सुभाष ते नेताजी : एक साहसी गरूडझेप

– श्रीराम पचिंद्रे
7350009433
‘साहित्य चपराक’ दिवाळी विशेषांक 2021

ओडिशाची राजधानी कटक येथे नामवंत वकील जानकीनाथ बोस वकिली करायचे. जानकीनाथांची कोलकत्त्यात मोठी वास्तू होती. ते कटकहून कोलकत्त्याच्या उच्च न्यायालयात वारंवार यायचे. त्या निमित्तानं घरी येऊन मुलांशी संवाद साधता यायचा. त्यांचे सतीश हे पहिले पुत्र. शरदचंद्र हे दुसरे पुत्र. ते इंग्लंडला जाऊन बॅरिस्टर होऊन आले होते. ते उच्च न्यायालयात उत्तम प्रकारे वकिली करायचे. सुभाष हे जानकीनाथांचे आठवे पुत्र. ते बी. ए. झाले होते.

त्यांनी ऑक्सफर्ड किंवा केंब्रिज विद्यापीठातून एम.ए. करावं किंवा देशातील सर्वोच्च असणारी भारतीय नागरी सेवा (आय. सी. एस.) परीक्षा देऊन मोठे सरकारी अधिकारी व्हावं आणि ब्रिटिशांची चाकरी इमानेइतबारे करावी, अशी जानकीनाथांची इच्छा होती. बंगालमध्ये क्रांतिकारी चळवळी जोरात होत्या. अशा क्रांतिकारकांमध्ये सुभाषबाबूंची उठबस असायची; ते कोलकत्त्यातील ‘नवविवेकानंद समूहा’चेही क्रियाशील सदस्य होते. हा समूह स्वामी विवेकानंदांच्या विचारांपासून प्रेरणा घेऊन राष्ट्रकार्य करीत असे. त्यातूनच ब्रिटिश सरकारविरुद्ध असंतोषाच्या आणि क्रांतीच्या ठिणग्या पडत असत.

या सगळ्याविषयी जानकीनाथ, आई प्रभावतीदेवी आणि सतीश, सुरेश आदी भावांना काळजी वाटत होती. असं असलं तरी वडिलांच्या इच्छेसाठी सुभाषबाबू अतिशय अवघड असणारी भारतीय नागरी सेवा (आय. सी. एस.)ची परीक्षा देण्यासाठी इंग्लंडला गेले. अगदी कमी कालावधी मिळालेला असतानाही ती परीक्षा देऊन सगळ्या विद्यार्थ्यांमध्ये ते चौथ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले; जानकीनाथांनी आनंदून सार्‍या कटकमध्ये पेढे वाटले. सर्वप्रकारचे सुखविलास, ऐश्वर्य, मानसन्मान पायाशी लोळण घेण्याची संधी सुभाषसमोर उभी राहिली पण ते स्वतः मात्र अस्वस्थ होते. सर्वप्रकारचे सुखोपभोग देणार्‍या सर्वोच्च अधिकाराच्या त्या ब्रिटिश नोकरीवर लाथ मारून सुभाषबाबू इंग्लंडहून भारतात परतण्यासाठी निघाले. येताना त्यांची त्याच बोटीवर विश्वकवी रवींद्रनाथ टागोर यांची भेट झाली. रवींद्रनाथांनी ब्रिटिश सरकारनं बहाल केलेला ‘सर’ हा किताब स्वाभिमानानं आपल्या मातृभूमीचा अपमान करणार्‍या सरकारला परत देऊन टाकला होता. सुभाषबाबूंना कवी म्हणून त्यांच्याविषयी जो आदर वाटत होता तो त्यांच्या ह्या कृतिमुळं शतपटीनं वाढला. त्याचप्रमाणे, ब्रिटिश सरकारची आय. सी. एस. ही पदवी सहजपणे भिरकावून टाकणार्‍या सुभाषविषयी गुरूदेव रवींद्रनाथांना कौतुक वाटत होतं. प्रवासात त्यांच्यातला स्नेहभाव अधिकच दृढ झाला. रवींद्रनाथ आणि महात्मा गांधी यांच्यातही काही मूलभूत वैचारिक मतभेद होते पण तरीही रवींद्रनाथांनी सुभाषला, ‘‘सुभाष, तू गांधीजींना भेट आणि त्यांचे विचार जाणून घे’’ असं सांगितलं.

16 जुलै 1921 या दिवशी सुभाषबाबूंची बोट मुंबई बंदराला लागली. सुभाषबाबूंना महात्म्याच्या भेटीचा योग समोरच दिसून आला; कारण त्या काळात महात्मा गांधी मुंबईतच होते. सुभाषबाबूंनी गांधीजींची भेट घेतली. सुभाषबाबूंना त्यांच्यात एक संत दिसून आला. त्यांनी गांधीजींशी भारतीय स्वातंत्र्य आंदोलनाबाबत चर्चा केली. त्याच वर्षी गांधीजींनी ‘एका वर्षात स्वराज्य’ ही घोषणा केली होती. हे साम्राज्याच्या अंतर्गत स्वराज्य होतं पण ते तरी नेमकं कसं मिळवायचं? ते कसं येणार? त्यासाठी काही निश्चित स्वरूपाचा कार्यक्रम आहे का? कोणतं आंदोलन आपण करणार? अशा काही प्रश्नांची उत्तरं सुभाषबाबूंना मिळाली नाहीत. त्यांचं समाधान झालं नाही. त्यावेळी गांधीजींनी त्यांना कोलकत्त्याला जाऊन देशबंधू चित्तरंजन दास यांची भेट घेण्याची आणि त्यांचं नेतृत्व स्वीकारण्याची सूचना केली, त्यानुसार त्यांनी कोलकत्यात देशबंधू चित्तरंजन दास यांची भेट घेतली. चर्चा केली. त्यांच्या नेतृृत्वाखाली कार्य सुरू झालं. 1921 हे वर्षं संपलं. स्वराज्य काही आलं नाही पण त्या वर्षी जे आंदोलन झालं, त्यामुळं ते वर्ष वाया गेलं असं म्हणता आलं नसतं.

