चपराक दिवाळी विशेषांक 2020
– मृण्मयी पाटणकर, सिडनी, ऑस्ट्रेलिया
व. पु. काळे यांच्या ‘वलय’ या पुस्तकामधली एक कथा आहे – ‘पिऊन वीज मी फुले फुलविली’. या गोष्टीतली मंजू लेखकाला एका प्रवासात भेटते. अत्यंत सुंदर… सौंदर्याची थोडीशी भीतीच वाटावी अशी. इच्छा असूनही आपण काही बोललो तर कदाचित ही आपला अपमान करेल या भीतीनं लेखक बोलायचं टाळतो पण मंजूच संवादाला सुरुवात करते आणि बघता बघता लेखकाचं मत साफ बदलून जातं. सौंदर्याचा जरासाही गर्व मंजूला नसतो. अत्यंत निर्मळ आणि दुसर्याला आपलंसं करून टाकणारं तिचं व्यक्तिमत्त्व लेखकाला भारावून टाकतं.
प्रवासाच्या अखेरीस मंजूच्या नवर्याशी – अवीशी देखील लेखकाची भेट होते आणि एका अत्यंत सुस्वभावी आणि एकमेकांना अनुरूप असलेल्या जोडप्याशी ओळख झाल्याचा आनंद मनात ठेवून लेखक त्यांचा निरोप घेतो. पुढे ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये होतं आणि भरभरून जीवन जगणार्या या जोडप्याविषयी लेखकाच्या मनातलं प्रेम अजूनच गाढ होत जातं. मग अचानक एके दिवशी कोणाशी तरी बोलताना लेखकाला समजतं की मंजू आजारी आहे.
‘‘काय झालंय तिला?’’ लेखक विचारतो.
‘‘तुम्हाला माहीत नाही? मंजूला टर्मिनल कॅन्सर आहे!’’ समोरचा सांगतो.
लेखकाला डोक्यावर आभाळ कोसळल्यासारखं वाटतं. एवढ्या सुंदर, जीवनानं रसरसलेल्या मंजूला टर्मिनल कॅन्सर? कसं शक्य आहे? लेखक मंजू आणि अवीची भेट घेतो. मनात आशा असते की समजलेली माहिती चुकीची असेल. किमान परिस्थिती आवाक्याबाहेरची नसेल पण वाईट बातम्या सहसा चुकीच्या नसतात.
‘‘मंजूकडं जास्त वेळ नाही…’’ अवी सांगतो.
‘‘आणि तरीही त्या इतक्या शांत कशा? तुम्ही इतके शांत कसे?’’ लेखकाचा प्रश्न.
‘‘मला माझ्या परिस्थितीची पूर्णपणे जाणीव आहे आणि मी ती स्वीकारलीय.’’ मंजूचं उत्तर.
‘‘ज्या क्षणी मला वाटेल की कॅन्सरच्या यातना आता सहन करायच्या नाहीत आणि अवीलाही सहन करायला लावायच्या नाहीत त्या क्षणी मी हे जग सोडून जाणार.’’
‘‘आणि तुम्ही त्यांना जाऊ देणार?’’ लेखक अवीला विचारतो.
‘‘मी मंजूवर प्राणापलीकडं प्रेम करतो आणि तिच्या निर्णयाचा मी आदर करणार.’’ अवी.
जड अंतःकरणानं लेखक त्यांचा निरोप घेतो. काही दिवसांनी अवी एकटाच लेखकाला भेटतो आणि मंजू अखेरच्या प्रवासाला ठरवल्याप्रमाणे हसत हसत निघून गेल्याचं वृत्त लेखकाला कळतं…
खूप वर्षांपूर्वी पहिल्यांदा ही गोष्ट वाचली तेव्हाच माझ्या मनाला ती भिडली होती. मंजूनं स्वतःच्या हातानं त्या दोन गोळ्या घेऊन अवीच्या बाहुपाशात प्राण सोडलेले वाचून मी घळाघळा रडले होते पण अशाच एका मंजूशी माझीही पुढेमागे गाठ पडणार आहे हे मात्र तेव्हा मला माहीत नव्हतं.
