जन्मजात चित्रकाराला एक हक्क असतो रंगात खेळण्याचा! त्याला बंधन नसतं वयाचं, वेळेचं, काळाचं!! त्याचा एकच ध्यास असतो कॅनव्हासवर रंग उधळण्याचा आणि त्याच रंगात रसिकांना रंगवण्याचा. जगणार्याला जसं जीवन तसं चित्रकाराला हवा असतो रसिकांचा उत्कट प्रतिसाद. त्याला साद म्हणून उभा राहतो ’रंगाचा श्रीरंगी अविष्कार’. चित्रकाराच्या शब्दांपेक्षाही त्याची चित्रंच आपल्याशी उत्कट संवाद साधतात. कल्पनेच्या आकाशाचा कॅनव्हास अन् त्यावर रंग उतरलेत देवरुपात..!
त्यातूनच जन्म होतो चित्रप्रदर्शनाचा. पंढरपूरमधील कुंचल्याच्या रंगात रंगलेले कलावंत आहेत श्री. भारत अर्जुन गदगे. त्यांचे ‘विघ्नहर्ता कला प्रदर्शन’ पंढरपूर येथील टिळक स्मारक मंदिरात सुरु आहे. त्यानिमित्त श्री. गदगे यांच्या कला साधनेचा उलगडलेला हा जीवनप्रवास…!!
‘मानसीचा चित्रकार तो, तुझे निरंतर चित्र काढतो’ या गीतपंक्तीप्रमाणे मनातील विविध कल्पनांना रंग आणि रेषा या माध्यमातून कॅनव्हासवर चितारणारे पंढरीतील एक कलावंत म्हणजे भारत अर्जुन गदगे. या पंढरीचा पांडुरंगही या भक्ताच्या भक्तीरंगात न्हाऊन निघाला आहे.
”भक्तीत दंग सदा पांडुरंग
रंगे मोरपंखी होऊनी श्रीरंग”
प्रत्येक वारकरी हा जन्मजात ‘पंढरपुरी’ असतो, तसा प्रत्येक पंढरपुरी हा भावरंगी रंगणारा असतो. अशा भक्ती रंगात रंगून रंगाची उधळण करणारा असा एक जन्मजात ‘चित्रकारी’ म्हणजे भारत अर्जुन गदगे! पंढरपुरातील एक काळ गाजवलेले, कला, नाट्यक्षेत्रात सहजतेने वावरणारे आणि कला क्षेत्रातील योगदानाबद्दल छोटा गंधर्व यांच्या हस्ते सत्कार झालेले ‘अर्जुन पेंटर’ हे भारत गदगे यांचे वडील आणि कलेच्या क्षेत्रातील पहिले गुरु.
याच अर्जुनाने त्यांना कलेच्या क्षेत्रातील लक्ष्याचा अचूक वेध कसा घ्यायचा ते शिकवले आणि मग त्यांच्या या शिष्याने कलेच्या क्षेत्रात चौफेर शिरसंधान करीत आपला एक वेगळा ठसा उमटविला. म्युरल पेंटिंग, पोट्रेट, लॅण्डस्केप, मेटल पेंटिंग, फोटोग्राफी आदी क्षेत्रात ते निपुण बनले. त्यांच्या या योगदानाची दखल राज्य शासनाने घेतली आणि ‘आदर्श शिक्षक’ हा पुरस्कार त्यांना 5 सप्टेंबर 1997 रोजी बहाल करण्यात आला. कल्पनेचा एकेक धागा गुंफून त्यांनी शुभ्र कॅनव्हास वर अनेकरंगी चित्रांची मुक्तहस्ते उधळण केली आणि त्यामुळेच जगण्यासाठी चित्रकला व चित्रकलेसाठी जगणे या दोन्ही गोष्टी भिन्न असल्या तरी अपरिहार्याने त्यांना एकत्रितपणे अबाधित ठेवण्यात गदगे यशस्वी झाले आहेत.
