डिजीटल मार्केटिंग एक जादुई दुनिया (भाग २)

डिजीटल मार्केटिंग एक जादुई दुनिया (भाग २)

Share this post on:

‘डिजीटल मार्केटिंग’ या विषयावरील पहिल्याच लेखाला ‘चपराक’च्या वाचकांनी भरभरून उत्स्फूर्त आणि उदंड प्रतिसाद दिला. त्याबद्दल मी ‘चपराक’च्या वाचकांच्या ऋणात आहे. जगात अवघड असं काही नसतं फक्त ते सोपं करून समजून घ्यायला हवं, ‘डिजीटल मार्केटिंग’ या अवघड वाटणाऱ्या विषय सोपं करून सांगण्याचा या लेखमालेतून प्रयत्न आहे.

या लेखमालेतील पहिला लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

डिजीटल मार्केटिंग : एक जादूई दुनिया (भाग १)

या लेखमालेतील दुसऱ्या लेखाला सुरुवात करण्यापूर्वी मला एका गोष्टीबद्दल आवर्जुन सांगावे लागणार आहे. फेसबुक किंवा अन्य कोणतीही सोशल मिडिया किंवा डिजीटल मार्केटिंगची सुविधा देणारी कंपनी कोणत्याही वाचकाचे नाव, गाव, फोन नंबर किंवा ई-मेल त्या युजरच्या परवानगी कोणासोबतही शेअर करत नाही. मात्र, त्या व्यक्तीची अभिरूची, स्वारस्य, त्याच्या डिजीटल ऍक्टिव्हिटी इत्यादीबाबत माहिती शेअर करण्याबाबतचा करार ज्याला Disclaimer म्हटले जाते, तो त्याने संबंधित कंपनीची सेवासुविधा वापरण्यापूर्वीच आपल्याकडे मान्य (डिजीटली मान्य) करून घेतलेला असतो. याचाच अर्थ असा की, तुम्ही ज्यावेळी फेसबुकवर तुमचे नवीन खाते उघडता किंवा उघडले असेल त्यावेळीच तुम्ही फेसबुकवर शेअर केलेली माहिती जाहिरातदारांना जाहिराती दाखविण्यासाठी वापरली जाईल, असे आपल्याकडून मान्य करून घेतलेले असते. आपण फक्त ‘I Agree’ शेजारीला चेक बॉक्सला क्लिक करतो आणि पुढे जातो. मात्र, तो चेक बॉक्स म्हणजे आपण आपली माहिती हस्तांतरित करत असल्याचा करार असतो.

मागील लेखात तीन उदाहरणे दिली होती. त्यापैकी पहिली दोन उदाहरणे पाहण्याआधी तिसरे उदाहरण पाहूयात. यावर्षी एप्रिल, मे महिन्यात कोकणातील कोकणबाग या शेतकरी समूहाच्या आंब्याची विक्री करायची होती. त्यासाठी डिजीटल मार्केटिंगमधील एक अत्यंत अनोखा, अभिनय प्रयोग यशस्वी झाला. सर्वांत प्रथम त्यांनी ‘हापूस आंबा होलसेल विक्रीसाठी उपलब्ध!’ अशी जाहिरात केली. योगयोगाने लॉकडाऊनचा काळ असल्याने या पहिल्याच जाहिरातीला उदंड प्रतिसाद मिळाला. त्यानंतर सोलापूर, औरंगाबाद, नांदेड वगैरे शहरांमधून १०० पेट्या (१ पेटी = ४ डझन), २०० पेट्या अशी ऑर्डर मिळाली. दरम्यान रत्नागिरीतील आंबाबागेपासून आंबे व्यवस्थित पॅक करून २०० किलोमीटरपेक्षा अधिक दूर पाठवताना केवळ १०० पेट्यांची ऑर्डर देणं परवडणारं नव्हतं. कारण त्यासाठी वाहतुकीचा खर्चच अधिक होता. किमान ५०० पेट्या ऑर्डर असेल तरच स्वतंत्र वाहनाने आंबे पाठवणे परवडणारे होते. त्यामुळे समजा औरंगाबादची १०० पेट्यांची ऑर्डर फिक्स झाली. त्यानंतर त्यांनी रत्नागिरी ते औरंगाबाद या मार्गावर जे जे छोटी-मोठी शहरे आहेत त्या शहरामध्ये, छोट्या-मोठ्या व्यावसायिकांनाच दिसेल अशी नवी जाहिरात प्रसिद्ध केली. अखेर रत्नागिरीहून औरंगाबादला जाणाऱ्या मार्गावरील वेगवेगळ्या शहरात ५०, १००, १५० अशा पेट्यांची ऑर्डर मिळत गेली आणि अखेर ५०० पेटींची गाडी अवघ्या ४८ तासात रवाना झाली. अशा पद्धतीने या समूहाने लॉकडाऊनच्या काळात संपूर्ण महाराष्ट्रात ५० लाख रुपयांच्या आंब्याची विक्री केली. विशेष म्हणजे लॉकडाऊनच्या काळात ज्यांचे व्यवसाय शब्दश: ठप्प झाले आहेत अशा हेअर सलून व्यावसायिक, मंगलकार्यालय व्यावसायिक, बँडवाले, टूर्स ॲण्ड ट्रॅव्हल्स सेवा देणाऱ्या छोट्या मोठ्या कंपन्या अशा तब्बल ४० हून अधिक नव्या व्यावसायिकांना आंबा विक्रीची संधी देऊन थोडासा आर्थिक आधार देण्याचा प्रयत्न केला. लॉकडाऊनच्या काळात हा कोकणातील आंबा विक्रीचा सर्वांत अभिनय, यशस्वी आणि अत्यंत प्रभावी प्रयोग असल्याचे मानले गेले. विशेष म्हणजे हे जाहिरात धोरण तयार करणे आणि त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यात माझा स्वत:चा सक्रिय सहभाग होता, हे ‘चपराक’च्या वाचकांना सांगताना मला आनंद होत आहे.

