मॅनहटन मिस्ट्री – गूढकथा

रात्रीचे आठ वाजले होते. तरीही लख्ख सूर्यप्रकाश होता. मॅनहटन सिटी आनंदाने न्हाली होती. शुक्रवार संध्याकाळ असल्याने लोकांच्या उत्साहाला उधाण आले होते. नाचत, गात मंडळी हिंडत होती. काही तरुण उघड्या जीपमधून वेगाने आवाज करीत जात होते. आरशासारख्या स्वच्छ रस्त्यावर काही परदेशी पर्यटक चक्क पाठीवर झोपून उंच इमारतींचे फोटो काढत होते. निऑन साईनचे बोर्ड इमारतींच्या तीस-चाळीसाव्या मजल्यावरूनही स्पष्ट दिसत होते. अनेक मोठे रंगीत टीव्हीच इमारतींवर लागलेले होते. थोड्याच वेळात सूर्यास्त झाला. विजेच्या दिव्यांचा लखलखाट सुरु झाला. सगळ्या जगातले लाईट्स जणू ह्या एकाच सिटीत लागले होते. अनेक हॉटेल्सनी रस्त्यावरच खुर्च्या मांडल्या होत्या. लोक त्यावर बसून, भल्या मोठ्या   ग्लासातून बिअरचा स्वाद घेत होते. काहीजण रंगीबेरंगी कॉकटेल्सचे मोठमोठे मग्ज तोंडाला लावत होते. कोणाचेही कुणाकडे लक्ष नव्हते. सगळेजण आपापल्या आनंदात दंग होते. रस्त्याच्या मध्यभागी असणार्‍या गुलाबी ताटव्यामध्ये उभे राहून काही प्रेमीयुगुलं प्रेमात अखंड बुडालेली होती. मधूनच काही युवक मोटर बाईकवरून गाणी गात जात होते. न्यूयॉर्क शहरदर्शनच्या लाल रंगाच्या उघड्या टपाच्या बसेस संथ वेगाने जात होत्या. त्यांचे चालक कम गाईड असणार्‍या स्त्रिया गोड आवाजात विनोद करीत प्रत्येक ठिकाणची माहिती सांगत होत्या. हवे तिथे लोक उतरत होते. आसपासची दृश्यं बघत होते. पुन्हा दुसर्‍या बसमध्ये बसून जात होते. ही सिटी झोपतच नाही, म्हणजे इथे येणारा प्रत्येकजण इतका अखंड बघत असतो की तो झोप विसरूनच जातो. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी असणार्‍या गगनचुंबी इमारतींमुळे रस्त्यावर सूर्यप्रकाश येतच नसे. सुखद गार वार्‍याच्या झुळकीने हिंडणारे पुन्हा पुन्हा ताजेतवाने होत होते. रंगीबेरंगी कपड्यांची जत्राच भरली होती. वेगवेगळ्या तर्‍हेचे लोक हिंडत होते. काळे, गोरे, हडकुळे, अवाढव्य शरीराची मुले आणि तरुण मंडळी आपल्याच नादात हिंडत होती. अनेक वृद्ध लोक ट्रायसिकलवर मजेत हातात कॉफीचे ग्लास घेऊन फिरत होते. खरंतर मॅनहटन शहराचे ते रोजचेच दृश्य होते. श्रीमंती ओसंडून वाहत होती. 

वेस्ट एंड ऍव्हेन्यूमधल्या एका मॉलच्या पायरीवर बसून सॅम्युएल ते दृश्य पाहत होता. सगळे जग आनंदाने बागडत असताना तो मात्र विमनस्क अवस्थेत बसला होता. त्याच्या स्वप्नांचा चुराडा झाला होता. मानसिक विश्‍वच उद्ध्वस्त झाले होते. अनेकदा वाटायचे एम्पायर स्टेट बिल्डिंगच्या शहाऐंशीव्या मजल्यावरून उडी टाकून जीव द्यावा पण काचेच्या भिंतीआडून खाली पाहिलं तरी चक्कर यायची… एलिनाची समजूत कशी काढावी त्याला समजत नव्हते. आईवडिलांना ती पसंत नव्हती. ‘एलिना एक्स्ट्रा ऍम्बिशिअस आहे, तू खूप गरीब स्वभावाचा आहेस. तिच्याशी  लग्न करू नकोस. एकतर ती मेक्सिकन आहे, खूप वेगळ्या वातावरणात वाढलेली आहे!’ असं ते सांगत.
पण तो ऐकायलाच तयार नव्हता. तिच्या प्रेमात आकंठ बुडाला होता. लग्न झाल्यानंतर वर्षभरातच ती त्याच्याशी वाद करू लागली. ती त्याला कायर, घाबरट म्हणू लागली. ‘‘तुझ्या अंगात डेअरिंगच नाही. आयुष्यात  तुझ्याच्याने  काहीही घडणार नाही, तू कायम मॉलमध्ये काम करणारा सामान्य कामगारच राहणार’’ म्हणून ती त्याला हिणवायची. एका मॉलमध्ये काम करणार्‍या इसमाचा पगार तो कितीसा असणार? आता तर ती घटस्फोटाची भाषा करायला लागली होती. घटस्फोट दिला तर रहायचे कुठे हा प्रश्‍न त्याच्यासमोर होता कारण ह्या घराचे भाडे ती भरत होती. तरी बरे, बर्‍याचशा वस्तू त्याने फ्री बोर्ड असणार्‍या रस्त्याच्या कडेला लोकांनी ठेवलेल्या अशाच आणल्या होत्या. डायनिंग टेबल, सोफासेट त्याला मिळून गेला होता. गुडविल स्टोअरमध्ये वापरलेले कपडेही स्वस्त मिळत पण तिला ते कपडे आवडत नसत. त्याचा बँक बॅलन्सही फारसा नव्हता. दिवसभर काम करून संध्याकाळ तो बाहेरच काढत असे. कित्येक दिवसात नवे कपडे पण घेतले नव्हते. त्याला आईवडिलांकडे पण जाता येत नव्हते. या वयात आईवडिलांचा आधार घेणे अमेरिकन संस्कृतीत बसत नाही. एलिना मात्र छानछोकीत राहत होती. कायम नातेवाईक, मित्र घरी येत असत. सगळा पगार ती वेगळा ठेवत असे. त्याविषयी तो काहीच विचारू शकत नसे. कवीमनाच्या सॅम्युएलची  सगळी स्वप्नं भंगली होती. सगळं जग या शहरात मजा करण्यासाठी येतं आणि आपण मात्र आत्महत्येचा विचार करीत इथे बसलो आहोत. रोजच संध्याकाळी तो असा कुठेतरी येऊन बसतो. खूप रात्र झाली की घरी जातो. एलिना बडबड करीत असे. कित्येकवेळा तो काही न खातापिता झोपून जाई. ती साधी चौकशी पण करीत नसे. तिच्या अशा वागण्यामुळे तो आणखीनच गरिबासारखा दिसायला लागला होता.

