ग्राहक राजा कधी होणार?

ग्राहक राजा कधी होणार?

– विनोद श्रा. पंचभाई
9923797725

‘ग्राहक राजा जागा हो’ किंवा ‘जागो ग्राहक जागो’ अशा प्रकारच्या जाहिराती आपण दूरदर्शनवर सतत बघत असतो. ग्राहकाला इंग्रजीत ‘कस्टमर’ असे म्हणतात. म्हणजेच जो कष्ट करत करत मरतो तो कस्टमर असे गमतीने म्हटले जाते. खरं तर आपल्या भारतात ग्राहकाची यापेक्षा वेगळी स्थिती नाही!

स्वातंत्र्यपूर्व काळात आपल्या देशात ‘उत्तम शेती, मध्यम व्यापार व कनिष्ठ नोकरी’ अशी म्हण प्रचलीत होती. आपला देश कृषीप्रधान असल्याने बरेच उद्योग शेतीवर अवलंबून होते. तेव्हा रोख पैशांचा व्यवहार कमीच होता, वस्तुविनिमय पद्धत वापरात होती. तसेच एकत्र कुटुंबपद्धती असल्याने मुलाने आपल्या वडिलांचा व्यवसाय पुढे चालू ठेवायचा हे ठरलेलेच असायचे. त्यामुळे बलुतेदारी पद्धतीने धान्य घेऊन वस्तु देणे असे प्रकार त्यावेळी चालायचे. सबब ग्राहक ही संकल्पना आपल्या देशात त्यामानाने उशिरा आली असं म्हणणं वावगं ठरणार नाही.

आपल्या देशात प्राचीन काळी बनारसची रेशीम, ढाक्याची मलमल, काश्मिरी शाली, सुरतचे जरीकाम इत्यादी उद्योग व कला प्रसिद्ध होत्या. विशेष म्हणजे त्याकाळी भारतात लोखंड व पोलाद यापासूनही वस्तू तयार करण्यात येत. पण तो मोठा उद्योग नव्हता. दिल्लीतील कुतुबमीनार जवळील लोहस्तंभ सुमारे 1500 वर्षांपूर्वी राजा विक्रमादित्याने उभारल्याचे आपला इतिहास सांगतो. एवढ्या वर्षानंतरही आज त्या लोहस्तंभावर उन्हा-पावसाचा परिणाम झाल्याचा दिसत नाही. पण युरोपातील औद्योगिक क्रांती व इंग्रजांच्या दुर्दैवी आगमनाने आपल्याकडील उद्योगधंदे व कला हळुहळू नामशेष होत गेल्या. भारतातील कच्च्या मालाच्या बदल्यात यंत्रनिर्मित मालाचा व्यापार वाढविण्याची सुवर्णसंधी धूर्त इंग्रजांना तेव्हा आयतीच मिळाली. त्यामुळे यंत्रनिर्मित पण गुणवत्ता नसलेल्या स्वस्त वस्तू त्यावेळी भारतीय बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात येऊ लागल्या. त्या झगमगाटाने आपला भारतीय ग्राहक भुलला. बघता-बघता इंग्रजांनी भारतीय बाजारपेठ काबीज केली आणि त्यामुळे इथूनच आपले परंपरागत उद्योगधंदे व अनेक प्रकारच्या हस्तकला यांचा र्‍हास होत गेला. स्वदेशी वस्तुंचा कितीही आग्रह धरला तरी त्या यंत्रनिर्मित आकर्षक विदेशी वस्तू स्वस्त मिळत असल्याने त्याकडे ग्राहकांचा ओढा जास्त असायचा.

