मुक्ताई

मुक्ताई

Share this post on:

माधव गिर, पुणे
चपराक मासिक, ऑक्टोबर 2011

मुक्ता! माझं बाळ ते!
असे अस्पष्टसे उच्चार मुखातून बाहेर पडले खरे, पण त्याच वेळी विट्ठलपंत हळूच उद्गारले.
‘रूक्मिणी, चल आता. सावर स्वत:ला
‘हो, चलावं! रूक्मिणीनी होकार भरला पण तिचा पायमात्र तेथून हलत नव्हता.
‘रूक्मिणी, अगं, आपण हे सर्व आपल्या मुलांसाठीच तर करतो आहोत ना.’ विट्ठलपंत समजूतीच्या सुरात बोलले.

‘चल, आता रूक्मिणी, आपल्या बोलण्याने मुले जागी होण्याच्या आधीच आपल्याला निघायला हवं.
‘हो, आता निघायलाच हवं!’ तिला हुंदका दाटून आला.
‘होय, निघायलाच पाहिजे, आता नाही निघालो तर पुन्हा केव्हाच आपण या मोहबंधनातून सुटणार नाही. विठ्ठलपंताचा चेहरा काहीसा करारी झाला होता. शब्दांमध्ये कधी नव्हे ती कठोरता आली होती.
‘चला तर मग! तिने एकवेळ निगरासपणे झोपलेल्या मुलांकडे पाहिले. इवलीशी लेकरं. जणूकाही आपलं पोरकंपण दूर करण्यासाटी एकमेकांच्या कुशीत शांत झोपी गेेलेली होती. पाहतापाहता तिची दृष्टी मुक्तावर खिळून राहिली आणि आतापर्यंत आवरलेला कढ बाहेर पडला. हुंदका दाटून आला. आलेला हुंदका तिने आवेगाने ओठातच आवळून धरला.
हं, चलायचं ना!
तिने मन घट्ट करण्याचा प्रयत्न केला खरा, पण शेवटी मनाचा बांध फुटलाच. डोळ्यात अश्रू दाटून आले. पाहतापाहता सारे धुसार झाले. डोळ्यातील अश्रूंनी फेर धरला. गालावरून ओघळून ते मुक्ताच्या पायावर टपटप पडू लागले. त्या ईवल्याशा चिमणपावलांवर अश्रुधारांचा अखंड अभिषेक सुरू झाला. त्या उष्ण अश्रुधारांनी तिची झोपमात्र चाळवली. तिने कुस बदलली आणि आपल्या लाडक्या ज्ञानदादाच्या गळ्यात हात टाकून ती पुन्हा निगरासपणे झोपी गेली. पण मुक्ताच्या हालचालीने रूक्मिणी भानावर आली. आपल्यामुळे आपल्या चिमणीची झोपमोड होईल असे तिला वाटते. तिने अश्रुंना बांध घातला. पदर डोळ्याला लावला. त्याच पदराने तिने मुक्ताच्या पायावरचे अश्रू पुसून घेतले. ते ओले पाय पुसता पुसता तिचे मन चार साडेचार वर्षां पाठीमागे सर्रकन धावले.
त्या रात्री अशाच अखंड श्रावणधारा कोसळत होत्या. बाहेर पिंपळपानावरून थेंबांची टपटप सुरू होती. इंद्रायणीचं पात्र दुधडी भरून वाहत होतं. पात्रातील पाण्याचा गंभीर आवाज घुमत होता. आपल्याला रात्री उशीरा झोप लागली होती. मधेच झोपडीत गळू लागले म्हणून आपण उठून बसलो तर इकडच्या स्वारीनी आपणास आवाज दिला.
‘रूक्मिणी काय झाले?’ असे उठलीस का अचानक?
‘अहो पाऊस तर थांबायचे नाव घेत नाही.’ मी म्हटले, तसे ते म्हणाले होते. ‘थांबेल. रूक्मिणी, अंग हा श्रावणमास आहे.’ सरी सरसर धावून येतील आणि पटकन निघून जातील. तू काळजी करू नकोस.’
मी काळजी नाही हो कर, असे किती पावसाळे पाहिलेत आपण आणि किती उन्हाळे सोसले आहेत. याचे मला काहीही वाटत नाही, पण!
पण काय, रूक्मिणी, हे सृष्टीचक्र असेच सुरू राहणार’ ते मला समजूतीने सांगत होते.
‘तसे नाही हो, झोपडी गळते आहे वरून बघा’ माझ्या पायांवर पाण्याची धार लागली आहे.
यावर यांनी दिवली पेटविली व दिवली हातात घेऊन सगळीकडे पाहिले. झोपडीत कुठेच गळत नव्हते. फक्त माझ्याच पायावर पाण्याची धार लागली होती.
‘रूक्मिणी ! हे क्षणभर थांबले. हे बोलताना मधेच थांबले की, काहीतरी अलौकिक बोलत असत.
‘अहो, असे थांबलात का,’ काय झाले, मी अधीर मनाने विचारले.
