अधिक-उणे – मराठी चित्रपटसृष्टीचे

मराठी चित्रपट निर्मात्यांना जेवढ्या सोयी आणि सवलती राज्य शासनाने दिलेल्या आहेत तेवढ्या अन्य कोणालाही देवू केलेल्या नाहीत. चित्रपट निर्मितीसाठी आर्थिक सहाय्य, चित्रपट निर्मिती झाल्यानंतर सिमेना करमुक्त करण्याकरता शासनाची होणारी मदत, निर्माण झालेला सिनेमा चांगल्या चित्रपटगृहात लावता यावा म्हणून शासकीय मदत आणि एवढे सगळे करूनही या चित्रपटांना फारसा पे्रक्षकवर्ग मात्र मिळत नाही. शासन चित्रपट निर्मात्यांना निर्मितीपासून ते चित्रपटगृह देण्यापर्यंत अनेक सोयी सवलती देवू शकते पण चित्रपटगृहात प्रेक्षक नेवून बसविणे हे शासनाला शक्य नाही. त्या दर्जाची, गुणवत्तेची निर्मिती ही त्या निर्मात्यालाच करता यायला हवी की जी निर्मिती होत नाही.

गेल्या काही वर्षात भारतीय चित्रपट जगभर पसरला पण मराठी चित्रपटांच्या बाबतीत हे झाले नाही. ‘दुनियादारी’ किंवा ‘लय भारी’ या अलीकडच्या काही सिनेमांनी २५ ते ३० कोटी दरम्यान धंदा केला आणि मराठी चित्रपट निर्मात्यांना कमालीचा आनंद झाला. हिंदी चित्रपट यशस्वी झाला तर भारतभर ३०० ते ४०० कोटींचा धंदा करतो आणि भारताबाहेर त्यांचा होणार्‍या धंद्याचा वित्तीय आकडा वेगळाच आहे. ‘बाहुबली’सारखा एक प्रादेशिक चित्रपट हा हिंदी चित्रपटाच्यापेक्षाही अधिक चांगला व्यवसाय करतो आणि ५०० कोटींपेक्षा अधिक उत्पन्न मिळविण्याची किमया करतो. प्रश्न एवढाच आहे की असा एखादा पराक्रम मराठी चित्रपटाच्या नावावर का होत नाही? मराठी चित्रपट नेमका कोणत्या बाबतीत कमी पडतो? मराठी चित्रपटाने असा रेकॉर्डब्रेक धंदा केला असे एखादे उदाहरण गेले ३० – ४० वर्षात आपल्याला का पाहायला मिळत नाही?

सवंग लोकप्रियता मिळविणे, पे्रक्षकांची गर्दी खेचणे म्हणजे चित्रपटाची गुणवत्ता फार मोठी आहे असा त्याचा अर्थ घ्यायचे कारण नाही पण जे माध्यम लोकांसाठी तयार केलेले आहे, लोकरंजन आणि लोकप्रबोधन यासाठी वापर केलेला आहे त्या माध्यमाकडे जर लोक पाठ फिरवत असतील तर त्या कलाकृतीचे मूल्य व त्याचा विचार करणे आवश्यक आहे. शेक्सपिअरच्या नाटकांच्या बाबतीत एक प्रकार सातत्याने घडला. शेक्सपिअरची नाटके ब्रिटिश रंगभूमीवर आली. पहिल्या रांगेत बसणारे प्रतिभावंत समीक्षक आणि पिटात उभे राहून टाळ्या वाजवणारा पे्रक्षक हे दोघेही शेक्सपिअरच्या प्रतिभेने अचंबित झाले. शेक्सपिअरच्या अलौकिक कल्पनाशक्तिचे कौतुक पिटातल्या प्रेक्षकांनी जेवढं केलं तेवढंच समीक्षकांना आणि विरोधकांना करावं लागलं. असा एखादा प्रकार मराठी चित्रपटाच्या बाबतीत आजतागायत का झाला नाही याही प्रश्नाचं उत्तर शोधणं आवश्यक आहे.

तंत्र आणि छायाचित्रण याबाबतीत मराठी चित्रपट फारच मार खात होता. सुदैवाने गेल्या काही वर्षात आलेले मराठी चित्रपट मात्र आशादायक आहेत. ‘बालगंधर्व’, ‘दुनियादारी’ यासारख्या चित्रपटांनी छायाचित्रण आणि तंत्र याबाबतीत कमालीची प्रगती केलेली आहे ही गोष्ट मान्य करणे गरजेचे आहे. मात्र एकंदर मराठी चित्रपटाचा आवाका पाहता मराठी चित्रपटाचे अर्थकारण बदलणं फार अवघड आहे. चांगल्या दर्जाची निर्मिती प्रेक्षकांपर्यंत पोचविण्यासाठी करावे लागणारे प्रयत्न आणि गुणवत्तेशी तडजोड न करता लोकांना चांगले स्वीकारायची सवय लावणं या गोष्टी करणं आवश्यक आहे. याबाबतीत मराठी चित्रपट सृष्टीतील कलाकार निर्माते, दिग्दर्शक नेमकं काय करतात हे पाहणं मनोरंजक ठरेल.

‘शोले’सारखा एखादा हिंदी सिनेमा ४० वर्षे होवून गेली तरी लोकं सातत्याने पाहत आहेत. त्याच्यावर चर्चा करतायत. कुठही तो सिनेमा नव्याने एखाद्या थिएटरला लागला तरी लोकांची गर्दी आजही खेचत असते. प्रश्न एवढाच आहे की असा प्रकार एखाद्या मराठी सिनेमाच्या बाबत का होत नाही? ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’सारखा सिनेमा १५-१७ वर्षे एका थिएटरला लावला जातो आणि सातत्याने रोज त्याचे प्रयोग होतात हा प्रकार मराठी सिनेमाच्या बाबत का झालेला नाही या प्रश्नाचं उत्तर परखडपणाने शोधणं आवश्यक आहे.
मराठी चित्रपटसृष्टीमध्ये काम करणारे गेली 30 ते 40 वर्षातील कलाकार, अभियंते, निर्माते आणि दिग्दर्शक यांनी मराठी चित्रपट सृष्टीला काय दिले याचा जाब त्यांना एकदा विचारणे गरजेचे आहे. दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना जेवढ्या सोयी आणि सवलती शासनाने दिल्या नाहीत त्याच्या कित्येकपट सोयी आणि सवलती मराठी चित्रपट निर्मितीसाठी देवूनही मराठी चित्रपट निर्मात्यांना सकस मराठी चित्रपटांची निर्मिती का करता आली नाही या प्रश्नाचा जाबही त्यांना विचारणं गरजेचं आहे.

अलीकडे काही चरित्रात्मक चित्रपट आले. ‘लोकमान्य टिळक,’ ‘यशवंतराव चव्हाण’ या महानायकांवर आलेल्या चित्रपटांनी केलेला धंदा हा सुद्धा चिंतेचा विषय आहे. महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनामध्ये ज्यांचं जीवन आदर्शवत मानावे अशा महानायकांची कमतरता कधीही नव्हती. अनेक महापुरूषांनी विविध क्षेत्रात काम करून महाराष्ट्राचे सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय जीवन समृद्ध केलेले आहे. या महापुरूषांचे आयुष्य हा चित्रपटाचा विषय निश्चित आहे. त्याद़ृष्टिने अलीकडच्या काळातले चित्रपट पाहिले तर या चित्रपटांकडे मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांनी का पाठ फिरवली, का लक्ष दिलं नाही याचं उत्तर शोधावं लागेल.

