हे जीवन सुंदर आहे!

हे जीवन सुंदर आहे!

अलीकडेच एक बातमी वाचनात आली…

फेसबुकवर एकाने पोस्ट टाकली की,
‘मी माझे जीवन संपवित आहे’

दुसऱ्याने पोस्टचे गांभीर्य लक्षात घेऊन ही गोष्ट शिवसेनेच्या एका आमदाराना कळवली. आमदारांनी पुणे पोलिसांना कळविले. पोलीस त्या व्यक्तीच्या घरापर्यंत पोचले. पोलिसांनी समुपदेशन करून आत्महत्येपासून त्या व्यक्तीला परावृत्त केलं! अवघ्या पंचवीस मिनिटात पुण्यामध्ये हे घडले. त्या नंतर ‘त्या’ व्यक्तीने फेसबुकवरची पोस्ट डिलीट केली. तसेच पोलीस आणि सर्व संबंधितांशी चर्चा झाल्यावर आत्महत्येचा विचार बदलला असल्याचं त्या व्यक्तीने सांगितले. त्यानुसार त्यांनी पुन्हा फेसबुकवर पोस्ट टाकली आणि आत्महत्येच्या निर्णयापासून ‘तो’ परावृत्त झाल्याचं त्यानं स्पष्ट केलं! कौटुंबिक कलहातून ती व्यक्ती आत्महत्येच्या निर्णयापर्यंत आली होती असे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले. शिवसेनेच्या नेत्या डॉ. निलमताई गोऱ्हे या घटनेबाबत म्हणाल्या,

‘सतर्क शिवसैनिकांमुळे आणि पोलिसांच्या तत्परतेमुळे एका व्यक्तीचा जीव वाचवण्यात यश आलं ही समाधानाची बाब आहे.’

वरील घटनेमध्ये डॉ. निलमताई गोऱ्हे यांनी जी तत्परता दाखवली व पुणे पोलिसांनी ज्या कार्यक्षमतेने प्रकरण हाताळले त्यामुळे एका व्यक्तीचा जीव वाचला ही गोष्ट कौतुकास्पद आहे. त्याबद्दल सर्व संबंधितांचे अभिनंदन!

पण अशी टोकाची भूमिका घेण्याची वेळ का यावी? प्रत्यक्षात ‘आत्महत्या’ ही गोष्ट अतिशय निंदनीय आहे. कायद्याने ‘आत्महत्या’ करणे किंवा आत्महत्येचा प्रयत्न करणे हा गुन्हा देखील आहे. याची कारणे अनेक आहेत. त्यामध्ये गरिबी, बेरोजगारी, जवळच्या व्यक्तीचा मृत्यू, घटस्फोट, प्रेमभंग, असाध्य आजार, अपयश, सामाजिक बहिष्कार, बलात्कार, न्यूनगंड आणि मानसिक दुर्बलता. आत्यंतिक नैराश्य, मानसिक विकार, वैफल्य, अनैच्छिक ब्रम्हचर्य, नशेचा अंमल, मानसिक तणाव, आर्थिक संकट, नातेसंबंधातील गुंता ही देखील इतर कारणे असू शकतात.

उपलब्ध आकडेवारी नुसार जगभरात दरवर्षी सुमारे दहालाख लोक आत्महत्या करतात. जागतिक आरोग्य संघटनेच्या अंदाजानुसार मानवी मृत्यूच्या कारणांच्या क्रमवारीत आत्महत्या हे तेराव्या क्रमांकाचे कारण आहे. आपल्या देशात एकूण आत्महत्येच्या ११.२% शेतकरी आत्महत्या करतात. शेताला पाणी नाही व पिकाला हमीभाव नाही या मुख्य कारणांमुळे त्यातील पंच्यांणव टक्के शेतकरी आत्महत्या करतात. जगात बत्तीस कोटी नैराश्यग्रस्त लोक असून त्यातील सात कोटी भारतात आहेत. (अंदाजे अठरा टक्के). महिलांमध्ये नैराश्याचे प्रमाण खूप जास्त आहे. १८% शेतकरी शेतीमुळे, २०% कर्जबाजारीपणामुळे, २०% कौटुंबिक कलहामुळे, १३% आजारामुळे, ४% व्यसनांच्या मुळे, तर २५% इतर कारणांमुळे शेतकरी आत्महत्या करतात.