‘रूक्मिणी, अगं ही तर तुझ्या कुशीत वाढणार्‍या अंकुराच्या दिव्यत्वाची प्रचिती आहे.’ ते क्षणभर पुन्हा थांबले. मी यावेळी काहीही न बोलता त्यांच्या चेहर्‍याकडे पाहत राहिले. त्यांच्या चेहर्‍यावरून आनंद वाहत होता. जणू काही त्यांना विष्याच्या गर्भातले रहस्य सापडले होते. क्षणभराने ते म्हणाले.
‘अगं, या श्रावणधारांनी तुझ्या कुशीतल्या अंकुराला वाहिलेला हा जलाभिषेक आहे.’
‘अहो काहीतरीच काय’, पायावर पाणी पडले म्हणजे काय जलाभिषेक झाला का?’ तुमचे आपले काहीतरीच असते. मी अविश्‍वासाने म्हणाले.
‘काही तरी नाही, रूक्मिणी’ या वेळी साक्षात आदीमायाच तुझ्या पोटी जन्म घेणार, बघ तू.’
त्यांच्या या बोलांनी मात्र माझ्या अंगावर सर्रकन काटा उभा राहिला होता. क्षणार्धात सर्वांगातून लख्खकन वीज चमकून गेल्याचा भास झाला होता. तरीही मी उत्सुकतेने यांना विचारले होते.
‘अहो, खरेच, आदीमाया, म्हणजे काय हो?’ विस्ताराने सांगता का थोडे?’
‘हो, सांगतो, ऐक तर’
‘आदीमाया म्हणजे योगमाया’ आदीमाया म्हणजेच महामाया होय. ती सर्व विश्‍वव्यापी असते. पण त्याचवेळी सर्वाहून अलिप्त ही असते.’
‘हं’ दोन्ही हात हनुवटीवर ठेवून आपण ऐकत होतो. ते पुढे सांगू लागले.
‘रूक्मिणी, ही आदीमायाच आहे, जी साक्षात भगवान विष्णुची. त्या युगंधर योगेश्‍वराची प्रेरणा आहे.
आदीमायेमुळेच भगवान विष्णुचे अवतार घडले. याच आदीमायेमुळे प्रेरीत होऊन त्या योगेश्‍वराने अनेक पात्रे रंगविली, अनेक कला निर्माण केल्या. अशी ही आदीमाया सर्वव्यापी व सर्वालित असते. तीच सर्वांची प्रेरणा असते.
‘तू बघ, रूक्मिणी, ही आदीमायाच तुझ्या पोटी जन्म घेणार!
मी लाजून हसले होते.
‘हसू नकोस रूक्मिणी, अगं ही आदीमायाच आपल्या तिन्ही मुलांची प्रेरणा बनेल. बघ तू. त्यांच्यातला विश्‍वास ओसंडून वाहत होता. खरे तर हे सुख-दु:ख यांच्या परे होते. पण या घडीला त्यांच्या चेहर्‍यावर हर्ष दाटून आला होता.
अहो, कोणते भविष्य वर्तवित आहात आपण’ मी ओशाळले होते. भविष्याच्या गर्भात हेच दडले आहे. रूक्मिणी, अगदी हेच दडले आहे’ त्यांचे डोळे दूर कुठेतरी काहीतरी शोधत असल्याचा आपणास त्रास होत होतो आहे असे क्षणभर वाटले.
‘रूक्मिणी, पड आता’ बसू नकोस जास्त वेळ अशी’ त्यांच्या बोलण्यात मार्दव होतं.
मी पडल्याजागीच विचार करू लागले. खरेच का, हे म्हणतात असेच होईल, खरेच आपल्या पोटी मुलगी जन्माला येईल का? असे झाले तर बरेच होईल. कारण तिन्ही भावांना बहिण होईल. आपल्या सुख-दु:खाला जाणणारी लेक होईल. लेकीलच आईचं काळीज कळतं खरं.
खरेच काही झाले तरी मुलगीच व्हावी यावेळी.
आता पहाटवारा सुटला होता. झरणार्‍या श्रावणसरींनी विश्रांती घेतली होती. ढगाआडून एखादी चांदणी चमकत होती. पिंपळपानातून थेंबांचा टपटप आवाज येत होता आणि माझे डोळे जडावून गेले होते. हळूहळू आपण निद्राधिन झालो होतो. अर्धवटप झोपेत होते की, ग्ढ झोपत सारखे तेच शब्द कानात घुमत असल्याचा भास होत होता.
‘यावेळी आदीमायाच तुझ्या पोटी जन्म घेणार, रूक्मिणी. होय आदिमायाच’
आणि हो, त्याचवेळी अचानक एक दिव्य प्रकाशशलाका झोपडीत शिरली होती. बराच वेळ ही प्रकाशरेषा आपल्या ओटीपोटाजवळ रेंगाळत होती. हे स्वप्न होते की सत्य की केवळ भास काहीच समजत नव्हते. तरीही डोळ्यांबरोबर मन जडावल्यामुळे आपण तसेच पडून राहिले होतो. बराच वेळ अगदी बराच वेळ पर्यंत.
‘आई. ए आई, तुला बरे वाटत नाही का’ पडून राहा तू अशीच.’
ज्ञानदेवाच्या या मार्दवी आवाजाने मी जागी झाले होते.
‘उठू नकोस आई, पडून राहा तू, तुझे पाय चेपून देऊ?’ ज्ञानदेव बोलला.