अमानवी विनवणी

जसजशी रात्र व्हायला लागली तसतशी गर्दी वाढायला लागली. तो उठला. चालू लागला. आजूबाजूच्या हॉटेल्समधून खमंग वास येत होते. फारशी गर्दी नसलेल्या एका केएफसीमधून त्याने चिकन नट्स खरेदी केले आणि खात खात तो निघाला. जाता-जाता एका दुकानाच्या भव्य आरशात त्याला त्याचं प्रतिबिंब दिसलं आणि तो चरकला. काय अवस्था झाली आहे आपली! कपडे धड नाहीत. बूट तर तळाला फाटलेले आहेत. वरुन दिसत नाहीत एवढेच. काही दिवस असे राहिलो तर जाणारे-येणारे एखादा डॉलरसुद्धा टाकतील… स्वतःचीच कीव आली त्याला. खरंतर एलिना दुर्लक्ष करीत होती म्हणूनच त्याची अशी अवस्था झाली होती. तिच्याशिवाय जीवन फोल वाटत होेते. साधं स्वप्न होतं त्याचं. दोघांनी मजेत रहावं. हिंडावं, फिरावं, स्वतःचं छोटंसं घर असावं, टू सीटर कार असावी, लहानशी बोट घेऊन एखाद्या लॉंग विकेंडला लांब कुठेतरी समुद्र किनार्‍यावर जावं, टेंट बांधून तिथेच दोन दिवस रहावं, मुलांशी खेळावं… पण मुलाचं नावं काढलं की एलिना तुफान संतापायची. ‘अगोदर  तू मोठा होऊन दाखव, स्मार्ट हो, मग बघू’ म्हणायची. जगावेगळी बाई होती ती. घरी जावंसच वाटत नाही. घरी गेलं की गोंधळ चाललेला असतो. मित्रमैत्रिणी गोळा झालेल्या असतात. त्यांचं हसणं, खिदळणं आणि वाईन घेणं चालू असतं. त्याच्या येण्याची दखलही कोणी घेत नसे. त्याला खिजवण्यासाठी ती तिच्या श्रीमंत मित्रांना मुद्दाम घरी बोलावत असे.
आजही त्याला घरी जावंसंच वाटत नव्हतं. उद्या पुन्हा सुटी. करायचं काय, खूप मोठा प्रश्‍न पडला होता. तो विचारांच्या नादात चालतच राहिला. खूप लाईट्स असणार्‍या त्या स्ट्रीटवर गर्दी अजिबात नव्हती. एका कोपर्‍यात त्याला तो उंच लोखंडी डोनेशन बॉक्स दिसला. अनेक लोक त्यात नको असणारे कपडे, इतर वस्तू टाकतात. गरजू लोक हवे ते घेऊन जातात. पूर्वी कधी त्याचे लक्ष तिकडे जात नसे पण आज काय वाटले कुणास ठाऊक! तो तिकडे गेला. त्या बॉक्सच्या खाली एक झडप होती. ती उचलली की बर्‍याचश्या वस्तू बाहेर येत. कोणी बघत नाही असे पाहून त्याने ती झडप उचलली. अनेक कपडे बाहेर आले. त्याबरोबर एक बुटाचा जोडही बाहेर आला. सॅम्युएल आश्‍चर्यचकित झाला कारण ते बूट चक्क नवेच दिसत होते. एखाद्या श्रीमंत माणसाने खास बनवून घेतलेले ते बूट होते. त्याच्या बुटापेक्षा दसपट चांगले होते आणि मुख्य म्हणजे त्याच्या पायाच्या मापाचे आणि चांगलेच जड होते. त्याला गंमत वाटली… आताच आपण बुटाविषयीच विचार करीत होतो आणि योगायोगाने आपल्याला आपल्याच मापाचे शूज मिळावेत ह्याचा अर्थ काय? मनोमन तो खूश झाला. त्याने ते बूट घेतले. दोन्ही बूट खूप मोठ्या, जाड लेसने एकमेकांना बांधले होते. कदाचित दोन्ही एकत्र रहावेत म्हणून बांधले असावेत असं त्याला वाटलं. शेजारीच वर्तमानपत्रांचा बॉक्स होता. त्यातून एक वर्तमानपत्र त्याने घेतले. त्यात ते बूट बांधले आणि इकडेतिकडे न पाहता झटक्याने तो निघाला. लहान मुलाला एखादी वस्तू रस्त्यात सापडल्यावर जसा आनंद होतो तसा आनंद त्याला झाला होता. त्या आनंदातच तो निघाला. घरी फ्रायडे नाईट एन्जॉय करणे चालू होते. एलिनाला बकार्डी चांगलीच चढली होती. मित्रांबरोबर गाण्यावर ती डान्स करीत होती. सॅम्युअलने शूज कपाटाखाली डाव्या बाजूला सरकवून ठेवले आणि तो बेडकडे गेला.
बराचवेळ झाला तरी त्याला झोप येईना. सोमवारी ड्युटीवर जाताना नवे बूट घालून जायचे त्याने ठरवले होते. मध्ये झोप लागली तेव्हा झोपेतही त्याला ते बूटच दिसत होते. त्या बुटातून आता आपले फाटके सॉक्स दिसणार नाहीत त्यामुळेही तो खूश झाला. बाहेरच्या पार्टीचा कोलाहल जसा थांबला तसा तो गाढ झोपी गेला.
एकाएकी रात्री अडीच-तीनच्या सुमारास त्याला खाडकन् जाग आली. कुणीतरी हलवून उठवावं तशी. त्याचं लक्ष कपाटाखाली गेलं आणि त्याला दरदरून घाम फुटला. ते बूट चक्क चमकत होते. हिरवा प्रखर प्रकाश बाहेर पडत होता. तो घाबरला. बूट उचलून खिडकीतून फेकून द्यावेत असाही विचार त्याच्या मनात आला पण दारिद्य्र तुम्हाला धीटपणा देतं. एवढ्या नशिबानं एवढे चांगले बूट मिळालेत… कदाचित ते रात्री तसे चमकतच असावेत. लहान मुलांचे शूज जसे रंगीबेरंगी वाजणारे असतात, त्यात हिरवे, लाल दिवेही असतात तसेच हेही असतील असा विचार करून, कूस बदलून, कपाटाकडे पाठ करून सॅम्युएल झोपी गेला. शनिवारी सकाळी तो लवकरच उठला. एलिनाने  त्याच्यासमोर कॉफी आणून आदळली आणि म्हणाली,
‘‘आय ऍम गोइंग टू नायग्रा फॉर टू डेज विथ माय फ्रेंड्स, यू एन्जॉय युअरसेल्फ.’’
