वेदांपासून ते अगदी आजच्या काळापर्यंत पूजला जाणारा देव म्हणजे गणपती होय. ऋग्वेदातील एक ऋचा आहे त्याला गणपती सुक्त असे म्हणतात. पुराण काळात तर गणपतीच्या अनेक कथा सांगितल्या गेल्या आहेत. आज गणपती केवळ देवळात पुजला जातो असे नाही तर सार्वजनिक गणेश मंडळांच्या मंडपात बसवलेल्या मूर्तीलाही मंदिरातल्या गणपतीइतकेच महत्त्व दिले जाते. भाद्रपद महिन्यात होणाऱ्या गणेशोत्सवाला जितके महत्त्व आहे तसेच महत्त्व आता माघ महिन्यात गणेश जन्माच्या निमित्ताने होणाऱ्या उत्सवालाही येऊ लागले आहे. गणरायाचा हा उत्सव आता दिवाळीपेक्षा देखील मोठा होईल का काय? असे रूप या उत्सवास प्राप्त झाले आहे. केवळ भारतातच नव्हे तर भारताबाहेर अन्य काही देशातही याला उत्सवाचे स्वरूप आले आहे. 1893 साली सुरू झालेल्या या उत्सवाने आता प्रचंड असे विराट स्वरूप प्राप्त केले आहे.
1893 मध्ये अगदी सुरुवातीला एका मंडळापासून सुरू झालेला हा उपक्रम नंतर वेगाने सगळीकडे पसरला. अवघ्या 3 वर्षात गणपती मंडळांची संख्या 100 पर्यंत झाली होती. या मंडळांची वाढती लोकप्रियता लक्षात घेऊन त्यानंतर या मंडळांचे एक मध्यवर्ती मंडळ असावे अशीही कल्पना पुढे येऊन एक मध्यवर्ती मंडळही स्थापन झाले. त्या मंडळामार्फत पुस्तकेही प्रसिद्ध झाली.
गणेश मंडळाचा उत्सव अचानक सुरू झालेला नाही. पेशव्याच्या काळात शनिवारवाड्यात मोठ्या प्रमाणात गणेशउत्सव साजरा होत असे. त्यावेळी विविध कार्यक्रम होत असल्याची नोंदही आहे. पेशव्यांच्या नंतर त्यांच्या सरदारांकडून गणपती उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होऊ लागला मात्र तोपर्यंत या उत्सवाचे स्वरुप खासगी होते. सरदार खासगीवाले यांनी पुढाकार घेऊन वैद्य भाऊसाहेब रंगारी यांच्या घरी बैठक होऊन 1893 मध्ये अधिकृतपणे सार्वजनिक गणपती बसवला गेला. मिरवणुकीने त्याचे विसर्जनही करण्यात आले. लोकमान्य टिळकांनी या उत्सवाला खऱ्या अर्थाने उत्तेजन दिले. 1894 साली त्यांनी स्वातंत्र्यसंग्रामासाठी आणि लोकाना एकत्र करण्यासाठी हा उत्सव अत्यंत उपयुक्त ठरेल हे लक्षात घेऊन त्याला पाठिंबा दिला. 1894 साली त्यांनी विंचूरकर वाड्यात गणपती बसवला. सुरुवातीला काही मंडळींनी गणेशोत्सवाच्या कल्पनेला चांगलाच विरोध केला पण हळूहळू या मंडळांना व्यापक स्वरूप प्राप्त झाले. अवघ्या तीन वर्षांत या मंडळांची संख्या वेगाने वाढली. गणपती मंडळाच्या सगळ्या उपक्रमांमध्ये त्यावेळी टिळकांचा शब्द अंतिम मानला जाई. मिरवणुकीत कुणाचा गणपती प्रथम आणि कुणाचा गणपती मागे यावरून वाद व्हायला लागल्यानंतर लोकमान्यांनी बैठक घेऊन गणपती विसर्जन मिरवणुकीच्या मंडळांचा क्रमच ठरवून दिला.
