छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक का केला?

छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक का केला?

छत्रपती शिवाजी महाराज. मरगळलेल्या मनात चेतनेचा संचार करवणारा प्रेरणामंत्र. हा शब्द म्हणजे महाराष्ट्राचा उर्जस्वल इतिहास. मार्गदर्शक वर्तमान आणि दिशादर्शक भविष्य आहे. कितीही नकारात्मक परिस्थितीशी झगडण्याचं बळ देणारा हा मंत्र आहे. छत्रसालपासून ते नेताजी सुभाषबाबूंपर्यंत कित्येक राष्ट्रनायकांना लढण्याची आणि विजयाची गाढ प्रेरणा देणारे हे अद्भूत व्यक्तीमत्व.

नेताजी एकदा पुण्यात भाषण देताना म्हणाले होते, ‘दिल्लीच्या तख्ताविरुद्ध शिवाजी महाराजांनी जो दीर्घकाळ लढा दिला, तो आज आधुनिक भारताला स्वातंत्र्यासाठी लढताना किती प्रेरणादायी ठरतो आहे, याची परक्या लोकांना मुळीच कल्पना करता येणार नाही.’

हा अधिकार अनायासे मिळाला नाही. त्यासाठी आयुष्याचा प्रत्येक श्वास पणाला लावला तेव्हा स्वराज्यसूर्य उगवला महाराष्ट्राच्या अंगणात. स्वराज्याच्या उत्कर्षाची दशोदिशांतून फिरवलेली द्वाही म्हणजे शिवराज्याभिषेक.

शालीवाहनाने मातीचे सैन्य बनवले. संजीवनी मंत्राच्या साह्याने त्यांच्यात प्राणसंचार करवला.त्याच सैन्याच्या बळावर बलाढ्य शत्रूचा पराभव केला आणि सातवाहन साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवली. अशी अख्यायिका आहे. त्याचीच पुनरावृत्ती शिवचरित्रात झाली. मृतवत आणि गुलाम बनलेल्या लाचार मराठी मनाला अस्मितापूर्ण बनवणारा राजा. छत्रपतीशिवाजी महाराज. त्या राजाच्या सार्वभौमत्वाची दवंडी विश्वभरात पिटणारा उत्सव, शिवराज्यभिषेकोत्सव. या विधीची पार्श्वभूमी, कारणे आणि महत्व या विषयावर आज चर्चा करण्याचा मानस आहे.

स्वराज्याची पार्श्वभूमी
ज्या अंधार्या पार्श्वभूमीवर आशेच्या स्वराज्याचा उदय झाला, ती जाणून घेणे उद्बोधक ठरेल. अनागोंदी आणि अराजकतेचे मुर्तिमंत उदाहरण म्हणजे शिवपूर्वकाळ. कोणाचा पायपोस कोणाच्या पायात नव्हता. कोण, कोणाशी, कशासाठीलढतोय? कोणासाठी प्राण पणाला लावतोय? याची कोणालाही ना जाणीव होती ना फिकीर. १५६५ च्या तालिकोटच्या लढाईमध्ये शेवटचे हिंदू राज्य लयाला गेले. त्यानंतर जन्माला आलेल्या मुस्लीम शाह्या म्हणजे कायम कटकारस्थाने, लढाया, शह काटशहांचे राजकारण, याला उत आला होता. फक्त उदाहरण द्यायचं झालं तर शिवरायांच्या जन्माच्या वेळी शहाजीराजे आणि त्यांचे आजोबा (मासाहेब जिजाऊंचे वडील) लखुजीराजे एकमेकांच्या जीवावर उठले होते. त्याचे कारण जर बघितले तर वाटते, की ही इतकी शूरवीर क्षत्रियशक्ती हे काय करत होती?

कोणी या शाहीचा गुलाम तर कोणी त्या शाहीचा. अर्थात तिथे त्यांच्या पराक्रमाचे फार चीज होत होते, असेही नाही. ज्यांच्यासाठी उभी हयात घातली तेच कधी विश्वासघात करतील, याची शाश्वती नव्हती. शहाजीराजेंचे सासरे लखुजीरीजे यांनी ज्या राज्याची इमाने इतबारे सेवा केली त्याच सत्तेने त्यांची भर दरबारात हत्या केली. अव्यवस्था, गोंधळ, अनागोंदी हे शब्दही किरकोळ वाटावेत अशी परिस्थिती होती.