बस्स! बाकी काहीच न बोलता ती गेली. थोड्या वेळातच दरवाजा लागल्याचा खाट्कन आवाज आला. दोन दिवस तू काय करशील? तुझ्या जेवणाचं काय? असं काहीही न विचारता ती गेली सुद्धा. किती बदलली एलिना… त्यानं उसासा सोडला. सहज कपाटाखाली पाहिलं. ते बूट जणू आश्‍चर्याने तोंडाचा आ करून पाहतायेत असं त्याला वाटलं. आता ते चमकत नव्हते. तो स्व:तशीच हसला. त्याने निरखून पाहिलं तर बूट कालच्या जागेवरून थोडेसे हलल्यासारखे वाटले. त्याला चांगलं आठवत होतं, त्याने कपाटाच्या डाव्या कोपर्‍यात ठेवले होते, ते आता मध्यभागी दिसत होते! पण त्याने तो विचार झटकला. आपल्याच लक्षात नसेल, आपण विचारांच्या नादात होतो म्हणून त्याने दुर्लक्ष केले. एका दृष्टिने एलिना गेली ते बरं झालं.. दोन दिवस मनासारखं घरात राहता येईल. तो आवरायला लागला. तरीही तिची आठवण त्याला अस्वस्थ करीत  होती. ती कशीही वागली तरी त्याला आवडत होती.
काल बूट बांधून आणलेला पेपर सहज चाळला. त्यात बातमी होती, आज डाऊन टाऊन जवळच्या रस्यावर मुलांना शिस्तीचे नियम तासभर सांगितले तर वीस डॉलर्स मिळणार होते. त्याने आनंदाने उडीच मारली. चला, आजची चिंता मिटली… आवरून तो निघाला. नवीन शूज घालायचा मोह त्याने आवरला. लगेच नको वापरायला काढायला. कुणी ओळखले तर फील होईल आपल्याला. आजपर्यंत इतके किमती शूज घातले नव्हते. कपडे पण तसेच हवेत ना…!
सॅम्युएल मुलांच्या संगतीत वेळेचं भान विसरून गेला. दोन तास झाले तरी तो बोलत होता. मुलांशी खेळत होता. मुलं पण खूश झाली होती. आपली मुलं असती तर आपणही शनिवार-रविवार असाच घालवला असता असं त्याला वाटून गेलं. पोरांचा त्याला चांगलाच लळा लागला.. ‘‘पैसे नाही मिळाले तरी चालतील; मी दर शनिवारी इथे येत जाईल’’ म्हटल्यावरच मुलांनी त्याला सोडलं. कोपर्‍यातल्या रेस्टॉरंटमध्ये जाऊन त्याने ब्लू मून बिअर आणि बरीटो खायला घेतलं आणि मजेत तो घरी आला. दुपारी मस्त ताणून दिली. पडल्यावर मात्र त्याला एलिनाची आठवण तीव्रतेने झाली. तिच्याशिवाय घरही नकोस वाटतं. संध्याकाळी टाईम स्क्वेअरला नुसतं जाऊन बसलं तरी वेळ जातो. माणसे बघत बसायची. सगळेजण आपापल्या नादात झपाझप चालत असतात. परदेशातून अमेरिका पहायला आलेल्या मंडळींचे विस्फारलेले डोळे पाहून त्याला गंमत वाटायची. इंडियन लोक तर लगेच ओळखू येतात. त्यांच्या त्या बायका अंगाभोवती केवढा गोल कपडा गुंडाळून घेतात. मात्र त्यांच्या कपाळावरची लाल टिकली खूप छान दिसते. दुकानाच्या पायरीवर बसून एक-दोघा इंडियनकडे पाहून तो ‘नमस्ते’ देखील म्हणाला. तेव्हा ते आश्‍चर्याने बघू लागले होते. मॉलमध्ये काम करीत असताना अनेक इंडियन लोक येत. त्यांचे काही शब्द त्याने ऐकले होते.
लग्नानंतरचे काही दिवस मजेत गेले होते. भरभरून प्रेम करीत होते दोघे एकमेकांवर. ती त्याला सॅम म्हणायची आणि तो तिला एल… सुरुवातीला ‘गरिबीतही आपण संसार करू’ असं ती म्हणायची. नंतर तिला त्याचा स्वभाव पटेनासा झाला. आता तर दोघातला संवादच बंद झाला होता. त्यामुळे त्याची तडफड वाढली होती. कशातच लक्ष लागत नव्हतं.
बाथरूममध्ये जाऊन शॉवरखाली मनसोक्त आंघोळ केली. थोडं फ्रेश वाटलं. नाईट ड्रेस चढवला. फ्रीज उघडून पाहिला. कालच्या पार्टीसाठी बनवलेले बरेच पदार्थ राहिलेले दिसत होते. त्याने ओव्हनमध्ये गरम करून घेतले. मस्काटो वाईनची बाटली पण बर्‍यापैकी भरलेली दिसत होती. त्याची चैन झाली. टी. व्ही. पाहत त्याने खाल्लं आणि तो बेडरूममध्ये आला. टीव्हीवर कुणा गर्भश्रीमंत माणसाच्या खुनाच्या केसची बातमी चालली होती. ती पाहता पाहता कधी झोप लागली त्याला समजलेच नाही.
