शिवप्रताप

शिवप्रताप

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजलखान यांच्या संघर्षावर आधारित असलेल्या ‘शिवप्रताप’ या उमेश सणसलिखित कादंबरीचे हे एक प्रकरण. ‘चपराक प्रकाशन’ची सर्वोत्कृष्ट निर्मिती असलेल्या या शिवदिग्वीजयाच्या रोमांचकारी आणि अत्यंत प्रेरणादायी कादंबरीची नवी आवृत्ती लवकरच प्रकाशित होत आहे. शिवराज्याभिषेकदिनानिमित्त हे प्रकरण जरूर वाचा. आपल्या अभिप्रायाचे स्वागत.


महालात
जाऊन राजांनी कपडे बदलले. काही वेळ विश्रांती घेतली. झालेल्या सर्व घटनांचा प्रचंड असा शारीरिक व मानसिक थकवा राजांना जाणवत होता. फार काळ एकट्याला महालात बसवेना. राजे सदरेवर आले. पंताजीपंत व कान्होजी जेधे गडावर होते. राजांना पहाताच तेही सदरेवर आले. हळूहळू विजयाची एकेक वार्ता घेऊन वीर येत होते. दीड हजार पठाणांची संपूर्ण तुकडी गारद झाली. हे समजताच राजे फक्त इतकेच म्हणाले, तसे असेल तर पारला मोरोपंतांना फार कष्ट घ्यावे लागणार नाहीत. तोच जिउ महाला व चांदजी सदरेवर आले. पारची पूर्ण छावणी उध्वस्त झाल्याचे आणि अफजलखानाचे सरदार पळून गेल्याच्या सुखावणार्‍या वार्ता त्यांनी राजांच्या कानावर घातल्या. विजयी वीरांना शाबासकी देत राजे म्हणाले, “कान्होजी तुमच्या शिवजीने आज कमाल केली. आमची आज्ञा न घेता, आम्हाला साधे न विचारताही तो राजगडावर निघून गेल्याचे आम्हाला समजले आहे. बोला आता!”