मराठी माणसाचं सिनेमावरचं प्रेम कमी झालेलं आहे का? मराठी माणसांना सिनेमा पाहिला आवडतच नाही का? मराठी माणसांना मराठीपेक्षा हिंदी सिनेमा अधिक प्रिय आहे का? या प्रश्नाचं उत्तर नकारार्थी आहे. जे चांगलं आहे ते मराठी माणसांना आवडतं. मराठी माणूस हा सद्गुणांचा पूजक आहे. मराठी माणसाचं जगातल्या सर्व चांगल्या गोष्टींवर प्रेम आहे. जगातल्या सर्व चांगल्या गोष्टीचं अनुकरण करावं हे मराठी माणसांना आवडतं. २००० नंतरची मराठी पिढी बदलेली आहे. ‘सम बडी लव्हज यू, सम बडी मिस यू, एव्हरी सिंगल नाईट’ असं म्हणणारी नवीन मराठी पिढी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक पटलावर आता दिसू लागलेली आहे. या पिढीला मराठी चित्रपट बघावेत असं वाटावं यासाठी मराठी निर्माते आणि दिग्दर्शक काही करत आहेत का या प्रश्नाचं उत्तर ‘नाही’ असंच आहे.
मराठी सिनेमा हा कात टाकतो आहे अशा आशयाचा एक अग्रलेख मध्यंतरी एका वृत्तपत्रात आलेला होता. मराठी सिनेमानं कात टाकली तर त्याचं स्वागतही चित्रपट रसिक नक्की करतील पण मराठी सिनेमा अशी कात टाकतो आहे असं वाटत नाही. भारतीय चित्रपटसृष्टीतला सर्वश्रेष्ठ सिनेमा कोणता? असा प्रश्न कुणी विचारला आणि याचा शोध घ्यायचा ठरवलं तर उत्तर फार सोपं आहे. ‘प्रभात’ने निर्माण केलेला ‘संत तुकाराम’ हा भारतीय चित्रपट सृष्टीतला सर्वश्रेष्ठ सिनेमा आहे हे उत्तर कोणालाही द्यावं लागेल. आजही ‘प्रभात’चा जुना ‘संत तुकाराम’ हा अत्यंत आकर्षक सिनेमा वाटतो. या सिनेमाचं छायाचित्रण, जगद्गुरू संत तुकाराम या महापुरूषाच्या जीवनाची केलेली मनोवेधक मांडणी, मनात ठसणार्‍या व्यक्तिरेखा, सुंदर अभंग, नाट्यमय प्रसंग यामुळं ‘संत तुकाराम’ यासारखा चित्रपट आजतागायत भारतीय चित्रपट सृृष्टीत झालेला नाही असं नक्की म्हणता येईल. त्यापिढीतले अनेक लोक, अनेकजण असं सांगायचे की ‘संत तुकाराम’ हा सिनेमा आम्ही ४० वेळा पाहिला, ५० वेळा पाहिला. ‘संत तुकाराम’ सिनेमा हा ४० ते ५० वेळा पाहणारे काही प्रेक्षक हे नास्तिक होते. तरीही हा सिनेमा त्यांना मनापासून आवडत होता. ‘प्रभात’ची ‘संत तुकाराम’ ही निर्मिती खरोखरंच विलक्षण होती. म्हणजे मार्क देवून सांगायचं तर ‘शोले’ मधल्या गब्बरसिंग या खलनायकाला ५० मार्क दिले तर ‘संत तुकाराम’ मधल्या सालोमालो या खलनायकाला १०० मार्क द्यावे लागतील इतका अप्रतिम खलनायक संत या सिनेमामध्ये साकारला गेलेला आहे. एवढी समृद्ध परंपरा असताना आजच्या मराठी चित्रपटसृष्टीची अशी दशा का झालेली आहे?

व्ही. शांताराम यांचे सामाजिक जाण असलेले ‘माणूस’सारखे सिनेमे हे मराठी चित्रपटसृष्टीचं वैभव आहे. व्ही. शांताराम यांनी एकाचवेळी मराठी आणि हिंदी या दोन्हीही भाषातून निर्मिती केली. अधिक सशक्त कथा या व्ही. शांताराम यांना मराठी साहित्यातून मिळत होत्या. त्याचा त्यांनी समर्थपणाने वापर केला. व्ही. शांताराम यांचे सिनेमे हे सामाजिक प्रबोधन आणि भव्यता या दोन्ही गोष्टी एकाचवेळी दाखवत होते. लोकरंजन करत असताना सामाजिक भान ठेवणारे चित्रपट म्हणून या सिनेमांचं आवर्जून वर्णन करावं लागेल. एक वेगळा चित्रपट निर्माता म्हणून आचार्य अत्रेंचा उल्लेख करणं अपरिहार्य आहे. ‘श्यामची आई’, ‘महात्मा फुले’ या अत्रेंच्या दोन सिनेमांचा उल्लेख न करता पुढे जाणं शक्य नाही.

आचार्य अत्रेंनी श्यामची आई घराघरात पोचवली. आचार्य अत्रेंचा हा सिनेमा आजही आकर्षक वाटतो. महात्मा फुले या महापुरूषाचे समर्थ जीवन अत्रेंनी अत्यंत रोमहर्षक पद्धतीने रूपेरी पडद्यावर आणलं आणि लोकप्रिय केलं. अत्रेंच्या सिनेमातील श्रीकृष्णाच्या तोंडी दिलेल्या एका वाक्यामुळे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनात मोठं वादळ उठलं. संस्कृतीरक्षक मंडळींनी अत्रेंवर मोठी टीकेची झोड उठवली. अत्रेंच्या सिनेमातला नायक श्रीकृष्णाला उद्देशून ‘कृष्णराव आम्हाला एखादा चान्स द्या’ असं म्हणतो अशा आशयाचं ते वाक्य होतं. त्यावरून साहित्यिक आणि सांस्कृतिक जगतामध्ये आपापल्या समर्थनामध्ये मोठ्या सभा झाल्या. वैचारिक वाद झाले आणि चित्रपटाच्या अनुषंगानं महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनामध्ये मोठ्या चर्चा घडल्या. त्यानंतर असा प्रकार महाराष्ट्राच्या सार्वजनिक आणि सांस्कृतिक जीवनात कधी घडला नाही.