एकाएकी रात्री तीनच्या सुमारास त्याला खडबडून जाग आली. त्याने टीव्ही बंद केला. कालपासून हे असं काय होतंय त्याला समजेना. कुणी तरी हलवून उठवावं तसं वाटलं. त्याचं लक्ष कपाटाखाली गेलं आणि पुन्हा तो चक्रावला. बुटातून प्रखर हिरवा प्रकाश येत होता. त्याला भीती वाटायला लागली. उठला, कपाटाकडे गेला. बूट बाहेर काढले आणि त्याला काय मोह झाला त्याने शूज घातले. हिरवा प्रकाश बंद झाला. खूप कम्फर्टेबल वाटलं. एकदम चालावसं वाटलं. त्याने चालून पाहिलं. खूश झाला. अचानक त्याने लॅच की घेतली. दरवाजा ओढून घेतला आणि घराबाहेर पडला. तसाच नाईट ड्रेसवरच. आपण  काय करतोय त्याचं त्यालाच समजेना. रात्री उठून असं चालत जायची सवय नव्हती. काहीतरी वेगळंच घडतंय याची जाणीव त्याला झाली. हे बूट तर आपल्याला चालवत नसतील? हा विचार मनात आला आणि त्याला दरदरून घाम फुटला. अपरात्री अचानक जाग येणं, बुटांचं रात्री हिरव्या रंगानं चमकणं सगळंच विचित्र वाटायला लागलं होतं आणि आता तर त्या बुटांनी त्याला एवढ्या रात्री चक्क घराबाहेर चालायला लावलं होतं. आपण कुठे चाललो आहोत त्याला काहीच समजत नव्हते. त्याने मागे जायचा प्रयत्न केला पण त्याला ते जमत नव्हते. ते बूट त्याला जणू खेचून नेत होते. तो चालतच राहिला. पहाटेचा गार वारा सुरु झाला. पूर्व दिशा फटफटू लागली. जसजसा अंधार नाहीसा होत होता, तसतशी त्याची चाल मंदावत होती. तो स्वतः खरं तर काहीच करत नव्हता. बूटच त्याला थांबवत होते. तो भानावर आला. बर्‍याच लांबवर तो चालत राहिला होता. आता तो परत फिरला आणि घरी निघाला. घरी येताच त्याने ते बूट काढले तेव्हा तो शुद्धीवर आला. आपण कुठेतरी बाहेर जाऊन आलोत हेच त्याला खरे वाटेना. तो बेडवर पडला आणि शांत झोपी गेला. खूप वेळानंतर त्याला जाग आली. बूट तसेच कपाटाखाली होते. रात्री घडलं ते खरं की आपण स्वप्न पाहत होतो हेच त्याला समजेनासे झाले.
संध्याकाळी त्याने व्हिक्टरला फोन केला. अर्ध्या तासात तो वूल्फहाउंड आयरिश व्हिस्कीची बाटली घेऊन आला. व्हिक्टर त्याचा एकमेव फ्रेंड होता. त्याने अनेकवेळा सल्ला दिला होता, ‘‘तू एखाद्या वकिलाचा सल्ला तर घेऊन पहा. नुसती धमकी देऊन पहा. एलिना तशी दुष्ट नाहीये. तू दूर जातोयस म्हटल्यावर तिचं मन बदलेल’’ पण सॅम्युएलची हिंमत होत नव्हती कारण तो तिच्यावर प्रचंड प्रेम करीत होता. ती खरंच सोडून जाईल अशी त्याला भीती वाटायची. व्हिक्टरचा नाईलाज होई. ती घरी असताना त्याच्या कोणत्याही मित्राची घरी यायची हिंमत व्हायची नाही.. ‘‘युवर ऑल फ्रेंड्स आर लाईक यू, लुकिंग ऑलवेज थर्स्टी ऍन्ड हंग्री नो बडी इज बोल्ड’’ असं ती त्याला नेहमी म्हणत असे.
दोन पेग पोटात जाताच गप्पा रंगायला लागल्या.
‘‘व्हिक्टर तुला सांगतो, परवा रात्री…’’
‘‘यार तुझं नेहमीचं रडगाणं नको राव गाऊस! तुझ्याच्याने काहीही होणार नाही. मलाही एलिनासारखंच वाटायला लागलंय आता…’’
‘‘नाही रे! आज तुला वेगळीच गंमत सांगणार आहे’’ म्हणून त्याने ते शूज कसे सापडले, रात्री कसे हिरव्या रंगाने चमकले, अचानक जाग आल्यावर, नकळत घातल्यावर बाहेर कसा पडलो, बूट कसे आपोआप बाहेर घेऊन गेले हे सगळं सांगितलं. व्हिक्टर जाम घाबरला. बुटाकडे पहायचं धैर्यच होईना. तो म्हणाला,
‘‘हे झंझट नको घेऊ गळ्यात. एवढे नवे कोरे शूज कोण कशाला टाकेल? टाकून दे ते बूट परत त्या बॉक्समध्ये.’’
सॅॅम्युएलला चांगलीच चढली होती. तो म्हणाला,
‘‘नाही तरी जिंदगीत काही अर्थ उरलेला नाहीच. मग बघू तर बूट कुठं नेतात मला ते! नाही तरी एलिनाशिवाय माझं जगणं अर्थहीन, दिशाहीनच झालंय…’’
‘‘नको नादी लागू. वाट लावतील ते बूट.’’
‘‘कदाचित वाट दाखवतीलही.’’
‘‘हो दाखवतील ना! एखादेवेळी स्मशानाची!’’ व्हिक्टर बोलून  गेला.
‘‘मग तर बरं होईल यार. इथं कोणाला जगायची इच्छा आहे?’’ मोठ्याने हसत सॅम्युएल म्हणाला.
त्याच्याशी बोलण्यात काही अर्थ नव्हता हे व्हिक्टरच्या लक्षात आले. त्याचं ते हसणंही व्हिक्टरला भेसूर वाटलं. त्यानं तेथून काढता पाय घेतला. रात्र बरीच झाली होती. सॅम्युएल तसाच बेडवर आडवा झाला. क्षणार्धात गाढ झोपी गेला.
रात्री तीन वाजता अचानक त्याला खाडकन् जाग आली. अजूनही त्याची नशा उतरली नव्हती. त्याने कपाटाखाली बुटांकडे पाहिलं. हिरव्या रंगाने ते चमकत होते. तो सरळ उठला, कपाटाकडे गेला. त्याने ते बूट पायात घातले आणि म्हणाला,
‘‘चला दाखवा वाट. व्हिक्टर म्हणाला तशी स्मशानाची दाखवता का? दाखवा! शो मी द रोड ऑफ ग्रेव्हयार्ड…’’ दरवाजा खाडकन् लावून घेत तो घराबाहेर पडला देखील.
