कॅमेर्‍याचे पांग फेडणारा छायादिग्दर्शक – राहुल जनार्दन जाधव

जर तुमच्यापुढे ‘गलेलठ्ठ पगाराची कायमस्वरूपी सरकारी नोकरी’ आणि ‘आवडीच्या पण अनिश्चित क्षेत्रातील सहाय्यक प्रशिक्षणार्थी’ या दोन प्रस्तावांपैकी  एक स्वीकारण्याचा पर्याय असेल तर कोणता निवडाल? विशेषतः तेव्हा, जेव्हा परिस्थितीने तुम्हाला एकेका पैशाचे महत्त्व चटके देऊन समजावले असेल. आपल्यापैकी बहुतांश लोक आधी आर्थिक स्थिरतेचा विचार करतील मग त्यातून वेळ मिळाला तर छंद, हौस, आवड वगैरे! पण त्याने मात्र वयाच्या अवघ्या एकविसाव्या वर्षी एम.पी.एस.सी. पास करून मिळवलेल्या सरकारी नोकरीपुढे छायाचित्रकाराचा सहाय्यक होणे निवडले. 80च्या दशकात असा निर्णय घेणे चौकटीबाहेरचे होते. त्यावेळी छायाचित्रकलेकडे पूर्ण वेळ व्यवसाय म्हणून क्वचितच पाहिले जायचे. तरीही पूर्णवेळ छायाचित्रकार होण्याचा धाडसी निर्णय त्याने घेतला आणि मराठी चित्रपटसृष्टीत तसेच दूरचित्रवाणीत आपले मोलाचे योगदान दिले. हे व्यक्तिमत्त्व म्हणजे सुप्रसिद्ध चित्रपट आणि छाया दिग्दर्शक राहुल जनार्दन जाधव.

 

जन्म 8 मे 1973. मुंबईच्या गिरणी कामगारांच्या संपाच्या झळा सोसलेल्या घरातील तीन भावंडातील सर्वात छोटा सदस्य इतकीच काय ती ओळख. संपाच्या काळात उदर्निर्वाहाकरिता भाजीपाला, फळे, सणासुदीच्या वस्तू इत्यादी जे मिळेल ते विकणे हाच काय तो व्यवसाय आणि चाळीतील मित्रांसोबत अंत्ययात्रेमध्ये  प्रेतामागे लोकांनी टाकलेले  5, 10, 20 पैसे  गोळा करणे हीच काय ती वरकमाई त्याला माहिती. वडील बॉम्बे डायिंगमध्ये कपडे कापण्याचे काम करत आणि कामावरून आल्यावर छंद जपण्यासाठी तसेच अतिरिक्त कमाईसाठी स्थिर छायाचित्रकार (स्टील फोटोग्राफर) म्हणून कामे घेत. राहुलला यातूनच छायाचित्रणाची आवड निर्माण झाली पण पूर्णवेळ त्यात पडण्याचे धाडस मात्र त्याला झाले नाही कारण वडिलांची नोकरी फार काळ टिकली नाही. गिरणी कामगारांच्या संपामुळे घराची आर्थिक घडी विस्कळीत झाली आणि शिक्षण पूर्ण करून नोकरीला लागणे हा एकमेव पर्याय सर्व भावंडांकडे होता. राहुलने बी.ए. नंतर एमपीएससीची परीक्षा दिली. एमए प्रथम वर्ष तसेच बिझनेस मॅनेजमेंट करत असताना एमपीएससीचा निकाल लागला आणि त्याला नागपूरची पोस्टिंग मिळाली. यातच एक संधी अनपेक्षितपणे चालून आली जिने त्याचा नागपूरला जायचा निर्णय बदलला.

