भारतीय संगीताचा इतिहास

अग्निमीळे पुरोहितं यज्ञस्य देवं रत्वीजम | होतारं रत्नधातमम ||
अग्निः पूर्वेभिर्र्षिभिरीड्यो नूतनैरुत | स देवानेह वक्षति ||

– ऋग्वेद

संपूर्ण जगात निरपवादपणे आद्य वाङ्मय, म्हणून मानला गेलेला आपल्या भरतभूमीत जन्माला आलेला, ऋग्वेद !
ऋग्वेदातील मंत्र म्हणण्याची, गाण्याची एक पद्धत शास्त्रमान्य आहे. ते मंत्र कसे गावेत, हे सांगीतले आहे, ते सामवेदात ! सृष्टीनिर्माता म्हणून आपण ब्रह्मदेवाला मानले आहे, याचाच आधार घेत, आपण स्वराचे मोठेपण अधोरेखित करतो, ते त्याला ‘नादब्रह्म’ म्हणत, याचे पावित्र्य म्हणूनच निरपवाद आहे. या नादब्रह्माच्या निर्मितीला आपण अजून दुसरी बाजू मानतो, ती म्हणजे भगवान शंकराचे तांडव नृत्य, त्यातून निघालेला ओंकार ! एकंदरीत आपल्या संगीताच्या निर्मितीचा इतिहास किंवा मूळ हे सृष्टीकर्त्या ब्रह्मदेवापाशी आणि सृष्टीसंहारकर्त्या शिवापाशी जाते.

आपल्या भूमीतील संगीताचा इतिहास हा असा प्राचीन आहे, तो थेट मानवाच्या निर्मितीपावेतो पोहोचतो. आपण अगदी
स्वाभाविकपणे विचार केला, तरी संगीताची, संगीताला लागणाऱ्या स्वराची निर्मिती, त्याचे अस्तीत्व हे मानवाच्या
जन्मापासूनच आहे, यांत शंका नाही. मनुष्यप्राण्याने एखादा जीव जन्माला घातला, तर तो जीव जिवंत आहे का नाही, याची खात्री केली जाते, ती त्याच्या जन्मतः फोडलेल्या टाहोतून, त्याच्या रुदनातून ! माणसाचा आणि स्वराचा हा असा,
जिवंतपणाचा संबंध आहे. आपल्या श्वासाचा येणारा आवाज थांबला, की आपली या पृथ्वीतलावरील कामगिरी संपली, हे समजले जाते.

मध्यप्रदेशातील गुहांमध्ये सापडलेल्या, सुमारे ३०,००० वर्षांपूर्वीच्या चितारलेल्या चित्रावरून, तत्कालीन संगीतात आपली संस्कृती ही पुढारलेली होती, हे दिसून येईल. सिंधू नदीच्या काठावरील मोहंजोदारो, हराप्पा येथील उत्खननातून आपल्याला सुमारे ५००० वर्षांपूर्वीच्या भारतातील ‘सिंधू संस्कृतीतील’ प्रगत जीवनाची कल्पना येते. त्यांत सापडलेली नर्तिकेची मूर्ती, ही त्या काळांतदेखील संगीताविषयी आपली संस्कृती किती प्रगत, प्रगल्भ होती हे दाखविते. इ.स.पू. ८०० च्या दरम्यान ‘शतपथ ब्राह्मण’ यांत दोन नटांतील नाट्यप्रसंग चितारलेला आहे. ताल ही कल्पना आपल्याकडे वेदकालीन आहे. स्मृती, वेदकाळानंतरच्या साहित्यकृती म्हणजे वाल्मिकीचे रामायण, यांत अप्सरागान, अप्सरानृत्य यांत रंभा, उर्वशी, मेनका, तिलोत्तमा, तसेच रावणाच्या पत्नी या नृत्यकलेत निपुण असल्याचे उल्लेख आढळतात. गंधर्व हे नृत्यगायन निपुण असल्याचे उल्लेख वारंवार येतात. दशानन रावण हा त्या काळातील संगीततज्ञ मानला गेला होता. संगीतातील तंतुवाद्यांचे, म्हणजे वीणा, तंत्री, विपांची, वल्लाकी वगैरेंचे उल्लेख येतात. सुषीरवाद्यांचे, म्हणजे हवेने ज्यातून नाद काढला जातो, अशा वेणू, शंख, वेणुगणा (बऱ्याच वेणू एकत्र बांधून हे वाद्य तयार केलेले असते) यांचा उल्लेख येतो. रागांची नावे, म्हणजे कौशिक, कौशिक धवनी यांचा उल्लेख येतो. सप्तस्वर, अना, मूर्च्छना, स्वरांचे चढउतार करून मंत्रांचे गायन यांचा उल्लेख येतो. त्रिपरमना म्हणजे आजचा तीनताल, यातील द्रुत, मध्य आणि विलंबित लयीचा देखील विचार केला आहे. रामायणाचे गायन हे प्रभू रामचंद्रांची मुले, लव-कुश यांनी गायले याचा देखील उल्लेख आहे.