‘मनाची अफाट शक्ती’ असे शीर्षक असलेला एक लेख अलीकडेच व्हाट्सऍपवर माझ्या वाचनात आला. त्यावर लेखकाचे नाव नव्हते पण थोडक्यात त्या लेखाचा आशय पुढील प्रमाणे होता.

लुईस या एक अमेरिकन महिला होत्या. त्यांच्या पूर्वायुष्यात वयाच्या पाच ते पंधरा वर्षांपर्यंत त्यांच्यावर भरपूर शारीरिक अत्याचार झाले. बलात्कार झाले. त्यामुळे त्यांचा जगाकडे बघण्याचा दृष्टिकोनच इतका नकारात्मक होता की हे संपुर्ण जगच वाईट आहे. सर्व पुरुष हे घाणेरडेच असतात व मी जगायला लायक नाही. पुढे वयाच्या चाळीसाव्या वर्षी त्यांना कॅन्सर झाला. जेव्हा त्यांच्या हे लक्षात आलं की ज्यांनी त्यांच्याशी वाईट वर्तन केलं जे त्यांच्या आयुष्यातून निघूनही गेले, त्यांना काही त्रास झाल्याचं ऐकिवात सुद्धा नव्हतं. ” कॅन्सरचा त्रास कोणाला झालाय तर मला. कारण इतकी वर्षं त्या सर्वांबद्दलच्या सर्व नकारात्मक भावना (राग, द्वेष, घृणा) मी माझ्या मनात जोपासल्या.” जर मला यातून बाहेर पडायचे असेल तर त्या सर्वांना माफ करणे खूप गरजेचे आहे. बरं ज्यांनी ते कृत्य केलं, ते माफ करण्यासारखं होतं का? तर आपल्या दृष्टीने नक्कीच नव्हते. तरी पण ‘लुईस हे’ यांनी त्या सर्वांना मनापासून माफ केले परिणाम स्वरूप त्यांचे कोणतेही ऑपरेशन (शस्त्रक्रिया) न करता त्या पूर्णपणे बऱ्या झाल्या. पुढे 90 व्या वर्षापर्यंत जगल्या आणि जगभर लेक्चर देत फिरल्या!

त्यांनी एक सुंदर पुस्तक लिहिले आहे, त्याचं नाव – ‘यू कॅन हील युवर लाईफ’. त्या पुस्तकाच्या शेवटच्या काही पृष्ठांमध्ये तर त्यांनी एक तक्ता दिला आहे, ज्यामध्ये पहिल्या स्तंभामध्ये आजार, दुसऱ्या स्तंभामध्ये त्यामागील नकारात्मक भावना व तिसऱ्या स्तंभामध्ये कशाप्रकारे सकारात्मक विचार करा म्हणजे तो आजार बरा होईल असे दिले आहे. अगदी सर्दी खोकल्यापासून कॅन्सरपर्यंत सर्व आजारांच्या मागच्या नकारात्मक भावनांचा त्यामध्ये समावेश आहे.

याच बाबतीत माझ्या एका मित्राने त्याच्या गुरूंबद्दल सांगितलं.

