नारायणऽऽ नारायणऽऽऽ

प्रभू श्रीराम, लक्ष्मण आणि सीतामैय्या वनवासात होते. चौदा वर्षांचा वनवास होता. वनवासाचा दिनक्रम ठरलेला असायचा. सकाळी लवकर उठून लक्ष्मणानं सरपण आणायचं, कंदमुळं आणायची! सीतामाईंनी भोजनाची व्यवस्था करायची! रामानं संरक्षण करायचं! दिवसभर प्रवास करायचा आणि आजूबाजूच्या परिसराचं निरिक्षण करून मुक्कामाची जागा रामानं निश्चित करायची. लक्ष्मणानं झोपडी उभी करायची. आवश्यक ते सामान आणायचं. सीतामाईनं जमेल तसं रांधायचं… दिवसभर एकमेकांशी सुखदुःखाच्या गप्पागोष्टी करायच्या. एकमेकांशी अतिशय प्रेमानं वागायचं असा त्यांचा दिनक्रम सुरू होता.

असा प्रवास सुरू असताना एकेदिवशी लक्ष्मण वैतागला. त्यानं सांगितलं, ‘‘मी मूर्ख आहे म्हणून तुमच्याबरोबर आलो. इथं येऊन मला लाकडं गोळा करावी लागतात, सगळी कामं करावी लागतात.’’

त्याचं ऐकून सीतामाईही खवळल्या. त्या म्हणाल्या, ‘‘मी मिथिलानगरीची राजकन्या. तुमच्याबरोबर मी वनवासात आले आणि इथं तुमचा स्वयंपाक करण्याची वेळ माझ्यावर आली… कुठून मी वनवासात तुमच्यासोबत आलेय असं झालंय…’’

राम म्हणाले, ‘‘कशाला आलात तुम्ही दोघे माझ्यासोबत? मी तुम्हाला निमंत्रण दिलं होतं का? विनाकारण ही बिनकामाची पिडा मी वनवासात सोबत घेऊन आलो…’’

या भांडणाच्या धुसफुसीत रात्र गेली. दुसरा दिवस उजाडला. तोही संपला. पुढचा प्रवास सुरू झाला. या प्रवासात त्यांना वशिष्ट मुनी भेटले. त्यांनी विचारलं, ‘‘रामा कसं चाललंय वनवासात?’’

राम म्हणाले, ‘‘अहो ही पाच-सहा वर्षे फार चांगली गेली. काही त्रास नव्हता. लक्ष्मण माझ्या शब्दाबाहेर नव्हता. सीता सगळं काम करायची. राजवाड्यापेक्षा आम्ही सुखात होतो… पण परवा सीतेनं स्वयंपाकावरून भांडणं केली. लक्ष्मणानं तिच्याशी वाद घातला. माझाही राग अनावर झाला. मी कधी अपशब्द वापरत नाही पण परवा माझ्याकडून तोही प्रमाद घडला… काय प्रकार आहे हा?’’

त्यावर वशिष्ट मुनी म्हणाले, ‘‘रामा, यात तुझा दोष नाही, सीतेचा दोष नाही. लक्ष्मणाचाही दोष नाही. तुम्ही महाराष्ट्राच्या पावन भूमित आलेले आहात. आता इथून बाहेर पडेपर्यंत तुम्ही एकमेकांशी भांडतच राहणार आहात…’’

महाराष्ट्राची भूमी ही या पद्धतीनं पूर्वापारापासून कदाचित प्रसिद्ध असावी. शिवशाही, पेशवाई ते आजच्या काळातलं राजकारण! महाराष्ट्रात भाऊबंदकी नवी नाही. एकमेकांचे कौटुंबीक आणि सामाजिक हेवेदावेही महाराष्ट्रानं बघितलेले आहेत. हा एकमेकांशी असलेल्या वादाचा, दुहीचा आणि संघर्षाचा जो परिणाम आहे त्याचा लाभ शत्रूने अनेकदा उठवला आहे पण मराठी माणूस यापासून काही शिकायला तयार नाही. औरंगजेबाच्या छावणीचे कळस कापणारा संताजी घोरपडे औरंगजेबाचं लक्ष होता. तो औरंगजेबाला मिळाला तो म्हसवडच्या नागोजी मानेच्या फितुरीमुळे! वीर संताजी घोरपडेंचं मस्तक कापून जहागिरीसाठी घरभेदी करणारे मराठे सर्वकाळात होते आणि आहेत. अफजलखानाचं अस्मानी संकट स्वराज्यावर आलेलं असताना अफजलखानाला जाऊन मदत करणारा खंडोजी खोपडे देशमुख हाही महाराष्ट्राला माहीत आहे आणि वतनासाठी, जहागिरी मिळावी म्हणून रायगडाच्या प्रवेशद्वाराचे दरवाजे उघडे करून देणारा सूर्याजी पिसाळ हा देखील इतिहासात प्रसिद्ध आहे. दुहीमुळं, भाऊबंदकीमुळं आणि घरभेदीपणामुळं मराठेशाहीला आणि मराठी माणसाला अनेक वर्षे त्रास झालेला आहे. मराठी माणूस संकटात गेलेला आहे. तरीही आम्ही यातून काही बोध घ्यायला तयार नाही.

