जगातला सर्वात मागासलेला खंड म्हणून आपण आज आफ्रिकेकडे पाहतो. नायजेरिया, काँगो, इथिओपिया ह्यासारखे मागासलेले देश, सतत चालणारी यादवी युद्धे, कुपोषणाचे बळी ठरणारी लहान मुले, असहाय्य महिला आणि वृद्धांची केविलवाणी धडपड ही आफ्रिकेच्या संदर्भातली आपल्या डोळ्यासमोर उभी राहणारी दृश्ये आहेत. ही काही आफ्रिकेची खरीखुरी ओळख मानता येणार नाही. आजचा हा दयनीय वाटणारा भूभाग मानवी संस्कृतीच्या पहाटेच्या काळात सर्व जगाच्या पुढे होता व त्याच्या विकासाच्या प्रकाशात बाकीच्या जगाने विकासाची वाट शोधली होती, हे मुद्दाम सांगितलेच पाहिजे. मानववंशाची सुरूवातच आफ्रिकेत झाली असे अभ्यासक मानतात.
हा लेख ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
इथिओपियामध्ये सापडलेल्या मानवाच्या महापणजी ल्युसीचा काळ साडेतीन ते चार दशलक्ष वर्षांपूवीचा मानला जातो. म्हणजे त्याच्या आसपास कधीतरी मानव नावाचा प्राणी ह्या जगात अवतरला असावा. आफ्रिकेतून अनेकानेक कारणांमुळे मानवाने जगात इतरत्र स्थलांतर केले असे साधारणतः मानले जाते. जगातले इतर खंड प्रगत झाले. त्यांनी नव्या संस्कृतीचा स्वीकार केला. आफ्रिका मात्र युरोपियन देशांच्या वसाहतवादाचा बळी ठरला. आफ्रिकन लोकांना बळजबरीने गुलाम म्हणून जगाच्या इतर भागात नेले गेले आणि त्यांच्या क्षमतांच्या जोरावर जगातले इतर भाग समृद्ध झाले. युरोपियन आणि अमेरिकन विचारवंतांनी आफ्रिकेला एक ‘काळा खंड’ मानले. आफ्रिकेतली जंगले, सहारासारखे प्रचंड मोठे वाळवंट, आजदेखील आदिम काळातल्या रूढी आणि परंपरा मानणार्या बर्याचशा गूढ आफ्रिकन जमाती व टोळ्या… ह्या सगळ्यामुळे आफ्रिका हा नेहमीच एक अविकसित समजला गेलेला भाग आहे. तिथे बर्याचशा दंडेलीने घुसलेल्या ख्रिश्चन मिशनरी लोकांनी आफ्रिकन लोकांना ‘सुधारण्याचे’ प्रयत्न करायला सुरूवात केली आणि त्यांच्या प्रेषिताने दाखवलेल्या मार्गाने गेलात (तरच) तुमचा विकास होईल, असा प्रचार करुन तिथे आपले बस्तान बसवले; पण अनेकदा प्रश्न असा पडतो की मूळचा आफ्रिकन समाज आपण मानतो इतका अविकसित होता का? भारतात युरोपियन आक्रमणानंतर असेच झाले होते. त्यावेळी देखील इथल्या समाजातल्या अनेक प्रथा आणि परंपरांना ते आक्रमक मागास मानतच होते पण युरोपियन आक्रमणापूर्वीचा आपला समाज तरी खरोखरच मागास होता का?
