स्वमायेचे आडवस्त्र लावूनि एकला खेळवी सूत्र

स्वमायेचे आडवस्त्र लावूनि एकला खेळवी सूत्र

परिपाठ झाला. हजेरी घेत होतो. माझ्या लक्षात आलं की ताई आजही गैरहजर आहे. मी तुझ्या शेजारच्या विद्यार्थ्याला विचारलं,” काय रे? ताई आज का नाही आली?”

तो म्हणाला,”त्या घरीच भांडुकली खेळतंय.”

एकदा गैरहजर राहायची सवय लागली की मुलांना शाळा गोड लागत नाही; म्हणून मी ताईच्या घरी गेलो. घरी कोणीच नव्हतं. ताई खेळत होती. स्वतःच स्वतःशी बोलत होती. त्यामुळे मी एकदम समोर न जाता वळचणीच्या आडोशाला उभा राहून तिचं बोलणं ऐकू लागलो. दगडाची चूल. दगडाची भाजी, दगडाचे ताट, दगडाची वाटी, दगडाचीच सर्व भांडी. माझ्या दृष्टीने ते दगड होते; पण तिच्या दृष्टीने मात्र तो तिचा संसार होता.

शेजारी छोटं बाळ अंथरुणावर टाकलेलं होतं. ते रडत होतं. त्याच्या रडण्याकडे मात्र तिचं लक्ष नव्हतं. थोडा वेळ मी तिची बडबड ऐकली. खेळ बघितला. हळूच समोर गेलो.

“कहावंssताई कहा साळंत नाही येस?” मी म्हणालो.

ताई म्हणाली, “मालं बाळदी राखला हाये, पोर्याघेयालं.आईशी गेल्याय माळात. तेलं घ्याया कोणी नाही, तहा मालं घरी ठवला.”

“ठीक आहे; पण ते बाळ तर रडतंय आणि तू तर खेळण्यांमध्ये दंग आहेस.” मी म्हणालो.

तिचा चेहरा ओशाळला. माझाही नाईलाज झाला. तिला तसंच घरी सोडून, मी परत आलो.

लहान मूल म्हणजे छोटं माणूस असतं आणि आणि मोठं माणूस म्हणजे मोठं मूल असतं. हे किती खरं आहे नाही! आपण तरी काय वेगळं करत असतो? ज्या गोष्टी खोट्या आहेत त्यांना खरं म्हणतो. दगडगोटे हा तिचा संसार. गाडी, बंगला, पद, पैसा प्रतिष्ठा हा आपला! यातच आपण रममाण होतो. त्यातच आपल्याला आनंद मिळायला लागतो. हे जगण्याचं साधनच जगण्याचं साध्य बनून जातं. ज्या गोष्टी आपल्या सेवकाप्रमाणे असाव्यात त्यांना आपण आपला स्वामी बनवून टाकतो. त्यामुळे आपला जीवनहेतू मात्र हरवून जातो. परिणामी सुखदु:खाचं चक्र सुरू होतं.

वास्तविक कोणतीही बाह्य गोष्ट आपल्याला सुख किंवा दुःख देऊ शकत नाही. सुख किंवा दुःख हे आपल्या अंत:करणातच असतं. ते फक्त या गोष्टींच्या उद्दीपनाने मनाच्या पृष्ठभागावर येतं. उदाहरणार्थ रस्त्यावर जाताना-येताना रोज घडणारे अपघात आपण पाहतो. रस्ता आहे म्हणजे अपघात होणारच घडणारच असं म्हणून आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. आपल्या मनावर त्याचा काहीही परिणाम होत नाही; पण जर त्या अपघातांमध्ये आपला जवळचा मित्र, नातेवाईक कुणी सापडलं तर? मग मात्र आपल्या घशाला कोरड पडते. अंगावर काटा येतो. घाम फुटतो. जेवण करायची इच्छा होत नाही. सगळं विश्व 360 अंशामध्ये फिरल्याचा भास होतो. याचा अर्थ काय झाला? घडणाऱ्या घटनेचा जेव्हा माझ्याशी संबंध असतो तेव्हा ती माझ्यावर परिणाम करते, अन्यथा नाही.