मंजू… मी मंजू असं एकेरी म्हणावं असं त्यांचं वय नव्हतं. माझ्या अगदी जवळच्या मैत्रिणीची – प्राजक्ताची – ही आई. आम्ही त्यांना ‘काकू’ म्हणायचो पण या निवेदनामध्ये तरी मी त्यांचा उल्लेख मंजू असाच करणार आहे. तर या मंजूशी माझी ओळख सिडनीमध्ये स्थलांतरित झाल्यानंतर झाली. प्राजक्ताची आई म्हणून! आमच्या ग्रुपच्या ‘वीकएंड गेट-टूगेदर्स’मध्ये आमच्या भेटीगाठी व्हायला लागल्या. वपुंच्या मंजू सारखीच आमची मंजूदेखील खूप सुंदर होती. सतेज गोरा वर्ण आणि चेहेर्यावर कायम एक प्रसन्न हसू! तिच्याकडं बघूनच समोरच्याला एकदम फ्रेश वाटावं! राहणीमान वयाच्या मानानं एकदम मॉडर्न. किंबहुना वय जाणवूच नये असा मस्त ऍटिट्यूड आणि त्याला साजेसा पेहेराव! अगदी नवीन स्टाईलचे कपडे पण अशी कॅरी करायची की तरुण मुलींनीही लाजावं!
इथं परदेशात येऊन राहणारे आम्हा सगळ्यांचेच आईवडील काही काळानं कंटाळायला लागतात. त्यांना परत जाण्याचे वेध लागायला लागतात. मंजू मात्र याला अपवाद! इथं आली की अगदी मनापासून इथलीच होऊन जायची. नातवाला शाळेत सोडायला आणि आणायला चालत जायचं, बागेत चक्कर मारताना इतर लोकाशी ओळखी करून घेऊन गप्पा मारायच्या, मोकळ्या वेळात भारतीय कार्यक्रम बघायला मिळत नसले तरी इथल्या टीव्हीवरचे लोकल कार्यक्रम एन्जॉय करायचे हे ती वर्ष वर्ष न कंटाळता अगदी सहज करू शकायची! तिला अनेक छंदही होते. ती स्वतः कलाकार होती. पुण्यामध्ये तिचा स्वतःचा हँडिक्राफ्ट्सचा व्यवसाय होता. एक बुटीक शॉप होतं. पॅचवर्कचे कपडे, बेड लिनन वगैरे डिझाइन्स मंजू स्वतः करून तिच्याकडं कामाला असलेल्या बायकांकडून वस्तू बनवून घ्यायची. इथंही तिनं नातवासाठी त्याच्या आवडीच्या गोष्टी – विमानं, ढग, बिल्डिंग्ज, गाड्या वगैरे वापरून इंटरेस्टिंग डिझाईनचं मस्त ब्लँकेट बनवलं होतं. याशिवाय ती पेंटिंग्ज करायची. ऑस्ट्रेलियाच्या स्थानिक आदिवासी शैलीतलं एक आणि इथल्या एका प्रसिद्ध लँडमार्क ‘एयर्स रॉक’चं तिनं केलेलं पेंटिंग आत्ताही माझ्या डोळ्यासमोर आहे! थोड्याफार फरकांनी इथं मुला-नातवंडांना भेटायला येणारे सगळेच पालक असे काहीतरी उद्योग लावून घेतात पण मंजूचं वेगळेपण असं की केवळ वेळ घालवण्यासाठी ती हे करतीय असं तिच्याशी बोलताना कधीच वाटायचं नाही. ती जिथं असेल तिथं लाईफ एन्जॉय करायची!
एका ट्रीपमध्ये तिनं ज्वेलरी मेकिंगचा उद्योग चालू केला. इथल्या एका दुकानात जाऊन खूप सारं सामान घेऊन आली आणि प्राजक्ताबरोबर आम्हा सगळ्या मुलींसाठी छान छान काय काय बनवून दिलं! तिचं बघून मलाही उत्साह आला. मग काय… एका दुपारी तिनं मला मस्त ट्रेनिंग दिलं आणि माझ्याही तिच्याबरोबर त्या दुकानाच्या फेर्या व्हायला लागल्या.