जुन्या चित्रपटांचा उल्लेख करत असताना दादा कोंडक्यांच्या सिनेमाचा उल्लेख करणं आवश्यक आहे. चित्रपट समीक्षकांनी दादांच्या सिनेमावर कडाडून टीका करायची आणि पे्रक्षकांनी दादांच्या सिनेमांचं भरभरून कौतुक करायचं हा पायंडा त्या काळात पडलेला होता. अर्थकारणाच्या भाषेत बोलायचं तर बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक हिट चित्रपट देणारा निर्माता म्हणून दादा कोंडके यांचा आणि त्यांच्या सिनेमांचा उल्लेख करणं आवश्यक आहे. दादा कोंडक्यांच्या सिनेमांचं आणखी एक वैशिट्य म्हणजे ग्रामीण जीवनाशी एकरूप झालेले दादांचे चित्रपट आजही प्रेक्षकांना खळखळून हसायला लावतात. दादांचे द्विअर्थाचे विनोद, नायकाचा भाबडेपणा आणि अत्यंत साध्या पार्श्वभूमीवरच्या कथा घेवून लोकांची केलेली करमणूक आजही चकित करते. दादांच्या चित्रपटांचं लोकांनी नेहमीच मनापासून स्वागत केलं. ज्या चित्रपटांनी मोठं अर्थकारण साधलं पण त्याहीपेक्षा मराठी माणसांना खळखळून हसायला शिकवलं. दादांच्या चित्रपटातील राजकीय विनोदामुळं कधी वादळ निर्माण झाली नाहीत. राजकीय वाद निर्माण झाले नाहीत आणि हिंसाही निर्माण झाली नाही. तोपर्यंत राजकीय संघटना आणि मराठी माणसंही आपल्यावरील टीका पचवून घेण्याच्या बाबतीत सहिष्णू होते असं म्हणायला हरकत नाही.
मात्र दादा कोेंडके यांच्यानंतर मराठी चित्रपट सृष्टीमध्ये आलेला मराठी चित्रपट हा अत्यंत दुय्यम दर्जाचा आहे. सचिन पिळगावकर या कलाकाराचेे विनोदी म्हणून आलेले पोरकट सिनेमे, लक्ष्मीकांत बेर्डे ते मकरंद अनासपुरे यांच्यासारख्या अभिनेत्यांचा पोरकट अभिनय असलेले विनोदी चित्रपट या सिनेमांना विनोदी सिनेमे म्हणणे सुद्धा फार अवघड आहे. याच काळातल्या सिनेमांनी मराठी चित्रपटसृष्टीची रया घालवली. हिंदी, इंग्रजी कथा वस्तुवरून स्वत: कथन बेतून कामचलाऊ चित्रपट निर्मिती करणार्‍या महेश कोठारे नावाच्या निर्मात्याने मराठी सिनेमांची वाताहत केली. या काळातला मराठी सिनेमा हा कुठल्याही अर्थाने कंटाळवाणा होता.

६० ते ८० च्या दशकात निर्माण झालेल्या मराठी सिनेमातली अनेक गाणी रसिकांच्या ओठावर खेळत होती. ८० नंतर मराठी युवकांना सिनेमातली गाणी म्हणावीत अशी गाणी मराठी चित्रपटाने दिली नाहीत.‘सम बडी लव्हज यू, सम बडी मिस यू, एव्हरी सिंगल नाईट’कडे मराठी युवक वळण्यात महत्त्वाचं कारण म्हणजे मराठी सिनेमांनी चांगली गाणी गेल्या ३० वर्षात दिली आहेत असं आपल्याला म्हणता येणार नाही. दरवर्षी २५ ते ४० चांगली गाणी सिनेमांमधून यावीत असा प्रकार मराठी सिनेमांच्या बाबतीत गेल्या ४० वर्षात झालेला नाही. मराठी गाण्यांचे कार्यक्रम पाहिले तर ते आजही ५० ते ७० च्या दशकामधली गाणी म्हणत असतात. ते कार्यक्रम सादर करणार्‍या कलाकारांची कीव येते.

मराठीमध्ये चांगलं लेखन करणारे अनेक कथाकार होऊन गेले. मराठीमध्ये अनेक सशक्त कथा आहेत. मराठीमध्ये अनेक चरित्र नायकांची आयुष्य अत्यंत समृद्ध आहेत. महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनात असंख्य वादळं झाली. मात्र मराठी चित्रपट निर्मिती करणार्‍यांना यातल्या कशाशीच घेणंदेणं नाही. मुंबईतले बॉम्बस्फोट, अतिरेकी कारवायांमुळं हादरलेली महाराष्ट्राची जीवनशैली, आधुनिकीकरणाच्या वेगाने बदलेले आयुष्य, संगणक कंपन्यांमुळं आलेली समृद्धी आणि त्यातून जीवनाला मिळालेला प्रचंड वेग. जगभर पसरलेला मराठी माणूस, शेतकर्‍यांचे प्रश्न आणि त्यातून निर्माण झालेल्या असंख्य समस्या यापैकी कुठल्या प्रश्नावर मराठी चित्रपटांनी प्रकाश टाकलेला आहे? यापैकी कोणते प्रश्न मराठी चित्रपटांनी हाताळले, यापैकी कुठल्या प्रश्नांना आणि विषयांना मराठी चित्रपटांनी हात घातला या प्रश्नांची उत्तरं एकतर चित्रपट निर्मिती करणार्‍या निर्मात्यांकडून आणि दिग्दर्शकांकडून मागितली जाणं आवश्यक आहे.

साहित्य आणि कला हा समाजाचा आरसा असतो. समाजाची प्रतिबिंब ही साहित्यात प्रतिबिंबित व्हावी लागतात. महाराष्ट्राच्या समाजमनाच्या कोणत्या प्रतिमा गेल्या ४० वर्षातल्या मराठी सिनेमांनी रूपेरी पडद्यावर आणल्या हे शोधायचा प्रयत्न केला तर उत्तर अत्यंत निराशाजनक आहे. रणजित देसाई, वि. स. खांडेकर या जुन्या पिढीतील सशक्त कादंबरीकारांच्या अनेक कादंबर्‍या हा चित्रपटाचा विषय आहे. मात्र त्याकडे मराठी चित्रपट निर्मात्यांनी फारसं लक्ष दिलं नाही. मराठी चित्रपटाची प्रगती न होण्याचे सगळ्यात महत्त्वाचे कारण म्हणजे सशक्त कथावस्तु न घेता केलेली चित्रपट निर्मिती. सशक्त कथावस्तु या साहित्यातून नाट्यसृष्टीला आणि चित्रपटसृष्टीला मिळाव्या लागतात. अशा सशक्त कथावस्तु देणारे अनेक चांगले लेखक मराठीमध्ये असताना त्यांचा वापर मराठी चित्रपट सृष्टीला करून घेता आला नाही हे सत्य नाकारण्यात अर्थ नाही.
हिंदी चित्रपटांची निर्मिती मुंबईत होते. तमिळ चित्रपटांची निर्मिती आणि दाक्षिणात्य चित्रपटांची निर्मिती मद्रासमध्ये होते. पूर्वी कोल्हापूर हे कलानगरी म्हणून ओळखलं जायचं. कोल्हापूरमध्ये चित्रपटांचे चित्रीकरण करणारे स्टुडिओ होते, ते गेले. पुण्यातला ‘प्रभात’ गेला. मराठी चित्रपटांना हक्काची जागा राहिली नाही. अर्थकारण येत नाही असं म्हणणार्‍या अनेकांनी चित्रपट निर्मितीचे स्टुडिओ मात्र कोल्हापूर आणि पुणे या महाराष्ट्रीयन संस्कृती, मराठी संस्कृती अभिमानाने बाळगणार्‍या गावांमध्ये टिकू दिल्या नाहीत. निर्मितीसाठी हक्काचं ठिकाण नाही. चांगल्या कथावस्तु असताना त्यांच्याकडे पाहण्याची द़ृष्टी नाही. रंगभूमिवर काम करणारे अनेक ताकतीचे अभिनेते असूनही त्यांचा वापर करण्याची क्षमता नाही अशा बिनडोक लोकांच्या हातात निर्मिती गेली. मराठी सिनेमाची निर्मिती करणं हे काही फारसं अभिमानाचं लक्षण मानलं जात नाही. मराठी चित्रपट निर्माता हे अभिमानानं मिरवण्याची बिरूदावली नव्हे. सिनेमाच्या अर्थकारणासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणार्‍या कार्यकर्त्यांची, सिनेमाचं अर्थकारण सांभाळण्यासाठी धडपडणार्‍या कार्यकर्त्यांची कोणतीही यंत्रणा महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर दिसत नाही. प्रादेशिक तमिळ सिनेमांचा वर्ल्ड प्रिमिअर होतो. मराठी सिनेमाच्या बाबतीत ते होत नाही. महाराष्ट्राच्या बाहेर अनेक शहरांमध्ये मराठी माणूस प्रमाणाच्या बाहेर एकवटलेला आहे. इंदौर म्हणजे मध्य प्रदेश, बडोदा म्हणजे गुजरात या शहरांमध्ये मराठी माणसांची संख्या काही लाखांच्या घरात आहे. या शहरांमध्ये मराठी सिनेमा रिलीज करण्याकरता कोणते प्रयत्न केले जातात? जिथं जिथं मराठी माणूस आहे तिथपर्यंत मराठी सिनेमा पोहचविण्यासाठी कोणत्या प्रकारचे प्रयत्न केले जातात? या प्रश्नांना सामोरं जावं लागेल. ग्रामीण भागामध्ये जत्रेच्यावेळी खुल्या मैदानावर पडदा लावून चित्रपट पाहणार्‍या रसिकांसाठी चित्रपटगृह उभारली जाणं आणि तिथपर्यंत प्रेक्षकांना चित्रपट खेचून घेतील असं सातत्यानं निर्माण करणं या बाबतीत गेल्या ४० वर्षातील मराठी चित्रपटसृष्टी आणि त्यात काम करणारी मंडळी अपयशी ठरली आहेत असं म्हणायला हरकत नाही. मराठी चित्रपटातलं वातावरण, चित्रपटसृष्टीतील एकंदर स्वरूप यामुळं चांगली माणसं चित्रपटसृष्टीत फार काळ टिकली नाहीत. पु. ल. देशपांडे हे त्याचं उत्तम उदाहरण. पु. ल. देशपांडे, ग. दि. माडगूळकर, व्यकंटेश माडगूळकर यासारख्या प्रतिभासंपन्न व्यक्तिंनी मराठी चित्रपटसृष्टीला समृद्ध करण्याचं काम ८० च्या दशकापूर्वी केलं पण ८० च्या दशकानंतर असा प्रयत्न करणारं कुणीच दिसत नाही.