आज गणेश मंडळांची व्यापकता प्रचंड वेगाने वाढत आहे पण सगळ्यांचं संचालन करून कुणाला चार शब्द समजुतीचे सांगेल असे नेतृत्व दुर्दैवाने राहिलेले नाही. गणेश मंडळांचा लोकोत्सव झाला असला तरीसुद्धा आज गणेश मंडळांवर कॉर्पोरेट कल्चरचा मोठा प्रभाव पडला आहे. गणेश उत्सवाचा इव्हेंट झाला आहे. गणेश मंडळे आता वर्गणी कमी मागत असले तरी जमा करत असलेल्या पैशांचा विनियोग केवळ समाजासाठीच होतो असे म्हणता येणार नाही.
गणेश मंडळांचा व्यवहार आणि गणेशोत्सवाची व्यापकता याचा विचार केला तर 125 वर्षांपेक्षा जास्त वर्षांची परंपरा लाभलेल्या या उत्सवात अनेक दोष निर्माण झाले आहेत. गणेशोत्सव हा समाजाला दिशा देणारा उत्सव ठरण्याऐवजी समाज कसा बिघडत आहे किंवा समाजाची प्राधान्याची मूल्य काय आहेत त्याचे प्रतिबिंब या उत्सवात सातत्याने उमटत आहेत. गणेशोत्सवांच्या मंडपांची, आकारमानाची समस्या ही आजच आहे असे नाही. शतकभरापूर्वीची वर्तमानपत्रे चाळली तर मंडपांच्या आकारामुळे अडथळा येतो अशा बातम्या आणि पत्र लेखकांची पत्रे आढळून येतील तसेच गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांकडून काही ठिकाणी जुगारही खेळला गेल्याची तुरळक उदाहरणे देखील आढळली होती. याचा अर्थ गणेशोत्सवात केवळ आजच काही दुर्गुण शिरले आहेत आणि 100-125 वर्षांपूर्वी सारे काही उत्तम होते असे समजण्याचे कारण नाही मात्र त्यावेळी उत्सवामध्ये असलेले दुर्गुणांचे प्रमाण अत्यंत अल्प होते. आज दुर्गुण जास्त आणि सद्गुण कमी अशी परिस्थिती उद्भवली आहे.
मात्र गणेशोत्सवावर टीका करून किंवा त्याला नावे ठेवून हा उत्सव सुधारला जाणार नाही तर या उत्सवात अधिकाधिकरित्या सहभागी होऊन त्याच्यातील दोष दूर करण्यासाठी झटले पाहिजे. सामाजिक संस्थांनी तसेच विविध संघटनांनी या उत्सवात सहभागी होऊन उत्सवाला कसे वळण लावता येईल यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले पाहिजेत.
महाराष्ट्रच नव्हे तर देशाच्या अनेक भागांमध्ये गणपती उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. भक्तीशक्तीचा समन्वय असलेला हा उत्सव आता युक्तीने समाजासाठी राबवून त्याला वेगळे अधिष्ठान प्राप्त करून देण्याची वेळ आलेली आहे. जसजसा समाज बदलत गेला तसतसा गणेशोत्सवात बदल होत गेला. समाजसुधारकांनी जसा गणपती उत्सव अग्रक्रमाने आपला मानला तसा राजकारण्यांनी आपल्यासाठी कार्यकर्त्यांची हक्काची फौज मिळावी यासाठी देखील गणेशोत्सवाचा वापर करून घेतला. समाजसुधारक, राजकारणी यांनी गणेशोत्सवाचा वापर आपल्यासाठी करून घेतला तरी त्यामुळे समाजाचे नुकसान झाले असे नाही मात्र वरद राजन किंवा मुंबईतील अन्य मोठ्या गुंडांनी आपली प्रतिमा निर्माण करण्यासाठी प्रचंड पैशांचा वापर करून गणेशोत्सव साजरा करण्यात सहभाग घेतल्यानंतर मिरवणुकीत ‘आमचा गणपती पुढे की मागे’ यावरून वाद सुरू झाले. त्याला हिंसक रूप आले. कालांतराने ही मंडळी बाहेर पडली मात्र आजही गणेशोत्सवाला जे स्वरूप आले आहे ते समाजाचे यातून केवळ भलेच होईल असे राहिलेले नाही. समाज विकासाच्या रथाला अत्यंत वेगवान अशी चालना मिळण्याचे साधन म्हणून गणेशोत्सव हे चांगले