राहुलच्या वडिलांना दूरदर्शनच्या ‘श्रीमान श्रीमती’ या मालिकेच्या चित्रीकरणादरम्यान स्थिरचित्रीकरणाचे (स्टील फोटोग्राफीचे) काम मिळाले होते पण त्यावेळी तब्येत बरी नाही म्हणून त्यांनी राहुलला सेटवर पाठवले. तिथे सुप्रसिद्ध छायादिग्दर्शक राकेश सारंग हे कॅमेेरामन म्हणून काम पाहत होते. पहिल्याच खेपेस एखाद्या प्रशिक्षित व अनुभवी छायाचित्रकारासारखे काम करत असलेल्या राहुलला त्यांनी हेरले व शूटनंतर कॅमेरामन राजा सटाणकर (सध्याचे सुप्रसिद्ध छाया दिग्दर्शक/सिनेमॅटोग्राफर) यांचा पाचवा असिस्टंट होण्याचा प्रस्ताव त्याच्यापुढे ठेवला आणि अशाप्रकारे सरकारी नोकरीस हजर राहण्यास काहीच दिवस राहिले असताना राहुलने पूर्णवेळ छायाचित्रकार व्हायचं ठरवलं.  आठ महिने त्याचे काम बघितल्यानंतर सटाणकरांनी राहुलचा अहवाल राकेश सारंगांना दिला आणि मग सारंगांनी त्याला आपला शिष्य म्हणून स्वीकारलं. पाच वर्षे राहुल राकेश सारंग यांच्या हाताखाली निरनिराळ्या कामांच्या माध्यमातून तयार होत होता. छायादिग्दर्शक राजा सटाणकर आणि राकेश सारंग भविष्यातील दिग्दर्शक राहुल जनार्दन जाधव यांना आकार देत होते.

वयाच्या विसाव्या वर्षी घेतलेल्या निर्णयानंतर दिग्दर्शक राहुल जाधव यांनी मागे वळून पाहिलेच नाही. कॅमेर्‍याशी घट्ट मैत्री जमवली. कामात सातत्य ठेवले. सुरुवातीपासूनच त्यांनी  १४ ते १८ तास काम करण्याची आणि सेटवर दिग्दर्शकाच्या आधी येऊन व्यवस्था पाहण्याची शिस्त काटेकोरपणे पाळली. यामुळेच पाचव्या सहाय्यकापासून, चौथ्या मग तिसर्‍या ते कॅमेरामन अशी मजल ते मारत राहिले. या प्रवासात नव्वदच्या दशकातील एकापेक्षा एक मोठ्या बॅनरच्या दमदार मालिका आणि चित्रपटांचा महत्त्वाचा भाग होण्याचे भाग्य त्यांना लाभले पण एक स्वतंत्र छायादिग्दर्शक म्हणून त्यांना पहिली संधी मिळाली ती 2001-02 मध्ये झी टीव्हीवरील गाजलेल्या ‘एक महल हो सपनों का’ या मालिकेत. त्यानंतर झी मराठी वरील ‘श्रीयुत गंगाधर टिपरे’, ‘हसा चकट फू’ सोनीवरील ‘जस्सी जैसी कोई नही’ या मालिका स्वतंत्र छायादिग्दर्शक (इंडिपेन्डन्ट डिरेक्टर ऑफ फोटोग्राफी/सिनेमॅटोग्राफर) म्हणून त्यांच्या कारकिर्दीतील मैलाचे दगड ठरल्या. आजपर्यंत दूरचित्रवाणीवर त्यांनी मराठी, हिंदी मालिका आणि विविध कार्यक्रमांचे ६५०० पेक्षा जास्त भाग चित्रित केले आहेत.

त्यानंतर वेळ होती चित्रपटांची आणि तो दिवस उजाडला जेव्हा केदार शिंदे लिखित आणि दिग्दर्शित ‘अगं बाई अरेच्चा’ या चित्रपटाच्या छायादिग्दर्शनाची जबाबदारी केदार शिंदेंनी राहुल जाधव यांच्यावर  सोपवली. छायादिग्दर्शन हे जितके दिसते तितके सुटसुटीत नाही. त्याकरता प्रकाशयोजना, विविध प्रकारच्या शॉट्ससाठी वापरल्या जाणार्‍या कॅमेर्‍यांच्या विविध लेन्सेस, छायाचित्रणाची विविध उपकरणं यांचा अभ्यास आणि सराव असावा लागतो. बदलत्या ट्रेंडवर नजर ठेवावी लागते. पटकथेनुसार त्यातील भाव पडद्यावर प्रकट व्हावेत यासाठी आधी प्रत्येक दृष्यामधील भाव, पात्र (ते सकारात्मक आहे की नकारात्मक), काळ , वेळ (दिवस आहे की रात्र) इत्यादी गोष्टींना अनुसरून त्या दृश्याची रंगसंगती निवडावी लागते. दृश्याचे स्केच करून घेणे किंवा दिग्दर्शकाने दिलेल्या स्टोरीबोर्डनुसार कॅमेरा अँगल ठरवणे; लेन्स, फिल्टर निवडणे; प्रकाशयोजना ठरवणे हे सर्व या कामाचाच भाग आहे शिवाय वेशभूषाकार, कला दिग्दर्शक, सेट मॅनेजर, तंत्रज्ञ, कलाकार इत्यादीशी समन्वय साधावा लागतो. छायाचित्रण करण्याचे स्थान निश्चित करावे लागते. त्यासाठी चित्रीकरणाआधी कॅमेरा टिमसोबत ‘लोकेशन रेकी’ला जाऊन जागा, चित्रीकरणाची वेळ तसेच प्रकाशयोजनेचे नियोजन करावे लागते. छायादिग्दर्शन ही एक कला आहे. कॅमेरा ट्रिक करून अशक्य गोष्टी शक्य करणे, चित्रीकरणाचा वेळ आणि खर्च वाचवणे हे कौशल्य देखील छायादिग्दर्शकाच्या अंगी असावे लागते.


