१९६० नंतरच्या कवितांची सफर

१९६० नंतरच्या कवितांची सफर

‘साहित्य चपराक’ दिवाळी विशेषांक 2020
साहित्य चपराक मासिकाचे सभासद होण्यासाठी आणि ‘चपराक’ची नवनवीन पुस्तके मागविण्यासाठी संपर्क – 7057292092

कवितेसोबत चालताना…!

मराठी कवितेत 1960 नंतरच्या कवितेचं वेगळेपण आहे. खरी सशक्त कविता 1960 नंतर आलेल्या संग्रहांनी मराठीला दिली आहे पण इथं तो इतिहास सांगायचा नाही. त्या कवितेवर समीक्षा करावयाची नाही. आता एकविसाव्या शतकाची दोन दशकं संपून गेल्यावर या कवितांबद्दल लिहिणं हे सिंहावलोकन आहे पण वैयक्तिक माझ्यासाठी हे स्मरणरंजन आहे. कळत्या वयापासून या कवितेची आवड लागली. नंतर स्वत: कविता लिहू लागलो. कवीसंमेलनात भाग घेणं सुरु झालं. हे गेली चाळीस वर्ष सुरु आहे. त्यामुळं आस्वादनासाठी या प्रवाहाजवळ आलेला मी आता या प्रवाहाचा भाग झालो आहे. त्यामुळं हे सिंहावलोकन फार थोडं म्हणजे दहा-वीस वर्षाचंच आहे. बाकी सगळं हे त्या कवितेसोबत चालतानाच्या आठवणी आहेत. त्या आठवणीतून एक सुंदर आणि मराठी कवितेत महत्त्वाच्या ठरल्या गेलेल्या प्रवाहाचं दर्शन आपल्याला घडवावं हा मूळ हेतू आहे. कवी म्हणून माझा निर्मितीचा संघर्ष तर सुरूच आहे, कवी म्हणून व्यासपीठावर येतानाचा आणि आल्यानंतरचा संघर्ष आहेच पण या दोघांचा या आपल्या सफरीत काही संबंध नाही. ते फार सांगण्यासारखं सुद्धा नाही किंवा मला त्याबद्दल बोलायचं नाही.

1961 साली मराठी भाषिकांचं स्वतंत्र राज्य अस्तित्वात आलं ही या काळातील महत्त्वाची घटना आहे. संयुक्त महाराष्ट्रासाठी खूप मोठी चळवळ होऊन आणि अनेकांचे बळी जाऊन महाराष्ट्र राज्य निर्माण झालं हे त्यात महत्त्वाचं. जगभरात हा काळ खूप महत्त्वाचा आहे. मार्टिन ल्यूथर किंग यांनी कृष्णवर्णीयांच्या हक्कासाठी याच दशकात चळवळ सुरु केली. त्यांच्यासाठी लाखो लोकाचे मोर्चे निघत होते. स्त्रियांच्या हक्कासाठी याच दशकात चळवळी सुरु झाल्या. अमेरिका व्हिएतनामवर बॉम्बवर्षाव करीत होती. एका बाजूला वॉटरगेट प्रकरण गाजत होतं तर दुसर्‍या बाजूला सैनिकांच्या बंदुकात फुलं ठेवून महिला आणि शाळकरी मुलं ‘युद्ध नको, आम्हाला शांती हवी आहे’ यासाठी आग्रह धरीत होते. 1970 साली अमेरिकेत पर्यावरण रक्षणासाठी जगभरातून 25 लाख लोक गोळा झाले होते. जगभरातील या सर्व वादळी कालखंडात तरुणांचा उत्स्फूर्त सहभाग होता. हे तरुण बंडखोर होते. संस्कृती ही धनिक, उच्चभ्रू आणि अभिजन यांच्यापुरती होती. ती आम्ही नाकारतो अशी भूमिका घेऊन पर्यायी संस्कृती उभी करण्याची चळवळ सुरु झाली. श्रीमंतांच्या महालातील कला रस्त्यावरच्या लोकासाठी सुरु झाली. मिळेल ते वाद्य घेऊन रस्त्यावर गाणी म्हणू असं सांगत नवसंगीत ज्याला बिटल्स म्हणतात ते आलं. ‘दाढी वाढवू, फाटके कपडे घालू’ असं म्हणत हिप्पी आलं.

बंगालमध्ये बादल सरकार यांनी पथनाट्यं सुरु केली. आपल्याकडं लघुनियतकालिकांची चळवळ सुरु झाली. ‘दलित पँथर’, ‘युक्रांद’सारख्या चळवळी आल्या. मोठे चित्रकार रस्त्यावर उतरून चित्र काढू लागले. आपल्या मुंबईच्या वसतिगृहातील खोल्यांच्या भिंती अशाच चित्रांनी भरून गेलेल्या होत्या. जगभराच्या तरुणांनी प्रस्थापितांविरुद्ध बंड सुरु केलं होतं तरी त्यात नुसती मोडतोड नव्हती तर प्रत्येकाला पर्याय दिले जात होते. एका बाजूला नकार देताना दुसर्‍या बाजूला टोकदार निर्माण होत होते. 1960 ते 70 च्या दशकाला म्हणून मानवी इतिहासातच खूप महत्त्व आहे. आपला देश तर नेहरू गेल्यापासून (1964) दोन हजार सालापर्यंत खदखदतच होता. राजकीय आणि सामाजिक जीवनात प्रंचड वादळे या काळात आली. आजचं राजकीय व सामाजिक चित्र हे त्या काळातील वादळानंतरचं आहे. आणीबाणी, इंदिरा गांधींचा मृत्यू, राजीव गांधींचा मृत्यू, अयोध्या यात्रा, बाबरी पाडणं, त्यानंतरच्या दंगली, मंडल आयोग, मुंबई बॉम्बस्फोट, राजकीय अस्थिरता, आघाड्यांची सरकारं आणि त्यात जागतिकीकरण या व अशा अनेक घटनांनी हा काळ रंगलेला आहे. त्यात आपण आपल्या कवितेचा रंग पाहणार आहोत.

त्यातच भारत-चीन युद्ध, भारत-पाक युद्ध ही देशावर परिणाम करणारी युद्धं झाली. 1972 सालचा अन्नावाचून तडफडणारी माणसं बघण्याचा दुष्काळ आला. आंतरराष्ट्रीय महिला वर्ष आलं, राज्याचं महिला धोरण आलं. नामांतराची दंगल झाली. नामविस्तार झाला. मराठवाडा विकास आंदोलन, स्वतंत्र विदर्भ आंदोलन, पाठीत खंजीर खुपसणं आलं.

शिकलेल्या पिढीसमोर भवितव्य नव्हतं. त्याचा विस्फोट साहित्यातून आला. दलित साहित्यातून नवं जीवन आलं. त्याचा भडका उडाला. आंबेडकरांचं धर्मांतर होऊन गेलं होतं. त्याचे सामाजिक परिणाम सुरु झाले होते. दुष्काळानं देश सोडून कामगार होणार्‍यांची संख्या वाढत होती. वाढत्या शहरीकरणात गुन्हेगारीचे नवे प्रश्न सुरु झाले होते. जातीयतेचे चटके ग्रामीण भागात वाढल्यानं दलितांना शहर सुरक्षित वाटू लागलं. त्यातून झोपडपट्ट्याची संख्या वाढली. त्यांचं एक वेगळंच जग तयार झाले. नवे कामगार, नवे गुन्हेगार, झोपडपट्ट्याचे दादा, महिलांचे प्रश्न यातून एक वेगळाच समाज घडत चालला. जागतिकीकरणानं या सर्वांवर आता कळस चढवला आहे. जगणं अधिक भिकार करून हे शतक सुरु आहे.

संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत आण्णा भाऊ साठे, अमर शेख आणि गवाणकर हे शाहीर आपली कला सादर करीत होते. हजारोंच्या संख्येनं या कार्यक्रमाला लोक गर्दी करत. लावणी, पोवाडा, गोंधळ या लोककलेचा वापर करून नवे विषय, नवे प्रश्न मांडण्यात येत. त्याचा खूप मोठा परिणाम महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनावर झालेला दिसून येतो. त्याचप्रमाणे गाडगेबाबा आणि तुकडोजी महाराज हे आधुनिक संत झाले. सार्वजनिक स्वच्छता करून अंधश्रद्धा घालवणारे प्रबोधन गाडगेमहाराज करीत. तुकडोजी महाराज नव्या काळाची मूल्ये सांगणारी गाणी म्हणत. चांगल्या जीवनासाठी अंधश्रद्धा आणि कर्मकांडं टाळून विवेकवादी चिचार महत्त्वाचा असतो हे आयुष्यभर या संतांनी सांगितलं.