दिवसभर कान्होजी व त्यांच्या इतर चारही मुलांनी पराक्रमाची शर्थ केली होती. त्या समाधानात कान्होजी असताना शिवजीबद्दल राजांनी कागाळी केली होती. कान्होजी ताडकन म्हणाले, “तसं असेल तर शिवजीस योग्य वाटेल ती शिक्षा राजांनी द्यावी.!”
“व्वा! भले कान्होजीबाबा ! अहो आम्ही तर खूष आहोत. शिवजीवर!” राजे सांगू लागले.
कान्होजींना काहीच कळेना. राजांचे बोल ते ऐकू लागले. “आम्ही खानास मारून गडावर येत असताना शिवजी गडाच्या प्रवेशद्वारात उभा होता. आम्ही गडावर प्रवेश करताच त्यानं राजगडाकडे कुचं केलं असं आम्हाला रघुनाथ बल्लाळांनी सांगितलं आमच्या आऊसाहेब तिकडे राजगडावर डोळ्यात प्राण आणून वाट पहात बसल्या असतील की राजांचे काय झाले ? आम्हाला गडबडीत हे नाही लक्षात आले की प्रथम आऊसाहेबांकडे निरोप धाडायला हवा. ते काम शिवजीने केले आहे. आम्ही त्याच्यावर खूष आहोत.” राजांनी सर्व खुलासा केला.
सायंकाळ होऊ लागली होती. रात्रीची चाहूल लागली होती. एकेक वीर गड वर चढून राजांच्या भेटीला येत होता. राजांच्या हे ध्यानी आले ते म्हणाले, ङ्गपंताजीपंत, चला आपण गड उतरू. जखमींची विचारपूस करू. काही कैदी घेऊन ताना आला आहे. कैद्यांनाही सोबत घ्या. रघुनाथपंत तुम्ही सर्व व्यापारी घेऊन गडाखाली या.ङ्घ राजाज्ञा होताच सर्वांची धावपळ सुरू झाली.
“राजे तुम्ही आऊसाहेबांची गाठ घेण्यास उदयिक निघावं. ती माऊली आपली वाट पहात असेल.” राजांना असं सांगण्याचा अधिकार फक्त पंताजीपंतांना होता.
“नाही पंताजीपंत, आमचे बेत वेगळे आहेत.” असं म्हणत राजांनी तो विषय बंद केला व झाल्या गोष्टींचा सविस्तर वॄत्तांत घेउन आऊसाहेबांकडे जासूद हरकारे रवाना केले.
राजे गडाखाली उतरणार हे कळताच गडाखाली गडबड उडाली होती. रघुनाथ बल्लाळांनी सर्व जखमी, कैदी व भेट घेण्यास आलेल्या इच्छुकांना रांगेत उभे केले होते. राजांसाठी साधी बैठक व्यवस्था तयार केली. जास्त रात्र झाली तर असावे यासाठी काही पलिते तयार करुन जागोजागी उभे केले. सर्व कैद्यांवर तानाजीची देखरेख होती. अहमदखान उदास चेहेर्‍यानं उभा होता. त्यानं जिवीताची आशा सोडली होती. युद्धात पराभूत झालेल्या लोकांना अब्बाहुजूर कसे वागवितात, आदिलशाही दरबारात कसे वागविले जाते याबद्दल त्याला पूर्ण माहिती होती. शेजारी उभ्या असलेल्या घाडगेसरकारांना अहमदखान म्हणत होता., “सरकार आता मी तरी आशा सोडली आहे. शांतपणे मौत स्विकारायची.”
तोच रघुनाथ बल्लाळांनी सर्व व्यापारी आणून कैद्यांच्या रांगेत उभे केले. जेरबंद केलेले खानाचे सरदार, पुत्र यांना पाहून काय झालं याचा अंदाज गोपाळशेठला आला होता. त्याला स्वत:ला आपलं भविष्य समजून चुकले. आणलेल्या सर्व मालावर व संपत्तीवर तर त्याने पाणी सोडलेच होते.
पण आता त्याला जिविताचीही हमी वाटत नव्हती. तो पूर्णत: अस्वस्थ झाला होता. छगनशेठची अवस्था फारशी वेगळी नव्हती. तो हळू आवाजात गोपाळशेठला म्हणाला “आता देवाची प्रार्थना करा गोपाळशेठ! शेवटची प्रार्थना!” गोपाळशेठला त्याच्या डोळ्यात यमराजाची आकॄती दिसत होती.
जखमी झालेले व इतर वीर एकमेकांस एकमेकांच्या पराक्रमाच्या कथा सांगत होते. अफजलखानाचे डोके आपण कसे आणले हे परत एकदा रंगवून संभाजी कावजी सांगत होता. त्याला वेडावित इब्राहिम सिद्धी बर्बर म्हणाला, “आणि त्यानंतर गडावर जाउन बसलेत ते बसलेत ! आम्ही पारच्या छावणीपर्यंत लढत होतो.”
चांदजी जेधे सर्वांगावर झालेले घाव सर्वांना दाखवित होता. तसा कैद्यांशेजारी उभा राहिलेला तानाजी जोरात ओरडून चांदजीला सांगू लागला, “या भाद्दरावर वार करायची हिमंत नाही झाली कोणाची !”
लुटीचा शक्य झाला तेवढा माल व सर्व याद्या घेऊन मोरोपंत हजर झाले. “या वक्ती, नेताजीराव पायजेल हुता!”
संभाजी कावजी जिऊ महालेस सांगत होता. तसा संभाजीला डिवचत परत इब्राहिम सिद्धी बर्बर म्हणाला, “का रे, तुला भांडायला कोणी दुसरा नाही का चालत ?”
तोच “राजे आले, राजे आले,” अशी कुजबूज झाली. सार्‍यांनी उठून राजांना मुजरे केले. राजांनी आपली जागा घेतली. राजांच्या सोबत कान्होजी जेधे व पंताजीपंत होते. सर्वप्रथम राजांनी जखमींची विचारपूस केली. त्या-त्या वीरांनी केलेला पराक्रम कान्होजी जेधे व मोरोपंत सांगत होते. येसाजीलाही सर्व माहिती होती. तोही राजांना माहिती पुरवित होता. जखमी झालेल्या वीरांना दोनशे होनांपासून पंचवीस होनांपर्यंत बक्षिसे राजांनी स्वत: दिली.
मोरोपंतांनी राजांना माहिती दिली, “राजे शामराजपंत व त्रिंबक भास्कर रणात कामी आले. दोघांनीही थोर पराक्रम केले!” इतरही मृत झालेल्या वीरांची माहिती राजांनी घेतली. राजांच्या डोळ्यासमोर शामराजपंत उभे राहिले. शामराजपंतांचा स्वभाव उतावळा होता खरा पण, ते राजांचे अतिशय लाडके होते. शामराजपंतांना राजांनी सावधगिरीची सूचना दिलेली होती. पण तसे घडायचे नव्हते. राजांना या घटनेचे मनस्वी दु:ख झाले. राजांनी सांगितले, “शामराजपंत व इतर मृत झालेल्या आमच्या सर्व वीरांच्या स्त्रियांना व मुलांना आम्ही निम्मे वेतन देणार आहोत.” तशी तजवीज करण्याची आज्ञा राजांनी केली. त्रिंबक भास्कर यांचा पुत्र राजांच्या फौजेतच होता.
