असा प्रश्नही ते उपस्थिती करतात.माहिती तंत्रज्ञानाचा विचार शिक्षणात काळाबरोबर चालताना कदाचित आवश्यक असेल..पण त्याचा धोकाही ते अधोरेखित करत विवेकाची गरज अधोरेखित करतात.माहिती तंत्रज्ञानाशी जुळवून घेताना त्यासाठी लागणा-या गुणवत्तापूर्ण आणि विवेकी शिक्षकांची गरज ते अधिक अधोरेखित करताना ते दिसतात.माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग कितीतरी जबाबदारीने करण्याची गरज ते व्यक्त करतात.शिक्षक बनण्यासाठी केवळ पदवी,पदविका अभ्यासक्रम पुरेसे नाही हे वास्तवही ते वाचकांच्या समोर आणता आहेत.त्यामुळे नव्या दिशेचा प्रवास करण्याच्या दृष्टीने अनेक मार्गाची ओळखही पुस्तकात वाचनास मिळते.

पुस्तकात प्रासंगिक स्वरूपात निर्माण झालेल्या प्रश्नांचा उहापोह देखील वाचकांना अनुभवता येतो.कोरोनासारख्या प्रसंगात अवघ्या जगाने घेतलेला अनुभव आणि त्याचा शिक्षण क्षेत्रावर झालेला परिणाम अधोरेखित करताना त्यांनी विविध अनुभवाची मांडणी केली आहे.आपणास अद्यापही बराच मोठा टप्पा पार करण्याची गरज असल्याचे ते अधोरेखित करतात.शिक्षणाचा मूलभूत साक्षरतेचा टप्पा जशा महत्वाचा आहे त्याप्रमाणे विद्यार्थ्यांना शिकवण्यापेक्षा शिकण्यासाठी प्रेरित करण्याची गरजही ते अधोरेखित करतात.शिकणे ही प्रेरणा असायला हवी.बालकांसाठी शिक्षक हा मार्गदर्शनापेक्षा सुलभक म्हणून उभा राहिल तर बरेच काही वर्गात घडू शकेल असेही मत व्यक्त करतात.विद्यार्थ्यांचे शिक्षण जेव्हा सुरू असते तेव्हा शिक्षणाचा नेमका अर्थ काय असतो याची ओळख वाचकांना ते अत्यंत कौशल्यांने अत्यंत साध्या आणि सोप्या भाषेत करून देतात.देशातील विविध सर्वेक्षणाचा विचार करत ते करत असलेली विश्लेषक मांडणी वाचकांच्या डोळ्यात अंजन घालणारी ठरते.