रयत तर फक्त मरण येत नाही म्हणून जीवन कंठत होती. त्यातही राजकर्त्या जमातीने विधर्मी प्रजेचे जीवन नरकमय करून ठेवले होते. आपले जीवित आणि प्रतिष्ठा याची कोणालाच शाश्वती नव्हती. खुलेपणाने दसरा, दिवाळी, हरिनाम सप्ताह काहीही साजरे करता येत नव्हते. साधी तीर्थयात्रा करायलाही टॅक्स भरावा लागत होता. जगण्यापेक्षा मरण परवडले अशी परिस्थिती होती. कोणाच्याही घरातील स्त्री सुरक्षित नव्हती. धन सुरक्षित नव्हते. अंधकारयुग म्हणतात ते यापेक्षा काय वेगळे असणार?

अशा अंधारात स्वराज्याचे रोप अंकुरले. राजमाता जिजाऊंनी बालपणापासूनच बालशिवबाच्या अत:करणात स्वातंत्र्याची प्रेरणा निर्माण केली.
आसपासच्या सहकार्यांच्या मनात स्वराज्याविषयी विश्वास निर्माण करण्याचे काम या स्वराज्यजननीने केले. तुर्की, इराणी, तुराणी, अफगाणी आक्रमक सुलतानांच्या विरोधात शिवरायांचे मन घडवण्याचे कार्य जिजामातेने केले.

“अधर्माचि अवधी तोडीं । दोषांचीं लिहिलीं फाडीं ।
सज्जनांकरवी गुढी । सुखाची उभवीं ॥”

या माऊलींच्या वचनांची सार्थकता म्हणजे स्वराज्य.महाराजांनी रयतेच्या सुखाची उभारलेली गुढी म्णजे स्वराज्य.

स्वराज्य स्थापना व विस्तार

हा इतिहास आपल्याला सर्वांना माहित आहे. पुणे आणि सुपे परगण्याची जहागीर ते जिंजीपर्यंत पसरलेले साडेतिनशे किल्ल्यांचा सामावेश असलेले बलाढ्य स्वराज्य उभे राहिले. हा काही सोपा प्रवास निश्चितच नव्हता. आतापर्यंत स्थापन झालेल्या सत्ता या एकतर गद्दारीने, राजाची हत्या करून जन्माला आल्या होत्या. एखाद्याला एखाद्या प्रांताचा अधिकारी नेमल्यावर त्याने आपले स्वातंत्र्य घोषित केले या स्वरूपात निर्माण झालेल्या आहेत. स्वराज्य याला अपवाद आहे.

पैसा नाही. सैन्य नाही. तरीही जगाच्या पाठीवरील सर्वात बलाढ्य समजल्या जाणार्या मोगल साम्राज्याला आव्हान दिले. आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही, सिध्दी,पोर्तुगीज, इंग्रज अशा शक्तीसंपन्न सत्तांच्या गराड्यात स्वराज्य उभे करणे, हे अशक्य वाटणारे काम होते. तरीही अशक्य कोटीतील प्रचंड पराक्रम, जीवाला जीव देणारे स्वामीभक्त मावळे, धवल चारित्र्य, याच्या बळावर उभे राहिलेले अमृतफळ म्हणजे श्रींचे राज्य.

म्हणूनच स्वामी विवेकानंद म्हणतात, “Shivaji was the greatest Hindu king that India had produced within the last thousand years; one who was the very incarnation of lord Siva, about whom prophecies were given out long before he was born; and his advent was eagerly expected by all the great souls and saints of Maharashtra as the deliverer of the Hindus from the hands of the Mlecchas, and as one who succeeded in the reestablishment of Dharma which had been trampled underfoot by the depredations of the devastating hordes of the Moghals ”

गेल्या हजारो वर्षांतील सर्वश्रेष्ठ राजा. शिवकल्याण राजा. रयतेचा राजा.

राज्याभिषेकाची आवश्यकता

दावा द्रुम दंड पर, चीता मृगझुंड पर,
‘भूषन वितुंड पर, जैसे मृगराज हैं।
तेज तम अंस पर, कान्ह जिमि कंस पर,
त्यौं मलिंच्छ बंस पर, सेर शिवराज हैं॥

असे कवी भूषणाने महाराजांचे वर्णन केले आहे. तरीही शत्रूपक्ष त्यांना राजा मानावयास तय़ार नव्हता.

अखंड परिश्रम आणि प्रचंड बलिदानाच्या जोरावर स्वराज्य उभे राहिले खरे पण त्याला अधिकृत अधिमान्यता नव्हती. बाजी, तानाजी सारख्या असंख्य नररत्नांच्या बलिदानाला अधिमान्याता द्यायची होती. स्वत:चे राजेपण सिध्द करायचे होते. रयतेचे राज्य आस्तित्वात आलेय, याची जाहिर उद्घोषणा करायची होती. इतरही अनेक कारणे होती ज्यासाठी महाराजांचा विधीयुक्त अभिषेक होणे आवश्यक होते.त्या कारणांचा उहापोह आपण खालील मुद्द्याच्या आधारे करू.