तो कुठं चाललाय त्याचं त्याला समजत नव्हतं. तारेत असल्यासारखा चालतच राहिला. रस्त्यामागून रस्ते मागे पडत होते.. चालण्याचा वेग वाढू लागला. तो एका निर्जन वस्तीकडे जाऊ लागला. चालताचालता तो खरोखरच एका ग्रेव्हयार्डकडे आला. एवढं श्रीमंत सिमेट्री तो पहिल्यांदाच पाहत होता. अनेक रंगांची भलीमोठी थडगी गुडघ्यावर बसलेल्या फादरसारखी दिसायला लागली तसा तो भानावर आला. आपण खरंच एका स्मशानभूमीत आलोत. बुटांनी आणले. आपण स्वतःहून आलो, की आपण त्यांना म्हटलं दाखवता का वाट, म्हणून त्यांनी आणलं त्याला समजेना… तो प्रचंड घाबरला. त्याची नशा पूर्ण उतरली… ते बूट त्याला पुढेच नेत होते. एखाद्या विशिष्ट थडग्याच्या दिशेने तो खेचल्यासारखा जाऊ लागला. घामाने पूर्ण डबडबला… एकाएकी प्रचंड सजवलेल्या थडग्यापुढे येऊन तो उभा राहिला. गार वार्‍याचा सपकारा अचानक अंगावर आला. काही दिवसांपूर्वीच निधन झालेल्या व्यक्तीचं ते थडगं असावं आणि ती व्यक्ती अमाप श्रीमंत असावी. एखाद्या महालाच्या प्रवेशद्वारासारखेच दिसत होते ते थडगे. काही क्षण तो थांबला आणि मागे वळून त्याने धूम ठोकली. पळतच तो घराकडे आला. धापा टाकीतच दार उघडलं आणि त्याने पलंगावर अंग टाकलं.
सकाळी उठला तेव्हा तो एकदम फ्रेश होता. त्याचंही आश्‍चर्य वाटलं. त्याला पुन्हा समजेना, रात्री घडलं ते खरं होतं की स्वप्न.. चक्रावून गेला. काहीतरी विचित्र घडल्याची जाणीव त्याला झाली. कसंबसं आवरून तो कामाला निघाला. ते बूट घालायचे धैर्य मात्र त्याला होईना. रात्री उशीरा तो घरी आला तेव्हा एलिना आली होती. ती तिच्याच नादात गाणं गात होती. सॅम्युएल त्याच्या रूममध्ये गेला. तावातावाने एलिना त्याच्या मागे आली.
‘‘शूज कुठून आणलेस?’’
‘‘डोनेशन बॉक्समधून!’’
‘‘आर यू अ बेगर? फेकून दे ते अगोदर.’’
‘‘हात लावशील तर याद राख. डोंट टच दोज शूज…’’
एखाद्या हिंस्त्र श्‍वापदाने गुरगुरावे तसा वेगळाच आवाज सॅम्युएलच्या तोंडून ऐकताच एलिना दचकलीच… त्याचा असा आवाज तिने कधीच ऐकला नव्हता.. त्याचा चेहरासुद्धा भयाण वाटत होता. डोळे हिरवट दिसत होते. घाबरून तिने विचारले,
‘‘सॅम आर यू ऑल राईट? म..मी सहज म्हणाले… मी घेऊन देते..’’
तिचा बदललेला स्वर पाहून त्याला आश्‍चर्याचा धक्काच बसला. तो नेहमीसारखाच बोलला होता. त्याला वेगळं काही जाणवलं नव्हतं. काही वेळाने तर तिने चक्क त्याला खायला आणून दिलं आणि ती त्याच्याकडे पाहत पाहत निघून गेली.
तिच्यात झालेला बदल पाहून त्याने बुटांचे आभार मानले आणि बेडरूममधले दिवे मालवले. बराच वेळ त्याला झोप आली नाही. अचानक तो उठला. बूट घातले आणि बाहेर पडला. एलिना जागीच होती. तिने सॅम्युएलला बाहेर पडताना पाहिले. ती चक्रावली. त्याला अशी सवय कधीच नव्हती. हळूच ती त्याच्या मागे निघाली. त्याचा तो वेग आणि चालण्याची पद्धत पाहून ती घाबरली. प्रकरण काहीतरी वेगळं आहे ह्याची जाणीव तिला झाली. बघताबघता तो कालच्याच स्मशानभूमीकडे आला. त्या विशिष्ट थडग्यापाशी येऊन उभा राहिला. तो सिमेट्रीमध्ये शिरताना पाहताच एलिनाला घाम फुटला. ती मागे वळाली. जवळजवळ धावतच घरी पोहोचली. हातात गळ्यातला क्रॉस घट्ट धरला आणि टेबलवरच्या येशूच्या छोट्या मूर्तीजवळ जाऊन प्रार्थना करू लागली. अंग घामाने थबथबले होते. बराचवेळ तिला काही सुधरतच नव्हते. खूप वेळाने ती भानावर आली आणि ती बेडकडे गेली. तरी बराच वेळ तिला झोप येत नव्हती. डोळ्यासमोर स्मशानात उभा असणारा सॅम्युएलच दिसत होता. सकाळी तिला जेव्हा जाग आली तेव्हा तो त्याच्या बेडरूममध्ये गाढ झोपलेला दिसत होता. इतका की जणू काही घडलेलंच नाही.
ह्या घटनेनंतर घरातलं वातावरण बदललं. तिचं त्याला टोमणे मारणं बंद झालं. ती त्याला वेळच्या वेळी खायला देऊ लागली. आपल्याला काहीतरी व्हावं म्हणून तर तो काही करत नसावा ना असा संशय तिला आला. तो तसा दुष्ट नव्हता हे तिला माहीत होतं. तो काहीतरी जादूटोणा करीत असावा असा तिचा संशय बळावला पण अशा गोष्टीही तो करेल हे तिला पटत नव्हतं. ती त्याच्या रूमकडे येईनाशी झाली. कपाटाखाली बघण्याचे धैर्य तिला होईना. ह्या गोष्टी तिला बाहेरही कुठे बोलता येत नव्हत्या.
सॅम्युएल तर चक्रावूनच गेला होता. काय घडतंय त्याला समजत नव्हतं. रोज रात्री ते बूट चक्क त्याला घेऊन त्या सिमेट्रीकडे जात होते. कुणी तरी बोट धरून घेऊन जावं तशी त्याची पावलं त्या विशिष्ट कबरीपाशी जाऊन थांबत होती. जणू काही त्या थडग्याला त्याला काही तरी सांगायचं होतं. हे सगळं विचित्र होतं. त्याने एकदा ते बूट बाहेर बागेपाशी ठेवले तर रात्री उठून चक्क तो बुटापर्यंत गेला… वेगळ्याच चक्रात तो अडकला होता. त्यातून त्याला बाहेरही पडता येत नव्हते. एलिना म्हणाली होती, ‘‘ते बूट फेकून दे’’ तेव्हा आपण असे कसे फाडकन बोलू शकलो ह्याचेच त्याला नवल वाटत होते. तिच्यासमोर तो आवाज वाढवूच शकत नसे. मग त्या दिवशी एवढी ताकद आली कुठून? प्रकरणानं गंभीर वळण घेतलं होतं. काहीतरी वेगळंच घडत होतं आणि तो ते थांबवू शकत नव्हता.