सिनेमा बघत असताना जोपर्यंत आपण सिनेमामधलं सगळं खोटं आहे किंवा कुठलाही सुंदर सीन बघत असताना त्याचे चित्रीकरण कसं केलं असेल, कॅमेरा कुठे ठेवला असेल किंवा हा शॉट कसा केला असेल याचा विचार करतो तेव्हा आपण सिनेमापासून अलिप्त असतो त्यामुळे त्याचा मनावर काहीच परिणाम होत नाही. याउलट सिनेमा खरा आहे. तो आपल्या जीवनातल्या कहाणीशी कुठेतरी संबंध सांगतोय असं म्हणून आपण बघतो त्या वेळेस सिनेमातला दुःखद प्रसंग पाहून आपल्या डोळ्यांमध्ये पाणी उभं राहतं. सुखद प्रसंग पाहून सुख होतं.

अशी कितीतरी उदाहरणं देता येतील. अपघातामुळे दुःख होत असेल तर ते कुठल्याही अपघातामुळे कुठल्याही व्यक्तीला सारख्याच प्रमाणात व्हायला पाहिजे; पण तसं होत नाही. जर मृत्यूमुळे होणारं दुःख सारखं असेल तर कुठल्याही मृत्यूमुळे व्यक्तीला होणारं दुःख सारखं असलं पाहिजे. सिनेमामुळे आनंद होत असेल तर कुठल्याही व्यक्तीला तितकाच आनंद व्हायला पाहिजे; पण तसे होत नाही त्याला कारण हेच आहे की प्रत्येकाच्या आनंदाची तीव्रता किंवा दुःखाची तीव्रता ही त्या व्यक्तीच्या त्या गोष्टीशी असणाऱ्या संबंधावर अवलंबून असते. हा संबंध आपण त्या गोष्टीकडे कोणत्या दृष्टीकोनातून पाहतो यावर अवलंबून असतो.

याच गोष्टीचा विसर आपल्याला पडतो. त्यामुळे आपण वेळोवेळी दुःखी किंवा सुखी होत असतो. त्याचा परिणाम मात्र शरीरावर होतो. वाजवीपेक्षा जास्त दुःख करत बसलं, वाजवी पेक्षा जास्ती राग आला, वाजवीपेक्षा जास्त आनंद झाला तर वेगवेगळ्या प्रकारचे हार्मोन्स शरीरामध्ये स्त्रवतात. त्यामुळे कोणाचा रक्तदाब वाढतो, कोणाची साखर वाढते, कोणाचं वजन नियंत्रणात राहत नाही.

सगळ्या गोष्टी विपरीत ज्ञानामुळे घडतात. दगडाच्या वस्तूंना किंवा प्रत्यक्ष दगडांना संसार मानणं हे जसे विपरीत ज्ञान आहे, तसं या गोष्टींच्या सहाय्याने आपलं जगणं सुसह्य झालं. त्या गोष्टी म्हणजेच आपल्या जीवनाचे साध्य आहे. त्यासाठीच माझं जीवन आहे. त्यासाठीच सगळा आटापिटा असं जर आपण मानत असू तर तेसुद्धा विपरीत ज्ञान आहे.

आमची ताई बाळ सांभाळायचं मुख्य काम बाजूला सोडून खेळण्यात दंग होते. तसं आपण आपल्या जीवनाचा मूळ हेतू हरवून कृत्रिम सुख दु:खांना कवटाळून बसतो. वास्तविक मानवी जीवनाचा हेतू असा आहे की, जगामध्ये जी माणसं सद्विचारांपासून दूर आहेत, जी माणसं भगवंतापासून दूर आहेत, जी माणसं ज्ञानापासून वंचित आहेत त्यांच्यापर्यंत विचार, ज्ञान आणि देव घेऊन जाणं. तुकाराम महाराज म्हणतात “आम्ही वैकुंठवासी | आलो याचि कारणासी | बोलिले जे ऋषी| साच भावे वर्तावया ||” पण असं वर्तन मात्र आमच्या हातून घडत नाही. आम्ही आमची दुःख कुरवाळत बसतो. त्याचा परिणाम म्हणून त्या दुःखामध्ये वाढच होते. घट मात्र कधी होत नाही. आम्ही आमच्याच कोशांमध्ये गुंग राहतो.

