शैवयोगिनी लल्लेश्वरी!

शैवयोगिनी लल्लेश्वरी!

– संजय सोनवणी, पुणे
9860991205

साहित्य चपराक, दिवाळी विशेषांक 2020
हा अंक घरपोच मागविण्यासाठी आणि ‘चपराक’ मासिकाचे सभासद होण्यासाठी संपर्क – 7057292092

काश्मीर अप्रतिम, निसर्गदृष्ट्या भुतलावरील नंदनवन म्हणून जसे जगप्रसिद्ध आहे तसेच अनेक अभिनव तत्त्वज्ञानांचे, साहित्यनिर्मितीचे आणि विचारांचेही नंदनवन राहिलेले आहे. काश्मीर अनेक शतके दक्षिण आशियाचे ज्ञानकेंद्र राहिलेले आहे. येथेच शैव तत्त्वज्ञानाने अभिनव गुप्ताच्या रुपाने कळस गाठला तर चीन, कोरिया, अफगाणिस्तान, चायनीज तुर्क्मेनीस्तान, तुर्कस्तान या विशाल भुप्रदेशात गेलेला बौद्ध धर्म ही काश्मीरचीच वैशिष्ट्यपूर्ण निर्मिती. शैव आणि बौद्ध तत्त्वज्ञानांचा संगम करुन बनवला गेलेला हा बौद्ध धर्म जगाने स्वीकारला. येथेच हजारो संस्कृत, पाली, प्राकृत ग्रंथांचे तिबेटी-चिनीसहित अनेक भाषांत रुपांतरे झाली. ह्यु-एन-त्संग ते हिचेओ असे चिनी, कोरियन प्रवासी ज्ञानप्राप्तीसाठी काश्मीरला भेट देत राहिले. त्याच वेळेस काश्मीर खोर्‍यात अडकुन न राहता काश्मिरी धर्मप्रचारकांनी विशिष्ट बौद्ध धर्म चीनमध्ये नेला. संघभूती, गौतमसंघ व कुमारजीव हे काश्मिरी बौद्ध प्रचारक चौथ्या शतकातच चीनमधे गेले. कुमारजीवाच्या प्रतिभेने चीनचा राजा एवढा प्रभावित झाला होता की त्याने कुमारजीवाचे चक्क अपहरण केले आणि चीनमध्येच ठेवत शंभराच्या वर बौद्ध ग्रंथांचा चिनी भाषेत अनुवाद करुन घेतला. कर्कोटक वंशाच्या प्रतापादित्याच्या काळात रत्नचिंता या काश्मिरी भिक्षुने चीनला भेट दिली होती. (सन 693) त्याने चीनमध्ये मठही स्थापन केला आणि सात संस्कृत ग्रंथांचे चिनी भाषेत अनुवाद केला. गुणाढ्याच्या पैशाची भाषेतील बृहत्कथेची संस्कृत रुपांतरे झाली तीही काश्मीरमध्येच. एका अर्थाने काश्मीर हे ज्ञान, साहित्य आणि धर्म-तत्त्वज्ञान निर्मितीचे अनेक शतके केंद्र राहिलेले आहे. उपखंडाच्या बुद्धिवादी, गूढवादी आणि सौंदर्यवादी मानसिकतेला काश्मीरने फार मोठा हातभार लावलेला आहे.

काश्मीरला ललितादित्य (आठवे शतक), दिद्दा राणी (दहावे शतक) आणि पंधराव्या शतकातील झैन-उल-अबिदिनसारख्या महान सम्राटांचीही परंपरा आहे. ललितादित्याने अर्धा भारत तर आपल्या नियंत्रणाखाली आणलाच पण अफगाणिस्तान, तुर्कस्तान, बाल्टीस्तान, गिलगिट ते लडाखही आपल्या नियंत्रणाखाली आणला. तत्कालीन रेशीम मार्गांवर त्यानेच नियंत्रण ठेवले व काश्मीरला एक अर्थसत्ताही बनवले. झैन-उल-अबिदिनचा काळ अत्यंत शांततामय व धार्मिक सलोख्याचा म्हणून ओळखला तर जातोच पण मधल्या काळातुन हातातुन सुटलेले लडाखही त्याने पुन्हा जिंकून घेतले व काश्मीरला जोडले.