२००४ मध्ये प्रदर्शित झालेला ‘अगं बाई अरेच्चा’ हा चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीतील अतिशय वेगळ्या धाटणीचा (ट्रेंडसेटर) चित्रपट ठरला. राहुल जाधवांच्या कॅमेर्‍याने यात कमाल केली. चित्रपट बघताना प्रेक्षकांना वाटले की मराठी चित्रपटसृष्टीचा पडदा बदलला आहे. स्वतः राहुल जाधवांसाठी हा चित्रपट सर्वात अविस्मरणीय ठरला. प्रथमच एखाद्या  मराठी चित्रपटाचे बजेट चित्रीकरणाकरता वाढवून मिळाले होते. त्यामुळे त्यांना यात अनेक प्रयोग करता आले. त्याकाळी मराठी चित्रपटांच्या चित्रीकरणासाठी जिमी जिप, स्टेडीकॅमसारखी महागडी उपकरणे क्वचितच वापरली जायची. ती यात वापरली गेली. या चित्रपटाची सर्वच गाणी गाजली मात्र सर्वात मोठे वैशिष्ट्य ठरले ते ‘प्रभातगीत’ ज्यात मराठी चित्रपटाच्या रुपेरी पडद्याचा कृष्णधवल मूकपट ते समकालापर्यंतचा प्रवास अगदी कलात्मकतेने दाखवला होता. यात राहुल जाधवांचं चित्रीकरणकौशल्य पणाला लागलं आणि गाणं ‘हिट’ झालं. या चित्रपटाची आणखी एक खासियत म्हणजे शोले चित्रपटाच्या चित्रीकरणाकरता वापरण्यात आलेल्या कॅमेर्‍याचा यात काही सीन करता वापर करण्यात आला. त्या कॅमेर्‍यावर चित्रित झालेला हा शेवटचा चित्रपट होता.‘अगं बाई अरेच्चा’ चित्रपटासाठी राहुल जाधव यांना ‘उत्कृष्ठ छायादिग्दर्शनाचा’ पुरस्कार मिळाला.