आपल्या देशात कापड उद्योग हा आधुनिक पद्धतीने चालणारा पहिला उद्योग होता. तो स्वातंत्र्यापूर्वीच विकसित झाला होता व सर्वार्थाने स्वदेशी उद्योग होता. पण स्वातंत्र्याचे वेळी यंत्रे जुनी झाली होती, तंत्र सुद्धा जुनेच वापरले जायचे. यावर कडी म्हणजे चांगला कापूस पिकवणारा भाग नेमका पाकिस्तानात गेला. त्यामुळे मग हातमाग झपाट्याने मागे पडले व यंत्रमागांवर तयार होणारे कृत्रिम धाग्यांचे कापड तयार होऊ लागले. हे कापड महाग असल्याने ग्राहकांची कुचंबणा व्हायला लागली. कारण कापड उद्योगाला नियंत्रणमुक्त केल्याने जुन्या गिरण्या व हातमाग यांच्यावर अवकळा पसरली. त्यामुळे त्यावर अवलंबून असणारे कामगार व गरीब ग्राहक अक्षरश: पिचून गेलेत! आधुनिक यंत्रमागांची संख्या झपाट्याने वाढल्याने नवनवीन डिझाईन व फॅशनचे महागडे कापड बाजारात सर्वत्र दिसू लागले.

सद्यस्थितीत साखर, तेल, डाळी, वनस्पती इ. प्रकारच्या दैनंदिन गरजेच्या वस्तूंचे उत्पपादन त्यामनाने कमी, आणि याउलट टिकाऊ व ऐषारामाच्या वस्तूंचे उत्पादन वाढले आहे. त्यामुळे साहजिकच महागाईचा भडका उडालेला आपण बघतो आहोच. पर्यायाने त्याचा अतिरिक्त बोजा पुन्हा ग्राहकावरच पडतो आहे. हे मान्य करावेत लागेल. तरीही आपला माल खपवण्यासाठी व ग्राहकाला खुष करण्यासाठी व्यापार्‍यांचे निरनिराळे प्रयत्न सुरूच असतात. ‘जुना टी. व्ही द्या व नवीन घेऊन जा.’ ‘फ्रीज खरेदीवर इस्त्री फुकट’ अशाप्रकारची अनेक प्रलोभने दाखवून ग्राहकांना आकर्षित करणे सुरू असल्याचे आपल्या बघण्यात येते. हल्ली असे चित्र आपल्या देशात सगळीकडेच सर्रास दिसू लागले आहे. त्यामुळे आजघडीला प्रथमच भारतीय ग्राहकाला आपण ‘कोणीतरी’ असल्याची जाणीव झालेली आहे. पण दुर्दैवाने कारखानदारांची व व्यापार्‍यांची मनोवृत्ती मात्र जुनीच आहे.

खरे तर मालाचा दर्जा तसेच त्याबरोबर ग्राहकाचे समाधान हीच आजची गरज आहे. पण सगळा भर आजकाल जाहीरातबाजीवर दिला जातो. टी. व्ही.च्या विविध चॅनल्समुळे हे सोपे झाले आहे. अनेकदा तर कत्येक जाहिराती ह्या दिशाभूल करणार्‍याच असल्याचे आढळून येते. ‘प्रसंगी गोड बोलून, काहीही करून ग्राहकाच्या माथी एकदा वस्तू मारली की झाले’ अशा प्रकारची वृत्ती आता बदलणे आवश्यक आहे. पण बिचारा भारतीय ग्राहक हे सारे खपवून घेतो कारण याची त्याला सवयच झालेली आहे.

‘ग्राहकांचे म्हणणे नेहमी बरोबर असते’ असे सार्‍या जगभर मानले जाते. जेव्हा आपल्या भारतात हे मानले जाईल त्यादिवशी खर्‍या अर्थाने आपला ग्राहक राजा होईल हे निश्‍चित!

‘‘खुद को कर बुलंद इतना
कि हर तकदीर लिखनेसे पहले,
खुदा बंदेसे खुद पूछे
बता तेरी रजा क्या है।’’

– विनोद श्रा. पंचभाई
भ्रमणध्वनी : 9923797725

चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email - Chaprak Email ID

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

हे ही अवश्य वाचा