आम्हाला गुरुजींनी व्याकरण शिकवताना तीन काळ शिकवले. वर्तमानकाळ सोडला तर बाकीच्या दोन्ही काळांशी आमचा संबंध येत नव्हता. शाळा पूर्ण झाली आणि आम्हाला आणखी एका काळाला सामोरं जावं लागलं. तो काळ म्हणजे ‘दुष्काळ…!’ असं जीवनविषयक तत्त्वज्ञान मांडणारे पंढरपूर येथील ज्येष्ठ लेखक डॉ. द. ता. भोसले म्हणजे एक चालतंबोलतं विद्यापीठच म्हणायला हवं. ग्रामीण साहित्याच्या प्रांतात त्यांनी फक्त यथेच्छ मुशाफिरीच केली नाही तर खेड्यापाड्यातील अनेक लिहित्या अंकुरांना त्यांनी बळ दिलं आणि त्यातले अनेकजण आज डौलदार वृक्ष म्हणून साहित्यशारदेच्या दरबारात प्रभावीपणे पुढं आलेत.
8 मे 1935ला जन्मलेल्या भोसले सरांचा व्यासंग अफाट आहे. रयत शिक्षण संस्थेत प्राध्यापक आणि मराठी विभागप्रमुख म्हणून त्यांनी बत्तीस वर्षे सेवा केली. त्यातील काही काळ ते प्राचार्यही होते. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती समितीत सदस्य म्हणून त्यांनी सहभाग घेतला आणि क्रमिक पुस्तकांचे संपादनही केले. दोन कादंबर्या, आठ कथासंग्रह, सहा ललितलेखसंग्रह, पाच वैचारिक, लोकसंस्कृतीवरील सहा, समीक्षा-चरित्रात्मक सहा आणि अनेक संपादित ग्रंथांची निर्मिती त्यांनी केली. त्यांचा ग्रामीण बोलीचा शब्दकोशही दखलपात्र ठरला. पुणे, मराठवाडा, बडोदा, धारवाड, नांदेड विद्यापीठात पाठ्यपुस्तक म्हणून त्यांच्या अनेक ग्रंथांचा समावेश झाला. हे सगळं करताना त्यांनी असंख्य नवोदितांना यथायोग्य मार्गदर्शन, सहकार्य आणि उत्तेजन दिलं. ‘जिव्हाळा’ या सेवाभावी संस्थेची स्थापना करून विद्यार्थ्यांना सर्वतोपरी मदत केली. शिष्यवृत्ती दिल्या. वाचनालयांची स्थापना केली. अनाथाश्रम आणि वृद्धाश्रमांना दरवर्षी एक लाख रूपये देणगी म्हणून दिले. सर्वोत्कृष्ट ग्रंथांना चाळीस हजार रूपयांची बक्षिसं दिली. ज्यांचं आयुष्यच साहित्यसेवेसाठी, नवनिर्मितीसाठी गेलं अशा द. ता. भोसले सरांना आजवर बाराहून अधिक संस्थांकडून जीवनगौरव पुरस्कारानं सन्मानीत करण्यात आलंय. त्यांच्या काही पुस्तकांच्या हिंदी आवृत्त्या प्रकाशित झाल्या तर काही इंग्रजीतही अनुवादित झाली.
ज्यांच्यापुढं नतमस्तक व्हावं असे पाय कोणत्याही काळात अत्यल्प असतात. आपल्या अनुयायांना घेऊन स्वतःचे मठ स्थापन करणारे अनेकजण असतात, मात्र तळागाळातील अनेकांना कौतुकाची थाप देत त्यांच्या जडणघडणीत मोलाचा वाटा उचलणारे भोसले सरांसारखे निःस्पृह समाजचिंतक हेच खरे दीपस्तंभ आहेत. सरांची साहित्यिक कारकिर्द जेवढी दैदीप्यमान आहे तेवढंच त्यांचं मोठं योगदान म्हणजे त्यांनी अनेक लिहिते हात तयार केले. आपल्या लेखणी आणि वाणीच्या बळावर त्यांनी बहुजन समाजातील अनेकांना त्यांच्या अस्तित्वाची जाणीव करून दिली.
भोसले सरांनी आजवर अनेकांच्या पुस्तकांना सैद्धांतिक आणि आस्वादक प्रस्तावना लिहिल्या. अनेकजण त्यांची प्रस्तावना मिळवण्यासाठी देव पाण्यात बुडवून बसलेले असतात. असं सगळं असताना त्यांनी मला फर्मान काढलं की ‘तुमच्या एका तरी पुस्तकाला मला प्रस्तावना लिहायची आहे. माझ्यासाठी तुमच्या एका पुस्तकाची संहिता पाठवा.’ त्यांच्या आदेशानंतर मी माझे काही वैचारिक लेख एकत्र केले आणि ती संहिता त्यांच्याकडं पाठवली. नेमके त्यावेळी त्यांची तब्येत बरी नव्हती. त्यांचे चिरंजीव वैद्यकीय डॉक्टर असल्यानं त्यांनी द. ता. सरांना या दरम्यान वाचन करायचं नाही अशी ताकीद दिली होती. मात्र त्यांनी त्यांच्या डॉक्टरपुत्राला सांगितलं की ‘सध्याच्या काळाचा हा एक आश्वासक लेखक आहे. त्याच्या पुस्तकावर लिहिणं ही माझी इच्छा आहे. त्यामुळं या एका पुस्तकापुरतं आपण या नियमाला बाजूला ठेऊया!’