    गुरू स्वतः व्यवसायाने डॉक्टर आहेत. त्यांची शिकवण शास्त्राला धरून असते. ती काहीशी अशीच आहे. आपल्याला ज्या इच्छा पूर्ण व्हाव्यात असं वाटतं त्या इच्छा गुरूंचे स्मरण करून सकारात्मक शब्दात वर्तमानकाळात रोज मनाशी म्हणाव्या. रोज सकाळी व रात्री झोपताना वैश्विक क्षमा प्रार्थना करावी. या प्रार्थनेमध्ये चारही योनींमधील ज्या जीवांच्या बाबतीत आपल्याकडून कळत नकळत अपराध घडला आहे त्या जीवांची क्षमा मागावी व त्या जिवांसाठी सुख, शांती, समाधान व आरोग्य वगैरे साठी प्रार्थना करावी. आणखी एक प्रार्थना कर्मशुद्धीसाठी करावी ज्यामध्ये जाणते अजाणतेपणी ज्या लोकांना आपल्या मुळे अतोनात दुःख , पीडा, भोग भोगायला लागले त्या बद्दल त्या सगळ्यांची आपल्या गुरूला साक्षी ठेऊन क्षमा मागावी आणि त्यांच्यासाठी त्यांना हवे ते सर्व प्राप्त व्हावे अशीही प्रार्थना करावी. अशा प्रकारच्या प्रार्थनांमुळेही अनेक लोकांचे दुर्धर आजार बरे झाले आहेत व त्यांना मानसिक स्वास्थ्यही मिळाले आहे व जीवनातील ताण तणाव कमी झाल्यामुळे अनर्थ टळले आहेत. यात कोणतीही अंधश्रद्धा नाही तसेच कोणतेही कर्मकांड , थोतांड नाही. अनेक भाविकांच्या जीवनात या साधनेमुळे सकारात्मक बदल झाले आहेत. सकारात्मक विचार महत्वाचे आहेत!

आणखीन एक उदाहरण ‘ब्रँडन बेज’ यांचे. त्यांना स्वत:ला फुटबॉलच्या आकाराचा ट्युमर पोटामध्ये होता. बऱ्याच दिवसांपासून पोट सुटल्यासारखं वाटतंय म्हणून रूटिन चेकअपसाठी सोनोग्राफी केली, तेव्हा एवढा मोठा ट्युमर डॉक्टरांना दिसला. त्यांच्या गायनॅकॉलाजिस्ट (स्त्री रोग तज्ज्ञ) तर उडाल्याच. त्या म्हणाल्या, “लगेच अ‍ॅडमिट व्हा, उद्याच्या उद्या ऑपरेशन करून ट्युमर काढून टाकू.” पण ब्रँडन बेज यांना मन, भावना व शरीराच्या संबंधांविषयी चांगली माहिती असल्याने त्या म्हणाल्या, मला एक महिन्याची मुदत द्या. समजा काही उपयोग नाही झाला तर आपण ऑपरेशन करु. एक महिनाभर त्यांनी स्वत:च्या मनाची स्वच्छता केली व जुन्या अनावश्यक क्लेशदायक आठवणी खणून बाहेर काढल्या व टाकून दिल्या. त्याच्याशी निगडित लोकांना माफ केलं. महिनाभराने सोनोग्राफीत ट्युमरचा आकार निम्म्याने कमी झाला व पुढील तीन महिन्यांत सोनोग्राफी नॉर्मल आली. इतरांनाही याचा उपयोग व्हावा यासाठी त्यांनी ‘दि जर्नि’ या नावाचे पुस्तक लिहिले आहे. तसेच ही पद्धत शिकवणारा तीन दिवसांचा कोर्सही सुरू केला. सकारात्मक विचार महत्वाचे!

तसेच आपल्या देशातील डॉ. दीपक चोप्रा हे एक प्रख्यात एन्डोक्रायनॉलॉजिस्ट आहेत व ते अमेरिकेतील एका प्रसिद्ध हॉस्पिटलमध्ये प्रमुख पदावर होते. ते म्हणायचे की मी अगदी मनापासून कॅन्सरच्या गाठी मुळापासून कापतो-खरं म्हणजे त्या पुन्हा होता कामा नये पण तरीही recurrence का बरं होतो? जेव्हा त्यांनी याचा शोध घ्यायला सुरुवात केली तेव्हा त्यांच्या हे लक्षात आले की जेव्हा आपल्याला एखादी जखम होते, तेव्हा मलम लावलं तर ती जखम लवकर बरी होते. पण मलम नाही लावलं तरीही ती जखम बरी होतेच! कोण बरं ही जखम बरी करतं? आपलंच शरीर!

