डिजीटल मार्केटिंग : एक जादूई दुनिया (भाग १)

ही तीन उदाहरणं बघा –

01
बारामतीतील एक तरुण. लॉकडाऊनमुळे मोठा व्यवसाय ठप्प पडलेला. करायचं काय? घरात शेती. नातेवाईकांची शेती. शेतीत बऱ्यापैकी भाज्या घेतलेल्या पण लॉकडाऊनच्या काळात भाजी विकणार तरी कुठे आणि कसे? मित्राच्या सल्ल्यानं त्यानं डिजीटल मार्केटिंगचा पर्याय निवडला आणि अवघ्या आठ दिवसात त्याला तीन दुकानात मासिक किमान ८० हजार रुपयांच्या भाजीची कायमस्वरुपी ऑर्डर मिळाली. त्याचा उत्साह शतपटीने वाढला.

02
समीर. एक अत्यंत कष्टाळू, कल्पक, सर्जनशील तरुण. नोकरी आणि छपाईची स्वत: कंत्राटं घेऊन पूर्ण करणारा जिद्दी मुलगा. काहीतरी सर्जनशील करायचं. यातूनच त्याला गणपतीचे सजावटीचे पर्यावरणपूरक मखर करायची कल्पना सुचली. त्याप्रमाणे त्यानं केलेही. लॉकडाऊनचा काळ असल्यानं लोकं खरेदी करतील की नाही ही भीती. म्हणून गुंतवणूक करायची की नाही ही चिंता. अखेर मित्राच्या सल्ल्यानं त्यानं डिजीटल मार्केटिंग करून मार्केटचा कल जाणून घेतला. अवघ्या दोन दिवसात त्याला ६० हजार रुपयांच्या मखरांची ऑर्डर मिळाली. उत्साह शतपटीनं वाढला.

03

लॉकडाऊनच्या काळात कोकणातील शेतकरी हवालदिल झालेले. आंबा उत्पादन तर चांगलं झालेलं मग ही सगळी आंबे विकायला कुठं पाठवायची. मार्केट बंद. मग या शेतकऱ्यांच्या ‘कोकणबाग’ या शेतकरी समूहाने डिजीटल मार्केटिंगचा मार्ग अवलंबला आणि अवघ्या ४५ दिवसात त्यांनी ५० लाखांपेक्षा अधिकचे आंबे संपूर्ण महाराष्ट्रात विक्री केले.

आजपर्यंत डिजीटल मार्केटिंग वगैरे गोष्टी आपण वाचल्या असतील आणि थिअरीमध्ये शिकल्या असतील. मात्र, वरील उदाहरणांवरून त्याचा प्रॅक्टिकल वापर कसा आणि किती मोठ्या प्रमाणात करता येऊ शकतो हे सहजपणे समजेल. वरील तीनही उदाहरणं आपल्यापासून फार दूर नव्हे तर आपल्या महाराष्ट्रातील आहेत. खरं सांगायचं तर वरील तीनही उदाहरणं ही माझ्या जवळच्या मित्रांचीच आहेत. बघा, फेसबुकचा आणि तत्सन अन्य माध्यमांचा किती जबरदस्त वापर करून आपण आपला उद्धार करून घेऊ शकतो. त्यामुळेच तर डिजीटल मार्केटिंग मला एक जादूई दुनियाच वाटते.

खास ‘चपराक’च्या वाचकांना डिजीटल मार्केटिंगबद्दल विशेषत: फेसबुकबद्दल माहिती असायल्या हव्यात अशा काही बेसिक गोष्टी सांगण्यासाठी या लेखाचा प्रपंच मी मांडला आहे.

लॉकडाऊननंतरचं जग बदललं आहे. मास्क, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टन्सिंच्या नव्या जगात आपण जगत आहोत. व्यवहारात खंड पडल्याने अर्थचक्राची गती मंदावली आहे. थोडक्यात व्यवसाय-उद्योगाच्या ग्राहकांवर विपरित परिणाम झाला आहे. दुकाने, उद्योग, व्यवसाय हळूहळू सुरु होत असले तरीही पूर्वीप्रमाणे किंवा किमान अपेक्षित ग्राहक मिळणेही कठीण होत आहे. अनेकांनी आपले व्यवसाय बदलले. अनेकांनी शक्य त्या सर्व जीवनावश्यक आणि मागणी असलेल्या वस्तूंच्या विक्रीचा व्यवसाय स्वीकारला. पण ग्राहकांपर्यंत पोहोचताना त्यावरही काही मर्यादा आहेतच.

या सर्व पार्श्वभूमीवर अपेक्षित ग्राहकांच्या घरात जाऊन आपल्या उत्पादन-सेवेची जाहिरात करणे अनिवार्य बनत चालले आहे. अर्थातच सामाजिक अंतर पाळूनच. म्हणजे काय तर अपेक्षित ग्राहकांच्या डिव्हासेसमध्ये (स्मार्ट फोन किंवा लॅपटॉप किंवा डेस्कटॉप किंवा टॅब) आपली जाहिरात दाखवायची. हेच तर डिजीटल मार्केटिंग. आणि फेसबुक हे आजच्या घडीचं डिजीटल मार्केटिंगमधील सर्वांत प्रभावी माध्यम आहे.