भगवान गीतेत सांगतात, “अज्ञानावृत्त ज्ञानम् तेनं मुह्यन्ति जन्तव:” आमच्या ज्ञानावर आज्ञानाचं आवरण आहे. त्यामुळे आम्ही मोहित होतो आणि अशा प्रकारचं भ्रममय जीवन जगत असतो. आमचे शंकराचार्य सांगतात, “चिदानंद रुप: शिवोहम् शिवोहम्” प्रत्येकजण शिवस्वरूप आहे. फक्त त्या स्वरूपाचा विसर पडल्यामुळे आपण या संसार रुपी रहाटगाडग्यामध्ये फिरत असतो. श्रीकृष्ण भगवद्गीतेमध्ये सांगतात, “यंत्रारूढानि मायया”

आपला भौतिक संसार, संबंध, नाती, एकमेकांविषयीचे समज गैरसमज चिरकालीन नसतात. ही सगळी त्या किमयागाराची नेपथ्य योजना असते. या नाटकाचा निर्माता, दिग्दर्शक तो एकमेव! आपल्याकडे त्या नाटकाचं स्क्रिप्टही नसतं. ती फक्त त्या लीलाधराची लीला असते. आपण त्या लीला लाघवातील फक्त एक पात्र असतो. नटाने अभिनय करताना हे तात्पुरतं आहे याचं भान कायम ठेवणं आवश्यक आहे. नाटकातील पत्नी जर खरी पत्नी मानून तो वर्तन करील तर काय घोळ होईल याचा विचार करा. हसू आलं ना! हा घोळ मात्र आपण नित्यनेमाने करत असतो. म्हणूनच सगळा घोळात घोळ आहे.

भावार्थ दीपिकेत माऊली हीच गोष्ट अनेक उदाहरणांच्या साहाय्याने आपल्याला समजावतात. ते म्हणतात, ‘स्वमायेचें आडवस्त्र । लावूनि एकला खेळवी सूत्र ।बाहेरी नटी छायाचित्र । चौर्याशीं लक्ष ॥’ याची जाणीव ज्याला होते त्याला साक्षात्कार झाला असं म्हणतात. हा साक्षात्कार जेव्हा प्रत्येकाला होईल तेव्हा ‘देह देवाचे मंदिर आहे आणि त्या देहामध्ये बसणारा जो आत्मा आहे तोच पांडुरंग आहे’ याची प्रचिती आपोआपच येईल. गीतेमध्ये भगवान सांगतात, “ईश्वर: सर्वभूतानां हृदस्येर्जुन तिष्ठति ” सगळ्यांच्या अंत:करणामध्ये ईश्वर बसलेला आहे. याचा साक्षात्कार होईल तेव्हाच जीवनामध्ये ‘आनंदाचे डोही आनंद तरंग’ निर्माण होतील.

रमेश वाघ, नाशिक 
९९२१८१६१८३

आमचे इतरही लेख वाचण्यासाठी, दर्जेदार पुस्तके विकत घेण्यासाठी www.chaprak.com ला भेट द्या. ‘चपराक प्रकाशन’चे फेसबुक पेजही जरूर लाईक करा. उत्तमोत्तम व्हिडीओ पाहण्यासाठी ‘चपराक’च्या युट्यूबला भेट द्या आणि सबस्क्राइबही नक्की करा.
Copyright @ www.chaprak.com / All Rights Reserved.

चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email - Chaprak Email ID

5 Thoughts to “स्वमायेचे आडवस्त्र लावूनि एकला खेळवी सूत्र”

  1. रविंद्र कामठे

    लईच भारी रमेश

  2. Vinod s. Panchbhai

    व्व्व्वा! वाघ सर,
    संतांचे समर्पक दाखले देऊन तुम्ही जीवनाचं तत्त्वज्ञान अतिशय सुंदर रीत्या
    सोप्या भाषेत सांगितलं!

  3. हेमंतकुमार देविदास भोये

    अप्रतीम…….. जीवनाचा उद्देश काय हे समजून घ्यायला हा लेख मार्गदर्शनपर आहे….

  4. Santosh

    खूपच सुंदर सर

  5. Pratap

    खूप सुंदर वाघ सर

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

हे ही अवश्य वाचा