‘नको हे माझ्या राजा, राहू दे.’ किती काळजी करतोस.
तुझा निवुदादा कुठे आहे?’ मी विचारले.
‘पाणी आणायला गेलाय दादा,’ आणि बाबा येतीलच एवढ्यात आंघोळीवरून.’ ज्ञानदेव निगरासपणे बोलला.
खरेच या एवढ्याशा बाळाला किती काळजी आहे माझी. याचा सर्वांवरच खूप जीव आहे. एखाद्या वयातही कितीतरी समंजस आहे. कधी कधी वाटते मी याची आई आहे की हाच माझी आई आहे. खरेच हा सर्वांची माऊली आहे. अगदी सर्वांची माऊली.
‘ज्ञानदेवा, जरा हात देतोस? मी आता उठते.’
हो, देतो ना.
ज्ञानाचा हात हातात घेताना त्याच्यातला ओलावा मला जाणवला. त्याच्या हातात काहीतरी दिव्यशक्तीचा मला भास झाला होता.
ज्ञानू, ज्ञानू हा घडा घेतोस का? निवृत्तीच्या आवाजाने हा लगेचच तत्परतेने उठला.
‘हो दादा, आलोच बघ’ ज्ञानाने निवृत्तीच्या हातातील एक घडा घेतला. दादा, यातील पाणी थोडेदेखील सांडले नाही. बघ’ घडा अगदी काठोकाठ भरलेला आहे.’ घड्यातील पाण्याकडे पाहत ज्ञानू निरागसपणे बोलला.
‘ज्ञानू?’ निवृत्तीच्या बोलाने, ज्ञानुने त्याच्या चेहर्‍याकडे पाहिले,
‘ज्ञानू, अरे, हा घडा पूर्ण भरलेला आहे ना, म्हणून घड्यातील पाणी डुचमळले नाही.’ निवृत्तीच्या या बालण्यातील अर्थ समजून ही ज्ञानाने प्रश्‍नार्थक नजरेने आपल्या निवुदादाकडे पाहिले.
‘अरे, ज्ञानु, जर घड्यात अर्धेच पाणी असते ना ते नक्की ढवळले असते आणि सांडले की असते.’ निवृत्ती बोलला.
‘ए, दादा, तुला काय सांगायचे आहे का’ यातून ‘सांग ना लवकर’
कोडे का घालतो आहेस असे. ज्ञानु गालात हसून बोलला. जणू काही त्याला ते कोडे केव्हाच सुटले होते. पण त्याला दादाच्याच तोंडून ते वदवायचे होते.
ए, दादा, उकल ना रे कोडे’ ज्ञानुने अधिरेतेने विचारले होते.
‘ज्ञानु, अरे आपल्याकडे असलेल्या ज्ञानाचे असेच असते. बघ अरे अर्धवट ज्ञान केव्हाही घातकच असते. ज्ञानदेखील परिपूर्ण असावे लागते. आपण जे ग्रहण करू ते एकनिष्ठपणे जपले पाहिजे. वाढविले पाहिजे. ‘अरे, आपले बाबा प्रकांड पंडीत आहेत. ते जे शिकवतील, सांगतील ते ज्ञान साठव, ज्ञानाचा साठा कर. काय सांगावे? याच ज्ञानाचा उपयोग अवघ्या संसाराच्या सुखासाठी होईल.’ एवढ्या वयात निवृत्ती किती उंचवरील गोष्टी बोलत होता. दाराच्या पाठीमागे उभे राहून ऐकता ऐकता मी डोळ्यातील अश्रू पुसले.
‘खरेच, किती विद्वान आणि गुणी मुलं माझ्या पदरात टाकली आहेत.’
देवाने. पण पण आपला पदरच फाटलेला आहे.
एवढी सदगुणी मुलं माझी. पण त्यांचं काही म्हणून कोडकौतुक होत नाही आपल्याकडून. मी पुन्हा डोळ्याला पदर लावला.
‘रूक्मिणी, तुझ्या डोळ्यात अश्रू’ इकडची स्वारी नदीवरून आंघोळ करून आली होती.
‘अगं, बाई, आलात तुम्ही आणि माझे काहीच आवरले नाही अजून’ मी स्वगतच पुटपुटले.
रूक्मिणी, यांची नजर माझ्यावर खिळून राहिली होती.
अगं, तू किती चैतन्यदायिनी दिसते आहेस’ सतेज, टवटवीत.
अगदी श्रावणातल्या सृष्टीने नवचैतन्याचा शालू पांघरल्यासारखी’ त्यांच नजर अगदी स्थिर होती.
‘अहो, तुमचं आपलं काहीतरीच’ मी पुटपुटले.
‘काहीतरीच नाही, रूक्मिणी’ असे म्हणत ते आत गेले. निवु आणि ज्ञानु मात्र गालात हसत होते. मी ओशाळून गेले होते. आता मात्र पदर तोंडाला लावून मी आत गेले. एवढ्यात सोपानाही उठून बसला होता. त्याला जवळ घेऊन चुल पेटविता मनात विचार आला.
