जागो मोहन प्यारे!

जागो मोहन प्यारे!

“एक मेसेज सध्या मोबाईलवर व्हायरल होतो आहे.

“महानगरपालिकेचे लोक पन्नास वर्षांपेक्षा अधिक वयाच्या लोकाच्या कोविड टेस्ट घ्यायला आले तर फक्त नकार द्या. ते म्हणतील की हे अनिवार्य आहे. कायदेशीर आहे. सोसायटीचा वॉचमन ‘सरकारी अधिकारी’ अशी बतावणी केली की ‘पॉश’ दिसणाऱ्या माणसाला काहीही न विचारता, काहीही चौकशी न करता सोसायटीमध्ये प्रवेश देतो.”
एक माणूस घरी येतो आणि म्हणतो, “मला तुमचा फोटो आणि अंगठ्याचा ठसा हवा आहे. तो आयुष्यमान भारत या योजनेसाठी घ्यायचा आहे.” त्याच्याकडे एक लॅपटॉप, बायोमेट्रिक मशीन आणि नावांची यादी असते. हे बोगस असू शकते. त्याला खातरजमा केल्याशिवाय माहिती देऊ नका.

असाच एक गट घरोघर फिरून ‘होम अफेअर्स ऑफिसर’ गृहखात्याचा किंवा आरोग्य विभागाचा असल्याचे नाटक करत आहे. त्यांच्याकडे गृह, आरोग्य मंत्रालयाची कागदपत्रे आहेत. तपासणीसाठी ओळखपत्र ही आहेत. ते घर लुटत आहेत.

सरकारकडून असा कोणताही पुढाकार घेतला जात नाही हे लक्षात घ्या. अशा टोळ्या सगळीकडे कार्यरत आहेत. हे लोक तरबेज आहेत. अधिकारी दिसतात. सर्वांना सावध करा. इतर ग्रुप्सवर ही माहिती पाठवा. वगैरे वगैरे…

‘सावध हरिणी सावध ग
करील कुणीतरी पारध ग’

सध्या कोविड १९ ने सगळीकडे थैमान घातले आहे. परराज्यातील कामगार सुरुवातीला या महामारीच्या भीतीपोटी आपापल्या राज्यात परत गेले. काय व्हायचे असेल ते आपल्या घरी होऊदे अशा विचाराने ते गेले. लॉकडाउनमुळे वाहतूक बंद होती. जिल्हा बंदी, राज्य बंदी अशा अडचणी ही होत्या पण घराच्या ओढीने कुटुंबाच्या ओढीने हे लोक आपापल्या राज्यात जाण्यासाठी धडपडत होते. शेवटी सरकारने या लोकांसाठी स्पेशल ट्रेन्स सोडल्या आणि या लोकाना त्यांच्या घरी पोचवण्यात आलं. लॉकडाउनमुळे काम बंद. दोन वेळा खायची भ्रांत अशी या हातावर पोट असणाऱ्या लोकाची अवस्था होती. काही दिवस सरकारने या लोकाची खाण्याची-पिण्याची सोय केली. काही सामाजिक संस्था पुढे आल्या. त्यांनी काही काळ या लोकाची खाण्यापिण्याची व्यवस्था केली. कशीबशी ही मंडळी परत गेली. कुटुंबियांसोबत काही दिवस काढल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की गावाकडे देखील तीच परिस्थिती आहे. मग ही मंडळी पुन्हा मुंबई-पुण्यासारख्या मोठ्या शहरात परत आली. रोजगार नाही, अन्न नाही अशा अवस्थेत जगण्यासाठी यातील काहींनी चोऱ्या माऱ्या, लूटमार अशा गोष्टींचा आधार घेतला आणि अगोदरच कोविडच्या महामारीने त्रस्त असलेल्या सामान्य जनतेला सतर्क, सावध राहण्याची वेळ आली. तशा वेगवेगळ्या माध्यमातून सूचना येऊ लागल्या. कोण, कोणत्या मार्गाने येऊन आपल्याला लुटेल यासाठी सजग राहण्याची वेळ आली. या कोविडच्या महामारीने, सामान्यांचे जीव वाचवण्यासाठी, संसर्ग वाढु नये म्हणून सरकारपुढे लॉकडाउनशिवाय पर्याय नव्हता. एवढी मोठी लोकसंख्या असलेल्या देशात लोकसंख्येच्या प्रमाणात हॉस्पिटल्स, डॉक्टर्स, नर्सेस यांचीही पुरेशी सोय होऊ शकत नाही. मृत्यूचे प्रमाण वाढु नये याची काळजी घेण्यासाठी लॉकडाउन हाच एकमेव पर्याय होता! ज्यामुळे उद्योग धंदे बंद झाले. हाताचं काम गेलं. हातावर पोट असणाऱ्यांना उपासमारीची वेळ आली. परिणामी गुन्हेगारी वाढली! चोर-भामट्यांपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी सामान्यांना सतर्क राहणं, जागरूक राहणं क्रमप्राप्त झालं!