तिची सगळ्याच बाबतीत निवड फार सुंदर होती. प्रत्येक वेळी पुण्यातून येताना आमच्या ग्रुपमधल्या सगळ्यांसाठी काहीतरी गिफ्ट्स घेऊन यायची. प्रत्येक वेळच्या वस्तूंमध्ये वेगळा विचार आणि अत्यंत आर्टिस्टिक चॉईस! तिला एवढ्या छान कल्पना सुचायच्या कशा याचं मला नेहेमी आश्चर्य वाटायचं.
स्वयंपाकात तर मंजूचा हातखंडा! ती इथं असताना प्राजक्ताकडं डिनरला जाणं म्हणजे आमच्या ग्रुपसाठी अत्यंत आनंदाचा प्रसंग असायचा! प्राजक्ता पण या बाबतीत अगदी आईचा वारसा चालवणारी. दोघी मायलेकी मिळून असे एक एक बेत करायच्या की त्या जेवणानंतर दोन दिवस उपास करावा. मंजूच्या हातच्या जिलेब्यांना तर अक्षरशः तोड नव्हती. माझे गोडाशी सबंध फारसे गोडीगुलाबीचे नाहीत. जिलेब्या तर जरा नावडत्याच पण मंजूच्या जिलेब्या खायला माझा सुद्धा अगदी पहिला नंबर असायचा. बरं नुसतंच पदार्थ सुंदर बनवायची असं नाही तर त्या पदार्थांचं प्रेझेंटेशन सुद्धा अप्रतिम करायची. असं वाटावं की कुठंतरी रेस्टराँमध्ये जेवतोय.
तिचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे ती स्वतः अनेक गोष्टींमध्ये इतकी पारंगत असूनही तिच्या व्यक्तिमत्त्वामध्ये गर्वाचा, आपण इतरांपेक्षा श्रेष्ठ असल्याच्या भावनेचा लवलेशही नव्हता. कोणाच्याही गुणांचं ती अतिशय मुक्तकंठानं कौतुक करायची. तिच्याशी बोलताना स्वतःबद्दल न्यूनगंडाची भावना यावी इतके गुण तिच्यामध्ये होते पण न्यूनगंड सोडाच, कोणालाही आपल्याच आयुष्याकडे नव्यानं पाहायला शिकवेल असं तिचं संवादकौशल्य होतं. तिच्याशी छान गप्पा मारल्यावर एक स्ट्राँग पॉझिटिव्ह फीलिंग यायचं. तिची प्राजक्ताला एक साधी शिकवण होती. कधीही कोणाकडे जेवायला गेलात तर तुम्हाला जेवण मनापासून आवडलेलं असो अथवा नसो, ते बनवणार्या व्यक्तीला तुम्ही सांगायलाच हवं की जेवण छान झालंय! कारण ते बनवण्यामध्ये त्या व्यक्तीची मेहेनत असते आणि त्या मेहेनतीची दखल घेतली गेल्याची पावती त्या व्यक्तीपर्यंत पोचायला हवी. हाच तिचा दृष्टिकोन सगळ्याच बाबतीत होता.
कोणालाही मदत करण्यात मंजूचा पहिला नंबर असायचा. एकदा आम्ही एका घरातून दुसर्या घरात शिफ्ट होत होतो. मंजूचा मुक्काम तेव्हा सिडनीमध्ये होता आणि माझ्या घरी माझे सासूसासरेही होते. प्राजक्ताकडून निरोप आला की रात्रीचं जेवण मी पाठवते. शिफ्टिंग करायला मूव्हर्स बोलावले होते पण तरीही आधी आठवडाभर पॅकिंग आणि त्या दिवशी सगळं सामान हलवून होईपर्यंत अक्षरशः कंबर मोडली होती. रात्री जेवण घेऊन प्राजक्ताचा नवरा योगेश आला. डबे उघडल्यावर आम्ही थक्कच झालो. या मायलेकींनी एखादं साधं सोपं ज्याला वन डिश मील म्हणतात असं काहीतरी करण्याऐवजी छोले, पोळ्या, कोशिंबीर, भाताचा एक प्रकार असं चारी ठाव जेवण आम्हा सगळ्यांसाठी पाठवलं होतं! अंगात उभं राहायचंही त्राण नसताना हे असं गरमागरम जेवण मिळणं म्हणजे त्याक्षणी आमच्यासाठी स्वर्गसुख होतं!