काश्मीरची संतकवी परंपराही तशीच प्राचीन आहे. चौदाव्या शतकातील शिवयोगिनी लल्लेश्वरी (लल्लदेद) ते शेख नुरुद्दिन उर्फ नंद ऋषी या संत कवींनी काश्मीरची परंपरागत समन्वयवादी मानसिकता घडवण्यात फार मोलाचा वाटा उचलला आहे. किंबहुना काश्मीरच्याच समन्वयशाली परंपरेचा विराट उद्गार त्यांच्या काव्य-गीतांवर पडलेला आहे.
आज काश्मीरमधील जी स्थिती आहे त्या स्थितीचे जे भारतीय समाजाचे आकलन वा त्यांच्यावर ज्या माहितेचा प्रभाव आहे त्यांचा आज कदाचित या माहितीवर विश्वास बसणार नाही पण गतकाळात काश्मिरी आणि भारतीयही डोकावले तर एक बाब लक्षात येईल ती म्हणजे शांततेचे आणि समन्वयाचे तत्त्वज्ञान देण्याची व आचरणात आणण्याची क्षमता काश्मिरी आजही बाळगुन आहेत. त्यासाठी इतिहासही माहीत असण्याची गरज आहे आणि तशाच समाज-सांस्कृतिक विचारांना घेत त्यांच्याजवळ गेले पाहिजे.

लल्लेश्वरीचा जन्म अंदाजे 1320 चा. तेव्हा आपल्या महाराष्ट्रातील संतकवयित्री मुक्ताबाईंनी समाधी घेऊन 23-24 वर्षे झाली असतील. लल्लेश्वरीला हिंदू व मुस्लिम समुदायांत सारखाच सन्मान आजतागायत मिळत आला आहे. लल्लेश्वरीला मुस्लिम लल्ल ‘अरिफा’ म्हणतात. लल्लेश्वरी शैव आणि सुफी तत्त्वज्ञानाचा सुरेख मिलाफ घडवून आणते असे मत अनेक विद्वान तिच्याबद्दल व्यक्त करीत असतात. अर्थात आता या ऐक्याला सुरुंग लावणारी लल्लेश्वरी केवळ शैव तत्त्वज्ञ ते लल्लेश्वरी केवळ सुफी तत्त्वज्ञान मांडणारी अशी लल्लेश्वरीची सांप्रदायिक मांडणी करु लागले आहेत. असे होण्याचे मुख्य कारण लल्लेश्वरीच्या काव्याचा (ज्यांना ‘वाक’ असे म्हटले जाते) काश्मीरींवर असलेला अमिट प्रभाव. संत कबीरांप्रमाणेच लल्लेश्वरीवर दोन्ही समाजांनी मालकी दाखवण्याचा हा केवीलवाना प्रयत्न आहे हे स्पष्ट आहे. लल्लेश्वरीला आपले वाक लिहिताना अथवा गाताना जाणीवपूर्वक शैव किंवा सुफी विचार घेतलेले दिसत नसून जे काही आलेले आहे ते सरळ तिच्या हृदयातून आले आहे. ते तिचे संस्कार, चिंतन आणि स्वत:च्या अंत:करणातून उत्स्फुर्तपणे उमटलेले उद्गार आहेत. कोणते वाक अथवा विधान कोणत्या तत्त्वपरंपरेला जवळचे आहे हे शोधत तिच्यावर आपल्या कोणत्याही तत्त्वधारेचे आरोपन करणे ही आपल्या देशातील अनेक विद्वानांची प्रवृत्ती असली तरी हा या महान संत-कवयित्रीवर अन्याय करणारा घटक आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे. मुळात शैव विचारधाराच समतावादी असल्याने सुफींनीही शैवांकडून काही घेतले तर सुफींकडून गूढवाद शैवांनी स्वीकारला असे फार तर म्हणता येईल! पण ही देवाण-घेवाण जाणीवपूर्वक समन्वयवादी म्हणून नव्हे तर काश्मिरी जनमाणस मुळातच या विचारांना साजेशा असल्याने असे समन्वयात्मक वातावरण आपसूक बनले असे म्हणता येईल.