संगीत म्हणजे काय, तर नाद आणि शांती, होय. नाद आणि शांती, हे आपल्याला दिसू शकत नाही, आपल्या दृष्टीस पडू शकत
नाही, इतर कोणाला दाखवता येत नाही, तर त्याचा अनुभव फक्त आपल्याला येऊ शकतो. फक्त हा अनुभव देखील
आपल्याला दुसऱ्याला देता येत नाही, हस्तांतर करता येत नाही. थोडक्यात नाद आणि शांती या फक्त आपण अनुभवायच्या
असतात. मात्र संगीतामधील अजून एक भाव आहे, ते म्हणजे नृत्य ! आपल्या शरीराच्या अंगांनी आपण ज्या भावना प्रकट
करतो, त्यासाठी कदाचित स्वर, अथवा शांती याचा वापर केला पण जात नाही. हे नृत्य, म्हणजे आपल्या शरीराच्या
अवयवांचे विक्षेप, हालचाल आपल्याला प्रत्यक्षांत दिसू शकते. त्या विक्षेपातून, हालचालीतून ज्या भावभावना नर्तकाद्वारे
प्रकट केल्या जातात, त्या आपल्याला जाणवू शकतात, आपण त्या अनुभवू शकतो. याची परिणामकारकता अजून वाढावी
यासाठी, स्वराचा शांतीचा आणि त्यानंतर विकसित झालेल्या साधनांची जोड घेतली, तर त्यातून व्यक्त होणारी
भावनिर्मिती, ही परिणामकारकता वाढवते.

भारतीय शास्त्रीय संगीताची दोन पायाभूत तत्वे आहेत, एक म्हणजे ‘राग’ आणि दुसरे म्हणजे ‘ताल’ ! राग हा स्वरावर,
कणस्वरावर आधारलेला असतो, तर ताल हा एका आवर्तनाचे काळ मोजण्याचे परिमाण असते. रागाची रचना ही स्वरांत
गायन करून, विविध प्रकारे रागाचे स्वरूप स्पष्टपणे दाखविणे असते, तर ताल त्या रागाला काळाच्या आवर्तनात
परिमाणाच्या सहाय्याने बंदिस्तपणा देतो. भारतीय शास्त्रीय संगीतात स्वरांतील अंतर, स्वरांवर थांबणे हे, काही वेळा प्रत्यक्ष
स्वरोच्चार करण्यापेक्षा जास्त महत्वाचे असते.

वेदकालीन प्राचीन काळातील संगीत आणि त्याचा विकास संगीताचा उपयोग हा वेदकालात प्रामुख्याने वेदगायनांत होत असल्याने, आणि वेद हे संस्कृतात असल्याने, त्यातील प्रत्येक शब्दाचे, श्लोकाचे, ऋचेचे उच्चारण हे शास्त्रसंमत आणि योग्य पद्धतीनेच व्हावे, यासाठी नियम सामवेदात स्पष्ट केले गेलेले आहे. नंतरच्या काळात याला संगान म्हणून संबोधू लागले, तदनंतर यात थोडा बदल होऊन जातीगण म्हणू लागले. नंतर संस्कृतातील श्लोकांच्या माध्यमातून, गायला जाणारा प्रकार, याला ‘ध्रुवपद’ म्हणून ओळखू लागले, अशा बदलत गेलेल्या प्रकाराला प्रबंध संगीत म्हणू लागले. संगीताचा प्रथम संदर्भ अशा पद्धतीने केला, तो इसवीनपूर्व ५०० चे सुमारास, विद्वान पाणिनी यांनी ! इ. स. पू. ४०० च्या दरम्यान ‘प्रतिशाख्य’ म्हणजे वेदातील ऋचा अशाप्रकारे म्हणाव्यात, त्यांचे अचूक उच्चारण कसे असावे, संधीविग्रह कसा असावा, त्यातून भावाहानी, अर्थहानी होऊ नये, एकच शब्दाचे उच्चारण करायचे असेल तर नियम काय असावेत, वगैरे यासाठी पदबद्ध रचना केली गेली. हे शिक्षा वेदांगांचा भाग आहेत. विद्वान पाणिनीच्या व्याकरणात उच्चारणासंबंधाने जे नियम आहेत, ते वाजसेनीय प्रतिशाख्य याच्या अतिशय जवळचे आहेत. चौथ्या शतकातील विद्वान भरताच्या नाट्यशास्त्रात संगीताच्या विषयावर विविध भागांत लिहीले आहे. शास्रशुद्धपणे, लिखीत स्वरूपांत,सप्तक आणि बावीस श्रुती स्पष्टपणे मांडलेले कदाचित हे प्रथमच कार्य असावे. यानंतर समूहाने जे गायन केले जात असे, त्यातील प्रत्येक सप्तकातील बावीस श्रुती असण्याचे मानले जाऊ लागले. पूर्वीच्या कल्पनेप्रमाणे माणूस हा केवळ बावीस श्रुतीच व्यक्त करू शकतो, ही समजूत होती.

या काळांत अजून दोन महत्वाची कामे झाली, ती म्हणजे ९ व्या शतकात ‘विद्वान मातंग यांनी ‘बृहद्देशी’ नावाचा ग्रंथ
लिहीला, ज्यात रागाचे स्वरूप स्पष्ट केले गेले आणि त्यानंतर ११ व्या शतकांत विद्वान नारद यांनी ‘संगीत मकरंद’ नावाचा
ग्रंथ लिहीला, ज्यांत त्र्याणव राग कल्पिलेले असून, पुरुषांचे आणि स्त्रियांचे त्यादृष्टीने वर्गीकरण केले आहे.
वैदिक कालखंड म्हणजे इ.स.पू. २००० वर्षे मानता येईल. त्या काळांत पुरुष गात असत आणि त्यांच्या पत्नी वाद्य, म्हणजे
तत्कालीन प्रचलित असलेली वीणा, वाजवीत असत. सामगानामध्ये, मंत्रोच्चारांमध्ये प्रामुख्याने तीन स्वर उपयोगांत आणले
जात – जसे –

१. अनुदत्त, म्हणजे खालच्या स्वरांत, आजच्या भाषेत मंद्र स्वर,
२. उदात्य, म्हणजे उंच स्वरांत, आजच्या भाषेत तार स्वरांत, आणि
३. स्वरित, म्हणजे जो फार उंच नाही अथवा खालचा नाही असा स्वर, म्हणजे आजच्या भाषेत मध्य स्वरात !