माध्यम ठरू शकते याची प्रचिती अनेकांना आलेली आहे. अनेक अभ्यासकांनी तशी ग्वाही देखील दिली आहे मात्र मांजराच्या गळ्यात घंटा कुणी बांधायची या न्यायाने या उत्सवाचे संचालन करण्यासाठी ज्यांच्या शब्दाला समाजात वजन आहे ती मंडळी अद्यापही मागेच आहेत. ज्यांना या उत्सवात विधायकरित्या बदल व्हावेत या अफाट जनशक्तीच्या माध्यमातून रचनात्मक कार्य घडावे असे वाटते ती मंडळी या उत्सवापासून दूर राहणेच पसंत करतात आणि ज्यांना हा उत्सव म्हणजे आपली राजकीय सोय किंवा आपली व्यापाराची उत्तम संधी किंवा आपल्या प्रतिमा निर्मितीसाठी उत्तम साधन असे वाटते ती मंडळी मात्र तनमन धनाने या उत्सवात उतरताना दिसतात. त्यामुळे या उत्सवाचे स्वरूप आनंददायी असे राहिलेले नाही. त्यामध्ये सगळ्यांना सहभागी व्हायचे आहे पण यात घुसलेल्या काही वाईट गोष्टी कशा दूर करायच्या याचा मार्ग सापडत नाही अशी अवघड स्थिती झालेली आहे.
अर्थात सारेच काही अंधारमय आहे असे मुळीच नाही. गणेशोत्सवावर टीका करताना समाजविकासाचे, समाजशिक्षणाचे, समाजसेवेचे हे उत्तम माध्यम आहे यात कसलीही शंका नाही. हा उत्सव धनदांडग्यांच्या हातात गेलेला आहे अशी टीका करावी असे वाटत असतानाच इतक्या काही चांगल्या गोष्टी विविध मंडळांकडून केल्या जातात की मंडळांवर टीका करणे किती चुकीचे असे वाटू लागते.
देशातील गणेशोत्सव हा जनोत्सव झाला आहे असे नुसते म्हणून चालणार नाही. एखाद्या समुद्रासारखे रूप या उत्सवाला आले आहे. संपूर्ण 10 ते 11 दिवस गणेशोत्सवाने समाजाचे मोठे क्षेत्र व्यापून टाकलेले असते. न्यायमूर्ती रानडे यांनी लोकमान्य टिळकांना ‘तुम्ही गणपतीला रस्त्यावर आणून चूक करत आहात’ असा इशारा दिला होता. दुर्दैवाने टिळकांच्या निधनानंतर या मोठ्या चळवळीला मार्गदर्शन करील असे एक मोठे नेतृत्व न राहिल्यामुळे यात काही चुकीच्या गोष्टींचा प्रवेश झाला. कालांतराने या चुकीच्या गोष्टी म्हणजेच उत्सव अशी धारणा समाजात पसरली. त्यामुळे उत्सवावर टीका होऊ लागली. टीकेमुळे या उत्सवापासून अनेकांनी दूर राहणे पसंत केले कारण काही वर्षांनी पुन्हा एकदा काही रचनात्मक गोष्टींचा आग्रह धरणाऱ्यांनी उत्सवात लक्ष घातल्यानंतर अपप्रवृत्ती कमी होऊ लागल्या. आज याचे प्रमाण कमी असले तरी उत्सव विधायक हवा, रचनात्मक हवा असा सूर हळूहळू वाढत आहे हे सुचिन्हच आहे.
बाजारपेठेच्या गणितातून बघितले तर गणपती उत्सव हा बाजारपेठेला प्रचंड अशी चालना देणारी सामाजिक यंत्रच आहे असे म्हणावे लागेल. आज वॉटसॲपचा वेग व प्रसार जितका आहे त्याचा विचार केला तर कुणी एकेकाळी गणेश मंडळे ही वॉटसॲपचे काम करीत होती असे म्हणावे लागेल. गणेशोत्सव सुरू झाल्यानंतर पहिल्या काही वर्षात पुण्यामध्ये आणि राज्यात इतरत्रही मेळ्यांची परंपरा सुरू झाली. या मेळ्यांतून स्वराज्य निर्मितीच्या संग्रामासाठीचे जागरण मोठ्या प्रमाणात घडले हे जितके सत्य तितकेच अनेक कवी, लेखक, कलाकार यांना प्रचंड असे मोठे व्यासपीठ मिळाले हे नाकारून चालणार नाही. त्याचबरोबर विविध मंडळांकडून चालवल्या जाणाऱ्या व्याख्यानमालेत या समाजशिक्षणाचे मोठे साधन ठरले होते हे नाकारून चालणार नाही.