लोखंडाला परिसस्पर्श झाला की त्याचे सोने होते. तसंच काहीसे गदगे यांच्या बाबतीत घडलं. 1967 साली ‘आग्य्राहून सुटका’ या नाटकाची तयारी चालली होती. त्यात आपलाही सहभाग असावा या भावनेतून भारत गदगे यांनी शिवरायांच्या प्रतिमेला चित्ररूप दिले आणि खरंतर तेव्हापासून कागद, रंग, ब्रश, पेन्सिल यांचे एक भावविश्व आकार घेऊ लागले. दहावीनंतर सांगलीच्या कला विश्व महाविद्यालयातून ए. डी. टी. परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर पुण्याच्या अभिनव कला विद्यालयात आणि नंतर मुंबईच्या सुप्रसिद्ध जे. जे. स्कूल ऑफ आर्टस् मध्ये त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. जी. डी. (पेंटिंग) ही परीक्षा केंद्रात द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले. त्यानंतर ए. एम. ही कलेच्या क्षेत्रातील सर्वोच परीक्षा ते केंद्रात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले.
आकाशात काही काळाने संथ विहरणारा पतंग हा जसा सुरूवातीस अष्ट दिशांना गोता खातो, तशाच काही परिस्थितीच्या गोता खाताना गदगे यांना कला क्षेत्रात स्थिर राहण्यासाठी गुरुतूल्य तिळवे सर, ए. टी. पाटील, श्री. माजगावकर, एम. के. जाधव यांनी सहाय्य केले. आपल्या गावातील एक उत्कृष्ट कलाकार नोकरीच्या निमित्ताने आपले गाव सोडून जाऊ नये यासाठी पंढरपुरातील कै. बापू जोशी, भागवताचार्य वा. ना. उत्पात यांनी त्यांना पंढरपुरातच बांधून ठेवायचे ठरवले आणि नगरपालिकेच्या ‘लोकमान्य विद्यालयात’ कलाशिक्षक म्हणून गदगे नोकरीस लागले.
महाराष्ट्र भूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, चंद्रकांत व सूर्यकांत मांडरे बंधू,चित्रकार एम. एफ. हुसेन, वसंत बापट, प्रतापसिंह मोहिते-पाटील, सुधाकरपंत परिचारक इत्यादी मान्यवरांनी त्यांच्या कलाकृतीचे कौतुक केले आहे. आजही गदगे यांची चित्रसाधना कायम चालूच असते. स्वातंत्र्याची 50 वर्षे पूर्ण झाल्यावर त्यांनी क्रांतिकारकांच्या कार्याचे दर्शन घडवणारे चित्र प्रदर्शन भरविले. त्यांच्या ‘ईश्वरभूती’ आणि ‘रंगाचा श्रीरंगी आविष्कार’ या प्रदर्शनांना मोठा प्रतिसाद मिळाला. या प्रदर्शनातून मिळालेल्या पैश्याचा गरीब विद्यार्थ्यांसाठी उपयोग केला जातो. पंढरपूरचे माजी प्रांताधिकारी ज्योतिबा पाटील यांनी गदगे सरांचे हे कलागुण लक्षात घेऊन 1 मे 1997 रोजी सोलापूर जिल्ह्यातर्फे मुंबईला पाठविण्यात येणार्या चित्र रथाच्या कलादिग्दर्शनाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली आणि त्यांनी ती सार्थ करून दाखवली. सध्या ते तालुक्यातील होतकरू विद्यार्थी कलाकारांना मार्गदर्शन करीत आहेत.
महाराष्ट्राच्या अनेक घरात पोहचलेल्या या कलाकारास साथ मिळाली आहे ती त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. मंजुषा गदगे यांची! पंढरपुरतील इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये गदगे यांनी कलाशिक्षिकेचे काम केले आहे परंतु संसाराच्या व्यापामुळे त्यांनी ती नोकरी सोडली आणि कलेची साधना चालूच ठेवली. प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या यशामागे त्याच्या पत्नीचा फार मोठा वाटा असतो हे सौ. मंजुषा गदगे यांनी सार्थ करून दाखविले आहे. भारत गदगे यांचे दोन्ही बंधूही कलाक्षेत्रात पारंगत आहेत. त्यांचे मोठे बंधू आनंद गदगे हे उत्कृष्ट छायाचित्रकार आहेत तर धाकटे बंधू गणेश गदगे हे वास्तुविशारद आहेत. एकंदरीत भारत गदगे यांचे संपूर्ण कुटुंब चित्रकलेच्या रंगात मनसोक्त रंगलेले आहे.
भारत गदगे यांच्या रंगात रंगलेल्या वाटचालीचे रंग असेच अधिकाधिक खुलत रहावेत हीच शुभेच्छा!!
स्वप्निल रविकांत कुलकर्णी, पंढरपूर प्रतिनिधी
साप्ताहिक ‘चपराक’,पुणे
९८३३३७९००५