एलियन

आपल्या पृथ्वी सारख्या अनेक पृथ्वी इतर आकाशगंगेमध्ये आहेत. त्यामुळे त्यावरही जीवसृष्टी असल्याचा अंदाज नेहमी व्यक्त केला जातो. इतर ग्रहांवरील सजीवांना ‘एलियन’ असं संबोधलं जातं. विदेशात त्यांना ‘यूएफओ’ अर्थात ‘अनआयडेंटिफाइड फ्लाइंग ऑब्जेक्ट’ असं म्हटलं जातं. यांच्या शरीराची ठेवण व यांचा आकार वेगळ्या ढंगाचा असल्याचे बोलले जाते. एलियन पाहिल्याचा दावा अनेक जण करत असतात.

उपलब्ध माहिती नुसार १९६४ मध्ये न्यू मेक्सिको येथे एका पोलीस अधिकाऱ्याने एलियन पाहिल्याचा दावा केला होता. या घटनेनंतर लगेचच दोन दिवसांनी त्या भागातील एका कुटुंबाने एलियन चे यान पाहिल्याचा दावा केला होता. याची सखोल चौकशी केली गेली आणि असा निष्कर्ष काढला गेला की, ते यान शुक्र ग्रहावरून आले असावे. शास्त्रज्ञांनीही एलियन पाहिल्याच्या या घटनेला कधी नव्हे ते एवढं महत्त्व दिलं होतं. लॉनी जामोरा या पोलिस अधिकाऱ्याने ‘युएफओ’ पाहिल्याचा दावा केला होता. त्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली होती. झालं असं की २४ एप्रिल १९६४ या दिवशी जामोरा हे एका द्रुतगती मार्गावर अतिवेगाने जाणाऱ्या कारचा पाठलाग करत होते. अचानक त्यांची नजर आकाशाकडे गेली. त्यांना ढगाएवढा मोठा तेज:पुंज ग्रह दिसला. काही क्षणातच त्याचा रंग निळा आणि नंतर नारंगी झाल्याचं त्यांना दिसलं. हा प्रकार पाहून त्यांनी कारचा पाठलाग सोडून दिला आणि ते ‘त्या’ तेज:पुंज गोष्टीचा पाठलाग करू लागले. थोड्याच वेळात ‘त्या’ तेज:पुंज गोष्टीचं यान झालं. ते एका शेतामध्ये उतरलं. ते अंडाकार होतं. थोड्या अंतरावर त्यांनी आपली कार थांबवली आणि ते याना कडे जाऊ लागले. जवळ गेल्यावर त्यांना ‘त्या’ यानावर विशिष्ट चिन्ह दिसलं. त्यातून पांढरा सूट घातलेले खुज्या व्यक्ती सारखे दोघेजण उतरले. जामोराला पाहताच ते दोघे लगेच यानामध्ये घुसले. यान आकाशात झेपावलं आणि अदृश्य झालं.

जामोराने लगेच आपल्या अधिकाऱ्यांना ही माहिती दिली. अमेरिकेच्या वायुदलाने आणि एफबीआयने या घटनेची चौकशी केली. ज्या शेतात हे यान उतरलं होतं तिथे यानाचे खोलवर ठसे उमटल्याचं त्यांना आढळलं. शिवाय मातीवर काही जळाल्याचंही त्यांना दिसलं. काही नवीन प्रकारचे धातूही तेथे आढळले. ते धातू पृथ्वीवरील नसल्याचे निष्पन्न झाले. त्यादिवशी इतरही अनेक लोकांनी असे यान पाहिल्याचा दावा केला. यानावर असलेले निशाण अरबीमध्ये ‘व्हीनस’ म्हणजे ‘शुक्र’ असा निर्देश करणारे होते. शुक्र ग्रहावर पृथ्वी पेक्षाही अधिक अनुकूल वातावरण असल्याचा आणि तेथे जीवसृष्टी असल्याचा दावा शास्त्रज्ञ करतात.