देशमुख सरदारांची मान्यता

सर्वच मराठा सरदार महाराजांना स्वत:च्या बरोबरीचा बादशहाचा एक सेवक मानीत. जावळीच्या चंद्रराव मोर्याच्या पत्रातील उर्मट भाषा तर सर्वांनाच माहित आहे. चौथीला असताना आपण सर्वांनी ते पत्र आणि महाराजांनी त्याला दिलेले उत्तर वाचलेले आहे. नसेल वाचले तर चौथीचे पुस्तक डाऊनलोड करा आणि वाचा. ही मंडळी महाराजांना राजाच मानत नसल्याने महसूल वसूलीचा मोठा प्रश्न निर्माण व्हायचा. या लोकांना जरब बसावी आणि महाराज हे धर्ममान्य राजाधिराज आहेत हा संदेश जाण्यासाठी हा राज्याभिषेक आवश्यक होता.

एखाद्याला एखादे वतन देणे किंवा त्याला वतनापासून बेदखल करणे यासाठीही अधिकृत राजा असणे आवश्यक होते. त्याशिवाय हे देशमुख आदेश मानायला तयार होत नसत. कारण ते स्वत:लाच राजे समजत.

राजसत्तांची मान्यता

ज्या सत्तांना जाहिर आव्हान देऊन स्वराज्याचा भगवा आकाशात डौलाने फडकत होता, त्या सत्ता स्वराज्याला स्वतंत्र राज्य मानायला तयारच नव्हत्या.आदिलशहा महाराजांना केवळ एक सरदाराचा बंडखोर मुलगा याच नजरेने पाही. पुरंदरच्या तहात ठरल्याप्रमाणे महाराज जेव्हा आग्र्याला गेले तेव्हा औरंगजेबाने जाणीवपूर्वक महाराजांना मागच्या रांगेत उभे करण्यामागचे कारणही हेच होते. कोणत्याही सत्तेसोबत करार मदार करताना नेमकी हीच अडचण होई. आज जशी जो शपथ घेतो तोच मुख्यमंत्री मानला जातो, अगदी त्याचप्रमाणे त्याही काळात जो अभिषिक्त राजा म्हणून घोषित केलेला नाही, त्याला सरदार, राजे वा जनता कोणीही मनातून राजा मानायला तयार होत नसे. या राजसत्तांना वचक बसावा आणि आपल्या जनकल्याणकारी मुद्रेला अधिमान्यता प्राप्त व्हावी हा त्यामागचा प्रमुख उद्देश होता.
कोणतेही द्विपक्षीय अथवा बहूलपक्षीय करार मदार करताना महाराजांना बरोबरीची वागणूक द्यायला ही मंडळी तयार होत नसत. त्यांना मराठा सत्तेच्या सामर्थ्याची जाणीव करून देणे आवश्यक होते. व्यापारामध्येही आपल्या मुद्रेची विश्वासार्हता या राज्याभिषेकाने वाढली.

अस्मिताजागरण

आपण वर पाहिलेय की अत्यंत पराक्रमी आणि बलशाली मराठी सरदार स्वत:च्या स्वत्वाचा विसर पडून मुसलमान शाह्यांचे गुलाम बनले होते. आपलेही स्वतंत्र सार्वभौम राज्य उभे राहू शकते असा आत्मविश्वासच कोणाला नव्हता.शिवाजीला साथ दिली तर आपणही बंडखोर गणले जाऊ या भीतीने सैन्यात भरती व्हायलाही लोक घाबरायचे. भीती हा मराठी माणसाचा स्थायीभाव बनतोय की काय सा प्रश्न निर्माण व्हावा अशी परिस्थिती होती.ही परिस्थिती बदलण्याचे काम राज्याभिषेकाने केले.

ब्रिटानिका विश्वकोशाने या बाबतीत असे म्हटले आहे,“Shivaji breathed new life into a moribund race that for centuries had resigned itself to abject serfdom and led them against Aurangzeb, a powerful Mughal ruler. Above all, in a place and age stained by religious savagery, he was one of few rulers who practised true religious tolerance.”

सभासद बखरीमध्ये सभासद असे म्हणतो, “या युगामध्ये सर्व पृथ्वीवर मुघल पातशहा. हा मर्हाटा पातशहा येवढा छत्रपती जाला ही गोष्ट काही सामान्य जाली नाही.”

न्यायाधिकार

पारंपारिक रूढीप्रमाणे ब्राम्हणाला दंड देण्याचा अधिकार हा फक्त राजाला होता. किंवा धर्मसत्ताच ब्राम्हणाला दंड देऊ शकत असे. असे अनेक प्रसंग शिवचरीत्रात पहायला मिळतात की महाराजांना ब्राम्हणांच्या बाबतीत न्यायदान करण्यासाठी काशीच्या पंडीतांची मदत घ्यावी लागे.हा धर्मदंड आणि राजदंड धारण करण्याचा अधिकार मिळावा यासाठी अभिषेक आवश्यक होता.