त्यामुळं मराठी निर्मात्याकडून १०० कोटींपेक्षा जास्त धंदा करणारा एखादा सिनेमा निघेल अशी शक्यता आज दिसत नाही. भारतभर मराठी सिनेमा हा प्रदर्शित होईल अशासाठी प्रयत्न करणारी कार्यकर्त्यांची आणि संघटकांची एखादी फळी उभी राहणं हे तूर्तास शक्य दिसत नाही. तंत्र आणि छायाचित्रण म्हणजे सिनेमा नव्हे हे मराठी निर्मात्यांना समजावून सांगणे आवश्यक आहे. मराठी प्रेक्षकांनी आपण काहीतरी चांगलं आणि वेगळं पाहतो आहोत अशी जाणीव करून देणारे सिनेमे गेले कित्येक वर्षात आले नाहीत हे मान्य करायला हवं. त्यामुळे मराठी सिनेमांचं अर्थकारण हे सुधारण्याची शक्यता नाही. मल्टीप्लेक्स चित्रपटगृहात मराठी सिनेमे दाखविण्यासाठी काही पावलं उचलली तर शोभाताई डे यांच्या सारख्या मराठी कुटुंबातून आलेल्या लेखिकेचा जळफळाट व्हावा यातच मराठी चित्रपटांचं दुर्दैव आहे. मराठी चित्रपटाच्या निर्मितीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करणारं शासन एका बाजूला आणि दुसर्‍या बाजूला दर्जेदार चित्रपट देवू न शकणारी मराठी चित्रपटांशी संबंधित असणारी सर्व मंडळी एका बाजूला असं हे विषम स्वरूप आहे. मराठी चित्रपटांच्या निर्मितीसाठी शासनानं कोणतीही गोष्ट ठेवलेली नाही पण निर्मिती ही गोष्ट कोणाच्या मदतीवर, कोणाच्या सहकार्यावर आणि अनुदानावर अवलंबून असत नाही. निर्मिती करणार्‍याच्या प्रतिभेचा आवाका हा सर्वात महत्त्वाचा असतो. त्या ताकतीची मंडळी नसतील तर त्यांना कितीही अनुदानं दिली तरी त्या दर्जाची निर्मिती होण्याची शक्यता नसते.

गेली १० वर्ष आम्ही थिएटरमध्ये जावून मराठी सिनेमा पाहिला नाही असं म्हणणारी मंडळी भेटतात. ते सांगत असताना त्यांना अभिमान वाटत असतो की अशा दर्जाचा मराठी सिनेमा गेल्या दहा-वीस वर्षात आलाच नाही याबद्दल खंत वाटत असते ते सांगणंही अवघड आहे. बी ग्रेड मराठी सिनेमांची निर्मिती नाही. मराठी प्रेक्षकांसारखा रसिक प्रेक्षक जगात कुठेही नाही. जगात सर्वाधिक बोलल्या जाणार्‍या पहिल्या पंधरा भाषांमध्ये मराठीचा समावेश होतो. तरीही मराठी चित्रपटांची अवस्था ही अशी निराशाजनक आहे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनात आपल्या प्रतिभेनं जनसामान्यांना विस्मयचकित करणार्‍या अनेकांना चित्रपटसृष्टीत काहीतरी करून दाखविण्याची महत्त्वाकांक्षा होती असं १९७० च्या पूर्वीच्या कालखंडातलं चित्र होतं. साहित्याच्या क्षेत्रात काम करणारे अत्रे, पु. ल. देशपांडे यांना चित्रपटसृष्टीचं आकर्षण वाटलं हे त्याचंच उदाहरण आहे. नंतरच्या काळात ही परिस्थिती राहिली नाही. सकस चित्रपटांची निर्मिती करण्यासाठी केवळ मराठी चित्रपटांचीच निर्मिती होवू शकेल अशाप्रकारचा एखादा स्टुडिओ असणं आवश्यक होतं. पुणे किंवा कोल्हापूर इथली चित्रनगरी टिकणं गरजेचं होतं मात्र यापैकी काहीच झालं नाही आणि मराठी प्रेक्षकांनी गेली ३ दशकं मराठी सिनेमाकडे मोठ्या प्रमाणात पाठ फिरवलेली आहे. हे चित्र बदलणं हे फार मोठं आव्हान आहे. ते तसं सोपं नाही. निर्मितीच्या पद्धती बदलल्या, जीवनाचे मार्ग बदललेत आणि गुणवत्तेचे निकषही बदललेत. अशा परिस्थितीत मराठी प्रेक्षकांना चित्रपटांकडे खेचून आणणं हे फार मोठं आव्हान आहे. ते आव्हान पार पाडेल, ते आव्हान पेलू शकेल अशी ताकत आजच्या घडीला मराठी चित्रपटसृष्टीत दिसत नाही. सुमार वकुबाची माणसं गेली अनेक वर्षे मराठी चित्रपटसृष्टीत जागा अडवून बसलेली आहेत. ते मराठी चित्रपटसृष्टीच्या अपयशाच सगळ्यात मोठं कारण आहे. बालकलाकार म्हणून चित्रपटसृष्टीत पदार्पण केलेला सचिन पिळगावकर हा अभिनेता अजूनही त्या भूमिकेतून बाहेर पडलेला नाही हे त्याच्या अनेक चित्रपटांमधून स्पष्टपणाने दिसून येते. ग्लॅमरस वाटाव्यात अशा नायिका गेल्या २० वर्षात मराठी चित्रपटसृष्टीत दिसत नाहीत. सई ताम्हणकर नावाची एक अभिनेत्री ही ग्लॅमरस वाटण्यापेक्षा ‘महिला मल्ल’ वाटते आणि ती आजच्या चित्रपटातील आघाडीची नायिका आहे यातच सर्व काही आलं. भरत जाधव आणि मकरंद अनासपूरे या दोघांचे विनोदी म्हणून पडद्यावर येणारे चित्रपट इतके कंटाळवाणे आहेत की त्या चित्रपटांमधल्या विनोदाला हसण्याऐवजी सिनेमाचं कसं हसं झालं या जाणीवेनं मराठी माणूस चिंतीत होतो. शासनाने सर्व काही देवूनही या अभागी मंडळींना मराठी चित्रपटाचा अश्वमेध पुढं नेता आला नाही. मराठी चित्रपटसृष्टी अशा विचित्र द्वंंद्वात सापडलेली आहे की त्यातून तिला बाहेर काढायचं असेल तर सकस दर्जेदार आणि गुणवत्ताप्रधान निर्मिती करणं हे फार मोठं आव्हान आहे. हे आव्हान पेलणं वाटतं तेवढं सोपं नाही.