१९८० च्या दशकामध्ये नासाच्या अंतराळ संशोधकांनी संशोधन कार्यात एलियनने व्यत्यय आणल्याचा आरोप केला होता. कारण काही शास्त्रज्ञाना हे एलियन नासाच्या अंतराळ संशोधन केंद्राच्या भोवताली फिरत असल्याचे संगणकावर आढळले होते. हा गौप्यस्फोट नासाच्या निवृत्त शास्त्रज्ञानी केला होता.

एलियन्सचे रहस्य अद्याप विज्ञानालाही उलगडता आलेले नाही. मात्र एलियन्स बद्दल अनेक सुरस कथा चर्चेचा विषय ठरतात. चित्रपटातून काल्पनिक एलियन्स आपण पाहिले आहेत. पुढच्या वर्षी एलियन पृथ्वीवर येणार असल्याचा दावा ‘फ्युचर टाईम ट्रॅव्हलर’ नावाने टिकटॉक वर अकाउंट असणाऱ्या व्यक्तीने केला आहे.

ते काहीही असो पण या आपल्या पृथ्वीवर अशीच काही विचित्र वागणारी मंडळी आम्हाला आढळली. एलियन्स प्रमाणेच परग्रहावरून आल्यासारखी काही माणसे जेव्हा आपल्या आजूबाजूला वावरताना आढळतात सभोवताली वावरणाऱ्या माणसांशी, प्राणिमात्रांशी आपला दुरान्वयानेही काही संबंध नाही असं वागतात तेव्हा मात्र आश्चर्य वाटतं आणि करमणूकही होते!

आमच्या घरातील नेहेमीचे ‘भांडी-केर-फरशी’ पुसण्याचे काम आटोपून शांताबाई शेजारच्या घरी गेल्या आणि लगेचच पळत पळत आमच्याकडे येऊन ‘आग लागली’ ‘आग लागली’ असे जोरजोरात ओरडत दार वाजवू लागल्या. साहजिकच आम्ही कुटुंबीय आहे त्या अवस्थेत शेजारी गेलो. मोठया प्रमाणावर धूर येत होता. शांताबाईंसह आम्ही सर्वजण घाबरून गेलो होतो. धावपळ सुरू झाली. एलियन कुटुंबीय घरात नव्हते आणि असले तरी ते वेगळ्याच विश्वात असतात हा आमचा नेहेमीचा अनुभव होता. ‘मन चिंति ते वैरी न चिंति’ या म्हणी प्रमाणे ‘शॉर्ट सर्किट’ ‘सिलिंडरचा स्फोट’ अशा वाईट गोष्टी मनात येऊ लागल्या. आधाराशीवाय चालता न येणारे आमचे काका खुरडत खुरडत खाली जाऊन एलियन च्या घराचा इलेक्ट्रिक सप्लाय बंद करून आले. एकाने एलियन च्या कुटुंबातील सदस्यांना फोन करण्याचा प्रयत्न केला. मिस्टर एलियनने फोनवर कुटुंबियांना कळवतो असे सांगितले, ते कामावर गेले होते. आग विजवण्यासाठी पाण्याची व्यवस्था करण्याचे काम सुरू होते. इतरही शेजारी मदतीला धावून आले. ‘अग्निशमन दलाच्या ऑफिसला’ फोन करूया म्हणून सदाभाऊ आले. फोन नंबर शोधत असताना मिस्टर एलियन चा फोन आला..
“माफ करा तुम्हाला तसदी झाली. सोसायटी मध्येच आमच्या दुसऱ्या फ्लॅटवर सौ आणि मुले आहेत. भाडेकरू गेल्यामुळे तिकडे आराम करत आहेत. मी त्यांना आपल्या घरी डोकावून या म्हणून सांगितले आहे. “