जखमेच्या शेजारील mother cells पासून daughter cells तयार होतात व जखम भरून येते. सर्वसाधारणपणे आईचे जसे संस्कार/मानसिकता असेल तशीच मुलीची होते. आपल्या नकारात्मक भावना वेगवेगळ्या पेशींमध्ये साठवल्या जातात. त्यामुळे ट्युमर कापला तरी तिथे जी जखम होते, ती बरी करण्याचं काम तिथल्या mother cells करतात. पण त्यामध्ये जर नकारात्मक भावना साठवल्या असतील तर नवीन पेशी परत तशाच तयार होणार अर्थात नकारात्मकच! त्यामुळे वर-वर फांद्या छाटून उपयोग नाही तर झाड मुळापासून काढायला हवं. हे जेव्हा त्यांच्या लक्षात आले तेव्हा त्यांनी medical practice बंद केली व आता ते पूर्णपणे cellular healing वर काम करतात. म्हणजेच प्रत्येक व्यक्तीला मनाची स्वच्छता करायला शिकवतात. राग, द्वेष, संताप, कुत्सित भावना सोडून त्यागून त्याजागी सकारात्मक विचार रुजवण्याचं काम!

त्यामुळे

  • जर आपण सर्वांनी स्वत:साठी रोजची पंधरा मिनिटे काढली व मनाची स्वच्छता केली, जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने पाहिलं तर आपण कमीत कमी आजारी पडू! बरं मनाची स्वच्छता करताना एखाद्या दिवशी खूपच छान व हलके वाटते पण दुसऱ्या दिवशी परत काहीतर घटना घडतात आणि ‘ये रे माझ्या मागल्या’ प्रमाणे मनात नकारात्मक विचार यायला लागतात. दारुड्या माणसाला तुम्ही कितीही समजवा की दारू पिणे वाईट आहे व त्याला ते पटतेसुद्धा पण दारूचे दुकान दिसल्यावर पाय बरोबर तिकडे वळतात. त्याचप्रमाणे आपण अगदी ठरवतो सुद्धा की फक्त सकारात्मकच विचार करायचे पण एक ठिणगी पुरेशी होते की लगेच नकारात्मक विचारांची शृंखला सुरू होते. हे अगदी नैसर्गिक आहे. ज्याप्रमाणे घरातील धूळ रोज साफ करावी लागते, त्याचप्रमाणे मनाची स्वच्छताही रोज करणे आवश्यक आहे. सकारात्मक विचार करण्याचा सराव रोज करावा लागेल! पाटीवर आपण मुळाक्षरे गिरवतो त्या प्रमाणे!
  • प्रयोग म्हणून करून तर पहा. मी जोपर्यंत स्वत: कोणती गोष्ट करून अनुभवून पहात नाही तोपर्यंत त्यावर विश्वास ठेवत नाही. तुम्हीही ठेवू नका. पण एकदा तुम्हाला अनुभव आला की मला खात्री आहे की रोज ज्याप्रमाणे आपण सकाळी उठल्यावर व रात्री झोपताना दात घासायला, अंघोळ करायला/हातपाय धुवायला विसरत नाही, त्याप्रमाणे एकदा तुम्हाला मनाची स्वच्छता करण्याची सवय लागली की तुम्ही कधीच ही सवय सोडणार नाही. सकारात्मक विचारांचे रोपण होतच राहील!