पुन्हा एका रात्री तो असाच तिथे पोहोचला. अंधार असल्यामुळे सुरवातीला काही दिसले नाही. एकाएकी तो दचकला कारण त्या कबरीपाशी एक स्त्री चक्क फुलांचा गुच्छ ठेवत होती. तो गडबडला. पुढे गेला. तेवढ्यात ती झटक्यात दिसेनाशी झाली. सॅम्युएल अस्वस्थ झाला. नंतरच्या रात्री ती दिसली नाही. आता रोज रात्री ती स्त्री दिसते का ते पहायला तो यायला लागला. कबरीच्या मागे असणार्‍या झुडपांमागे लपून राहू लागला. खूप दिवसानंतर एका रात्री पुन्हा ती आली. गुच्छ ठेवणार एवढ्यात सॅम्युएलने तिला अडवलं. ती दचकली. पळून जाऊ लागली. सॅम्युएल ओरडला,
‘‘वेट, मी भूत नाही, आय एम नॉट एव्हिल स्पिरिट.’’
‘‘क… कोण आहेस तू? इथे कसा आलास?’’ खूप खोल आवाजात ती बोलत होती.
‘‘थांब! तू कोण आहेस मला सांग. इथे बुके घेऊन अशी अपरात्री का येतेस? की तुलाही एखादा बूट इथे घेऊन येतो?’’
‘‘नो नो… लेट मी गो. जाऊ दे मला.’’
‘‘घाबरू नकोस. मी स्वतःच गोंधळलेलो आहे. मला हे शूज सापडले तेव्हापासून रोज रात्री ते मला इथे घेऊन येतात..’’
‘‘माय गॉड! शूज घेऊन येतात?’’ ती मटक्न खालीच बसली…
सॅम्युएलने तिला हात देऊन उठवले. घाबरून तिचे हात थंडगार पडले होते. शरीरातही काही ताकत उरली नव्हती… एकदम उचलल्यासारखी उभी राहिली… ‘‘मला सांग, कोणाचं आहे हे थडगं? मी असा इथे रोज रात्री आपोआप का येतो? काय आहे ह्या बुटांचं रहस्य?’’
अजूनही ती घाबरलेलीच होती. थरथरत म्हणाली… ‘‘मी तुला बरोबर महिन्याने भेटेन. याच ठिकाणी… याच वेळेला… आणि मला जे माहीत आहे ते सांगेन… मला जाऊ दे… पहाट व्हायची वेळ झाली आहे. कुणी पहायची शक्यता आहे. वर्दळ सुरु होईल.’’
‘‘आणि तू परत आलीच नाहीस तर? पळून गेलीस तर?’’
‘‘तुला ते शूज सापडावेत, त्यांनी तुला रोज इथे घेऊन यावं आणि माझीही भेट घडून यावी यामागे संकेत आहेत, असं मला जाणवायला लागलंय… माझ्यावर विश्‍वास ठेव… मी तुला भेटेन म्हणाले ना म्हणजे भेटणार… म्हणजे मला तुला भेटावंच लागेल. मात्र मी सांगितलेल्या वेळी आणि इथेच…’’ विचित्र हसत ती म्हणाली.
तिच्या बोलण्यातला ठामपणा पाहून ती तिचा शब्द पाळेल ह्याची त्याला खात्री पटली. ह्या सगळ्यामागे नक्कीच काहीतरी गूढ आहे याची पण त्याला खात्री पटली. ज्याअर्थी ती रात्रीच बोलावतेय आणि इथेच बोलावतेय त्याअर्थी नक्कीच काहीतरी तिला माहिती आहे. गोष्टी तिच्या कलाने घ्यायच्या त्यानं ठरवलं. या गोष्टीचा छडा लावायचाच!
‘‘ओके. देन वी विल मीट नेक्स्ट मंथ.’’
झटक्यात ती निघून गेली. दिसेनाशी झाली. तो भानावर आला. महिन्यांनी का होईना काही तरी समजेल, ह्या समाधानात सॅम्युएल घरी आला. नेहमीप्रमाणे गाढ झोपी गेला.

ओविली फुले मोकळी

गंमत म्हणजे या घटनेनंतर त्याला मध्यरात्री जागही आली नाही आणि त्या बुटांनी त्याला बाहेरही काढले नाही. मात्र ते बूट घालून इतर कुठे वा मॉलमध्ये जाण्याचं धैर्य काही त्याला होईना. रात्री बूट घातल्यानंतर त्याचा आत्मविश्वास वाढायचा. हे  कशानं  घडतं ते त्याला समजेना.. एलिनाही त्याला घाबरून राहू लागली. त्यामुळे तो खूश होता. न राहवून काही मित्रांना तिने घडलेल्या गोष्टी सांगितल्या तेव्हा तेही घाबरले. रात्री अपरात्री स्मशानात जाणं ही गंमतीने घेण्यासारखी गोष्ट नव्हती. मित्रांनी तिला सबुरीने घेण्याचा सल्ला दिला. त्या बुटांची सर्वांनाच भीती वाटायला  लागली होती. आता सॅम्युएलची पण वाटायला लागली.
महिना कधी संपतोय त्याची सॅम्युएल वाटच पाहत होता. रोज सकाळी उठल्यावर तो कॅलेंडरच्या तारखेवर खूण करीत असे. त्या खुणा बघूनही एलिना घाबरत असे. त्याला दिवस लक्षात ठेवायची गरज पडली नाही. एका रात्री त्याला पुन्हा खाडकन् जाग आली. बरोबर महिना झाला होता. नकळत यांत्रिकपणे त्याने बूट घातले किंवा बुटानेच त्याला तसं करायला भाग पाडलं असावं आणि तो भराभर चालू लागला. कोणीतरी धरून न्यावं तसा तो स्मशानाच्या दिशेने निघाला. त्या थडग्यापाशी येऊन उभा राहिला. ती फुलं वाहतच होती. मागे वळून न पाहताच ती म्हणाली,
‘‘आलास! चल त्या बाकड्यावर बसू.’’ तिच्या छद्मी हसण्याची त्याला भीती वाटली.
