कॅलिडोस्कोप – हायव्होल्टेज ड्राम्यांचा!

कॅलिडोस्कोप - हायव्होल्टेज ड्राम्यांचा!

केंद्रीय लघु व सूक्ष्म उद्योग मंत्री नारायण राणे यांना रत्नागिरी पोलिसांनी संगमेश्वर येथून अटक केली आणि चर्चा सुरू झाली ती हायव्होल्टेज ड्राम्याची! एखादी गोष्ट अनपेक्षितपणे घडणे आणि त्याभोवती सगळे गरगरा फिरणे म्हणजे हायव्होल्टेज!

विसाव्या आणि एकविसाव्या शतकातील बरेचसे हायव्होल्टेज ड्रामे हे वैयक्तिक स्वार्थासाठी झालेले आहेत. त्यातून महाराष्ट्राचा काही फार मोठा फायदा झाला नाही. त्यामुळे ‘हायव्होल्टेज ड्रामा’ फक्त एक आणि एकच असेल तर तो म्हणजे अफजलखानाचा वध! समोरच्या माणसाला भेटायला बोलवायचं आणि त्याला मारून टाकायचं, अशी ज्याची स्वतःची एक मोडस ऑपरेंडी होती अशा अफजलखानाला त्याचीच पद्धत वापरून ठार मारणं या इतका हायव्होल्टेज ड्रामा जगाच्या इतिहासात दुसरा असूच शकत नाही.

महाराष्ट्रातले पहिले दोन हायव्होल्टेज ड्रामे विचारात घेतले तर ते म्हणजे अफजलखानाचा वध आणि शाहिस्तेखानाची बोटं कापणं! या दोन ड्राम्यांनी जगाला महाराष्ट्राचा नवा इतिहास दिला. त्यामुळे भारताचा भूगोल बदलला. मराठी माणसाचा स्वाभिमान आणि त्याच्या अंतःकरणात स्वराज्याचं स्फूल्लिंग निर्माण करण्याचं आणि आत्मविश्वास देण्याचं काम या घटनांनी केलं. हे ड्रामे करायचे म्हणून केले गेले नाहीत, तर काळाची, देश आणि धर्माची आवश्यकता म्हणून केले गेले. त्यातून राष्ट्रउभारणीला मोठी मदत झाली. महाराजांची आग्य्राहून सुटका हाही हायव्होल्टेज ड्रामाच आहे. शिवचरित्रात असे अनेक हायहोल्टेज ड्रामे आढळून येतात पण प्रतापगडाच्या पराक्रमाशी त्याची तुलना होऊ शकत नाही. महाराजांनी जे हायव्होल्टेज ड्रामे केले त्यामुळे महाराष्ट्राची उंची वाढली. महाराष्ट्राचा स्वाभिमान वाढला. मराठ्यांच्या इतिहासातील सोनेरी पानं म्हणता येतील अशा प्रकारचा इतिहास महाराजांनी निर्माण केला.

त्या पुढच्या काळात बाजीराव पेशव्यांनी मस्तानीला शनिवारवाड्यात आणून ठेवणं हाही फार मोठा हायव्होल्टेज ड्रामा होता. त्यानं मराठी समूदायाला एक नितांतसुंदर आणि देखणी अशी प्रीतिकथा मिळाली. आपल्याकडे यापूर्वी अशी प्रीतिकथा दिसत नाही. चिमाजीअप्पाचं असं काही म्हणणं नव्हतं की बाजीरावांनी ही बाई ठेवू नये! पतीनिधनानंतर ते दुःख बाजूला ठेवून राधाबाईंनी बाजीरावांना पेशवाईची वस्त्रं घेण्यास सातार्‍यास पाठवलं. अत्यंत चतुर, कर्तव्यकठोर असलेल्या राधाबाईही मस्तानीकडं दुर्लक्ष करायला तयार होत्या. काशीबाईचंही म्हणणं नव्हतं की आपल्या नवर्‍यानं दुसरी बाई ठेवू नये! त्या सगळ्यांचं इतकंच म्हणणं होतं की, अंगवस्त्र हे अंगवस्त्रच असावं! मस्तानीला शनिवारवाड्यात प्रवेश नाही! तिला तिकडं दूर कोथरूडला ठेवा! बाजीरावांचं म्हणणं होतं की हे अंगवस्त्र नाही! मी तिच्यासोबत लग्न केलंय. मी तिला इथं शनिवारवाड्यावर घेऊन येणार आणि ती इथंच आपल्यासोबत राहणार! शिवाय तिच्यापासून झालेल्या मुलाची मुंजही व्हायलाच हवी. ती अंगवस्त्र नाही तर माझी बायको आहे आणि तिच्याशी त्याच आदबीनं आपण सगळ्यांनी वागायला हवं! माझ्याकडून तुम्ही तीर्थक्षेत्र काशीच्या मुक्तीची अपेक्षा ठेवता, रामेश्वरच्या मुक्तीची अपेक्षा धरता, नर्मदेच्या पार जाऊन चंबळच्या पलीकडे मी पराक्रमाचे घोडे नाचवावेत म्हणून अपेक्षा धरता, दिल्ली ताब्यात घ्यावी अशी अपेक्षा व्यक्त करता आणि त्यासाठी मी लढावं असं म्हणता! मग मस्तानीनं माझा धर्म स्वीकारूनही तिला तुम्ही माझी बायको म्हणून का स्वीकारत नाही? त्यामुळं बाजीरावांनी मस्तानीला शनिवारवाड्यात आणणं हा हायव्होल्टेज ड्रामाच होता. त्यातून राज्याला काही मिळालं नसलं तरी ही एक अद्भूत प्रीतिकथा निर्माण झाली.