राजांनी त्याला जवळ बोलावून घेतले व त्याचे सांत्वन केले. राजांचे सांत्वनाचे शब्द ऐकल्यानंतर तर पोरगा अधिकच रडू लागला. राजीयांनी त्यास पोटास धरत सांगितले, “गप रहा रडू नकोस. जसा आमचा संभाजी तसा तू.” राजे.
ज्यांच्याशी बोलत होते त्यांना जन्माचं सार्थक झाल्याच समाधान वाटत होत. सर्वांची विचारपूस झाल्यानंतर कैद्यांना राजांसमोर आणले गेले. “यांना असे बांधून का ठेवले आहे ? यांना मोकळे करा.” राजांनी आज्ञा केली.
झुंझारराव घाडगे सरकारांसह क्षणात सारे मोकळे झाले. राजे स्वत: उठून घाडगेसरकारांसमोर गेले. त्यांनी घाडगेसरकारांचे हात हाती घेत सांगितले, “सरकार आम्हाला तुमचा राग नाही. तुम्ही आदिलशाही सरदार, तुम्हाला आम्ही मुक्त केले आहे.”
अफजलखानाचे दोन्ही पुत्र राजांपुढे उभे होते राजे काय निर्णय देतात हे ऐकायला अहमदखान आतुर होता खरे, पण त्याने मरणासाठी मनाची तयार केली होती. राजांनी अहमदखानाच्या पाठीवर हात ठेवीत सांगितले, “अहमदखान तुमचं दु:ख आम्ही जाणतो.” याचवेळी राजांनी रघुनाथ बल्लाळांना आज्ञा केली, “रघुनाथपंत खान ज्या ठिकाणी पडला होता तेथे त्याचे व सय्यद याचे दफन इतमामाने करा.” राजे परत अहमदखानास बोलले, “तुमचे अब्बाजान मोठे शूरवीर होते. अत्यंत गरिबीतून त्यांनी वैभव मिळवले होते. आमचा घात करण्याचा हेतू मनात ठेवूनच ते आमच्या विरुद्ध आल्याने आमचा नाईलाज झाला. ते गेले युद्ध संपल, वैर संपल ! तुम्हाला तुमचे मार्ग मोकळे आहेत. आम्ही तुम्हाला आझाद केले आहे. आपण परत विजापूरला जाऊ शकता. तुम्हाला कोणीही अडविणार नाही वाटेत. इतर काही मदत हवी असेल तर सांगा.”
अहमदखानाला हे मुळीच अपेक्षित नव्हते. त्याच्या उदास चेहर्‍यावरील ताण बराच कमी झाला होता. राजांना पुन्हा-पुन्हा कुर्निसात करीत तो राजांचे आभार मानू लागला. “राजे आम्हाला वाचवा,” म्हणत गोपाळशेठ व छगनशेठ राजांच्या पायावर पडले. “या उप्पर आमच्या प्रदेशात व्यापारासाठीही पाऊल ठेऊ नका जा!” असे म्हणत राजांनी गोपाळशेठ व इतर सर्व व्यापार्‍यांना खुले केले.
इतरही सर्व कैद्यांना राजांनी त्यांच्या मनाप्रमाणे वागण्याचे स्वातंत्र्य देऊन टाकले. रणदुल्लाला मात्र राजांनी सुनावले, “तुमचे अब्बाहुजूर व आमचे आबासाहेब यांचा जुना रिश्ता आहे. तुमचे वडील बंधू रुस्तुमेजमा आमचे स्नेही आहेत. तुमच्याकडून आम्हाला असे वर्तन अपेक्षित नव्हते. या आपण ….” अत्यंत शरमिंदा होऊन रणदुल्ला निघून गेला.
विजयी वीरांचा राजांनी यथोचित गौरव केला. अनेकांना सोन्याची कडी व होन बक्षिस मिळाले. रात्र झाल्यामुळे अंधारुन आले होते. सर्व पलिते लावले गेले. पलित्यांच्या प्रकाशात राजे बोलू लागले, “आपल्या सर्वांच्या निष्ठेमुळे, श्रद्धेमुळे, पराक्रमाने आणि कष्टामुळे स्वराज्यावरील संकट दूर झाले आहे. आपल्या पराक्रमाने हे स्वराज्यावरील संकट दूर झाले आहे पण एक गोष्ट मनी समजून ठेवा. ही फक्त सुरुवात आहे. यापेक्षाही मोठ्या संकटाशी आपणाला यानंतरच्या दिवसात मुकाबला करायचा आहे. भुमिपुत्रांच राज्य यावंं गरिबाला सन्मान व प्रतिष्ठा प्राप्त व्हावी यासाठी आमचा हा संघर्ष आहे. तुम्ही तुमची मनं अजिंक्य ठेवलीत तर या विश्वातील कोणतीही ताकद तुमचा पराभव करु शकणार नाही. तेव्हा यापुढील काळातील संघर्षासाठीही तयार असा. आजच्या या विजयाबद्दल तुमचे सर्वांचे मन:पूर्वक अभिनंदन करून तुम्हास सुयश चिंतितो.”
राजांचे बोलणे संपले. सैनिकांनी ङ्गहर हर महादेवङ्घ चा जयघोष केला. राजांना विनंती करण्यासाठी सर्वांच्या वतीनं कान्होजी जेधे उभे राहिले, “बोला कान्होजी बाबा काय मागणं आहे आपलं ?” कान्होजींचे उठणं, त्यांना इतरांनी सूचक असं सांगण राजांनी टिपलं होत.
“राजे, आम्हाला विजयोत्सव करायचा आहे. त्यास परवानगी असावी.!” कान्होजी म्हणाले.
“हो. राजांचा झालेला विजय सार्‍या मुलुखास कळला पाहिजे.” पंताजीपंतानीही आग्रह धरला.
राजांनी निग्रहाने नकार देत सांगितले, “नाही. आज विजापूरकरांची आमच्याविरुद्ध असलेली मोहिम संपली. आता आम्ही उद्या विजापुरकराविरुद्ध आमची मोहिम सुरू करणार आहोत. उद्याच आम्ही वाईच्या दिशेनं कूच करणार आहोत. अफजलखानाच्या मृत्यूच्या भीतीनं गांगरलेल्या आदिलशहाला सावरण्याची संधी मिळेपर्यंत शक्य होईल तेवढा विजापूरचा प्रदेश जिंकण्याचा आमचा विचार आहे.”
सर्वांनी राजांना संमत्ती दिली. दुसर्‍या दिवसाचे नियोजन राजांनी करायला सांगितले. व राजे उठले. राजे उठताच मुजरे झडले. तोच मोरोपंतांचे आणखी काही कारकून धावत आले. त्यांनी मोरोपंतांच्या हाती काही कागद दिले. मोरोपंतांनी राजांना थांबविले व सांगितले “लुटीच्या मालाची कच्ची मोजदाद केली आहे ….”
राजे हसत मोरोपंतांना म्हणाले, “अजून वाईत बराच माल मिळवायचा आहे. तो एकत्र करून आम्हाला उद्या लुटीची तुमची कच्ची आकडेवारी सांगा.”
सर्वांचा निरोप घेत राजे गडावर निघून गेले.