शब्दसुरांच्या हिंदोळ्यावर

रामायण आणि महाभारत कालखंड हा गंधर्व संगीतासाठी सुवर्णयुग होते. कदाचित याच काळांत, सप्तस्वरांचा, म्हणजे – सा रे ग म प ध नी, यांचा शोध लागला असावा, त्यांच्या देवता देखील ठरल्या असाव्यात. ते सप्त स्वर आणि त्यांच्या देवता आपणास याप्रमाणे देता येतील –

वैदिक काळानंतर, बुद्ध काळांत संगीताची भरभराट होती, अगदी मौर्य काळात देखील संगीत हे लोकप्रिय होते. कौटिलीय
अर्थशास्त्राचा जनक कौटिल्य याच्या ग्रंथातून यासंबंधाने विविध उल्लेख दिसून येतात. इ.स.पू. २०० मध्ये झालेला
वात्स्यायन संगीतसंबंधाने तीन भाग कल्पितो.
१. गीतं – गायले जाणारे संगीत, ज्यातून भावभावना व्यक्त होतील,
२. वाद्यं – वाद्यांमार्फत तालाच्या बाबत मूल्ये स्पष्टीकरणासाठी आणि
३. नृत्यं – नर्तकाने आपल्या शरीराच्या अवयवाने विविध भावाविष्कार करून भावना व्यक्त करणे होय.


मध्यकाळातील भारतीय संगीत मध्यकालीन भारतात मुस्लिम राजवट असल्याने, त्यांच्या संस्कृतीचा पगडा समाजजीवनावर बसलेला होता. या काळात, म्हणजे साधारणतः १४ व्या शतकांत, भारतीय संगीत हे हळूहळू दोन भागांत विभागले जात होते, एक म्हणजे ‘हिंदुस्थानी संगीत’, जे विशेषतः उत्तर भारतात म्हटले जायचे आणि दुसरे म्हणजे ‘कर्नाटकी संगीत’ जे भारताच्या दक्षिण भागात प्रचलीत होत होते. खिलजीच्या काळांत उत्तर हिंदुस्थानी आणि कर्नाटक संगीताचे मेळे व्हायचे. १४ व्या शतकातील आसामी कवी, माधव कंदली, याने ‘सप्तखंड रामायण’ या साहित्यकृतीत विविध वाद्ये, मार्दाला, खुमुची, भेमची, डागर, टोकरी, वीणा, रुद्रविपांची वगैरे उल्लेखिली आहेत. याचा सरळ अर्थ की त्या काळांत ही वाद्ये अस्तित्वात होती आणि वापरात होती.
भारतातील स्वरलिपी पद्धत ही जगातील सर्वांत जुनी आणि तपशीलवार अशी आहे. उत्तर हिंदुस्थानी संगीतावर १५ व्या शतकांत पर्शियन संगीताचा मोठा प्रभाव पडत होता, तर ‘ध्रुवपद’ म्हणून ओळखला जाणारा गानप्रकार हा ‘धृपद’ या नावाने स्थिरावला. ख्याल गायकीचा प्रकार हा साधारणतः १८ व्या शतकांत नवीन स्वरूपात प्रकटला. कर्नाटकी शास्त्रीय संगीत तथा कृती, यांत मुख्यतः साहित्य तथा गानमूल्ये प्रभावी ठरली, तर उत्तर हिंदुस्थानी पद्धतीत संगीताची बैठक ही प्रभावी ठरली. उत्तर हिंदुस्थानी पद्धतीत शुद्ध स्वर सप्तक स्विकारले गेले, तर कर्नाटकी संगीतात पूर्वापार चालत आलेली पद्धतीच अवलंबली गेली. हिंदुस्थानी संगीत पद्धती तसेच कर्नाटकी संगीत पद्धती, यांत लोकसंगीत, प्रादेशिक संगीत स्विकारले जाऊन, त्याचा परिणाम त्यांतील रागांवर झाला, आणि विविध प्रकारच्या चाली या विविध रागातून निर्मित झाल्या.

भारतीय संगीत हे समाज तसेच धार्मिक परिणाम दाखविणारे झाले. पन्न पद्धत ही तामिळी यांचेकडून पूर्वापारपासून
उपयोगांत आणलेली सुस्वर पद्धत आहे. या संबंधीचे उल्लेख संगम आणि पूर्व-संगम साहित्यांत दिसून येतात. पुत्रजन्माच्या
आनंदाप्रीत्यर्थ देवाची प्रार्थना करण्यासाठी गायन केले जाते.

