व्हायरस..!!

व्हायरस..!!

Share this post on:

शिरीष देशमुख, मंगरूळ, जि. जालना
साहित्य चपराक दिवाळी विशेषांक 2020
अंक मागवण्यासाठी संपर्क – 7057292092

‘‘हायलो…’’
आबांनी थरथरत्या हातानं मोबाईल कानाला लावला.
‘‘आबा, मी सतु बोलतोय…’’ समोरून त्यांचा मुलगा बोलत होता.

‘‘अय… आगं सतुचा फोन हे…’’ मोबाईल तसाच कानाला ठेवत आबांनी आपल्या खटल्याला आवाज दिला. माय चुलीपुढं बसून भाकरी थापत होती. पिठात माखलेला हात तसाच ठेवून लगबगीनं ती आबाजवळ येऊन उभी राहिली.
‘‘काय म्हंतुया वाघ मव्हा…?’’ आबानं कानाला लावलेल्या मोबाईलजवळ मायनं आपला कान नेला.
‘‘आता का कानात घुसतीस का मह्या?’’ आबा वसकले, ‘‘थांब पीकरवर टाकतू… तुला बी आयकू यील…’’ आबांनी मोबाईलचा स्पीकर मोड ऑन केला.
‘‘आबा, मी उद्या घरी येतोय…’’ तिकडून सतू बोलला.
‘‘काय?’’ आबांचा जणू त्यांच्या कानावर विश्वासच बसत नव्हता. मायही हरखून गेल्यागत मोबाईलकडं बघत होती.
‘‘हो आबा. इकडं त्या व्हायरसमुळं परिस्थिती खूपच बिघडलीय. माझ्या अपार्टमेंटमध्ये दोन संशयित सापडलेत. त्यामुळं साऊ म्हणत होती इथं राहण्यात अर्थ नाही. तिचे बाबा पुण्यात राहतात. त्यामुळं तिकडं जाणं म्हणजे आगीतून फुफाट्यात पडण्यासारखं…’’ सतू बराच वेळ सगळं काही सविस्तर सांगत होता. सुरूवातीला आबा लक्ष देऊन ऐकत होते. नंतर मात्र ते कुठंतरी हरवून गेल्यासारखे नुसते मोबाईलकडं टक लावून बघत राहिले. डोक्यातलं घड्याळ गरागरा उलटं फिरू लागलं. काळाचा काटा जाऊन थांबला तो थेट बारा वर्षांपूर्वीच्या अशाच एका उन्हाळ्यातल्या दिवसावर. तेव्हाही असाच फोन आला होता सतुचा.
‘‘हॅलो आबाऽऽ सतू बोलतोय!’’
‘‘बोल बाळा… म्या आबाच आयकायलोय…’’
‘‘आबा… मी लग्न करतोय.’’
‘‘क… क… काय…?’’ आबा अडखळले. त्यांना पुढं शब्दच फुटेना. पोटचा पोरगा लग्न करतोय आणि आपल्याला ठाऊकही नाही.
‘‘सॉरी आबा! सगळं अचानकच ठरलं. पुण्याची मुलगी आहे. मी इथं मुंबईत तिच्या वडिलांच्याच कंपनीच्या ब्रँचमध्ये कामाला आहे.’’
‘‘बरं बरं… कव्हाची तारीख धरली?’’
‘‘उद्याच लग्न आहे आबा.’’
‘‘उद्याच?? आरं दोन दीस आधी तर सांगावं का न्हाई? आमी कसं पव्हचावं रं यका दिसात?’’
‘‘तुम्ही येऊच नका आबा…’’ तो बोलला आणि आबांवर जणू वीजच कोसळली. ते मटकनच खाली बसले.
‘‘हॅलोऽऽ आबा… ऐकताय ना?’’ तो तिकडून बोलत राहिला, ‘‘इकडचे लोक खूप स्टँडर्ड आणि श्रीमंत आहेत आबा… आपल्या खेड्यातील माणसं या लग्नात सूट कशी व्हायची…? त्यामुळं साऊ म्हणाली गावाकडचं कुणीच नको लग्नात! तशी अटच घातली तिनं! माझा नाईलाज झाला आबा… मला समजून घ्या आबा प्लीज… आणि मायलाही समजावून सांगा. ती चिडचिड करेल उगाच…’’ तो बोलत राहिला. समजावत राहिला. आबा ऐकून घेत राहिले. फोन कधी बंद झाला ते कळलंही नाही त्यांना.