इंग्रजी साहित्याच्या प्रभावातून मराठी साहित्याची मांडणी करण्याचा प्रयत्न केशवसुतांपासून सुरु झाला तरी त्याचा पाया संत साहित्य हाच होता. केशवसुतांनंतरच्या पन्नास वर्षांच्या काळात रविकिरण मंडळ ते मर्ढेकर यांच्यावर पाश्चत्य साहित्याचा प्रभाव होता तरी त्याचाही पाया संतसाहित्य हाच होता. माधव जुलियन यांनी गजल हा नवा काव्यप्रकार आणला पण त्यातील फारसी भाषेचा प्रभाव ते कमी करू शकले नाहीत. त्यामुळं त्यांची गजल फारशी रुजली नाही. मर्ढेकरांनी कवितेत बदल आणला हे मानले जाते पण त्यांनी अभंग, ओवी यासारखा रचनाप्रकार वापरला. 1960 नंतरच्या कवींनी जुनं नाकारल्याचा घोष केला परंतु त्यांची कविता तुकाराम आणि नामदेवांभोवती फिरत राहिली. थोडक्यात ज्या ज्या वेळेस कवितेला साचलेपणा आला त्या त्या वेळेस त्यात बदल करण्यास केशवसूत आले, मर्ढेकर आले पण त्या प्रत्येक बदलासाठी पुन्हा संत कवितेकडं जावं लागलं.

मराठीचा तास म्हटलं की मन आनंदून जायचं. आज शिकवला जाणारा धडा किंवा कविता कितीदा वाचून झालेला असायचा. तरी गुरुजी त्याबद्दल काय सांगतात हा वाट पहायला लावणारा भाग असायचाच. मग कवितेचा तास असेल तर मजाच. कवितेला चाल लावून तरी म्हणणे किंवा खड्या आवाजात. जशी कविता तसे हे वाचन. अगदी चौथीपूर्वी असलेली ‘खबरदार जर टाच मारुनी’ ही कविता असो नाय तर ‘वाटाणा, फुटाणा आणि शेंगदाणा, उडत चालले टणाटणा’ ही कविता असो! त्यात रंगून जाणं होतं. पुढच्या पाचवी ते सातवीमध्ये इंदिरा संतांची ‘गवत फुला रे गवत फुला’ ही कविता.

रंग रंगुल्या, सान सानुल्या
गवत फुला रे, गवत फुला
असा कसा रे मला लागला
सांग तुझा रे तुझा लळा.

ही कविता कितीदा तरी म्हटली असेन. खूपच छान वाटत राहायचं. भा. रा. तांबे, यशवंत, बा. भ. बोरकर, शांता शेळके, वसंत बापट, विंदा करंदीकर, मंगेश पाडगावकर, केशवसूत, बालकवी, कुसुमाग्रज हे कवी शालेय जीवनातून आठवतात. मुलांच्या मानसिकतेचा विचार करून छान छान विचाराच्या, भावनिक होणार्‍या कविता त्यावेळी होत्या पण यशवंत मनोहर, नारायण सुर्वे, वामन निंबाळकर हे कवी भेटले. त्यांची कविता वेगळी होती. त्यात ते छान छान शब्द, लाडिकपणा, गोड गोड भाषा नव्हती. त्यामुळं कवितेच्या आवडीचा असा विस्तार झाला. त्या मानानं या कवींची कविता आमच्याशी बोलल्यासारखी वाटू लागली. आपल्यातील काही माणसांचं वेगळं जगणं, वेगळं दु:ख अशी प्रस्तावना गुरुजी करायचे. ते तेवढं कळत नव्हतं पण कविता आवडायची. वामन निंबाळकरांची ओळख ‘माय’ कवितेनं झाली. त्यांच्या कवितेतून वेगळ्याच जगाची ओळख झाली. त्यांच्या कवितासंग्रहाचं नाव ‘गावकुसाबाहेरच्या कविता.’ मग शिक्षकांना त्याचा अर्थ विचारणं. गावकुसाबाहेर म्हणजे काय? मग तो सारा इतिहास. ते जगणं. हा संग्रह तेव्हा लक्षात राहिला. पुढं कॉलेजमध्ये आल्यावर मिळवून वाचला.

1.
ह्या मरणाकडे जाणार्‍या वाटा
तुम्हाला समृद्ध करतील
संपन्न करतील
म्हणून म्हणतो दोस्तानो!
आताच कोठे रक्तात पेटवलेल्या मशाली
तुम्ही का विझवता मला समजत नाही
तुम्ही हताश होवू नका, मी हताश झालो नाही.

2.
विसाव्या शतकाच्या शेवटच्या टोकावर
मी आज उभा आहे.
भोवती कसे सारेच पेटलेले
गर्जत असेलला उफाळणारा सागर
मी मात्र अविचल, निर्भय
हजारो वर्षाचा प्रवास करून
आज येथवर आलोय.

तरुण मनाला एक वेगळी उर्जा त्यातून मिळायची.

यशवंत मनोहर यांच्या कवितासंग्रहाचे नाव ‘उत्थानगुंफा.’

1.
कालचा पाऊस आमच्या गावात आलाच नाही
सदरहू पीक आम्ही आसवांवर काढले आहे
कालपर्यंत पावलांनी रस्त्यापाशी तक्रारी मांडल्या नाहीत
झाडे करपली, माथी हरपली
नदीच्या काठाने मरण शोधित फिरलो
आयुष्याच्या काठाने सरण नेसून भिरभिरलो
कालचा पाऊस आमच्या गावात आलाच नाही.

2.
ते ग्रीष्म माझे वैरी आहेत,
ज्यांनी इथे प्रामाणिकपणा रुजू दिला नाही
ते आहेत आपमतलबी बगलबच्चे
ज्यांनी सत्याचा जन्म उजेडात येऊ दिला नाही.

हे कवी पाठ्यपुस्तकात होते. त्यांची पुस्तकं मिळवून वाचली! पण शिक्षणातून नाही तर बाहेर भेटलेला एक कवी म्हणजे नामदेव ढसाळ. त्यांचे गोलपिठा, मूर्ख म्हातार्‍याने डोंगर हलवले, तूही इत्ता कुंची, गांडू बगिचा हे कवितासंग्रह आले होते. काय ती भाषा, काय ते विचार! वाचताना मजा यायची.

1.
त्यांची सनातन दया फॉकलंड रोडच्या भडव्याहून उंच नाही
खरंच त्यांनी आपल्यासाठी आभाळात मांडव घातला नाही
बोलून चालून ते सामंतशाहा, त्यांनी तिजोरीत लॉक केलेला प्रकाश
लादलेल्या पडीबाज आयुष्यात फुटपाथ देखील आपला नाही
माणूसपणाची किळस यावी इतके त्यांनी बनवले आहे लाचार
करपून गलेल्या आतड्यात साधी माती भरायला मिळत नाही
उगवणारा न्यायी दिवस लाच खाल्यागत त्यांचाच होतो पाठीराखा
आपली कत्तल घडताना त्यांचा सढळ हातातून निश्वासही ढळत नाही.

2.
सूर्याकडे पाठ फिरवून त्यांनी शतकाचा प्रवास केला
आता अंधार यात्रिक होण्याचे नाकारलेच पाहिजे
हा आपला बाप अंधार वाहून वाहून अखेर पोक्या झाला
आता त्याच्या पाठीवरला बोजा खाली ठेवलाच पाहिजे
या वैभवनगरीसाठी आपलाच खून सांडला
आणि दगडी खाण्याचा मक्ता मिळाला
आता आभाळमुका घेणार्‍या हवेल्यांना सुरुंग लावलाच पायजे
सूर्यफुले हाती ठेवणारा फकीर हजारो वर्षांनंतर लाभला
आता सूर्याफुलासारखे सूर्योन्मुख झालेच पाहिजे.

काहीतरी नवं वाचत आहोत, आपल्या पिढीचं वाचत आहोत, हे दु:ख आपल्या आजूबाजूचं आहे, त्यातला निर्धारी नायक आपला आहे, तो स्वाभिमानी, लढाऊ आणि क्रांतीकारी विचार आपला आहे असे वाटायचे. नारयण सुर्वे, केशव मेश्राम, दया पवार आणि वाहरू सोनावणे, भुजंग मेश्राम यांच्या आदिवासी कविता वाचताना वेगळे विषय समजत गेले. नारायण सुर्वे यांची कविता त्या तरुण वयात फारशी कळली नाही. त्या नागरी जीवनाचा त्यावेळी फारसा संबंध नव्हता. मुंबईच पाहिली नव्हती त्यामुळं ते जीवन दिसायचं नाही. नंतर ते जीवन, त्या कवितांचं वेगळेपण कळालं.

