‘एक तीळ सात जणांनी वाटून खाल्ला’, ‘तिळगुळ घ्या गोड बोला’ ही वाक्ये आजकाल ‘बोलाची कढी बोलाचाच भात’ या वाकप्रचारात मोडत आहेत. असे असताना देखील कामापुरत्या गोडबोल्या माणसांच्या भाऊगर्दीत काही माणसं अशी असतात जी आपल्या स्वभावाच्या साखरेने आयुष्य गोड करून जातात.
आपल्या भारतीय संस्कृतीत साजरे केले जाणारे सण आणि निसर्ग याचा खूप जवळचा संबंध आहे. त्यात मकर संक्रांतीचे विशेष महत्व आहे. या दिवशी सूर्याचे उत्तरायण सुरू होऊन तो मकर राशीत प्रवेश करतो. हळूहळू ‘उजेडाचे राज्य’ सुरू होते. विविध राज्यांत विविध नावांनी साजरा केल्या जाणाऱ्या या सणाला मराठी बांधव एकमेकांना तिळगुळ देताना ‘गोड बोला, गोड रहा’ म्हणतात.
खरंच हेच ‘गोड बोला’ ‘गोड रहा’ आपल्या ओठांवर आपल्या मनात किती दिवस टिकते ? आपल्या घरी, व्यवसायाच्या ठिकाणी अशी किती माणसे आहेत जी कटू अनुभव येऊनही आपला स्वाभाविक गोडवा कधीच आटू देत नाहीत?
तोंडावर गोड बोलून मागे त्याच व्यक्तीची कुचेष्टा करणे, गोड बोलून आपले काम करवून घेणे, आपल्या मोठेपणाच्या गझालींची साखर पेरणे असे ‘गोड बोलणे’ एकवेळ काम निभावून नेईल पण माणसं जोडत नाही. त्यासाठी मनात ज्ञानोबा, तुकाराम माऊलींसारखा मायेचा अखंड निर्झर क्षणोक्षणी पाझरता हवा. मधमाशी निरनिराळ्या फुलांकडून रस गोळा करते. तोच मध जेव्हा आपण चाखतो तेव्हा मात्र त्याचा गोडवा एकसमान असतो. कित्येक व्याधींवर औषध म्हणून हा मध वापरात येतो. ज्या व्यक्तीला आपल्या सहवासात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या स्वभावातील चांगले तेच वेचून त्याचा ‘मध’ बनवून जगाला देता येतो त्या व्यक्तीला ‘गोड बोला’ किंवा ‘गोड रहा’ असे सांगायची देखील गरज भासत नाही.
गरम खाल्ल्याने किंवा प्यायल्याने जीभ पोळते तेव्हा इतर कुठल्याही पदार्थाची चव लागत नाही, रसना कोरडी होऊन काही चविष्ट चाखण्याची इच्छा देखील मरून जाते. परिस्थितीने पोळलेल्या व्यक्तिंचे देखील असेच होते त्यांच्या आयुष्यातील रस निघून जातो, त्यांना कशातही ‘रस’ उरत नाही. अशा लोकांच्या सहवासात जेव्हा स्वभावमाधुर्य जपलेल्या व्यक्ती येतात तेव्हा त्यांच्या कटू भासणाऱ्या दिनचर्येत गोडवा पेरला जातो. जगण्यात ‘रस’ येतो. मधुर स्वभावाच्या व्यक्तींनी चाखवलेले हे मध त्यांच्या जखमांवर औषधासारखे काम करते.
याउलट वरवर गोड बोलून , एखादा स्वार्थी हेतू मनात ठेऊन किंवा औपचारिकता म्हणून गोड बोलणाऱ्या व्यक्ती! त्या ‘जिवाभावाचे मैत्र’ या मांदियाळीत कधीच मोडत नाहीत. भोळ्या , सरळ जीवांना आयुष्यातील ‘कटू’ अनुभव देण्यात अशा व्यक्ती अग्रेसर असतात. कटू अनुभव आपल्याला जीवन जगण्याची शिकवण देतात हे जरी खरे असले तरी असे अनुभव देणाऱ्या व्यक्तिंच्या यादीमध्ये आपण नसावे हे आपल्यापैकी किती जणांच्या मनात असते ?
एखाद्या मकर संक्रांतीला फक्त औपचारिकता म्हणून तिळगुळ देताना कधी आपण या गोष्टीचा विचार केला आहे का? जेव्हा कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या स्वभावाचे उत्तरायण सुरू होते तेव्हा अवघ्या कुटुंबावर उजेडाचे राज्य सुरू होते तसेच देशाचे, विश्वाचे!
संक्रांतीला जिथे ऋतू कूस बदलतात, निसर्ग बदलाची चाहूल देतो तिथे आपल्या स्वभावात देखील एखाद्या चांगल्या बदलाची सुरवात आपण नक्कीच करू शकतो, शेवटी आपण देखील निसर्गच आहोत ना?
– ज्योती घनश्याम पाटील
पूर्वप्रसिद्धी दै. संचार, १४ जानेवारी २०२२
सुंदर लेख. मकरसंक्रमणाच्या निमित्ताने प्रत्येकाने स्वत:च्या स्वभावात गोडवा निर्माण करून किंवा असलेली कडवाहट दूर करून दुसऱ्याच्या आयुष्यात आनंद निर्माण करावा असा गोड संदेश देणारा लेख! लेख आवडला.
छान लेख. मकरसंक्रातीच्या खूप शुभेच्छा
छान लेख, साहित्य संवाद असाच चालू द्यात…
सर्वसमावेशक
मस्त
नवी दृष्टी देणारा सुंदर लेख
अप्रतिम लेख!
अभिनंदन🎉🎊