‘‘काय म्हंतुया ल्योक?’’ मायच्या प्रश्नानंतरच आबा भानावर आले. उगीचच हसले.
‘‘लगन करतूया…’’
‘‘काहीबी बोलू नगा व्हं…’’
‘‘खरंच सांगतुय.’’
‘‘मला भरोसा न्हाई! तुम्हाला न् मला सोडून कस्काय लगीन करील त्यो?’’ भोळ्या मायीचा भोळा प्रश्न ऐकून आबा पुन्हा एकदा नुसतेच हसले.
‘‘त्यो मोठ्या शिटीतला मानूस झालाय. आपून खेड्यातले अडाणी येडे… जाऊदी.. च्या टाक तू!!’’
पोराच्या वागण्यानं आबाच्या काळजात खोलवर जखम झाली होती पण अशा कितीतरी जखमा त्यांनी आतल्या आत बुजवून टाकल्या होत्या. चेहर्‍यावरची रेषाही हलू न देता सगळ्या वेदना पचवण्याची कला ते कुठून शिकले होते कुणास ठाऊक!!
बारा वर्षांपूर्वीचा तो दिवस आबांना आज पुन्हा एकदा आठवला. या एका तपाच्या काळात ना सतू गावाकडं आला ना त्यानं त्याचे बायकापोरं मायबापाला आणून दाखवले. त्याच्या मायबापाला शहरात लग्नाला येण्यापासून रोखणारी त्याची बायकोच आज बारा वर्षानंतर त्याला ‘खेड्याकडे चला’ म्हणत होती.
‘‘आता कशाला येतीया सटवी?’’ माय फुसफुसू लागली. ‘‘तुम्हाला सांगत्ये म्या तिला मह्या घरात येऊ देनार न्हाई. मव्हा पोटचा गोळा तोडला मेलीनं मह्यापासून…’’ परातीतली भाकर दणादणा थापीत माय बडबडू लागली. आबा मात्र गप्पच होते. मायनं ताटात वाढलेली गरमगरम भाकर अन् भुरकी त्यांनी खाल्ली. उठले. खुंटीला अडकवलेला नवा नेहरू अंगावर चढवला.
‘‘आता कुठं?’’ मायनं चुल फुकीत विचारलं.
‘‘तालुक्याहून येतो…’’ आबानं टोपी झटकून डोक्यावर ठेवली.
‘‘यकदमच काय काम निघलं…?’’
‘‘तुला काय करायचं? तू तुव्हं काम कर ना!’’ आता आबाही चिडून बोलले. माय गप झाली. दाराशी ठेवलेलं नर्‍हीचं खेटर आबांनी पायात घातलं अन् घराबाहेर पडले.
जरावेळानं पुन्हा परत आले. गावातला माल तालुक्याला नेणारी मोडक्या टपाची एक जीप सोबत होती. भिंताडाच्या कोपर्‍यात ज्वारीच्या चार पोत्यांची थप्पी लावलेली होती. यंदाची सालभराची कमाई. त्यातलं एक पोतडं आबा उचलू लागले. त्यांना धाप लागली. ते खोकलायला लागले. इतक्यात जीपचा ड्रायव्हर सुर्‍या घरात आला.
‘‘आवाज त द्याचा ना आबा. म्या उचलितो. तुम्ही हात लावा निस्ता…’’ सुर्‍यानं पोतं उचलून पाठीवर घेतलं. आबानं आधाराला हात लावला. पोतडं जीपमध्ये टाकलं. आबाच्या खोकल्याची ढास सुरूच होती.
‘‘कितीबार्‍या सांगावा तुमास्नी? उचलाखाचल्या करीत जाऊ नगा म्हून… पुन्हा दमा उचलितो तुमाला…’’ माय बडबडत होती अन् आबा त्यांचं काम करत होते. ‘‘ह्या जवारीचे पैशे इकडं तिकडं घालू नगा… तुमचा दम्याचा दवाखाना करायचा हे!!’’ माय सांगत राहिली पण ऐकतील ते आबा कसले? ते जीपीत बसून निघून गेले.