आनंदयात्री मंगेश पाडगावकरांची नशा होती. विशेषत: त्यांची भावगीतं अफाट असायची. या कवितेतील सौंदर्य, त्यातील शब्द मस्तच होते. ‘मातीच्या गंधाने भरला गगनाचा गाभारा’ किंवा ‘देव बोलतो बाळमुखातून, देव बोलतो उंच पिकातून’ या त्यांच्या गाण्यातील ओळी थरार आणायच्या. झोपाळ्यावाचून झुलायाच्या वयात हळूहळू काजळताना सांज सुरंगी व्हायची पण हे दाटून येणारे भास अंतरंगी असायचे. ‘या जन्मावर या जगण्यावर प्रेम करण्यासारखं’ खूप काही आहे. तू तुझ्या समजून घेण्याच्या भावना मला शब्दातून सांगण्याची परवानगी नव्हती. हे चांदणे पाण्यातुनी, गाण्यातुनी दिसायचे बस्स.

बा. भ. बोरकरांच्या कविता नादमयी होत्या. ‘गडद निळे गडद निळे जलद भरुनी आले’ ही त्यांची कविता शालेय अभ्यासाला होती. म्हणून त्यांचे दूधसागर, चित्रवाणी हे संग्रह मिळवून वाचले.

1.
झाले हवेचेच दही, माती लोण्याहून मऊ
पाणी होऊनिया दूध, लागे चहूकडे धाऊ
आज जगाचे गोकुळ, आज यमुना पांढरी
आणि कालियाच्या उरी घुमे कृष्णाची बासरी

2.
क्षितिजी आले भरते गं
घनात कुंकुम खिरते गं
झाले अंबर
झुलते झुंबर
हवेत अत्तर तरते गं.

3.
जीवन त्यांना कळले हो
मी पण त्यांचे पक्व फळापरी
सहजपणाने गळले हो.

ग. दि. माडगूळकर, ना. धो. महानोर, वा. रा. कांत, शांता शेळके, ग्रेस, आरती प्रभू यांची गाणी व कविता यांनी एक वेगळीच मजा दिली. निसर्ग कविता, विचार कविता आणि प्रेम कविता असं खरं तर भावजीवन समृद्ध करण्यार्‍या ह्या कविता होत्या. कुसुमाग्रजांच्या कविता नव्या स्वरुपात माझ्या पिढीसमोर आल्या. देव्हारा नावाची त्यांची कविता आठवते. ‘देव नसला तरी देव्हारा पायजे, देव्हारा सलामत तो देव पचास’ अशी त्यांची कविता वेगळंच बळ द्यायची. कवी अनिलांनी ‘सारेच दीप मंदावले आता’ या कवितेनं भविष्याची चाहूल दिली होती.

ऐंशीनंतरच्या दशकात माझं कॉलेज शिक्षण सुरु होतं. त्याचवेळेस मराठवाड्यात नामांतराचं वातावरण पेटलं. त्या अगोदरपासून गाण्याचे जलसे व्हायचे. डॉ. आंबेडकरांनी हे जलसे सुरु केले होते. परिवर्तनाची, नव्या विचारांची गाणी शाहीर सादर करत. आंबेडकर जयंतीनिमित्त हे जलसे रंगू लागले. त्यातील वामनदादा कर्डक हे शाहीर मला खूप आवडायचे. त्यांचे कार्यक्रम जिथं असतील तिथं मी जायचो. रात्रभर हे जलसे ऐकणे ही एक मजा होती. विशेष म्हणजे वामनदादांचं कवित्व मला आवडायचं…
1.
मासळी बोले, आपल्या पिलाला
खेळ बाबा तू खाली तळाला
जाळे टाकून बसलेत कोळी
लागशील तू त्यांच्या गळाला

2.
पहाट झाली प्रभा म्हणाली
भीमजयंती आली
चांदाची चांदणी, येवून खाली
वारा भिमाला घाली.

3.
आला, पहाटवारा, गेला पहाटवारा
वारा निघून गेला, थारा न दे आम्हाला
उगविल कोण आता, डोळ्यांमधील धारा.


4.
वंदन माणसाला, एकाएकी अन् मायेचं चंदन माणसाला
मानवतेची करून होळी, भाजुनी नको रं पोळी
पिकेल तुझी पोळी, पण जळेल जनता भोळी
ममता गौतमाची, समता गौतमाची
हवी जगाला, नको रणकंदन माणसाला
कुणी बनवले धनी कुणाला, कुणी बनवले दास
कष्टकर्‍यांच्या गळी बांधला, कुणी गुलामी फास
वामन ऐक आता, सांगे भीम गाथा
जुन्या पिढीचे, नको रूढीचे बंधन माणसाला.

5.
रक्त पिणारे सारे सारे, वाडे लोळवणारा
मी वादळवारा, मी वादळवारा.


6.
उद्धरली कोटी कुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे
झाले गुलाम मोकळे, भीमा तुझ्या जन्मामुळे

7.
मी जगातली देखणी, मी भिमाची लेखणी

8.
भीमा तुझ्या मताचे जर पाच लोक असते
तलवारींचे त्यांच्या न्यारेच टोक असते
वाणीत भीम आहे, करणीत भीम असता
वर्तन तुझ्या पिलांचे, सारेच चोख असते.

जोरदार आवाज, मस्त चाली यामुळे या जलश्यात जीव रंगून जायचा. नामांतराच्या लढाईत वामनदादांची गीतं परिवर्तनवादी तरुणाई मन लावून ऐकायची. त्यानंतरही शाहिरी जलसे सुरु आहेत. आमचा कवीमित्र संभाजी भगत शाहिरी जलसा करतो. नव्या काळाची, नवी प्रबोधनाची गाणी त्याच्याकडं आहेत. शाहीर विठ्ठल उमप कार्यक्रम करायचे. आता मिलिंद शिंदे, साहेबराव येरेकर, अनिरुद्ध वनकर, राहुल अन्वीकर हे शाहीर आहेत पण वामनदादांचा ठसा मनातून जात नाही. मी त्यांना पाहिले तेव्हा ते साठी पार केलेले होते पण जोश होता. नव्वदीनंतर मात्र हा जोश वयामुळं कमी झाला.

कॉलेज शिक्षणासाठी मराठवाड्यात होतो. तेथे अभ्यासक्रमासाठी ‘मातीचा मोहोर’ नावाचा कवितासंग्रह होता. बी. रघुनाथ, फ. मु. शिंदे, लक्ष्मीकांत तांबोळी या मराठवाड्याच्या कवींचा शालेय अभ्यासक्रमापासून परिचय होता. बी. रघुनाथ यांची ‘चंदनाच्या विठोबाची माय गावा गेली’ ही कविता शालेय पुस्तकात होती. फ. मु. शिंदे यांची ‘विसर सीमेवरून आठवत आठवत येत आहे, मास्तर तुम्ही जोडलेलं वर्तुळ कुठं आहे’ ही कविता होती तर लक्ष्मीकांत तांबोळी यांची ‘सैनिकी रक्त’ नावाची कथा होती. ना. धों. महानोर यांची ‘आई’ ही कविता होती. नंतर बा. ह. कल्याणकर, प्राचार्य गजमल माळी, अनुराधा पाटील, प्रकाश कामतीकर, विश्वास वसेकर, महावीर जोंधळे, भ. मा. परसवाळे, त्र्यंबक सपकाळे, फ. म. शहाजिंदे यांच्या कविता पदवी अभ्यासक्रमात होत्या. त्यातील काही जणांचे कवितासंग्रह मिळवून वाचले.

बी. रघुनाथ यांच्या कवितेनं वेड लावलं होतं. ‘आज कुणाला गावे’ ही त्यांची कविता पदवी अभ्यासाला होती.

1.
पुन्हा नभाच्या लाल कडा…
ये भवितव्या, रूप इथुनी ने
तुझे हंसित हे माझे गाणे
अमर माझिया मी मरणाने
नको आता गं बसूस जुळवित,
स्वप्नातील तुकडा तुकडा.

2.
उजेड झाला, उजेड झाला
पिउनि लाल उत्तेजक काही, दिवस नागडा फिरू लागला
दो खिडक्यांच्या दोनच खोल्या, दमट कुंद भुइ भिंती ओल्या
धुराड धुपते या दिवसाचा, करावयाला सुरु सोहळा

वा. रा. कांत यांची ‘अक्षरे तुम्हाविण कोण करील व्रजाची?’ ही कविता अभ्यासक्रमात होती.

काय बोलू श्वास भारे, चांदणे उधळेल का
उमलण्याचे सुख फिरुनी, त्या फुला सोसेल का
नित नवी मरणे मराया, जन्म तू मागू नको

पाकळ्यांचे शब्द होती, तू हळू निश्वासता
वाजती गात्री सतारी, नेत्र पारखी झाकता
त्या फुलांचे, त्या स्वरांचे गीत तू मागू नको
रोखूनी पलकात पाणी, घाव सारे साहिले
अन् सुखाच्या आसवांचे, मीठ डोळा साचले
या घडीला मोतियाचा घास तू मागू नको.

