सोलापूरचा वस्त्रोद्योग काल आज उद्या

सोलापूरचा वस्त्रोद्योग काल आज उद्या

‘चपराक मासिक – व्यापार आणि उद्योग विशेषांक 2011’
– अरुण रामतीर्थकर


कोल्हापूरची चप्पल जशी प्रसिद्ध आहे त्यापेक्षा किती तरी पट अधिक सोलापूरी चादर प्रसिद्ध आहे. घर म्हटले की, त्यात चार-पाच चादरी असतातच. त्या सोलापुरी असाव्यात असा गृहिणींचा आग्रह असतो. सोलापूरची माहेरवाशीण असो वा सासरवाशीण जाता येता ‘आमच्यासाठी दोन चादरी आण हं’ असे दोन-तीन निरोप तिच्याजवळ असतातच. चादरीच्या जोडीला आता टॉवेल, नॅपकीन आणि वॉलहँगिंग यांचीही निर्मिती होत असून काही वर्षांपूर्वी या व्यवसायाची सोलापुरातील वार्षिक उलाढाल हजार कोटींपर्यंत गेली होती.

हातमागामुळे नाव झालेल्या या शहरात मोररजी मिल, लक्ष्मीण विष्णू मिल, जाम मिल, नरसिंग गिरजी मिल अशा चार कापड गिरण्या उभ्या राहिल्या. गेल्या 25 वर्षांत सहकारी तत्त्वावर सहा सूतगिरण्या सुरू झाल्या. आज या सर्वांचे भोंगे बंद आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणावर एखाद्या शहरातील रोजगार मावळल्यावर त्या शहरावर किती अवकळा आली असती मात्र सोलापूर गारठले नाही. उलट विमानतळ आहे विमानसेवा सुरू करा असा आग्रह येथील मंडळींना धरावा लागतो. सोलापूरचा हा दिमाख कायम राहिला याला कारम पूर्वभागात घरोघरी असलेले यंत्रमाग आणि हातमाग मोठे उद्योग बंद पडले तरी घरगुती आणि लघुउद्योग यामुळे सोलापूरची दिमाख टिकून आहे.

हा व्यवसाय पूर्वभागात आहे असे मी म्हटले. पूर्वभाग म्हणजे विजापूर वेशीपासून जोडबसवण्णापर्यंतचा भाग. 1840 च्या सुमारास तेलगंणमध्ये मोठा दुष्काळ पडला. लोक अन्नावाचून मरू लागले. उदरनिर्वाहासाठीइ लोक बाहेर पडले. त्यातील एक जथ्था सोलापूरकडे निघाला. वाटेल बोरामणीजवळ त्यांना पोलिसांनी अडवले. आलेले लोक तेलुगु आणि पोलीस मराठी. त्यांना पोलीस पाटलापुढे उभे केले. त्यांनी हातमागाची अवजारे दाखवून खणाखुणा करून आम्ही वस्त्रे विणतो हे कळवले. मग कलेक्टरांना भेटून जागेची मागणी केली. पूर्ण जंगल असलेला हा पूर्वभाग वार्षिक एक रूपया साराठरून या तेलुगु लोकांना दिला. कोंगारी, संगा, गाजुल, महांकाळ सोमा या लोकांनी पूर्वभागात घरे बांधून व्यवसाय सुरू केला. हातमागावर लुगडी, चोळी, धोतर अशी वस्त्रे निघू लागली. गावातील आणि बाजूच्या खेड्यातील लोकांना ही उत्पादने एकदम पसंत पडली. माऊथ पब्लिसिटी झाली. थोड्याच वर्षांत या व्यवसायाला एकदम बरकत आली.

येथे एक गोष्ट प्रथम स्पष्ट केली पाहिजे ती म्हणजे अस्मानी – सुलमानी संकट म्हणजे काय ते या लोकानी भोगलेले आहे. निझाम राजवटीत ते होते निझाम प्रचंड श्रीमंत पण अय्याशी, प्रजा उपाशी मरत होतीतरी लक्ष नव्हते, वर धार्मिक अत्याचार अन्नाचा कण नाही हे झाले अस्मानी संकट. एवढ्या विपरित अवस्थेतही त्यांनी धर्म, परंपरा, भाषा चिकाटीने जपली आहे.