लल्लदेद (माता लल्ल) जेव्हा जन्माला आली तेव्हा काश्मीर एका वेगळ्याच राजकीय आणि वैचारिक घुसळणीतुन जात होता. इस्लामी सत्ता स्थापन झाली असली तेथील इस्लामप्रवेश हा सर्वस्वी वेगळ्या कारणाने घडला. खरे तर तोही इतिहास आपल्याला माहीत असला पाहिजे. थोडक्यात तो असा –

ल्हाचन गुलाबु रिंचेन हा मुळात लडाखी राजपुत्र. तो बौद्ध धर्मिय होता. रिंचेनने आपल्या काकाविरुद्ध बंड केले पण ते फसल्याने त्याने काश्मीरमध्ये आश्रय घेतला. त्यावेळेस सुहदेव हा राजा काश्मीरमध्ये राज्य करत होता. राजा सुहदेवाने जसे रिंचेनला आपला मंत्री म्हणून नियुक्त केले तसेच स्वात खोर्‍यातील शाह मीर यालाही मंत्रीपदावर बसवले. त्याच काळात झुल्चु या मंगोल आक्रमकाने काश्मीरवर धाड घातली. सुहदेवाला पळून तिबेटमध्ये आश्रय घ्यावा लागला. मोगल निघुन गेल्यावर आपल्या राजाला परत आणण्याऐवजी रामचंद्र या सुहदेवाच्या अमात्याने गादी बळकावली. त्याने रिंचेनला प्रशासक म्हणून नेमले. पुढे रामचंद्राची सत्ता बंड करुन रिंचेनने उधळली आणि स्वत:च गादीवर बसला.

काश्मीरची प्रजा बव्हंशी हिंदू होती. काश्मीरमध्ये बौद्ध धर्माने एक आगळी तात्त्विक उंची गाठली असली व लोकही त्या धर्माचा सन्मान करीत असले तरी अभिनव गुप्तामुळे मुळची शैव विचारधारा प्रबळ होती. प्रजेचा जो धर्म तोच आपणही स्वीकारला तर आपले राजकीय अस्तित्त्व प्रबळ होईल हे त्याने हेरले. हिंदू धर्मात प्रवेश घ्यायचा म्हणून त्याने देवास्वामी या शैव गुरुंची भेट घेतली. देवास्वामीने काश्मिरी पंडितांशी विचारविमर्श पण वैदिक धर्माच्या प्रभावाखाली आलेल्या बहुतेक पंडितांचे मत पडले की भिन्नवंशीय आणि भिन्नधर्मिय रिंचेनला हिंदू धर्मात प्रवेश देऊ नये. रामास्वामीने रिंचेनला धर्मात घ्यायचे नाकारले. खुद्द राजाला धर्मांतराची परवानगी नाकारली म्हटल्यावर रिंचेन संतप्त झाला.

तेव्हा मध्यपूर्वेतुन आलेल्या सुफी पंथानेही काश्मीरमध्ये बस्तान बसवायला सुरुवात केली होती. बुलबुलशहा हा थोर सुफी संत काश्मीरमध्ये प्रसिद्ध होता. रिंचेनने त्याची भेट घेतली आणि इस्लाममध्ये प्रवेश केला. धर्मांतरानंतर रिंचेनचे नाव सुलतान सद्रुद्दीन शाह असे ठेवण्यात आले. त्याच्या बरोबरच त्याच्या मेव्हण्यासह दहा हजार लोकानी इस्लाम स्वीकारला. एका बुद्ध मंदिराच्या जागेवरच त्याने बुद मस्जिद (बुद्ध मशिद) बांधली. अशा रीतिने काश्मीरमध्ये इस्लाम आला व पहिली मस्जिदही उभारली गेली.

अर्थात सुफी परंपरा आणि भारतात अन्यत्र पसरलेल्या इस्लामी परंपरेत खूप अंतर आहे. सुफी परंपरा ही गूढवादी, आत्मवादी आणि इस्लामची अनेक मूलतत्त्वे नाकारणारी परंपरा आहे. हीच सुफी परंपरा अन्यत्रही, विशेषत: महाराष्ट्र आणि दक्षिणेत पसरली. त्यामुळे समन्वयवादी प्रयत्न हिंदू व सुफी संतांनी एकत्रीतपणे करुन भारतीय संस्कृतीचा आत्मा हरवु दिला नाही. अर्थात रिंचेनची सत्ता केवळ तीन वर्षे टिकली. त्याच्याविरुद्धही बंड झाले आणि त्याला ठार मारण्यात आले. सन 1320 ते 1323 एवढीच त्याची राजवट. लल्लेश्वरीचे जन्मवर्ष खरे असेल तर तिचा जन्म झाला तेव्हा रिंचेन सत्तेत आला होता. (काहींच्या मते तिचे जन्मवर्ष सन 1335 आहे.) काश्मीरची राजकीय अस्थिरता शिगेला पोहोचली होती. कट-कारस्थाने आणि बंडांना उत आला होता. पूर्वी शैव आणि बौद्ध या प्रबळ विचारधारात आता सुफी इस्लामचाही समावेश झाला होता. पुढे नुरुद्दिन नुराणी, ज्याला हिंदू ‘नंदऋषी’ असे आदराने म्हणतात, त्याने सुफी गूढवाद आणि शैव तत्त्वांचा मिलाफ करुन नवाच विचार मांडायला सुरुवात केली.