**

फाजलखानाला थांबविण्याच धाडस कोणाकडेच नव्हत. थोड्यावेळानं मुसेखानाच्या लक्षात आलं की आपण फाजलच्या मागे धावत आहोत. हसन, याकुतखान, व अंकुशखान, हेही धावत होते. शिवाजीचा, तानाजी नावाचा सरदार सर्वांचा पाठलाग करून त्यांना पकडत आहे हे कळताच फाजलने वेषांतर केले. दाढी कमी केली. डोईवरची मौल्यवान अशी मुस्लीम पद्धतीची पगडी फेकून दिली. डोईस मराठेशाही मुंडासे बांधून तो पळू लागला. पळता-पळता कोणी पडत होते, कोणी ठेचकाळत होते पण कोणी कोणासाठी थांबत नव्हते. प्रत्येकजण स्वत:च्या नादात होता. मुसेखानाने सर्वांना थांबविले व जोरानं सांगितले, ङ्गअसं करू नका. त्यामुळे आपण सर्वजण सापडण्याची शक्यता अधिक आहे.ङ्घ मुसेखानाचा शब्द प्रमाण मानून पळणारे पळू लागले. घनदाट झाडीतून मार्ग काढताना बहुतेक सर्वांच्या अंगाला काटे लागले होते. पाय रक्तबंबाळ झाले होते. फाजलच्या तर पायातून रक्त ठिबकत होते. पण फाजल थांबायला तयार नव्हता.
अखेर पायाची वेदना फारच वाढली तेव्हा फाजलने डोईचे मुंडासे काढले व ते पायाला बांधले. मुसेखानाने सुचविले की, ङ्गआपण येथे थोडावेळ थांबू या.ङ्घ पण कोणीही तयार नव्हते. कधी एकदा वाईस जाऊन पोहोचतो असे सर्वांना झाले होते. एकदा वाईस गेलो की आपणाला थोडा विसावा मिळेल अशी फाजलची अपेक्षा होती. त्यासाठी तर तो धडपड करीत होता. रस्ता कोणालाच ठाऊक नव्हता. त्या घनदाट झाडीतून वाट काढत सर्वजण पुढे चालले होते. अशीच एक पायवाट ओलांडित असताना फाजलला दुसर्‍या पायवाटेने येणारा प्रतापराव मोरे दिसला. त्याच्याकडे बोट दाखवित फाजल ओरडलाच, “हाच तो हरामखोर, पहा कसा पळतो आहे.” रात्रीच्या अंधारात
फाजलचा आवाज फार मोठा वाटत होता. संतापलेला याकुतखान पळतच पुृढे गेला व त्याने प्रतापरावाला पकडले.
अंकुशखान त्याच्याकडे बोट दाखवत म्हणाला, “हाच तो बदमाश आहे ! यानेच महासेनापती अफजलखानसाहेबांच्या कानाला लागून, वारंवार चुगल्या करून, अनेक खोट्या गोष्टी त्यांच्या कानावर घालून त्यांच्यासह आमची या प्रलयाग्निच्या मुखात आहुती दिली. बरे झाले हा चोर आम्हाला सापडला.”
याकुतखान म्हणाला, “या हरामखोराला मी मारणार आहे ! तुम्ही सारे बाजूला व्हा. इतर कोणी मध्ये येऊ नका! मी पहातो याच्याकडे.” आणि याकुतखानाने खरोखरच प्रतापरावावर शस्त्र उगारले. गरज पडली तर असावी म्हणून फाजलने बरोबर घेतलेली कट्यार बाहेर काढली. फाजलचे पाय पकडून प्रतापराव मोरे जोराने ओरडू लागला. “मला क्षमा करा, मजकडून चूक झाली असेल पण मला मारू नका. मला सोडून द्या. माझे भविष्य आधीच संपले आहे. मला सोडा, माफ करा…”
प्रतापरावाबरोबर पळून आलेला खंडोजी खोपडे एका कोपर्‍यात उभा राहून सर्व प्रकार पहात होता. खंडोजीला पुढे जाण्याचे धाडस करवत नव्हते. प्रतापराव हात जोडून विनंती करीत होता, “मला एकवार माफ करा. माझी काहीच चूक नाही.”
परिस्थितीची गांभीर्याने जाणीव सर्वात प्रथम झाली ती मुसेखान पठाणाला. त्यानं फाजलला व याकुतखानाला थांबविलं व म्हणाला, “आता याला सोडून द्या. जे काही व्हायचे आहे ते होऊन गेलेलं आहे. आता याला मारून तरी काय फायदा आहे बरे ? आता आम्ही याच्यावर दया करणे उत्तम.”
फाजलने मुसेखान पठाणाकडे रागाने पाहिले. तोवर मुसेखान प्रतापरावावर गुरकावत म्हणाला, “प्रतापराव, हे दुर्गम व गहन अरण्य तुला पूर्वीपासून माहित आहे. तुला येथील सर्व मार्ग व वाटा माहित असणार. तेव्हा एखाद्या जवळच्या वाटेने तू आम्हाला वाईस घेऊन चल. वाईला गेल्यावर तुझे उपकार स्मरून आम्ही तुला मोठी बक्षिसी देऊ.”
प्रतापरावाला हायसे वाटले. तो कसाबसा आधार घेत उभा राहिला. व म्हणाला, “घाबरू नका मला आणि खंडोजीला येथील सर्व रस्ते माहीत आहेत. तुम्हाला मी वाईस सुखरूप नेऊन पोहोचवितो.”
तोच खंडोजीने सांगितले, “आपणाला बरेच रस्ते व वाटा बदलत जावे लागेल. राजांचा सेनापती नेताजी पालकर पळून जाणारांचा पाठलाग करीत बसला आहे.”
“नेताजीच आहे ना ? असू दे. नेताजी म्हणजे काही शिवाजी नव्हे.” आता प्रतापरावालाही अवसान आले होते.
“काहीतरी भलतंच काय बोलत आहात आपण. एकवेळ राजे परवडले पण हा महाभयंकर नेताजी नको. प्रतिशिवाजी म्हणतात त्याला. जर का मी त्याच्या हाती सापडलो तर तो मला मारून टाकील.” नुसत्या कल्पनेने सुद्धा खंडोजी घाबरून गेला होता.
“तुमची बडबड बंद करा आणि चालायला सुरुवात करा.” मुसेखान गुरकावला.
तसे काही न बोलता प्रतापराव व खंडोजी पुढे व इतर सर्व मागे असा प्रवास सुरू झाला. प्रतापरावाला एक आडवाट माहिती होती. त्या वाटेने सर्वांना घेऊन तो वाईच्या दिशेने निघाला होता. सर्वांचे गुडघे फुटले होते. अंगावर जखमा झाल्या होत्या. पण कशाचीही फिकीर न करता रात्रभर प्रवास करून सर्वजण वाईच्या मार्गाला चालले होते. नेताजी वाटेत गाठतो की काय ही भीती सर्वांना वाटत होती. मार्गशीर्ष शुद्ध अष्टमीला उगवत्या सूर्यास साक्षी ठेऊन फाजल व मुसेखानाने वाईत प्रवेश केला. फाजल व मुसेखानाने वाई दिसू लागताच प्रतापरावाला यथेच्छ बडविले व हाकलून दिले पण प्रतापराव दुसर्‍या कोठे जाणार होता आणि त्याला जवळ कोण करणार होता. नाइलाज झाल्याने लोचटपणे तो परत मुसेखान व फाजल यांना चिकटला होता. वाईची सर्व सूत्रे हसनखानाच्या हाती होती. वाईच्या सीमेवर जेव्हा त्याने फाजल, याकुत व मुसेखान पठाण यांना पाहिले तेव्हा प्रथम तर त्याने कोणाला ओळखलेच नाही. जेव्हा ओळख पटली तेव्हा आश्चर्याचा विलक्षण धक्का त्यास बसला. झालेला विलक्षण प्रकार समजताच तो घाबरुन गेला. मोठे शौर्य दाखवित आपण कसे पळून आलो हे फाजलने हसनखानाला सांगण्यास सुरुवात केली. मुसेखानाने त्याला थांबविले व हसनखानाला घोडे आणण्यास फर्माविले. घोड्यावर बसून सर्वांनी निवासाची जागा जवळ केली. फाजल, मुसेखान यांनी कपडे बदलले. जखमांना औषधपाणी केले. झाला प्रकार कळताच अफजलखानाचा जनानखाना आक्रोश करू लागला. काही क्षणात सार्‍या वाईत ही वार्ता समजली. पळून येण्यात यशस्वी झालेले काही वीर ह़़ळूहळू वाईत येऊ लागले होते.
फाजलने उसंत घेतली नाही. त्याला थांबण्याची इच्छा नव्हती. त्यानं कडक शब्दात जनान्याचा आक्रोश थांबविला. शक्य होती तेवढी सर्व मौल्यवान चिजवस्तू बरोबर घेतली. हसनखानास सर्व लष्कर बरोबर घेण्यास सांगितले. मुसेखानाने व याकुतखानाने वाईस थांबावे असे फाजलला वाटत होते. पण वाईत थांबण्यास कोणीच तयार होत नव्हते. कोणालाही आग्रह करीत बसण्याची ही वेळ नव्हती. फाजलने वाईत राहिलेले घोडदळ, हत्ती, जनाना व खजिना सोबत घेतला व अत्यंत वेगाने वाई सोडून त्याने विजापूरची वाट धरली. ….. इतका वेळ मनात न आलेला विचार आता मात्र फाजलच्या मनात येऊ लागला होता. भावांना मागे टाकून आलेल्या, लज्जित होऊन पळून आलेल्या आपणाला अल्लीशहा व बड्या बेगमसाहिबा काय म्हणतील?पण विचार करण्यापेक्षा नेताजीच्या तडाख्यातून बाहेर जाणे महत्त्वाचे होते. ते काम मात्र फाजल तडफेने करीत होता.
सकाळच्या प्रहरी गावात सुरु झालेला आक्रोश व पळापळ ऐकतच वाईकर जागे झाले. पहिला काही वेळ काय घडले हे कोणालाच कळाले नाही. “शिवाजीने खानसाहेबांस मारिले” असे कळताच नारायणराव व गणेशशास्त्री वाड्याबाहेर आले. त्यांनी तातडीने एका पळून आलेल्या सैनिकास पकडले. त्याला बाजूला घेऊन काय झाले याची माहिती घेतली. गावाच्या पश्चिम वेशीवर सारे जमले. गुढ्या, तोरणे, उभारुन वाईकरांनी राजांच्या स्वागताची तयारी सुरु केली.
आणि एखाद्या झंझावातासारखा नेताजी पालकर वाईत प्रवेश करता झाला. वाईकरांच्या स्वागताचा त्याने स्वीकार केला. व आज सायंकाळपर्यंत राजे वाईस येत असल्याची वार्ता सांगितली. नेताजीस वाईत विरोध कोणीच केला नाही. विरोध करायला जागेवर कोणी नव्हतेच. नेताजींनी अलगद वाई ताब्यात घेतली. शे-पाचशे सैनिक वाईची व्यवस्था ठेवण्यास व विरोध झाल्यास तो मोडून काढण्यासाठी नेताजींनी वाईत ठेवले. व उरलेले घोडदळ घेऊन फाजलखानाचा पाठलाग सुरू केला. नेताजींची घोडदळावरील पकड व तडफ जबर असतानाही फाजल इतक्या बेफाम वेगानं पळत होता की तो काही नेताजींच्या हाती लागला नाही. वाटेत फाजलखानाने सोडलेले आठ-दहा हत्ती बरोबर घेऊन निराश होत नेताजी परत वाईकडे निघाले. नेताजी वाईस येत असताना नेताजीस खबर मिळाली की राजे वाईत पोहोचले आहेत.