या तेलुगु विणकरांना पद्मशाली असेही म्हणतात. त्याची धार्मिक पार्श्‍वभूमी आहे. कालवासुर नावाच्या दैत्याला ब्रह्मदेवाने वर दिला की योनीद्वारा जन्मलेल्याकडून तुला मृत्यू येणार नाही. या वरामुळे कालवासूर उन्मत झाला. स्वैराचारी झाला. ऋषिमुनी हताश झाले. मग ब्रह्मदेवाने कडक ब्रह्मचर्य पाळणार्‍या मार्कंडेय ऋषिंना पुत्रकानेस्टी यज्ञकरम्यास सांगितले. यज्ञात धर्मपत्नी सोबत असावी लागते. मार्कंडेय तर ब्रह्मचारी. मग ब्रह्मदेवाने सांगितले की यज्ञातील धुरातून धूम्रवती ही स्त्री येईल ती यज्ञात आणि यज्ञापूरतीच पत्नी होईल. त्याप्रमाणे यज्ञ होतो. या यज्ञातून तेज-पुंज तरुण येतो भावनाऋषी, त्याचा जन्म योनीमार्फत नसल्याने तो कालवासुराचा वध करतो. त्यानंतर भावनाऋषी भगवान विष्णूंच्या दर्शनास जातात. मानवाच्या मान रक्षणासाठी पद्मनाल (कमळाच्या देठाचे तंतू) यापासून तलम वस्त्रे विणण्यास सांगितले. पृथ्वीवर परतल्यावर भावनाऋषींनी शिष्यगणांच्या मदतीने कमळाची देठे मजवून त्यांचे तंतू काढले. त्यापासून वस्त्र विणण्याचे साधन तयार केले. त्याला हातमाग म्हणतात. या वस्त्रांना रंग दिले. असेच एक वस्त्र भगवान विष्णूंना दिल्यावर ते म्हणाले, धन्य तुमही रे पद्मशाली तेव्हापासून हे तेलुगु विणकर स्वत:स पद्मशाली म्हणतात.

1900 सालापर्यंत या समाजाला स्थैर्य आणि त्यानंतर आर्थिक सुबत्ता आली. हातमागावरील चादरी भारतभर जाऊ लागल्या. त्यामुळे जुनी मिल (1876) एन. जी. मिल (1896) लक्ष्मी विष्णू (1910) जाम मिल (1909) सुरू झाल्या. तरीही हातमागचा दबदबा कायम होता. 1970 च्या पहाणीनुसार शहरात पाच हजार यंत्रमाग आणि 30 हजार हातमाग होते.

आर्थिक सुबत्ता आणि स्वतंत्र प्राप्तीमुळे राजकारणात तेलुगु समाज वरचढ ठरला. या समाजाने 1910 साली स्वत:ची बँक सुरू केली. या बँकेने गणेशोत्सव व्याख्यानमाला सुरू केली. प्रत्येक वक्त्याची उत्तम बडदास्त आणि भरघोस मानधन म्हणून नामवंत वक्तेही सोलापूरच्या औद्योगिक बँकेचे निमंत्रण मिळावे यासाठी धडपडत असत. खासदारांपासून नगरसेवकांपर्यंत उमेदवारी कोणाला याचा निर्णय बँकेत झालेल्या बैठकीत होत. पद्मशाली शिक्षण संस्था ही शहरातील सर्वांत मोठी शिक्षण संस्था आहे.

1985 पर्यंत हे सुरळीत चालू होते. वॉल हॅगिंग आणि शबनम पिशव्या ही अतिरिक्त उत्पादने ही भरघोस खपत होती. पंचतारांकित हॉटेल्स वाढली. नॅपकिनच्या ऑर्डर्स वाढल्या. त्या वेळीअशी परिस्थिती होती की ऑडर्स पुर्‍या करत येत नव्हत्या. लुम्स कमी पडत होते. मग एकदम हे सर्व उजाड कसे झाले?

राजकारण आणि संपत्ती यांचा संपर्क आल्यावर सदसदविवेक बुद्धी कमी होत जाते. येथे तसेच झाले. हातमागाकडून अनेकजण यंत्रमागाकडे वळू लागल्यावर हातमागाला संरक्षण देण्यासाठी सरकारने रिबेटची योजना राबवली. हातमाग उत्पादनाची विक्री केल्याची पावती दाखवताच तीस टक्के रिबेट मिळायचा. हेतू हा की हातमाग उत्पादने स्पर्धेत टिकावी. प्रत्यक्षात नुसत्या पावत्या फाडून रिबेट गिळायचा प्रकार सुरू झाला. बहुसंख्य हातमाग सोसायट्या याच मार्गाने गेल्या. समाजातील धुरियांनी हा प्रकार रोखण्याऐवजी दुर्लक्ष केले. बरीच लुटमार झाल्यावर सरकारनेच ही योजना बंदी केली. रिबेटवरच जगणार्‍यांचे हातमाग कायमचे बंद झाले. आता हातमाग फक्त अस्तित्व टिकवून आहे.

ही अपप्रवृत्ती मग वाढतच गेली. चार लुम्स आहेत त्यावर चार-चार बँकाकडून कर्ज उचलायचे हा प्रकार तर फारच झाला. यशवंत सोलापूर सहकारी शारदा अशा तीन सूतगिरण्या उभ्या राहिल्या. दोन अर्धवटच राहिल्या. या सूतगिरण्यांचे भवितव्य उत्तम होते. कारण शेजारच्या वळसंग येथील कै. विष्णू शिवदारे यांनी सुरू केलेली गिरणी आणि सांगेल्यात गणपतराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली चालू असलेली गिरणी दरवर्षी कित्येक कोटी रूपयांचा नफा अनेक वर्षे (सुमारे 35) मिळवत आहेत. मात्र पद्मशालींनी सुरू केलेल्या सर्व गिरण्या पाच ते सात वर्षांत प्रचंड तोटा येऊन बंद पडल्या. कारण सोपे होते. संचालक सूत उचलत पैसेच भर नसत. प्रत्येक संचालकाकडे सुताची लाखो रुपयांची थकबाकी शिवाय इतर खाबुगिरी, उधळपट्टी होतीच.