अवीट गाणी

ज्या ग्रंथाला संगीत आणि नृत्याचा सागर म्हटले जाते, तो ग्रंथ, ‘संगीत रत्नाकर’ हा १३ व्या शतकाच्या पूर्वकाळांत महाराष्ट्रातील ‘शारंगदेवाने’ लिहीला, यांत विविध राग आणि तालांचा उल्लेख आहे. त्याने आपल्या ग्रंथांत सात ताल कुटुंबे दिलेले आहे, आणि नंतर त्याची पुन्हा विभागणी केली आहे, ज्यातून भारतीय संगीताच्या प्रगतीची द्वारे खुली झालीत. संगीत
रत्नाकर हा संगीतावरील परिपूर्ण असा ग्रंथ आहे. त्यांत प्रत्येक राग आणि तालाच्या मागे त्याची प्रकृती, तंत्र, आणि त्याबाबतची कारणे दिली आहेत. जैन, हिंदू, बुद्ध मंदीरामध्ये गायन-वादनासंबंधीचे उल्लेख यानंतरच जास्त प्रमाणात
यावयास लागले. तत्कालीन काळांत बहुसंख्य ग्रंथ हे संस्कृतमध्ये लिहीले जात, मात्र त्यावरील टीकाग्रंथ, हे तत्कालीन प्रादेशिक भाषांमध्ये, म्हणजे ब्रज, कन्नड, ओडिया, पाली, प्राकृत, तामिळ, तेलुगू, या भाषांमध्ये येत. कित्येक हस्तलिखिते ही काळाच्या ओघांत नष्ट झाली आहेत. या संबंधाने अंदाज जो खंडाळा जातो, तो विविध ठिकाणे याबाबतचे जे ठिकठिकाणी उल्लेख येतात त्यावरून असतो. भारतातील महत्वाचे मानले गेलेलं वाङ्मय, म्हणजे विविध पुराणे, जसे – भागवत पुराण, लिंग पुराण, वायू पुराण, विष्णुधर्मोत्तरया पुराण, मार्कंडेय पुराण, दिखील विविध वाद्यांचा, नृत्याविष्कारांचा आणि राग-रागिण्यांचा उल्लेख येतो.

आधुनिक भारतीय संगीत

नंतरच्या ब्रिटिश राजवटीत राजेरजवाडे लयाला गेल्यामुळे, त्यांची सांपत्तिक परिस्थिती पूर्वीसारखी राहिली नाही. त्यांचे
ऐषारामी जीवन जगणे जवळपास संपुष्टात आले. याचा परिणाम, त्यांच्या दरबारी अथवा त्यांचेवर अवलंबून असणाऱ्या
संगीताज्ञावर झाला, त्यांना उपजीविकेसाठी दुसरीकडे जाणे अथवा संगीताचा पोटापाण्याचा व्यवसाय सोडून दुसरा
व्यवसाय, उपजीविकेसाठी करणे प्राप्त झाले. यापैकी काही घराणेच आपले अस्तित्व टिकवून ठेवू शकले आणि त्यांनी संगीताचे
कार्य पुढे चालविले, तथापि या काळात भारतीय संगीताची फार मोठी पीछेहाट झाली. याच्या जोडीला नवनवीन प्रयोग
होतच होते, त्यांत भारतीय संगीतावर पाश्चात्य संगीताचा प्रभाव, परिणाम पडत होता. आकाशवाणी, दूरदर्शन ही प्रभावी
माध्यमे पाश्चात्यांकडून आली, लोकप्रिय झाली आणि त्यामुळे त्यांचा पण परिणाम, येथील वातावरणावर झाला. याचा
परिणाम ६० च्या दशकांत, आपले भारतीय शास्त्रीय संगीत हे त्यामुळे सातासमुद्रापार गेले.

आधुनिक काळातील संगीताचा इतिहास पहातांना, हा कालखंड साधारणतः अठराव्या शतकाच्या अखेरीस गृहीत धरता
येईल. मुघल साम्राज्याच्या अस्तानंतर आलेले इंग्रज, हे भारतीय संस्करीपासून भिन्न प्रकृतीचे होते, विशेषतः भारतीय संगीताबाबत तर त्यांचे वेगळेपण ठसठशीत होते. त्यांनी या संगीतज्ञांना आधार देण्याचे नाकारल्याने, यांनी आपले संगीतज्ञान हे आपल्या कुटुंबापुरतेच ठेवले, किंवा तशी सुरुवात प्रकर्षाने झाली. गायक, संगीतकार यांना केवळ मनोरंजनासाठी समाजांत विचारांत घेतले जाऊ लागल्याने, समाजातील त्यांना खालच्या दर्जाचे समजू लागले. ही समजूत साधारणतः १९ व्या शतकाच्या मध्यापर्यंत होती. मुघलकाळाच्या अखेरच्या आणि गालितावस्थेतील काळांत संगीतप्रेमी, कवी वाजिद अली शहा अयोध्येचा नबाब होते, त्यांस इंग्रजांनी कलकत्ता येथे तुरुंगात टाकले. त्यांनी कित्येक ख्याल आणि ठुमरीच्या रचना केल्या. आपण सर्वांच्या परिचयाची असलेली रचना – बाबुल मोरा, नैहर छूटो ही जाए बाबुल मोरा, नैहर छूटो ही जाए, ही त्यांचीच ! त्यानंतर २० व्या शतकाच्या सुरुवातीला, भारतीय संगीताची पाहत नव्याने उगवायला लागली.