पुन्हा एकदा मला सांगावेसे वाटते की, तुम्ही फेसबुक किंवा अन्य कोणत्याही माध्यमातून जे काही पोस्ट करता, शेअर करता, लाईक करता, कमेंट करता किंवा फक्त व्हिडिओ वगैरे पाहत असाल तरीही प्रत्येक क्लिकची माहिती अशा कंपन्यांकडून यांत्रिकपद्धतीने संकलित केला जाते. त्यावरून तुम्हाला काय आवडतं, तुमचं स्वारस्य काय आहे, तुमची विचारधारा कोणती आहे त्याचे यांत्रिक आराखडे बांधले जातात. त्यातून तुम्हाला काय आवडेल, तुमच्या विचारधारेशी सुसंगत कंटेंट तुम्हाला जास्तीत जास्त कसा दिसेल आणि पर्यायाने तुम्हाला सगळं काही अगदी छान सुरळित चाललं आहे, वाटून तुम्ही फेसबुक किंवा अन्य संबंधित संकेतस्थळच छान आहे असं समजून याच माध्यमावर जास्तीत जास्त वेळ कसे टिकून रहाल, जास्त वेळ घालवाल यासाठीच ही सगळी सर्वाधिक परिश्रम घेत असतात.

ही माहिती कोणत्या स्तरावर संकलित केली जाते याचे काही उदाहरणे मुद्दाम देतो. ही माहिती फेसबुकच्या ऍडस मॅनेजरमधून Potential Reach यावरून संकलित केली आहे. ही तंतोतंत जुळणारी नसली तरीही वास्तवाच्या अगदी जवळ पोहोचणारी आहे. ही माहिती केवळ अभ्यासाच्या हेतूने संकलित केली आहे. उदाहरण म्हणून पुणे शहराची माहिती येथे देत आहे –

• पुण्यामध्ये एकूण ५५ लाख फेसबुकचे युजर्स आहेत.
• पुण्यातील एकूण फेसबुक युजर्सपैकी २१ लाख युजर्स हे ‘हिंदुत्ववादा’त स्वारस्य असणारी आहेत.
• पुण्यामध्ये टू जी इंटरनेट कनेक्शन वापरून फेसबुकचा वापर करणारे ७१०० युजर्स आहेत.
• पुण्यातील अलिकडेच नवा फोन घेऊन त्यावर फेसबुक वापरणारे २ लाख २० हजार युजर्स आहेत.
• पुण्यामध्ये १७०० घटस्फोटित व्यक्ती (स्त्री व पुरुष) फेसबुक वापरतात.
• पुढील ३० दिवसात पुण्यातील १२००० जोडपे आपला लग्नाचा वाढदिवस साजरा करणार आहेत.
• पुण्यातील ९९ हजार फेसबुक युजर्स पुढील आठवड्यात आपला वाढदिवस साजरा करणार आहेत.
• पुण्यामध्ये ६० वर्षांहून अधिक वयाचे तब्बल १ लाख ६० हजार युजर्स फेसबुक वापरतात.

बघा, वरीलपैकी किती माहिती आपण स्वत:हून फेसबुकला शेअर करतो आणि किती माहिती फेसबुक स्वत:हून आपल्या माहितीवरून संकलित करतो. ही सर्व माहिती फेसबुकला जे लोक जाहिरात देतात त्यांना उपलब्ध असते. त्यावरून जाहिरातीला किती प्रतिसाद मिळेल हे ठरते.

चला, पुढील मंगळवारपर्यंत तुम्ही या माहितीवर विचार करा. मी थांबतो. मात्र, पुढील लेखात हे नेमकं घडतं कसं त्याबद्दल चर्चा करूयात.

व्यंकटेश कल्याणकर 
७७९८७०३९५२

आमचे इतरही लेख वाचण्यासाठी, दर्जेदार पुस्तके विकत घेण्यासाठी www.chaprak.com ला भेट द्या. ‘चपराक प्रकाशन’चे फेसबुक पेजही जरूर लाईक करा. उत्तमोत्तम व्हिडीओ पाहण्यासाठी ‘चपराक’च्या युट्यूबला भेट द्या आणि सबस्क्राइबही नक्की करा.
Copyright @ www.chaprak.com / All Rights Reserved.

Share this post on:

Author: चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email -

View all posts by चपराक >

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

error: Content is protected !!