दोघेजण अंधारातच कोपर्‍यातल्या लाकडी बेंचवर बसले. दीर्घ श्‍वास घेत ती म्हणाली,
‘‘हे जेकबचं थडगं आहे. मी त्यांच्याकडे काम करीत होते. जवळजवळ पंधरा वर्ष. मी त्यांची देखभाल करायचे.’’
‘‘कोण जेकब? त्याची डेथ कशी झाली?’’ सॅम्युएल अस्वस्थ झाला होता.
‘‘जरा शांत बैस. माझं बोलणं पूर्ण होऊ दे. मग तुझे प्रश्‍नच राहणार नाहीत’’ ती दरडावल्यासारखी म्हणाली तसा तो दचकला कारण आता तिचा स्वर वेगळाच वाटत होता.
‘‘जेकब अतिशय धनाढ्य गृहस्थ होते. त्यांच्या मालकीची अनेक हॉटेल्स न्यूयॉर्क शहरात आहेत. अत्यंत छानछौकीत ते राहत. त्यांचे शूजसुद्धा ते वेगळ्या प्रकारचे खास तयार करून घेत असत. शूजचे एक कपाट पूर्ण भरलेले आहे.. त्यांचे सूटस डिझाईन करणारे टेलर्स वेगळे होते. न्यूयॉर्कमधल्या धनाढ्य व्यक्तींत त्यांचा समावेश होत होता. अमेरिकेतील अनेक परगण्यात त्यांची टॉवर्स आहेत. तुझ्या वर्षाचा पगार त्यांच्या दिवसाच्या सिगारला लागत असेल…’’
‘‘हे तू मला कशासाठी सांगते आहेस? ते शूज मला इथं का घेऊन येतात ते सांग…’’
‘‘जेकबचा खून झालाय.’’
‘‘त्याचा बुटाशी काय संबंध? त्याचे खुनी तुरुंगात शिक्षा भोगत असतील ना?’’
‘‘नाही.. ते मजेत बाहेर हिंडतायत!’’
‘‘म्हणजे?’’
‘‘म्हणजे खून सिद्ध झाला नाही कोर्टात. आत्महत्या ठरवली गेली.’’
‘‘तुला माहीत होतं तर तू का नाही साक्ष दिलीस कोर्टात?’’
‘‘माझं कुणी ऐकलंच नाही. खूप सांगायचा प्रयत्न केला मी.’’
‘‘कुणी मारलं जेकबला..?’’
ती काही बोलणार तेवढ्यात एक डेड बॉडी घेऊन काहीजण दफन करण्यासाठी आले. दोघेही भानावर आले.
‘‘मी जाते… कुणी पाहिलं तर तुझा जीव धोक्यात येईल. जा तू.’’
‘‘अगं पण बुटांचं रहस्य?’’
काही न बोलता ती धावतच गेली. क्षणार्धात दिसेनाशी झाली. अंधाराचा फायदा घेत कुणी बघत नाही असं बघून त्यालाही नाईलाजानं बाहेर पडावं लागलं. कसा तरी तो घरी आला. भयंकर अस्वस्थ झाला होता… बराचवेळ त्याला झोपच आली नाही. डोळ्यासमोर तेच दृश्य दिसत होतं. तिचं दरडावणं आणि तिचं ते विचित्र हसणं… जेकबला कुणी मारलं असेल? कशासाठी आपण त्या स्त्रीला नावही विचारलं नाही…! कुठं राहते काहीच विचारलं नाही… ती रात्री-बेरात्री न घाबरता स्मशानात कशी येऊ शकते? तिला काय रहस्य माहीत असावं! तिने आपल्याला लगेच का नाही सांगितलं? त्याला काहीच सुचेना. कुणी पाहिलं तर तुझा जीव धोक्यात येईल असं ती का म्हणाली असावी? कुणाला चुकवून ती येत असेल का? कुणी आपल्या पाळतीवर असेल का? हजारो प्रश्‍न त्याच्या डोक्यात भुंगा घालू लागले. आपल्या डोक्याचा भुगा होईल अशी भीती त्याला वाटू लागली. दिवसरात्र डोक्यात तेच विचार चालू असायचे. अचानक एका रात्री ती स्त्री त्याच्या स्वप्नात आली आणि म्हणाली,
‘‘संकेत मला समजलेत. तुला जेकबच्या खुन्यांना शोधायचंय, त्यांना पकडून द्यायचंय. म्हणूनच ते बूट तुला सापडलेत. तुला हे करावंच लागेल.’’
एकाएकी थंडी वाजल्यामुळे सॅम्युएल दचकून जागा झाला. ती स्त्री जणू त्याच्या बेडरूममध्ये येऊन सांगत होती असंच त्याला वाटलं. आता तो आणखीनच गडबडला. आपण कसे शोधणार खुन्यांना… आपला काय संबंध… खरंच आपण घ्यायलाच नको होते ते बूट… नसती झंझट मागे लावून घेतली… तो उठला. बूट घालून निघाला. त्याने ठरवलं त्या थडग्यापाशी जाऊन बूट सोडायचे आणि निघून यायचं.. बस… नकोच ती कटकट. तो सिमेट्रीपाशी पोहोचला. पाहतो तो काय! ती स्त्री जणू त्याचीच वाट पाहत होती…
‘‘ये! मला माहीत होतं तू आज येणार. आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. आज मी तुला सगळं सांगणार आहे.’’
‘‘अतिशय धनाढ्य असणार्‍या आणि जगाची पर्वा न करीत राहणार्‍या जेकबचा खून करण्याची कल्पना प्रत्यक्ष त्याच्या मुलानेच, जॉनने आणि त्याच्या मित्राने आखली होती.’’
‘‘प्रत्यक्ष मुलगा? का…? जेकबचं काही लफडं…?’’