ही कविता अगदी अलीकडच्या कवींना देखील हलवून टाकते. त्यातील सौंदर्याच्या दर्शनानं दिपून जायला होतं. वा. रा. कांत हे मराठवाड्यातील नांदेड येथील होते. फारसे शिक्षण नाही पण कविता किती तरी मस्त. बी. रघुनाथ आणि वा. रा. कांत यांनी मराठी रसिकांना खरंच मोठा आंनद दिला.

भालचंद्र नेमाडे, ना. धों. महानोर आणि चंद्रकांत पाटील यांनी ‘वाचा प्रकाशन’ असं काहीतरी लघुनियतकालिक सुरु केल्याचं आठवतं. नेमाडे हे कादंबरीकार म्हणून माहीत होते. त्यांची कविता वाचण्यात आली. महानोरांची लयबद्ध कविता होतीच. चंद्रकांत पाटील हे समीक्षक आणि अनुवादक म्हणून माहीत होते. त्यांची एक कविता अशीच अंगावर आली होती.

1.
खजूराहोच्या विश्वनाथ मंदिरावरचं
एक मिथून अवघडलंय
जी बाई पुरुषाला विळखा घालून
उभी होती मध्ययुगापासून
तिनं एकाएकी झटकला पुरुष
आणि ताठ उभी राहिली ती
सैनिक संचलनाच्या पवित्र्यात.

इतकी वर्ष तृप्त हासणारा पुरुष
गोंधळून गेलाय
चेहरा पडून उभाय मिथुन पुरुष
बाई एकदम एकविसाव्या शतकासारखी
मुजोर झालीय.

त्या वयात ही कविता वेगळाच विचार देणारी होती. त्यांची ‘निवांत’ ही अशी कविता आहे. बरीच मोठी आहे पण त्यातही असेच धक्के आहेत. लघुनियतकालिकाच्या चळवळीत अशा खूप कविता होत्या.

इकडं लघुनियतकालिक चळवळीत अशोक शहाणे, मनोहर ओक, सतीश काळसेकर, तुलसी परब, वसंत आबाजी डहाके, अरुण कोलटकर, विलास सारंग यांचे कवितासंग्रह वाचनात आले. ती कविता वर्तमानाची होती. सार्‍याच नाही पण बर्‍याच कवितेत आजूबाजूचे संदर्भ असायचे. नागरी जीवनाचे खूप संदर्भ असायचे. त्या वयात ते जीवन आमच्यापासून दूर होतं. दिलीप चित्रे त्यांच्या कवितेनं मात्र आवड लावली.

1.
उलथून चक्रमय रात्रीची स्तब्धता
उघड स्वर्गीय तेजस्वी थडगी
एकदा मांस दिलेल्या थंड स्तनी पोरी
मुकगुप्त पाण्यागत एकदा संपूर्णलेल्या स्त्री.

‘शक्तीची प्रार्थना’ अशी ही खूप मोठी कविता आहे. माझ्या तरुणपणी त्या कवितेतील सारी वर्णनं वेगळ्याच अर्थानं जाणवत. अश्लिल शब्दांच्या पसार्‍यात एक विचार सतत खुणावे. मग ही लैंगिकता वेगवेगळ्या पद्धतीनं येत राहिली.

1.
तू नुकत्याच निवळलेल्या प्रकाशाच्या मांड्या
काळोखाच्या विस्कटलेल्या अंथरुणातल्या
तुझ्या स्तनाग्रावरील राखेखाली
अनारंभ विस्तवाच्या लाटा फुटलेल्या..

2.
प्रकटलं घामाघूम इंद्रियांचं सुख
थंडावणारं
अंगांग
थंडावणारं
तळहातांची विसराळू झाली मलई
जमली डोळाभर निद्राळू सुखसाई
सांडला ग्रहांचा गर आणि गाळ
नसानसात
अंगांग
मंदावलं, मातलं, फैलावलं, दाटलं, थंडावलं.

वाटतंय ना वेगळं! त्यांची अजून एक कविता आहे.

3.
यापुढचं महाराष्ट्रगीत कदाचित मीही लिहीन, कोणी सांगावं?
जेव्हा वेडापिशी होते, इथली मराठी भाषा तेव्हा
कोट्याधी ओव्या आणि अभंगांचे प्रतिध्वनी उठतात
खोलवरून आणि इरसाल अध्यात्म भडकवतं
इथल्या माणसाचं माथं
तेव्हा पुकारली जातात, स्वतंत्र प्रज्ञेची काव्यशास्त्र
माणसाचा जन्म साजरा करायला.

अनियतकालिकातूनही अशाच कविता येत होत्या. त्या वयात त्या कळत नव्हत्या. त्यातील काही कळल्या व लक्षात राहिल्या.

शालेय अभ्यासक्रमातून कवयित्रीच्या कविता होत्या. इंदिरा संत, पद्मा गोळे, संजीवनी मराठे, बहिणाबाई, शांता शेळके, सरिता पदकी यांची नावं आठवतात पण या सर्व सोठोत्तरी नाहीत. साठीपूर्व आहेत. यातील इंदिरा संत, शांता शेळके यांना ऐंशीच्या दशकात मी प्रत्यक्ष भेटलो. ‘किलबिल किलबिल पक्षी बोलती’ यासारखी बालगीतं, ‘राजा सारंगा, दर्या सारंगा, चल जावू या…’, ‘मी डोलकर, डोलकर दर्याचा राजा’ ही कोळीगीतं, ‘काटा रुते कुणाला’ यासारखी नाट्यगीतं, ‘रेशमाच्या रेघांनी, लाल काळ्या धाग्यांनी, कर्नाटकी कशिदा मी काढीला, हात नगा लावू माझ्या साडीला’ अशा लावण्या, ‘गणराज रंगी नाचतो, मागे उभा मंगेश’ सारखी भक्तिगीतं असा विपुल काव्यफुलोरा शांताबाईंनी उभा केलाय.

1992 साली कोल्हापूर येथे अ. भा. मराठी साहित्य संमेलन होतं. त्याच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत रमेश मंत्री आणि इंदिरा संत असा सामना झाला. रमेश मंत्री निवडून आले. इंदिराबाई पडल्या. त्याचं खूप दु:ख झालं. त्यामुळं बेळगावला जाऊन त्यांना भेटलो. त्या बाकी खूप बोलल्या पण निवडणुकीबद्दल काहीच नाही. त्यांचे पती ना. मा. संत कवी होते. घरच्यांचा विरोध घेऊन त्यांनी लग्न केलं. त्या दोघांचा मिळून ‘सहवास’ हा काव्यसंग्रह काढला होता. 1940 साली. 1936 साली लग्न झालं आणि 1946 साली पती वारले. तीन मुलं होती. पतीवियोगाचं दु:ख घेऊन त्या उभ्या राहिल्या. शिक्षिका, प्राध्यापिका व प्राचार्या अशा नोकर्‍या केल्या. 14-15 कवितासंग्रह लिहिले. इंदिरा संत आणि संजीवनी मराठे या दोघी 2000 सालात देवाघरी गेल्या. इंदिरा संत यांच्या कविता खूपच ताकदीच्या वाटायच्या.

1.
रक्तामध्ये ओढ मातीची
मनास मातीचे ताजेपण
मातीतुन मी आले वरती
मातीचे मम अधुरे जीवन

2.
दु:ख तुझे, दु:ख तुझे
वेदनेस काय कमी
प्रीतीचे, भीतीचे
शस्त्र त्या लावित मी
दु:ख तुझे, दु:ख तुझे
वेदनेस काय कमी
सुटकेचा भास पुरा..
जाईल ते, जाईन मी.

3.
एक दगड कष्टाचा,
एक दगड काळाचा,
एक दगड त्यागाचा,
वात्सल्याचा थर घाटासाठी वापरायचा.
अशी सुरेख चूल घरोघरी असलेली.
घर सांभाळणारी… घर जोपासणारी.
तिचेच नाव गृहस्वामिनी, गृहलक्ष्मी.
घरधनीण. अशी गृहाघराने वेढलेली. जखडलेली.

आणि मग कुकर, मग पोळ्या, मग फोडण्या.
थोरापोरांच्या मनधरण्या. नोकर्‍याच्या काचण्या.
कितीतरी धागे. घट्ट जखडून ठेवणारे.
सगळाच शिणवटा. शिजवणारीही तीच.
आणि शिजणारीही तीच.

सरिता पदकी या बालगीतामुळं लक्षात राहिल्या.