मंजू माझ्या मैत्रिणीची आई असूनही माझ्याही खूप जवळची झाली. ती असली की माझी आई असल्यासारखाच तिचा आधार वाटायचा. मंजूचं इथे वास्तव्य झालंही खूप! आधी प्राजक्ताचा मुलगा लहान असताना त्याच्या निमित्तानं आणि नंतर प्राजक्ता पीएच. डी. करत असताना तिला मदत म्हणून मंजू बरीच वर्ष ये जा करत होती. प्राजक्ताचं आणि तिचं नातंही खूप घट्ट होतं. स्वतः 9 वर्षांच्या मुलाची आई असलेली प्राजक्ता नेहेमी म्हणायची की आईशिवाय अजूनही मी काय करेन मला माहीत नाही.
प्राजक्ताचं पीएच. डी. संपत आलेलं असताना एक दिवस आम्ही एका कॅफेमध्ये ब्रेकफास्टला भेटलो होतो. मंजूपण होती. बोलता बोलता प्राजक्ता म्हणाली की ‘‘आईला डॉक्टरकडे घेऊन जायचंय. तिच्या छातीवर डाव्या बाजूला सूज आल्यासारखं वाटतंय आणि तिचा डावा हातही खूप दुखत होता.’’ प्राजक्ताला खूप टेंशन आलं होतं पण मंजू म्हणाली की ‘‘तुझा शेवटचा आठवडा राहिलाय थिसीसचा! आत्ता काही काढू नकोस. तुझं सबमिशन झालं की आपण जाऊ. एवढं काही झालं नसणार आहे. शिरेवर शीर चढली असेल. थोडा मसाज केला की बरं वाटेल मला!’’
मी हे संभाषण दोन दिवसात थोडं विसरूनही गेले कारण मंजूच्या बोलण्यावरून काही सिरीयस असेल असं मलाही वाटलं नाही. प्राजक्ताचा थिसीस सबमिट झाला. आम्ही सगळ्यांनी तिचं अगदी मनापासून अभिनंदन केलं… खरं तर ती इतकी वर्षं इतके कष्ट, एवढं काम त्यावर करत होती की तो प्रकार एकदाचा संपला म्हणल्यावर तिच्याएवढंच आम्हालाही हायसं वाटलं! त्यानंतर चार-पाच दिवसांनी मी ऑफिसमध्ये असताना सकाळीच प्राजक्ताचा फोन आला. ‘‘हाय! काय म्हणतीयेस?’’ असं म्हणेपर्यंत ती फोनवर रडायलाच लागली. ‘‘मृण्मयी, अगं आईला टेस्ट करायला घेऊन आलीय… डॉक्टर म्हणाले की ऑलमोस्ट शुअरली ब्रेस्ट कॅन्सर आहे!’’
मला एक क्षण काय बोलावं सुचेचना! आजूबाजूचं दृश्य फिकट झाल्यासारखं वाटलं… गरगरल्यासारखं वाटायला लागलं. प्राजक्ताला धीर देण्यासाठी मी काहीबाही बोलले असणार पण माझ्याच पायाखालची जमीन सरकल्यासारखी झाली होती. हे कसं शक्य आहे? मंजूला कॅन्सर? आणि तो ही असा अचानक डिटेक्ट व्हावा? आधी काहीच लक्षणं नव्हती. तरीही मी माझ्या मनाची समजूत घातली की वाईटात चांगलं एवढंच की ब्रेस्ट कॅन्सरचा प्रॉग्नोसिस इतर काही प्रकारच्या कॅन्सर्सपेक्षा खूपच चांगला आहे. ऑपरेशन करून मंजू नक्कीच बरी होईल. एवढा सकारात्मक दृष्टिकोन असलेली मंजू निश्चितच या रोगाला पिटाळून लावेल.