‘‘शटअप! मध्येमध्ये मूर्खासारखं बोलू नकोस… अतिशय सज्जन, जंटलमन होते जेकब. पत्नीच्या अचानक जाण्याने कोलमडून गेले होते. खूप प्रेम होतं त्यांचं तिच्यावर. पुन्हा लग्नही नाही केलं. त्यांनी संपत्ती वाटायला सुरवात केली. अनेक संस्थाना दान करायला लागले. हे जॉनला पाहवत नव्हतं. त्याने जेकबना संपवायचे ठरवले. हे मला समजलं त्या दिवशी मी जेकबना सांगितलं होतं. त्यांना अगोदर पटतच नव्हतं. जॉनच्या प्लॅनच्या गप्पा टेप करून मी जेकबना ऐकवल्या. तेव्हा त्यांना आश्‍चर्याचा धक्का बसला. जॉनला माझा संशय आला. त्याने मला प्रथम बाजूला केलं. मी गेल्यानंतर जेकबना परिस्थितीची जाणीव झाली. ते सावध झाले. त्यांनी त्यांच्या एका बुटाच्या तळव्याखालच्या चोर कप्प्यात एक चिठ्ठी लिहिली… त्यावर साक्षीदार म्हणून मी सहीपण केली होती. त्यातच ती टेप ठेवली होती पण त्यांच्या असंख्य बुटांच्या जोडामध्ये हा बूट सापडणे अवघड होते आणि ते सांगणार तरी कसे? मला ते माहीत असल्यामुळे मलाच ते करणं भाग होतं… जेकबसारख्या सज्जनाला न्याय मिळायलाच हवा म्हणूनच मी तडफडत होते… जेकबच तुला इथे आणत होते.. पण ते सगळं सांगू शकत नव्हते… तू त्या रात्री इथे आलास आणि म्हणालास, ‘हे बूट मला इथे घेऊन येतात’ तेव्हाच मला समजलं तेच ते बूट असणार आणि माझं काम झालं… नेमके तेच बूट त्या रात्री जेकबने घातले असणार आणि त्याच बुटांच्या लेसने गळा आवळून जॉनने जेकबना संपवलं. त्यांचे बूट काढून खुर्चीवर ठेवले आणि प्राण गेल्यानंतर जेकबना पंख्याला लटकवले… आणि तातडीने ते बूट डोनेशन बॉक्समध्ये टाकले असणार. ते सापडले तेव्हा बुटांची लेस एकमेकांना जोडलेली होती का? जाड लेस होती का?’’
‘‘हो…’’ सॅम्युएल पुरता गारठला होता. त्याला काहीच समजेना.
‘‘पण हे तुला कसं समजलं? तू का नाही त्यांना वाचवलंस?’’
‘‘जास्त प्रश्‍न विचारू नकोस… फक्त सांगते ते ऐक.. जेकब मला हेच सांगायचा प्रयत्न करीत होते आणि मी तुझी वाट पाहत होते. पुढचं काम तुला करायचं आहे… जेकब… आता माझे काम मी केलं… मी सुटले.’’
‘‘म्हणजे?’’ सॅम्युएलने वळून तिला विचारलं.
तेव्हा तिथं कोणीच नव्हतं. पहाट व्हायची होती. तरीही प्रचंड गार वार्‍याची झुळूक त्याच्या अंगावर आली आणि तो नखशिखांत थरथरला.. दरदरून घाम आला. काय घडलंय ते त्याच्या लक्षात आलं. त्याक्षणी तो सिमेट्रीच्या बाहेर पडला. घरी एलिना  त्याची वाटच पाहत होती. काही तरी वेगळं घडलंय हे तिला त्याच्या चेहर्‍यावरून लक्षात आलं.
‘‘काय झालं सॅम..’’
अनवधानाने तो तिच्या मिठीत शिरला. तिने त्याला जवळ घेतलं. ‘‘घाबरू नकोस’’ ती म्हणाली.
तो सुखावला. खूप दिवसानंतर तिने त्याला सॅम म्हणून हाक मारली होती… दोघांनाही पूर्वीचे दिवस आठवले. तो रिलॅक्स झाला. ‘‘थँक्स’’ म्हणाला.
‘‘थँक्स काय सॅम..! आपण का वेगळे आहोत? काय झालंय ते सांग.’’
एका श्‍वासात त्यानं घडलेलं सगळं सांगितलं.
‘‘एलिना मला हे करायलाच हवं. एक चांगलं काम करायचंय. जेकबला न्याय मिळवून द्यायचाय. त्या स्त्रीनं तिचं काम केलं. आता आपण करायला हवं.’’
‘‘नक्कीच सॅम… आता मला तुझा अभिमान वाटायला लागलाय. तू आपण म्हणालास खूप बरं वाटलं.. आय एम सॉरी, खूप दुखावलं मी तुला… माझं चुकलं.’’
‘‘नाही एल! तू माझ्या प्रेमापोटीच असं वागत होतीस. तू माझ्यातला स्वाभिमान जागा ठेवलास. तू माझ्यासाठी एलिना नाहीस एल आहेस…’’
‘‘एल फॉर लव्ह!’’ ती म्हणाली.  दोघेही हसले.
सॅम्युएलने एक बूट घेतला. त्याच्या तळव्याचा मागचा भाग उघडायचा प्रयत्न केला पण काहीच होईना. एलिनाने त्याला दुसरा बूट दिला. त्यानं तळवा हलवला. एखाद्या ड्रॉवरसारखा तो संपूर्ण तळवाच बाहेर आला. त्याबरोबर एक चिट्ठी त्यातून बाहेर पडली. पेनड्राईव्हसारखी टेपही चिट्ठीसोबत होती. दोघांनी चिट्ठी वाचायला सुरवात केली.
‘‘मी जेकब, शुद्धीवर असताना हे लिहित आहे. माझा अकस्मात मृत्यू झाला तर ती आत्महत्या नसेल कारण मला इतक्यात मरायचे नाही. पत्नीच्या स्मरणार्थ अनेक धार्मिक संस्थांना दान द्यायचे आहे… मात्र माझा खून करण्यासाठी माझा मुलगा जॉन सतत प्रयत्न करीत आहे. तोच माझा मारेकरी असेल. ही चिट्ठी सापडणार्‍याने पोलिसांना द्यावी; तसेच पुरावा म्हणून सोबतच्या टेपवर जॉनचे मित्रांशी झालेले संभाषणही ऐकवावे. ही टेप आणि चिट्ठी घेऊन येणार्‍या व्यक्तीस बक्षीस म्हणून माझ्या बर्कलेमधील हॉटेलची मालकी देण्यात यावी. यावर साक्षीदार म्हणून सोफिया सही करीत आहे…’’
खाली दोघांच्याही सह्या होत्या.
काही क्षण दोघेही सुन्न झाले. एलिनाने त्याला घट्ट मिठी मारली. वेगळ्याच आत्मविश्‍वासाने सॅम्युएलने तिचा हात हातात घेतला आणि दोघंहीजण पोलीस स्टेशनकडे धावले.

– सदानंद भणगे 
अहमदनगर 
९८९०६२५८८० 
(प्रसिद्धी – ‘चपराक दिवाळी अंक २०१८’)

चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email - Chaprak Email ID

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

हे ही अवश्य वाचा