‘चपराक’ ची शिक्षणविषयक पुस्तके घरपोच मागण्यासाठी येथे क्लिक करा

वाकचौरे यांनी दशकाहून अधिक काळ विविध स्वरूपाच्या साहित्य, अभ्यासक्रम विकसनात, पाठ्यपुस्तक लेखनात क्रियाशील सहभाग नोंदवला आहे. त्यांनी प्रतिभेला व्यासंगाचे पंख लावून या शिक्षकांने अल्पावधीतच मोठी झेप घेतली आहे. ते सातत्याने विविध वृत्तपत्रांतून आठवड्याला पाच सहा शैक्षणिक स्तंभांचे लेखन करत आहेत. शिक्षणाची ऐतिहासिक पार्श्वभूमी, शैक्षणिक धोरणांची वाटचाल, अभ्यासक्रमांचे विकसन आणि पाठ्यपुस्तकांची निर्मिती प्रक्रिया यासंबंधीचा सांगोपांग अभ्यास त्यांच्या लेखनात संदर्भानुसार सहजपणे डोकावताना दिसतो. शासन वेळोवेळी जाहीर करत असलेले धोरणांचा विचार करत त्यामागील तत्त्वे आणि अभ्यासक्रमातील उद्दिष्टे वर्गात पोहचवण्यात कोणत्या अडचणी येतात. त्या दूर करून शैक्षणिक गुणवत्तेचे लक्ष्य कसे गाठता येईल यासंबंधीचे त्यांचे विवेचन हा वातानुकूलित खोलीतील नव्हे तर वर्गातील जमिनीवरुन घेतलेला वास्तवाचा वेध अनेकाना स्पर्शून जातो. त्यामुळे अनेकदा परीस्थिती सुधारणा करून आणता येणे शक्य असल्याचे चित्रही ते रेखाटतात.
शिक्षणातून जीवनातील समस्यांचे निराकरणाची शक्ती प्राप्त करण्याची गरज आहे.किंबहूना शिक्षणाचा मूळ हेतूच मुळी शिक्षणातून व्यक्ती समर्थ बनने हाच आहे. असे असताना शिक्षणच आज अनेक समस्यांनी ग्रासलेले आहे.शिक्षणक्षेत्रात अनेक समस्या पुढे येत असल्याचे विविध माध्यमातून समोर येता आहेत. .त्यामुळे शिक्षक,पालक,समाज संभ्रमित होत आहे. त्या समस्यांचा समग्रपणे वेध घेऊन त्यावरील व्यवहार्य उपाय संदीप वाकचौरे यांनी अनेक ठिकाणी सूचवले आहेत. शिक्षण विषयक धोरणे, अमंलबजावणीतील प्रश्न, नवे सिद्धांत , वेगळे उपक्रम, योजना अशा अनेक विषयांवर अनेक लेखात त्यांनी केलेली मांडणी वाचकांना शिक्षणाचा परीघ समजून घेण्यास मदत करते. वर्तमानातील समस्यांमुळे निर्माण होणा-या प्रश्नांविषयी अनेक ठिकाणी केलेला ऊहापोह वाचकांना वाचावयास मिळतो. वाकचौरे यांची ही पुस्तकमाला म्हणजे शिक्षक , पालक आणि शैक्षणिक यंत्रणेतील घटकांचे सातत्याने उद्बोधन करणारी ठरते आहे.वाकचौरे यांचे लेखन जसे शिक्षणाला भविष्याकडे वाटचाल करण्यासाठी दिशादर्शक ठरेल असा विश्वास शिक्षण संचालक तांबे साहेब यांनी प्रस्तावनेत व्यक्त केला आहे.तो पुस्तके वाचताना अधोरेखित होतो.गरजे प्रमाणे विविध ठिकाणी विचारवंताचे दाखले देत एखादा विषय ते वाचकांच्या गळी उतरू पाहतात.त्यामुळे एखादी कठीण गोष्ट सहजतेने समजण्यास मदत होते.

शिक्षण परिवर्तन या पुस्तकात लेखकाने शिक्षणाशी संबंधित काही लेखांचा समावेश केलेला आहे.त्यामध्ये अध्ययन अध्यापनविषयक बदलेला दृष्टीकोन, विद्यार्थ्यांची पायाभूत साक्षरता,स्टार प्रकल्प,वाचन,कोवीड काळातील ऑनलाइन शिक्षण, परीक्षा आणि मूल्यमापन, शैक्षणिक गुणवत्ता, सुट्ट्यांचा उपयोग इत्यादी विषयांचा समावेश आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षातही विद्यार्थ्यांमधील मूलभूत साक्षरतेचा प्रश्न आपणास भेडसावत आहे. त्या संदर्भाने देखील केलेले विवेचन वाचकांना विचार करायला भाग पाडते..भारताने अवकाशात झेप घेत मोठी क्रांती केली असली तरी आपल्याला अद्यापही पायाभूत आणि अंकीय साक्षरतेच्या स्तरावरच अडखळत प्रवास करावा लागतो आहे. या संदर्भाने अत्यंत तपशीलवार विवेचन आकडेवारीसह वाचायला मिळत. त्याची उत्तरे केवळ धोरणातील तरतूदीतून नव्हे तर वर्गातील कृतीतून मिळवायची असतात हेही ते सांगून जातात.पायाभूत साक्षरतेला चालना देऊन शैक्षणिक गुणवत्ता विकास साधण्याच्या उद्देशाने स्टार प्रकल्प आलेला आहे.केवळ भौतिक सुविधा आणि शैक्षणिक साधने पुरवून शिक्षण घडत नाही. शिक्षणामध्ये शिक्षकाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते.शिक्षणाची गुणवत्ता उंचवायची असेल तर शिक्षणाच प्रशिक्षणाला पर्याय नाही.पण त्यासाठी दर्जेदार प्रशिक्षण असायला हवे अशी मांडणी ते करतात पण त्यासाठी दर्जेदार प्रशिक्षकाची गरज ते अधोरेखित करतात.प्रशिक्षणाचे तेवढेच दर्जेदार उपयोजन शाळेतील वर्गात व्हायला हवे.त्यासाठी पर्यवेक्षण यंत्रणासुद्धा शिक्षणाच्या उद्दिष्टांची उत्तम जाण असणारी हवी हे देखील नमूद केले आहे. शिक्षणाचे अत्यंत वास्तव दर्शन या पुस्तकात घडते.