त्या रात्री मी प्राजक्ताकडच्या सगळ्यांनाच घरी बोलावलं. घराबाहेर पडून चार माणसांबरोबर वेळ घालवायची त्यांना अतिशय गरज होती. मंजू आल्यावर काय बोलायचं हे कळत नव्हतं. अशावेळी काय बोलतात कुणाशी? इंटरकॉमची बेल वाजली. दार उघडल्यावर मंजूचा चेहेरा पाहिला आणि काळजात चर्रर्र झालं. कायम प्रसन्न, टवटवीत असणारा मंजूचा हसरा चेहरा आज प्रथमच इतका घाबरलेला, असा हरल्यासारखा दिसत होता. प्राजक्ताच्या डोळ्यांकडं बघून स्पष्ट दिसत होतं की तिचा संपूर्ण दिवस रडण्यात गेलाय. आम्हाला कुणालाच काही बोलायला सुचत नव्हतं. जे काही बोलणं झालं त्यावरून एवढं समजलं की मंजूला तातडीनं ऑपरेशन करायला सांगितलं आहे. दुसर्या दिवशीच तिचं परतीच्या फ्लाइटचं तिकीट काढलं होतं. आम्ही आमच्यापरीनं त्या सगळ्यांनाच धीर द्यायचा प्रयत्न केला. म्हणलं, ‘‘वर्षभरात तू बरी होऊन परत सिडनीला येशील बघ.’’
आमच्या घराला मंजूची ती शेवटची भेट होती याची तेव्हा आम्ही स्वप्नातही कल्पना केली नसती.
मंजू दुसर्याच दिवशी पुण्याला परत गेली. इथली कामं मार्गी लावून काही दिवसांनी प्राजक्ताही गेली.
या काळात प्राजक्ताची अवस्था बघवत नव्हती. तिचं पीएच. डी. चं काम कित्येक वर्ष चाललं होतं. ते संपल्यावर आईबरोबर छान वेळ घालवायचा तिचा प्लॅन होता पण अचानक हे भलतंच काहीतरी घडलं होतं. तरीही ती पॉझिटिव्ह राहण्याचा प्रयत्न करत होती.
पुण्यामध्ये मंजूचं ऑपरेशन यशस्वी झाल्याची बातमी काही दिवसांनी आम्हाला मिळाली. आम्ही सगळ्यांनीच देवाचे आभार मानले. मनावर गेले काही आठवडे आलेलं दडपण जरा दूर झाल्यासारखं वाटत होतं. अर्थात ऑपरेशन ही अर्धी लढाई होती. पुढची ट्रीटमेंट, केमोथेरपी, अजून बराच पल्ला गाठायचा होता पण मंजू इच्छाशक्तीच्या जोरावर त्यातून नक्कीच तरून जाईल अशी खात्री होती.
ऑपरेशननंतर काही आठवडे थांबून प्राजक्ता सिडनीला परत आली आणि नंतर थोड्याच दिवसांनी मी माझ्या भावाच्या लग्नासाठी पुण्याला गेले. मधल्या काळात मंजूच्या केमोथेरपीच्या राऊंड्स सुरु झाल्या होत्या. लग्नाची गडबड आटोपल्यावर मंजूला भेटायचं होतंच. मी प्राजक्ताच्या बाबांना फोन केला तर ते म्हणाले की ‘‘तिची किमोची दुसरी राऊंड एवढ्यातच झालीय आणि तिला खूपच त्रास होतोय. त्यामुळे एवढ्यात भेटायला येऊन काही उपयोग नाही. ती बोलण्याच्या परिस्थितीच नाहीये.’’ सुदैवानं माझा पुण्यातला मुक्काम त्या वेळी बराच जास्त होता त्यामुळे मी दोन-तीन आठवड्यांनी जाऊ शकत होते.
प्राजक्ताच्या बाबांबरोबर वेळ ठरवून मी आणि आई मंजूला भेटायला गेलो. मनात चलबिचल होती. कशी असेल मंजू? बोलता तरी येईल का तिला आपल्याशी? तिचा शेवटच्या भेटीतला चेहेरा पुन्हा पुन्हा डोळ्यासमोर येत होता. तिला सामोरं जाण्याची हिम्मत माझ्यामध्ये आहे की नाही हेच मुळात समजत नव्हतं.