‘विष्णूद्वय’ म्हणून सर्वज्ञात असलेले, पंडीत विष्णू नारायण भातखंडे आणि पंडीत विष्णू दिगंबर पलुस्कर यांनी भारतीय संगीताचा चेहरामोहरा, त्यांच्या अथक प्रयत्नांनी आणि श्रमाने पार पालटून टाकला. पंडीत विष्णू नारायण भातखंडे यांनी संगीतरचना लिहिण्याची स्वरलिपी शोधली आणि सर्वांना सुगम वाटेल अशी विकसित केली. त्याचाच आज आपण उपयोग करतो. पंडीत विष्णू नारायण भातखंडे यांनी ‘हिंदुस्थानी संगीत’ यावर विविध ग्रंथ लिहीले, त्यांना टाळून आज आपण संगीताचा अभ्यास करू शकत नाही. यानंतर उस्ताद फैज खान, उस्ताद अब्दुल करीम खान, उ. अमीर खान, उ. बडे गुलाम अली खान, पं. ओंकारनाथ ठाकूर, पं. विश्वदेव चटोपाध्याय, पं. तर्पदा चक्रवर्ती, उ. अलाउद्दीनखान, उ. अली अकबरखान, उ. इनायत खान, पं. रवी शंकर, विदुषी अन्नपूर्णादेवी, पं. व्ही. जी. जोग, पं. भास्करबुवा बखले, पं. भीमसेन जोशी, विदुषी किशोरी आमोणकर वगैरे अनेक गायकांनी, वाद्यवादन करणाऱ्यांनी, संगीतज्ञांनी आपापल्या परीने ही भारतीय संगीताची पालखी पुढे वाहिलेली आहे.

‘रंजयति इति रागः’ हे तत्व आपण जर लक्षांत घेतले तर मनाला हवाहवासा वाटणारा, आपले रंजन करणारा म्हणजे राग होय, त्याचे ते वैशिष्ट्य हवे. यासाठी मानवाचे नवरस हे यातून अपेक्षीलेले आहेत, जसे – शृंगार, हास्य, करुण, रौद्र, वीर, भयंकर, बीभत्स, अद्भुत, शांत, हे विविध भाव आपल्याला रागांतून व्यक्त करता येतात. तोच त्या रागाचा भाव ठरतो. केवळ भावनाच नाही तर, प्रत्येक रंगाची गाण्याची वेळ देखील ठरविलेली आहे, की ज्यामुळे आपल्याला अपेक्षित असलेली भावना प्रकर्षाने, प्रभावीपणे जाणवेल. दिवसा गायले जाणारे, दुपारचे वेळी गायले जाणारे, संधीप्रकाश राग, रात्रीच्या वेळी आणि त्यातदेखील रात्रीच्या कोणत्या वेळी गायला हवे याचा देखील तपशील आहे. संगीतविद्या ही आपल्या भारतीय पद्धतीनुसार बहुतांशी गुरुमुखातून घेतली जात असल्याने, गुरु-शिष्याचे संबंध हे या इतिहासातील महत्वाचे पान आहे. भारतीय संगीताचा इतिहास पाहतांना आपल्याला, यातील काही महत्वाच्या ऐतिहासिक व्यक्तींचा देखील अभ्यास करायाला हवा, त्यांचे संगीतातील माहात्म्य जाणून घ्यायला हवे. संगीतातातील असंख्य व्यक्तींनी आपले योगदान संगीतवृद्धीसाठी दिलेले आहे. त्यातील सर्वच व्यक्ती आपल्याला ज्ञात नाहीत, आणि त्या काही आपल्याला ज्ञात आहेत, त्या सर्वांचे या छोट्या लेखांत तपशील देणे शक्य नाही; तथापि त्यातील काहींचा उल्लेख येथे करतो.

सुभावभजन

संगीतात इतिहास घडविणाऱ्या आणि त्यासाठी आपले योगदान देणाऱ्या उत्तर हिंदुस्थानातील संगीतकार व्यक्ती

1. जयदेव – सन ११७० मध्ये जन्मलेल्या संस्कृत आणि संगीताज्ञाने आपल्या ‘गीत गोविंद’ या भगवान श्रीकृष्णच्यासंबंधीच्या गीताच्या ग्रंथाने संगीतासाठी महत्वपूर्ण योगदान दिलेले आहे. याची काही गीते गुरु ग्रंथसाहीब यांत आहेत. हा ग्रंथ बारा भागांत विभागाला आहे, त्या बारा भागांचे अजून प्रत्येकी चोवीस उपविभाग केले आहेत, त्याला प्रबंध म्हणतात. या प्रबंधांत अष्टपदी आहेत. यांत राधा ही कृष्णापेक्षा श्रेष्ठ दाखविली आहे. यातील अष्टनायिकांच्या आठ विविध भावांतील वर्णन हे कित्येक नर्तकांना भारतीय शास्त्रीय संगीतातील नृत्याच्या विविध प्रकारांना दृष्टी देणारे ठरले आहे.

