स्वावलंबन आणि शिस्त

स्वावलंबन आणि शिस्त

Share this post on:

आपल्याला मिळालेलं हे सुंदर जीवन जगण्यासाठी स्वावलंबन आणि शिस्त जणू ‘प्राण’च आहेत. आपल्या रोजच्या जगण्यात स्वावलंबन नसेल तर आळसामुळे आपलं जगणं निरस झाल्याशिवाय राहणार नाही. तसंच आपल्या वागण्यात शिस्त नसेल तर या सुंदर जीवनाचा आपण पुरेपूर आनंद उपभोगू शकणार नाही! त्यामुळे स्वावलंबन आणि शिस्तीला आपल्या जीवनात अनन्यसाधारण महत्त्व आहे याबाबत कुणाचंही दुमत नसावं. 

आपल्या देशाचे तिसरे राष्ट्रपती होऊन गेलेले डॉ. झाकिर हुसेन हे शाळेत शिकत असताना त्यांना शिकवणारे शिक्षक सय्यद अल्ताफ हुसेन हे कडक शिस्तीबद्दल तेथे प्रसिद्ध होते. विद्यार्थ्यांना नीट वळण लागावं यासाठीच त्यांची शिस्त असायची. मुलांवर आदर्श संस्कार व्हावेत, त्यांनी स्वावलंबी बनावं यासाठी ते आग्रही होते. छोटा झाकिर लाडात आणि श्रीमंतीत वाढलेला होता. तसेच शाळेत न जाता त्यांनी घरी एका इंग्लिश मॅडमकडून प्राथमिक शिक्षणाचे धडे घेतले होते. त्यावेळी नुकतेच त्यांच्या वडिलांचे निधन झाले होते! मुळातच हुशार असलेले झाकिर हुसेन शिक्षकांच्या शिस्तीमुळे घडत गेले. शिक्षक सय्यद साहेब त्यांच्यातील गुणांची वाहवा करायचे. त्यांना वेळोवेळी प्रोत्साहन द्यायचे. त्यामुळे झाकिरवर शाळेपासूनच जीवनातील आदर्श संस्कार रूजले गेले. नंतर ते त्यांच्या पुढील आयुष्यात उपयोगी पडले.

आधीच्या काळात म्हणजे आधुनिक सुखसोयी सहजतेनं  उपलब्ध होण्यापूर्वी आपल्याकडे बहुतेकांचा स्वावलंबनाकडे ओढा होता. कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती आपापलं काम अगदी मन लावून करायची. घरातील पाणी भरणं, दूध आणणं, बाजारातून रोज लागणाऱ्या गरजेच्या वस्तू आणणं आणि इतर किरकोळ कामे स्वतः करण्यावर भर होता. परंतु आज परिस्थिती अशी आहे की माणूस नको तितका परावलंबी झाला आहे. त्यामुळे पालकच आळसपणा करत असतील तर त्यांची मुलंसुद्धा परावलंबी होणारच! आजकाल घरोघरी आपण बघतो, मुलांना सगळं कसं हातात हवं असतं. घरून अगदी चार पावलांवर जायचं असलं तरी त्यांना गाडी हवी असते. काही घरात तर स्वतः पालकच आपल्या मुलांचे ‘होमवर्क’ करून देताना दिसतात. हे कुठंतरी थांबायला हवं. आजच्या पिढीला पालकांनी तसंच शिक्षकांनी स्वावलंबनाचे धडे देणं हे कधी नव्हे इतकं आज नितांत गरजेचं झालं आहे.

‘आधी केले मग सांगितले!’ किंवा ‘केल्याने होत आहे रे, आधी केलेचि पाहिजे!’ या उक्तीनुसार पालकांनी स्वतःच्या कृतीतून स्वावलंबनाचा आदर्श आपल्या मुलांसमोर ठेवणं आजघडीला अत्यंत गरजेचं आहे. कारण मुलं ही अनुकरणप्रिय असतात. घरातील आईवडिल जसे वागतील,  त्याप्रमाणेच त्यांची मुलंही आचरण करणार हे निश्चित! आजची परिस्थिती जर बदलली नाही तर येणाऱ्या काळात आपल्याला खूप भयंकर समस्यांना सामोरं जावं लागणार आहे. त्यामुळे जास्त उशीर न करता आजच्या सुजाण पालकांनी आपल्या मुलांना स्वावलंबनाचं महत्त्व पटवून देणं, त्याचे फायदे त्यांच्या लक्षात आणून देणं हे आपलं आद्य कर्तव्यच समजायला हवं. तसंच त्याबाबतचं गांभीर्य ध्यानात घेऊन सतत पाठपुरावा करणं ही काळाची गरज आहे. त्यासाठी पालकांनी घरी असताना मुलांसमोर तरी आपला मोबाईल प्रयत्नपूर्वक स्वतःपासून दूर ठेवणं गरजेचं आहे. तसेच मुलांसमोर जास्त वेळ टीव्ही न बघता एखादं पुस्तक किंवा मासिक, वर्तमानपत्र वाचनात वेळ घालवला तर मुलंही उत्सुकतेनं तुमचं अनुकरण करतील. त्यासाठी निश्चितच पालकांना आपला वेळ द्यावा लागणार आहे. आपल्या मुलांकरीता तसा प्रयत्न करायला तरी हरकत नसावी!