नारायणराव पेशव्यांचा खून ही आपल्या इतिहासातील सगळ्यात काळी घटना आहे. आपल्या पुतण्याला सांभाळू न शकणारा काका हा मराठ्यांच्या इतिहासात पूर्वी कधीही नव्हता. नंतरच्या काळातील काकांना आपल्या पुतण्याचा सांभाळ करता आला नाही पण त्याचा खून कोणी केला नाही. इतकंच काय, त्यांचा राजकीय खून करावा इतकेही काका निर्दयी नव्हते आणि नाहीत. आपले बाप मारणं, भाऊ मारणं आणि सत्ता काबीज करणं ही मुघलांची परंपरा होती. एकेरात्री अचानक गारदी येतात, शनिवारवाड्यात घुसतात आणि मराठ्याच्या गादीच्या वारसाला, पेशव्यांच्या वारसाला अशा पद्धतीनं मारलं जातं ही कमालीची तिरस्करणीय घटना होती. नवरा ‘धरावा’ लिहितो आणि बायको ते पत्र हातात घेऊन ‘ध’ चा ‘मा’ करत ‘मारावा’ लिहिते आणि ते पत्र गारद्यांच्या हातात जातं यासारखी दुर्दैवी घटना नाही. राजकारणात बायकांचा हस्तक्षेप किती त्रासदायक होऊ शकतो, हे आजच्या काळात अकारण ट्विट करणार्‍या बायकांच्या नवर्‍यांनी या इतिहासातून लक्षात घ्यायला हवं. नारायणरावांचा राघोबादादा आणि आनंदीबाईंनी खून करणं हा त्या काळातला सगळ्यात मोठा हायव्होल्टेज ड्रामा होता.

नंतरचा काळ पाहता महाराष्ट्र एकीकरण समितीनं ठरवलं होतं की पंडित नेहरूंच्या हस्ते प्रतापगडावर शिवाजीमहाराजांच्या पुतळ्याचं अनावरण होऊ देणार नाही. एकीकरण समितीचे हजारो कार्यकर्ते वाईत नेहरूंना काळे झेंडे दाखवून गाड्या अडवण्याच्या तयारीत होते. वाईच्या गणपती घाटापासून पाचगणीच्या घाटापर्यंत हजारोंचा जनसमुदाय ठाण मांडून बसला होता. लोक अक्षरशः आडवे पडले होते. काहीही झालं तरी नेहरूंची गाडी वर जाऊ द्यायची नाही असा त्यांचा निश्चय होता. नेहरू पुण्यातून वाईमार्गे महाबळेश्वरला जाणार हे निश्चित होतं. मात्र यशवंतरावांनी या सगळ्यांना कात्रजचा घाट दाखवत त्यांना भिलार-मेढ्याहून महाबळेश्वरला नेलं. पंडितजी काळे झेंडे न बघताच प्रतापगडावर पोहोचले आणि पुतळ्याचं अनावरण करून दिल्लीला परतले. काळे झेंडे दाखवणारा एकही आंदोलक पंडित नेहरूंना दिसू नये, एवढी दक्षता यशवंतरावांनी घेतली आणि ती यशस्वी करून दाखवली. उत्तर प्रदेशचे रहिवासी असलेल्या पंडित नेहरूंना शिवभक्तांपासून वाचवून यशवंतरावांनी नेहरूंची पाठराखण केली. मराठी माणसाला त्यापासून मिळालं मात्र काहीच नाही. यशवंतरावांचा हा हायव्होल्टेज ड्रामा यशस्वी झाला असला तरी जर नेहरू वाईमार्गे गेले असते तर त्यांना मराठी माणसाचा रोष कळला असता. कदाचित त्यामुळे कारवार, निपाणी, बेळगाव हा सीमाभाग महाराष्ट्राला मिळण्यास मदत झाली असती.