आफ्रिका हे एक मागास आणि दरिद्री खंड आहे. काळ्या निग्रो वंशाच्या आणि सौंदर्याच्या पाश्चात्य कल्पनांमध्ये समाविष्ट न होणार्या जाड ओठांच्या व राठ केसांच्या लोकांबद्दलचा तुच्छतेचा भावदेखील अनेकदा पाश्चिमात्यांकडून प्रकट होत असतो. माणसाची बुद्धिमत्ता त्याच्या कातडीच्या रंगावर, ओठांच्या जाडीवर वा केसाच्या राठ वा तलमपणावर अवलंबून नसते. आफ्रिका खंडात असणार्या टिम्बक्टू, सोंगाई, माली, मपुन्गुब्वे यासारख्या प्राचीन संस्कृती व राज्यांमध्ये अस्तित्वात असणार्या पद्धतींकडे व त्या संदर्भातील विचारांकडे पाश्चात्य विचारवंतांनी साफ दुर्लक्ष केलेले आहे असे लक्षात येते. आफ्रिका म्हणजे आळशी, खुशालचेंडू व निर्बुद्ध लोकांचा मागासलेला प्रदेश अशी पाश्चात्यांची कल्पना झाली असावी असे त्यांनी आफ्रिकेकडे केलेल्या दुर्लक्षावरून वाटू लागते, हे आफ्रिकी अभ्यासकांचे मत नीट विचार केला तर पटू लागते. आदिम काळापासून आफ्रिकेतील अनेक जातीजमाती आपापला कारभार करीत आलेल्या आहेत. हजारो वर्षे टिकून राहिलेल्या ह्या जातीजमातींच्या व्यवहारांकडे व त्यांच्याकडे असणार्या वैचारिक वारशाकडे बारकाईने पाहिले पाहिजे. आफ्रिकी विद्वानांच्या मते पाश्चात्यांनी आफ्रिकेकडे आजवर पाहिले ते केवळ एक वसाहत ह्या चष्म्यातूनच. त्यामुळे इथली संस्कृती आणि इथली कार्यपद्धती याबद्दल एक प्रकारची पूर्वग्रहदूषित अशीच दृष्टी त्यांनी सतत बाळगली असावी. या संदर्भात एक उदाहरण म्हणून आफ्रिकेच्या दक्षिण भागातील समाजात प्रचलित असणार्या उबुंटु किंवा युबुन्टु ह्या एका पद्धतीचा तिथले अभ्यासक उल्लेख करतात.
उबुंटुमधला बुन्टू म्हणजे वाटून घेणे, सामायिकपणे वा सामूहिकपणे करणे. वस्तुतः ही उबुंटु व्यवस्था ही एक समाजरचनेची पद्धती आहे. एका अर्थाने ती एक जीवनपद्धतीच म्हणता येईल. तथापि ती केवळ खाजगी जीवनापुरती मर्यादित न राहता सामूहिक जीवनामध्येदेखील वापरली जाते व त्याचाच एक अपरिहार्य भाग म्हणून ती व्यावसायिक कार्यामध्येदेखील वापरली जाते. उबुंटु म्हणजे मानवता आणि उबुंटुच्या तत्त्वज्ञानात परस्पर साहाय्य आणि आदर, परस्परावलंबन, एकता, सामूहिक कार्य आणि जबाबदारी यांचा समावेश होतो. प्रा. थडॉस मेटज यांच्या मते, ‘उबंटू ही कल्पना आहे की एक माणूस इतर मानवांसोबत करूणा, क्षमा, औदार्य आणि आदरातिथ्य या गुणांद्वारे सुसंवादी नाते टिकवून ठेवू शकतो.’ प्रा. लव्हमोअर मगिबी ह्या आफ्रिकन व्यवस्थापन तज्ज्ञाने सांगितले आहे की, ‘उबुंटुची पाच मुख्य मूल्ये आहेत. जिवंत वा जगण्याची भावना, एकता, करूणा, आदर आणि प्रतिष्ठा.’ आजूबाजूला प्रचंड प्रतिकूल परिस्थिती असताना आपापसात कितीही मतभेद असले तरी आपल्या अस्तित्वासाठी आपल्याला एकमेकांवर अवलंबून राहावे लागेल आणि त्यासाठी आवश्यक असणारे कौशल्य किंवा तंत्र आपल्याला आत्मसात करावेच लागेल. ह्या गरजेतून गेल्या तीन हजार वर्षांमध्ये उबुंटुचे तत्त्वज्ञान विकसित होत गेलेले आहे.