आबाच्या अशा वागण्याचा मायला खूप राग यायचा. ‘‘सवताच्या जीवाची कदरच करीत न्हाई ह्यो मानूस… म्हैन्या-दीड म्हैन्यापासून सांगायले, जवारी इका… दवाखाना करा… पर आयकल त्यो मव्हा दादला कसा? रातभर निसतं धापा टाकीत खोकलत र्‍हातं मथारं. पर दयाखान्यात जाचं नाव घेत न्हाई…’’ माय बराच वेळ स्वतःशीच बडबडत होती. ‘‘मथारं हे असं अन् पोरगं ते तसं…! हाडाचं काडं करून पोराला शिकीवलं. काट्टयानं असं पांग फेडलं. मायबापाला देलं सोडून अन् बसलंय जाऊन बायकूच्या वटीत. बारा वर्सात याद न्हाई आली मायबापाची… दोन म्हैन्याला फोन अन् चार म्हैन्याला मनीआडर.. इतकंच काय ते नातं ठूलं पोरानं आमच्यासंगं… आमच्या मथार्‍याचा सोभाव भोळसट हे मनून. नायतर म्या बी दाखविला असता इंगा. पोरालाबी अन् सुनालाबी… आपल्याला आपल्या मान्साम्होरं जाता येत न्हाई मनून गप र्‍हावा लागतंया…’’
झाकड पडता खेपी जीप पुन्हा एकदा आबाच्या दारापुढं येऊन उभी राहिली. कपडे झटकीत आबा जीपीतून उतरले. ‘‘सुर्‍या, हात लाव रं जरा…’’ जीपच्या ड्रायव्हरला आबांनी आवाज दिला.
‘‘तुमी थांबा आबा. म्या उतरितो सामान’’ असं म्हणत सुर्‍या ड्रायव्हरनं गाडीतलं खोकं काढून घरात नेऊन टेकलं. वरच्या कॅरीयरवर बांधलेलं सिलींडर सोडून खाली उतरवलं. तेही दाराच्या आत नेऊन ठेवलं. आणखी एक मोठं खोकं होतं. आबानं अन् सुर्‍यानं दोन्ही बाजूनं धरून तेही घरात नेऊन टाकलं. भिंताडाला पाठ देऊन उभी असलेली माय नुसती बघू लागली. गाडीतलं सगळं सामान उतरवणं झाल्यानंतर सुर्‍यानं ज्वारीच्या थप्पीवरचं एक पोतं उचललं. आबानं हात लावला. जीपमध्ये नेऊन टाकलं. सुर्‍यानं जीप सुरू केली. ‘भ्रु भ्रु’ करीत धूळ उडवीत तो निघून गेला.
‘‘आवो काय चलविलंय तुमी हे? अन् ह्यो काय पसारा आनून मांडलायसा…’’ माय जरा जास्तच भडकली होती.
‘‘अगं समदं सांगतो… आधी च्या-पान्याचं…’’
‘‘मला कळल्याबिगर च्या पानी चट बंद…’’ मायीनं कडक पवित्रा घेतला होता.
‘‘आगं काय न्हाई… उद्या पोरगं येनार हाये ना…’’
‘‘हां मंग…?’’
‘‘आगं शारात र्‍हानार्‍या तेच्या बायकू पोरास्नी ह्यो चूलखंडाचा धूर सहीन व्हनार है का? मनून ग्यास घिऊन आलूया नवा…’’ जीर्ण होऊन सुंभ तुटलेल्या बाजावर बसत आबा समजावू लागले.
‘‘मही जिंदगी गेली ह्या धूपनात… तुम्हाला कव्हाच दयामया न्हाई आली अन् आज सुनासाठी…’’ मायीच्या तळपायाची आग जणू मस्तकाला जाऊन भिडली. ती पाय आदळीतच पाण्याच्या डेर्‍याजवळ गेली. तांब्या बुचकाळला. आबाच्या समोर आणून धरला. आबाही तांब्याभर पाणी घटाघटा प्याले.