अनेक हॉलिवूडच्या सिनेमात हॉलिवूड निर्माते हे एकापेक्षा अधिक चांगल्या चित्रपटांची निर्मिती करतात. १५, २० घरात चित्रपट निर्माण करणारे हे चांगल्या गुणवत्तेची निर्मिती करतात आणि तरीही त्यांची भूक संपलेली नाही हे दिसून येतं. एक दोन सिनेमांची निर्मिती करून चित्रपट निर्माते म्हणून मिरवणारे रामदास फुटाणे आणि विजय कोंडके यांसारखी मंडळी ही त्या चित्रपटसृष्टीत नाहीत. ‘माहेरची साडी’ नावाच्या एका सिनेमाच्या निर्मितीनंतर कोणत्याही प्रकारची नवी निर्मिती न करता यशस्वी चित्रपट निर्माता होणार्‍या मंडळींच्या हातात चित्रपट महामंडळाचं भविष्य आहे. देवानंद या हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकारानं अनेक चित्रपटांची निर्मिती केली. शेवटच्या काळातील त्यांची प्रत्येक निर्मिती ही बॉक्स ऑफिसवर अयशस्वी ठरली. मात्र देवानंद यांनी स्वत:ची निर्मिती थांबविली नाही. देवानंद यांना एका मित्रानं सांगण्याचा प्रयत्न केला की ‘बाबा रे, तुझे चित्रपट अयशस्वी होतायंत. तू थांंबावंस हे बरं. तुझं आर्थिक नुकसान किती होतंय त्याचा तरी विचार कर.’ त्याला देवानंदने दिलेले उत्तर सर्वात महत्त्वाचं आहे. देवानंदने सांगितलं होतं, ‘पठाणकोट येथून येताना एक सायकल आणि दोनशे रुपये घेवून आलेलो होतो. जे मिळालेले आहे ते इथंच मिळालेले आहे. इथंच सगळं गेलं तरी चालेल.’ अशी जीवननिष्ठा असल्याशिवाय आणि अशी धडपड असल्याशिवाय चांगली निर्मिती होत नाही. अशी धडपड, असं झोकून देणं, असं सर्वस्व पणाला लावणं हे मराठी चित्रपटसृष्टीत दुर्दैवानं दिसत नाही. ‘हाऊसफुल’ हा चित्रपटसृष्टीतला महत्त्वाचा शब्द हा एका मराठी माणसानं दिला. तो कसा निर्माण झाला याच्याबद्दलचा आचार्य अत्रेंनी लिहिलेला त्यांच्या आत्मचरित्रातला इतिहास वाचण्यासारखा आहे. चांगले मराठी सिनेमे हा भूतकाळ होता. चित्रपटांची निर्मिती करण्यासाठी केवळ अर्थकारण असून उपयोग नाही. काहीतरी चांगलं, वेगळं करण्याची जिद्द अंगात असणं आवश्यक आहे. केवळ अनुदान मिळविण्याकरता आणि शासकीय स्कीमचा फायदा घेण्याकरता निर्मिती करणारी अनेक मंडळी दिसतात. त्यांची निर्मिती ही त्याच दर्जाची राहते. महानगरांच्या बाहेर जावून स्थिरावलेला आणि जगभर पसरलेला मराठी माणूस हा चांगल्या मराठी चित्रपटांची वाट पाहतो आहे. चांगल्याचं स्वागत करणं, तोंड फाटेपर्यंत कौतुक करणं ही मराठी माणसाची खासियत आहे. मात्र त्या गुणवत्तेचं आणि दर्जेदार असं त्याला काहीतरी मिळणं आवश्यक आहे. शासनाने योजना करून आणि शासकीय मदत देवून चांगली निर्मिती होत नाही. हे मराठी चित्रपटांबद्दलच्या महाराष्ट्र शासनाच्या धोरणांमधून स्पष्ट झालेलं आहे. इतर भाषेतील रसिकांनी मराठी चित्रपट पाहावा असं वाटावं अशाप्रकारच्या निर्मितीची आवश्यकता आहे. मराठी चित्रपट भव्यदिव्य असावेत, एखाद्या मराठी चित्रपटानं 500 कोटीचा धंदा केला यासारखी बातमी इंग्रजी वृत्तपत्रामध्ये झळकावी, भारतीय वृत्तपत्रांनी त्याची दखल घ्यावी ही इच्छा मराठी रसिकांची आहे. आपल्या प्रेमविषयक भावना व्यक्त करताना मराठी माणसाला हिंदी आणि इंग्रजी या भाषांचा आधार घ्यावा लागतो, हा नाकर्तेपणा मराठी चित्रपटसृष्टीचा आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. रंगभूमीवरून येणारे कलाकार चित्रपटसृष्टी समृद्ध करतात. सिडने शेल्डन हा एकाचवेळी रंगभूमीवर नाटकं आणि सिनेमांसाठी पटकथा लिहित होता. असा प्रकार मराठीत दिसत नाही.

शांतारामबापूंनी सामाजिक मराठी सिनेमा एका वेगळ्या उंचीवर नेला. भालजी पेंढारकरांनी ऐतिहासिक मराठी सिनेमाचं एक नवं दालन प्रेक्षकांसमोर उभं केलं. आचार्य अत्रेंनी विनोदी सिनेमांना एक वेगळी उंची प्राप्त करून दिली. चांगल्या साहित्यकृतीतून चांगली निर्मिती कशी करावी याचा आदर्श आचार्य अत्रेंनी ‘श्यामची आई’ या कलाकृतीतून घालून दिला. दादा कोंडके यांनी लोकांना खळखळून हसवणारी सिनेमांची निर्मिती केली. या परंपरा आज पुढं जाताना दिसतात का? या परंपरा कुठं, केव्हा आणि कशा खंडित झाल्या? सामाजिक चित्रपटांची लाट, कौटुंबिक सिनेमांची लाट, तमाशापटांची लाट, विनोदी सिनेमांची लाट अशा लाटा मराठी सिनेमांत सातत्याने आल्या. हे सगळं अचानक का थांबलं? मराठी सिनेमांवर वृत्तपत्रात दर आठवड्याला परीक्षणं यायची; कारण त्याला वाचक वर्ग होता. आता ही परीक्षणंच येत नाहीत याचं कारण संपलेला वाचक वर्ग आणि पे्रक्षकांनी फिरवलेली पाठ हेच आहे का?

मराठी चित्रपटाच्या अर्थकारणाचा विचार करत असताना सिनेमाच्या बजेटचाही विचार होणं गरजेेचं आहे. मराठी सिनेमाचं बजेट किती असतं या प्रश्नाचं उत्तर फारसं अवघड नाही. हिंदी, इंग्रजी, तमिळ सिनेमांच्या मानाने बहुतांश मराठी सिनेमे हे लो बजेट असतात. एखादा १०० कोटी रुपये खर्च करून एखादा अतिभव्य सिनेमा एखाद्या निर्मात्याने मराठीत तयार केला आहे का? करण्याची कल्पना तरी कुणाच्या मनात आलेली आहे का?