शिक्षणात सध्या मार्कांची प्रतिष्ठा उंचावते आहे.ख-या शिक्षणापेक्षा आणि व्यक्तिमत्व विकासापेक्षा पालक आणि व्यवस्थेला देखील केवळ मार्क हवे आहे.हे मार्क म्हणजे शिक्षणाची गुणवत्ता ठरते आहे.आपण मार्कांच्या मागे लागल्याने विद्यार्थ्यांच्यामधील सुप्त गुणांचा विकास थांबण्याचा प्रयत्न होतो आहे.त्यामुळे ख-या शिक्षणाचा विचार रूजवण्यासाठी शिक्षणाचा खरा अर्थ अनेक लेखात अधोरेखित करण्याचा प्रयत्न वाकचौरे यांनी केला आहे.शिक्षणाचा खरा अर्थ शोधताना आपण शिक्षणापासून दूर गेलो तर त्याचे परिणाम किती भयंकर असतील हेही ते अधोरेखित करतात.मुलांच्या विकासाच्या प्रक्रियेकड आपण कसे पाहायले हवे हे ही तेअनेक लेखांच्या माध्यमातून अधोरेखित करतात.अनेकदा शिक्षणाच्या प्रक्रियेत आदर्शवादी विचाराची मांडणी केली जाते असे म्हटले जाते. मात्र एखादी प्रक्रिया देखील आपण पुढे घेऊन जाऊ शकतो..कदाचित त्या अंमलबजावणीतील अडचणी असतील मात्र अशावेळी त्यावर मात करण्यासाठी सकारात्मक सूचनाही त्यांना करून ती पाऊलवाट परिवर्तनाची ठरू शकते असा आशावाद व्यक्त करतात. पुस्तकात शिक्षणातील अनेक वाटा कठीण असल्याची जाणीव ते करून देतात पण त्या वाटा अशक्य आहेत असे मात्र कोठेच प्रतिबिंबीत करत नाही. शैक्षणिक गुणवत्तेच्या आंतरिक तळमळीतून लेखक काही ठिकाणी आपली मते परखडपणे नोंदवतात.मात्र त्यात प्रामाणिकपणाची वाटेचे ते दर्शन घडवू पाहातात. त्यामुळे या पुस्तकातील लेख शिक्षक, शिक्षण यंत्रणेतील विविध घटक आणि पालक यांच्यासाठी हे पुस्तक निश्चित दिशा देण्यास मदत करणारे ठरेल असा विश्वास वाचताना सहजतेने येत जातो.सर्व वाचकांना हे पुस्तक आत्मपरिक्षण करण्यास भाग पाडते आणि त्याचवेळी पुस्तकातून शिक्षणाचा खरा अर्थ उलगडण्यास देखील मदत होते. पुस्तकाचे मुखपृष्ठ कु.अनुष्का वाकचौरे हिने अत्यंत समर्पक स्वरूपात रेखाटले आहे.आरंभी असणारी वाट अधिक प्रकाशमान करण्यासाठी पुस्तकांच्या सोबतचा प्रवासच आपल्याला दिशा देणारा ठरेल असे दर्शित करणारेआहे.पुस्तकाला माजी शिक्षण संचालक शिवाजीराव तांबे यांची अत्यंत आशयघन आणि पुस्तकाचे मोल सांगणारी प्रस्तावना लाभली आहे.घनशाम पाटील यांनी मलपृष्ठावर दिलेला ब्लर देखील पुस्तकाचे महत्व अधोरेखित करतो. पुस्तक हे शिक्षण क्षेत्रात काम करणा-या प्रत्येकाला मदत करणारे आहे त्याप्रमाणे पालकांना देखील शिक्षणाचा आनंद देणारे आणि शिक्षणाचा अर्थ उलग़डून दाखविणारे ठरेल.पुस्तक वाचताना वाचक म्हणून पुस्तकासोबतचा प्रवास आत्मपरिक्षणाच्या वाटेने घेऊन जाणारा ठरतो.

– स्मिता रावत,पुणे

पुस्तकाचे नाव- परिवर्तनाची वाट
लेखक- संदीप वाकचौरे
प्रकाशक-चपराक प्रकाशन,पुणे
किंमत-250

हे पुस्तक घरपोच मागण्यासाठी येथे क्लीक करा

परिवर्तनाची वाट

चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email - Chaprak Email ID

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

हे ही अवश्य वाचा