    गौतम बुद्धांनी काम, क्रोध, द्वेष इत्यादी दोष दूर करून जीवन निर्मळ करण्याचा सदाचाराचा एक मार्ग सांगितला आहे. त्याचे नाव ‘अष्टांगिक मार्ग’ यास ‘मध्यम मार्ग’ सुद्धा म्हणतात. अष्टांगिक मार्गाचा परिपूर्ण अवलंब केला तर मनुष्य निर्वाण प्राप्त करू शकतो अशी बौद्ध धर्माची धारणा आहे. निर्वाण म्हणजे मृत्यू नव्हे. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, निर्वाण म्हणजे धर्ममार्गावर वाटचाल करता येईल इतका पुरेसा ताबा आपल्या प्रवृत्तींवर असणे. निब्बाण, निर्वाण म्हणजे निर्दोष जीवन. काम, क्रोध, द्वेष वगैरे दोष आपले जीवन दूषित करतात. हे दोष दूर करून जीवन निर्मळ करण्याचा मध्यम मार्ग म्हणजे ‘अष्टांगिक मार्ग’. हा मार्ग मनुष्याला पाहायला शिकवतो, जाणायला शिकवतो, ज्ञान देतो. त्यामुळे चित्त शांत होते. या मार्गाने वाटचाल करणाऱ्याचे जीवन आनंदी होते!

    चौऱ्याऐंशी लक्ष योनीतुन गेल्यानंतर आपल्याला मनुष्यजन्म प्राप्त होतो अशी हिंदू धर्माची धारणा आहे. त्यामुळे माणसाने हा जन्म भरभरून जगायला हवा. हे जीवन खूप सुंदर आहे. त्याचा आस्वाद घ्यायला हवा. कला, क्रीडा, साहित्य, संगीत हे जीवनाचे आविष्कार आहेत. यात रस घेणाऱ्यांना समाधीचं सुख मिळतं. जीवनात प्रेमाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. दुसऱ्याला प्रेम लावा, दुसऱ्यासाठी जगून तर बघा त्यात फार मोठा आनंद सामावलेला आहे. आपण एक रोपटे लावतो आणि त्या रोपट्याची वाढ होताना पाहण्यात जो आनंद मिळतो तो अवर्णनीय असतो! जसे लहान मूल आपल्या डोळ्यासमोर वाढताना होतो तसा, त्याच्या बाललीला पाहत होतो अगदी तसा! कृष्ण कन्हैया सारखा! निरभ्र आकाश, अथांग सागर, सागराच्या लाटांचे संगीत, सागराची गाज, सूर्योदय, सूर्यास्त, पहाटे मंदिरातून येणारा घंटानाद, पाखरांचे थवे, त्यांची किलबिल असे बरेच काही निसर्गाने आपल्या साठी भरभरून दिलं आहे. फक्त ते डोळेभरून पाहण्याची त्याचा आस्वाद घेण्याची आपल्याकडे दृष्टी हवी!

    काही कारणाने जीवनात नैराश्य आल्यास आपल्या जवळच्या व्यक्तीशी बोलून मन मोकळं करावं. कुढत राहू नये. गरजेनुसार मनोविकार तज्ञांचा सल्ला घ्यावा. तणावाचे नियोजन करावे. आजच्या धकाधकीच्या जीवनात संकटे येणारच त्यासाठी सदैव खंबीर व सहनशील राहून संकटांचा मुकाबला करावा. सहजासहजी कोणतीही गोष्ट मिळत नसते त्यासाठी कष्ट करावे लागतात. यशाचा शॉर्टकट नसतो. हार पचवल्याशिवाय यशाची चव चाखता येत नाही. हे मुलांच्या मनावर लहानपणी पासून बिंबवायला हवं. मुलांकडून अवाजवी अपेक्षा करू नयेत. अध्यात्म स्वीकारावे. अध्यात्मात मन आणि शरीराचा घनिष्ट संबंध असतो. अध्यात्माची कास धरून ध्यानाद्वारे सर्व विकार नष्ट होऊ शकतात, मन विचलित करणारे विचार आपोआप लोप पावतात आणि पूर्ण सुखाची अनुभूती येते. हे अनुभव घेतल्याशिवाय समजणार नाही.’ सुदृढ शरीरात सशक्त मन राहतं ‘ असं म्हणतात. त्यामुळे सूर्यनमस्कार, योगासने, प्राणायाम आणि ध्यानधारणा यावर भर देऊन शरीर बळकट आणि मन शांत ठेवावं. काय बिशाद आहे की ते विचलित होईल! मिळालेलं जीवन परत मिळत नाही म्हणून जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने कसे पाहता येईल हे जो शिकेल तोच आत्महत्येच्या विचारापासून अलिप्त राहील. जीवन हे आनंद उपभोगण्यासाठी आहे हा विचार अंगीकारल्यास आत्महत्या आपसूकच कमी होऊन बंद होतील!