‘अगं बाई अरेच्चा’नंतर राहुल जाधवांचे कौशल्य आजमावले गेले ते २००६ मध्ये आलेल्या केदार शिंदे दिग्दर्शित ‘जत्रा’ चित्रपटामध्ये. ज्यात एकाच वेळी दोन भरत (जाधव) दिसणे इत्यादी दृश्यांसाठी त्यांनी विविध कॅमेरा ट्रिक वापरल्या. त्यांचे काम पाहून सुप्रसिद्ध संगीतकार, दिग्दर्शक अवधूत गुप्ते यांनी त्यांच्या आगामी ‘झेंडा’ या महत्त्वाकांक्षी चित्रपटात त्यांना छाया दिग्दर्शनाची तसेच चित्रपटाच्या सहदिग्दर्शनाची संधी दिली. २०१० मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट आणि त्यातील गाणी तुफान गाजली. हा चित्रपटदेखील मराठीतील वेगळ्या धाटणीचा चित्रपट ठरला. छाया दिग्दर्शनाच्या दृष्टीने या चित्रपटाचे वैशिष्ट्य हे होते की ६०% हा चित्रपट स्टेडी कॅमेर्‍याशिवाय चित्रित झाला आहे ज्यासाठी कॅमेरामनकडे अनुभव आणि संतुलनकौशल्य दोन्ही असावे लागते. २०१३ मध्ये प्रदर्शित झालेला आदित्य सरपोतदार दिग्दर्शित ‘नारबाची वाडी’ हा चित्रपट राहुल जाधव यांनी पहिल्यांदा स्वतःच्या ८७ लाख किमतीच्या ‘अलेक्सा एक्स टी’ या डिजिटल कॅमेर्‍यावर चित्रित केला आणि आपली छायाचित्रीकरणाची जादू परत एकदा रुपेरी पडद्यावर दाखवली. ‘क्लोजअप’ शॉटपासून, मास्टर ते वाईड शॉटसमध्ये कोकणचे अद्भूत दर्शन त्यांनी घडवून आणले शिवाय प्रत्येक दृश्याला साजेशी रंगसंगती, प्रकाशयोजना कथानकाला उठाव देणारी होती. या चित्रपटासाठी देखील राहुल जाधव यांना उत्कृष्ठ छायाचित्रीकरणाचा पुरस्कार मिळाला. त्यानंतर ‘मला आई व्हायचंय’, ‘गोलमाल’, ‘आयडियाची कल्पना’, ‘ढोलकी’, ‘मोरया’, ‘जन्म’, ‘साटं लोटं’, ‘हापूस’, ‘नाना मामा’ अशा पंचवीसहून अधिक गाजलेल्या चित्रपटांचे छायादिग्दर्शन त्यांनी यशस्वीपणे केले.  २०२१ मध्ये चित्रीकरण पूर्ण झालेल्या सई ताम्हणकर आणि ललित प्रभाकर यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘कलरफूल’ या चित्रपटामध्ये कॅमेरा प्रेक्षकांशी संवाद साधणार आहे. यात पात्रांचे संवाद कमी आहेत आणि संपूर्ण चित्रपटात कॅमेरा बोलतो आहे. लवकरच हा चित्रपट प्रदर्शित होईल.

‘विजय असो (२०१३)’ या चिन्मय मांडलेकर लिखित राजकीय डावपेचांवर आधारित चित्रपटाद्वारे राहुल जाधव यांनी चित्रपट दिग्दर्शनात पहिले पाऊल टाकले. त्यानंतर आदित्य कोठारे आणि मृणाल ठाकूर यांची मुख्य भूमिका असलेला ‘हॅलो नंदन’ हा थ्रिलर चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केला. २०१५ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मर्डर मेस्त्री’ या विनोदी चित्रपटासाठी त्यांना उत्कृष्ठ दिग्दर्शक हा पुरस्कार मिळाला. या तिन्ही चित्रपटांमध्ये दिग्दर्शन आणि छाया दोन्हीची जबाबदारी त्यांनी कौशल्यपूर्वक पार पाडली. ‘पाच पैश्यांची अंत्ययात्रा’ हा त्यांचा लघुपट गोवा, कान्स, औरंगाबाद, युवा इंटरनॅशनल, बुलढाणा, केरळ, रवींद्रनाथ टागोर यासारख्या अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांची शान ठरला आणि अनेक मानाची पदके त्याने पटकावली. यासाठी राहुल जाधव यांना सर्वोत्कृष्ठ दिग्दर्शनाचे पदक देखील मिळाले. विशेष बाब म्हणजे ‘पाच पैश्याची अंत्ययात्रा’ या लघुपटाची कथा त्यांची स्वतःची आहे. मुंबईच्या गिरणी कामगारांच्या संपानंतर विस्कळीत झालेल्या जनजीवनाचं प्रतिबिंब यात उमटलं आहे. जे स्वतः पाहिलं, जगलं, सोसलं तेच त्यांनी या लघुपटात मांडलं.

मराठी चित्रपटसृष्टीची शिखरे आणि खाचखळगे दोन्हीचा अनुभव घेतल्यानंतर डिसेंबर २०१९ मध्ये त्यांनी आपल्या महत्त्वाकांक्षी  ‘मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी’ या चित्रपटाची घोषणा केली. गेली अडीच वर्षे या पहिल्या मराठी हॉलिवूड चित्रपटाची जय्यत तयारी सुरू असून मे २०२२ मध्ये याचे चित्रीकरण सुरू होईल.१९ फेब्रुवारी २०२३ ला  चित्रपटगृहात प्रदर्शित होणार्‍या या चित्रपटाची उत्सुकता मराठीसोबत इतर भाषिक चित्रपटसृष्टीतील दिग्गजांना देखील लागली आहे. आजतागायत दिग्दर्शकाच्या म्हणजेच राहुल जाधव यांच्या व्हिजननुसार या चित्रपटाच्या नऊ पटकथा लिहिल्या गेल्या आहेत आणि शेवटी नवव्या पटकथेवर शिक्कामोर्तब झाले आहे. इतक्या बारकाईने त्याचे काम सुरू आहे. सध्या रंगभूषा, वेशभूषा, कला इत्यादी विभागांचे काम सुरू आहे.

मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी नंतर १३ मे २०२२ ला त्यांनी आणखी एका महत्त्वाकांक्षी चित्रपटाची घोषणा केली. स्वराज्याचे दुसरे छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित ‘छावा – द ग्रेट वॉरियर’. कल्पनेतील सुपरहिरोंपेक्षा आपल्या गौरवशाली इतिहासातील खरेखुरे सुपरहिरो राहुल जाधवांना पडद्यावर आणायचे आहेत. आपली ओळख आणि स्वातंत्र्य अशा शूरवीरांच्या त्याग आणि पराक्रमामुळे टिकून आहे. त्यांचे आपल्यावर अनंत उपकार आहेत. त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शिवाय भावी पिढीसमोर चित्रपटसारख्या प्रभावी माध्यमातून चांगले आदर्श उभे करण्यासाठी म्हणून हा प्रयत्न ते करत आहेत.

याशिवाय भविष्यातील इतरही काही महत्त्वाकांक्षी चित्रपटांची नावे ते लवकरच जाहीर करतील.

चित्रीकरणात 32 वर्षांचा समृद्ध अनुभव असलेले राहुल जनार्दन जाधव हा अनुभव इतरांना देऊन कॅमेर्‍याचे पांग फेडण्यास मात्र विसरले नाहीत. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी अठरापेक्षा जास्त छायाचित्रकारांना स्वतंत्र छायादिग्दर्शक होईपर्यंत आपल्या हाताखाली घडवले. ज्यातील अनेकांनी मराठीसोबत हिंदी आणि दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये आपल्या कामाचा ठसा उमटवला. धर्मेंद्र, माधुरी, रीमा लागू, दिलीप प्रभावळकर, श्रीदेवी, अक्षय कुमार, अजय देवगण, आशा भोसले, शिवाजी साटम, सुबोध भावे या आणि अशा अनेक दिग्गज कलाकारांना राहुल जाधव यांनी आपल्या कॅमेर्‍यात कुशलतेने कैद केले. मराठी चित्रपटसृष्टीच्या तीन पिढ्यांचा अनुभव घेतलेले राहुल जाधव मराठी चित्रपटांच्या कला, तंत्रज्ञान आणि निर्मितीमध्ये होत असलेल्या सकारात्मक बदलांचे मनापासून कौतुक करतात पण तिच्या व्यावसायिक वाटचालीवर मात्र खंत व्यक्त करतात. मराठी प्रेक्षक हा नोकरवर्ग आहे त्यामुळे तो फक्त सुट्ट्यांच्या दिवशी चित्रपट पाहतो. ते देखील चित्रपटगृहांमध्ये जाऊन क्वचितच. यामुळे एखाद्या चांगल्या कलाकृतीचे देखील बॉक्स ऑफिस कलेक्शन अपेक्षेपेक्षा अगदीच कमी होते. व्यावसायिकदृष्ट्या आपण खूप मागे आहोत. बदल होत आहे पण जिथे 95% अपेक्षित आहे तिथे अगदीच 5%च्या प्रमाणात. सरकारने चित्रपटांना सबसिडी दिली आहे पण त्यापेक्षा करमणूक कर कमी करणे जास्त अपेक्षित आणि फायद्याचे आहे. निर्माता आणि दिग्दर्शक टिकावा यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. आपल्या राज्यात जिथे  तिकिटे 300 रुपयाला विकली जात आहेत तिथे ती 100 रुपयाला विकली गेली पाहिजेत. प्रेक्षकांमध्ये सिनेमागृहांमध्ये जाऊन चित्रपट पाहण्याची फक्त आवड नाही तर जिद्द निर्माण व्हायला हवी मग कुठे चित्र पालटेल. मराठीचा सुवर्णकाळ सुरू होईल. असे त्यांचे म्हणणे आहे.