‘खरेच, हे एवढे मोठे ज्ञानी आहेत. चौदा विद्या, अठरापुराण, चौसष्ट कला या सर्वांचा अभ्यसा होता यांना. मग ब्रह्मवृंद असूनही यांना समजले कसे नसेल? का यांनी संन्यास घेण्याचा विचार केला असेल. नव्हे का संन्यास घेतला असेल. लग्न झाल्यानंतर मुल झाल्याशिवाय ग्रहस्थाश्रम सोडून संन्यासाश्रम स्वीकारता येत नाही. हे का यांना कळले नसेल. असो बाई, बारा वर्षाच्या अखंड तपश्‍चर्येने हे फळ पुन्हा आपल्या पदरात पडले खरे. आपल्याच गुरूच्या आज्ञेने हे पुन्हा गृहस्थाश्रमात आले. पण यांना परत आणणे म्हणजे आपला दोष होता का? की आपणच अन्याय केला सर्वांवर, अगदी आपल्या या बाळांवर देखील. पण.
यांनी संन्यास घेतलाच नसता तर निदान माझ्या लेकरांवर हे दिवस आलेच नसते, त्यांचे कोडकौतुक झाले असते. एवढीसी गुणी बाळं माझी पण संन्यासाची पोरं म्हणून गावाने यांना वाळीत टाकलं आहे. कुणी धड भिक्षा घालत नाही की चार शब्द चांगले बोलत नाहीत. नेहमी लोक खालीउतर बोलतात. संन्याशीच पारं म्हणून हिणवतात. एकदा तर या लोकांनी माझ्या ज्ञानुच्या झोडीत शेण टाकले होते. पशुंनाही घराच्या गोठ्यात बांधणारी ही लोकं आपल्या सोन्यासारख्या लेकरांना घराचा उंबरठा देखील चढु ते नाही. देव, परमेश्‍वरा कसले भाग्य आमच्या पदरात टाकले आहेस रे’ विचाराच्या नंद्रीत मी बुडून गेले होते. हाताला चटका बसताच माझी विचारशृंखला तुटली. पण त्या चटक्याच एवढे काही वाटले नव्हते. कारण असे कितीतरी दाहक चटके सोसलेले होते.
‘आई, मी फुलं आणु.’ एवढासा सोपाना म्हणाला.
‘आण, हो, माझ्या राजा’ मी असे म्हणताच ‘हे, आत्ही ताललो फुलं आणायला असे म्हणत तो निघून गेला. आताशा थोडं जडजड वाटत होतं. सातवा महिना लागल्यापासून काही करावसं वाटत नव्हतं. फक्त बसून राहवं असंच वाटायचं. पण मीच बसले तर कोण करणार म्हणून जीवावर येवून सगळं करत होते.
बघता – बघता श्रावणधारांनी फेर धरला. सरी सरसरत येऊ लागल्या. सरसरत येणार्‍या सरीमागून केशव पिवळे ऊन धावू लागले. त्या उन्हाने सिद्धेश्‍वराचा कळस आणखी सोनेरी दिसू लागला होता. इवलुस आळंदीगाव उजळून निघायचं मधेच पावसाची सर यायची. ऊन पावसाचा पाठशिवणीचा खेण् रंगायचा. सारी सृष्टी ते हिरवे चैतन्य पांघरूण वावरू लागली. झाडेवेली हिरव्यागर, टवटवीत झाल्या, असंख्य फुलांनी सृष्टीवर छत्र धरले. सृष्टी आनंदाने डोलू लागली. मी सृष्टीचं हे रूप नेहमी न्याहळत बसत असे.
‘काय हो, ही माती किती चैतन्यादायिनी आहे की नाही’ माझ्या या बोलाबरोबर त्यांनी सांगितले होते की, ‘रूक्मिणी, ही माती म्हणजे सर्वांची आईच आहे.’ तीच सर्वांना आपल्या उबदार कुशीत सामावून घेते आणि योग्य वेळ येताच त्यांच्यात प्राण फुंकून सर्वांना जगण्याची प्रेरणा देते.
‘हो खरेच आहे की, याच मातीच्या उबदार कुशीत आपण देखील लहानाचे मोठे होतो. ती आपणास खेळविते, माया देते, वाढविते अगदी आपल्या जन्मदात्री आईसारखेच.’ मी बोलू लागले की हे शांत चित्ताने ऐकायचे. ते खरेच उत्तम श्रोते आहेत असे मला राहून राहून वाटायचे.
‘हो हो खरेच आहे की, मातीमुळेच आम्हाला की नाई, निवाला सुद्धा मिळतो. ही की नाही गं, आई. मधेच सोपानाचे बोबडे बोल ऐकून सर्वांना हसू आले. सर्वांयच हसण्यामुळे तो मात्र फुरंगटून गेला पण लगेच म्हणाला.
‘आम्ही खोते नाही बोलत’, बाबा, ‘बघा तल आम्ही मातीचंच घल बनवलंय’ त्या बाळबुद्धीचं सर्वांनाच कौतुक वाटलं.
‘बरं का निवृत्ती, ज्ञानदेवा, ज्या ज्या वेळी या मातीचं चैतन्य बहरेल. त्या त्या वेळी तिच मुले बाळेही चैतन्यशील असतील, तिच्या लेकरांचे जीवन खर्‍या अथांने बहेरल.’ यांनी मुलांना समजून दिले. मला वाटले की, मुलांना याचा अर्थ समजेल का? अजून कितीतरी लहान आहेत की लेकरं. पण माझ्या विचारांची तंद्री तोडत निवू म्हणाला.