या सामाजिक व राजकीय वातावरणाचा लल्लेश्वरीवर बालपणापासुन परिणाम झाला असणे सहज शक्य आहे. प्रत्येकावर असा प्रभाव पडत असला तरी त्या प्रभावाच्या कक्षा व दिशाही वेगवेगळ्या असतात. लल्लेश्वरी शैव वातावरणात वाढली तसेच सुफी प्रभावाचाही तिच्यावर परिणाम होत तिची स्वतंत्र द़ृष्टी विकसित होत गेली असे म्हणता येईल. काश्मीरमध्ये मुळात वैदिक प्रभाव वाढण्याआधी स्त्री स्वातंत्र्य पुरुषाइतकेच होते. काश्मीरला लोक मुळात सती-पार्वतीची भुमी मानतात कारण काश्मीरच्या जागेवर प्राचीन काळी ‘सतीसार’ नावाचे सरोवर होते आणि तेच कोरडे झाल्यानंतर तेथे मानवी वस्ती होऊ लागली अशी श्रद्धा आहे.

    श्रीनगरपासुन चार मैलावर असलेल्या पांडरेस्थान या पुरातन इतिहास असलेल्या गावी लल्लेश्वरीचा जन्म झाला. सिद्ध श्रीकांत या स्थानिक विद्वानाच्या देखरेखीखाली तिचे शिक्षण झाले. लल्लेश्वरीची बौद्धिक आणि आध्यात्मिक झेप पाहुन श्रीकांतांनी लल्लेश्वरीला शैव परंपरेतील गूढवादाशी परिचित केले. लल्लेश्वरी त्या तत्त्वज्ञानाकडे आकर्षित झाली आणि असे म्हणतात की तिने लवकरच आपल्या गुरूलाही मागे टाकले एवढा तिच्या आध्यात्मिक उन्नतीचा वेग होता.

    लोकस्मृतींनुसार वयात आल्यावर तिचा विवाह पद्मपूर येथील एका सधन परिवारातील युवकाशी झाला. तिचे सासरचे नाव पद्मावती. तिच्या पतीचा स्वभाव वेगळा होता. तिची सावत्र सासु खाष्ट तर सासरा मात्र कनवाळु. पती तिचे आध्यात्मिक प्ररूप ओळखु शकला नाही कारण तो व्यवहारी. दोघांतील दरी वाढतच गेली आणि त्याचा फायदा तिच्या सावत्र सासुने घेतला. ती लल्लेश्वरीला दिवसेंदिवस वाईट वागणुक देऊ लागली. काश्मीरमधील दंतकथा सांगतात की तिला जेवण देताना सासु एक दगड मध्ये ठेऊन वर भात लेपत असे त्यामुळे पाहणार्‍याला वाटावे की लल्लेश्वरीला भरपूर खायला मिळत आहे पण प्रत्यक्षात काही शिते वगळता तिला काही खायला मिळत नसे. त्यामुळे ती कृश होऊ लागली. जेवण झाल्यावर तो दगड आणि ताट स्वच्छ करुन तिला गुपचूप सासुच्या हवाली करावे लागे पण तिने तक्रार केली नाही. सासरा मायाळू असला तरी त्यालाही या गोष्टींची खबर नव्हती.

    जवळपास बारा वर्षे हा जाच सुरुच राहिला. एके दिवशी तिच्या सासर्‍याने आपल्या घरी एक मेजवानी आयोजित केली. त्या दिवशी सकाळी तिचा सासरा एका झर्‍याजवळून जात असता तेथे पाणी भरायला आलेल्या स्त्रियांचे बोलणे त्याच्या कानावर पडले. एक स्त्री लल्लदेदला म्हणत होती, ‘‘काय गं, तुझ्या सासर्‍याने आज मेजवानी आयोजित केलीय तर आज तुला चांगले जेवण मिळेल!’’