 

2. शार्ङ्गदेव – (सन ११७५ ते १२४७) – शार्ङ्गदेव हा काश्मिरात एका ब्राह्मण कुटुंबात जन्माला आला. यांच्या यथार्थ उल्लेखाशिवाय भारतीय संगीताचा इतिहास पूर्ण होऊ शकणार नाही. यांनी ‘सङ्गीतरत्नाकर’ हा संगीतावरील अजोड, यावरील विषयांसंबंधित परिपूर्ण असा संस्कृत ग्रंथ लिहीला. याला यथार्थपणे संगीत आणि नृत्याच्या माहितीचा महासागर म्हटले जाते. तेराव्या शतकांत उत्तर हिंदुस्थानी आणि कर्नाटकी संगीतातील वैशिष्ट्ये स्पष्ट होऊ लागली होती. ग्रंथकार हा यादव साम्राज्यातील सम्राट सिंघण याच्या देवगिरी या राजधानीतील, राजाच्या दरबारातील !सङ्गीतरत्नाकर हा ग्रंथ सात भागांत विभागलेला आहे. पहिले सहा भाग हे – १. स्वरगताध्याय, २. रागविवेकाध्याय, ३. प्रकीर्णध्याय, ४. प्रबंधाध्याय, ५.तालाध्याय, ६. वाद्याध्याय, हे संगीतावरील विषय, संगीतात वापरली जाणारी वाद्ये आणि त्याचा उपयोग, वापर यावर आहे, तर अध्याय ७. नर्तनाध्याय हा नृत्यसंबंधाने आहे. आजदेखील हा ग्रंथ प्रमाणभूत मानला जातो, यातील विविध संदर्भ हे आजदेखील प्रमाणभूत मानले जातात. यांनी स्वरामागील कल्पना, त्याची नोंद, माणसाला ऐकू येणाऱ्या अगदी सूक्ष्म स्वराच्या भागाचा देखील विचार करून, तसेच वाड्यातून निर्माण होणाऱ्या सूक्ष्म भागाचा विचार करून ‘श्रुती’ ही कल्पना मांडली, त्याचे सप्तक बनविले, २६४ रागांची निर्मिती, तालाची निर्मिती आणि त्याचे संगीतातील महत्व, तसेच संगीताचे सादरीकरणाशी असलेले महत्व, मानवाच्या भावभावना आणि संगीत याचादेखील विचार त्यांनी केला. रागगायन, नाट्याचे सादरीकरण आणि त्यातील गीते
यातील त्यांच्या विविध कल्पनांनी, कलाकारांना आपली कला सादर करण्यासाठी अमर्याद मोकळीक आणि संधी मिळाली.

ameer khusro 3. अब्दुल हसन यामिन-उद्दीन खुसरो – (१२५३ – १३२५) – सुफी संगीतकार, कवी, ज्ञानी असलेल्यास आपण ‘अमीर
खुसरो’ या नावाने ओळखतो. सुरुवातीला पर्शियन भाषेत आणि त्यानंतर हिंदवी भाषेत यांनी कविता लिहील्या.
‘भारताचा आवाज’ किंवा ‘तुती-ए-हिंद’ या नावाने त्यांची ओळख आहे. ‘उर्दू साहित्याचा पिता’, तसेच ‘कव्वालीचा
पिता’ म्हणून त्यांना ओळखले जाते. गझल निर्मिती आणि त्याच्या विकासातील यांचे महत्वाचे योगदान आहे.

4. राजा मानसिंग – (सन १४८६-१५१८) – ग्वालियरचा राजा यांच्या काळांत ‘ग्वालियर घराणे’ या भारतीय संगीतातील महत्वाच्या घराण्याला जन्म दिला असे म्हणता येईल. यांच्या कालखंडांत सकस असे भक्तीप्रधान काव्य भरपूर निर्माण झाले. संत कबीर, संत मीराबाई, संत चैतन्य महाप्रभू यांच्या भक्तीकाव्याने या काळांत संगीतातील लोकप्रियतेची, विकासाची परिसीमा गाठली होती.

 

 

5. तानसेन – सोळाव्या शतकांत, तानसेन यांनी वयाच्या ६० व्या वर्षी मुघल दरबारात सामील झाले. मूळचे हिंदू असलेले ‘तन्नू मिश्र’ हे सम्राट अकबराच्या काळात इस्लाम धर्म स्विकारुन ‘तानसेन; झाले. संगीतातील कित्येक घराण्यांचे संस्थापक म्हणून त्यांचे नांव घेतले जाते. त्या काळांत हिंदुस्थानी संगीत हे कर्नाटक संगीतापासून वेगळे ओळखू लागले किंवा नाही, हे सांगता येणार नाही. त्याची सुरुवात कदाचित १४ व्या शतकापासून देखील झाली असू शकते.संगीताचा विकास हा बऱ्यापैकी सम्राट अकबराच्या कालखंडांत झाला. तानसेनाने आपल्या आयुष्यातील पूर्वीचा सुमारे ६० वर्षांचा काळ हा संगीत शिक्षणात, संगीताचा विकास कसा करता येईल चिंतनांत आणि त्यानुसार केलेल्या विविध प्रयोगांत, ग्वालियर येथील ‘राम चंद’ या हिंदू सम्राटाकडे व्यतीत केला, आणि त्यानंतर मग त्याने सम्राट अकबराकडे प्रस्थान केले. बऱ्याच संगीतज्ञांच्या मते तानसेन हा हिंदुस्थानी संगीताचा संस्थापक आहे. त्याच्या गायनाची पद्धत, त्याने उपयोगांत आणलेल्या विविध कल्पना या अलीकडील संगीतातील विविध घराण्यांना जन्म देणाऱ्या ठरल्या आहेत. मुघल काळांत संस्कृताची पीछेहाट झाली आणि संगीताच्या तांत्रिक बाबीचा विकास जास्त झाल्याने, कर्नाटक संगीतापासून, उत्तर हिंदुस्थानी संगीत हे वेगळे ओळखले जाण्यास सुरुवात झाली असावी. ही पद्धत आपणांस विशेषतः उत्तर हिंदुस्थानांत, अलीकडच्या पाकीस्थानांत आणि बांगला देशांत दिसून येते. गायनाचे चार प्रकार सर्वसाधारणपणे झाले – १. धृपद हा गायन प्रकार सर्वांत जुना, २. ख्याल गायन प्रकार हा धृपदप्रकारातून विकसित झाला, ३. तराना आणि ४. ठुमरी ही ख्यालगायन प्रकारातून विकसित झाली, जी उपशास्त्रीय प्रकारांत गणली जाते. ठुमरीचे तीन घराणे मानले जातात, १. लखनौ, २. बनारस आणि ३. पंजाबी घराना ! याचा विकास हा तत्कालीन लोकसंगीतातून जास्त झालेला दिसतो. अजून एक गायनप्रकार म्हणजे ‘टप्पा’ हा होय. हा पंजाबी आणि राजस्थानी भागात जास्त प्रचलित आणि विकसित झाला, तसेच बंगाली संगीतात देखील त्यांनी याचा विकास करत आपले विशेष स्थान तयार केले. हिंदुस्थानी संगीत पद्धतीवर अरेबियन आणि पर्शियन संगीताचा देखील प्रभाव आहे. यांचे शिष्यगण एकत्रित होऊन त्यांचे ‘सैनी घराणे’ मानले जाते. दरबारी कानडा, मियाकी सारंग, मिया मल्हार वगैरे राग हे तानसेन यांची निर्मिती असल्याचे मानले जाते.