ह्या पद्धतीची काही वैशिष्ट्ये सांगता येतील. कोणत्याही कार्यासाठी सर्व साधनसामुग्रीचा सामूहिकपणे एकत्रित वापर करण्याला प्रोत्साहन दिले पाहिजे, समूहामधल्या सर्वांनी परस्परांबद्दलची सहकार्याची व आदराची भावना वृद्धिंगत केली पाहिजे म्हणजेच कोणत्याही प्रसंगाचा विचार एकट्याच्या स्तरावर न करता सामूहिक विचार करण्याची वृत्ती वाढविण्याचा प्रयत्न करणे आणि सर्व कार्ये, उत्सव, समारंभ, निर्णय यासारख्या प्रसंगांमध्ये संघटनेच्या अंतर्गत मध्यवर्ती ठिकाणी सामूहिक सहभागाची व अनौपचारिक वैचारिक देवाणघेवाण, सहकार्य वाढविणे. उबुंटु ही एक सामूहिक व सांघिक कार्यपद्धती आहे व आफ्रिकेतल्या अनेक जमातींमध्ये ती आज हजारो वर्षे वापरली जाते आहे. संघटनात्मक शैली व रचनात्मक पद्धतींचा अभ्यास करणार्या पाश्चात्य विचारवंत व अभ्यासकांना ह्या व अशा इतरही ज्या पद्धती व प्रणाली आफ्रिकेसारख्या अतिप्राचीन इतिहासाचा वारसा असणार्या भूप्रदेशात वापरल्या जात आहेत त्यांच्याकडे गांभिर्याने पाहावेसे वाटले नाही ही वस्तुस्थिती स्वीकारावीच लागते.
आफ्रिकन तत्त्वज्ञानातल्या मान्यता पावलेल्या कल्पना उबुंटु ह्या संज्ञेतून व्यक्त होतात. झांबियाचे माजी प्रमुख डॉ. केनेथ कौंडा यांनी उबुंटुचे वर्णन ‘आफ्रिकेतील मानवतावाद’ म्हणून केलेले आहे. ही एक सामाजिक आणि मानवतावादी संकल्पना आहे. उबुंटु हा शब्द वेगवेगळ्या स्वरूपात बहुतेक आफ्रिकन भाषांमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. उबुंटु म्हणजे ‘मी आहे; कारण तू आहेस!’ खरं तर ‘उबुंटू’ हा शब्द उमंटू न्गुमंटू नंगाबंटू या झुलू वाक्यांशाचा फक्त एक भाग आहे, ज्याचा शब्दश: अर्थ असा आहे की ‘एखादी व्यक्ती केवळ स्वतःमुळे अस्तित्वात असत नाही; ती व्यक्ती असते, जे कार्य ती व्यक्ती करु शकते ते फक्त इतरांच्यामुळेच तिला करता येते. त्या इतर लोकांमुळेच ती व्यक्ती कार्य करीत असते.’