1.
आभाळ वाजे धडाड धूम, वारा सुटला सूं सूं सूं
वीज चमकली चकचकचक, जिकडे तिकडे लखलखलख

2.
घाटातील वाट, काय तिचा थाट
मुरकते, गिरकते, लवते पाठोपाठ
निळी निळी परडी, कोणी केली पालथी
पण फुलं सांडली, दूर आणि खालती

सरिता पदकी यांनी मराठी कविता रसातळाला जात आहे याबद्दल जोरदार लेख लिहिला होता. 1965 साली झालेल्या साहित्य संमेलनात अध्यक्ष ज्येष्ठ समीक्षक वा. ल. कुलकर्णी यांनी हा मुद्दा उचलून धरला होता हे या निमित्त आठवलं.

बहिणाबाईंच्या कविता ही नवी सुभाषितं होती. त्याचप्रमाणे वृंदा लिमये, रजनी परूळेकर, सुहासिनी इर्लेकर, अनुराधा पोतदार, अनुराधा पाटील, प्रभा गणोरकर, अरुणा ढेरे यांच्या कविता वेगळेपणानं भेटत आल्या. आता कवयित्रींची संख्या वाढते आहे. मोठ्या संख्येनं आणि खूप धीटपणानं त्या लिहित आहेत. दलित साहित्याप्रमाणे हे साहित्य आपल्या वेगळ्या रचनेमुळं लक्षात राहतं. शोषणाचा इतिहास मांडत नव्या जीवनाचं स्वप्न ते पाहतात. समाजाच्या वेगवेगळ्या प्रश्नावर ते जसं भाष्य करतात तसं या नव्या जीवनाला विरोध करणार्‍या कुटुंबीयांवरही घाव घालताना दिसतात.

शालेय अभ्यासक्रमात ग्रामीण कवितांची एक वेगळी ओळख होती. ग. ह. पाटील यांच्या कविता होत्या. त्यातील
1. देवा तुझे हे किती सुंदर आकाश
2. फुलपाखरू, छान किती दिसते
3. माझ्या मामाची बैलगाडी, गाडीला खिल्लारी जोडी

या खूप आठवतात. मामाचा गावं खेड्यात आणि भाचा शहरात असं हे चित्र होतं. ‘मामाच्या गावाला जावू या’ हे एक गाणं आहे. तसंच त्यानंतर ग. ल. ठोकळ यांची ‘दिवस सुगीचे सुरु जाहले, ओला चारा बैल माजले’ अशी कविता होती. गावाकडच्या गढीचं वर्णन करणारी त्यांची एक कविता होती.

बहिणाबाईंच्या कविता वेगळ्या बोलीतून म्हणताना मजा येई. शेताचं, पिकाचं वर्णन होतं, तसंच त्यांच्या कवितेत गरिबी व दु:खाचं वेगळं रूप दिसे. सुभाषितवजा त्यांची कविता साध्या शब्दांमुळं लवकर पाठ होई.

आनंद यादव हे एक ग्रामीण लेखक. त्यांचा ‘हिरवे जग’ नावाचा संग्रह होता. शेताचं, पिकाचं, गावाचं वर्णन त्यात होतं. तसंच काम करणार्‍या मजुरांच्या प्रेम कहाण्या त्यांच्या कवितेत होत्या. त्या वाचताना त्या वयात एक वेगळाच आनंद होता. विदर्भाचे शंकर बडे यांची ‘हिरव्या पिकात डोलाया, उरी आभाळ झेलाया, सांग सजणा मग बल्लावू कोणाले’ ही कविता आठवते. विठ्ठल वाघ यांची ‘काया मातीत मातीत, तिफण चालते’ हे गाणं खूप आवडायचं. त्याची चालच मस्त होती. त्याच काळात शरद जोशी यांची चळवळ आली. त्या चळवळीचा प्रभाव घेऊन ग्रामीण कविता आली. इंद्रजीत भालेराव, प्रकाश होळकर या माझ्या आगे-मागे असणार्‍या कविंच्या कविता तशा आल्या. चित्रपट गाण्याच्या चालीवर या कविता गाऊन सादर होत. खेड्यांचे प्रश्न त्यात येऊ लागले होते.

सुरेश भट या कवीच्या कवितांनी आमचा काळ भारलेला होता. त्यांनी लिहिलेल्या गझला तोंडपाठ असणारी ती पिढी होती. 1983 साली अंबाजोगाईला अ. भा. मराठी साहित्य संमेलन झालं होतं. त्या संमेलनात सुरेश भट यांचं एक स्वतंत्र सत्र होतं. दोन-तीन तास त्यांच्या कविता त्यांच्या तोंडून ऐकताना एक वेगळाच अनुभव आला. ते गात होते, वाचत होते. तसे शब्द, तसा विचार आधी ऐकला नव्हता. त्यामुळं नवंच काहीतरी हाती आल्यासारखं वाटलं. अजूनही ते आकर्षण संपलेलं नाही.

सुरेश भट शालेय पुस्तकात भेटले होते. ‘गे मायभू तुझे मी, फेडीन पांग सारे, आणीन आरतीला, हे चंद्र सूर्य तारे’ ही कविता होती. नामांतराच्या लढाईत त्यांची

अद्यापही सुर्‍याला, माझा सराव नाही
अद्यापही पुरेसा, हा खोल घाव नाही

ही गझल म्हटली जायची. विशेषत: ‘गर्दीत गारद्यांच्या, सामील रामशास्त्री, मेल्याविना मढ्याला, आता उपाव नाही’ या ओळींची चर्चा असायची. ‘उष:काल होता होता, काळरात्र झाली, अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली’ हे गाणं चर्चेत होतं. त्यांची गाणी लागायची.

1. मालवून टाक दीप
2. केव्हा तरी पहाटे
3. मलमली तारुण्य माझे
4. आज गोकुळात रंग खेळतो हरी

या त्यांच्या गाण्यात वेगळा गोडवा होता. त्यांच्या सामाजिक व राजकीय भाष्य करणार्‍या कविता होत्या. त्या आवडायच्या पण फार कळायच्या नाहीत! पण आत्मपर अशा कविता होत्या. त्या खूप छान वाटायच्या. त्यांचे ‘रूपगंधा’, ‘रंग माझा वेगळा’, ‘एल्गार’, ‘झंझावात’ हे गझलसंग्रह वाचनीय आहेत. ते स्वत: पत्रकार होते. त्यामुळं सगळीकडचे अनुभव त्यांच्या गझलांमध्ये मिळायचे.
1.
काय जे सोसायचे ते सोसले मी
सांत्वनांचे सोसतो आघात आता
मी असा अन् हा तुझा रस्ताच नाही
सोड माझा पोळलेला हात आता

2.
आपापल्या सुखाशी केला करार त्यांनी
मी बोलताच माझी केली शिकार त्यांनी

3.
जगत मी आलो असा की, मी जसा जगलोच नाही
एकदा तुटलो असा की, मी पुन्हा जुळलोच नाही
सारखे माझ्या स्मितांचे, हुंदके सांभाळले मी
एकदा हसलो जरासा, मग पुन्हा हसलोच नाही

4.
सांगा कुणीतरी या आकाशखाजव्यांना
मातीच मोक्ष देई, कंगाल नागव्यांना
आहे जरी उभा मी निष्पर्ण माळरानी
या स्वप्न पाखरांच्या, रोखू कसा थव्यांना
प्रत्येक आतड्याचा मी पीळ होत आहे
ते मात्र गाठ देती त्यांच्याच जानव्यांना!

5.
फुलावया लागलीस तेव्हा मला कुठे देहभान होते
वसंत आला निघून गेला मला कुठे वर्तमान होते

6.
ऐकताना गोष्ट माझी नीज एकांतास आली
ऐकण्यासाठी तरीही वेदना जागीच होती
जीवनाची सर्व पाने काय सोनेरीच होती
सारखी तेजाळणारी ओळ एखादीच होती.

7.
माणसाच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी
माझियासाठी न माझा पेटण्याचा सोहळा
रंगुनी रंगात सार्‍या, रंग माझा वेगळा
गुंतूनी गुंत्यात सार्‍या, पाय माझा मोकळा

सुरेश भट स्वत: गझल गायनाचे कार्यक्रम करायचे. वर्षातून दोन-चार कार्यक्रम ऐकायला मिळत. त्यामुळं त्यांच्या खूप गझला ऐकून झाल्या. विदर्भातील सुधाकर कदम हे गझलगायक कार्यक्रम करायचे. सुरेश भट त्याचं निवेदन कारायचे. सुरेश भटांच्या गझलांचे हे दोन-तीन कार्यक्रम ऐकल्याचं आठवतं.

सुरेश नाडकर्णी, राम पंडित, संगीता जोशी यांचे वृत्तपत्रात, मासिकात गझल परिचय सदर असे. त्यातूनही विविध भाषातील गझल कळायच्या. संगीता जोशी गझल लिहायच्या. मराठी आणि उर्दूतून त्यांनी गझला लिहिल्या. भीमराव पांचाळे यांनी गझलगायन सुरु केल्यावर संगीता जोशी यांच्या गझला ऐकल्या. त्या खूप छान होत्या. संगीता जोशी यांच्या पुढील गझला आठवतात.