‘बाबा, ही माती पंचतत्त्वांपैकी एक आहे की नाही.’
‘हो’ हे सहज उद्गारले.
‘मग ही मातीच कोरडी, चैतन्यहीन झाली तर अखिल मानवजाती कसी बहरून येईल.’ निवृत्तीच्या या बोलाने मी दचलके. एवढुशा वयात अखिल मानवजातीचा विचार याच्या मनात कसा आला. हा विचार मला अस्वस्थ करत होता. अगदी यांनी देखील किती आश्‍चयचकित पाहिले होते निवृत्तीकडे.

एके दिवशी हे भिक्षा न मागताच परत आले होते. यांना सचिंत पाहुन मी विचारले.
‘अहो, काय झाले?’
‘काही नाही.’ त्यांचे तुटक बोल ऐकून मी खोदून विचारले, पुन्हा पुन्हा विचारले, ‘कोणी, काही म्हटले का, तुम्हाला?’
‘नाही, कोणी काही नाही म्हणाले मला’ ते माझ्यापासून काहीतरी लपवत होते. ‘मग तुम्ही असे सचिंत का आहात? आणि भिक्षा न मागताच परत आला आहात.’
‘आज खूप मोठी भिक्षा मिळाली. रूक्मिणी, त्यांच्या चेहर्‍यावर थोडीशी चिंता उमटली होती.
‘म्हणजे काय?’ मला काही समजले नाही.’ मग मात्र त्यांना राहवले नाही त्यांनी वाटेतच घडलेला प्रसंग मला सांगितला. अगदी जसाच्या तसा सांगितला.
‘रूक्मिणी वाटेत विसोबा भेटले होते’ विसोबांचे नाव त्यांनी उच्चारताच माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली. कारण विसोबा काकाच खरे तर यांचा सर्वांपेक्षा जास्त द्वेष करत असत. ते पुढे सांगू लागले. विसोबा म्हणाले, म्हणाले कसले कडाडलेच.
‘काय विठ्ठलपंत, कडमडलात रस्त्यात आमच्या आडवे’ निर्लज्ज कुठले!
‘अहो, विसोबा मी असे काय केले आहे. निर्लज्ज म्हणायला?’
‘विठ्ठलपंत तुम्ही केवळ निर्लज्ज नाही, निर्लज्जपणाचा कळस आहात.’
‘अहो, पण विसोबा.
‘गप्प बसा, म्हणे तुम्हाला आता चौथे अपत्य होणार आहे.’ अहो संन्यासीबुवा काही तरी लाज बाळगा. त्यांचे एक एक शब्द काळीज चिरून टाकणार होते.
‘विसोबा, तुम्ही ज्ञानी आहात, प्रचंड पंडीत आहात, मी तुम्हाला किती वेळा सांगितले आहे की, मी माझ्या गुरूच्या आज्ञेनेच ग्रहस्थाश्रम स्वीकारला आहे.’ हे ऐकताच विसोबा पुन्हा कडाडले.
‘तुम्ही शहाणे आणि तुमचे भाऊ दिडशहाणे.’
‘विसोबा!’
‘नाही तर काय, संन्यासेत्तर गृहस्थाश्रम स्वीकारता येत नाही. हे तुमच्या विद्वान गुरूंना माहीत नव्हते?’ विसोबांनी गुरूच्याच विद्ववत्तेला हात घातला होता.
‘पण-पण विसोबा गुरू आज्ञाऽऽ’ वाक्य पूर्ण होण्याच्या आधीच ते म्हणाले ‘गप्प बसा हो, तुमच्या पापी मुखाने माझे नाव घेवू नका. निर्लज्ज कुठले! व्हा बाजूला पांडुरंगा आणखी किती पापाचा बोजा या आळंदीला उचलावा लागेल कुणास ठाऊक! आता म्हणे चौथा बोजा! विसोबा तावातावाने बोलत होते.
‘असे म्हणून नका, विसोबा’ अहो एक दिवस माझ्या याच मुलांमुळे आळंदीचे नाव भारतवर्षात अमर होईल.’ हे निर्धाराचे बोल ऐकून तर विसोबा अधिकच क्रोधित झाले.
‘ते होईल तेव्हा होईल, विद्वान विठ्ठलपंत आणि तसेही पापकर्मामुळे अपकिर्ती होते. कीर्ती मिळत नाही.’
जाऊ द्या हो विठ्ठलपंत, या क्षणी तुम्ही माझ्या मार्गातून बाजूला व्हा! तुमची पापी सावली देखील माझ्यावर पडायला नको बाजूला व्हा!
‘शिवऽ शिवऽ गोमुत्र शिंपडले पाहिजे’ असे म्हणत ते तणतणत निघून गेले. त्यांच्या दोघातील बोलण्याचा शब्दन् शब्द यांनी सांगितला होता.

अहो, पण हे काय नवीन आहे का?’ मी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला होता.
‘रूक्मिणी, आपल्या मुलांचे कसे होईल’ यांच्या शब्दात काळजी दाटली होती.