**

राजगडाच्या बालेकिल्ल्यात उभ्या असलेल्या गंगाजी-मंगाजी यांना भल्या पहाटे शिवजीने खबर सांगितली आणि आनंदाने बेहोश झालेल्या गंगाजी-मंगाजींनी सरळ शिवजीला उचलूनच घेतले. भल्या पहाटे सर्वांची झोपमोड करीत नगारखाना वाजवायची आज्ञा गंगाजी-मंगाजींनी केली. सर्व सरदार व सैनिक नगारखान्याजवळ गोळा झाले होते. आणि त्यांना गंगाजी मंगाजी ओरडून सांगत होते, “राजांनी फत्ते केली. खान धुळीस मिळाला.”
गंगाजी-मंगाजींना तिथेच सोडून शिवजी जेधे आऊसाहेबांच्या महालाकडे धावला. कधी एकदा ही खबर आपण आऊसाहेबांना सांगतो आहोत असे शिवजीस झाले होते. शिवजीस पहाताच गोमाजी नाईक पुढं धावला. त्यानं शिवजीस अडवीत प्रश्न केला, “प्रतापगडावरून आला ना, काय झालं ?” ङ्गनगारखान्याकडे जा, सगळं समजंल.ङ्घ असं उलट उत्तर देत शिवजी कसलीही औपचारिकता न बाळगता आऊसाहेबांच्या महाली घुसला. नगारखान्यातील वाद्ये का वाजत आहेत विचारणा करावी म्हणून आऊसाहेब देवघराजवळून आल्या होत्या. रात्रभराच्या जागरणामुळे त्यांचे डोळे लाल झाले होते. वृद्धापकाळात एवढे दडपण, त्रास हा त्यांना सोसवण्यासारखा नव्हता.
जिजाऊसाहेबांची अवस्था शिवजीच्या ध्यानी आली. शिवजीला समोर उभा राहिलेला पहाताच जिजाऊसाहेबांच्या काळजाचा ठोका चुकला. “बोल शिवजी बाबा काय सांगणार आहेस तू आता ?” आऊसाहेबांचा कातर स्वर शिवजीस जाणवत होता.
आऊसाहेबांना मुजरा करीत शिवजी म्हणाला, “आऊसाहेब काम फत्ते झाले. राजांनी खानास मारला. राजे सुखरूप गडावर पोहोचले आहेत.”
जिजाऊसाहेबांच्या डोळ्यातून आनंदाच्या धारा वाहू लागल्या. त्यांनी दासीला हाक मारून साखरेचे ताट मागविले. मुठभर साखर आऊसाहेबांनी स्वत:च्या हातांनी शिवजीच्या तोंडात घातली. शिवजीला सोन्याचं कडं आऊसाहेबांच्याकडून मिळालं. “राजे कसे आहेत?” आऊसाहेबांनी विचारलच.
“राजांना काहीही झाले नाही. राजे सुखरूप आहेत. खानाचं डोक कापून राजांनी गडावर आणलं. आपली फत्ते झाली.” शिवजीचा आनंद त्याच्या प्रत्येक शब्दामधून व्यक्त होत होता.
आऊसाहेबांनी सार्‍या गडावर साखर वाटण्याचा आदेश दिला. येवढा आनंद फार दिवसातून आऊसाहेबांना मिळाला होता. गंगाजी- मंगाजीच्या उत्साहाला तर उधाण आले होते. त्यांनी बाहेर दारूकाम सुरू केले. फटाके फुटू लागले. छोट्या संभाजीराजांना बरोबर घेऊन गंगाजी मंगाजी आऊसाहेबांच्या महाली आले. आऊसाहेबांचा समाधानी चेहरा पाहताना गंगाजी-मंगाजींना हायसे वाटले. गेले कित्येक दिवस या चेहर्‍यावर थोडसुद्धा हसू त्यांना दिसलं नव्हत. छोटे संभाजीराजे गंगाजी-मंगाजींना सोडून आऊसाहेबांकडे पळत आले व म्हणाले, “आऊसाहेब, आबासाहेबांनी खानाला मारला. आम्ही फटाके वाजवितो.” मोठ्या मायेने आऊसाहेबांनी शंभुबाळास जवळ घेतले. कनकगिरीच्या लढाईत धारातीर्थी पडलेल्या आपल्या पुत्राची आठवण म्हणून आऊसाहेबांनी मोठ्या हौसेने नातवाचे नाव संभाजी ठेवले होते. आपल्या पुत्राच्या संभाजीराजांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या अफजलखानाला राजांनी ठार मारल्याचे समजताच आऊसाहेबांना विलक्षण समाधान वाटले होते.
त्यांनी गंगाजी- मंगाजींना सांगितले, “हा पोर शिवजी, आमच्यासाठी धावत-पळत खबर घेऊन आला. त्याला चांगले खाऊ-पिऊ घाला. त्याला थोडी विश्रांती घेऊ देत.”
“आऊसाहेब आपली परवानगी घ्यायची होती.” गंगाजी-मंगाजी अजूनही त्याच उत्साहात होते.
“आज आम्ही अतिशय आनंदात आहोत. तुम्हाला जी काही परवानगी घ्यायची असेल ती घेऊन टाका.” आऊसाहेब.
“आऊसाहेब, राजांच्या स्वागतासाठी सारा गड सुशोभित करावा म्हणतो. राजे आल्यानंतर त्यांचे भव्य स्वागत झाले पाहिजे. स्वागताची तयारी करण्यास आपली परवागी आहे असं मी समजू ना ?” गंगाजी-मंगाजी पुढील बेत मनात आखत होते. आज काही आऊसाहेब नाही म्हणणार नाहीत याची त्यांना खात्री होती.
पण राजे इकडे राजगडावर येणार आहेत हे तुम्हाला सांगितले कोणी ? आऊसाहेबांना आश्चर्य वाटल्याशिवाय राहिले नाही.
“वा ! असे कसे होईल आपल्याला भेटायला राजे गडावर येणारच!” गंगाजी-मंगाजींना दांडगा विश्वास वाटत होता.
“गंगाजी, राजे येणार नाहीत. खानाच्या पराभवाने आदिलशाही हादरली असेल. या पराभवाचा फायदा घेण्यासाठी कोणताही राजकारणी प्रयत्न केल्याशिवाय राहणार नाही. याबद्दल राजांचे बेत फार पूर्वीपासून ठरले असणार. राजे येणार नाहीत. आलेली सुवर्णसंधी डावलून राजांनी आम्हास भेटायला यावं असं आम्हालाही वाटत नाही.” आऊसाहेबांनी ठामपणे सांगितलं.
“पण, राजे येणार च नाहीत हे आपण कसे सांगू शकता आऊसाहेब?” गंगाजी-मंगाजी अजूनही संभ्रमात होते. त्यांना काहीच समजत नव्हते.
“त्याचं असं आहे, खान स्वराज्यावर चालून आल्यापासून राजांचा व त्यांच्या आबासाहेबांचा नियमित पत्रव्यवहार सुरू झाला आहे. या सर्वांचा निश्कर्ष आपण काढू शकत नाही का ? खानाच्या पराभवामुळे त्रस्त झालेल्या आदिलशाही राज्याचा शक्य होईल तेवढा प्रदेश स्वराज्याला जोडण्याचा प्रयत्न राजे करणार याबद्दल आम्हाला तरी शंका वाटत नाही. आतापर्यंत राजांनी प्रतापगड सोडलाही असेल.” आऊसाहेबांनी सांगितले.
गंगाजी-मंगाजींचा उत्साह हा संपूर्णपणे संपला होता. पण अजुनही राजे येतील अशी आशा मात्र त्यांना वाटत होती. गंगाजी-मंगाजींची उरलीसुरली आशा संपली ती दुपारी प्रतापगडावरून जासूद हरकारे प्रतापगडाचा युद्धाचा सविस्तर वृत्तांत घेऊन आले त्या वेळेसच.
गंगाजी-मंगाजींच्या समोरच आऊसाहेबांनी जासुदास विचारले, “राजे इकडे येणार आहेत की नाहीत ते प्रथम आमच्या गंगाजी-मंगाजींना ऐकवा. त्यांना विनाकारण उत्सुकता लागून राहिली आहे.”