आपल्यापैकी बऱ्याचजणांनी ‘पॅडमॅन’ सिनेमा पाहिला असेल. अरुणाचलम मुरुंगनंथम नावाच्या माणसाच्या खऱ्या आयुष्यावर हा सिनेमा आधारलेला आहे. तामिळनाडू मधील कोईम्बतूरचा अरुणाचलम याने स्वस्त सॅनिटरी नॅपकिन्स बनवण्याचे मशीन तयार केले आहे. सरकारने त्यांना पदमश्री बहाल करून त्यांनी स्त्रियांच्या आरोग्यासाठी केलेल्या कार्याचा गौरव केला आहे. स्त्रियांच्या आरोग्याविषयी जागरूक करणारा हा सिनेमा आहे. वर्षानुवर्षे खेड्यातच काय शहरात सुद्धा स्त्रियांच्या मासिकधर्माविषयी अनेक समज-गैरसमज प्रचलित आहेत. यावर मार्ग काढणं तर दूरच पण भाष्य करणं सुद्धा पाप समजलं जाई! महिला अस्वछ कपडा, राख, लाकडाचा भुस्सा वापरत. यामुळे महिलांना अनेक प्राणघातक रोगांना सामोरे जावे लागे. दोन हजार एक साली सॅनिटरी पॅडची जाहिरात टीव्हीवर लागली की लोक चॅनल बदलत आणि कोणी खोलात जाऊन विचारलंच तर ती जाहिरात साबण किंवा इतर कशाचीतरी आहे असं सांगून विषय बदलत! ग्रामीण भागात तर या गोष्टीला किळसवाणे व अपवित्र समजून महिलांना अस्पृश्या सारखे वागवले जाई. अशा वेळी सॅनिटरी नॅपकिन्ससारखा विषय हाती घेऊन त्याची तड लावणाऱ्या अरुणाचलम मुरुंगनंथमची ही कथा.

कमीतकमी खर्चात सॅनिटरी नॅपकिन्स महिलांना कसे मिळतील याविषयी चिंतन करायला लावणारा मुरुंगनंथम. महिलांच्या आरोग्याविषयी जागरूक करणारा मुरुंगनंथम! उपलब्ध माहिती नुसार २०१५-१६ च्या राष्ट्रीय कुटुंब आरोग्य अहवालानुसार ग्रामीण भागात केवळ आठ्ठेचाळीस टक्के महिलाच मासिक पाळीच्या काळात सॅनिटरी नॅपकिन्स वापरतात असे आढळून आले आहे. तर शहरात हे प्रमाण आठयाहत्तर टक्के इतके आहे. केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी २०१२ मध्ये एक योजना सुरू केली आणि ग्रामीण भागात सॅनिटरी नॅपकिन्सचा प्रचार व्हावा यासाठी १५० कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. या योजनेनुसार दारिद्र्य रेषेखालील महिलांना सॅनिटरी नॅपकिन्स प्रत्येकी केवळ एक रुपयांना दिले जातात. सरकारचे व सामाजिक संस्थांचे प्रयत्न चालू आहेतच तरीही अजूनही याविषयी जागरूकता निर्माण करण्याची गरज आहे. महिलांमध्ये नॅपकिन्स वापरण्याविषयीची मानसिकता तयार करण्याची गरज आहे. आरोग्याविषयी लिहिताना सध्याच्या कोरोना महामारीच्या काळात सर्वांनीच आपलं आरोग्य चांगलं ठेवणं गरजेचं आहे. ज्यामुळे प्रतिकारशक्ती वाढेल आणि कोरोनाच्या संसर्गापासून आपण दूर राहू शकू!

