रायरेश्वराच्या मंदिरात वयाच्या पंधराव्या वर्षी आपले बालमित्र आणि मावळ्यांसोबत शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्मितीची शपथ घेतली आणि आदिलशाही व मोगलशाही विरुद्ध उघड संघर्षाला सुरुवात झाली. शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्मितीची शपथ घेईपर्यंत आलमगीर औरंगजेबाचा सर्वात मोठा शत्रु म्हणजे आदिलशाहीच होती पण १६५९ साली शिवाजी महाराजांनी स्वतः प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजलखानाचा कोथळा बाहेर काढून वध केला आणि या घटनेने औरंगजेबाच्या मनातही जबर भीती निर्माण केली.
ही भीती निर्माण होण्याचे कारण म्हणजे भूतकाळातील आदिलशाही आणि मोगलशाहीतील संघर्षात अफजलखानाने औरंगजेबाला दिलेली मात. औरंगजेबाला हे आता कळून चुकले होते की आपला मुख्य शत्रू आता आदिलशाही नसून शिवाजी महाराज आणि त्यांचे मावळे आहेत. शिवाजी महाराजांच्या स्वराज्य विस्ताराला आवर घालण्यासाठी आलमगीर औरंगजेबाने आपले अनेक पराक्रमी सरदार आक्रमणासाठी पाठवायला सुरुवात केली. स्वतःचा मामा शाहिस्तेखानालाही शिवाजी महाराजांचा बंदोबस्त करण्यासाठी औरंगजेबाने धाडले होते. शाहिस्तेखानाचा मुक्काम पुण्यातील लाल महालात होता. त्यावेळी मोगली फौजा मराठी स्वराज्यात लूट-पात माजवत होत्या. याचा बिमोड करण्यासाठी शिवाजी महाराजांनी १६६३ साली स्वतः लाल महालात घुसून शाहिस्तेखानाची बोटे कापण्याचा पराक्रम केला. जिवाच्या भीतीने शाहिस्तेखानाने परतीचा मार्ग स्वीकारला. हा औरंगजेबासाठी नक्कीच खूप मोठा अपमान होता. याउपर मोगली फौजांच्या आक्रमणाने स्वराज्याचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी १६६४ साली शिवाजी महाराजांनी सुरत वर आक्रमण केले. सुरत ही मोगलांची आर्थिक राजधानी होती. सुरतेमधून मराठी स्वराज्याला खूप मोठा खजिना प्राप्त झाला.
सुरतच्या लुटीने औरंगजेब प्रचंड संतापला आणि स्वराज्याच्या मुळावर उठला. औरंगजेबाने तब्बल ८०००० फौज सोबत देऊन आपला सर्वात विश्वासू सरदार मिर्झाराजे जयसिंग याला १६६५ साली स्वराज्यावर आक्रमण करण्यासाठी पाठवले पण मागील जिव्हारी लागणारा पराभव बघता औरंगजेब आता कोणावरही विश्वास ठेवायला तयार नव्हता. त्यातही मिर्झाराजे जयसिंग हे हिंदू राजपूत होते. शिवाजीराजे आणि मिर्झा राजे एक तर होणार नाहीत या शंकेने औरंगजेबाने आपला अजून एक विश्वासू सरदार दिलेरखान याला देखील मिर्झाराजे सोबत पाठवण्याचा निर्णय घेतला. मिर्झाराजे जयसिंग हा एक अतिशय पराक्रमी, मुत्सद्दी, धूर्त आणि मोगल साम्राज्यातील औरंगजेबाचा सर्वात विश्वासू सरदार होता. जयसिंग यांना राजे हा किताब औरंगजेबानेच बहाल केला होता. स्वराज्यावर चालून येताना दिलेरखानाला मात्र मिर्झाराजे यांचं नेतृत्व मनोमन मान्य नव्हते. पुण्याला पोहोचल्यावर आक्रमण स्वराज्यातील प्रदेशावर करायचे की गड-किल्ल्यांवर याबद्दल मिर्झाराजे आणि दिलेरखानामध्ये मतभेद निर्माण होऊ लागले. गड-किल्ल्यांवर आक्रमण करून ते ताब्यात घेणे सोपे नाही हे मिर्झाराजे जाणून होते. मावळ्यांच्या गनिमी काव्याची त्यांना माहिती होती पण दिलेरखानाने पुरंदर किल्ल्यावर आक्रमण करायचे ठरवले. १६६५ साली शिवाजी महाराजांच्या ताब्यात ३५ किल्ले होते. त्यातील पुरंदर, कोंढाणा, तोरणा हे सर्वात महत्त्वाचे आणि मजबूत किल्ले होते. पुरंदर जर ताब्यात आला तर शिवाजी महाराज शरणागती पत्करतील असा दिलेरखानाचा कयास होता.