बालपट, भयपट, लहान मुलांसाठी चित्रपट, मराठीतील अ‍ॅनिमेशन चित्रपट, अ‍ॅनिमेशन आणि प्रत्यक्ष कलाकार यांच्या संयोगातून केले गेलेले चित्रपट की जे काही वॉल डिज्नीने केलेले आहेत असे चित्रपट, असे काही प्रयोग मराठीत झालेले आहेत का? प्रयोगशिलतेच्या बाबतीत मराठी सिनेमा हा किती लवचिक राहिला आहे या प्रश्नाचं उत्तर शोधावं लागेलं. मराठी सिनेमात वेगळे प्रयोग केले ते विश्राम बेडेकरांनी, शांताराम बापूंनी, प्रभातनं, नंतरच्या काळात अत्रे, पु. ल. या मंडळींनी. मात्र प्रयोगशिलता ही मराठी चित्रपटाचा प्राण कधीच राहिली नाही.

मराठीतल्या प्रसिद्ध आणि अति गाजलेल्या नाटकांवरून चित्रपट केलेत, एखाद्या घडलेल्या भव्य घटनेवर आधारित एखाद्या चित्रपटाची निर्मिती झाली असं फारसं जाणवत नाही. गो. नी. दांडेकर आणि श्री. ना. पेंडसे हे मराठीतील दिग्गज कादंबरीकार. या कादंबरीकरांचं वैशिष्ट्य असं की त्यांच्या कादंबर्‍यातले प्रसंग हे एखाद्या चित्रासारखे पुढे येतात. या दोघांच्याही सर्व कादंबर्‍या हा चित्रपटाचा विषय व्हाव्यात इतक्या बोलक्या आहेत. वेगळी पटकथाही तयार करायला नको अशी ताकत या दोघांच्या कादंबर्‍यांमध्ये आहे. बरं, हे सिनेमेही लो बजेट होवू शकतील. ‘पडघवली’ नावाची दांडेकरांची एक नितांत सुंदर कादंबरी आहे. कोकणच्या पार्श्वभूमीवर लिहिलेल्या अशा कलाकृतींकडं निर्मात्यांचं, दिग्दर्शकांचं लक्ष गेलंच नाही का? ‘तुंबाडचे खोत’ ही आजच्या भाषेत दोन ते तीन सिक्वेल तयार होतील एवढा मोठा आवाका असलेली कादंबरी आहे. चांगल्या कलाकृतींकडे निर्मात्यांनी आणि दिग्दर्शकांनी केलेल्या दुर्लक्षामुळं कथावस्तु सशक्त राहिलेली नाही आणि त्यामुळं प्रेक्षकांनी मराठी चित्रपटांकडं पाठ फिरवली असा प्रकार घडला का?

उपलब्ध इन्फ्रास्ट्रक्चरचा, उपलब्ध साधन सामग्रीचा वापर करून जास्तीत जास्त विकास सामान्य माणसांपर्यंत पोहचविणे हे उद्योजकाचं आणि राजकारण्यांचं काम आहे असं म्हणतात. मराठी चित्रपट निर्मितीसाठी उपलब्ध असलेली साधनसामग्री काय होती? चांगले लेखक होते, चांगले कवी होते, चांगले गायक होते, चांगले संगीतकार होते पण या सर्वांना एकत्र आणून चांगली कलाकृती करण्याची कल्पना असलेले निर्माते, चांगल्या कलाकृती निर्माण करण्यासाठी क्षमता असणारे दिग्दर्शक त्या मानाने कमी झाले का आणि यावर काय उपाय योजायला हवेत? हे ठरवायला पाहिजे. एक गोष्ट नक्की झाली की शासकीय अनुदानातून चांगल्या कलाकृती तयार होत नाहीत. शासनाने कितीही मदत केली तरीही त्या मदतीतून वास्तू उभ्या राहू शकतात, त्या मदतीतून एखादी साहित्यकृती किंवा एखादी कलाकृती उभी राहू शकत नाही. सशक्त, समर्थ आणि चांगली कलाकृती उभी करायची असेल तर त्यासाठी कलावंतानं त्या कलेत प्राण ओतणं आवश्यक आहे. चित्रपट हे समूहाचं माध्यम आहे. एका छोट्या समूहाने मोठ्या समूहासाठी तयार केलेली कलाकृती.

मराठीमध्ये प्रायोगिक रंगभूमी हा प्रकार सातत्याने रंगभूमीवर राहिलेला आहे. तसा प्रायोगिक सिनेमा हा काही वेगळा प्रकार मराठी चित्रपटांच्या बाबतीत कधी दिसला का? प्रायोगिक सिनेमा निर्माण करण्याचा कुणी प्रयत्न केला का? मराठी चित्रपट महोत्सव म्हणून महाराष्ट्राच्या बाहेरील मराठी माणसांसाठी दरवर्षी चित्रपट महोत्सव सादर करण्याची कल्पना कुणाच्या मनात आली का? मराठी चित्रपट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचावा यासाठी काही उपक्रम राबविणार्‍या संस्था महाराष्ट्रामध्ये आहेत का? आणि हे कोणी नसेल तर काय करावं लागेल याचा विचार करणं गरजेेचं आहे.
ग्लॅमरस हा शब्द वापरावा अशा किती मराठी अभिनेत्री गेल्या १०० वर्षात आल्या? मास्टर विनायक आणि अत्रेंच्या सिनेमांमध्ये ’यमुनाजळी खेळु कन्हैया का लाजता’ हे गाणं म्हणणार्‍या मिनाक्षी अत्यंत ग्लॅमरस वाटायच्या असं त्या काळातले लोक सांगायचे. असं ग्लॅमर कोणत्या अभिनेत्रीला नंतरच्या काळात मिळालं? लक्षात राहण्यासारखे तगडे नायक आणि खलनायक मराठी चित्रपटसृष्टीत किती वेळा दिसले? पुरेशी साधनसामग्री उपलब्ध असतानाही त्याचा उपयोग केला गेला नाही. त्यामुळं मराठी सिनेमा तितका समर्थ झाला नाही.
सिनेमानं स्वप्नरंजन करणारा सिनेमा हाही ८० दशकामध्ये हिंदी चित्रपटसृष्टीला तारून गेला. स्वप्नरंजन पडद्यावर अतिभव्य पाहण्याची इच्छा आणि स्वत:च्या वैयक्तिक आयुष्यात जे करता येत नाही ते करणार्‍या महानायकाची प्रतिमा पडद्यावर पाहण्याची स्वप्नं हिंदी चित्रपटात प्रतिबिंबित झालेली दिसतात. यापैकी मराठी चित्रपटात काही दिसतं का? फारसं काही दिसत नाही.

हिंदीमध्ये, इंग्रजीमध्ये अनेक प्रीतीकथा असलेले चित्रपट आले आणि सुपरहिट झाले. मराठीमध्ये निखळ प्रेमकथा म्हणून किती चित्रपट आले? अनेक मराठी कथाकारांनी, कादंबरीकारांनी आणि नाटककारांनी सुंदर प्रीतीकथा लिहिल्या. ना. सं. इनामदारांची ‘राऊ’ ही कादंबरी मराठीतली एकाचवेळी अत्यंत देखणी ऐतिहासिक कलाकृती आहे आणि दुसर्‍यावेळी ती एक सुंदर प्रीतीकथा आहे. या प्रीतीकथेवर एखादा सिनेमा निर्माण करावा असं या माध्यमातल्या लोकांना न वाटणं हे या माध्यमाचं सर्वात मोठं अपयश आहे.