‘‘जवारीचे समदे पैशे ह्येच्यातच घातले मना की… तुमचा दवाखाना कशानं करायचा आता? बरं दोन पोते गेल्यावर पुन्हा यक पोतं सुर्‍याला कशाला देलं?’’ मायीचे प्रश्न संपतच नव्हते! ‘‘अन् ह्या बाक्सात काय हे?’’
आबांनी तांब्यातलं सगळं पाणी संपवलं. गळ्यातल्या रूमालानं तोंड पुसलं.
‘‘दोन पोते जवारीच्या पैशात ग्यास… अन् मंग ध्यानात आलं… आपलं घर हे असं… पत्राचं… आता उन्हाळ्याचे दिसं… अंगाची ल्हाई ल्हाई व्हती… आपल्याला सहीन व्हत न्हाई तर त्या शारातल्या लोकायला कसं सहीन हूयाचं… मनून… मंग…’’ आबा सांगू लागले, ‘‘पैशे कमी पडले… मंग सुर्‍याकून घेतले… त्यालाबी जवारी इकत घ्याचीच व्हती… मनलं म्या देतो… अन् असं करून… हे आनलं!!’’
‘‘हे? हाय काय नेमकं हे?’’
‘‘कूलर!!’’
मायनं आता अक्षरशः ऊर बडवून घ्यायला सुरुवात केली. ती खूपच संतापली होती. ‘‘आवो का येडे झाले का काय तुमी? आपून मेलोत का जित्ते हाव त्ये बी न इचारणार्‍या लोकायसाठी इतकी मरमर करताव तुमी? उद्या तुमचा दयाखाना कसा करायचा? हाय न्हाई तेवढी जवारी फुकलीत. आता सालभर काय खाचं?’’ मायीचा आक्रोश आवरत नव्हता. आबा शांत-स्थिर बसलेले होते. छताच्या पत्र्याखाली आधाराला दिलेल्या कुईजट झालेल्या डिळीकडं बघत ते म्हणाले, ‘‘बघू…!!’’
दुसर्‍या दिवशी सकाळीच एक नवी चकचकीत कार आबाच्या घरापुढं येऊन उभी राहिली. आबा मोरीत उभं राहून काळ्या मंजनानं दात घासत होते. माय चुलीवरचा चहा केव्हा उकळतोय त्याची वाट बघत होती. गाडीचा आवाज आला अन् दोघंही हातातलं काम सोडून दाराशी आले. कारचा दरवाजा उघडून सतू उतरला. डोळ्यावरचा चष्मा काढला. अंगावरचे कपडे झटकले. उतरताच जणू धावतच आबाजवळ आला. आबाच्या अन् मायच्या पायांवर डोकं ठेवलं. साऊ अजून गाडीतून उतरलेली नाही हे त्याच्या लक्षात आलं. पुन्हा गाडीजवळ जाऊन त्यानं गाडीचं दार उघडलं. टीव्हीतल्या बाया दिसतात तशी गोरीगोमटी, डोळ्यांवर काळा चष्मा, पॅन्ट-शर्ट घातलेली आपली सून बघून माय तर आरबळूनच गेली. तिच्या मागोमाग एक गोड गोंडस लेकरूही गाडीतून उतरलं.
‘‘माय, ही साऊ… तुझी सून… आणि हा जिमी… तुझा नातू…’’ सतूनं ओळख करून दिली. नातवाला बघताच मायच्या डोळ्यात टच्कन पाणी आलं. तिनं त्या सहा वर्षांच्या लेकराला जवळ घेतलं. मायेनं तोंडावरून हात फिरवला. स्वतःच्या गालावर बोटं ठेवून कडाकडा मोडले. ती नातवाच्या गालाचे पटापटा मुके घेऊ लागली. लेक अन् सुनेवरचा तिचा राग कुठल्या कुठं पळून गेला होता.
‘‘बरं घरात चला आता…’’ आबा म्हणाले. सतू डिक्कीतून सामानाच्या बॅगा काढू लागला. साऊ आणि जिमी मायच्या मागं घरात जाऊ लागले. तोच माय वसकली, ‘‘थांब हतंच!!’’
साऊ जागेवरच थबकली. आबाही गोंधळून गेले. ‘‘काय झालं रं?’’ आबांनी विचारलं.