1978 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना आपली कामगिरी दाखवू शकली नाही. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीतही सेनेचा दारूण पराभव झाला. त्याची सगळी जबाबदारी स्वीकारत बाळासाहेब ठाकरे यांनी राजकारण संन्यास घेतला होता. हजारो शिवसैनिक मातोश्रीवर जमले. बाळासाहेबांनी शिवसेनाप्रमुखपदाचा राजीनामा दिला. तो कुणाकडे दिला हे त्यांचं त्यांनाच माहिती! पण ही घटना घडली होती. दोन दिवस सगळीकडे मुलाखती झाल्या. वृत्तपत्रांनी रकानेच्या रकाने भरले. प्रचंड ताण-तणाव निर्माण झाले आणि तिसर्‍या दिवशी बाळासाहेबांनी माघार घेतली. ‘हजारो शिवसैनिकांच्या इच्छेला, त्यांच्या विनंतीला मान देऊन मी मागे हटतोय. आजवर मी आदेश दिला पण यावेळी शिवसैनिकांच्या आदेशाला मान देऊन मी पुन्हा शिवसेनाप्रमुखपद स्वीकारतोय’ अशा आशयाचं विधान करून त्यांनी हा हायव्होल्टेज ड्रामा संपवला.

गेल्या काही काळातला हायव्होल्टेज ड्रामा म्हणजे पहाटे-पहाटे फडणवीस आणि अजितदादांनी घेतलेली शपथ. याची तर कुणी कल्पनाही केली नव्हती. त्यावेळी हे सगळं नेमकं काय घडलं होतं हे अजूनही कळत नाही. ही कल्पना कुणाची होती, त्यातून साध्य काय झालं, दादा गेले की त्यांना पाठवलं गेलं हे सगळं अनुत्तरीत राहिलं.

…आता नारायण राणे यांच्या अटक आणि सुटकेच्या नाट्यानं ‘हायव्होल्टेज’ची चर्चा सुरू आहे. त्यातून महाराष्ट्राला काय मिळणार, कुणाचं भलं होणार आणि कुणाची वाताहत होणार हे नजिकच्या काळात दिसेलच! पण राज्याचं आणि पर्यायानं देशाचंही भलं व्हावं अशा हायव्होल्टेज ड्राम्याची महाराष्ट्राला आजही गरज आहे.
– घनश्याम पाटील
7057292092

दै. ‘पुण्य नगरी’,
रविवार दि. 29 ऑगस्ट 2021

चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email - Chaprak Email ID

6 Thoughts to “कॅलिडोस्कोप – हायव्होल्टेज ड्राम्यांचा!”

 1. Prachi Kulkarni

  हाय व्होलटेज लेख👍

 2. Vaishali Ritesh Deshmukh

  खूप छान लिहलय. स्टेटस ला बघताच हातात वृत्तपत्र घेतल. वाचतांना लेखात एखाद्या मराठी चित्रपटा मध्ये सस्पेन्स वाढवा तसा अनुभव आला. आपल्या लेखणीचा हेच वैशिष्ट्य आहे. ते सहजासहजी उलगडत नाही.यातून अभ्यासू वृत्तीचा, तीव्र बुद्धिमतेचा उलगडा होतो. नेहमी प्रमाणे फारच उत्कृष्ट लेखन👌💐

 3. Vinod s. Panchbhai

  जबरदस्त लेख…
  वाचताना खिळवून ठेवलंय!

 4. Pralhad Dudhal

  नेहमीप्रमाणेच वाचनीय

 5. Dr Vitthal K Jaybhaye

  वा, घन:शामजी! किती सहज, ओघवती शैली आहे तुमची! घडा घडा शिवकाळापासून ते वर्तमानापर्यंतच्या सर High Voltage Drama च्या घटना हुबेहूब चितारल्या…पण सुरुवात वाचतांना जे शहारे आले…ते पुन्हा एकदा मस्तानी च्या वेळेला कळवळले…आणि नंतर मात्र सगळे स्वार्थीच ड्रामे झाले…
  असो खूपच सुंदर अप्रतिम लेख!!!👌👍

 6. Ramkrishna Adkar

  फारच विषयानुरूप आणि सविस्तर विवेचन ! गेल्या ४००-५०० वर्षातील महाराष्ट्रातील सर्व high voltage नाट्यपूर्ण घटनांचा आढावा उत्कृष्ट रीतीने घेतला आहे ! राणेंसंबंधी नाट्यावर अधिक भाष्य होते तर मजा आला असता !

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

हे ही अवश्य वाचा