चित्रपट या माध्यमाची ताकत, चित्रपट या माध्यमाचं सामर्थ्य आणि या माध्यामाच्या मर्यादा माहिती असणारी किती जाणकार मंडळी मराठी चित्रपटसृष्टीत काम करतात? या प्रश्नाचं उत्तर शोधणं गरजेचं आहे. प्रत्येकाचं आपल्या मातृभाषेवर प्रेम आहे. आपल्या मातृभाषेत जेव्हा काही मिळत नाही तेव्हा माणूस ते दुसर्‍या भाषेत शोधायला जातो. चांगली गाणी, चांगले सिनेमे हे मराठी चित्रपटांकडून नवीन पिढीला न मिळाल्यामुळं गेली अनेक वर्षे मराठी युवक आणि मराठी युवापिढी ही हिंदी आणि इंग्रजीकडे आकर्षित झाली पण तो दोष निर्मिती करणार्‍यांचा आहे; पे्रक्षकांचा आणि युवापिढीचा नाही! भाषेचा आणि संस्कृतीचा नाही! जगातील सर्वात समर्थ, कदाचित सर्वश्रेष्ठ भाषा म्हणून मराठीचा उल्लेख करणं आवश्यक आहे.

पूर्वी मराठी सिनेमा हा कौटुंबिक जिव्हाळ्याचा मराठी चित्रपट आणि विनोदी चित्रपट अशा दोन भागात विभागलेला असायचा. कौटुंबिक जिव्हाळ्याचा मराठी सिनेमा म्हटलं की, महिला वर्ग त्या सिनेमांना गर्दी करायचा आणि घरातूनच रडायच्या तयारीने यायचा. आशा काळे आणि अलका कुबल या दोन अभिनेत्री अशा सिनेमातल्या गाजलेल्या अभिनेत्री होत्या, परंतु या सिनेमांचाही नंतर अतिरेक झाला. अलका कुबल आणि आशा काळे या अभिनेत्री पडद्यावर आल्या की लोक रडायला सुरवात करायचे. तरीही या कौटुंबिक जिव्हाळ्याच्या मराठी सिनेमांनी बाळ कोल्हटकरांच्या ‘वाहतो ही दुर्वांची जुडी’ या नाटकाशी बरोबरी करील किंवा या नाटकाच्या जवळपास जाईल अशाप्रकारची कोणतीही कलाकृती मराठी रसिकांना दिली नाही.

चित्रपट निर्माते जाहिरात करायचे की हा विनोदी सिनेमा आहे. ‘धमाल विनोदी मराठी चित्रपट’ असे त्या चित्रपटाच्या जाहिरातीतच लिहिलेलं असायचं. त्यावरून लोकं ओळखायचे की हा सिनेमा विनोदी आहे. आपल्याला हा सिनेमा बघायला जायचंय ते हसण्यासाठी जायचंय! परंतु त्या सिनेमातला पोरकट अभिनय, त्या सिनेमातले बाष्कळ विनोद आणि अभिरूचीहिन कथानक यामुळे असले अनेक चित्रपट प्रेक्षकांनी नाकारले. महेश कोठारे नावाचा निर्माता व दिग्दर्शक हा तर कोणत्या सिनेमावरून उचलेगिरी करतो हे कळत नसे एवढी त्याची दयनीय अवस्था होती. अशा विनोदी चित्रपटांनी, प्रेक्षकांनी हसणं तर दूर राहिल परंतु प्रेक्षकांना मराठी चित्रपटगृहापासून पाठ फिरवायला अशाप्रकारचे चित्रपट जास्त कारणीभूत ठरले.

शेवटी शेवटी या दोन्ही प्रकारच्या सिनेमांचा इतका अतिरेक झाला की, कौटुंबिक जिव्हाळ्याच्या मराठी सिनेमाला जावून लोक रडण्याऐवजी हसायला लागले आणि विनोदी चित्रपटांमधल्या विनोदाचं हसं होवून लोकांवर रडण्याची वेळ आली. या दोन्ही चित्रपटांचा पे्रक्षकवर्ग संपल्यानंतर मराठी चित्रपटांना हक्काचा प्रेक्षकवर्ग शिल्लक राहिला नाही.
‘मराठी चित्रपटसृष्टीची वाटचाल’ असा एखादा लेख लिहायचा म्हटलं तर त्या लेखाचं शीर्षक द्यावं लागेल ‘मराठी चित्रपटाची वाटचाल भव्यतेपासून ते दळभद्रीपणाकडे.’ अत्यंत भव्य आणि समृद्ध परंपरा ही मराठी चित्रपटांना मिळाली पण ती परंपरा मराठी चित्रपट सृष्टीला गेल्या काही वर्षात पुढं नेता आली नाही. मराठी चित्रपटांना प्रेक्षक देता आला नाही. चांगल्या आणि सकस कथा मराठी रसिकांसमोर पोहचवता आल्या नाहीत.

चित्रपट हे कलेचं सर्वात प्रभावी माध्यम आहे. या माध्यमाने समाजरंजन आणि समाजप्रबोधन या दोन्ही गोष्टी कराव्यात अशी अपेक्षा आहे. समाजरंजन करणारे आणि समाजप्रबोधन करणारे किती चित्रपट या काळात निर्माण झाले याचा हिशोब करावा लागेल. महेश मांजरेकर नावाचा एक दिग्दर्शक आस्ट्रेलियात आणि भारताच्या बाहेर अनेक ठिकाणी मराठी चित्रपटाच्या पुरस्कार वितरणाच्या सोहळ्याचे व्यवस्थापन करण्यात सध्या गुंतलेला आहे. ‘काकस्पर्श’सारखा चांगला चित्रपट करण्याची क्षमता ज्याच्याकडे आहे त्या निर्मितीक्षम दिग्दर्शकाने निर्मिती करण्याचा उद्योग सोडून व्यवस्थापनाचा उद्योग करीत बसणं ही चित्रपट सृष्टीसाठी चिंताजनक गोष्ट आहे. ज्याच्याकडे चांगली निर्मितीची क्षमता आहे त्याने निर्मितीकडेच लक्ष दिलं पाहिजे परंतु निर्मितीक्षम प्रतिभा वाया जावू द्यायची आणि तत्सम उद्योगामध्ये आपलं मन रमवायचं असले प्रकार मराठी चित्रपटसृष्टीत चाललेले आपल्याला नेहमीच बघायला मिळतात.