सुभाषबाबू लवकरच चित्तरंजनबाबूंच्या विश्वासाला पात्र झाले. त्यांनी स्थापन केलेल्या ‘नॅशनल स्कूल’चे प्राचार्यपद सुभाषबाबूंना दिले. हे काम सुभाषबाबूंना आवडणारंच होतं. त्यांनी उत्साहानं कामाला सुरूवात केली.

दरम्यान, ‘अनुशीलन’ आणि ‘युगांतर’ हे क्रांतिकारी संघ कोलकत्यात कार्यरत होते. ब्रिटिशांच्या कारावासात असलेल्या अनेक क्रांतिकारकांची पहिलं महायुद्ध संपल्यानंतर सुटका झाली होती. बदललेल्या परिस्थितीत काय करायचं हे त्यांना समजत नव्हतं. त्यांना योग्य दिशा देऊन काँग्रेसच्या चळवळीत आणण्याचा यशस्वी प्रयत्न देशबंधूंनी केला. त्यांंनी ह्या भूतपूर्व क्रांतिकारकांची गांधीजींशी भेट घडवली. दासबाबूंच्या घरी झालेल्या ह्या बैठकीस पं.मोतीलाल नेहरू, लाला लजपतराय हेही उपस्थित होते. ह्याच बैठकीत सुभाषबाबूंची गांधीजींशी दुसर्‍यांदा भेट झाली. ते असहकार आंदोलनात सहभागी झाले.

गांधीजींनी 1922 मध्ये पुन्हा असहकार आंदोलन जाहीर केलं. उत्तर प्रदेशातील गोरखपूर शहराजवळ चौरीचौरा हे गाव आहे. तिथल्या पोलिसांनी सत्याग्रहींना अमानुष मारहाण केली. त्यामुळं भडकलेल्या गावकर्‍यांनी 4 फेब्रुवारी या दिवशी पोलिसांना चौकीत कोंडून चौकी पेटवून दिली. त्यात 22 पोलीस जळून भस्मसात झाले. अहिंसामय आंदोलनाला हिंसेचं गालबोट लागल्यानं गांधीजींनी असहकार आंदोलन मागे घेतलं पण त्यामुळं चित्तरंजन दास, सुभाषबाबू आणि असंख्य स्वातंत्र्यसैनिकांना अवसानघात झाल्यासारखं वाटलं. त्यानंतर ‘यंग इंडिया’तील लेखाबद्दल सरकारनं गांधीजींना सहा वर्षे गजाआड पाठवलं. तसंच चित्तरंजन दास आणि सुभाषबाबू यांनाही सहा-सहा महिन्यांची शिक्षा ठोठावण्यात आली. 1922 च्या ऑगस्ट महिन्यात बंगालमध्ये महापुरानं थैमान घातलं. हजारो शेतकरी उद्ध्वस्त झाले. तेव्हा बंगाल प्रांतिक काँग्रेसनं पूरग्रस्तांसाठी निधी उभा केला. सुभाषबाबूंना स्वामी विवेकानंदांचे बोल आठवले, ‘दरिद्रीनारायणाचे अश्रू पुसा, मानवसेवा करा. निर्धन-निराधाराला आधार दिल्यानेच परमेश्वर प्रसन्न होतो.’

सुभाषबाबूंनी आपल्या स्वयंसेवक सहकार्‍यांसह आपद्ग्रस्तांसाठी दीड महिना महापुराच्या परिसरातच तळ ठोकला. एकेका खेड्यात जाऊन अन्न आणि औषधांचा पुरवठा केला. अविश्रांत परिश्रम केले. मानवतेची सेवा केली. त्यामुळं लोकांच्या मनात त्यांच्याविषयी अपार आदराची आणि विश्वासाची भावना निर्माण झाली. त्यातून त्यांच्यातील नेतृत्वानं उभारी घेतली.

तेव्हा बंगाल प्रांतिक काँग्रेसचे अध्यक्ष होते चित्तरंजन दास आणि सरचिटणीस होते पंं. मोतीलाल नेहरू. 1920 मध्ये केंद्रीय आणि प्रांतिक विधिमंडळाच्या निवडणुका झाल्या. तेव्हा ‘विधिमंडळात जाऊन आपण सरकारची जमेल तिथं अडवणूक करावी’ हे मत चित्तरंजनबाबूंनी मांडलं तर ‘काँग्रेसजनांनी विधिमंडळात जाऊ नये’ असं गांधीजींचं मत होतं. इथेच दोघात मतभेद निर्माण झाले. काँग्रेसच्या अधिवेशनात देशबंधूंनी आपली भूमिका मांडली आणि खुल्या अधिवेशनात ठरावही मांडला पण तो 1748 विरुद्ध 890 मतांनी फेटाळला गेला. त्यानंतर त्यांनी आणि मोतीलाल नेहरू यांनी आपापल्या पदांचा राजीनामा दिला आणि ‘स्वराज्य पक्ष’ स्थापन केला. स्वराज्य पक्षाच्या धोरणांच्या प्रचारासाठी चित्तरंजन बाबूंनी ‘बांगलार कथा’ हे बंगाली दैनिक सुरू केलं. त्याच्या संपादकपदी त्यांनी सुभाषबाबूंची नियुक्ती केली. नंतर विधिमंडळाच्या निवडणुका झाल्या, त्यात स्वराज्य पक्षाला भरघोस यश लाभलं.