सध्या जागतिक मंदी आहे. त्यात कोरोनाने भर घातली आहे. उद्योग धंद्याची चाके मंदावली आहेत. लोकाच्या हाताला काम नाही. बऱ्याच लोकाच्या नोकऱ्या गेल्या आहेत. काहीजण अर्ध्या पगारावर काम करत आहेत. बँकातून कर्जाला उठाव नाही. सरकारी बँकेतील ठेवींवरील व्याजाचे दर कमी झाले आहेत. आणखी कमी होत आहेत. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांची परिस्थिती अवघड आहे. जी माणसे केवळ ठेवींवरील व्याजावर अवलंबून आहेत त्याना सहकारी पतसंस्था जास्त व्याजाचे अमिश दाखवतात. पण या सहकारी पतसंस्थांना ठेवींवरील विम्याचे संरक्षण नसते. पतसंस्थेच्या कामकाजात काही गडबड झाली की सरकार या सहकारी संस्थांच्या कामकाजावर बंदी आणते. या संस्था अवसायनात निघतात. खातेदारांना व्याज मिळणे बंद होते. ठेवीही अडकून पडतात. ठेवींचा विमा नसल्याने संस्थेकडून काहीच मिळत नाही! ‘व्याजाला सोकला आणि मुदलाला मुकला’ अशी अवस्था होते! याशिवाय ज्येष्ठ नागरिकांनी अनिश्चित उत्पन्न देणाऱ्या किंवा कधीकधी ते देखील न देणाऱ्या शेअर बाजारात व म्युच्युअल फंडस् मध्ये गुंतवणूक करण्याचे टाळावे. थोडक्यात सरकारी बँका, पंतप्रधान वय वंदन योजना ज्यासाठी एलआयसी मध्ये गुंतवणूक करता येते, पोस्टातील ठेवी व ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या सरकारी विशेष योजना या मध्येच गुंतवणूक करावी व सुखा-समाधानात आयुष्य घालवावे. थोडे व्याज कमी मिळाले तरी चालेल. पण मुद्दल सुरक्षित राहील! गुंतवणूक करताना जागरूक असावे! कोरोनापासून बचाव करण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांनी शक्यतो घरातच राहावे. बाहेर जाणे अनिवार्य असल्यास मास्क वापरावा, सोशल डिस्टन्स पाळावा, वरचेवर साबणाने किमान वीस सेकंद हात धुवावेत व आवश्यक तेव्हा सॅनिटायझर चा वापर करावा.

आणखी एक फसवा मेसेज किंवा मेल बक्षिसाचा येतो. “तुम्हाला अमुक अमुक लाखांचे (डॉलर किंवा पाउंड मध्ये) बक्षीस लागले आहे. बक्षीसाची रक्कम जमा करण्यासाठी कृपया आपला खाते नंबर व इतर डिटेल्स कळवा.” माणसाचा स्वभाव लालची झाला आहे. ज्याला मेसेज येतो त्याने थोडा विचार करावा की ‘मला कोण कशासाठी बक्षीस देईल?’ ‘बक्षीस मिळण्यासाठी मी काय विशेष पराक्रम केला आहे?’ वगैरे! पण असं होत नाही. दुर्दैवाने सुशिक्षित लोकसुद्धा आशा भामट्यांना आपल्या खात्याची माहिती कळवतात आणि बक्षिसाची वाट पाहत बसतात! महिना-दीडमहिन्यांनी आपल्या खात्यातील होती ती रक्कमही गेल्याचे निदर्शनास येते. मग पोलिसस्टेशनचे हेलपाटे सुरू होतात. फसवणूक झाल्याचे समजते! पोलिसांच्या सायबर सेलचे अधिकारी मेसेज किंवा मेलच्या मुळापर्यंत जाण्याचा प्रयत्न करतात. काही प्रकरणात यश मिळते. काही प्रकरणात अनुभव मिळतो! बक्षिसाच्या जाहिराती बाबत जागरूक असणे आवश्यक आहे! स्वस्थ बसून काहीही मिळत नसतं हे लहानपणापासून मनावर बिंबवायला हवं! प्रामाणिकपणे कष्ट करणे हाच एकमेव पैसे मिळवण्याचा राजमार्ग आहे!