1.
आयुष्य तेच आहे
अन् हाच पेच आहे
तू भेटशी नव्याने
बाकी जुनेच आहे

बोलू घरी कुणाशी
तेही सुनेच आहे
तू प्रेम दे जगाला
मग ते तुझेच आहे

2.
काय मी करू ह्या चांदण्याचे
दिवस माझे नेहमी अंधारण्याचे
होवू द्या आघात आता काय चिंता
राहिले नाहीच काही भंगण्याचे

3.
अंधेरो ने एक सितारा मांगा था
रात तुमसे सिर्फ उजाला मांगा था
डुबो दिया दर्या ने उसे बेरहमी से
कश्ती ने तो एक किनारा मांगा था

इलाही जमादार हे गझल गायनातून पोचलेले शायर. खूप वेगळी गझल लिहितात.

ऐकलेली, वाचलेली माणसे गेली कुठे
पुस्तकात भेटलेली माणसे गेली कुठे
रोज अत्याचार होतो आरशावरी आता
आरशाला भावलेली माणसे गेली कुठे

या त्यांच्या गझलेनं वेड लावलं होतं.
त्यांनी एक ओळ हिंदी आणि एक ओळ मराठी गझल लिहिण्याचा प्रयोग केला होता.

ये सनम आंखो को मेरी खुबसुरत साज दे
येवूनी स्वप्नात माझ्या एकदा आवाज दे
ऐ खुदा मै चाहता हॅूं, हर कोई चाहे मुझे
गंध दे मजला फुलांचा, हासणे निर्व्याज दे

इलाही जमादार यांना भेटलो. त्यांच्यासोबत पुणे फेस्टिवलसह एक-दोन कार्यक्रम केले. निष्ठेनं कविता, गझल लिहिणारा कवी म्हणून त्यांच्याबद्दल आदर आहे. अलीकडे ते दोहे लिहित आहेत. चार-पाच वर्षांपूर्वी मी भेटलो तेव्हा 15 हजार दोहे लिहून तयार होते.

गरजांचा भोवती गराडा
गरजा दावेदार
एकेकीची भूक अघोरी
कसे तू भागवणार
इलाही, कसे भागवणार

असे ते दोहे आहेत.

‘जखमा कशा सुंगधी’ या कॅसेटने प्रसिद्धीस आलेले भीमराव पांचाळे ऐकण्याचे वय होते. त्यांचा वेगळा आवाज, चांगल्या गझला यामुळं त्यांचा कार्यक्रम एक आकर्षण होतं.

1.
झाल्यात काळजाला, जखमा कशा सुगंधी
केलेत वार ज्यांनी, तो मोगरा असावा
अंदाज आरशाचा वाटे खरा असावा
बहुतेक माणसाचा तो चेहरा असावा
(इलाही जमादार)

2.
हासण्याचा खुळा प्रयास नको
आसवांना उगाच त्रास नको
मृत्यू जामीन होवूनी यावा
जीवनाचा तुरुंगवास नको
(राजा जाधव)

3.
आम्ही असे दिवाणे, आम्हास नाव नाही
आम्ही घरोघरी या, आम्हास गाव नाही
(शंकर बडे)

अशा त्यांनी गायलेल्या गझला आठवतात. गझलेसाठी त्यांनी मोठं काम केलं. गझल कार्यशाळा घेतल्या, गझलसंग्रह काढले, गझलसंमेलनं सुरु केली. त्यातून खूप गझल ऐकायला, वाचायला मिळाल्या. सुरेश वैराळकर यांच्या पुढाकारानं गझलांचे कार्यक्रम अलीकडं होत आहेत. हे सुरेश भटांसोबत कार्यक्रमाचं निवेदन करायचे. अनुभवी आहेत, अभ्यासू आहेत. त्यांच्या निवेदनातून किंवा सुरेख संचलानातून म्हणा चांगले गझलकार हे ऐकायला मिळताहेत.

कवितांची अशी ही सफर आहे. मी स्वत:ला खूप भाग्यवान समजतो की या काळात खरंच खूप चांगली मराठी कविता लिहिली गेली. मराठी साहित्यात खूप काळपर्यंत राहील अशी ही कविता आहे. कवी येतात-जातात पण कविता जिवंतच असते. ती वाचायला सुरूवात केली की जिवंत भेटते.

‘ही कोंबाची लवलव, सांगे मातीचे मार्दव’ या ओळीत ज्ञानदेव भेटतात.

‘आपुले हित आपण पाही । संकोच तो न घरी काही ॥
अवगुणांचे हाती । आहे अवघी फजिती ॥’
असे वाचतो अन् तुकोबा दिसतात. विषय, विचार, भावना आणि दृष्टिकोन घेऊन कविता शब्दात सामावली असते. वाचताना या सगळ्यासह ती उभी राहते. काही कवितांमधून काळाचे संदर्भ असतात. तो काळ मग भेटतो.

माणसाच्या सभ्यतेचा, काळ सांगा कोणता
कोणत्या काळात सांगा, सभ्य होती माणसे
राक्षसांची राक्षसांशी, सर्व युद्धे संपली
दंगली करतात आता माणसांशी माणसे

या ओळी येतात आणि सारेच फेरविचार सुरु होतात.

शृंखला पायी असू दे, मी गतीचे गीत गाई
दु:ख उजळायास आता, आसवांना वेळ नाही

या ओळीतून बाबा आमटे भेटतात.

कविता अमर आहे. त्यामुळं कुणीही, केव्हाही ही सफर करू शकतात. तो आनंद घेऊ शकतो.

******

कवितेचा प्रांत तसा मोठा असतो. गेल्या शतकात हजारो कवी आणि लाखो कविता आहेत. या शतकात शेकडो कवी आणि हजारो कविता आहेत. कोणतीच कविता वाईट असत नाही. कवितेचं असणं कधीच चूक नाही, वाईट नाही. कवितेचं दिसणं किंवा वागणं चूक किंवा वाईट असू शकतं. कविता आपल्यापर्यंत पोचण्याची साधणं ही काही निरपेक्ष असत नाही. आपल्या मर्यादा पण असतात. कविता उपलब्ध होण्याच्या आणि आकलनाच्याही. त्यामुळं हा लेख म्हणजे इतिहास नाही. वर्तमानकाळ त्यात कमी आला आहे. कारण वर्तमानाची कविता ही अनुकरणातील असते. कवींचं नाव घेतल्यानं त्याला आनंद होईल पण असं कुणाला खूश करण्याचं कंत्राट आपण थोडंच घेतलंय? कवितेची समीक्षा पण नाही. कवितेचा अर्थ दुसर्‍यांनी सांगायचा नाही. ज्याचा त्यानं शोधायचा. फसलेल्या कवितांकडं आपण पहायचं नाही. त्यामुळं समीक्षा कशाला?

हा प्रवास आनंदयात्री होता. त्या त्या वयाच्या समजुतीचं भान लेखन करताना पाळलं आहे. आताच्या वयाचा आणि अनुभवाचा शहाणपणा त्यात येऊ दिला नाही. आता कोणत्याही गोष्टीला चांगलं म्हणायचा काळ नाही. एखादा किती वाईट आहे याबद्दल लिहिताना आपली प्रतिभा फुलून येते पण एखाद्या चांगुलपणानं आपण वेडे होत नाही. यामुळं ज्येष्ठ माणसं ऊर्जा देणारी राहिली नाहीत. ती एक तर ‘स्वनामधन्य’ असतात किंवा ‘जग किती मूर्ख आहे’ ते सांगण्यात उत्साही होतात. तो आगाऊपणा मी लेखात येऊ दिला नाही. तरुणाला आवडणार्‍या कवितांच्या बरोबरीनं चालण्याचा प्रयत्न केला.

    प्रत्येक गोष्ट स्वार्थासाठी करायची. स्वार्थ असेल, काही लाभ असेल तर एखादं काम करायचं अशी ज्या पिढीची वैचारिक जडणघडण होत होती त्या पिढीचा मी सोबती होतो. मी लहान असताना आणि माझ्या तरुणपणी निरपेक्षपणे काम करणारे खूप लोक होते. काही नाही तर प्रेम करणारे लोक होते. जातीच्या अस्मिता टोकदार झाल्या. दुसर्‍या जातीबद्दल द्वेष सुरु झाला. कॉलेजात सरळ-सरळ दलित आणि मराठा जातीची टोळकी फिरायची. कॉलेज सुरु होतानाच्या दिवसात नेमक्या हाणामार्‍या असायच्या. आपली जात सोडून काय ओळखच नव्हती. ती तेवढ्याच विखारानं पसरत गेली. भौतिक गोष्टीचं पाशवीपण साहित्यातही आलं. साहित्यात म्हणजे साहित्यिकात आलं. साहित्यात म्हणजे खूप मानवतेचं लिहिणारे लेखक प्रत्यक्षात जातीयवादी आणि स्वार्थी असल्याचं दिसलं. हा वर्तमानकाळ माझ्या पिढीचा होता. तो सुद्धा माझ्या या लेखात येऊ दिला नाही. चांगलं वाचायला आणि लिहायला वेळ पुरत नाही. वाईट लिहा किंवा वाचा केव्हा अशीच भूमिका यावेळेपासून आजवर आहे.