त्यानंतर कोलकत्ता महापालिकेच्या निवडणुका झाल्या. चित्तरंजन दास यांच्या महानगर पालिकेत बहुमत मिळालं. नगरसेवकांच्या बैठकीत चित्तरंजन दास महापौर म्हणून एकमतानं निवडून आले. सुभाषबाबू बिनविरोध निवडून आले होतेे. महापौर चित्तरंजनबाबूंनी सुभाषचं नाव मुख्य कार्यकारी अधिकारी पदासाठी सुचवलं. ब्रिटिश सरकारला ते मान्य करणं भाग पडलं. सुभाषबाबू मुख्य कार्यकारी अधिकारी झाले. त्यांना तीन वर्षांसाठी दरमहा तीन हजार रुपये मिळणार होते. सुभाषबाबू अर्धं वेतन सार्वजनिक कामासाठी खर्च करायला लागले. प्राचार्यपद, संपादकपद अशी इतर सारी पदं सोडून सुभाषबाबूंनी मुख्य कार्यकारी अधिकारी ह्या नात्यानं शहराच्या विकासात लक्ष घालून अनेक सुधारणा घडवून आणल्या. शहर सुधारणेच्या अनेक योजना राबवल्या. भ्रष्टाचाराला आळा घातला. महापालिकेतर्फे ब्रिटिश अधिकार्‍यांना मानपत्र देऊन त्यांचा गौरव करण्याची त्या काळी पद्धत होती; ती बंद करून महात्मा गांधी, मोतीलाल नेहरू, विठ्ठलभाई पटेल इत्यादी भारतीय नेत्यांचे नागरी सत्कार करायची प्रथा त्यांनी सुरू केली. कर्मचार्‍यांसाठी खादीचे गणवेश शिवून घेतले. चौक आणि रस्त्यांना भारतीयांची नावे दिली. त्यामुळं ब्रिटिश सरकार कमालीचं अस्वस्थ झालं.

बंगालमधील ‘युगांतर’ ह्या क्रांतिकारक संघटनेशी सुभाषबाबूंचा संबंध आहे, असा अहवाल बंगाल सरकारच्या मुख्य सचिवांनी भारत सरकारला पाठवला होता. त्याच सुमारास मॉस्को येथे असलेल्या मानवेन्द्रनाथ रॉय यांनी कम्युनिस्ट इंटरनॅशनलच्या परिषदेसाठी चित्तरंजन दास आणि सुभाषबाबू यांना निमंत्रित केलं. हे पत्र सरकारच्या हाती लागलं; तेव्हा सुभाषबाबूंवरील सरकारचा संशय अधिकच वाढला.

क्रांतिकारक गोपीनाथ साहा याला फासावर चढवण्यात आलं. त्याच्या हौतात्म्याचा गौरव करणारा ठराव बंगाल प्रांतिक काँग्रेस परिषदेत संमत करण्यात आला पण याविषयी गांधीजींनी नाराजी व्यक्त केली. ‘गोपीनाथ साहा याला देशभक्त म्हणणारच असाल, तर त्याला वाट चुकलेला देशभक्त असं म्हणा’ गांधीजींनी चित्तरंजन दास यांना पत्र लिहून कळवलं. पुढच्या बैठकीत ही सुधारणा सांगण्यात आली तेव्हा सुभाषबाबू संतापले. एका राष्ट्रभक्ताच्या हौतात्म्याची अशी अवहेलना करणं, हे सुभाषबाबूंना अस्वस्थ करून गेलं.

‘शांततेच्या रक्षणासाठी शस्त्र धारण करावं लागलं तरी ते निषिद्ध मानता येणार नाही’ असं सुभाषबाबू म्हणाले. त्यामुळे सुभाषबाबू यांचे क्रांतिकारकांशी निकटचे संबंध आहेत, यावर ब्रिटिश सरकार ठाम झालं. बंगाल प्रांतिक सरकारनं भारत सरकारला तसा अहवाल पाठवला. बंगालचे गव्हर्नर लॉर्ड लिटन हे सतत भारत सरकारच्या संपर्कात राहून सुभाषबाबूंना अटक करण्याची संमती मागत होते. अखेर इंग्लंडहून तशी संमती रवाना करण्यात आली. 1818च्या अधिनियमाचे पुनरूज्जीवन करण्यात आले आणि बंगालसाठी खास अधिनियम नव्यानं काढण्यात आला.

24 ऑक्टोबर 1924 च्या पहाटे चार वाजता पोलिस सह आयुक्त सुभाषबाबूंच्या निवासस्थानी अटकेचं वॉरंट घेऊन पोहोचले. अटक करून त्यांना अलीपूर तुरुंगात पाठवण्यात आलं. देशबंधू चित्तरंजन दास यांनी ह्या अटकेचा निषेध केला. ‘1818चा अधिनियम हा बेकायदेशीर कायदा आहे’, असं दासबाबू म्हणाले. त्यांनी कोलकत्त्यात सलग पाच दिवस अनेक ठिकाणी सभा घेतल्या. पाचव्या दिवशी तर दीड लाख नागरिक सभेला जमले होते. सुभाषबाबूंच्या अटकेने हे लोक संतप्त झाले होते.

सुभाषबाबूंना अलीपूरमधून मंडालेच्या कारावासात पाठवण्यात आलं. त्याच कारावासात पूर्वी लोकमान्य टिळक आणि सरदार अजितसिंग यांना डांबण्यात आलं होतं. इथल्या संपूर्ण प्रतिकूल वातावरणात सुभाषबाबूंची प्रकृती बिघडली. त्यांना अपचनाचा त्रास व्हायला लागला. नंतर नंतर तर प्रकृती फारच बिघडत गेली. क्षयाचा संशय व्यक्त झाला. प्रकृतीच्या कारणास्तव तिथून त्यांना म्यानमारमधल्या इन्सेन तुरूंगात हलवण्यात आलं. अडीच वर्षं आणि एकवीस दिवस गेले. 16 मे 1927 या दिवशी सुभाषबाबूंची सुटका झाली पण त्यांची प्रकृती एवढी खालावली होती की त्यांना जरा उठलं तरी ग्लानी यायची. महिनाभरात सुभाषबाबूंना बरं वाटायला लागलं. त्यानंतर ते काही काळ विश्रांतीसाठी शिलाँगला रहायला गेले.