काकांनी दार उघडलं आणि मंजू समोर आली. अगदी छान हसत, ‘‘या या’’ म्हणत तिनं आमचं स्वागत केलं. मनावरचं दडपण एकदम दूर झालं. ही तर आमची जुनीच मंजू होती. सिडनीमधल्या शेवटच्या भेटीत तिच्या चेहेर्यावर दिसलेल्या भीतीचा कुठे मागमूसही नव्हता. अर्थात कॅन्सर आणि किमोनं आपल्या खुणा उमटवल्या होत्याच. तिचं वजन खूप कमी झालं होतं आणि चेहेरा थकल्यासारखा दिसत होता. डोळ्यांखाली काळी वर्तुळंही आली होती पण आत कुठंतरी काहीतरी पूर्ववत झालं होतं. तिच्यातलं चैतन्य परत आल्यासारखं वाटत होतं.
आम्ही आत येऊन सोफ्यावर बसलो. यापूर्वी जेव्हा आम्ही मंजूच्या घरी आलो होतो तो प्रसंग आठवला. आमच्या ग्रुपमधल्या एकाची होणारी बायको प्रथमच सगळ्यांना भेटणार होती. कार्यक्रमाची होस्ट होती मंजू. तिनं नेहेमीप्रमाणे तिच्या स्टाईलमध्ये सगळं खूप सुंदर ऑर्गनाईझ केलं होतं. अगदी आठवणीत राहिली होती ती संध्याकाळ. आज मात्र मंजू पेशंट होती. आम्हीही भेटायलापेक्षा खरं तर तिला ‘बघायला’ आलो होतो! पण थोड्याच वेळात जाणवलं की आमची ही समजूत तितकीशी बरोबर नव्हती. मंजूला किमोच्या पहिल्या राऊंडनंतर प्रचंड त्रास झाला होता. अक्षरशः रात्र रात्र उलट्या, चकरा येणं, चार पावलं चालताही येणार नाही एवढा अशक्तपणा, भ्रम, वर्णनही करता येणार नाही असा भीतीदायक प्रकार! पण हे असं सगळं दोन आठवड्यांपूर्वीच होऊन गेलंय असं तिच्याकडे आत्ता बघताना सांगूनही खरं वाटलं नसतं. तिला कुठल्यातरी डॉक्टरांची होमिओपॅथीची ट्रीटमेंट चालू केली होती आणि त्याचा तिला बराच फायदा होत होता. आमच्याशी बोलताना ती अगदी पूर्वीसारखी हसत प्रसन्नपणे बोलत होती. काका म्हणाले की ‘‘जरा बरं वाटल्यावर बाईसाहेब कामाला लागतात.’’
‘‘मग काय करायचं गं? बरं वाटत असलं की बसून राहायला नको वाटतं’’ मंजूचं उत्तर!
खरंतर तिच्या नेहेमीसारख्याच सुंदर ठेवलेल्या घराकडे बघूनच आम्हाला समजायला हवं होतं की स्वतःचं आजारपण इतरांवर आणि घरावर तिनं पसरू दिलं नव्हतं. शरीर आजारी होतं, मन नाही! तिच्याशी गप्पा मारताना मग कसलीच अडचण आली नाही. ती स्वतःच इतकी छान पॉझिटिव्ह स्पिरिटमध्ये होती की सगळं काही चांगलं होणार आहे असा धीर आम्ही तिला देण्याऐवजी तिच्याशी बोलून मलाच धीर मिळत होता.
