चंद्रपूरचे संशोधक प्रा. प्रशांत आर्वे पुण्यात आले होते. ते म्हणाले, “दादा, गेल्या तीन वर्षांपासून गभांना भेटायचा प्रयत्न करतोय. माझं त्यांच्याकडे काहीही काम नाही. या ज्ञानमहर्षीच्या चरणावर नतमस्तक होण्यासाठी फक्त दोन मिनिटांचा त्यांचा वेळ हवाय. काहीही करून आमची भेट घडवून आणा.”
आर्वेंचे हे कळकळीचे बोलणे ऐकून मी पुण्याचे माजी खासदार आणि भारत इतिहास संशोधक मंडळाचे अध्यक्ष प्रदीपदादा रावत यांना फोन केला. त्यांना म्हणालो, “चंद्रपूरसारख्या भागातील एका संशोधकानं मला मागून मागून काय मागितलं तर आपल्याकडील एका विद्वानाची दोन मिनिटांची भेट! प्रकाशक म्हणून त्यांची इच्छा पूर्ण करणं हे माझं कर्तव्य आहे. त्यासाठी काय करता येईल ते तुम्ही बघा. एखादा अभ्यासक तीन वर्षे एखाद्याला भेटण्यासाठी धडपडत असेल तर त्यातून त्याची प्रामाणिक तळमळ दिसून येते.” प्रदीपदादांनी हे ऐकून मला सांगितलं “मी संध्याकाळी पाच वाजता तुम्हाला फोन करतो.”
ठरल्याप्रमाणे दादांचा बरोबर पाच वाजता फोन आला. ते म्हणाले, “उद्या सकाळी नऊ वाजता तुम्ही आणि प्रशांतजी माझ्या घरी या. मी अकराव्या मजल्यावर राहतो आणि त्याच इमारतीत दुसऱ्या मजल्यावर गजाभाऊंचा ज्ञानयज्ञ सुरु असतो.”हे ऐकून मी हर्षोल्हासित झालो. आर्वेंना तसा निरोप दिला. दुसऱ्या दिवशी आम्ही त्यांच्या घरी पोचलो आणि दहा मिनिटांची ही भेट तब्बल पाच-साडेपाच तास चर्चेत कशी बदलली ते आम्हाला कळलंच नाही.
वाचकमित्रांनो, आजच्या काळात एखाद्या व्यक्तीच्या भेटीसाठी ही धडपड कशासाठी ? असा प्रश्न आपणास पडेल. गजानन भास्कर मेहेंदळे हे काही राजकारणी नाहीत. ते उद्योजक अथवा वलयांकित कलाकार नाहीत. त्यांच्या भेटीतून काही अर्थप्राप्ती होईल अशीही शक्यता नाही. तरीही आम्ही इतके उत्सुक होतो कारण अशा काही ऋषितुल्य व्यक्तींच्या भेटीने आयुष्यालाच अर्थ प्राप्त होतो.
ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी आम्ही त्यांच्याकडे पोहोचलो. थरथरत्या हातांनी दार उघडत गजाभाऊंनी आमचं स्वागत केलं. ते म्हणाले, “गेली पस्तीस वर्षे माझा दिवस सकाळी साडे आठ- नऊला सुरु होतो तो रात्री अडीच तीनला केव्हातरी संपतो. या वेळात मी फक्त वाचन आणि संशोधनच करत असतो. माझ्या आयुष्याची इतिकर्तव्यताच त्यात आहे. गेल्या काही वर्षात मी वेगवेगळ्या आक्रमणांचा आणि जुलुमी राजवटींचाच अभ्यास करतोय. माझ्या लेखनातील एकही वाक्य पूर्ण पुराव्याशिवाय आणि सगळे संदर्भ तपासून बघितल्याशिवाय मी लिहिले नाही. आता ‘ छत्रपती शिवाजी महाराज झाले नसते तर… ‘ या विषयावर मी काम करतोय. साधारण छापील चौदाशे पानं होतील असा अंदाज आहे. त्यातील आठशे पाने लिहून तयार आहेत. उर्वरित प्रकल्प पूर्ण करण्यासाठी परमेश्वरानं मला निदान मार्चपर्यंत आयुष्य द्यावं. माझ्या वयाचे माझे सगळे मित्र मला सोडून गेले. एक होता तोही परवा हृदयविकारानं गेला. असा अकस्मात मृत्यू वाट्याला येऊ नये. आता या क्षणी मला कॅन्सरचं निदान झालं तरी तो मी आनंदानं स्वीकारेन! कारण त्यानंतरही व्यक्तीला निदान तीन-चार महिने हातात मिळतात. एवढ्या वेळात जिद्दीनं मी माझा प्रकल्प पूर्ण करून विधात्याच्या भेटीला आनंदानं जाऊ शकतो.”