‘हे विद्वान म्हणविणारे पंडीत आपल्या लेकरांना धर्मात घेतील का?’ त्यांना पंक्ती पावन करून घेतील का? त्यांच्या मनाची उलघाल मला समजत होती.
‘अहो, उगीच मनाला त्रास करून घेवू नका.’ हे काही नवीन नाही आणि म्हणून भिक्षा न मागताच परत आला तुम्ही.’ धीर धरा सर्व काही ठीक होईल.
तसे तर ते खरेच धीराचे होते. त्यांनी असे कितीतरी अपमान पचविले होते. पण आपल्या मुलांची काळजी त्यांना आता कुठे तरी पोखरून काढत होती आणि त्या काळजी पोटीच ते सर्व बोलत होते.
‘रूक्मिणी, कधी कधी वाटते. या आळंदीच्या ब्रह्मवंदाना संन्यासी शब्दाचा अर्थच समजत नाही.
‘म्हणजे? मी विचारताच ते म्हणाले,
‘ज्ञेयस नित्यसंन्यासी यो न द्वेष्टि न काडक्षती।
निर्द्वद्वो ही महाबाहो सुखं बन्धात्प्रमुत्यते॥
जो कोणाचाही द्वेष करत नाही. कोणाचाही राग धरत नाही. जो निस्पृह, निरपेक्ष वृत्तीने वागतो. तो संन्यासीच म्हणविला जातो.
‘आपण तर कधीच कोणाचा द्वेष करत नाही. कोणाचाही राग धरत नाही, रूक्मिणी त्यांच्या या बोलण्यावर माझी प्रतिक्रिया मी दिलीच होती.
‘अहो, हे सर्वकाही त्यांना समजत का नाही’ हे आळंदीकर प्रकांड पंडीतच आहेत.’ परंतु त्यांच्या या प्रचंड ज्ञानरूपी बुद्धीवर अहंकाराची धूळ साचली आहे. ती धूळच नेमकी त्यांना झटकता येत नाही.
‘खरे तर या अहंकारानेच तुम्हाला त्यांनी विषयासक्त करून सोडले आहे.’ तुम्ही लक्ष देवू नका’ बरे मी काय म्हणते.
बोल, काय म्हणायचे आहे तुला? यांनी विचारले. पण लाजून मी मान खाली घातली.
‘रूक्मिणी बोल ना’
‘हल्ली की नाही, मला खूप आगळेवेगळे भास होतात हो’
कसले भास होतात तुला? त्यांनी शांतपणे विचारले.
खरे सांगू, मला की नाही, सारे आकाश कवेत सामावून घ्यावेसे वाटते.
आणि… आणि जावू द्या हसाल तुम्ही.
आणि काय, रूक्मिणी, सर्व सांग मला. काही मना ठेवू नकोस. ‘मला की नाही, आकाशात विहार करावासा वाटतो’ माझ्या या बोलाने ते दचकलेच अगदी.
‘रूक्मिणी, हे तू बोलत नाहीस’ तुझ्या कुशीतल योगमायाच.
जन्माच्या अगोदरच आपली लीला दाखविते आहे. ते गहन, सखोल बोलत होते. रूक्मिणी, खरे तर यावेळी तू एखाद्या योगतपस्विनी सारखीच दिसते आहेस.
त्यांच्या अंतरंगातील सारे भाव त्यांच्या मुखावर एकवटले होते., इका अनाहुत समाधानाने त्यांचा चेहरा उजळून निघाला होता. मला ही सदगदीत वाटत होते. निवृत्ती, ज्ञानदेव हे लक्षपूर्वक ऐकत होते. सोपानही बाबाच्या मांडीवर शांतपणे बसला होता.
त्या रात्री सर्वजण तृप्त झाले होते. आकाश चांदण्यांनी भरून आले होते. लक्ष लक्ष चांदण्यांच्या दिव्यांनी ते उजळले होते. लक्ष चांदण्यांचे तेज झोपडीभर पसरले होते.
‘खरे का हो, तुम्ही म्हणता तसेच होईल का, आपल्या पोटी यावेळी मुलगीच होईल का?’
मुलगी, मुलगी नव्हे साक्षात आदीमायाच होईल.’ ते एकदम बोलून गेले खरेच, मुलगीच हवी. मुलीशिवाय घर संसार अपूर्णच आहे.’ हे संपूर्ण जगत स्त्रीशिवाय अपूर्णच आहे. स्त्री आहे, स्त्रीत्व आहे म्हणूनच तर तिन्ही लोक आहेत.’ माझ्या अशा बोलण्याने हे प्रभावित होऊन म्हणाले.
‘रूक्मिणी, अनादी, अनंत काळापासून हेच तर चालत आले आहे.’
स्त्री आणि पुरुष ही विश्‍वाची दोन अंगे आहेत.
हं!
यातील एकाच्या अस्तित्वाला जरी धोखा निर्माण झाला तर, भयंकर उलथापालथ होईल आणि एकदिवस विश्‍वाचा समूळ नाश होईल.