पुरंदर ताब्यात घेण्यासाठी दिलेरखानाने सर्वात आधी वज्रगडावर आक्रमण केले. त्यावेळी पुरंदरचे किल्लेदार होते मुरारबाजी देशपांडे. मुरारबाजी म्हणजे समशेर बहाद्दर व्यक्तिमत्व होते. दिलेरखान आणि त्याच्या प्रचंड फौजे पुढे मुरारबाजींनी निकराने किल्ला लढवला. त्यांनी दिलेरखानाच्या हाती किल्ला जाऊ दिला नाही. मुरारबाजींचा तलवारीचा पराक्रम बघून दिलेरखानाने ऐन रणांगनातच त्यांना मोगल साम्राज्यात सामील होण्याचे आमिष दाखवले. पण स्वराज्यनिष्ठ मुरारबाजींनी हा प्रस्ताव जागीच धुडकावून लावला. या युद्धात कंठामध्ये बाण लागून मुरारबाजी देशपांडे धारातीर्थी पडले. मावळे तरीही लढत राहिले आणि त्यांनी पुरंदर वाचवला पण सामान्य जनतेचे होणारे हाल आणि मुरारबाजी देशपांडे यांचे धारातीर्थी पडणे यामुळे शिवाजी महाराजांना अति दुःख झाले. महाराजांनी हे ओळखले की अफजलखान, शाहिस्तेखान यांनी याआधी केलेल्या आक्रमणापेक्षा यावेळेसचे आक्रमण खूप मोठे आहे. शिवाजी महाराजांना जनतेचे हाल होऊ द्यायचे नव्हते आणि स्वराज्याचे शिलेदारही गमवायचे नव्हते. शिवाजी महाराजांनी मिर्झाराजे जयसिंग यांच्या सोबत तह करण्याचा निर्णय घेतला. तिकडे मिर्झाराजे यांच्या मनातही शंका होती की जर आदिलशाही फौजा शिवाजी महाराजांच्या मदतीला आल्या तर आपला टिकाव लागेलच असे नाही. म्हणून मिर्झाराजांनीही नमते घेण्याचे धोरण ठरवले. ११ जून १६६५ रोजी शिवाजी महाराज मिर्झाराजे जयसिंग यांना भेटायला त्यांच्या छावणीत गेले. दिलेरखानाचे यावेळेसही पुरंदर किल्ल्यावर आक्रमण सुरूच होते. शिवाजी महाराजांनी पुरंदर किल्ल्यावरील आक्रमण थांबल्याशिवाय तह करण्यास मिर्झाराजांना नकार दिला. मिर्झाराजांनी पुरंदरावरील आक्रमण थांबवण्याचे तात्काळ आदेश दिले. दिलेरखान इथेही तह करण्याच्या विरोधातच होता. हा तह जर यशस्वी झाला तर त्याचे श्रेय मिर्झाराजांना जाणार होते आणि दिलेरखानला नेमके हेच नको होते.
११ जुनला सुरू झालेल्या वाटाघाटी १३ जुन १६६५ ला संपल्या आणि या दिवशी ५ कलमी तहाचा मसुदा अंतिम करण्यात आला. हा मसुदा मिर्झाराजांनी आलमगीर औरंगजेबाकडे पाठवून दिला. यातील काही प्रमुख कलमे पुढील प्रमाणे होते.
