आजोबा आणि सांताक्लॉज ( कथा )

Share this post on:
आईबाबा ऑफिसला जायचे. दिवसभर घरात फक्त आजोबा आणि बडबड्या शुभम. घरात शुभमचा पसारा आणि त्याची घरभर पसरलेली बडबड. या दोनच गोष्टीने घर भरलेलं असायचं. दिव्याखाली अंधार का असतो? पृथ्वी गोलच का असते? ती त्रिकोणी का नसते? भाजीपाला हिरवा का असतो? रात्री अंधार का असतो? सारखे पोहून मासे दमत कसे नाहीत? टीव्हीत माणसे कुठून येतात? असे किती अन् काय काय प्रश्न शुभमला पडतात! या इतकुशा पोराला इतके प्रश्न पडतातच कसे? याचं आजोबांना भारी अप्रूप वाटायचं. शुभमला बघताना आजोबांना त्यांचं बालपण आठवायचं.

एका हाताने कमरेवरून घसरणारी चड्डी धरण्यात आणि दुसर्‍या हाताने नाकाचा शेंबुड पुसण्यात आमचं बालपण गेलं हे आठवून आजोबांना खूप हसू यायचं.
शुभमची बडबड ऐकून घ्यायला, बाहेर खेळायला घेऊन जायला एकमेव आजोबाच तर होते घरात. आजोबांना तरी कोण होतं शुभमशिवाय! शुभमला आजोबांच्या झुपकेदार मिशा भारी वाटायच्या. आजोबाला शुभमची लपकेदार तोतरी बडबड खूप आवडायची. आजोबांमुळे शुभमला घरात कधी कंटाळा यायचा नाही. शुभमच्या बडबडीमुळे वेळ कसा जायचा आजोबाला कळायचं देखील नाही. शुभमला शाळेत सोडल्यावर मात्र रिकामं घर आजोबांच्या अंगावर यायचं. मग अशावेळी आजोबांना गावाकडे राहणार्‍या आजीची खूप आठवण यायची. याआधी आजोबा कधीच आजीला सोडून राहिले नव्हते पण गेल्या वर्षभरापासून आजोबा शहरात राहायचे आणि आजी गावाकडे शुभमच्या काकाकडे! अशी आजी-आजोबांची ताटातूट झाली होती.
ही कथा ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
आजोबा शुभमला रोज एक गोष्ट सांगायचे. शुभम आजोबाच्या गोष्टीत रमून जायचा. कधी एखाद्या शूरवीराची तर कधी जंगलाच्या राजाची तर कधी दुष्ट राक्षसाची गोष्ट आजोबा शुभमला सांगायचे. नेहमी खरे बोलणारी, इतरांच्या मदतीला धावून जाणारी, शूर, पराक्रमी, धाडसी… अशी आजोबांच्या गोष्टीतली पात्रं शुभमला खूप आवडायची. ‘गोष्टीतल्या या सगळ्या पात्रांशी माझी एकदा भेट घालून द्या ना’ असा शुभम हट्ट धरायचा तेव्हा आजोबाला शुभमचं हसू यायचं. कौतुकही वाटायचं. आजीच्या भेटीला लवकर जाऊ न शकणारे आजोबा मात्र गोष्टीतल्या पात्रांशी शुभमची भेट घालून देणार होते.
त्या दिवशी आजोबा शाळेबाहेर शुभमची वाट पाहत उभे होते. शाळा सुटली. शुभम धावतच आजोबांकडे आला. आज शुभम खूप खूश होता. उद्यापासून शाळेला नाताळाच्या सुट्ट्या होत्या. मग काय नुसती मज्जा धमाल मस्ती! शुभम उड्या मारतच आजोबांसोबत घरी निघाला. आजोबांचं मात्र शुभमच्या बोलण्याकडे लक्ष नव्हतं. आजोबा जरा सावध चालत होते. चालत चालत येताना त्यांच्या डाव्या पायाला चांगलीच ठेस लागली होती. पाय कन्हारला होता.
शुभमने आजोबांना विचाराले, ‘‘तुम्ही असे का चालत आहात? तुमच्या पायाला काही लागलंय का?’’
आजोबांनी पायाला ठेस कशी लागली याचा सविस्तर वृत्तांत शुभमला सांगितला.