‘हो, तर हा विश्‍वविनाश होऊ द्यायचा नसेल तर स्त्री व पुरुष या दोहोचा तेवढाच सन्मान झाला पाहिजे.’ मी ही यांच्या बोलण्यामध्ये आपले अर्थगर्भित शब्द मिसळून दिले. खरे तर मी एवढे कधी बोलत नसे. पण हल्ली माझ्या मुखातून आपोआपच अनपेक्षित शब्द निघत होते. ते मी इच्छा असूनही थांबवू शकत नव्हते. आता ही मी बोललेच.
‘या दोन्हीपैकी एकाही अंगाकडे समाजाचे दुर्लक्ष झाले. तर किंवा समाजाने यातील कोणत्याही एका अंगाला तुच्छ लेखले तर विनाशाची भयंकर उल्का या जगावर एक ना एक दिवस नक्कीच आदळेल.’ मी हे बोलत असताना यांनी फक्त माझे मुखावलोकन केले व शांत बसून राहिले. एवढे शांत की विश्‍वाच्या उत्पत्तीचे कोडे उकलन असावे. एकदा का हे असे शांत झाले की समजावे कोणते तरी गूढ, अनाकलनीय कोडेच उकलत आहेत. पण पण स्वत:च्या भविष्याचे कोडे मात्र यांना उलगडता येत नव्हते. एवढे मोठे विद्वान, वेदअभ्यासक, प्रकांड पंडीत पण स्वत:च्या भविष्याचे कोडे उकलताना मात्र हतबल होत असत. त्यांची ही हतबलता मला पाहवत नव्हती. ते असे गप्प बसले की मनाची कोण उलघाल होत असे. यांची ही हतबलता, शांतता भंग करण्यासाठी मी म्हणाले,
‘खरेच, हो. मुलगीच होईल का?
ते फक्त हसले होते. गूढ -गूढ हसले होते.
‘राहू दे रूक्मिणी, बराच वेळ झाला आहे.’ पानं वाढून घे.’ यावर मी भानावर आले.
‘अगंबाई, खरेच की, लेकरं भुकेजली असतील.’ आता घेते हो बाळानो पानं वाढून माझे बोलणे संपण्याआधीच ज्ञानू म्हणाला.
‘नाही आई, तुझे आणि बाबांचे बोलणे ऐकूणच मन तृप्त होते बघ.’
‘हो, मन तृप्त होते का? किती विद्ववानासारखा बोलतो आहे, पाहिलंत? मी कौतुकाने त्याच्याकडे पाहिले.
‘विद्वानासारखा?’ विद्वानासारखा नाही आहेच तो विद्वान’ काय हो बाबा? निवृत्ती मधेच बोलला.
‘हो तल आमता ज्ञानुदादा विद्वान आहे.’ यांच्या मांडीवरच्या सोपानानेही त्याला पुष्टी जोडली.
हे मात्र हसले, पुन्हा एकदा गुढ गुढ हसले होते.
त्या रात्री खरेच सर्वजण आत्मिक समाधानाने जेवली. सर्वजण अगदी तृप्त तृप्त होते.
खरेच आता खूप जड जड वाटत होते. काही काही खावेसे वाटत होते. काय मिळणार होते. तेच चार ठिकाणी मागून आणलेले जाडेभरडे तांदूळ. मिळेल तेच तेवढे. खरेच आई असती तर किती कौतुक केले असते. उगीच ‘आईच्या आठवणीने डोळे पानावले होते. एवढ्यात बाहेरून कोणी तरी आवाज दिला.
‘रूकू ए रूकू’ घरात आहेस की नाहीस?
‘कोण आहे?’ मी आतूनच विचारले.
‘अगं, मीच आहे की’ इकडे तिकडे पाहत गोपा आत आली.
‘अगं, गोपा तू होय, इकडे कशी आलीस? माझ्या प्रश्‍नांचे तिने सवयीने उत्तर दिले.
आले बाई, तसंच झपझप
तसे नव्हे गं, गोपा, तू इकडे आल्याचे कुणी पाहिले तर? मी काळजीने विचारले
‘पाहिले तर, पाहू दे.’ तिचं उत्तर तयारच होतं.
तसे नव्हे, गोपा. तुझ्या घरी समजले तर तुला नाहक त्रास देतील गं. ते’
मला बाई काळजी वाटते.’ मला मात्र गोपा म्हणाली.
होऊ दे, झाला तर, हे घे’, घे ठेवून, गोपाने पदराखाली काही तरी आणले होते. ‘हे गं काय आणले आहेस. मला काही नको, तू आलीस ना. बस झाले.’
‘बरे, वाटले तू आलीस. हल्ली कुणी जीवा-भावाचे भेटायला येत नाही गं.’ माझ्या अशा बोलण्याने गोपाचे डोळे ओले झाले. पदराने डोळे पुसून ती म्हणाली.
‘रूकु,’ खूप वाटते गं. तुला भेटावं व बोलावं. पण पण… जावू दे हे चे ठेवून’ मी बालमैत्रीण आहे ना तुझी. मला माहिती आहे. तुला काय आवडते आणि काय नाही’
‘हं.’ मी एक सुस्कारा सोडला.
‘रूकु, आज तुझी आई असती तर तुला कुठे ठेवू आणि कुठे नाही केले असते. बघ.
‘हो ग. मला आताच आईची आठवण झाली होती.’ मी अजून इक सुस्कारा सोडला, ‘खरंच, तुझी आई असती तर किती बडेजाव ठेवला असता तुझा.’