एकदा का मुलांना स्वावलंबनाची सवय जडली की मग जगण्याला शिस्त लागायला वेळ लागणार नाही. पर्यायानं त्यांच्यात सकारात्मक वृत्ती वाढणार हे वेगळं सांगायला नको. त्यासाठी अगदी लहानपणापासूनच मुलांना योग्य वळण लावणं, निदान पालकांनी तसा प्रयत्न करणं आजच्या परिस्थितीत खूपच आवश्यक आहे. आपण बघतो, आजकाल घराघरात मुलं त्यांच्या अभ्यासासाठी रात्री उशिरापर्यंत जागतात आणि मग सकाळी उठायला त्यांना नऊ दहा वाजतात. उलट रात्री लवकर झोपून पहाटे उठणं कधीही चांगलं! कारण पहाटे केलेला अभ्यास जास्त चांगल्या प्रकारे लक्षात राहतो हा अनेकांचा अनुभव आहे. त्यासाठी मुलांना अगदी लहानपणीच सकाळी लवकर उठण्याची सवय ( शिस्त ) लावणं तसेच उठल्यावर स्वतःच्या पांघरूणाची घडी घालायला लावणं हे शिस्त लावण्याच्या दृष्टीने गरजेचं वाटतं. सुरूवातीला मुलांना थोडा कंटाळा येणार, नाही असं नाही मात्र हळूहळू मुलं मोठी झाली की त्यांच्या अंगी नीटनेटकेपणा आल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे आपली अभ्यासाची पुस्तकं, वह्या आणि इतर वस्तू नीटनेटकेपणानं जागच्या जागी ठेवणं, सकाळी शाळा असल्यास स्वतःच तयारी करणं, शाळेतून परत आल्यावर दप्तर, बूट वगैरे ठराविक जागीच ठेवणं अशा चांगल्या सवयींची शिस्त मुलांना क्रमाक्रमाने तरी लागणारच.  शिवाय त्यांना सकाळचा नाश्ता अन् दूध पिणं झाल्यावर स्वतःची कपबशी विसळणं, एखादा हातरूमाल धुणं, थोडं वय वाढल्यावर कपड्यांची इस्त्री करणं ही कामे सुद्धा त्यांना त्यांच्या कलाने करायला लावली तर ती स्वावलंबी होणारच आणि मग त्यांना शिस्त लागायला वेळ लागणार नाही! 

आजकाल बर्याच घरात एकुलतं एकच मूल असल्याचं बघण्यात येतं. त्यामुळे त्याची आवडनिवडही प्रमाणाबाहेर जपली जाते. त्याचे नको तेवढे लाड पुरवले जातात. जेवण किंवा काही खाण्याच्या बाबतीत ‘मूल म्हणेल तीच पूर्व दिशा’ असंही घराघरात आढळून येतं. मग हतबल झालेले पालक मूल मोठं झाल्यावर सुद्धा, ते हट्टी झाल्यानं त्याचे लाड पुरवतात. अशाप्रकारे त्या लाडोबाचेच ऐकत गेल्यास पालकांची अवस्था दयनीय व्हायला वेळ लागत नाही. हे सर्व थांबावं असं वाटणं साहजिकच आहे. मात्र त्यासाठी पालक स्वतः सद् वर्तनी असणं अत्यंत गरजेचं आहे. तेव्हाच ते आपल्या मुलांना अगदी लहानपणापासून सुसंस्कारित होण्याच्या दृष्टीने त्यांना छोट्याछोट्या गोष्टीतून शिस्त लावू शकतील. चांगल्या सवयी लावू शकतील. ‘आळस हा आपला पहिल्या नंबरचा शत्रु आहे’ हे मुलांच्या मनावर बिंबवू शकतील!

अशाप्रकारे मुलांना त्यांच्या लहानपणापासूनच योग्य वळण लागले तर त्यांना एकप्रकारची शिस्तही आपसूकच लागणार. मुलं स्वावलंबी झाल्यामुळे त्यांच्यात सकारात्मकताही वाढेल. पर्यायाने त्यांच्यात आत्मविश्वास जागृत झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळेच त्यांना जगण्याची योग्य दिशा लाभणार हे नक्की! मग सर्व दृष्टीने ‘मॅच्यूअर्ड’ झालेली ही मुलं आपल्या आईवडिलांसोबतच इतर थोरामोठ्यांचाही आदर राखतील हे वेगळं सांगायला नको. त्यांना आपल्या गुरूजनांबद्दल, समाजाबद्दल तसेच आपल्या देशाबद्दल प्रेम, जिव्हाळा वृद्धिंगत होत राहणार हेही ओघाने आलंच. त्याकरीता पालकांना आवश्यकता आहे … हे जीवन सुंदर बनवण्यासाठी मुलांना स्वावलंबन आणि शिस्त लावण्याची … आणि त्यासाठी स्वतःपासून सुरूवात करण्याची!!

विनोद श्रा.पंचभाई, वारजे, पुणे
भ्र.क्र.९९२३७९७७२५

Share this post on:

Author: चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email -

View all posts by चपराक >

3 Comments

  1. एका महत्त्वाच्या विषयावरील आपले अभ्यासपूर्ण विवेचन आवडले.

  2. माऊली मुलांच्या स्वावलंबी असण्याबद्दल आपण फार सुंदर विवेचन करून त्याचं महत्त्व पटवून दिले आहे. लेख आवडला, शुभेच्छा!

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

error: Content is protected !!