तितक्या वेळात माय लगबगीनं घरात गेली. पाण्याचा तांब्या अन् भाकरीचा कुटका आणला. सून नातवावर ओवाळला. त्यांच्या पायावर पाणी ओतलं. तुकडा बाजूला फेकून दिला, ‘‘या आता घरामधी…’’
साऊनं घरात पाऊल टाकताच गळ्यातला स्कार्फ नाकाला लावला. चुलीच्या धुरानं काळीकुट्टं झालेली पत्रं, त्या पत्र्याखाली दिलेली कुईजट लाकडं, किड्यांनी खाल्ल्यामुळं लाकडातून पडणारं पीठ, मातीच्या भिंतीचे गळून पडणारे पोपडे, चिमणीच्या धुरानं काळवंडून गेलेल्या देवळ्या, जागोजाग लोंबणारे कोळ्याचे जाळे… घराची ती सगळी अवकळा बघून साऊला ओकारीच आली. पुढचे दोन अडीच महिने याच घरात काढायचे होते तिला.
‘‘घी च्या…’’ मायनं कान तुटलेला कप सुनंपुढं धरला. तो हातात कसा धरायचा तेच साऊला कळेना. कसाबसा हातात घेऊन तिनं कप तोंडाजवळ नेला तोच शेळीच्या दुधाचा घुरट वास तिच्या नाकात शिरला. शिसारीच आली. तिनं कप बाजूला ठेवून दिला. पटकन दाराबाहेर गेली. सतू अजूनही गाडीतल्या बॅगाच काढत होता.
‘‘ऐ सोन्या… काय नाव हे तुव्हं… यी इकडं… तुह्या आज्यापाशी यी…’’ आबा आपल्या नातवाला बोलावू लागले. कुरळ्या केसांचं, टप्पोर्‍या डोळ्यांचं ते गोरंगोमटं लेकरू धावतच आपल्या ग्रँडफादरच्या मांडीवर जाऊन बसलं. आजोबांनीही त्याला उचलून घेतलं अन् लगेच त्यांना धाप लागली. मागोमाग खोकला. इतका की जवळ आलेल्या त्या लेकराला बाजूला ठेवून आबा उठून मोरीत जाऊन उभे राहिले. गच्च भरलेल्या छाताडातून बाहेर पडणारे बेडके थुंकू लागले.
साऊ आणि सतू अजून दाराशीच होते. बॅगा काढणं, कार साईडला पार्क करणं असं काही काही चाललं होतं त्यांचं. त्यातच आबांच्या खोकलण्याचा आवाज साऊच्या कानावर पडला अन् ती संतापलीच. ‘‘काय हे सतू… अरे आपण का आलोय इथे…? सेफ राहण्याची गॅरंटी आहे म्हणूनच ना? आणि काय चाललंय तुझ्या बाबांचं? व्हायरस राहिला बाजूला त्या म्हातार्‍याच्या खोकण्याचंच इन्फेक्शन व्हायचं इथं…’’
‘‘अगं अस्थमा आहे त्यांना… त्यांचा खोकला काही आजचा नाही…’’ सतू समजावू लागला.
‘‘मला तर कठीण दिसतंय यार यांच्यात राहणं… इथंच आजूबाजूला एखादं वेगळं घर नाही मिळायचं का? पाहिजे तितकं भाडं देऊ… पण आपण तिघंच राहू… म्हातारा म्हातारी नकोच आपल्यात…’’
‘‘आता तू आल्या आल्याच सुरू होऊ नकोस हं! आणि हे घर आबांचं आहे साऊ… आपण आपला जीव वाचवण्यासाठी इथं त्यांच्या आश्रयाला आलो आहोत… आणि आता त्यांनाच त्यांच्याच घरातून बाहेर काढायचं? असा विचार तरी कसा काय येऊ शकतो तुझ्या मनात? बाय द वे… इथं येण्याचा डिसीजन तुझाच आहे बरं…’’
‘‘ते तर आहेच रे… बट…’’
‘‘चल आता… घरात जाऊन फ्रेश होऊ… इथं अ‍ॅडजस्ट करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही आपल्याकडं!’’ त्यानं समजावलं. तिच्या खांद्यावर हात ठेवला. तिला घरात आणलं.