नकारार्थी मान हलवित जासुदाने सांगितले, “राजांनी सांगितलय की पुढल्या संपूर्ण मासात तरी आपणास राजगडी यायला वेळ होणार नाही. आज सकाळीच राजे वाईच्या दिशेने रवाना झाले असतीलही.”
आश्चर्यानं चकित झालेल्या गंगाजी-मंगाजींना बसायला सांगत आऊसाहेबांनी जासुदास सविस्तर वृत्तांत कथन करण्याची आज्ञा केली. लढाईचे वॄत्त ऐकताना आऊसाहेबांच्याच काय पण ऐकणार्‍या इतर मानकर्‍यांच्या अंगावरही रोेमांच उभे रहात होते. जासुद बेभान होऊन एकेक प्रसंग रंगवून सांगत होता. आऊसाहेबांसह ऐकणारे सर्वजण कानात प्राण आणून प्रत्येक शब्द ऐकत होते.
चार हजारांचे कसलेले पायदळ व तीन हजारांच्या आसपास घोडदळ घेऊन राजे वाईच्या दिशेने दौड करू लागले होते. कान्होजी, मोरोपंत, येसाजी कंक, तानाजी मालुसरे, रामजी पांगारकर आदी सर्व सरदार राजांबरोबर होते. पंताजीपंतांना राजांनी एक दोन दिवस विश्रांती घेऊन राजगडावर जायला सांगितले होते. कान्होजी जेध्यांचे कालचे उत्तर राजांना प्रवासात आठवले तरी हसू येत होते. सर्व सरदारांच्या वतीने विजयोत्सव करण्याची परवानगी कान्होजीबाबांनी राजांकडे मागितली होती. राजांनी परवानगी नाकारली होती. या संदर्भात रात्री कान्होजींशी बोलताना राजे म्हणाले होते, “कान्होजीबाबा उत्सव करण्यासारखा विजय पुढे वाट पहात असताना तुम्ही विजयोत्सवाची परवानगी मागितली कशी ? तुम्हाला तर सर्व गोष्टी माहिती आहेत. आमची किमान तुमच्याकडून तरी ही अपेक्षा नव्हती.”
गालात हसत कान्होजी जेधे राजांना म्हणाले होते, “काय आहे राजे आपल्या भावी योजनांबद्दल व आदिलशाही राज्यावर निर्णायक हल्ला करण्याबाबत या कान्होजीस काहीच माहिती नाही असे सर्वांना नंतर वाटेल हे एक कारण! आपलं पुढील राजकारण कोणाला कळू नये हे दुसरं कारण! या दोन कारणासाठी आम्ही विजयोत्सवाची परवानगी मागितली.”
कान्होजींच्या या उत्तरावर राजे खळखळून हसले होते. काल रात्रीच घडलेला सर्व वॄत्तांत राजांनी शहाजीराजांना कळविला होता. लवकरात लवकर शक्य होईल तो दिवस आक्रमणासाठी ठरवावा अशी विनंतीही केली होती. जर सर्व गोष्टी आताप्रमाणे जुळून आल्या तर फार मोठे राजकारण राजांना साधता येणार होते. त्यासाठी राजांची प्रयत्नांची पराकाष्ठा चालली होती.
राजांनी दुपार उलटून गेली तेव्हा वाईत प्रवेश केला. राजांच्या अंगावर फुलांचा वर्षाव करीत वाईकरांनी राजांचे स्वागत केले. नेताजी फाजलखानाच्या पाठलागावर गेल्याचे राजांना समजले. वाईत राहिलेल्या नेताजींच्या लोकांनी लुटीचा ऐवज गोळा केला होता. गावाच्या पूर्वेकडील मोकळ्या मैदानावर राजांनी त्यांचा मुक्काम ठोकला. राजांसाठी साधा तंबू उभारण्यात आला होता. राजांनी मोरोपंतांना आज्ञा केली. “पंत आता येथील लुटीचा माल पहा ! व लुटीच्या याद्या करून आमच्या समोर आणा.” मोरोपंत त्यांच्या कामाला निघून गेले. राजे क्षणाचीही उसंत घ्यायला तयार नव्हते. खानाच्या सरदारांचा अजुनही पुणे, सुपे, शिरवळ, सासवड, कोकण व मावळ प्रांतात ताबा होता. राजांनी तानाजी मालुसरे व येसाजी अशा दोघांना बोलावले व सांगितले, कोकण ताब्यात घेण्याचे काम आमचे दोरोजी करतील. उरलेला प्रांत तुम्ही ताब्यात घ्यावा. तुम्हाला किती लष्कर हवे आहे ?”
“हा ताना एकटा जाऊन खानाच्या सर्व सरदारांना हुसकावून लावेल राजे, तुम्ही फक्त आज्ञा करा.” तानाजी आवेशाने बोलत होता. “तुमची मागणी आम्हाला कळाली. आम्ही तुमच्यासोबत पाचशे स्वार देत आहोत. फक्त खानाचे सरदार आपल्याला हुसकावून लावायचे आहेत. यापेक्षा जास्त काहीही अपेक्षित नाही हे ध्यानी ठेवा.” राजांनी सांगितले. “उद्या सकाळी निघा.”
दुसर्‍या दिवसापर्यंत थांबायला दम होता कोणाला ? पाचशे स्वारांचं पथक सोबत घेऊन कंक व तानाजी मालुसरे रात्रीचे वाईबाहेर पडले. कोणाच्याही उत्साहावर पाणी न पाडता त्याचा योग्य पद्धतीने उपयोग करुन घेण्याचा राजांचा प्रयत्न चालला होता.
तोच नेताजी पालकर परतले. नेताजींना राजांनी भेटायला बोलावले. नेताजी राजांसमोर मुजरा करुन उभे राहिले. नेताजींची निराश मुद्रा राजांना सर्व काही सांगून गेली. राजे हसत म्हणाले “नेताजी निराश व्हायचं कारण नाही. जरी तुम्ही फाजलखानास पकडला असता तरी आम्ही त्यास सोडून दिला असता. असो, त्याला पळवून लावलेत. वाईसारख्या खानाच्या सुभेदारीच्या गावात आमच्या स्वागतासाठी लोकांना गुढ्या, तोरणे उभारायला लावलित हे काय कमी झाले? आम्ही खूष आहोत तुमच्या कामगिरीवर.”
राजांच्या बोलण्याने नेताजीचा चेहेरा उज़ळला. मोकळेपणाने तोे राजांशी बोलू लागला. “राजे फाजलखान पळाला नसता पण त्याला वाट दाखवावचे काम केले ते प्रतापराव मोर्‍याने आणि खंडोजी खोपड्याने.”
खंडोजीचे नाव नेताजीने उच्चारताच राजांच्या डोळ्यात अंगार दिसू लागला. संयमाने राजांनी स्वत:ला सावरले व ते म्हणाले, “नेताजी फाजलखानास आम्ही माफ करू. तो तर आमच्या शत्रूचा पुत्र आहे. प्रतापरावाच्या भावास आम्ही शासन केल्याने त्याचा रागही समजण्यासारखा आहे पण या खंडोजी खोपड्यास मात्र पुरते ध्यानात ठेवा. जर का हा गद्दार आमच्या हाती गवसला तर त्याला आम्ही जिवंत सोडणार नाही. स्वराज्याचं काम करणार्‍या वीरांच्या पाठीवरून हात फिरविणारे शिवाजीराजे फितुरांना कसे वागवतात हे सर्वांना कळायलाच हवं!” राजांचे संतप्त शब्द सर्वांच्या कानी पडले.
“वाईत विरोध मात्र जराही झाला नाही. उलट लोक आपण होउन स्वागताला आले होते.” नेताजी सांगत होते.
“खानाबरोबरच्या या युद्धात आमचा फायदा काय झाला आहे ते तर आम्हाला कळू दे” राजे.