छायादिग्दर्शकांच्या पुढच्या पिढीला संदेश देताना त्यांना एका गोष्टीचा आवर्जून उल्लेख करावा वाटतो. कथा हा चित्रपटाचा मूळ गाभा असतो, कथेतील पात्रं, दृश्य ही कॅमेर्‍यातून व्यक्त झाली पाहिजेत, त्यांच्यावर कॅमेरा हावी होता काम नये. जिथे दाखवायचे तिथेच कला आणि कौशल्य दाखवावे. कथेवर कलादिग्दर्शन वरचढ होता कामा नये. पडद्यावर दोन्ही वेगळेे दिसायला लागले की नकळत प्रेक्षकांचे लक्ष्य विभाजित होते आणि चांगले प्रयोगदेखील फसतात. बाकी आता दर तीन महिन्याला तंत्रज्ञान बदलत आहे. नवनवीन उपकरणे येत आहेत. ती वापरायला पण सोपी आहेत. तरीही अभ्यासू वृत्तीने आपल्या कौशल्याला धार देत राहणे ही आपली नैतिक आणि व्यावसायिक जबाबदारी आहे.

म्हणूनच फक्त मालिका, चित्रपट यापुरते मर्यादित न राहता राहुल जाधव यांनी जाहिरात आणि मालिकांचे प्रोमो मेकिंगची कामे सुरु केली आहेत. आजपर्यंत ४३५ पेक्षा जास्त मालिकांचे प्रोमो त्यांनी चित्रित केले आहेत. ज्यात खतरों के खिलाडी, नागीन, बडे अच्छे लगते है, भीमराव आंबेडकर, बिग बॉस यासारख्या प्रसिद्ध मालिकांचा समावेश आहे. याशिवाय त्यांनी बजाज आल्मन्ड ड्रॉप्स, बजाजचे इतर प्रॉडक्टस, चिंतामणी ज्वेलर्स, मुद्रा कंपनी, रिलायन्स इन्फोकॉमसारख्या सुप्रसिद्ध ब्रँडच्या जाहिरातींचं काम केलं आहे.

असा हा छाया आणि चित्रपट दिग्दर्शक राहुल जनार्दन जाधव यांचा चित्रप्रवास फक्त छायाचित्रकारांसाठीच नव्हे तर कुठल्याही क्षेत्रातील काही करून दाखवायची इच्छा असणार्‍यांसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे.

मी सरळ रेषेवर चालत होतो फक्त
पाहीले कधी ना इकडे किंवा तिकडे
पावले मोजणे कधी ना आले ध्यानी
तरी पोचलो तेथे जायचे होते जिकडे

मी वळून पाहता कळले की मी कैक
मैलांचे दगड केले होते पार
तरी अजून आहे जिद्द पुढे जाण्याची
खड्गाला अजुनी करतो आहे धार

खरंच या लेखानिमित्त त्यांच्याशी बोलताना आणि त्यांच्यासोबत काम करताना जाणवले की ते आपल्या कामावर लक्ष केंद्रित करून फक्त पुढे चालत राहिले. स्वतंत्र छायादिग्दर्शक आणि चित्रपट दिग्दर्शक असूनही  त्यांच्यातील प्रशिक्षणार्थी त्यांनी जिवंत ठेवलाय शिवाय त्यांच्यासोबत काम करणार्‍या प्रशिक्षणार्थ्यांना ते स्वतंत्र छायादिग्दर्शक किंवा दिग्दर्शक म्हणूनच वागवतात. चित्रपटसृष्टीतील इतर व्यवसायबंधू जे प्रयत्न करत आहेत त्यांचे ते भरभरून कौतुक करतात, त्यांच्या प्रोमोशनमध्ये मोकळ्या मनाने सहभागी होतात. राहुल जाधव फक्त काम करत राहतात. त्यांच्याकडे अजूनही त्यांनी केलेल्या कामांची पक्की यादी नाही, नोंद नाही पण तरीही मराठी, हिंदी चित्रपटसृष्टी व दूरचित्रवाणीसाठी ‘राहुल जनार्दन जाधव’ या मराठी माणसाने नोंद घेण्यासारखे काम जरूर केले आहे.

– ज्योती घनश्याम पाटील
  ८४३१७५४०२९

दिग्दर्शक राहुल जनार्दन जाधव यांचा चित्रप्रवास www.rahuljanardanjadhav.com या संकेतस्थळावर देखील उपलब्ध आहे.

पूर्वप्रसिद्धी – मासिक ‘साहित्य चपराक’ जून २०२२

मासिकाचे सभासद होण्यासाठी संपर्क ७०५७२९२०९२

चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email - Chaprak Email ID

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

हे ही अवश्य वाचा