हे ऐकल्यावर आम्ही एलियन कुटुंबियांची वाट पाहत थांबलो. त्यांचा विचार घेऊन आगीचा बंब बोलवायचे सर्वानुमते ठरले.
आणखी दहा मिनिटांनी ज्युनियर एलियन डुलत डुलत आमच्याकडे आला. हेडफोन बाजूला सारून म्हणाला,
“पपांचा फोन आला होता. आईला बरं वाटत नाही म्हणून ती झोपली आहे. पेस्ट कंट्रोल बद्दल सांगायचं राहिलं असा तिने निरोप दिला आहे.”
दोन मुलं हेडफोन लावून इंग्लिश बँड ऐकत होती. आणि सौ एलियन झोपेत होत्या!
“पेस्ट कंट्रोल?”
हे ऐकून सर्वांच्या तळपायाची आग मस्तकात गेली.
तरीही संयम राखून सदाभाऊ म्हणाले, “बाळ, जरा तो हेडफोन बाजूला कर. तुमच्या घरातून येणारा धूर जर पेस्ट कंट्रोल चा असेल तर तुम्ही शांताबाईंना पेस्ट कंट्रोल बद्दल बोलायला हवं होतं. निदान तुमच्या शेजाऱ्यांना तरी त्याविषयी कल्पना द्यायला हवी होती. असं काही तुला वाटत नाही का? शांताबाई तुमच्या घरातला धूर पाहून ‘आग, आग’ असं मोठयाने ओरडल्या नसत्या आणि सगळी सोसायटी जमा झाली नसती! आणि पळापळ ही झाली नसती!”
एलियन कुटुंबियांना लोकांच्या धावपळीबद्दल ना खंत ना खेद! ‘शेजारधर्म’ पाळण्याचा मूर्खपणा करून, वेळेचा अपव्यय करून कपाळावर हात मारून आम्ही आपापल्या घरी परत आलो!! बाळ एलियन कानावर हेडफोन लावून मक्ख चेहेऱ्याने दुसऱ्या फ्लॅटवर इंग्लिश म्युझिक ऐकायला गेला सुद्धा!