रयतेची इच्छा

अतुलनीय शौर्य आणि त्यागाच्या बळावर उभे राहिलेल्या स्वराज्याला छत्रपती लाभावा ही सामान्य प्रजेची इच्छा होती. राज्याभिषेक करावा अशी कोणाची कल्पना होती याबाबतीत विद्वानांमध्ये पुष्कळ मतभेद आहेत. अर्थात जिथे जन्मतारखेबाबत एकमत नाही तिथे ही बाब क्षुल्लकच मानावी लागेल. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकानंतर देशभर जो जल्लोष हिंदू प्रजेने केला त्यावरून हेच सिध्द होते की अभिषेकाची कल्पना प्रथम कोणीही मांडली असली तरी शिवराय छत्रपती व्हावेत, ही रयतेचीच इच्छा होती. जनतेच्या इच्छेने राजा छत्रपती व्हावा हेही कदाचित अपवादात्मक उदाहरण असेल.

धर्मांतरणास आळा

कासी हूँ की कला गई मथुरा मसीत भई
शिवाजी न होतो तो सुनति होती सबकी॥

असे कवी भूषण शिवाबावनीमध्ये लिहितो. जर महाराज नसते तर सर्वांची सुन्नत झाली असती. हिंदुंची धर्मस्थळे आस्तित्वात राहिली नसती.

हिंदू म्हणजे गुलाम हा समज पिढ्यानपिढ्यांच्या गुलामगिरीने दृढमूल झाला होता. तो उखडून टाकण्याचे काम या एका राज्याभिषेकाने केले. अखंड भारतातील सामान्य हिंदूंना या कल्पनेने बळ दिले, की या देशात हिंदुंचेही एक सिंहासन आहे. आतापर्यंत बहूतेक मशिदी मुस्लिम राजकर्त्यांनी मंदिरे पाडून त्याच दगडांचा वापर करून बांधल्या होत्या. महाराजांनी त्या पाडून मंदिरे पूर्ववत उभी केल्याचे उदाहरणे आहेत. समर्थ देखील म्हणातात, “हिंदू धर्म राहिला काही तुम्हां कारणे.”

अर्थात आपल्या मुसलमान सेवेकर्यांसाठी त्यांना स्वतंत्र मशिदी उभ्या केल्यात. ही सहिष्णुता फक्त महाराजच दाखवू शकले. हिंदू असणे म्हणजे सहिष्णू असणे याचा आदर्श वस्तूपाठ म्हणजे शिवचरित्र. म्हणूनच शेकडो मुसलमानांनीही शिवरायांसाठी पले प्राण वेचले. महाराजांचा विरोध कोणत्याही धर्माला नव्हता. आमचाच धर्म तेवढा श्रेष्ठ अशी शेखी मिरवत रयतेवर जुलूम करणार्या धर्मांध राजसत्तेला महाराजांनी आव्हान दिले. कदाचित शेखी मिरवणे हा वाक्प्रचार या धर्मांध लोकांच्या अशा वागण्यासाठीच जन्माला आला असावा.

राज्याभिषेकाने शिवशकाला सुरूवात झाली. ही गोष्ट जगातल्या बलाढ्यातल्या बलाढ्य राजांनाही साध्य झाली नाही, ती महाराजांनी साध्य केली. मराठी राजभाषा बनली. दरबरातून फारसी हद्दपार झाली. ही काही सामान्य गोष्ट नव्हे. आज आपण त्या मराठीला तिचे वैभव पुन्हा प्राप्त करून देण्यासाठी कटिबध्द होऊयात. धर्म, न्याय आणि तत्वाच्या बाजूने खंबीरपणे उभे राहण्याचा संकल्प करूयात.तोच खरा शिवराज्याभिषेकदिन.

जय शिवराय
– रमेश वाघ,
नाशिक
९९२१८१६१८३

चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email - Chaprak Email ID

5 Thoughts to “छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक का केला?”

 1. मनःपूर्वक धन्यवाद

 2. Sunil

  खूप सुंदर आणि माहिती पूर्ण लेख सर .

 3. Vinod s. Panchbhai

  खूपच अप्रतिम..
  सर्वांगसुंदर लेख!
  जय शिवराय! 🙏🙏

 4. जयंत कुलकर्णी

  शिवराज्याभिषेकाची योग्य कारणमीमांसा रमेश वाघ सरांनी विशद केली आहे. माहितीपूर्ण लेख. लेख आवडला.

 5. मनःपूर्वक धन्यवाद सर्वांना

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

हे ही अवश्य वाचा