त्याच काळात सुभाष आणि जवाहरलाल नेहरू अधिकाधिक जवळ येत होते. 1929 मध्ये जवाहरलाल नेहरूंनी संपूर्ण स्वातंत्र्याचा नारा दिला. सुभाषबाबूंनी त्याला पाठिंबा देताना त्यातील उणीवा दाखवून, साम्राज्यांतर्गत स्वराज्याला विरोध केला आणि लढाऊ कार्यक्रमाचा जोरदार पुरस्कार केला! पण त्यांची ही उपसूचना फेटाळण्यात तर आलीच पण गांधीजींनी सुभाषबाबूंना काँग्रेस कार्यकारिणीतूनही काढून टाकलं. यावर जवाहर एक शब्दही बोलले नाहीत, याचं सुभाषबाबूंना जास्त आश्चर्य वाटलं.

त्यानंतर सुभाषबाबूंनी 2 जानेवारी 1930 ह्या दिवशी ‘काँग्रेस लोकशाही पक्षा’ची स्थापना केली. त्यांनी 26 जानेवारी 1930 हा दिवस ‘संपूर्ण स्वातंत्र्याच्या मागणीचा दिवस’ म्हणून घोषणा केली. दरम्यान, क्रांतिकारकांना सरकार देत असलेल्या अमानुष वागणुकीचा निषेध त्यांनी केला. त्याबद्दल त्यांना एक वर्षाची शिक्षा ठोठावण्यात आली. 26 जानेवारी हा त्यांचा स्वातंत्र्यदिन होता, त्या दिवशी ते अलीपूरच्या तुरुंगात बंदिस्त होते पण देशात त्या दिवशी स्वतंत्र भारताचे प्रतिज्ञावाचन झाले. भविष्यात, स्वतंत्र भारतात 26 जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून निश्चित करण्यात आला. ही सुभाषबाबूंना वाहिलेली आदरांजलीच होती.

1930 हे वर्ष मिठाच्या सत्याग्रहाचं! पण सुभाषबाबू कारावासात होते. तिथं त्यांना निर्दयपणे मारहाण झाली. ते बेशुद्ध पडले. त्यानंतर न्यायालयानं त्यांना नऊ महिन्यात मोकळं केलं. लगेचच त्यांनी कोलकत्ता महापौरपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. आपल्या पहिल्या भाषणात त्यांनी न्याय, समता, बंधुता ही समाजवादाची त्रिसूत्री मांडली. दरम्यान, त्यांनी एक बंदीहुकूम मोडल्यामुळं त्यांना एक आठवड्याची शिक्षा झाली.

1931 हे वर्ष सुरू झालं. 26 जानेवारी हा सुभाषबाबूंनी जाहीर केलेला दुसरा ‘स्वातंत्र्यदिन’ आला. त्याची सुभाषबाबूंनी तयारी सुरू केली. त्या दिवशी त्यांना काहीही करता येऊ नये, अगदी सभादेखील घेता येऊ नये म्हणून पोलिसांनी मनाई हुकूम जारी केला. तो झुगारल्यानं सुभाषबाबूंना अमानुष मारहाण झाली. ते रक्तबंबाळ झाले. त्यांच्या उजव्या हाताची दोन बोटे तुटली. त्याच अवस्थेत त्यांना अटक करण्यात आली. कोलकत्त्याचे महापौर असलेल्या सुभाषबाबूंना सहा महिन्यांची शिक्षा झाली. त्या तुरूंगवासातून त्यांची तीन महिन्यात सुटका झाली. त्यानंतर पुन्हा एकदा बंदी हुकूम मोडण्याचा प्रयत्न केल्याबद्दल त्यांची डाक्क्याच्या अलीकडे धरपकड करण्यात आली आणि नंतर सोडून देण्यात आलं.

बंगालमधील सगळ्या क्रांतिकारक चळवळींना सुभाषबाबूंची प्रेरणा आहे, असा 75 पानांचा अहवाल बंगाल सरकारनं तयार करून दिल्लीला पाठवला. हिंदुस्थान सरकारनं त्याच्या आधारे एक खास वटहुकूम काढून बंगाल सरकारला पाठवला आणि सुभाषबाबूंच्या अटकेचं वॉरंट जारी झालं पण त्यांना बंगालमध्ये अटक केली तर लोकांचा प्रक्षोभ होईल म्हणून ते बंगालबाहेर असतानाच अटक करावी, असा निर्णय सरकारनं घेतला.

दुसर्‍या गोलमेज परिषदेत काहीही पदरात न पडता महात्मा गांधी 28 नोव्हेंबर 1931 या दिवशी भारतात, मुंबईला पोहोचले. सुभाषबाबूंनी त्यांची भेट घेतली. व्हॉईसरॉय लॉर्ड विलिंग्डन यांनी गांधीजींची भेट नाकारली. सुभाषबाबूंना याची चीड आली पण ब्रिटिश सरकारपुढे लाचारी न पत्करता प्रखर आंदोलन उभे करण्याच्या त्यांच्या प्रस्तावाकडे गांधीजींनी पुन्हा दुर्लक्ष केले. 1 जानेवारी 1932 दिवशी गांधीजींनी पुन्हा सविनय कायदेभंगाची हाक दिली. हा लढा बंगालमध्ये प्रखर स्वरूपात सुरू करण्याच्या जिद्दीने सुभाषबाबू कोलकत्त्याला परतायला लागले पण मुंबईजवळच, कल्याण रेल्वे स्थानकात सुभाषबाबूंना बंगाल पोलिसांनी अटक केली. मुंबईजवळच्या सेवनी मध्यवर्ती कारागृहात सुभाषबाबूंना नेलं. ते तिथं असतानाच, त्यांना अर्थसहाय्य करतात म्हणून शरदबाबूंनाही पोलिसांनी पकडून त्याच कारागृहात आणलं. सुभाषबाबूंच्या पाठोपाठ महात्मा गांधी, वल्लभभाई पटेल, जवाहरलाल नेहरू इत्यादी नेत्यांनाही अटक झाली. असहकार चळवळ पूर्ण मोडून काढण्याचा सरकारचा डाव होता. सुभाषबाबूंना कारावासात पुन्हा क्षयाची बाधा झाली पण सरकार त्यांना कोलकत्त्याला हलवायला मात्र तयार नव्हते. कोलकत्ता वगळून त्यांना सतत इकडून तिकडे हलवण्यात येत होते. लखनौच्या बलरामपूर रूग्णालयात नेण्यात आले. त्यांची प्रकृती पुन्हा ढासळली. तिथून त्यांना विश्रांतीसाठी स्वित्झर्लंडला पाठवायची तयारी सरकारनं केली. युरोपला जाण्याचा, राहण्याचा खर्च पंधरा हजार रूपये होता पण हितचिंतकांनी ही रक्कम लोकांच्याकडून उभी केली. सुभाषबाबू युरोपला निघाले. नाहीतर त्यांना सरकारनं मुक्त केलंच नसतं. इंग्लंड आणि जर्मनी सोडून उर्वरित युरोपात जाण्याची सुभाषबाबूंना मुभा होती. त्यांनी 23 फेब्रुवारी 1933 या दिवशी दुःखी अंतःकरणानं मायभूमी सोडली. एकवीस दिवसांनी ते इटलीला व्हेनिसच्या किनार्‍यावर उतरले. तिथं त्यांचा पुतण्या अशोकनाथ यानं त्यांचं स्वागत केलं. तिथल्या पत्रकारांना सुभाषबाबू आल्याची बातमी लागली होती. त्यांनी सुभाषबाबूंशी संवाद साधला.