    त्यावर लल्लदेद उत्तरली, ‘‘ते मोठा बोकड कापोत की छोटा, सुनेला दगडाला लेपलेला भातच खावा लागणार!’’

    काव्यात दिलेले हे उत्तर ऐकुन सासर्‍याला धक्काच बसला. लल्लच्या या विधानाची खात्री करुन घेण्यासाठी त्याने ती जेवायला बसताच तिच्या हातातील ताट हिसकाऊन घेतले आणि त्याला तो दगड दिसला. त्याचे मन खिन्न झाले. त्याने वारंवार लल्लदेदची माफी मागितली पण तिच्यावरील सासुचे अत्याचार जास्तच वाढले. यामुळे लल्लदेदचा संसारामधील रसच आटला. तिने ऐन तारुण्यात घराचा त्याग केला आणि एकांतवासाचे जीवन जगु लागली. ती गावोगावी सत्याच्या शोधात फिरे आणि प्रेम आणि दैवी शांतीची गीते गाई. हीच गीते आता ‘वाख’ म्हणून ओळखली जातात.

    आपल्या देशात इतिहास लेखनाची परंपरा नाही हे सर्वांन माहीत आहे. महनीय व्यक्तींचा जीवनप्रवास मिळतो तो दंतकथांतुन. लल्लदेदही याला अपवाद नाही. तिचे जन्मवर्षही निश्चित नाही. काश्मिरी राजांचा इतिहास विविध राजतरंगिण्यांमध्ये येतो पण तो केवळ राजकीय इतिहास असल्याने अगदी जोनराजाच्या राजतरंगिणीतुनही लल्लेश्वरी गायब आहे. सोळाव्या शतकातील एका मुस्लिम लेखकाच्या काश्मिरी संतांच्या इतिहासात तेवढा तिच प्रथम उल्लेख येतो. लल्लदेदनंतर चारशे वर्षांनी लिहिल्या गेलेल्या माहितीत अर्थातच अधिकृतता नाही. लोकस्मृतींत जेवढा आहे तेवढाच तिचा इतिहास. तिची कवनेही लोकानीच मुखोद्गत पद्धतीने सातशे वर्ष जतन केली. फरक एवढाच की आपल्याकडे संत-महात्म्यांच्या बाबतीत चमत्कारांचा समावेशही केला जातो तसे तिच्या बाबतीत एवढे घडले नाही. तिचे अध्यात्म हे खर्‍या अर्थाने आत्मिक होते. बाह्यावडंबराचा स्पर्शही त्याला झाला नाही.

    कोणत्या दिशेने आले मी
    आणि कोणत्या दिशेने जाणार
    नाही माहीत मला.
    जेथे आहे मी उभी तीच श्रेष्ठ जागा
    जर आत्म्याचे सच्चे मार्गदर्शन मला!
    केवळ श्वासांवर नियंत्रण मिळवणे
    म्हणजे योग थोडीच असतो?

    एका वाखमध्ये एक त्रिकालाबाधीत सत्य ती सांगुन जाते-

    एक वेळ मी आभाळात दाटलेले ढग
    टाकीन विखरुन
    उपसुन काढेल सागरातील सारे जल
    आणि बरेही करेल असाध्य रोग
    पण मूर्खांना नाही समजावु शकत मी!

    ती विवस्त्र संचार करीत असल्याने तिची कुचेष्टा करणारे, तिला दगड मारणारे काही कमी नव्हते. तरीही ती आत्मविश्वासाने म्हणते,

    करा माझी कुचेष्टा
    किंवा द्या मला काहीही शिव्या
    मी शरणागत आहे त्या दयाळु शिवाची
    मला ना शिव्यांचे दु:ख होतं ना दगडांचा त्रास
    राखुंडीने जसा आरसा स्वच्छ होतो
    तसेच माझे मन निरंतर स्वच्छ होत राहते
    या त्रासाच्या राखुंडीने!