ही थकबाकी वाढली आणि शेवटी अशी अवस्था आली की, नव्याने कापूस आणायला पैसे नाहीत. कापूस नाही म्हणून यंत्रे बंद कामगार बसून, अशा वेळी याच लोकांची औद्योगिक बँक वेठीला धरण्यात आली. या बँकेने 18 ते वीस कोटी रुपयांचे कर्ज या गिरण्यांना दिले. दोन महिने गिरणी चालून पुन्हा बंद. बँकेची स्वत:ची थकबाकी (एनपीए) होतीच शिवाय गिरण्यामुळे एनपीए पन्नास टक्के झाले. बँकच भिकारी झाली. खात्यावर पैसे आहेत पण चेकचे पैसे वळते करायला पैसे नाही एवढी लाजीरवाणी अवस्था आली. रिझर्व्ह बँकेला स्वत:च्या कर्मचार्‍यांचे पगार करणेही अवघड झाले.

या बंद पडलेल्या गिरण्या चालू करण्याची घोषणा अकलूजच्या खासदार रणजीत मोहिते यांनी केली. शहरभर त्यांचे डिजीटल फलक लागले. पुढे काहीच झाले नाही. भाजपचे तत्कालीन खासदार सुभाष देशमुख यांनी ‘‘या गिरण्या आहे त्या स्थितीत माझ्याकडे द्या. मी कामगारांना एक महिन्याचा पगार उचल म्हणून देतो’’ असे म्हणत कापूस आणून गिरणी सुरू करण्याची तयारी दर्शविली पण त्यांना श्रेय मिळू नये म्हणून कामगारांचे थकीत पगार, विजेचे बिल, मागचे कापसाचे बिल, पीएफची रक्कम, बँक कर्ज हे सर्व करण्यापेक्षा मी नवीनच कारखाना काढतो असं म्हणत देशमुखांनी भडारकवठ्याला दुसरा साखर कारखाना काढला. आता बँकही बुडाली. बंद पडून यंत्रे गंजून गेली. साठ वर्षांपूर्वी जसा हा व्यवसाय घरगुती पद्धतीने चालू होता तसाच आज आहे. मध्यंतरी आलेली भव्यता क्षणभंगुर ठरली. ती टिकली असती तर वस्त्रोद्योगात आपण चीनला मागे टाकावे एवढी ताकद सोलापुरात होती. पण ते होणे नव्हते.

पद्मशाली नेतेमंडळी जशी कुचकामी निघाली तसेच सामान्य विणकरही रस्ता चुकला. 1930-35 चे समाजाच्या पंचकमिटीचे निवाडे पाहिले तर दारू पिण्यास दोन रुपये दंड ठोठावला. धार्मिक कार्यात येण्यास बंदी असे निकाल आहेत. आज विणकर कामगारात दारू न पिणारा कामगार शोधावा लागेल. दर बुधवारी पगार होतात. तो पगार त्याचदिवशी मटण दारूत संपतो. घरी बायका विड्या वळून प्रपंच सांभाळतात. नवर्‍याची कमाई दारूत म्हणून विणकरांच्या प्रत्येक घरात बायका विड्या वळताना दिसतात.

सोलापुरात यंत्रमाग व्यवसाय आहे. पण पूर्वीचे वैभव नाही. क्षीरसागर, चाटला, पुलगम, कोडम, कोडम अशा मोजक्या कुटुंबांनी धडाडीने हा व्यवसाय चालू ठेवला. त्यांच्या चादरी टॉवेल, नॅपकीन यांना मागणी आहे. पूर्वभागात फेरी मारली तर यंत्रमागाचा धडधडाट, बाहेर सूत वाळत घातलेले असे हस्य सर्वत्र दिसते. याच भागात विड्याच्या फाटक्या पानांचा कचराही विपुल प्रमाणात दिसतो. सोलापूरचे हवामान या व्यवसायाला पोषक, रेल्वे अशी भारतभर जाता येते. विमानतळ आहे. कसबी कामगार अमाप आहेत. खंबीर नेतृत्व लाभल्यास अजून गतवैभव पुन्हा प्राप्त होऊ शकेल, तूर्त तरी अस्तित्वाची लढाई चालू आहे.

– अरुण रामतीर्थकर
चपराक मासिक – व्यापार आणि उद्योग विशेषांक ऑक्टोबर 2011

चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email - Chaprak Email ID

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

हे ही अवश्य वाचा