‘‘मी प्रकृती सुधारण्यासाठी इथं आलेलो आहे पण कसाही असो, कुठेही असो, माझ्या मातृभूमीला गुलामगिरीतून मुक्त करणं हेच माझं ध्येय राहील’’ असं सुभाषबाबू पत्रकारांना म्हणाले.

तिथून ते व्हिएन्नाला आले. ऑस्ट्रियाला सुभाषबाबू येत आहेत हे समजल्यावर तिथल्या भारतीय विद्यार्थ्यांनी त्यांना गेल्या गेल्या गराडा घातला. पत्रकार भेटले. सुभाषबाबूंनी पुनरुच्चार केला, ‘‘हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यासाठी झगडणं हेच माझं जीवितकार्य आहे…’’

सुभाषबाबू व्हिएन्नामध्ये एका आरोग्यधामात दाखल झाले. तिथल्या डॉ. फुर्ट यांनी सुभाषबाबूंना जर्मनीच्या दक्षिण भागातील औषधी पाण्याच्या झर्‍यांच्या ठिकाणी जायची सूचना केली. तिथल्या पाण्यानं सुभाषबाबूंचा पोटाचा विकार बरा होईल, असं त्यांनी सांगितलं. मग जर्मनीला जाण्यासाठी सुभाषबाबूंनी इंडिया हाऊसची परवानगी मागितली. सध्या जर्मनी हा हिटलरच्या राजकीय कारवायांनी खूप अस्वस्थ आणि अस्थिर होता. त्यामुळं सुभाषबाबू जर्मनीला जाण्यात सरकारला काही धोका दिसला नाही. म्हणून इंडिया हाऊसनं त्यांना जर्मनीला जायची संमती दिली.

दरम्यान, स्थानबद्ध केलेल्या गांधीजींची सुटका झाली आणि त्यांनी अचानक असहकार आंदोलन स्थगित केलं. हे तिसर्‍यांदा घडलं. सुभाषबाबूंनी पत्रक काढून याविषयी नाराजी व्यक्त केली. गांधीजींवर त्यांनी परखड टीका केली. सुभाषबाबू प्रागला गेले. त्यांनी तिथं इंडियन असोसिएशनची स्थापना केली. असोसिएशनच्या उद्घाटनानिमित्त सुभाषबाबूंनी केलेल्या भाषणात भारतीय स्वातंत्र्याचा उद्घोष केला. त्यानंतर आजारी असतानाही ते युरोपात सर्वत्र फिरत राहिले. 1933 च्या जुलै महिन्यात एके दिवशी ते जर्मनीत बर्लिनला जाऊन पोहोचले. त्या काळात हिटलर हा स्वतःला सर्वश्रेष्ठ वंशाचा समजायचा आणि ब्रिटिश वंशालाही श्रेष्ठ मानायचा. म्हणूनच भारतासाठी ब्रिटिशांशी शत्रुत्व घेण्याची त्याची तयारी नव्हती. सुभाषबाबूंनी असा निष्कर्ष काढला की भारतात जसा बिटिश साम्राज्यवाद हा एक अवमानकारक घटक होता तसा जर्मनीत नाझीवाद होता. हिटलरला आर्यवंशाचा अभिमान होता आणि तो भारतीयांना अनार्य समजून तुच्छ लेखत होता. हिटलरनं त्याच्या ‘माईन काम्फ’मध्ये भारतीयांविषयी काय म्हटलंय, हे सुभाषबाबूंना माहीत होतं पण भारतीय स्वातंत्र्यासाठी सैतानाचंही सहकार्य मिळालं तरीही ते सुभाषबाबूंना घ्यायचं होतं. बर्लिनमध्ये त्यांची प्रकृती पुन्हा बिघडली.

या काळात मुंबई इलाख्याचे माजी गृहमंत्री के. एम. मुन्शी हे बिटिश गुप्तचर यंत्रणेकडून मिळालेली सुभाषबाबूंविषयी चुकीची माहिती महात्मा गांधी-वल्लभभाई पटेल यांना पुरवून त्यांच्याविषयी मत कलुषित करण्याचं कारस्थान करत होते. आपल्या युरोपमधील वास्तव्यात सुभाषबाबू हे मुसोलिनी आणि काही नाझी नेत्यांना भेटल्याचा ब्रिटिश गुप्तचर यंत्रणेने बराच गाजावाजा केला होता पण तसं तर महात्मा गांधीसुद्धा 1931 च्या डिसेंबर महिन्यात मुसोलिनीसह अनेक फॅसिस्ट नेत्यांना भेटले होते.