    मी माझा श्वास
    घशातच किंचाळी रोखावी तसा रोखला
    आणि हृदयात प्रदीप्त झाला एक प्रकाश
    दाखवत मला
    माझे अस्तित्व काय आहे ते!
    मी अंध:काराचे अलंघ्यकडे तो प्रकाश घेऊन
    ओलांडले
    जागोजागी पेरत त्या प्रकाशाची बीजं!

    एके ठिकाणी ती म्हणाली, ललदेद, सत्य हवे तर बाहेर फिरणे बंद कर आणि आपल्या आत फिर… सत्य गवसेल तुला!

    लल्लदेदने बाह्य जगाशी नाळ तोडलेली होती. जुनी वस्त्रे गळाली तर तिने विवस्त्र राहणे पसंत केले. आजीवन ती तशीच राहिली. ‘मुक्तीची स्थिती आली की विवस्त्रपण अमर होते,’ असे तिचे एक ‘वाख’ अत्यंत प्रसिद्ध आहे. खरे तर काश्मीरच्या व्यक्तित्त्वातच लल्लदेद आहे. ती वैश्विकतेचा धांडोळा घेत जीवनाचा अमोघ स्पर्श तिच्या काव्याला देते. तिचे वाख म्हणींसारखे आजही काश्मिरींच्या तोंडी आहेत. काश्मीरमधील 1989 च्या पंडितांच्या दुर्दैवी हत्याकांडाच्या स्थितीमुळे लल्लदेद काश्मीरमध्ये अधिकच सामयिक बनली आहे कारण तिचे अध्यात्म वा तत्त्वज्ञान परंपरावादाला चिकटून राहणारे नाही. ते आजही दुभंगलेली मने जोडण्याचे कार्य करु शकते.

    आजचा समाज-राजकीय समजांना एखाद्या प्रांताच्या साहित्यिक/सामाजिक इतिहासावर लादल्याने तथ्यपूर्ण चित्र कधीही सामोरे येणार नसते. काश्मीरच्या इतिहासाबाबत तर हे भान अधिक असायला हवे पण ते तसे नाही हे आपले दुर्दैव आहे. लल्लेश्वरी उर्फ लल्लदेद ही गेली सातशे वर्षे काश्मीरच्या आध्यात्मिकतेचे प्रतीक बनलेली कवयित्री. तिचे जीवनही विलक्षण. कोणत्याही प्रतिभावंत साहित्यिकावर त्याच्या काळाच्या समाजधारणांचा व इतिहासाच्या छायांचा अपरिहार्य असा प्रभाव पडत असतो. लल्लेश्वरीही त्याला अपवाद असणे शक्य नाही. शैव, बुद्धिस्ट आणि सुफी तत्त्वज्ञानांचा प्रभाव तिच्या काव्यात जाणवतो की तीचे आत्मिक जीवनाचेच हे स्वयंभू तत्त्वज्ञान होते आणि त्यात इतरेजन बाह्य प्रभाव शोधतात हा एक वेगळाच अभ्यासाचा विषय आहे. लल्लदेवीच्या तत्त्वज्ञानात केवळ सुफी अथवा केवळ शैव मूळ शोधण्याचे वा तसे ठसवण्याचे जे प्रयत्न होतात ते गैर आहेत ते याचसाठी.

  • शिवाय नंतरच्या काळातील कवी आपले विचार/भावना/समज जुन्या कवीच्या किंवा लेखकाच्या लोकप्रियतेचा उपयोग करण्यासाठी अथवा ते विचार त्याचेच असा भास निर्माण करण्यासाठी घुसवून देत असतात. आपल्याकडे व्यास, कात्यायन, चाणक्य अशी अनेक उदाहरणे आहेत. ज्ञानेश्वर, नामदेव ते तुकारामांसारख्या संतांनाही या अर्धप्रतिभेच्या घुसखोर लेखकांनी आपल्या रचना त्यांच्या नावावर खपवून असेच छळले आहे. त्यामुळे मूळ लेखकाचीच प्रतिमा आपण अकारण धुमिल करत आहोत याचे भान या लेखकांच्या लक्षात आलेले नसते किंवा त्या कृतीमागे अन्य काही कुटील हेतू असतो. असे असल्याने गतकाळातील साहित्याची चिकित्सा अधिक काटेकोरपणे करावी लागणार आणि मूळचे नेमके काय आहे हे ठरवावे लागणार हे निश्चितच आहे. महाराष्ट्रात अनेक संतसाहित्यात प्रक्षिप्त अभंगांची घालघुसड झाली असल्याचे लक्षात आल्यावर चिकित्सक शुद्ध आवृत्या प्रसिद्ध करण्याची गरज भासली. इतिहासाचेही आकलन त्यामुळे बदलण्यास मदत झाली. लल्लेश्वरीही याला अपवाद राहिली नाही. अनेक विद्वानांनी लल्लेश्वरीचेच असे मूळ काव्य तत्कालीन भाषा, शैली, प्रतिमा इत्यादीवरुन निश्चित करण्याचे अनेक प्रयत्न केले आहेत. शिवाय लल्लेश्वरीच्या असंख्य कविता 1975 पर्यंत तरी काश्मीर खोर्‍यातील लोकानी मुखोद्गत पद्धतीने जतन केलेल्या होत्या. त्यात कालौघात शब्दबदल होणेही शक्य होते. त्यात घालघुसड होणेही शक्य होते. त्यामुळे विद्वानांना लल्लेश्वरीच्या मूळ रचना, तिची शैली आणि मूळ भाषा शोधत संपादन करणे आवश्यक बनले होते.