‘‘सतू… च्या-पानी घ्या… आंघुळी बिंघुळी करा… म्या जरा रानातून जाऊन येतू!’’ घरातून बाहेर पडता पडता आबा सांगून गेले.
सुनेनं आपल्या हातचा चहा घेतला नाही. तसाच टाकून दिला हे मायला खटकलं होतं पण ती काहीच बोलली नाही. चुलीवर आंघोळीच्या पाण्याचं भगुनं ठेवलं अन् जाळ फुकीत बसली. मध्येच घरातल्या मातीत मजेनं खेळणार्‍या नातवाशी गप्पाही मारू लागली. साऊ बॅगा उघडून त्यातले कपडे खालीवर करू लागली. सतू मात्र आबाच्या मोडक्या बाजेवर हातपाय ताणून पसरला.
मायनं तापलेलं पाणी बादलीत काढून मोरीत नेऊन ठेवलं. तोंड कसनूसं करीत साऊ बळंचमळंच आंघोळीला गेली. न्हाणीला कवाड नव्हतंच. ती मधात गेल्यावर मायनं मोडकं पत्तर उभं करून दिलं. आडोसा केला.
‘‘और जिमी बॉस… कैसा है ग्रँडफादर्स हाऊस?’’ सतूनं लोळत लोळत पोराला विचारलं.
‘‘व्हेरी नाईस… मच बेटर दॅन अवर्स…’’ नातू फाडफाड इंग्रजी बोलतंय हे पाहून तर माय हुरळूनच गेली.
‘‘माय… इतकूसा वाघ मव्हा… पर कसा राघुवानी इंग्रजी बोलतुया…’’ मायनं त्याला उचलून घेऊन त्याचे पटापटा मुके घेतले.
‘‘ऐ… ठूई त्या काट्ट्याला खाली…’’ आबा दारातूनच ओरडले. त्यांच्या आवाजानं सतू दचकलाच. खाडकन उठून बसला.
‘‘कावून हो?’’ मायला काहीच कळंना.
‘‘ठुई मनलो ना…’’ आबा मायच्या अंगावर धावून आले.
‘‘आत्ता… अन् काय झालं असं भूत लागल्यावानी… पेऊन आले क्काय?’’ आबानं कितीही भीती दाखवली तरी माय त्यांना भीक घालत नव्हती.
‘‘तू त्या पोराला खाली ठुतीस का चुलखंडातलं जळतं लाकूड घालू पाठाडात तुह्या?’’ आबाचा चेहरा लालबुंद झाला होता. हातपाय थरथरायला लागले होते. मायनं नातवाला सतुजवळ दिलं.
‘‘आवो काय करता आसं…? लेक इतक्या वरसानी आला अन…’’ माय समजावण्याचा प्रयत्न करू लागली.
‘‘कशाला आलाय त्यो?’’ आबा कुणाचंच काहीच ऐकून घेत नव्हते. ‘‘ठावं हाय का तुला कशाला आलाय त्यो…? तिकडं मंम्हईला कोनचा कानू रोग आलाय… लोक मरायलेत पटापट… मनून आलाय त्यो…’’
‘‘हाव मंग काय चुकलं तेचं?’’
‘‘काय चुकलं… आगं येडे… त्यो रोग घेऊन आलाय हितं… तेच्या संगं र्‍हायलं तर आपल्याला बी व्हनार त्यो रोग…’’
‘‘काहीबी बकबक करू नगा तुमी…’’
‘‘बकबक? समद्या गावातले लोक बोलायलेत हेच… सत्या रोग घेऊन आला गावात… आबाच्या मुळावर आला सत्या…’’
‘‘लोकायला काय मनायचं ते मनू द्या… मव्हा लेक मह्यासंगंच र्‍हानार…’’
‘‘मह्या घरात मी ह्या व्हायरसाला र्‍हावू देनार न्हाई…’’ आबा मोठ्या आवाजात गरजले. त्यांचा तो अवतार बघून माय गप्पच झाली. ‘‘हे पाहाय सतू… इतक्या वरसानी तू घरी आलास… मला तुह्यासंगं भांडायचं न्हाई… पर आपून यका घरात जमनार न्हाई गड्या… तुह्या रोगामुळं आमी आमचा जीव धोक्यात घालायचो न्हाईत…’’
‘‘आबा आम्हाला काहीही झालेलं नाही… आम्ही सगळ्या तपासण्या करून आलो आहोत आणि आमच्यामुळं तुमचा जीव धोक्यात येईल असं वाटतं तरी कसं तुम्हाला?’’ सतू समजावण्याचा प्रयत्न करू लागला.