6. पुंडलिक विठ्ठल – हा १६ व्या शतकाच्या उत्तरार्धांत झालेला संतांपुर गावांतील, जामदग्नी कुळातील महत्वाचा ब्राह्मण संगीतकार, संगीतज्ञ ! तेराव्या शतकातील महान संगीतज्ञ शारंगदेव, यांच्यानंतर सोळाव्या शतकापावेतो रागांचे जे स्वरूप बदलले होते, विकसित झाले होते. दक्षिण भारतीय पद्धत ‘कर्नाटक संगीत’ म्हणून आपले वेगळे स्थान निर्माण करत होती, मात्र उत्तर भारतात हे रागांचे वर्गीकरण व्यवस्थितपणे करण्याची निकड भासू लागली होती. अकबराच्या काळांत देखील बऱ्याच संगीतकाराचा भर हा प्रत्यक्ष संगीत गायनावर असे, मात्र त्याच्या तपशीलवार तंत्राकडे लिखीत स्वरूपातील निकडीकडे दुर्लक्ष होत होते. त्याची आवश्यकता, महत्व याची जाणीव असल्याने पुंडलिक विठ्ठल याने, याबाबत चार महत्वाचे ग्रंथ लिहीले – १. षडराग चंद्रोदय, २. रागमाला, ३. रंगमंजिरी आणि ४. नर्तन निमय – या ग्रंथामधून त्याने गायकांना, नर्तकांना, नटांना आणि वाद्यवादनकारांना मार्गदर्शन केले, उपयुक्त माहीती दिली. या चार ग्रंथांव्यतिरिक त्यांनी अजून दोन ग्रंथ लिहीले – १. दुतीकर्मप्रकाश आणि २. शृंगार प्रबोधिनी सम्राट अकबराच्या काळात, संत तुलसीदास यांचे रामचरितमानस निर्माण होऊन त्याचे जनमानसावर गारुड होते.

संगीतज्ञ बिलासखान, चत्तरखान,मक्कु खान वगैरे यांनी सम्राट जहांगीर यांच्या दरबारात आपली सेवा रुजू केली.
सम्राट शहाजहान यांच्या पदरी दिरंगाखान, तालखान, बिलासखान (तानसेन याचा मुलगा) वगैरे होते. मुघल सम्राटांनी
भारतीय शास्त्री संगीताच्या वृद्धीसाठी प्रयत्न केले अथवा संगीताचा विकास हा त्यांच्या काळात झाला. ख्याल आणि
टप्पा, हे गानप्रकार त्यांच्याच काळातील आहेत.

संगीतात इतिहास घडविणाऱ्या आणि त्यासाठी आपले योगदान देणाऱ्या दक्षिण हिंदुस्थानातील, कर्नाटक
संगीतातील संगीतकार व्यक्ती –
1. पुरंदरदास – (सन – १४८४ – १५६४) – हे विजयनगर साम्राज्यातील हम्पी निवासी, हिंदू रचनाकार, संगीतकार होते.
यांना कर्नाटक संगीताचे ‘पितामह’ म्हणून संबोधले जाते. भगवान कृष्णाचे निस्सीम उपासक, आणि संन्यासी असलेले
पुरंदरदास, यांनी भारतीय शास्त्रीय संगीतास, विशेषतः कर्नाटक संगीतास, महत्वपूर्ण योगदान दिले. भारतीय संगीताचे
साहित्यास त्यांनी व्यवस्थित रूप देवून, संगीतकारांनी संगीत शिकतांना ते कसे शिकावे आणि त्यांत पूर्णत्व कसे आणावे,
हे प्रत्यक्षांत आणले. कर्णकंक आणि महाराष्ट्रातील विविध भागांत त्यांनी संगीताच्या माध्यमातून भक्तिमार्ग शिकविला,
त्यांच्या विविध कल्पनांचा प्रभाव या संगीतावर दिसतो. त्यांचा हा संगीत शिकविण्यातील अनुभव, पद्धत यास ‘शूलादी
सप्त ताल’ म्हणून ओळखू लागले. त्यांच्या या अथक प्रयत्नाने, त्या गायन पद्धतीस १६ व्या शतकाच्या सुरुवातीपासून
‘कर्नाटक संगीत पद्धत’ म्हणून ओळखू लागले.