भारतात असणारे अनेक समाज एकमेकांना मदत करतात. एखाद्या गुजराती कुटुंबातला मारवाडी माणूस धंद्यात मागे पडला तर ते ऐकमेकांना मदत करतात. जो मागे पडलेला आहे, कर्जबाजारी झालेला आहे त्याला मदतीचा हात देऊन पुढे आणतात. त्याउलट मराठी माणसाचं वागणं आहे. एखादा पुढे जात असेल तर त्याला मागं कसं आणता येईल याचाच तो विचार करत असतो. त्यामुळं महाराष्ट्रानं देशाला दिलेला कोणता खेळ असेल तर तो कबड्डी आहे आणि खो खो आहे. हे खेळ महाराष्ट्रानं जगाला द्यायचं कारण आमच्या स्वभावात आणि वृत्तीत तर नसेल? या भाऊबंदकीपासून छत्रपती शिवाजीमहाराज सुद्धा सुटले नाहीत. महाराज कर्नाटकात गेले. एवढा दिग्विजय केला. आदिलशाही आणि कुतुबशाही महाराजांपुढं नतमस्तक झाली. महाराजांनी आपल्या भावाला, व्यंकोजीराजाला विनंती केली की, ‘‘तू स्वराज्यात ये!’’

त्यानं ‘‘नाही’’ म्हणून सांगितलं. महाराज म्हणाले, ‘‘किमान वडिलांचे युद्धात मिळवलेले जे छत्र होते ते तरी मला दे!’’

‘आज झेंडे मागितले, उद्या जहागीर मागेल’
म्हणून व्यंकोजीराजे शिवाजीराजांसोबत आले नाहीत. त्यांनी महाराजांसोबत काम करणं नाकारलं आणि जंगलात जाऊन राहिले.

महाराजांना अतिशय पश्चाताप झाला आणि त्यांनी जिंकलेला प्रदेश त्यांना दिला. व्यंकोजींच्या पत्नीला एक गाव चोळी-बांगडीसाठी दिलं आणि पत्र लिहिलं. त्यात ते म्हणतात, ‘‘तुम्ही जन्माने धाकुटे जन्माला आलात आणि वृत्तीनेही तसेच निघालात.’’

ही भाऊबंदकी मराठी माणसाच्या पाचवीला पूजलेली दिसतेय. काळ बदलतोय. संदर्भ बदलताहेत. वृत्ती मात्र तिच आहे. ‘नारायणऽऽ नारायणऽऽऽ’ म्हणत हे सगळं हतबलपणे बघण्याखेरीज सामान्य माणसाच्या हातात दुसरे काही आहे का?
– घनश्याम पाटील
7057292092

चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email - Chaprak Email ID

6 Thoughts to “नारायणऽऽ नारायणऽऽऽ”

  1. Nagesh S Shewalkar

    लेख अत्यंत अभ्यासपूर्ण आहे. शेवटचे वाक्य ठसठशीत, कटू सत्य आहे.

  2. रविंद्र कामठे

    अतिशय समर्पक असा सध्याच्या राजकीय परिस्थितीचे विवेचन करणारा हा लेख सर.

  3. Ramkrishna Adkar

    सुंदर लेख! जोरदार चपराक ! मराठी माणूस आपसातील भांडणे देशप्रेमापेक्षा महत्वाची मानतो हे महाराष्ट्राचे दुर्दैव !

  4. जयंत कुलकर्णी

    उदाहरणे समर्पक आहेत.

  5. Prachi Kulkarni

    Wonderful article. Must read. Words are mighter than sword. It’s a proof….. Prachi Kulkarni

  6. Pralhad Dudhal

    उत्तम लेख

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

हे ही अवश्य वाचा