    सर मार्क आरेल स्टीन यांना शारदा लिपीत लिहिलेल्या केवळ पंधरा कविता एका त्रुटीत हस्तलिखितात मिळाल्या होत्या. दुसरे एक हस्तलिखित सापडले त्यात लल्लेश्वरीच्या 49 रचना होत्या. 1920 साली ग्रियर्सनने लल्लेश्वरीच्या त्याला लिखित स्वरुपात झालेल्या रचनांचा अनुवाद प्रसिद्ध केला. त्या छापील स्वरुपात उपलब्ध नव्हत्या. त्या जमा करणे, मुखोद्गत ठेवताना नकळत होणारे बदल टिपने हेही एक मोठे आव्हान होते. लल्लेश्वरीच्या नावावर असलेल्या 228 कवनांपैकी केवळ 138 कवने लल्लेश्वरीची आहेत असे जयलाल कौल यांनी ठरवले होते. त्यात अजूनही अन्य स्त्रोतांतुन उपलब्ध झालेल्या आणि अस्सल ठरवण्यात आलेल्या कवनांचा समावेश होऊन 1975 मध्ये पहिल्यांदाच लल्लेश्वरी छापील माध्यमात अवतरली.

  • असे असले तरी तिला सुफी अथवा शैव गोटात ओढण्याचे प्रयत्न होतात. याचे कारण तिच्या काश्मिरी हृदयावर शतकानुशतके राज्य करण्याच्या अलौकीक शक्तीमुळे हे लक्षात घेतले पाहिजे. तसे पाहिले तर लल्लेश्वरी शिवभक्त होती. शिवयोगिनी होती पण तिने निवडलेला आध्यात्माचा मार्ग हा स्वतंत्र ओता. तिची अभिव्यक्ती सुफीवादासारखी गूढ असली तरी तत्त्वज्ञान स्वतंत्र होते. काश्मिरी मनांना धर्म वेगळे असले तरी भावनिक व सांस्कृतिकदृष्ट्या बांधुन ठेवण्याचे तिने अनमोल कार्य केले. अर्थात आपण असे काही कार्य करत आहोत याचे भान त्या उन्मुक्त योगिनीला असेल असे नाही. ती सहृदय आध्यात्मिक अंत:करणाने आपली अभिव्यक्ती करत गेली. अजरामर झाली. आज काश्मीरला समजावुन घ्यायचे असेल आणि काश्मिरींनाही समजवायचे असेल तर लल्लेश्वरीने प्रदीप्त केलेला शुद्ध अंत:करणाचा दीप आपल्या हाती असायला हवा!

    आमचे इतरही लेख वाचण्यासाठी, दर्जेदार पुस्तके विकत घेण्यासाठी www.chaprak.com ला भेट द्या. ‘चपराक प्रकाशन’चे फेसबुक पेजही जरूर लाईक करा. उत्तमोत्तम व्हिडीओ पाहण्यासाठी ‘चपराक’च्या युट्यूबला भेट द्या आणि सबस्क्राइबही नक्की करा.
    Copyright @ www.chaprak.com / All Rights Reserved.

    चपराक

    पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
    व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
    Email - Chaprak Email ID

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

हे ही अवश्य वाचा