आपल्या कार्याविषयीची ही अशी एकरूपता आणि मृत्युलाही सामोरं जाण्याची धीरोदात्त वृत्ती पाहून आम्ही त्यांच्यापुढे नतमस्तक झालो. अशा ध्येयवेड्या लोकांनीच तर आपला देश घडवलाय. त्यांची व्यग्रता पाहून आम्ही परत निघण्याची अनुमती मागितली. त्यावर खळखळून हसत ते म्हणाले, “सतत अत्याचारांच्या इतिहासाचा अभ्यास करून कधीकधी तोचतोचपणा येतो. अशावेळी थोडा बदल अपेक्षित असतो. मी उर्दू, संस्कृत, अरेबी, पर्शिअन, इंग्रजी अशा सगळ्या भाषेतील इतिहास आणि संदर्भसाधने वाचण्यात, अभ्यासण्यातच माझं आयुष्य घातल्यानं मराठी वाचन फारसं होत नाही. त्यातही कथा-कादंबरी, ललित साहित्याचं वाचन होत नाही. आता तुमचं ‘दरवळ’ मात्र आवर्जून वाचेन. बोलत बोलत गजाभाऊंनी आमच्यासाठी चहा ठेवला आणि तो आमच्यासमोरील टीपॉयवर ठेवत पुढच्या विषयाकडं वळले.
ते म्हणाले, “समजा तुम्हाला उगीचच नो एंट्रीत घुसण्याची इच्छा होते. कुणाला त्रास द्यावा असाही उद्देश नसतो. थ्रिल म्हणून तुम्ही हे केले मात्र त्यातून अनावधानाने तुम्ही समोरच्याला धडकलात, त्यातून त्याचा पाय मोडला तर तुम्ही काय कराल? तुमची पहिली प्रतिक्रिया म्हणजे तुम्ही सॉरी म्हणत त्याची माफी मागाल. दुसरी कृती म्हणजे त्याला त्वरित उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात न्याल. तिसरी कृती म्हणजे या चुकीचे प्रायश्चित घ्याल. हे प्रायश्चित कोणत्याही स्वरूपाचे असू शकते. म्हणजे संबंधिताच्या उपचारानंतर तुम्ही तुमचा वाहन परवाना स्वतःहून सरेंडर कराल आणि किमान एक-दोन महिने गाडी न चालवण्याचा निश्चय कराल. कोणताही भला माणूस असाच विचार करेल. अकबराने शेकडो नाही तर हज़ारो हिंदू स्त्रिया जनानखान्यात डांबल्या. त्यांच्यावर क्रूर अत्याचार केले. तेरा-चौदा वर्षाच्या कुमारीकेपासून ते पासष्ठ-सत्तर वर्षापर्यंतच्या स्त्रियांवर सैनिकांकरवी अत्याचार केले. हिंदू स्त्रिया त्यासाठी कुणालाही सहजी भेट दिल्या जायच्या. अकबराने असंख्य हिंदू मंदिरे उद्वस्त केली. नंतर या सगळ्याविषयी त्याने एकदा माफी मागितली. अकबरासारख्या सम्राटाने त्याच्या चुकीची जाणीव होताच माफी मागितल्याने त्याला माफ करायला हवे असे काही जण सांगतात. मघाशी मी म्हटल्याप्रमाणे चूक झाल्यावर त्याने पहिली कृती केली. या चुकीनंतर संबंधितांचे उपचार आणि त्यानंतरचे प्रायश्चित मात्र घेतले नाही. त्याने ज्यांच्यावर अत्याचार केले त्यापैकी एखाद्या अबलेची माफी