त्यानंतर त्यांच्या एका हाताला सलाईन होतं आणि दुसर्या हातात माझं पुस्तक! तशा अवस्थेतही त्यांनी ते काळजीपूर्वक वाचलं आणि त्यावर विवेचक प्रस्तावनाही लिहिली. कोविडच्या काळात या पुस्तकाच्या अकरा हजार प्रतींच्या पूर्वनोंदणीचा विक्रम झाला आणि माझ्या आयुष्यातली ही एक मोठी उपलब्धी ठरली. माझ्या या अनुभवाप्रमाणेच अनेक लेखकांना उभं करण्यात त्यांनी मोठं योगदान दिलं.
पुणे विद्यापीठातून सुवर्णपदक मिळविल्यानंतर त्यांनी ‘रविकिरण मंडळाची कविता’ या महत्त्वाच्या विषयावर पीएचडी केली. कृषी संस्कृती आणि गावगाडा हा त्यांच्या लेखनात आणि बोलण्यात नेहमीच महत्त्वाचा केंद्रबिंदू ठरला आहे. सामान्य माणसाचं जगणं शब्दबद्ध करतानाच त्यांनी भाषा वापराचा असा काही मार्मिक प्रयोग केला की ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासह अनेकांनी त्यांच्या लेखणीचं कौतुक केलं. अल्पभूधारक शेतकरी, कष्टकरी, कामगार, मजूर हे त्यांच्या कथेचे नायक राहिले आहेत. ‘मी आणि माझा बाप’ ही त्यांची कादंबरीही अफाट वाचकप्रिय ठरली. ‘डायरी एका चंद्राबाईची’ या कादंबरीच्या माध्यमातून त्यांनी वेश्येचं जीवन शब्दबद्ध केले.
मराठी साहित्य एका ठरावीक विचारधारेच्या साच्यात अडकलेलं असताना आणि एक मोठा वर्ग उपेक्षेच्या गर्तेत असताना डॉ. द. ता. भोसले यांनी त्यांच्यात नवे प्राण फुंकले. गुणवत्ता असेल तर तुम्ही मुख्य प्रवाहापासून वेगळे राहू शकत नाही, तुम्हाला बाजूला फेकणं कुणालाही शक्य नाही हे त्यांनी दाखवून दिलं. चुकीच्या प्रथा-परंपरांचा अहंकार बाळगायला नको आणि आपल्यातील क्षमतांकडे दुर्लक्ष करत न्यूनगंडही टाळायला हवेत हे त्यांनी निक्षून सांगितलं. मराठी साहित्यात भरीव योगदान देणार्या अशा या ऋषितुल्य व्यक्तिमत्त्वाला आजपर्यंत साहित्य अकादेमीसारख्या सन्मानापासून मात्र दूर रहावं लागलं याची खंत वाटते. साहित्य अकादेमी, महाराष्ट्रभूषण अशा सन्मापेक्षाही त्यांचं कार्य व्यापक असलं तरी सध्याचे मानदंड पाहता हे त्यांना मिळायला हवं अशी माझ्यासारख्या अनेक सामान्य साहित्यरसिकांची अपेक्षा आहे. या वयातही त्यांची साहित्यिक तळमळ आणि नव्या लेखकांविषयी उदात्त भावना हेच त्यांच्या आयुष्याचं संचित आहे. त्यांना उत्तम आणि निरोगी दीर्घायुरारोग्य लाभावं हीच यानिमित्तानं प्रार्थना.
– घनश्याम पाटील
7057292092
पूर्वप्रसिद्धी – ‘अक्षरयात्रा’ दैनिक ‘पुण्य नगरी’, 16 जानेवारी 2022
एखाद्या योग्याचं जगणं काय असतं, त्याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे द. ता.
खूप सुंदर लेख!
खूप छान लिहिले आहे.
ग्रामीण भागातील अनेक नवोदित लेखकांना प्रोत्साहन देऊन लिहिण्यास प्रवृत्त करणाऱ्या व स्वतः देखील ग्रामीण जीवनावरच लेखन करणाऱ्या या ऋषितुल्य व्यक्तिमत्वास विनम्र अभिवादन!! सुंदर लेख नेहेमी प्रमाणे आवडला!