2. त्यागराज – (४ मे, १७६७ ते ६ जानेवारी, १८४७) कर्नाटक संगीतातील त्रिमूर्तीमधील हे एक, अजून दोन म्हणजे –
मुत्तुस्वामी दीक्षित आणि श्याम शास्त्री हे होत. त्यागराज हे सीताम्मा आणि रामब्रह्मम या आईवडिलांचे पुत्र ! हे
भक्तिमार्गी कवी आणि कर्नाटक संगीतातील महान संगीतज्ञ, त्यागराज यांच्या नांवाशिवाय कर्नाटक संगीताचा इतिहास
पूर्ण होऊ शकणार नाही. त्यांनी शेकडो भक्तिरचना भगवान रामाच्या प्रित्यर्थ रचल्या, त्यांची सर्वश्रेष्ठ कृती ही, गीत
पंचरत्न मनात येईल. त्यांच्या कित्येक रचना कर्नाटक संगीतात नियमितपणे गायल्या जातात. हे प्रकांड पंडीत, कवी,
संस्कृत जाणकार, ज्योतिष्य पारंगत होते. यांची मातृभाषा तेलगू होती. आपल्या लहानपणीच हे वेंकटरमनैया यांचे
शिष्य बनले.

3. मुत्तुस्वामी दीक्षित – (सन १७७५ ते १८३५) – दक्षिण भारतातील महान कवी, रचनाकार असलेले हे त्रिमूर्थी मधील
एक – मुत्तुस्वामी दीक्षित, हे रामस्वामी दीक्षित यांचे पुत्र आणि गोविंद दीक्षित यांचे नातू ! यांनी कित्येक रचना केल्या,
त्या कर्नाटक संगीतातील गोष्टींमध्ये गायल्या आणि वाजविल्या जातात. यांचा जन्म हा त्यांच्या आईवडिलांनी भगवान
वैद्येश्वरन यांची प्रार्थना केल्याने, त्यांच्या प्रसादाने झालेला आहे. यांचे छोटे भाऊ बालुस्वामी आणि चिन्नास्वामी होते,
बहीण बालाम्बाल होती. यांचे वडील, रामस्वामी यांनी राग हंसध्वनी याची निर्मिती केल्याचे मानले जाते.
लहानपणापासून आपल्या वडिलांकडून त्यांनी धर्मज्ञान, साहित्य, अलंकार आणि मंत्रज्ञान तसेच संगीत यांचे शिक्षण सुरु
केले. किशोरावस्थेत त्यांना त्यांच्या वडिलांनी चिदंबरनाथ योग्यासोबत संगीत आणि दार्शनिक ज्ञानासाठी तीर्थयात्रेला
पाठविले. वाराणसी येथे त्यांना आपल्या गुरूकडून, वीणा मिळाली, त्यानंतर त्यांचे काही काळानंतर निधन झाले.

4. श्यामा शास्त्री – (२६ एप्रिल १७६२ ते १८२७) – कर्नाटक संगीतातील त्रिमूर्तीमधील सर्वात जेष्ठ सदस्य होय !
तिरुवारुर येथे ब्रह्मन् कुटुंबात जन्माला आलेला हा विद्वान, यांनी वेदाध्ययन, ज्योतिषविद्या आणि इतर पारंपरिक ज्ञान
त्यांच्या मामाकडून घेतले. संगीतातील ज्ञान त्यांना अडिअप्पय्या, या तंजावर राजदरबारातील संगीतज्ञाकडून मिळाले.
यांच्या रचना जरी संख्येने खूप नसल्या तरी, त्यांच्या रचनांमधील साहित्यमूल्ये, माधुर्य, नादमयता, तालबद्धता ही
वाखाणण्यासारखी आहे.अत्यंत कठीण तालांच्या निर्मितिक्षमतेबद्दल त्यांची ख्याती होती.

5. अरियाकुडी रामानुज अय्यंगार – (१९ मे, १८३० ते २३ जानेवारी, १९६७) हे अरियाकुडी गांवी तामिळनाडू राज्यांत
जन्माला आले, त्यांना या नावानेच ओळखले जाते. त्यांनी आपल्या गाण्याची वैशिष्ट्यपूर्ण पद्धत विकसित केली,
त्यालाच ‘अरियाकुडी घराणे अथवा पद्धत’ म्हणू लागले. त्यांचा शिष्यवर्ग या पद्धतीने गायन करू लागला. त्यांचे
संगीतातील योगदान लक्षांत घेऊन, सन १६५४ मध्ये त्यांना संगीत नाट्य अकादमी पुरस्काराने सन्मानीत करण्यांत
आले. सन १९५८ साली भारत सरकारने त्यांना ‘पद्म भूषण’ या नागरी सन्मानाने सन्मानित केले.

अशापद्धतीने भारतीय संगीताचा, त्याच्या विकासाचा आलेख आपणास थोडक्यात लक्षांत घेता येईल.

– अ‍ॅड. माधव भोकरीकर,
छत्रपती संभाजी नगर

पूर्वप्रसिद्धी – ‘साहित्य चपराक’ फेब्रुवारी २०२४

चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email - Chaprak Email ID

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

हे ही अवश्य वाचा