आपण पेट्रोल पंपावर पेट्रोलसाठी रांगेत उभे असतो किंवा एखाद्या मॉल मध्ये प्रवेश करत असतो अथवा मॉल मधून बाहेर पडत असतो अशावेळी ‘आमच्या कंपनीचा लकी ड्रॉ निघणार आहे कृपया आपला फोन नंबर द्या’ असे सांगून तिथे उभे असलेले मार्केटिंग करणारे लोक आपला फोन नंबर घेतात. आपण गडबडीत असतो. वेळ वाचवण्यासाठी, किंवा त्या विचारणाऱ्या व्यक्तीची दया येते म्हणून आपण फ़ोन नंबर देऊन मोकळे होतो. त्या माणसापासून सुटका करून घेतो. फोन नंबर दिल्याचे कालांतराने आपण विसरूनही जातो. एक दिवस अचानक फोन येतो, ‘सर लकी ड्रॉमध्ये आपला नंबर आला आहे येत्या शनिवारी आपण गिफ्ट घेण्यासाठी या’ आपल्याला काही संदर्भ लागत नाही. मग समोरची व्यक्ती अतिशय नम्रपणे आपल्याला कुठे फोन नंबर घेतला वगैरे आठवण करून देते. त्या व्यक्तीच्या बोलण्याने आपण भारावून जातो. शिवाय बक्षीस म्हणून काहीतरी मिळणार आहे (फुकट!) यामुळे मनोमन आपण खूश झालेलो असतो. फोन ठेवताना ‘मॅडमना सोबत घेऊन या’ या गोड वाक्याने आपण आणखी खूश होतो. खूप दिवसात बायकोला बाहेर नेलेले नाही. गिफ्ट मिळणार असल्याने ती ही खूश होईल. खाण्या-पिण्याची (फुकट!) सोयही आहे. आपण आनंदात होकार देऊन मोकळे होतो.

ठरलेल्या दिवशी, ठरलेल्या वेळी दिलेल्या पत्त्यावर आपण पोचतो. सुंदर सजवलेल्या त्या रेस्टॉरंटवजा हॉलमध्ये आपलं स्वागत होतं. नटून थटून गेलेले आपण आणखी भारावून जातो. आपल्या सारखे इतरही ‘भाग्यवान’ तिथे पोचलेले असतात. बक्षिसाची उत्सुकता वाढलेली असते आणि मग निवेदक आपल्यासमोर त्या ट्रॅव्हल कंपनीची माहिती देतो. ‘आपल्यासारख्या भाग्यवंतांसाठी कंपनीने एक योजना आणली आहे. आमच्या कोणत्याही टूरमध्ये आपल्याला पन्नास टक्के कन्सेशन देण्यात आलेले आहे. टूरची निवड आपली. ‘बायको मागे लागते, करा ना बुकिंग किती वर्षात आपण बाहेर गेलेलो नाही.’ कंपनीचा हेतू सफल होतो. ‘गिफ्ट’च्या नावाखाली एक टूर आपल्या गळ्यात पडलेली असते. जाहीर केल्याप्रमाणे त्यात सेवा सुविधा नसतात. आपण लुबाडले गेलेलो असतो! तेव्हा अशाप्रकारच्या प्रलोभनांना बळी पडू नका. सतर्क व्हा, जागरूक व्हा!