मारोपंतांंनी कागद हाती घेत सांगायला सुरुवात केली. “या युद्धात सुमारे पासष्ठ हत्ती व हत्तीणी मिळाल्या आहेत. तसेच सुमारे बाराशे उंट मिळालेले आहेत.” मोरोपंत एकेक तपशिल सांगत होते.
राजांनी मोरोपंतांना अडवित विचारले. “पंत, अगोदर घोडे किती मिळाले ते सांगा ! आमच्या नेताजींच लक्ष घोडे किती मिळाले यावर आहे. त्यांना त्यांचं घोडदळ वाढवता येईल ना त्यामुळे ?” राजांच्या बोलण्यावर नेताजी फक्त हसले.
“नेताजीकाका, आपणाला एकूण पहा सुमारे चार हजार घोडे मिळाले आहेत.” मोरोपंतांनी सांगितले.
“तूर्त आम्हाला इतके पुरेसे आहेत. आणखी लागले तर आम्ही आपणाकडे मागणी करू.” नेताजी.
मोरोपंत पुढे वाचू लागले. “सुमारे तीन लाख किमतीचे जडजवाहिर मिळाले आहे. कापडाची दोन हजार ओझी ताब्यात आली आहेत. याशिवाय नगद मोहोरा व होन सात लाखांचे मिळाले आहेत. शिवाय खानाचा सर्व तोफखाना आपल्या ताब्यात आला आहे. अफजलखानाच्या शस्त्रांची मात्र मोजदाद अजून व्हायची आहे.”
मन प्रसन्न करणारे लुटीचे आकडे ऐकून राजे समाधानी झाले. त्यांनी सांगितले, “पंत, आज या वेळेपर्यंत जैतापूरच्या खाडीत खानाने उभी केलेली गलबतं आमच्या दोरोजींनी ताब्यात घेतली असतील. त्या गलबतांवरील संपन्न शस्त्रे व नगद रक्कम तुम्हाला आम्ही नंतर सांगूच.”
“राजे यापुढला बेत काय ?” नेताजींना राहवत नव्हते.
“ठीक आहे. आम्ही सांगतो. कान्होजी जेधे आणि मोरोपंत आमच्या बरोबरच थांबतील. तुम्ही विजापूरच्या मुलखात थेट घुसा. जेवढी लूट मिळवता येईल तेवढी मिळवा. तुम्हास जमेल तेवढी तुमची दहशत अदिलशहाला बसवा. मात्र हे करत असताना सामान्य माणसाला त्रास होईल असे कोणतेही वर्तन करू नका. विजापूर शहराच्या आसपासच्या गावांपर्यंत जा. मात्र कुठे लढाईचा प्रसंग आला तर सरळ माघार घ्या. आपल्याला आपल्या सेनेची नासाडी करायची नाही, हे ध्यानात ठेवा. विजापूरच्या राज्यात आपणाला जो काही धुमाकूळ घालायचा असेल तो घाला. आमची आपणाला पूर्ण संमती आहे. मात्र वेडं धाडस करु नका. अफजलखानाचा पराभव करत असताना आम्हाला शामराजपंतांनी फार गहिरी जखम केली आहे. असला कोणताही प्रसंग आमच्यावर येऊ देऊ नका. तुम्ही सारे सवंगडी सोबत असाल तर त्या स्वराज्याला आणि आमच्या कष्टांना अर्थ आहे.”
राजांच्या शब्दांनी राजांच्या सर्व सवंगड्यांचे डोळे पाणावले. राजे क्षणभर थांबले व त्यांनी पुढे सांगायला सुरुवात केली. “आम्ही उद्या पहिला हल्ला चंदनवंदन या गडावर करणार आहोत. तेथून तसेच पुढे खटाव, मायणी, कलेढोण, वाळवे, अष्टे, औदुंबर, सावे, उरण असा भाग काबिज करत करवीरपूरावर हल्ला चढविणार आहोत. पंधरा ते वीस दिवसात आम्ही करवीरपूरात पोहोचू असा आम्हाला विश्वास आहे. आम्ही करवीरपूरात पोहोचताच तेथे तुम्ही आम्हाला येऊन मिळा. बाकी गोष्टी आपण करवीरपूरातच ठरवू. काय कान्होजीबाबा, आमची मसलत ठीक आहे ना?”
विजापूरवर हल्ला करण्यासाठी अजुनही राजांचे मन उत्सुक आहे हे कान्होजींना जाणवले. जर दैवाची साथ व शहाजीराजांचे बळ मिळाले तर दक्षिणेच्या राजकारणात जबरदस्त उलथापालथ केल्याशिवाय राजे रहाणार नाहीत हे कान्होजींच्या ध्यानी आले. राजांच्या कल्पकतेचे त्यांनी मनातल्या मनात अभिनंदन केले. राजांनी कान्होजींकडे पाहिले. ते काहीच बोलत नव्हते.
“कान्होजी बाबा तुम्ही आमच्या आबासाहेबांचे जुने जाणकार सहकारी आहात. त्यांचं मन तुम्ही जाणता. आमचं काही चुकत असेल तर आपण दुरुस्त करावं,” राजे सूचक बोलले.
राजांच्या बोलण्याचा अर्थ इतर कोणाला समजणे शक्य नव्हते. कान्होजींना मात्र तो पुरेपूर समजला. ते गडबडीने म्हणाले, “आपला विचार अगदी योग्य आहे राजे. आपली योजना पूर्ण बरोबर आहे. त्यात मलाच काय पण शहाजीराजांनाही चूक काढता येणार नाही.”
कान्होजींच्या बोलण्यावर राजे खळखळून हसले. इतर बारीक-सारीक कामांची वाटणी राजांनी केली. सर्व आदेश दिले. “उदयिक सूर्योदयानंतर आम्ही आमच्या अदिलशाही विरुद्धच्या मोहिमेला आपणा सर्वांच्या साक्षीने व सहकार्यानं सुरूवात करीत आहोत.” राजांनी जाहीर करून टाकले.
त्या रात्री आपल्या सर्व सहकार्‍यांसमवेत भाजी-भाकरीचे साधे जेवण राजांनी घेतले. बरीच रात्र झाली तरी सर्वांच्या गप्पा चालल्या होत्या. राजे मात्र दिवसाभरच्या थकव्याने तंबूत येऊन परतले होते.
“साधा फाजलखान पकडता आला नाही राव तुम्हाला” संभाजी कावजी नेताजीला म्हणत होता.
कॄष्णाकाठच्या गारठ्यात शेकोट्या पेटवून सैनिक गप्पा मारत होते. “मी म्हणतो तुमच्या तावडीतून तो सुटला कसा ?” नेताजी काही माघार घेणारांपैकी नव्हते.
“आमी बापाला मारला व पोराला मुद्दाम सोडला तुमची ताकद बघायला. ती मात्र दिसली आज !” संभाजी नेताजींना चिडवत होता. इतर मानकरी नेताजींना नेताजीकाका म्हणत पण संभाजी कावजी व ते समवयस्क असल्यामुळे दोघांची कायम थट्टा चाले.
नेताजी हसत म्हणाले, “वा ! राव संभाजी कावजी ! वा रे भाद्दूर! मेलेल्यांना मारून तुम्ही मर्दुमकी सांगताय काय ?”
दोघांच्याही बोलण्यानं मंडळी हसत होती. मोकळेपणानं दाद देत होती.
येवढ्या सगळ्या गडबडीत तान महाले जिउला हुडकत होता. जेवणाच्या वेळी जिउ राजांशेजारी बसला असल्याने तानाला त्याच्याजवळ जाता आले नाही. जेवणं आटोपल्यावर जीउ आपल्या वडीलभावाकडे गेला. “दादा” म्हणून जिउने हाक मारताच, तानाने त्याला कडकडून मिठी मारली व म्हणाला, “वा रे माझा वाघ ! आज सकाळी ऐकलं ! सय्यद बंड्याला उडविलारं गड्या तू ! लोक बोलत्यात ङ्कहोता जीवा म्हणून तर वाचला शिवा. आरं डोळं भरुन येत्यात माझं हे ऐकताना.” काहीही न बोलता दोघे भाऊ बराच वेळ तसेच एकमेकांच्या मिठीत बद्ध होते.