‘‘मला समदं ठावं हाय… ह्या घरात यकतर तुहं कोटंबं र्‍हाईल.. नायतर मव्हं!’’ आबा निर्वाणीचं बोलले.
‘‘आबा, मी तुमच्या कुटुंबाचा भाग नाही?’’ आबांच्या वाक्यानं सतुला धक्काच बसला होता.
‘‘ते तू सवतालाच इचार…’’ मागच्या बारा वर्षाची वेदना जणू एकाच वाक्यात मांडली होती आबानं. सतू मिनिटभर नुसता आबाकडं बघत राहिला. ‘‘ठीक आहे आबा… मी माझी वेगळी व्यवस्था करतो…’’
‘‘आवो काय चाललंय तुमचं हे?’’ आता माय मध्ये पडली. ‘‘कुठं र्‍हाईल त्यो? कुठं जाईल त्यो?’’
‘‘आणि का जाईल?’’ मोडक्या बाथरूममध्ये बसून अंघोळ करत आतापर्यंत सगळं ऐकणारी साऊ आतूनच बोलली, ‘‘हे घर जितकं तुमचं आहे… तितकंच आमचंही… आम्ही कुठंही जाणार नाहीत..!’’
‘‘साऊ… तू मध्ये पडू नकोस… आबा, आम्ही एक-दोन दिवसात बघतो वेगळी व्यवस्था…’’ आबाचं वागणं सतुच्या मनाला चांगलंच लागलं होतं.
थोडावेळ कुणीच काहीच बोललं नाही. सगळे स्तब्ध बसून होते. अचानकच माय उठली. एक थैली घेतली. पीठाच्या डब्यातलं ज्वारीचं पीठ, मिठाचा पुडा, भुरकीची पुडी अन् तेलाची कॅन थैलीत भरली. थैली खांद्यावर अडकवली अन् आबांना म्हणाली, ‘‘चला..!!’’
‘‘कुठं जातीस?’’ आबाला काहीच कळत नव्हतं.
‘‘आपल्या घरी… रानातल्या…’’
‘‘अगं पर निसतं खोपटं हे तिथं… अन् आपलं हे हक्काचं घर सोडून रानातल्या झोपड्यात कावून र्‍हाचं आपून?’’ आबा मायला समजावत होते.
‘‘तुमी येतायसा का म्या जाऊ यकटी?’’ फणफणतच माय घराबाहेर पडली होती. आबानं कोपर्‍यातली काठी उचलली. ‘‘अगं येऊ दी मला…’’ मायच्या मागं जात ओरडले. पुन्हा थांबले. परत आले. सतुच्या खांद्यावर हात ठेवला.
‘‘तेवढा गॅस जोडून घी… अन् कुलरबी लाव… अजूक काही लागलं सवरलं तर सांग… मी चकरा मारीतच र्‍हाईन…’’
‘‘आबा…’’ आबाच्या सगळ्या वागण्याचा अर्थ सतूला जणू उलगडत होता, ‘‘आबा… तुम्ही साऊचं आणि माझं बोलणं ऐकलं होतं…!’’
आबांनी सतुच्या डोक्यावर हात ठेवला. ‘‘पोरा, बाप हाय रे मी तुव्हा…! अन् सूनबाईला सांग… त्यो व्हायरसाचा इलाज आज ना उंद्या निघंलच… पर तिच्या मनात ज्यो आमच्याबद्दल-खेड्यातल्या लोकाबद्दल रागाचा व्हायरस हाय ना… तेचा इलाज कर म्हनं कायतरी..!!’’
आबांनी ओलसर झालेल्या डोळ्यांना हात लावला अन् ते घराबाहेर पडले!!

शिरीष पद्माकर देशमुख

मु. मंगरूळ, ता. मंठा, जि. जालना
मो. 7588703716

Author: चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email -

View all posts by चपराक >

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

error: Content is protected !!