मागितली नाही किंवा हजारो हिंदू मंदिरे पाडल्याचे प्रायश्चित म्हणून एकही मंदिर उभारले नाही. मग त्याला माफ करणारा मी कोण? ज्या स्त्रियांवर त्याने नरकयातना भोगायची वेळ आणली त्यांच्यापैकी कुणी जर त्याला माफ केले असते तर मी दुर्लक्ष केले असते; मात्र आता मी किंवा आणखीन कुणी त्याला माफ करणे म्हणजे त्याच्या पापाचे भागीदार होणे नव्हे काय? ज्यांनी सहन केले त्यांची ती चेष्टा नव्हे काय? जर आपल्या घरात चार डास झाले तर आपण ते मारतो. दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी हाच खेळ सुरु राहतो. हे सगळे करताना आपल्या लक्षात येत नाही की घराच्या मागे पाण्याचे थारोळे साचले आहे आणि त्यातून डासांची निर्मिती होत आहे. रोज घरात येणारे डास थांबवायचे असतील तर ते डबके बुजवायला हवे. मुस्लिम राजवट क्रूर होती म्हणून ती संपवण्यासाठी आपण जंग जंग पछाडले. मात्र त्याच वेळी त्यांची धर्म पद्धती, त्यांची उपासना पद्धती, त्यांची आयडॉलॉजी इकडे मात्र हेतुपुरस्सर दुर्लक्ष केले. म्हणून इस्लामी राजवट आणि त्यांचे अत्याचार वर्षानुवर्षे आपल्याला सहन करावे लागले. ‘थारोळे बुजवायला हवे’ हे अजूनही आपल्या लक्षात येत नाही.
‘सत्य लपवणे, असत्य सांगणे’ हा गुन्हा आहे हे अजूनही आपल्या अनेक अभ्यासकांच्या, राज्यकर्त्यांच्या लक्षात येत नाही. म्हणूनच बलुचिस्तान ते बंगाल आणि काश्मीर ते कन्याकुमारी एवढ्या विस्तृत प्रदेशातील आणि इ.सन सातशे ते अठराशे या कालखंडातील इस्लामी राजवटीचे धार्मिक धोरण काय होते, त्याचा परिणाम काय होत होता आणि छ. शिवाजी महाराजांमुळे इतिहासाच्या त्या प्रवाहाला कोणते वळण मिळाले याचे साधार लेखन करून या अभ्यासकाने नव्या पिढीसमोर अनेक तथ्ये आणली आहेत. भविष्यात इतिहास संशोधनाच्या नव्या वाटा त्यातून निर्माण होतील. अभ्यासकांना दिशा गवसेल. अनेक कारणांनी जे सत्य लपवले गेले ते गजाननभाऊंच्या धाडसामुळे लवकरच वाचकांच्या पुढे येत आहे. त्यासाठी प्रदीप रावत यांच्यासारख्या अत्यंत अभ्यासू नेत्याची खमकी साथ त्यांना लाभली आहे. गजाभाऊ अर्थात गजानन भास्कर मेहेंदळे यांचे हे आपल्यावरील मोठे ऋण असणार आहे. त्यांचा हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण व्हावा आणि त्यासाठी त्यांना निरोगी दीर्घायुरारोग्य लाभावे ही शुभकामना!
– घनश्याम पाटील ७०५७२९२०९२
पूर्वप्रसिद्धी – दै. पुण्य नगरी, रविवार, दि. २ जानेवारी २०२२