    नुकताच दहा सप्टेंबर ला ‘आत्महत्या प्रतिबंधक दिन’ होऊन गेला. त्या निमित्ताने या प्रतिबंधक पवित्र कार्यात माझा हा खारीचा वाटा! ‘चौकट राजा’ चित्रपटातील गीतकार सुधीर मोघे यांचे ‘हे जीवन सुंदर आहे’ सांगणारे पुढील गीत समर्पक आहे.
    ……………………
    हे जीवन सुंदर आहे

    नितळ निळाई आकाशाची अन क्षितिजाची लाली
    दवात भिजल्या वाटेवरती किरणांची रांगोळी
    (अहो आता विसरा हे सगळं
    इथं इमारतींच्या जंगलातला वनवास
    त्यातून दिसणारं टीचभर आकाश
    आणि गर्दीत घुसमटलेले रस्त्यांचे श्वास)
    कोठेही जा अवती भवती निसर्ग एकच आहे
    हे जीवन सुंदर आहे!

    पानांमधली सळसळ हिरवी अन किलबिल पक्षांची
    झुळझुळ पाणी वेळू मधुनी खुली शीळ वाऱ्याची
    (इथं गाणं लोकलचं
    पाणी तुंबलेल्या नळाचं
    आणि वारं डोक्यावर गरगरणाऱ्या पंख्याचं)
    इथे तिथे संगीत अनामिक एकच घुमते आहे
    हे जीवन सुंदर आहे!

    पाऊस झिमझिमणारा पाऊस कोसळणारा
    टपटप पागोळ्यातून आपल्या ओंजळीत येणारा
    (पाऊस म्हणजे रेनकोटचं ओझं
    कपड्यांचा सत्यानाश आणि सर्दीला निमंत्रण)
    जगण्यावरचे प्रेम जणू हे धुंद बरसते आहे
    हे जीवन सुंदर आहे!

    जयंत कुलकर्णी
    दूरभाष : ८३७८०३८२३२

    आमचे इतरही लेख वाचण्यासाठी, दर्जेदार पुस्तके विकत घेण्यासाठी www.chaprak.com ला भेट द्या. ‘चपराक प्रकाशन’चे फेसबुक पेजही जरूर लाईक करा. उत्तमोत्तम व्हिडीओ पाहण्यासाठी ‘चपराक’च्या युट्यूबला भेट द्या आणि सबस्क्राइबही नक्की करा.
    Copyright @ www.chaprak.com / All Rights Reserved.

    चपराक

    पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
    व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
    Email - Chaprak Email ID

    8 Thoughts to “हे जीवन सुंदर आहे!”

    1. अजित खोत.

      श्री.जयंत कुलकर्णी साहेबांचे लेख अतिशय र्मामीक आणि आत्मपरीक्षण करायला लावणारे असतात.👌

    2. Vinod s. Panchbhai

      खूप सुंदर लेख!
      सकारात्मक विचार प्रभावीपणे मांडलेत !

    3. Nagesh S Shewakar

      खूप छान मांडणी केली आहे.
      *नैराश्य येता मनी, करा सद्विचारांची पेरणी!*

    4. रमेश वाघ

      व्वा,अतिशय सुंदर

    5. प्रल्हाद दुधाळ

      सुंदर लेख! मनाची स्वच्छता नियमितपणे हवीच …

    6. Mrs Aparna Purohit

      Wow , khup chan

    7. Mukund Kulkarni

      जयंतराव खूपच सुंदर लेख आहे 🌹

    8. Mukund Kulkarni

      जयंतराव खूपच सुंदर आहे लेख !

    तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

    हे ही अवश्य वाचा