सुभाषबाबू युरोपात येऊन सव्वा वर्ष झालं. व्हिएन्नामध्ये त्यांनी ‘द इंडियन स्ट्रगल ः 1920-1934’ हा ग्रंथ लिहायला घेतला. ते दररोज सुमारे चार तास एमिली शेंकल यांना मजकूर सांगत. एमिली ते लिहून घेत आणि त्याची टंकलिखित प्रत तयार करत. ज्यू वंशाच्या याच एमिली शेंकल यांच्याशी सुभाषबाबूंनी नंतर विवाह केला. हा ग्रंथ लंडन येथील ‘लॉरेन्स अँड विसहार्ट’ ह्या प्रकाशन संस्थेनं तो 17 जानेवारी 1935 या दिवशी प्रसिद्ध केला पण हिंदुस्थान सरकारनं ग्रंथावर बंदी घातली. ह्या ग्रंथाचा दुसरा भाग 1943 मध्ये सुभाषबाबूंनी लिहिला. त्यात 1934 पासून 9 ऑगस्ट 1942 पर्यंतचा स्वातंत्र्य संग्रामाचा इतिहास आलेला आहे.

1934 च्या डिसेंबर महिन्यात वडील जानकीनाथ आजारी पडल्याची आईनं केलेली तार त्यांना मिळाली. त्यामुळं ते विमानानं भारतात परतले पण ते कोलकत्त्याला पोहोचण्यापूर्वी एक दिवस जानकीनाथांचं निधन झालं. सुभाषबाबूंना विमानतळावर पकडून थेट कारावासात न्यावं, असा बेत सरकारनं आखला पण काही वर्तमानपत्रांनी ती बातमी प्रसिद्ध केल्यामुळं प्रक्षोभ माजला म्हणून सरकारनं विमानतळावरून त्यांना थेट घरात नेऊन सोडलं. वडिलांच्या निधनानंतरचे काही दिवस घरी राहण्यासाठी सुभाषबाबूंनी परवानगी मिळवली.

पण त्यांना पुन्हा युरोपला जाणं भाग होतं. 11 जानेवारीला त्यांनी पुन्हा युरोपला प्रयाण केलं. ते नेपल्सला पोहोचले. 1938 चे काँग्रेस अधिवेशन हरिपुरा या ठिकाणी घ्यायचं निश्चित झालं. गांधीजींनी त्यांच्या मनात डॉ. पट्टाभि सीतारमय्या यांना अध्यक्षपद द्यायचं ठरवलं होतं पण ऐनवेळी त्यांनी निर्णय बदलला आणि सुभाषला आपल्या जवळ आणण्यासाठी हे अध्यक्षपद त्यांना द्यायचा निर्णय घेतला. त्यांनी लंडनमध्ये असलेल्या सुभाषबाबूंना तशी तार केली. गांधीजींचा निर्णय म्हणजे सर्वांचं एकमत!

सुभाषबाबू पुन्हा भारतात परतले. शरदबाबू आणि आई प्रभावती देवीसुद्धा अधिवेशनाला उपस्थित होते. 19 फेब्रुवारी 1938. संध्याकाळच्या वेळी सुभाषबाबू अध्यक्ष ह्या नात्यानं भाषणाला उभे राहिले. मंचावर होते महात्मा गांधी, पं. जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल. अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रश्नांची उकल करत सर्वात तरूण असलेल्या सुभाषबाबूंनी भारतीय स्वातंत्र्य संग्रामाला गांधीजींची किती आवश्यकता आहे याचं प्रतिपादन केलं. त्यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली. काँग्रेसच्या सर्व नेत्यांना नीट समजेल अशाप्रकारे सुभाषबाबूंनी आपले सगळे मुद्दे समजावून सांगितले. स्वातंत्र्य संग्रामासाठी लढणार्‍या सर्व नेत्यांनी आपापसात कितीही वैचारिक मतभेद असले तरी भारतीय स्वातंत्र्य हेच सर्वांचं अंतिम ध्येय असेल, असं सांगितलं. दारिद्य्र, अज्ञान आणि अनारोग्य दूर करण्याला स्वतंत्र भारतात प्राधान्य द्यावं यावर भर दिला.

हरिपुरा अधिवेशनाची सांगता झाली. अतिशय आनंदी मनःस्थितीत सुभाषबाबू मुंबईला परतले.

1939 मध्ये काँग्रेसचे अधिवेशन त्रिपुरी येथे भरणार होते. गांधीजींनी अध्यक्षपदासाठी ‘आपला’ उमेदवार म्हणून पट्टाभि सीतारामय्या यांना उभं केलं पण महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर इंग्लंडनं भारताला स्वातंत्र्य देणं भाग पाडावं अशी ठामपणानं मागणी करणारा लढाऊ बाण्याचा काँग्रेसाध्यक्ष असावा असं सुभाषबाबूंना वाटत होतं. त्यांनी अनेक नावे सुचवली पण कार्यकर्त्यांनी एकाही नावाला संमती दिली नाही. सर्वांच्या मुखी एकच नाव होतं…

…फक्त सुभाषचंद्र बोस!

पट्टाभि सीतारमय्या यांना प्रतिस्पर्धी म्हणून दुसरं कुणीही उभं राहून महात्मा गांधींचा रोष ओढवून घ्यायला तयार नसल्यानं सर्व कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव सुभाषबाबू स्वतः उभे राहिले. ही लढत गांधींजी विरुद्ध सुभाष अशीच होती. गांधीजींचा अहंकार उफाळून आला परंतु स्वतः गांधीजींसह त्यांचे सर्व अनुयायी पट्टाभिंच्या मागे उभे असूनही सुभाषबाबू विजयी झाले.

‘हा पट्टाभींचा नसून माझा पराभव आहे’ असं पत्रक गांधीजींनी काढलं.

स्वातंत्र्ययुद्धासंबंधी गांधीजींशी सुभाषबाबूंची मतभिन्नता वाढत गेली. त्यांनंतर सुभाषबाबूंनी ‘फॉरवर्ड ब्लॉक’ ही आघाडी स्थापन केली.