आपल्यापैकी बहुतेकजण फेसबुक वगैरे माध्यमं मनोरंजनाची (किंवा टाईमपासची) साधनं म्हणून वापरतात. मात्र, याच माध्यमाचा वापर करून आपण आपला व्यवसाय वाढवू शकतो हे आपल्यापैकी अनेकांना माहिती नाही.

हे बघा फेसबुकची व्याप्ती किती मोठी आहे –

१) तुम्ही ज्यावेळी एक श्वास तुमच्या शरीरात घेता त्यावेळी फेसबुकच्या खात्यात भारतीय रुपयांमध्ये पाच लाख रुपये जमा झालेले असतात.

२) जगभरातील एकूण २७० कोटी माणसं फेसबुक वापरतात.

३) एवढी मोठी उलाढाल असूनही फेसबुकमध्ये केवळ ५० हजारपेक्षा कमी लोकं काम करतात.

४) फेसबुकवर दर सेकंदाला जगभरातील वेगवेगळ्या देशातील युजर्स मिळून तब्बल ४००० फोटो अपलोड करतात.

आता हे सगळं तुम्हाला मोफत का मिळतं ते बघा. म्हणजे चित्र आणखी स्पष्ट होईल –

१) तुम्ही जे काही फेसबुकवर अपलोड करता जसं की, स्टेटस अपलोड करणे, पोस्ट लिहिणं, फोटो किंवा व्हिडिओ शेअर करणं, वेगवेगळ्या पेजेस किंवा पोस्टला लाईक किंवा कमेंट किंवा शेअर करणं वगैरे वगैरे. अशा सगळ्या बारीक-सारीक गोष्टींची फेसबुक स्वत:कडे नोंद ठेवतं.

२) वरील सर्व माहिती संकलित केल्यानंतर तुमच्या जीवनात काय घडतं, तुमची विचारसरणी कोणती आणि कशी आहे, तुमचं व्यक्तिमत्व कसं आहे याचे काही प्राथमिक अंदाज फेसबुकचे सॉफ्टवेअर्स बांधतात. हे सगळं कोणी माणसं करत नाहीत तर माणसांनी तयार केलेले सॉफ्टवेअर्स करतात.

३) तुम्हाला ज्या काही जाहिराती फेसबुकवर दिसतात त्या वरील माहिती संकलित करून तुम्हाला दाखविल्या जातात. फेसबुकवर जाहिरात देणाऱ्या जाहिरातदारांना तुमची माहिती (नाव, गाव, फोन नंबर, ईमेल नव्हे तर तुमची अभिरूची, तुमची आवड, तुमचं स्वारस्य इत्यादी) शेअर केली जाते.

४) तुम्हाला स्वारस्य असलेल्या जाहिराती तुम्हाला दाखविल्याने जाहिरातदारांकडून फेसबुकला उत्पन्न मिळते. हे उत्पन्न म्हणजे फेसबुकच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत आहे.

हे सगळं समजायला वगैरे वरवर पाहता थोडसं क्लिष्ट, किचकट आणि गुंतागुंतीचं वाटू शकतं. ते तसं वाटू नये म्हणून तुम्हाला या लेखमालेद्वारे हळूहळू गोष्टी समजून सांगण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळेच तर थोडं थोडं करूनच प्रत्येक लेखात लिहावं हे मी आधीपासूनच ठरवून ठेवलेलं आहे. त्यामुळेच यालेखात इथचं थांबतो.

पुढील लेखात वरील तीन उदाहरणांबद्दल थोडं जास्त लिहिन आणि हे फेसबुक मार्केटिंग नेमकं कसं काम करतं याबद्दलही सांगेन. यासंदर्भातील तुमच्या काही प्रश्नांचं स्वागत करायला उत्सुक आहे.

व्यंकटेश कल्याणकर, पुणे
मो. 7798703952

आमचे इतरही लेख वाचण्यासाठी, दर्जेदार पुस्तके विकत घेण्यासाठी www.chaprak.com ला भेट द्या. ‘चपराक प्रकाशन’चे फेसबुक पेजही जरूर लाईक करा. उत्तमोत्तम व्हिडीओ पाहण्यासाठी ‘चपराक’च्या युट्यूबला भेट द्या आणि सबस्क्राइबही नक्की करा.
Copyright @ www.chaprak.com / All Rights Reserved.

चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email - Chaprak Email ID

9 Thoughts to “डिजीटल मार्केटिंग : एक जादूई दुनिया (भाग १)”

  1. Vinod s. Panchbhai

    सुंदर माहितीपूर्ण लेख!

    1. आपल्या प्रतिसादाबद्दल आभार.

  2. Jayant Kulkarni

    नवीन जमान्याची उपयुक्त माहिती. उत्तम उपक्रम. हे आज प्रत्येकाला माहिती असायलाच हवं! लेख आवडला.

    1. आपल्या प्रतिसादाबद्दल आभार.

  3. बापू राजळे

    अप्रतिम…अतिशय महत्वपूर्ण लेख आणि उपयुक्त माहिती… यानंतर येणारा प्रत्येक भाग वाचायला आवडेल… पुढील भागाच्या प्रतीक्षेत…धन्यवाद सर

    1. खूप धन्यवाद. आपला अभिप्राय हीच माझी लेखनप्रेरणा आहे.

  4. माहितीपूर्ण लेख.. धन्यवाद घनश्यामजी..

    1. अभिप्राय कळविल्याबद्दल आभारी आहे.

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

हे ही अवश्य वाचा