**

पंच-पंच उष:काली राजे कॄष्णेवर स्नानाला गेले. कॄष्णेच्या थंडगार पाण्यानं राजांच अंग शहारलं. राजांची अंघोळ चाललेली असतानाच पूर्वेचा लालभडक रंग नदीच्या पात्रात सांडला. कॄष्णेचे ओंजळभर पाणी हाताशी घेत राजे स्वत:शीच म्हणाले, “हे लोकमाते कॄष्णे, सर्व पवित्र नद्या यवनांच्या ताब्यातून मुक्त करण्याचं व्रत आम्ही स्विकारलं आहे. तू आशीर्वाद दे. तुझा पवित्रपणा, मंगलपण, भव्यता, शांतपणा तू थोडा आमच्या स्वराज्यालाही दे …”

**

चाफळच्या राममंदीरात समर्थ रामदास बसले होते. समोर बसलेले त्यांचे सर्व शिष्य कैलासस्वामी सांगत असलेले राजांच्या विजयाचे रोमांचकारीे वॄत्त ऐकत होते. आपल्या श्रमांचे सार्थक झाल्याचं समाधान कल्याण व कैलास या समर्थांच्या दोन महंतांना होत होते.
कैलासानं सर्व वॄत्तांत सांगितला. कैलासाचा वॄत्तांत सांगून झाल्यावर समर्थ म्हणाले, “रामराज्याचं स्वप्न आम्ही पहातो आहे. तो कोदंडधारी राम आम्हाला शिवाजीराजांच्या रूपात आजमितीला दिसतो आहे. यशवंत, कीर्तीवंत, पुण्यवंत, आणि सामर्थ्यशाली राजाचं रूप आम्हाला शिवाजीराजांच्या रुपात दिसते आहे.”
“परमेश्वरानं त्यांना उदंड आयुष्य द्यावं व या मातीचे ऋण फेडण्याची संधी त्यांच्याबरोबर आम्हालाही मिळवून द्यावी.”
“शिवाजीराजांनी अफजलखानाला मारला, त्याचं लष्कर बुडवलं, मोठा विजय मिळविला ही सामान्य बाब नव्हे. भावी इतिहास या विजयाचा गौरवाने उल्लेख केल्याशिवाय रहाणार नाही. आनंदवनभुवनाचं आमचं मनोराज्य हा राजा महाराष्ट्राच्या भूमीत अवतीर्ण केल्याशिवाय रहाणार नाही असं आमची मनोदेवता आम्हाला सांगते आहे. मागे कौरवांचा क्षय पांडवांनी केला त्या वेळेसही असाच झगडा वीरा-वीरांचा जाहला होता. खासाखान राजियाने एकांगी करून मारिला. अफजलखान सामान्य आसामी नव्हे. बलाढ्य ताकद लाभलेला हा क्रुरकर्मा योद्धा जातीने दुर्योधन शोभावा असाच होता. अंगाचा, बळाचाही तसाच होता. त्याची दुष्टबुद्धी तर दुर्योधनाला मागे टाकेल अशी होती. अशा दुर्योधनास एकले भीमाने मारिला. त्याचप्रमाणे पराक्रम राजियाने केला. शिवाजी राजा म्हणजे दुसरा भीमचं ! त्यांनीच अफजल मारिला. हे कर्म मनुष्याचे नव्हे. आम्ही सांगतो हे कर्म सामान्य मनुष्याचे नव्हेच ! शिवाजी राजे म्हणजे अवतारीच होत. ! तरीच हे अफाट कर्म केले. यश आले. असे जाहले …”

– उमेश सणस
9822639110

चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email - Chaprak Email ID

One Thought to “शिवप्रताप”

  1. Vinod s. Panchbhai

    अतिशय रोमहर्षक आणि खिळवून ठेवणारी कादंबरी..

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

हे ही अवश्य वाचा