सगळ्या सुखांनी तुझ्या पायावर लोळण घेतली असती.’ पण दैवयोग किती विचित्र असतो बघ.’
गोपाचं बोलणं मधेच थांबवत मी म्हणाले होते.
‘गोपा, माझी लेकरांचं माझे खरे सुख आहेत.’
‘तसे नाही गं, रूकु ‘पण’
‘पण, काय गोपा? एवढं सुख असताना आणखी कोणते सुख देवाकडे मागू?’
‘तेही खरेच आहे हो रूकू.’
‘गोपा, अगं अगणित संपत्ती असेल आणि पोटी संतती नसेल तर ते संपत्तीसुख काय कामाचे?’
‘हं. गोपा शांतपणे ऐकत होती.
‘अगं, संतती आणि संपत्ती यापैकी कोणाची निवड करायची वेळ आली तर संततीची निवड करावी. हो काही नाही.
गोपा, आजची संतती हीच उदयाची खरी संपत्ती असते.
‘होय बाई, रूकू. देवाने तुझ्या पदरात खूप मोठी संपत्ती टाकली आहे.’ तुझी लेकरं म्हणजे सुखाचे आगारच आहेत.’
‘हो’ तर माझी मलं आहेतच सुसंहकारित, सौजन्यशिल, मी असे म्हणताच गोपा पुढे म्हणाली.
‘सालस आहेत, गुणवान आहेत.’ सर्वांप्रती त्याच्या अंत:करणात आदर आहे.’
‘मग सांगा गोपा, एवढी गुणवान संतती पोटी असताना आणखी कोणत्या संपत्तीची अपेक्षा करावी? मी सहज प्रश्‍न केला.
‘राहू दे बाई, रूकु, तु काही बोलण्यात हार जाणार नाहीस.’ मी काही तुला आज ओळखते का?
‘बरं, हे बघ, जे आहे ते ठेवून घे. अशीच बोलत बसले तर खूप वेळ होईल. गोपाने आणलेले भांडे माझ्यापुढे सटकवले.
‘ठीक आहे, दे इकडे, नको म्हटले तर तू ऐकणार का आहेस? असे म्हणत मी ते सर्व ठेवून घेतले.
‘रूकु, जाते मी बराच वेळ झाला आता’ ती दाराकडे जाता जाता थांबली. वळून म्हणाली.
‘रूकु, तुला काही लागले सवरले तर सांग. हो बरं का.’
हो, नक्की सांगेन की.
‘कसला ही संकोच करू नको.’ ती काळजीपोटी सांगत होती.
‘नाही गं. तुला सांगायला संकोच कसला?’ मी म्हटले.
तसे, नाही गंं, कशाला सांगायचे म्हणून बसू नको.’ ऐकवेळी काहीही विचार न करता निवृत्तीकडे निरोप दे बरं का?’ तिच्या शब्दांतून काळजीबरोबर माया पाझरत होती.
‘आणि हो रूकु. मी शांताक्काला सांगून ठेवले आहे. तसेच काही वाटले तर निवृत्तीकडे निरोप देवून तिला बोलावून घे.’
‘हो, बाई किती काळजी करशील?’ मी घेते शांताक्काला बोलावून.’
मी हसले.
‘हसू नको, अगं, रात्र -अपरात्र वेळ काय सांगून येते का’ तिने माझ्या हसण्याकडे दुर्लक्ष करून सांगितले.
‘हो गं, गोपा तु म्हणतेस तेही खरेच आहे.’ मी सावरून बोलले.
‘काही दुखले- खुपले, तर कसलाही विचार न करता निवृत्तीला नाही तर विठ्ठलपंतांना सांगून शांताक्काला बोलावून घे, येईल शांताक्का’ एवढे बोलून गोपाने ओल्या डोळ्याला पदर लावला व जाताजात
‘काळवेळ सांगून येत नाही, रूकू, काळजी घे स्वत:ची’ असे म्हणून गोपा निघून गेली.
मी बराच वेळपर्यंत गोपाची, पाठमोरी मूर्ती पाहत उभी होते. अगदी ती नजरेआड होईपर्यंत. नकळत माझेही डोळे पाणावले होते. आळंदीतील विद्वान, पंडीत अनेकजण आपला तिरस्कार करत असली तरी अशी काही साधीसुधी, निरपेक्ष, ममतास्थळं अजूनही शिल्लक होती आणि मी ती जीवापाड जपलेली होती, यांनी ती मायेने जोपासली होती. मला नेहमी वाटायचे की, स्वत:ला विद्वान समजणार्‍या निरलस, निरपेक्ष माणसांनाच जीवनाचे खरे तत्त्वज्ञान समजले आहे. असे मला नेहमी वाटायचे.
‘रूक्मिणी, कोण आले होते?’ याच्या बोलण्याने मी भानावर आले. ‘अं, गोपा आली होती’ मी गडबडीत उत्तर दिले.

– माधव गिर, पुणे
8975878803
चपराक मासिक, ऑक्टोबर 2011

Author: चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email -

View all posts by चपराक >

2 Comments

  1. खूपच सुंदर लिहलंय!
    मनापासून शुभेच्छा!!

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

error: Content is protected !!