हॉलीवूडमध्ये गाजलेल्या नाटकांवरून चित्रपट निर्मिती करण्याची एक पद्धत होती. मराठीत असे चित्रपट कधी झाले नाहीत. आचार्य अत्रेंनी स्वत:च्या गाजलेल्या नाटकांवरून चित्रपट निर्मिती केली. अत्रेंच्या ‘मोरूची मावशी’ या नाटकावरून बर्‍याच जणांनी वेगवेगळ्या प्रकारची चित्रपट निर्मिती केली. मराठीमध्ये अनेक गाजलेली ऐतिहासिक नाटकं होती. ‘राजसंन्यास’ हे राम गणेश गडकरींचे, औंधकरांचं ‘बेबंदशाही’ आणि प्राध्यापक वसंत कानेटकरांचे ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ या ऐतिहासिक नाटकांवर मराठी माणसांनी आत्यंतिक प्रेम केलं. या गाजलेल्या ऐतिहासिक नाटकांवरून, गाजलेल्या सामाजिक नाटकांवरून चित्रपट निर्मिती करावी असं कुठल्या निर्मात्याला किंवा दिग्दर्शकाला वाटले नाही. हे विषय त्यांच्या मनाला कधी खुणावलेच गेले नाहीत. प्राध्यापक कानेटकरांनी काही चरित्रप्रधान नाट्यकृती लिहिल्या. ‘वादळ माणसाळतंय’, ‘विषुववृक्षाची फळं’ या नाटकांमधून प्राध्यापक कानेटकरांनी इतिहासाचार्य राजवाडे, बाबा आमटे या महापुरूषांची चरित्र रंगभूमिवर आणली. तो प्रकार चित्रपट सृष्टीत करावा असं कुणाला आवर्जून वाटलं नाही. चरित्र नायकांची समृद्ध जीवनं खुणावत असताना, डोकावत असताना त्याकडं ढुंकूनही न बघता धमाल विनोदी आणि कौटुंबिक सिनेमे निर्माण करण्यात मराठी चित्रपट निर्माते गुंतलेले होते. बॉक्स ऑफिसचं म्हणजेच तिकिट खिडकीचं समीकरण डोळ्यासमोर ठेऊन त्यांनी चित्रपट निर्मिती केली म्हणावी तर बॉक्स ऑफिसवरही हे सिनेमे अपयशी ठरले. या सिनेमांना बॉक्स ऑफिवर कसल्याही स्वरूपाचं यश मिळालं नाही. महाराष्ट्राबाहेर मराठी चित्रपट दाखविण्याकरता सक्षम चित्रपटगृह उभी राहिली नाहीत.

हिंदी आणि इंग्रजी सिनेमांमध्येही चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात आणि अभिनयाच्या क्षेत्रात अनेक घराणी प्रस्थापित झालेली दिसतात. मराठीत अशी प्रस्थापित झालेली घराणी फारशी दिसत नाहीत. वडिलांना अभूतपूर्व यश मिळालं. त्यांच्या मुलांनी आणि मुलींनी पुन्हा चित्रपट सृष्टीत प्रवेश केला आणि त्यांनी वडिलांपेक्षा चांगलं यश मिळवून दाखवलं अशाप्रकारची उदाहरणं मराठी चित्रपट सृष्टीत फारशी दिसत नाहीत. याचे कारण निर्मात्यांनी आणि दिग्दर्शकांनी शोधणं आवश्यक आहे.
मराठी चित्रपट हा सर्वांगानी बहरला नाही. मराठी चित्रपटाच्या कक्षा मर्यादित राहिल्या. मराठी चित्रपटाची वाढ खुरटलेली राहिली. अशावेळी प्रेक्षकांना दोष देण्यात अर्थ नाही. प्रेक्षक हा चांगल्याचं कौतुक करायला सदैव तयार आहे. चांगल्या गोष्टींवर मनापासून प्रेम करणारी जगाच्या इतिहासात मराठी माणसांइतकी दिलदार माणसं दुसरीकडे कुठं नाहीत हा सर्वांचा अनुभव आहे. असं असताना मराठी माणूस मराठी चित्रपटांकडे इतकं दुर्लक्ष करीत असेल तर आपल्या निर्मितीमध्ये काहीतरी चुकतंय याचं भान निर्मिती करणार्‍यांनी ठेवणं आवश्यक आहे आणि स्वत:त बदल करणं गरजेचं आहे.

राष्ट्रीय चित्रपट निर्मितीची आणि अभिनयाची राष्ट्रीय पारितोषिक मिळविणारे काही मराठी कलाकार मध्यंतरीच्या काळात झाले पण त्यांना पारितोषिकं मिळाली ती मात्र हिंदी चित्रपटांसाठी. सयाजी शिंदे नावाचा मराठी कलाकार चित्रपट सृष्टीत आला खरा पण त्याच्या अभिनयाचा, त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा, त्याच्या आवाजाचा वापर दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीनं मोठ्या प्रमाणात केला. मराठी चित्रपट सृष्टीला हे जमलं नाही. हा सगळा कशाचा परिपाक आहे हे शोधणं गरजेचं आहे.
मराठी सिनेमांकडे गांभीर्याने बघितले पाहिजे. मराठी सिनेमा सुधारला पाहिजे. मराठी सिनेमाची वाढ सर्वांगीण झाली पाहिजे. मराठी सिनेमा जगाच्या कानाकोपर्‍यात पोहचला पाहिजे असे व्हिजन समोर ठेवून काम करणारे या मराठी चित्रपट सृष्टीत कुणी दिसत नाहीत. चित्रपट सृष्टीसाठी आवश्यक असणार्‍या गोष्टी करणार्‍या कोणत्याही यंत्रणा मराठी चित्रपट सृष्टीसाठी उपलब्ध नाहीत. हैद्राबादला रामोजी फिल्म सिटी उभी राहते. अशी फिल्म सिटी एखाद्या मराठमोळ्या परिसरात का उभी राहिली नाही? याबद्दल शासनाला दोष देण्यात अर्थ नाही. हे काम निर्मिती करणार्‍यांचं आहे. हे काम त्या क्षेत्रातून नाव आणि पैसा कमविणार्‍यांचं आहे. त्यांनी या प्रश्नांची उत्तरं स्वत:च शोधणं आवश्यक आहे.
‘श्वास’सारखा एखादा चित्रपट हा या सर्व पार्श्वभूमीवर अपवाद म्हणून स्वीकारायला हरकत नाही, परंतु गेल्या २५ ते ३० वर्षातली बहुतांश मराठी चित्रपट निर्मिती ही फारसी सक्षम राहिलेली नाही. चित्रपटाची वाटचाल ही भव्यतेकडून अतिभव्यतेकडं व्हावी ही मराठी रसिकांची अपेक्षा आहे. त्या द़ृष्टिने मराठी चित्रपट समृद्ध होणं गरजेचं आहे.

कित्येक मराठी चित्रपट तर अशा दर्जाचे आहेत की ते चित्रपट मध्यंतरापर्यंतही पहायला प्रेक्षक मिळत नाही. १५ ते २० प्रेक्षक चित्रपटगृहात हजर आहेत आणि मराठी चित्रपट चालू आहे, अशी द़ृष्य अनेक ठिकाणी बघायला मिळतात. कित्येकदा गुन्हेगारांना सक्त मजुरी, दंडाच्या शिक्षा देण्यापेक्षा त्यांना मराठी चित्रपट पाहायला लावले तर ती जास्त कडक शिक्षा होईल असं वाटतं. भ्रष्टाचार करणार्‍या राजकारण्यांना आणि सनदी अधिकार्‍यांना शिक्षा म्हणून दर महिन्यात पाच दहा चित्रपट बघायला लावले तर भ्रष्टाचार पूर्ण संपून जाईल इतका मराठी चित्रपटांचा दर्जा खालावलेला आहे. गुणवत्ता राहिलेली नाही. या सार्‍यात बदल करण्याची इच्छा असणारा नव्या पिढीतील एखादा कलाकार, एखादा निर्माता, एखादा दिग्दर्शक जर पेटून उठला तर काहीतरी होवू शकेल अन्यथा या परिस्थितीत फारसा बदल होईल असं सद्यस्थितीत वाटत नाही.

– उमेश सणस

७३८५९९८१४७

मासिक ‘साहित्य चपराक’ दिवाळी विशेषांक २०१५

‘चपराक प्रकाशन’च्या वाचनीय आणि दर्जेदार पुस्तकासाठी आणि ‘चपराक’चे सभासद होण्यासाठी संपर्क – ७०५७२९२०९२

चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email - Chaprak Email ID

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

हे ही अवश्य वाचा