अनेक राजकीय पक्षांतील छोट्या मोठ्या नेत्यांनी गणेश मंडळात काम करून आपली राजकीय जागा तयार केली. तसेच काही समाजसेवी मंडळींनी देखील मंडळांच्या कार्यकर्त्यांचा रचनात्मक कामासाठी उपयोग करून घेत समाजसेवेचे व सामाजिक संस्थांचे अनेक छोटे छोटे डोंगर निर्माण केले ही वस्तुस्थिती आहे. गणेश मंडळांची आजची स्थिती ‘तुम्ही एक तर प्रेम करा किंवा टीका करा पण त्यांच्याकडे तुम्ही दुर्लक्ष करू शकत नाही’ अशी आहे.
गणेश मंडळांच्या माध्यमातून समाजसेवा कशी करता येते याचे उत्तम उदाहरण पुण्यातील दगडूशेठ गणपतीने संपूर्ण देशाला घालून दिले आहे. एखाद्या छोट्या राज्य सरकारने जेवढे काम करावे तेवढे काम आरोग्याच्या क्षेत्रात तसेच समाजसेवेच्या क्षेत्रात मग ते अनाथआश्रम, वृद्धाश्रम किंवा शिक्षण संस्था असो अशा बाबतीत केले आहे. ससून रुग्णालयातील सर्व रुग्णांच्या नातेवाईकांना आणि रुग्णांना रोजचे जेवण या मंडळाकडून दिले जाते. त्याचबरोबर अनेक गरीब नागरिकांना औषधोपचारासाठी मदत केली जाते. काही लाखांपर्यंत दिली जाणारी ही मदत हे गणेशोत्सवाच्या विधायकतेचे आणि रचनात्मक कामाचे ठणठणीत उदाहरण आहे.
काही वर्षांपूर्वी ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर यांनी पुढाकार घेऊन संपूर्ण राज्यात गणेश मंडळांचे संघटन करण्याचा प्रयत्न केला होता मात्र फार काळ तो चालला नाही. खरे तर राज्यातील सर्व गणेश मंडळांचे एकत्रित असे एखादे कार्यकारी नियामक मंडळ आपण करून गणेश मंडळांना योग्य दिशा देण्याचे काम समाजातील धुरिणांनी करायला हवे. राज्य सरकारने देखील यासाठी सकारात्मक पुढाकार घेऊन वर्षभरात होणाऱ्या विविध उत्सवांची संख्या लक्षात घेऊन यासाठी एक वेगळे खाते तयार करून या उत्सवाला योग्य अशी आचारसंहिता घालून देऊन यातील दुर्गुण कसे दूर होतील यासाठी प्रयत्न करायला हवेत. यामध्ये नोकरशाहीचा वारेमाप उपयोग करून आणखी एक कुरण असे स्वरूप मात्र याला येऊ देता कामा नये. निवृत्त कर्मचाऱ्यांचा यासाठी सरकारला उपयोग करून घेऊन समाज शिक्षणासाठी विधायक स्वरूपाची अशी प्रचंड अशी व्यवस्था शिस्तबद्ध रीतीने उभी करता येईल. त्यासाठी राज्यकर्त्यांनी संवेदना, उपक्रमशीलता आणि समाजावरचा थोडा विश्वास वाढवून याला बळ आणि चालना देण्याची गरज आहे.