आजोबा धोतराच्या काठाने सारखा चष्मा पुसायचे. आजकाल आजोबांना चष्म्यातून नीट दिसत नव्हतं. अंधुक अंधुक दिसायचं. शुभमच्या डोळ्यात मात्र सुट्ट्याचा आनंद लख्ख चमकत होता. रस्त्याच्या दोन्ही बाजूला दुकाने सजली होती. ख्रिसमस ट्री आणि लाल टोपीचे शांताक्लॉज दुकानाच्या काचेतून शुभमकडे बघून हसत होते.
घरी आल्यावर शुभमने आजोबांकडे हट्ट धरला. शांताक्लॉजची गोष्ट सांगण्याचा. मग काय सुरू झाली गोष्ट… नाताळाच्या रात्री लाल टोपीवाला शांताक्लॉज कसा येतो? लहान मुलांच्या आवडीचे गिफ्ट त्यांच्या उशाला कसा गुपचूप ठेवून जातो?
…याची गोष्ट आजोबांनी रंगवून सांगितली. शांताक्लॉजच्या  गोष्टीत शुभम हरवून गेला. गोष्ट संपायच्या आधीच त्याने शांताक्लॉज व्हायचे आणि हवेत उडत जाऊन सगळ्यांना गिफ्ट वाटायचे… असे मनात ठरवून पण टाकले.
नाताळचा दिवस जवळ आला. शुभम सांताक्लॉज व्हायला आतुर होता. कुणाला काय गिफ्ट द्यायचे? याचा विचार त्याने आईसोबत बोलून पक्का केला. आईने शुभमसाठी सांताक्लॉजचा ड्रेस आणि लाल टोपी आणली. नाताळच्या आदल्या दिवशी आजोबांनी शुभमला कौतुकाने विचारलं, ‘‘आमच्या घरातला छोटा सांताक्लॉज कुणाला काय काय गिफ्ट देणार आहे?’’
शुभम आजोबाला म्हणाला, ‘‘हे तर सरप्राईज आहे! आज रात्री सांताक्लॉज कुणालाही न कळू देता गिफ्ट देणार आहे.’’
शुभम सकाळीच सांताक्लॉजचा ड्रेस घालून तयार झाला. डोक्यावर लाल टोपी घालून घरभर उड्या मारू लागला. ‘‘गोष्टीतला सांताक्लॉज हवेत कसा उडतो ते सांगा?’’ शुभमने आजोबांकडे हट्ट धरला. आजोबांनी सांताक्लॉजची खोटी खोटी नक्कल करून दाखवली. दोघांनी दिवसभर खूप धमाल केली. शुभमचा ड्रेस आणि टोपी आजोबांना खूप आवडली पण आजोबांना चष्म्यातून सांताक्लॉज अंधुक अंधुक दिसायचा. आजोबा सारखा चष्मा पुसायचे. पुन्हा सांताक्लॉजकडे कौतुकाने बघायचे.
दिवसभर उड्या मारून मारून सांताक्लॉज थकून गेला. ‘‘रात्री बरोबर बारा वाजता मला झोपेतून उठव,’’ असं आईला सांगून झोपी गेला. छोट्या सांताक्लॉज सोबत खेळून आजोबासुद्धा थकले होते. लवकर झोपी गेले.
आजोबा नेहेमीप्रमाणे सकाळी लवकर उठले. पाहतात तर काय? त्यांच्या उशाला एक गिफ्ट! गिफ्ट पाहून आजोबा आनंदले. त्यांनी घाईघाईत गिफ्ट खोलले. आत काय होते माहीत आहे? रंगीत बॉक्समध्ये पॅकिंग केलेले एक गिफ्ट होते! आजोबांनी गिफ्ट खोलले. गिफ्टमधली भेटवस्तू बघून आजोबांच्या डोळ्यात पाणीच आले! छोट्या सांताक्लॉजने आजोबासाठी नवा कोरा चष्मा भेट दिला होता. आता ना चष्मा सारखा सारखा पुसावा लागणार, ना आजोबाच्या पायाला ठेच लागणार! आजोबांनी नवा कोरा चष्मा घातला. समोर बघतात तर काय? छोटा सांताक्लॉज विठ्ठलासारखा कमरेवर हात ठेवून उभा…! अगदी स्पष्ट दिसत होता.
– गणेश घुले, संभाजीनगर
लाडोबा दिवाळी अंक २०२३

Author: चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email -

View all posts by चपराक >

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

error: Content is protected !!