थोडावेळ गप्पा झाल्यावर आम्ही निघायच्या विचारात होतो पण मंजूच्या घरून पाहुणचार न घेता कोणीही बाहेर पडू शकायचं नाही! अगदी ती स्वतः केमोथेरपीसारख्या दिव्यातून जात असली तरीही… तिनं तिच्या कामवाल्या मावशींना सांगून आमच्यापुढे नेहेमीप्रमाणे काय काय सुंदर पदार्थ ठेवले. आम्ही इथे एका कॅन्सर पेशंटला बघायला आलो होतो हा आमचाच भ्रम होता की काय? सर्वात कहर झाला जेव्हा तिनं स्वतःच्या हातानं बनवलेलं अप्रतिम डिझर्ट अगदी मास्टरशेफ स्टाईलमध्ये प्रेझेंट करून आमच्या पुढ्यात ठेवलं! यापुढे बोलायला माझ्याकडे काहीही शब्द उरले नव्हते!
एका अत्यंत आजारी व्यक्तीकडून कमालीची पॉझिटिव्ह एनर्जी घेऊन परतण्याचा विरोधाभास मी त्या दिवशी अनुभवला!
काही दिवसांनी मी सिडनीला परत आले. प्राजक्ताकडून मंजूच्या बातम्या मिळत होत्या. किमो संपून मंजूचा रिकव्हरीकडे प्रवास सुरु झाला होता. आमच्या मनात सुद्धा आता मंजूच्या बरं होण्याबद्दल जराही शंका राहिली नव्हती. काही महिन्यांनी प्राजक्ता योगेशबरोबर तिची आणि काकांची दुबईची ट्रीप सुद्धा झाली. प्राजक्ताचं आता आईबाबांना तिच्या ग्रॅज्युएशनला बोलावण्याचं प्लॅनिंग सुरु झालं होतं.
अशातच एक दिवस बातमी आली की मंजूचं एका नवीन ट्युमरसाठी परत ऑपरेशन झालं. त्याच ठिकाणी परत आलेला हा ट्युमर सुद्धा कॅन्सरच होता आणि यावेळी डॉक्टरांनी रेडिएशन थेरपी सुरु केली होती पण आता तितकीशी भीती वाटत नव्हती. असं वाटत होतं की सर्जरी तर झालीच आहे, आता रेडिएशन पण झालं की ट्रीटमेंट पूर्ण होऊन जाईल.
पण त्यानंतर मंजूला धाप लागायला लागली. रेडिएशन डॅमेज किंवा इन्फेक्शन असं काहीतरी असावं असं डॉक्टर्स म्हणत होते आणि काही दिवसांनी अचानक प्राजक्ताकडून समजलं की तिची तब्येत क्रिटिकल आहे. प्राजक्ता ताबडतोब पुण्याला निघून गेली. सगळं व्यवस्थित चालू आहे असं वाटत असतानाच हे इतकं अचानक घडलं की त्याचा अर्थच लावता येत नव्हता. माझं मन तरीही ठामपणे मला सांगत होतं की मंजू यातूनही बाहेर येईल. तिची शेवटची भेट आणि तिच्यामधून ओसंडून वाहणारी इच्छाशक्ती माझ्या डोळ्यांसमोर होती. मंजू हार मानणार नाही अशी खात्री वाटत होती.
…पण नियती म्हणजे काय आणि तिच्यासमोर कोणीच कधी जिंकू शकत नाही याचा प्रत्यय द्यायला एक दिवस माझ्या बाबांचा फोन आला. मंजू गेली होती.
तो फोन आला तो क्षण स्पष्ट आठवतो. त्याच्यानंतर काय झालं, पुढचे दिवस कसे गेले हे सगळं आता आठवतही नाही. एखाद्या धुराच्या पडद्याआडून पाहिलेलं दृष्य आठवायला जावं तसं होतं आणि शेवटी मंजू आता या जगात नाही एवढंच सत्य समोर उरतं!
मंजूला जाऊन आता चार वर्ष होतील! पण तिची ती टवटवीत प्रतिमा माझ्या मनामध्ये कधीच फिकी होणार नाही. अजूनही कधी कधी असं वाटतं की दार उघडल्यावर मस्त कपडे घातलेली सुंदर मंजू हसत हसत आत येईल आणि सगळं घर तिच्या त्या ट्रेडमार्क पॉझिटिव्ह व्हाइबनं भरून टाकेल!
वपुंच्या मंजूसारखीच आमचीही मंजू इतरांच्या आयुष्यात फुलं फुलवणारी, स्वतः वीज पिऊनही!