गणेशोत्सवाने कलाकारांना संधी दिली तसेच उद्योग वाढीला आणि व्यापाराचे चक्र गतिमान करण्यासाठी बळ दिले हे प्रतिपादन आता अपुरे आहे. तेच प्रतिपादन सतत मांडून काही उपयोग होणार नाही. 150व्या वर्षाच्या जवळ आलेल्या लोकोत्सवातील विवेकाच्या शक्तीने बुद्धीचा नेमका वापर करणारे लोकसैन्य असे स्वरूप प्राप्त होण्यासाठी सगळ्यांनीच प्रयत्न केले पाहिजेत. केवळ गणेशोत्सवावर टीका न करता हा उत्सव माझा आहे, तो सर्वांचा कसा होईल आणि सर्वांचा होत असताना त्यातला ‘मी’पणाचा संकोच होऊन माझ्या मनाला आनंद कसा मिळेल याचा विचार प्रत्येक मराठी माणसाने केला तर या लोकोत्सवाला जगात एक वेगळी कीर्ती लाभेल आणि जगासमोर त्याचे एक वेगळे उदाहरण निर्माण होईल इतकी ताकत या उत्सवात आहे.
प्रत्येक राज्यामध्ये विविध उत्सव साजरे केले जातात. ते उत्सव म्हणजे त्या त्या राज्याची संस्कृती असते. बंगालमध्ये दुर्गापूजेचा उत्सव असाच मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. दक्षिणेकडे असेच वेगवेगळे उत्सव साजरे केले जातात. ओडिशासारख्या कमी प्रगत राज्यात जगन्नाथ पुरीच्या सोहळ्यासाठी देशभरातून लोक येतात. महाराष्ट्रात सुरू झालेल्या गणेशोत्सवाला असेच सूत्रबद्ध स्वरूप देऊन खूप मोठी विधायक शक्ती उभी करता येईल. राज्य सरकार विविध मंदिरे ताब्यात घेते. तसे न करता या विविध मंडळांची साखळी तयार करून त्याला निवृत्त पोलीस, निवृत्त सैनिक, निवृत्त शासकीय कर्मचारी या सगळ्यांची मदत घेऊन या लोकोत्सवातून विधायक काम करणाऱ्यांची एक प्रचंड अशी रचना सैनिकांची आघाडी उभी करता येईल. हे करताना मात्र त्याला शासकीय स्वरूप मुळीच आणता कामा नये. तसेच लोकसहभाग याला सर्वोच्च प्राधान्य देऊन या लोकशक्तीचे रूपांतर बलदंड समाज पुरुषाच्या नेतृत्वाखालची बलदंड समाजसेवेची फौज असे करणे शक्य आहे.
गणेशोत्सवावर केवळ टीका करत न बसता त्याच्यामध्ये आपल्या परीने कसा बदल करता येईल याचा उत्तम प्रयत्न आनंद सराफ नावाच्या एका गणेश मंडळाच्याच कार्यकर्त्याने केला. गणेश मंडळांचे अहवाल हे रूक्ष अहवाल न होता मार्गदर्शक पुस्तिका कशा होतील याकडे त्याने त्याच्या परीने लक्ष दिले तसेच विविध मंडळांच्या पदाधिकाऱ्यांशी सतत संवाद साधत काही विधायक गोष्टी घडवल्या. असे करणे शक्य आहे. दिनेश थिटे नावाच्या एका जाणत्या आणि हुशार पत्रकाराने एकूणच या लोकोत्सवावर प्रबंध लिहून शास्त्रीय पद्धतीने या लोकोत्सवाचा वेध घेतला आहे. त्वष्टा कासार मंडळाचे अध्यक्ष काका वडके यांनी मिरवणुकीमध्ये होणारे गैरप्रकार थांबविण्यासाठी पुढाकार घेऊन अनेक बदल घडवले होते. ठरवले तर बरेच काही करता येऊ शकते. ही तीन नावे म्हणजे बदलाचे जादुगार आहेत असे कुणीच म्हणणार नाही पण ठरवले तर काय करता येते याची ही उत्तम उदाहरणे आहेत. कुठलीही संघटना, संस्था किंवा अफाट धनसंपदा मागे नसताना या तिघांनी आपल्या परीने या लोकोत्सवाला सकारात्मक वळण देण्याचा प्रयत्न केला. त्याचा अवलंब सर्वांनी सर्व पातळीवर केला तर हा लोकोत्सव खरोखर गर्वाने सांगावा असा उत्सव ठरेल यात शंका नाही.
– लोकोत्सव व्हावा विधायकसेना
देवदत्त बेळगावकर
साहित्य चपराक सप्टेंबर २०२४ (गणेशोत्सव विशेषांक)