फार पूर्वी आम्ही चाळीमध्ये रहात असताना असंच एक ‘एलियन’ कुटुंब तिथेही होतं. संध्याकाळची पाच साडेपाचची वेळ. त्या काळात साधारणपणे दहा ते पाच किंवा अकरा ते सहा अशी ऑफिस ची वेळ असायची. म्हणजे पुरुष मंडळी ऑफिस मधून परत येण्याची ती वेळ होती. पुरुषाने काम करायचे आणि बाईने घर सांभाळायचे, मुलं सांभाळायची असा तो काळ. दोन खोल्यांची घरं असत. घरात नळ वगैरे लक्झरी नव्हती. टॉयलेट्स कॉमन असायची. पाच दहा घरांना एक अशा प्रमाणात टॉयलेट्स असत. आमच्या चाळीत पाण्याचा एक कॉमन हौद ही होता. तिथे बायका धुणी धुवायच्या. बहुधा घरातील सर्व कामे धुणी भांडी सुद्धा त्या त्या घरातील बाई करत असे. अंगणातील कॉमन नळावरून सगळ्यांना घरात पाणी न्यावं लागत असे. पिण्याच्या पाण्याचा वेगळा नळ वगैरे असं काही नव्हतं. घरात फोन नव्हते. टीव्ही नव्हते. चारचाकी गाड्या नव्हत्या. असल्याच तर त्या सरकारी ऑफिसच्या किंवा एखाद्या डॉक्टर वकीलाकडे असायच्या. सायकल हे एकमेव फिरण्याचं साधन होतं. स्कुटर मोठे अधिकारी किंवा व्यापारी मंडळींकडे क्वचित बघायला मिळत असे. कम्प्युटर वगैरे कल्पनेपालिकडच्या गोष्टी होत्या. अर्थातच रॅट रेस नव्हती! सायंकाळी चाळीतल्या एखाद्या गाण्या-बजावणाऱ्या कडे मैफिल रंगत असे. म्हणजे ते गाणारे त्यांच्या घरात गाणी गात असत आणि चाळकरी त्यांच्या दारात अंगणात बसून ऐकत असत! बायकोचे गाणे, नवऱ्याचा तबला आणि चाळीतली एखादी कॉलेजकुमारी पेटीवर असे!
आशा बाळबोध वातावरणात संध्याकाळी नळावर चाळकरी मंडळी पाणी भरत असताना आपल्या कथेतील मिस्टर एलियन ऑफिस मधून आला आणि ऑफिसच्या कपड्यांसह कॉमन नळावरील नंबरमध्ये असलेल्या घागरी, बादल्या बाजूला सारून कॉमन नळाखाली बसला. पाणी भरणाऱ्या मुली बायका लगबगीने बाजूला झाल्या आणि आपापल्या दाराशी जाऊन तोंडाला पदर लावून पहात राहिल्या.
चाळीत नवीनच राहायला आलेलं हे कुटुंब होतं. आणि कुटुंबाचा ‘कर्ता’ ऑफिस च्या कपड्यांसह चाळीच्या कॉमन नळाखाली बसला होता. हे एलियन उच्च शिक्षित होते. गावातील सरकारी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये मिस्टर एलियन प्राध्यापक होते. अर्थात त्यावेळी खाजगी शिक्षण संस्थांचा सुळसुळाट झालेलाच नव्हता! मिस्टर एलियन कोणाचे तरी ‘क्रिया कर्म’ उरकून आले होते आणि तसेच घरात कसे जायचे म्हणून कॉमन नळाखाली बसले होते!
नवराबायको दोघेही उच्च शिक्षित असल्याने ‘इगो’ प्रॉब्लेम मोठा होता. रात्री अपरात्री उठून ते इंग्रजीतून एकमेकांशी भांडत असत. ते भांडतात या पेक्षा ‘इंग्रजीतून भांडतात’ याचं कौतुक आणि कुतूहल चाळकऱ्यांना होतं. कारण चाळीतील मुलं अकरावीला ‘इंग्रजी’ विषयामुळे मागे रहात होती! आणि एलियन कुटुंबाला चाळीशी काहीच देणं घेणं नव्हतं. त्या तरुण जोडप्याला एक दोन-तीन वर्षांची छोटी मुलगीही होती. या दोघांच्या भांडणात आणि विचित्र वागण्यात त्या मुलीचे जे हाल होत ते न सांगितलेले बरे!
मिस्टर एलियनला आधुनिकतेची क्रेझ होती. बायकोने बॉंबकट करावा, फॅशनेबल राहावं असं वाटे. आणि मिसेस एलियन ला या गोष्टी अजिबात आवडत नसत. हे ही त्यांच्या वेळी अवेळी भांडणाचं एक कारण होतं. एका रात्री मिस्टर एलियनने कडाक्याच्या भांडणात मिसेस च्या केसांना कात्री लावली. आणि पुढे आठ दिवस ती माउली घराबाहेर पडली नाही. घरही धुमसत राहिलं!
बाळबोध चाळकरी काहीही करू शकले नाहीत. छोट्या मुलीलाही ‘चिटिपिटी’ कपडे घातल्या मुळे नीट चालता येत नसे. नवरा बायको मुलीचे दोन्ही हात बाजूनी धरून अक्षरशः फरपटत रस्त्याने घेऊन जात! एकदिवस मिस्टर एलियनने आपल्या गावी बदली करून घेतली आणि चाळकरी मंडळी अक्षरशः ‘सुटली’!