1939 च्या सप्टेंबर महिन्यात इंग्लंड आणि जर्मनी ह्या दोन राष्ट्रात युद्ध सुरू झाले. देशाला स्वराज्य मिळवण्यासाठी ‘शत्रूचा शत्रू तो आपला मित्र’ ह्या न्यायाने इंग्रजांच्या शत्रूचं-जर्मनीचं सहकार्य आपल्याला मिळेल का, याविषयी सुभाषबाबू विचार करायला लागले. त्यासाठी देश सोडून जाण्याचा मार्ग त्यांना दिसत होता. ते युरोपात राहिलेले होते. तिथल्या परिस्थितीचा त्यांनी चांगला अभ्यास केला होता. आंतरराष्ट्रीय घडामोडींचं त्यांचं आकलन खूप चांगलं होतं.

क्रांतिकारक विचारांचा स्वातंत्र्यसेनानी म्हणून ब्रिटिश पोलिसांनी त्यांच्या 38/2, एल्गिन रोड या घरावर पाळत ठेवलेली होती. तसं पाहिलं तर तत्पूर्वी दहा वेळा त्यांना कारावास झाला होता. आता त्यांच्यावर पुन्हा खटला चालवायचा आणि जन्मठेपेवर पाठवायचं असा ब्रिटिशांचा बेत होता. जन्मठेपेत आपले आयुष्य वाया जाणार हे सुभाषबाबूंना स्पष्ट दिसत होतं. म्हणून त्यांनी देश सोडायचा निर्णय घेतला आणि त्यांनी अज्ञातवास स्वीकारला. देश सोडून काय करायचं याचाही विचार त्यांनी केला होता. आपल्या घरीच एकाकी राहून त्यांनी दाढी वाढवली. पुतण्याला सांगून पठाणाचा पोशाख मागवला. कुठून कुठं जायचं याचा मार्ग निश्चित केला.

16 जानेवारी 1941 च्या मध्यरात्री झोपलेल्या आईचं दर्शन घेऊन, तिच्या चरणांना स्पर्श करून पठाणाच्या वेशात सुभाषबाबू बाहेर पडले. पुतण्या शिशिर त्यांची ‘वाँडरर’ गाडी चालवीत होता. गाडी बराडीला पोहोचली. तिथं आपला आणखी एक पुतण्या अशोकनाथ याची भेट घेऊन ते पुढे रवाना झाले. पूर्णतः गुप्तता पाळण्यात आली. सुभाषबाबूंनी नाव धारण केले होते, ‘महम्मद झियाउद्दीन.’ दिल्ली हे मोठं स्टेशन टाळून ते गोमोहला गेले. तिथं रेल्वे पकडून ते पुढच्या दिशेने रवाना झाले. इकडे सुभाषबाबूंच्या खोलीत ठेवलेलं जेवणाचं ताट रिकामं झालं नाही. उपाशीपोटी सुभाषबाबू कुठं गेले? शोधाशोध सुरू झाली. सुभाषबाबूंचा काहीच पत्ता नव्हता. कोलकत्त्यात ‘हिंदुस्थान स्टँडर्ड’मध्ये पहिल्या पानावर बातमी प्रसिद्ध झाली ः ‘सुभाषचंद्र बोस यांचे काय झाले? घरातून अनपेक्षित प्रयाण’….

सुभाषबाबूंच्या अचानक नाहीशा होण्यानं सार्‍या देशात थरार निर्माण झाला. रवींद्रनाथ टागोर, महात्माजी यांच्यासारख्या मोठ्या व्यक्तिंना चिंता लागून राहिली. तोवर एक विमा एजंट अशी ओळख सांगणारे सुभाषबाबू पेशावरला पोहोचले. तिथून काबूलला जायचं होतं. तिथं त्यांना भगतराम तलवार हा भारत नवजवान सभेचा कार्यकर्ता सुभाषबाबूंना घेऊन पुढे निघाला. पेशावर, शाबकादर, गडंब खोरे, लालपुरा, जलालाबाद, अड्डा शरीफ आणि पुढे काबूल अशा मार्गानं ते पुढे निघाले. सुभाषबाबूंना पुश्तू भाषा येत नव्हती. म्हणून त्यांनी मुक्याचं सोंग घेतलं. जे बोलायचं ते भगतरामनंच. सोबत अबदखानही होता. ठिकठिकाणी ब्रिटिश छावण्या होत्या. प्रत्येक ठिकाणी भगतराम आणि अबदखान उत्तरं द्यायचे. पूर्ण पुश्तू पोशाखातले सुभाषबाबू अगदी अस्सल पठाण दिसत होते आणि एक ठिकाण आलं. तिथं हिंदुस्थानची सीमा संपली. सुभाषबाबूंनी तिथली माती कपाळाला लावली अन् पुढची वाटचाल सुरू झाली. कधी मालमोटारीतून, कधी खेचरावरून तर कधी चालत असा खडतर प्रवास सुरू झाला. असं करत करत ते अफगाणिस्तानच्या सीमेवर काबूलला पोहोचले. एक टप्पा पूर्ण झाला. महायुद्धाचे वातावरण असल्यानं वातावरण ताणलेलं होतं. भगतरामनं रहमतखान हे नाव धारण केलं होतं. तिथे सुभाषबाबू जर्मन वकिलातीत गेले. हे सुभाषचंद्र बोस आहेत, हे ऐकून जर्मन वकिलातीला अचंबा वाटला. पूर्वी सुभाषबाबू जर्मनीला गेले तेव्हा ते परराष्ट्रमंत्री रिबेनट्रॉप यांना भेटले होते. तो संदर्भ आला. बर्लिनला जायचे निश्चित होत होते. त्यांना तिकडे न्यायची व्यवस्था इटालियन वकिलातीकडून करण्यात आली. सुभाषबाबूंनी नवे नाव धारण केले- आर्लान्दो माझोता! त्या नावचं पारपत्र त्यांना देण्यात आलं. दोन दिवसांच्या प्रवासानंतर ते समरकंदला पोहोचले. तिथून मॉस्को. दोन दिवसांनी ते विमानानं बर्लिनला पोहोचले. सुभाषबाबूंनी ‘स्वतंत्र हिंदुस्थान केंद्र’ स्थापन केले. जर्मनीने दहा लाख मार्क्सचा धनादेश सुभाषबाबूंना दिला. याच केंद्राचं नाव ‘आझाद हिंद केंद्र’ असं झालं. 6 नोव्हेंबर 1941 या दिवशी केंद्राची बैठक झाली. याच बैठकीत ‘जय हिंद’ हा पहिला नारा देण्यात आला.