उबुंटुची मुळे मानवतावादी आफ्रिकन तत्त्वज्ञानात आहेत, जिथे समूदायाची कल्पना ही समाजाच्या निर्मितीमधली एक मध्यवर्ती कल्पना आहे. उबुंटु तत्त्वज्ञानाचे मुख्य आधुनिक समर्थक आर्चबिशप डेसमंड टुटू आहेत. ‘नो फ्युचर विदाऊट फॉरगिव्हनेस’ या त्यांच्या पुस्तकात त्यांनी उबुंटु असलेल्या व्यक्तिचे वर्णन केले आहे. ते म्हणतात, ‘इतरांसाठी खुले आणि उपलब्ध, इतरांना पुष्टी देणारे… योग्य आत्मविश्वास आहे’ असे केले आहे. या व्यक्तिकडे असलेला उबुंटु एका मोठ्या संपूर्णचा भाग असल्याने येतो. दक्षिण आफ्रिकेच्या वर्णभेदानंतरचे सत्य आणि सामंजस्य आयोग, ज्याचे अध्यक्ष टूटू होते, त्यांनी उबुंटु तत्त्वज्ञानातून घेतले होते. ते सांगतात, ‘उबुंटु ही कल्पना आपण मनुष्यप्राणी असण्याच्या मध्यवर्ती कल्पनेबद्दल संबंधित आहे. एखादा माणूस उबुंटुचे पालन करतो आहे म्हणजे तो उदार, आतिथ्यशील आहे. तो मैत्रीपूर्ण आणि काळजी घेणारा आणि दयाळू आहे. त्याच्याकडे जे आहे ते इतरांमुळे आहे असे तो मानीत असतो आणि माणुसकीच्या नात्याने तो इतरांशी जोडलेला असतो.’
एक व्यक्ती म्हणजे इतर व्यक्तिंद्वारे असणारी एक व्यक्ती. उबुंटु असलेली व्यक्ती इतरांसाठी खुली आणि उपलब्ध असते, इतरांना साहाय्य करत असते, इतर सक्षम आणि चांगले आहेत याची तिला भीती वाटत नाही, कारण आपण एका समूहाचे घटक आहोत ह्या खातरीतून ती सामूहिक भावना निर्माण होते. उबुंटुचे वर्णन पाश्चात्य भाषेत करणे खूप कठीण आहे. ते मानव असण्याचे सार आहे. उबुंटुच्या भावनेमध्ये, सामाजिक अन्यायांमुळे होणार्या जखमांवर मायेची फुंकर घालणे, असंतुलन दूर करणे, तुटलेले नातेसंबंध पुन्हा नव्याने जोडणे, पीडित आणि गुन्हेगार या दोघांचे पुनर्वसन करण्याचा प्रयत्न करणे, त्यांना समाजात पुन्हा एकत्र येण्याची संधी दिली जाणे ह्या सर्व गोष्टींचा समावेश होतो. त्यासाठी विशाल मन आणि समोरच्या व्यक्तिबद्दल करूणाभाव असणे अत्यंत आवश्यक आहे.
पाश्चात्य सभ्यता जे आणण्यात अपयशी ठरली ते उबुंटुने जगासमोर आणले. तो मानवी चेहरा जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात पाहायला मिळतो. उबुंटुचा अर्थ होतो, ‘एक मानवी सामाजिक कार्य, मानवसाध्य करण्यासाठी मानवी पद्धती वापरण्याचे ध्येय.’ जरी या मूल्ये आणि पद्धतींचे बारकावे वेगवेगळ्या वांशिक गटांमध्ये भिन्न असले तरी ते सर्व एकाच गोष्टीकडे निर्देश करतात ती ही की, ‘एक अस्सल वैयक्तिक माणूस हा एका मोठ्या आणि अधिक महत्त्वपूर्ण संबंध, सांप्रदायिक, सामाजिक, पर्यावरणीय आणि आध्यात्मिक जगाचा भाग असतो.’
आपल्या भगवद्गीतेमध्ये देखील हेच तत्त्व सांगितलेले आहे. तुझं, माझं, छोटं, मोठं असे भेद मनातून काढून टाका, मग सगळं तुमचं आहे आणि तुम्ही सर्वांचे आहात! ज्ञानोबामाउली देखील
विश्वाचे आर्त माझे मनीं प्रकाशले ।
अवघेचि जालें देह ब्रह्म ।
आवडीचें वालभ माझेनि कोंदाटलें ।
नवल देखिलें नभाकार गे माये ॥
म्हणतात ते देखील यापेक्षा वेगळे काय आहे?
– दिलीप फडके
अध्यक्ष, सार्वजनिक वाचनालय, नाशिक