    वेगवेगळ्या दुष्काळांनी ग्रामीण महाराष्ट्राला स्वार्थी बनवलं. बेरोजगारीनं तरुणांना स्वार्थी बनवलं. सेवाभावी संस्था देखील स्वार्थी झाल्या. महत्त्वाकांक्षा माणसाला स्वार्थी करते का? जगण्याचे प्रश्न सुटल्यावर जातीय अस्मितांची चैन/नशा करावी वाटते का? हे त्या काळात स्वत:चं जीवन घडवताना पडलेले प्रश्न होते. ते साहित्यात आले नाहीत. त्यामुळं त्याची उत्तरं मिळाली नाहीत.

    अशा वातावरणात राहुनही तरल आणि संवेदनशील लिहिणार्‍या माणसांचं आकर्षण होतं. प्रश्नांची उत्तरं मिळाली नसतील पण वर्मानाचे हे चटके सोसत असतानाही सुगंध निर्माण करण्याचा प्रयत्न करणारी व्यक्तिमत्त्व आदर्शवत वाटली.

    कवी यशवंत मनोहर यांनी केशवसुतांवर लिहिलेली कविता..

    धगधगत्या वणव्यासारखा
    तू भांडलास इथल्या काळोखाशी
    हाती येईल ते हाणून
    त्याच्या मग्रुरीचा मेरू तू कासाविस केला
    तू उजेडाच्या धरणाच्या भिंती फोडल्यास
    अरे ईश्वराचे थोबाड खेटराने रंगविणारा तू
    माणसासाठी तुझा शब्द माय झाला
    आणि मनामनातील मनूसाठी
    तू संतप्त पोलादाचा पाय झाला
    तू तडकवलेस तक्त परंपरांचे
    आणि प्रथापुत्रांच्या लाथेखालील प्रजेसाठी
    एकाकी जळत प्रतिभा जाळत राहिलास
    त्या तुझ्या विद्रोहाच्या तळ्यावर
    आमच्या नतमस्तकांची नम्रता नोंदवून
    तुझ्या स्वप्नांचे शिल्प आम्ही कोरू लागलो आहोत.
    केशवसुता, आम्ही ज्वालामुखी झालो आहोत
    इथल्या काळोखाशी
    आम्ही तुझ्या दाहकतेने भांडू लागलो आहोत.
    – यशवंत मनोहर

    कवी नारायण सुर्वे यांनी बा. सी. मर्ढेकर यांच्यावर लिहिलेली कविता…

    त्या मैफलीत आपण गेला होता का मर्ढेकर?
    सर्वत्र शोधले मी तुम्हाला,
    दिसला नाहीत;
    तसा गर्दीत मिसळण्याचा तुमचा स्वभाव नाही म्हणा;
    कविता होती आपली;
    ‘पितात, सारे गोड हिवाळा’ म्हणत…
    भेटीगाठी घेताना दिसली.

    म्हटले, ह्या निमित्ताने तरी भेटाल…
    सर्व सोहळा संपल्यावर आपण
    गिरगावच्या म्हणा किंवा गिरिणोदयाच्या
    फुटपाथवर बसून गप्पा मारल्या असत्या;
    पृथ्वीवरच्या परमेश्वरांनी काय काय
    निर्माण करून ठेवलंय
    त्याच्या हकिकती निघाल्या असत्या.

    कवितांच्या आडव्या अशाश्वत खांबावर
    हुश्श करीत; कोपरा टेकवून,
    तळहातावर डोके घेऊन,
    ‘अरे, ह्यांचेसाठी काहीतरी करा रे’ म्हणताना
    थकले भागलेले
    व्याकुळलेले
    गदगदून हालणारे तुमचे झाड
    पाहतो आहे मी मर्ढेकर!

    मुल्यांचे पडके बुरूज ढासळत असताही
    माणसांचे इतके लोभी हो कसे झालात?
    असा कोणता तंतू तुम्हाला दिसला?
    काय भावले तुम्हाला
    मागचे –
    म्हणजे आपल्याही मागचे मालगुंडवाले
    तसे भारीच निघाले.
    त्यांचे सोने कसाला लागले
    त्यांचे शब्द आम्ही आमच्या ध्वजेवर केव्हाच कोरले..
    तरीही सिनिऑरिटीच्या रांगेत तिष्ठत
    त्यांनाही उभे रहावे लागले.
    इतके जड आम्ही मर्ढेकर! इतके जड.
    मालगुंडला पोचायला एक शतक सहजच लोटले.
    त्या सोहळ्यातही,
    समस्त जन धन्य झाले
    आणि पुन्हा आपापल्या
    रोजी-रोटीच्या विवंचनेत गुंतले.
    म्हणजे मर्ढेकर! पुन्हा मुंग्यांनी वारुळच गाठले.

    देहूच्या वाण्याचा मागेच निकाल लागला
    परंतु मर्ढेकर! गणपत वाण्याचा एकूणच प्रवास
    काड्यांचा चोथा केव्हाच थुंकला त्याने.
    माडीही बांधली आहे.
    विधानसभेत फाड-फाड बोलतो
    दाराशी नवी गाडीही आहे.
    म्हणतो कसा,
    ‘नेपा’चा नवा कारखानाच काढणार आहे.
    हे आमचे पूर्वज! आमचा पराक्रम
    लिहायचा विसरूनच गेले.
    बोला आता मर्ढेकर!

    तसे मर्ढेकर,
    विद्यापीठवालेही चलाख निघाले.
    तुमचे शब्द वासनात बांधून,
    तुमचे दुभंगलेपण कातून, कातून सांगत
    त्यावर एक सुंदरसे आध्यात्मिक कलम केले.
    तुमच्या माणसांची मुळे तर जमिनीत
    खोलवर रुजलेली.
    ते मात्र पानाफुलांवरून बोलत राहिले.
    जे सुंदर असते ना मर्ढेकर,
    तेच सत्यही असते; आणि जे सत्य असते
    ते क्रांतीगामी अन् गतिमानही असते.
    अशाश्वत तर बदलतेच,
    शाश्वतही बदलत असते मर्ढेकर
    म्हणजे हे मी तुम्हाला सांगायला पाहिजे असे नव्हे,
    माझ्या रोजच्या लढाईत हेच मला प्रत्ययाला येते.
    तुमचा माणूसच पुसला
    तर, नंतर काय हो उरते?
    बरे झाले; मर्ढेकर
    तुम्ही भेटला नाहीत;
    बरेच झाले.

    .. कवीचा अहंकार फार मोठा असतो म्हणतात! – नारायण सुर्वे.

    कवींचा कवितासंग्रह निघणे ही सुरूवातीपासून अवघड गोष्ट आहे. त्यामुळं मान्यताप्राप्त साहित्यिकांनी आपापल्या आवडणार्‍या कवींचा किंवा कवींनी स्वत: संग्रह प्रकाशित केल्याची उदाहरणे आहेत. केशवसुतांच्या कवितांचा संग्रह ह. ना. आपटे यांनी, कुसुमाग्रजांचा वि. स. खांडेकर यांनी व नामदेव ढसाळ यांचा नारायण आठवले (अनिरुद्ध पुनर्वसू) यांनी प्रकाशित केला होता. 1950 नंतरची कविता, अभिनव, मौज आणि पॉप्युलर प्रकाशन संस्थांनी छापली. मान्यवरांनी अनेक कवींच्या निवडक कवितांचं संपादन केलं आहे. केशवसूत – हरपले श्रेय (सं.-रा. श्री. जोग), कुसूमाग्रज – रसयात्रा (सं.- बोरकर, वैद्य) बालकवी – ती फुलराणी (सं.- रा. शं वाळिंबे-कुसुमाग्रज) मनमोहन – आदित्य (सं.- शंकर वैद्य) बी- फुलांची ओंजळ (प्रस्तावना-आचार्य अत्रे) पु. शि. रेगे -सुहृद गाथा (सं.- गंगाधर पाटील) माधव जूलियन -स्वप्नलहरी (सं.- कवी गिरीश) गोविंदाग्रज – पिंपळपान (सं.- रा. श. वाळिंबे-कुसुमाग्रज) विंदा करंदीकर – संहिता (सं.- मंगेश पाडगावकर) यशवंत – पाणपोई (सं. – वि. स. खांडेकर) सुर्वे (सं. – दिंगबर पाध्ये) माय – आईच्या कविता (प्रकाशक – आमदार जितेंद्र आव्हाड) आईच्या कविता (सं. – मु. ब. शहा, ज्ञानेश्वर शेंडे) यांचा उल्लेख करावा लागेल.