हल्ली सगळं ‘ऑनलाइन’ असतं. साड्या, ड्रेस मटेरियल, अनेक गृहोपयोगी वस्तू, भेटवस्तू मुलं बसल्या बसल्या ऑनलाइन मागवतात. बऱ्याचवेळा पेमेंट ही ऑनलाइन केलेलं असतं. मग बातम्या आपण ऐकतो की, अमुक अमुक व्यक्तीला पार्सलमध्ये वस्तूच्या ऐवजी दगड आले किंवा मागितलेली वस्तू आलीच नाही. अशावेळी फसवणूक टाळण्यासाठी आपण ‘ग्राहक मंच’ किंवा ‘ ग्राहक न्यायालय’ यांचा आसरा घेऊ शकतो पण त्याबद्दल माहिती करून घ्यायला हवी. काही कंपन्यांची वस्तू परत घेण्याची सुद्धा तयारी असते पण ठराविक वेळात, ठराविक दिवसात ती वस्तू परत करावी लागते. ग्राहकराजाने जागृत व्हायला हवे!

लिफ्ट देण्या-घेण्याच्या बाबतीत ही असेच बरे वाईट अनुभव काहीवेळा येतात. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या लिफ्टसाठी हात करणाऱ्या व्यक्तीला आपण लिफ्ट देतो आणि पुढे गेल्यावर तो आपल्याला लुटतो किंवा आपण लिफ्ट मागतो आणि लिफ्ट देणारा आपल्याला लुबाडतो. अशा प्रकारच्या घटना घडलेल्या आपण पाहतो, ऐकतो आणि सुन्न होतो! मग कोणाला मदत करायचीच नाही का? असे प्रश्न पडतात. सगळीच माणसे वाईट नसतात. प्रसंग पाहून लिफ्ट द्यावी. उदा. अपघात झाला आहे, पेशंट तातडीने हॉस्पिटलमध्ये नेण्याची गरज आहे. तुमची सगळी कामे बाजूला ठेवा आणि पेशंट घेऊन जा. वेळेत पेशंट हॉस्पिटलमध्ये पोचला तर वाचण्याची शक्यता मोठया प्रमाणात असते. एक जीव वाचवा, तो व त्याचे कुटुंबीय तुम्हाला दुवा देतील! पण अनावश्यक लिफ्ट देण्यासाठी ट्रॅफिक अडवू नका. सिग्नल पाळण्या बाबत जागरूक राहा. अपघात कमी होतील. एकेरी रस्त्यावर विरुद्ध दिशेने गाडी चालवू नका. अपघाताचे प्रमाण कमी होईल. गाडी चालवताना मोबाईल वर बोलू नका. दुचाकीवरून जाताना हेल्मेट चा वापर करा. गाडी वळवताना इंडिकेटर दाखवा. स्वतःची काळजी घ्या, अनर्थ टाळा!

ए भाई जरा देखके चलो
आगे ही नही पिछे भी
दाये ही नही बाये भी
उपर ही नाही नीचे भी
ए भाई…

व्यापाऱ्यांकडून अनेक प्रकारची फसवणूक केली जाते. वजनात काटा मारणे, अन्न-धान्यातील भेसळ, डुप्लिकेट वस्तू विकणे आदी. ग्राहक म्हणून आपण जागरूक असायला हवं, सतर्क राहायला हवं. ग्राहक संरक्षण कायदा आपली मदत करू शकतो याचं जुजबी का होईना पण आपल्याला ज्ञान असायला हवं. आपण आपल्या हक्का साठी जसं जागरूक असायला हवं त्याच प्रमाणे आपण आपल्या जबाबदाऱ्या ही पार पाडायला हव्यात!