एक एलियन कुटुंब असेही आहे ज्यांचा आपसात ही संवाद नसतो. वरच्या उदाहरणातून आपण असं पाहिलं की, एलियन इतरांशी परग्रहावरून आल्या सारखे वागले तरी आपसात त्यांचा संवाद असतो. पण हे कुटुंब असं आहे की आपसात ही त्यांचा दुरान्वयाने संबंध येतो. मिस्टर एलियन यांचं ऑफिस मध्ये कोणाशीही पटत नाही. घरी आले की ते देवघरात जाऊन बसतात. मुलं काय करतात याचा त्यांना पत्ता नसतो. म्हणजे अभ्यासाखेरीज त्यांनी काही करायचेच नाही असा मुळी दंडकच आहे. मिसेस एलियन लग्नापूर्वी नोकरी करायच्या पण मिस्टर एलियन यांनी त्यांना नोकरीतून मुक्त करून देवधर्म, मुलं आणि घर यात अडकवून ठेवलं आहे. माहीत नाही त्यांना ‘देवधर्मात’ किती स्वारस्य आहे! नेहेमीप्रमाणे एकदा त्या मंदिरात गेल्या आणि येताना तबकातील हळद, कुंकू, गुलाल, फुले सोसायटीमधील एका सद्ग्रहस्थांच्या अंगावर उधळून आल्या! हल्ली त्या घरातच असतात! मुलगा आणि मुलगी अभ्यासात ‘किर्तीमान’ स्थापन करून विदेशात स्थायिक झाले आहेत. मिस्टर एलियन देवघरात आणि मिसेस …. ?????

एक गुणधर्म या सर्व एलियन मध्ये कॉमन आहे तो म्हणजे त्रिकोणी किंवा चौकोनी कुटुंबाच्या पलीकडे यांचे जग नाही. ‘मा नही, बाप नही … इतर कोणीच नाही. ‘आई, वडील, भाऊ, बहीण बिलकुल नाही.’ त्यामुळे त्यांच्याशी जोडणारे कोणतेही कार्यक्रम, सणवार नाहीत. यांच्या बहिणी मानलेल्या भावाला राखी बांधतात. आई-वडील इतरांच्या आधाराने रहातात. सख्ख्यांची ही अवस्था असल्याने चुलत, मामे, मावस यांचा विषयच येत नाही. काटेकोर नियमावली मुळे मित्रदेखील नसतात. ‘स्वतःसाठी जगलास तर मेलास……’ वगैरे अनंत काणेकरांची सुवचने यांच्या साठी नसतात. खऱ्या अर्थाने हे एकटे येतात आणि एकटेच जातात! अगदी परग्रहावरून आल्यासारखे ‘एलियन’!!

विषयाला अनुसरून ‘एकांत आणि आठवणी’ ही गोविंद त्र्यंबक यांची कविता पुढे देत आहे.
एकांत आणि आठवणी
—————————–
होतो जसा काल मी
आजही तसाच आहे।
कालही एकटाच होतो
मी आजही एकटाच आहे।।

आजकाल इथे आम्ही दोघंच असतो
माझा एकांत आणि मी,
तासन तास दोघ बोलत बसतो
आठवणींच्या विश्वात हरवत असतो ….
आठवणीचे विश्वात तुला शोधता शोधता
पापण्यात पाणी दाटून येते।।

शेवटी मनाला हेच समजावतो,
जीवन हे असंच जगायचं असतं
दुःख घेऊन सुख वाटायचं असतं …
जीवन-मरण हे फक्त कोडं आहे
जाता जाता हे सोडवायचं आहे …..।।।

-जयंत कुलकर्णी
दूरभाष : ८३७८०३८२३२

चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email - Chaprak Email ID

4 Thoughts to “एलियन”

  1. जयंत+कुलकर्णी

    धन्यवाद सर !!

    1. Nagesh S Shewalkar

      खूप छान लिहिले आहे.

  2. Pradnya Karandikar

    असतात असे एलियन करोनामुळे काही ठिकाणी हे कमी झालं कारण करोना झाल्यावर घर बंद करुन बसावं लागतं सामान औषध आणून द्यायला आजूबाजूच्यांची जिथे गरज लागते ते सुधारतात..पण काही महाभाग आॕनलाईन सोय भागवतात त्यांना गरज लागत नाही ..काहीतर घरात आहेत का नाहीत समजतच नाही..आपल्याच गमशनात असतात ही माणसं …एलियन बरोबर नाव दिलेत

  3. Vinod s. Panchbhai

    समाजातील वेगवेगळे ‘नमुने’ एलियन च्या रूपात छान पध्दतीने उलगडले माउली!

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

हे ही अवश्य वाचा