१) शिवाजी महाराजांना ३५ पैकी २३ किल्ले मोगलांच्या स्वाधीन करावे लागणार होते. यातील काही प्रमुख किल्ल्यांची नावे होती पुरंदर, कोंढाणा, लोहगड.
२) या २३ किल्ल्यांच्या परिसरातील चार लक्ष होणांचा प्रदेशही मोगलांना द्यायचा होता. होण हे तेव्हाचे चलन होते. शिवाजी महाराजांकडे १ लक्ष होणांचा प्रदेश शिल्लक राहणार होता.
३) तळ कोकणातील प्रदेश शिवाजी महाराजांकडेच राहणार होता. त्याबदल्यात पुढील १३ वर्षासाठी ४० लक्ष होण खंडणी मोगलांना देण्याचे ठरले.
४) शिवाजी महाराजांनी औरंगजेबाच्या सेवेत काम करण्यास नकार दिला. त्याऐवजी संभाजी महाराजांना मोगलांची पाच हजारी मनसब देण्याचे ठरले. पण तेव्हा संभाजी महाराजांचे वय फक्त सहा वर्ष होते म्हणून त्यांच्या तर्फे नेताजी पालकर यांनी प्रतिनिधित्व करण्याचे ठरले. नेताजी पालकर म्हणजे इतिहासात प्रति-शिवाजी म्हणून ओळख असलेले व्यक्तिमत्व.
५) शिवाजी महाराजांनी तहाची बोलणी पूर्ण झाल्यावर आग्रा येथे औरंगजेबाची त्याच्या वाढदिवसाला भेट घेण्याचे मान्य केले. या भेटीदरम्यान शिवाजी महाराजांच्या संरक्षणाची जिम्मेदारी मिर्झाराजे जयसिंग यांनी स्वतः कडे घेतली.
या तहामुळे स्वराज्याचे तात्कालिक नुकसान नक्कीच झाले होते. त्यानंतर शिवाजी महाराजांना आग्रा येथे औरंगजेबाकडून कैद देखील झाली होती पण हा तह करताना शिवाजी महाराजांनी बरीच मोठी दूरदृष्टी दाखवली होती. जे २३ किल्ले तहामध्ये द्यायचे ठरले होते ते मुळतः मोगलांचेच किल्ले होते. तोरणा, राजगड, शिवनेरी सारखे महत्त्वाचे किल्ले शिवाजी महाराजांना राखून ठेवण्यात यश आले होते. या तहामुळे सामान्य जनतेचे होणारे हाल थांबले होते. आग्रा येथील कैदेतून सुटल्यानंतर शिवाजी महाराजांनी आणि स्वराज्याच्या शिलेदारांनी परत एक एक किल्ला जिंकण्यास सुरुवात केली. हा तह १३ जून १६६५ रोजी झाला होता. आणि तह झाल्यानंतर महाराजांकडे १२ किल्ले उरले होते. पण पुढील १५ वर्षात म्हणजेच १६८० पर्यंत शिवाजी महाराजांकडे तब्बल २०० किल्ले होते. हा तह जेवढा ऐतिहासिक आहे तेवढाच सामान्य माणसाला प्रेरणादायी पण आहे. बरेच वेळेस प्रचंड संघर्ष करून यशाचे शिखर गाठल्यावर तिथूनही माघार घेण्याची वेळ आयुष्यात अनेक जणावर येते पण अशी वेळ आल्यावर खचून न जाता परत कसे उभा राहायचे हे शिवाजी महाराजांकडून आणि या तहातून शिकायला मिळते. काही वेळेस स्वीकारलेली तात्कालिक माघार दूरदृष्टीचा विचार करता किती महत्त्वाची असते ही गोष्ट पण पुरंदरचा तह शिकवतो. शिवाजी महाराजांचा इतिहास प्रेरणादायी आहे तो याच कारणामुळे. या तहाच्या मूळ प्रती आजही राजस्थानातील बिकानेर येथील संग्रहालयात उपलब्ध आहेत.
– राहुल बोर्डे
पुणे
९८२२९६६५२५