राजकारण हे एक असं क्षेत्र आहे जिथं कुणाच्याही घरादाराची रांगोळी सहजपणे होते. गंमत म्हणजे वरिष्ठ स्तरावरील नेते कधी एकमेकांशी शत्रूत्व करतात आणि कधी ‘तुझ्या गळा माझ्या गळा’ करतात हे सांगता येणे शक्य नसल्याने या सगळ्यात हाडवैर निर्माण होते ते मात्र सामान्य कार्यकर्त्यांत.
अनेकदा एकाच गावात, एकाच गल्लीत राहणारे मित्र वेगवेगळ्या पक्षाच्या नेत्यांच्या छत्रछायेखाली जातात आणि त्यांची तळी उचलताना आपापसात भांडत राहतात. ही भांडणे इतकी विकोपाला जातात की त्यात दोघेही उद्ध्वस्त होतात. दरम्यान त्यांचे नेते मात्र कोणत्या ना कोणत्या निमित्ताने एकत्र येऊन ‘आमच्यात राजकीय मतभेद असले तरी मनभेद नाहीत,’ अशी शेखी मिरवत असतात.
राजकारण ही एक संधी असते. ती संधी कुणी विकासकामातून दाखवून देतं तर कोणी एकमेकांवरील उट्टे काढून! दोन व्यावसायिक भागिदार राजकारणात येतात. त्यांचं वर्तुळही एकच असतं. दोघांनाही वेगवेगळ्या पक्षांकडून तिकिट मिळाल्याने उणीदुणी काढणं सुरू होतं. ते हमरीतुमरीवर येतात. शह-काटशहाचं, आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण करतात. आपापल्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून कोणत्याही स्तराला जाऊन वर्चस्व प्रस्तापित करण्याचा प्रयत्न करतात. या सगळ्यात भरडले जातात ते त्यांचे कार्यकर्ते! ‘दुसर्याचा बाप मेला म्हणून आपण बोडकं होऊ नये’ इतकं साधं सूत्र त्यांच्या लक्षात येत नाही. मग वैमनस्य वाढत जातं. नेते लढत राहतात. कार्यकर्ते त्यांचे झेंडे उचलतात. कुणीतरी जिंकतं. कुणी पराभूत होतं. पुन्हा सत्तेसाठी, लाभासाठी ते जुळवून घेतात. तोपर्यंत कार्यकर्त्यांची मात्र वाताहत झालेली असते.
गेल्या काही काळात तर पक्षनिष्ठा, विचारधारा याला काडीचीही किंमत राहिली नाही. प्रत्येकाला फक्त ओरबाडणं माहीत असतं. त्यामुळं भेळभत्त्यावर काम करणारे, सतरंज्या उचलणारे कार्यकर्ते सध्या दुर्मीळ झालेत. प्रत्येकजण ‘आपल्याला काय मिळेल?’ याचाच विचार करत असतो. त्यातूनच मग कुण्या भाऊ, दादा, अण्णा, अप्पा, ताई, वहिनी यांच्या मागे फिरणं सुरू होतं. काहीवेळी नेत्यांकडून कौतुक झालं तरी ती अभिमानाची बाब वाटते. नेत्यानं आपल्याला सगळ्यांच्या समोर नावानं हाक दिली, पाठीवर हात टाकला, हात हातात घेतला, सोबत जेवणाचा आग्रह केला अशा गोष्टीही लाखमोलाच्या वाटू लागतात. थोडी अधिकची पोच असेल तर छोटी-मोठी टेंडर मिळतात, मान-सन्मानाचे प्रसंग वाट्याला येतात, काही चुकीची-काही बरोबर असलेली, न होणारी कामं व्यवस्थेला वेठीस धरून करून घेण्यात येतात. मग त्या कार्यकर्त्यालाही धन्य धन्य झाल्यासारखं वाटतं. यातूनच नेत्याच्या ‘आणखी हवे’ वृत्तीचा खेळ सुरू होते. त्या नेत्याच्या विरूद्ध जो कोणी असेल तो कार्यकर्त्यांना त्यांचा पक्का वैरी वाटू लागतो. एकमेकांवर सूड कसा उगवता येईल आणि आपल्या नेत्याला खूश कसं ठेवता येईल यासाठी जो तो धडपडत असतो.
आपली नोकरी सोडून, धंद्याकडे दुर्लक्ष करून नेत्याच्या मागे फिरणारे कमी नाहीत. नेत्यांसाठी उत्साहाच्या भरात छोटे-मोठे गुन्हे आपल्या अंगावर घेणारे, घरादारावर तुळशीपत्र ठेवणारे अनेकजण दिसतील. नंतर अचानकपणे नेत्यानं हात सोडल्यावर त्यांची जी वाताहत होते ती दुर्दैवी असते. ज्यांची संपूर्ण हयात एखाद्या पक्षाच्या कार्यशैलीत गेलीय तो अचानक दुसर्या पक्षात जातो आणि त्याचे कार्यकर्ते मात्र हवालदिलपणे बघत असतात. ‘आपल्या पक्षातून कुणी बाहेर गेला तर तो गद्दार आणि दुसर्या पक्षातून कुणी आपल्याकडे आला तर ते त्याचं हृदयपरिवर्तन’ अशी त्यांच्या नेत्याची भूमिका असते. यातून टिकाटिपन्नी होते, वैयक्तिक गरळ ओकली जाते. कार्यकर्ते भरकटतात. व्यवस्थेवरचा त्यांचा विश्वास उडतो. ज्यांच्यासाठी रक्ताचं पाणी केलं, रात्रीचा दिवस केला ते नेते मात्र त्यांची तुंबडी भरण्यात मश्गुल असतात. त्यांना कोणतीही गोष्ट वर्ज्य नसते. सगळीकडून जेवढं काही ओरबाडता येईल, ओरपता येईल तेवढं ते साधत असतात.
राज्यात अशा असंख्य घडामोडी सातत्यानं घडतात ज्यात कार्यकर्त्यांचीच परवड होते. अनेकदा त्यांना आपल्या नेतृत्वावरील निष्ठा सिद्ध करताना न केलेल्या गुन्ह्यांची शिक्षा भोगावी लागते. त्यात त्यांची होरपळ तर होतेच पण कुटुंबाचीही वाताहत होते. सगळं हातातून निसटून गेल्यावर तो त्याच्या नेत्याला, पक्षाला लाखोल्या वाहत असतो पण वेळ हातातून निघून गेलेली असते. म्हणून ‘कोणता झेंडा घेऊ हाती?’ या प्रश्नाचा खूप गांभिर्याने विचार करायला हवा. राष्ट्रनिष्ठा, पक्षनिष्ठा, विचारधारा हे व असे सगळे थोतांड वाटावे असा सध्याचा काळ आहे. या काळाचा महिमा ज्याला कळला तो सुखी! बाकीच्यांचा ऐन श्रावणातही शिमगा ठरलेलाच.
– घनश्याम पाटील
7057292092
दै. ‘पुण्य नगरी’,
बुधवार, दि. 25 ऑगस्ट 2021
फारच वास्तववादी लेख आहे हा सर. नेत्यांच्या राजकारणात कार्यकर्त्यांची होणारी ससेहोलपटीचे अथवा व्यथेचा खूप चांगला धांडोळा घेतलात सर.