अलीकडे केजी व प्राथमिकचे शिक्षण उच्च शिक्षणापेक्षा महाग झाले आहे असे म्हटले तर अतिशयोक्ती होऊ नये! आणि कोरोनाचा संसर्ग वाढुनये म्हणून शाळा बंद आहेत. सध्या सर्वच शिक्षण घरातून ऑनलाइन पद्धतीने सुरु आहे. अगोदर मोबाईल फोन शाळेत नेण्यास परवानगी नव्हती, पण आता शाळाच मोबाईल मध्ये आली आहे! काळाचा महिमा अगाध आहे! परीक्षा घ्यायच्या की नाही. पूर्वीच्या मार्कांची सरासरी काढून मार्क द्यायचे का? परीक्षेच्या ठिकाणी कोरोनाचा संसर्ग होऊनये म्हणून अशा उपाययोजनांचा विचार सुरू आहे. याविषयी वेगवेगळ्या प्रकारची मतमतांतरे आहेत. जे काही ठरेल त्यात विद्यार्थ्यांचे भले व्हावे इतकेच!

परदेशात रस्त्यावर थुंकणे गुन्हा आहे. ही गोष्टी रसभरीत वर्णन करून आपण मित्रांना व कुटुंबियांना सांगतो. एखाद्याची कशी फजिती झाली. कुणाला कसा दंड भरावा लागला वगैरे वगैरे. पण परदेश वारी करून भारतात परत आल्यावर आपल्यापैकी अनेक जण विमानतळावर थुंकून भारतात परत आल्याचा आनंद साजरा करतात! तेव्हा तात्पर्य काय सुधारणा स्वतः पासून सुरू कराव्यात. आपला देश स्वच्छ व निरोगी ठेवणं ही आपलीपण जबाबदारी आहे. सरकारचे ‘स्वच्छता अभियान’ तेव्हाच यशस्वी होईल जेव्हा आपण स्वतःपासून त्याची सुरुवात करू! सध्याच्या कोरोना महामारीच्या संकटात सरकारी नियमांचे पालन करून स्वतः घराबाहेर पडूनये ज्यामुळे स्वतःचे संरक्षण तर होईलच पण इतरांनाही आपल्यामुळे संसर्ग होणार नाही. घराबाहेर जाणे अनिवार्य झाल्यास मास्क वापरावा, सोशल डिस्टनसिंग पाळावे, दिवसात जास्तीत जास्त वेळा प्रत्येक वेळी किमान वीस सेकंद हात साबणाने धुवावेत, घराबाहेर असताना सॅनिटायझर चा वापर करावा. आणखीन एक गोष्ट म्हणजे ज्याला कोरोना संसर्ग झाला आहे त्याला शारीरिक अंतर ठेवून सर्वतोपरी सहकार्य करावे. मानसिक दुरावा नसावा! वाळीत टाकू नये. जागरूक व्हा, सतर्क राहा, काळजी घ्या पण काळजी करू नका!

आपल्या सोसायटीमध्ये, जवळपास, आपल्या माहितीत कोणी समाजविघातक काम तर करत नाही ना? याची खबरदारी घ्या. आपल्या घरात भाडेकरू ठेवताना त्याची पूर्ण माहिती घेऊन, पोलीस व्हेरिफिकेशन करून मगच निर्णय घ्यावा. ज्यामुळे गुन्हेगारीला आळा बसेल. पोलिसांना गुन्हेगार शोधण्यासाठी मदत होईल.

मुलांना स्वावलंबी बनवा. त्यांची कामे त्यांना करू द्या. सध्या कोरोना च्या पार्श्वभूमीवर या गोष्टीचे महत्व अधोरेखित झाले आहे. लॉक डाऊनच्या काळात भांडी, धुणी, स्वयंपाक, केरफरशी या गोष्टी घरातच कराव्या लागल्या. ज्या घरातून पुरुषांना कामाची सवय होती त्या घरात महिलांना बऱ्यापैकी मदत होऊ शकली. पण ज्या घरातून पुरुषांना कामाची सवय नव्हती तेथील महिला कामाने पिचून गेल्या. मी एका आजींना आळशी मुलाचे कौतुक सांगताना ऐकले आहे. ‘तो आम्हाला सात मुलींनंतर झाला. नवसाचा आहे. लाडात वाढवलंय आम्ही त्याला. त्याला बिलकुल कामाची सवय नाही. एवढया मोठ्या बहिणी असताना का काम करेल तो? पायजमा काढला तरी दोन पाय तसेच ठेऊन जातो तो!’ ही अशी जर मुलं वाढवली, नको त्या गोष्टींचे कौतुक केले तर त्यांच्या होणाऱ्या बायकोचं मरणच आहे!