    परशुरामतात्या गोडबोले यांनी ‘नवनीत’ हा अनेक कवींचा प्रातिनिधिक संग्रह काढला. ग. त्र्य. माडखोलकर यांनी ‘पाच कवी’ हा पाच कवींच्या कवितांचा संग्रह काढला. महाराष्ट्र रसवंती, प्रवाहिनी, वासंती, नवे नवनीत अशी अन्य संकलनेही उल्लेखनीय आहेत. आठवणीतल्या कविता हे पाठ्यपुस्तकातील कवितांचे संकलन आहे. या संग्रहाची पूर्वनोंदणी होत असे. हजारोंचा प्रतिसाद पाहून प्रकाशन संस्था काढावी लागली. या संकलनाचे चार भाग प्रकाशित झाले. त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. प्रा. एकनाथ साखळकर या आठवण गटाचे प्रकाशक होते. या संकलनाचे संपादन पद्माकर महाजन, दिनकर बरवे, रमेश तेंडुलकर आणि राम पटवर्धन यांनी केले होते.

    1960 नंतर ‘कविता’ आणि ‘पुन्हा कविता’ अशी संकलने निघाली. त्यावेळेच्या तरुण कवीच्या कवितांचा समावेश आहे. ‘विद्रोही कविता’मध्ये दलित कवितेचा समावेश आहे. ‘झिरपलेली किरणे’मध्ये 1976-77 च्या आणीबाणीच्या काळातील कवितांचे संकलन आहे. ‘कविता दशकाची’मध्ये 1970-80 या दशकातील दहा कवींच्या दहा कवितांचा समावेश आहे. ‘अभिनव काव्यमाला’ (पाच भाग) ‘सप्तसरिता’ ‘आव्हान’ यामध्ये कवयित्रींच्या कवितांचा समावेश आहे. ‘उपहासिनी’ ‘गाजराच्या पुंग्या’ ही विनोदी कवितांची संकलने आहेत. ‘सुगी’ हे ज्ञानपद कवितांचे उत्तम संकलन आहे. स्त्री गीते आणि लोकगीते यांचेही अनेक संग्रह साने गुरुजी, सरोजिनी बाबर, ना. धों. महानोर, इंदिरा संत यांनी संकलित केले आहेत.

    साहित्य अकादमीने मराठी कवितांचे दोन प्रातिनिधिक संग्रह प्रकाशित केले आहेत. स्वातंत्र्योत्तर मराठी कविता (1945-1960) या संग्रहांचे संपादन वसंत पाटणकर यांनी केले असून त्यात 37 कवींच्या कवितांचा समावेश आहे. स्वातंत्र्योत्तर मराठी कविता (1961-1980) या संग्रहाचे संपादन तु. शं. कुलकर्णी यांनी केले असून 33 कवींच्या प्रत्येकी पाच कवितांचा त्यात समावेश आहे. ‘उत्कर्ष प्रकाशन’ने ‘कविता विसाव्या शतकाची’ हा संग्रह संपादित केला असून 120 कवींच्या कवितांचा त्यात समावेश आहे.

      गेल्या शंभर वर्षांतील मराठी कवितेवर पाश्चात्य कवितेचा सखोल व विस्तृत संस्कार झाला. त्या मानाने भारतीय भाषांमधील कवितेचा झालेला नाही. पाश्चात्य कविता पूर्वीपासून वाचली जात होती; परंतु तिच्यातील फारच थोडी अनुवादरूपाने मराठीत आली आणि तिची समीक्षाही अल्प अशीच आहे. गेल्या शतकात सदानंद रेगे, विश्वास कांडे, दिलीप चित्रे, विलास सारंग, मनोहर ओक यांनी काही पाश्चात्य कवींची कविता भाषांतरीत केली. हिंदी कवितेचे मराठीत भाषांतर करण्याचे श्रेय चंद्रकांत पाटील, चंद्रकांत बांदिवडेकर यांना दिले पाहिजे. बंगाली कविता स्फूट स्वरुपात आणण्याचे काम अशोक शहाणे, वीणा आलासे यांनी केले. काही मराठी कविता इंग्रजीत नेण्याचे कार्य दिलीप पुरुषोत्तम चित्रे, विलास सारंग, फिलीप एंगग्लाम, जॉन ऑलिव्हर पेरी, निस्सीम इझिकेल, वृंदा नाबर, रणजीत होस्कोटे, मंगेश कुलकर्णी इत्यादींनी केले. अलीकडच्या काळात हिंदी अनुसंधान केंद्र, अहमदनगरचे संचालक कवी संजय बोरूडे, संचालिका रचना, भरत यादव (सोलापूर) हे अनुवादाचे काम जोमाने करत आहेत.

    (संदर्भ – कविता – विसाव्या शतकाची)

    केशवसुतांच्या काळातही कविसंमेलन होत असत पण त्यांना स्वत:ला ते मान्य नव्हते. त्यांच्या निधनानंतर ‘काव्य-रत्नावली’कारांनी असे एक संमेलन केले होते. ‘रविकिरण मंडळा’च्या काळात काव्यगायनाची पद्धत आली. नंतरच्या काळात कविसंमेलन आणि काव्यवाचन या कल्पना रूढ झाल्या. मंगेश पाडगावकर, विंदा करंदीकर आणि वसंत बापट यांनी गावोगावी काव्यवाचनाचे तिकिट लावून प्रयोग केले. गेल्या काही वर्षतात रामदास फुटाणे महाराष्ट्रातील अनेक कवींना घेऊन ‘हास्यधारा’ हा कवितेचा कार्यक्रम करतात. आता अनेक ग्रुप असे कार्यक्रम करतात.

    चांगली कविता रसिकांपर्यंत पोचवण्याच्या हेतूने पु. ल. देशपांडे, सुनिता देशपांडे, श्रीराम लागू, अमोल पालेकर, चित्रा पालेकर इत्यादींनी काव्यवाचनाचे अथवा सादरीकरणाचे प्रयोग केले. अलीकडच्या काळात मधुराणी गोखले-प्रभुलकर या कवितेचे पण हा कार्यक्रम यूट्यूब चॅनेलवर करतात. स्पृहा जोशी, मुक्ता बर्वे या कवितांचे कार्यक्रम करतात.

    संगीताची जोड देऊन गाण्याच्या रुपात कविता सादर करण्याची पद्धती जुनीच आहे. ना. घ. देशपांडे यांची ‘शिळ’ ही कविता ध्वनीमुद्रीकेच्या रूपाने रसिकांपर्यंत आधी पचली. तांबे, कुसुमाग्रज, राजा बढे, ग. दि. माडगूळकर, शांता शेळके, मंगेश पाडगावकर, आरती प्रभू, ग्रेस, ना. धों. महानोर, सुरेश भट, सौमित्र, संदीप खरे, वैभव जोशी, मंदार चोळकर अशा अनेक कवींच्या कवितांना चांगला स्वर आणि चांगला साज लाभल्याने त्या लोकप्रिय झाल्या. कुसुमाग्रज, सदानंद रेगे, नारायण सुर्वे, वसंत आबाजी डहाके, बालाजी सुतार यांच्या कविता नाट्यरूपात रंगमंचावर सादर झाल्या.

    दिनकर जोशी
    अंबाजोगाई
    ७५८८४२१४४७
    चपराक दिवाळी अंक २०२०

    चपराक

    पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
    व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
    Email - Chaprak Email ID

2 Thoughts to “१९६० नंतरच्या कवितांची सफर”

  1. Aasavari Desai

    वा! अत्यंत माहितीपूर्ण लेख!
    धन्यवाद

  2. अतिशय अभ्यासपूर्ण आणि माहितीपूर्ण दीर्घ लेख लिहून नवीन माहिती वाचकांना दिल्याबद्दल लेखकांचे आभार!.

    माझा मराठी ब्लॉग असून मी माझ्या ब्लॉगवर ‘बालभारती’मधील कवितेचे अनेक नामवंत व प्रतिभावशाली संगीतकारांनी सुंदर चाली आणि वाद्यवृंद वापरून ह्या कवितेचे गाण्यात रूपांतर केलेले आहे, ह्या विषयावर लेखमाला लिहिली आहे. रसिक वाचकांनी कृपया ते लेख वाचावेत आणि आपल्या प्रतिक्रिया कळवाव्यात.

    ब्लॉगची लिंक: https://charudattasawant.com/geetmala/

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

हे ही अवश्य वाचा