त्यातूनच पुढे सुभाषबाबूंना ‘नेताजी’ म्हटलं जाऊ लागलं. आझाद हिंद सेनेसाठी सैनिक मिळवण्याची तयारी सुरू झाली. हिटलरची परवानगी मिळाली. भारतीय युद्धबंद्यांमधून सेनेची उभारणी होऊ लागली. 26 जानेवारी 1930 या दिवशी भारतात संपूर्ण स्वातंत्र्याची घोषणा करण्यात आली होती. तिचा पुनरुच्चार करण्यात आला. मूळ प्रतिज्ञेतील ‘अहिंसक मार्गाने’ हे शब्द मात्र वगळण्यात आले. 1942 मध्ये ‘आझाद हिंद नभोवाणी केंद्र’ सुरू झाले. सुभाषबाबूंनी आपल्या धीरगंभीर आवाजात भाषण दिलं, ‘होय, मी सुभाषचंद्र बोस बोलत आहे. मी ज्याची वाट पाहत होतो, तो क्षण आता आलेला आहे. हिंदुस्थानच्या द़ृष्टीनं नवयुगाची पहाट.’

भारतात चैतन्याची लाट उसळली. आझाद हिंद सेनेत सैनिक जमा होऊ लागले. त्यांचे प्रशिक्षण सुरू झाले. एके दिवशी सुभाषबाबूंची हिटलरशी भेट झाली. त्यावेळी हिटलरने सुभाषबाबूंना प्रश्न विचारला. ‘‘भारत स्वतंत्र झाल्यानंतर तुम्ही पंतप्रधान होणार आहात का?’’
सुभाषबाबू उत्तरले, ‘‘नाही. स्वतंत्र भारताचा पंतप्रधान देशाची जनता निवडणुकीच्या माध्यमातून ठरवेल.’’

मात्र, भारतीय स्वातंत्र्यासाठी थेट सहकार्य करण्यास हिटलरनं असमर्थता व्यक्त केली आणि सुभाषबाबूंना जपानला जायची सूचना केली. जपानला जाण्यासाठी लहानशा पाणबुडीतून जाण्याला दुसरा पर्याय नव्हता. त्यांच्याबरोबर फक्त एकालाच जाता येणार होते. त्यांनी अबिद हसन यांची निवड केली. बसायची अगदीच अपुरी जागा. नीट उभेही राहता येत नव्हते. युरोप खंडाच्या एका टोकापासून आशिया खंडाच्या दुसर्‍या टोकापर्यंत अत्यंत धोक्याचा समुद्राखालचा प्रवास – 8 फेब्रुवारी 1943 ते 16 मे 1943. अत्यंत धोकादायक परिस्थितीतला हा सुभाषबाबूंचा पाण्याखालचा प्रवास. युरोपातलं एक टोक ते आशिया खंडातलं दुसरं टोक. हा प्रवास सुरक्षित होण्याची एक टक्कासुद्धा शाश्वती सुभाषबाबूंनी बाळगली नव्हती. सलग 88 दिवस सुभाषबाबू एकाच जागी बसून होते. दोस्त राष्ट्रांची विमानं घिरट्या घालत बाँबचा वर्षाव करत होती. खालून जहाजांचा आणि पाणबुड्यांचा धोका होता. गुप्तपणे सुभाषबाबू टोकियोला येऊन पोहोचले. तिथे रासबिहारी बसू त्यांच्यासमोर आले. आझाद हिंद सेनेचे ते अग्रदूत. त्यांच्याकडून आझाद हिंद सेनेची सूत्रे सुभाषबाबूंच्या हाती आली. त्यांनी सेनेसमोर भाषण करून त्यांना युद्धासाठी प्रोत्साहित केले. असंख्य महिलांनीही आझाद हिंद सेनेत येण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांच्यासाठी नेताजींनी झाशी राणी पथक निर्माण केले.

सुभाषबाबूंनी आझाद हिंद सरकारचे मंत्रिमंडळ जाहीर केलं. त्यांच्या अनेक ठिकाणी सभा होऊ लागल्या. आझाद हिंद रेडिओच्या रंगून केंद्रावरून 6 जुलै 1944 या दिवशी सुभाषबाबूंनी महात्मा गांधींना उद्देशून भाषण केलं,

‘हे राष्ट्रपित्या, आम्हाला लढण्यासाठी आशीर्वाद द्या.’

सारा देश विस्मयचकित झाला. ज्या गांधीजींशी वैचारिक मतभेद होते त्यांनाच सुभाषबाबूंनी ‘राष्ट्रपिता’ असं संबोधलं होतं. आझाद हिंद सेनेची युद्धमोहीम सुरू झाली. कॅप्टन रामसिंह यांनी लिहिलेल्या

‘कदम कदम बढाये जा’
खुशीके गीत गाये जा
यह जिंदगी है कौम की
तू कौमपे लुटाये जा

तू शेर-ए-हिंद आगे बढ
मरनेसे फिरभी तू न डर
अस्मान तक उठाये सर
जोश-ए-वतन बढाये जा

‘चलो दिल्ली’ पुकारके
कौमी निशां सम्हालके
लाल किले गाडके
लहराये जा, लहराये जा…

जपानच्या सेनेच्या सहकार्यानं भारताच्या सीमेपर्यंत धडक देण्यासाठी सेना वाटचाल करायला लागली. एका महापराक्रमासाठी तिनं झेप घेतली!

‘साहित्य चपराक’ दिवाळी विशेषांक 2021, पान क्र. 239

चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email - Chaprak Email ID

One Thought to “सुभाष ते नेताजी : एक साहसी गरूडझेप”

  1. is there any other information related to this article if any please let me know

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

हे ही अवश्य वाचा