विनोदाचा भाग बाजूला ठेवला तरी अतिलाड वाईटच! पण सध्या मात्र बऱ्याच घरांमधून पुरुषांनी, मुलांनी कामे वाटून घेतली आहेत. घरातील कामाला हातभार लावला!

सगळ्यात मोठी लोकशाही असे बिरुद मिरवणाऱ्या आपल्या देशात साक्षरतेसाठी अजूनही प्रयत्न व्हायला हवेत. साक्षर नसलेली व्यक्ती कायद्याला घाबरते. आपल्या कायदेशीर हक्का बाबत जागरूक नसते. ही जागरूकता येण्यासाठी शिक्षण हवं!

खोट्या जाहिरातींपासून सावध राहा, व्यसनांपासून दूर राहा, आवश्यक कायद्यांची माहिती करून घ्या, पर्यावरणाची काळजी घ्या अन्यथा आपल्या मुलाबाळांना, नातवंडांना एक दिवस ऑक्सिजन सिलिंडर सोबत घेऊन शाळेत जावे लागेल, अशी वेळ आणू नका!

‘जागते रहो’ या हिंदी चित्रपटातील शैलेंद्र यांनी लिहिलेलं सलील चौधरी यांनी संगीतबद्ध केलेलं गान कोकिळा लता दिदींच्या आवाजातील पुढील गीत जागृती निर्माण करण्यासाठी उपयुक्त आहे. जागरूक राहिल्यास, सतर्क राहिल्यास जीवनात येणारी नवीन पहाट आशेचा किरण घेऊन येणार आहे हे नक्की!

जब उजियारा छाये
मन का अंधेर जाये
किरनोंकी रानी गाये
जागो हे, मेरे मन, मोहन प्यारे

जागी जागी रे सब कलियां जागी
नगर नगर सब गलियां जागी
जागी रे जागी रे जागी रे

जागो मोहन प्यारे, जागो
नवयुग चुमे नैन तिहारे
जागो, जागो मोहन प्यारे

जागी जागी रे सब कलियां जागी
नगर नगर सब गलियां जागी
जागी रे जागी रे जागी रे

भिगी भिगी अंखीयोसे मुसकाये
ये नई भोर तोहे अंग लगाये
बाहें फैला ओ दुखीयारे
जागो मोहन प्यारे

जिसने मनका दीप जलाया
दुनिया को उसने ही उजला पाया
मत रहना अखियोंके सहारे
जागो मोहन प्यारे

किरन परी गगरी छलकाये
ज्योत का प्यासा, प्यास बुझाये
फुल बने मनके अंगारे
जागो मोहन प्यारे

जयंत कुलकर्णी
दूरभाष : ८३७८०३८२३२

आमचे इतरही लेख वाचण्यासाठी, दर्जेदार पुस्तके विकत घेण्यासाठी www.chaprak.com ला भेट द्या. ‘चपराक प्रकाशन’चे फेसबुक पेजही जरूर लाईक करा. उत्तमोत्तम व्हिडीओ पाहण्यासाठी ‘चपराक’च्या युट्यूबला भेट द्या आणि सबस्क्राइबही नक्की करा.
Copyright @ www.chaprak.com / All Rights Reserved.

चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email - Chaprak Email ID

3 Thoughts to “जागो मोहन प्यारे!”

  1. अजित का. खोत

    👍🕵👌

  2. रविंद्र कामठे

    फारच छान आहे हा लेख.

  3. रमेश वाघ

    खूपच सविस्तर

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

हे ही अवश्य वाचा