माझे माहेर...!

जिव्हायात्रा!

Share this post on:

स्वत:च्या व्याख्यानप्रवासाला गुरुवर्य राम शेवाळकर ‘जिव्हा यात्रा’ संबोधताना म्हणत असत की वडिलांकडून मिळालेल्या सभाधीटपणा या गुणामुळे त्यांच्याच वाणीचा वारसा मी आत्मविश्वासाने चालविला. सुरुवातीला थोडा त्रास झाला; परंतु पुढेपुढे आत्मविश्वास वाढत गेला. जे जाणवले, स्फुरले, वाचले, लिहिले ते ते सारे वाणीतून मांडताना आनंद वाटत असे. हाच आनंद श्रोत्यांपर्यंत पोहचविताना माझे वक्तृत्व बहरत गेले.

ही आवड आणि बोलण्याच्या ध्यासातून मी मराठवाडा, भारतात आणि पुढे जगातही फिरलो. प्रत्येक सफरीतील लहानमोठी गावे, तिथली माणसे, त्यांनी केलेले आतिथ्य या सर्वांचा जवळून परिचय झाला. या सर्वांमधून, या भ्रमंतीतून स्वतःच्या ज्ञानकक्षा रुंदावल्या, असे शेवाळकर सांगत. ज्ञानाच्या, अनुभवाच्या शिदोरीत प्रत्येक व्यक्तीने आपुलकीने दानाचे ओझे टाकले. त्यामुळे व्यक्तित्व बहरले.

प्रत्येक ठिकाणी श्रोतृवृंदाचे वेगवेगळे रूप त्यांना गवसले. ते म्हणतात की, ‘सध्या सर्वत्र अशी तक्रार किंवा कुरबुर कानावर पडते, ती म्हणजे अलीकडे भाषणाची आवड राहिली नाही. प्रकाशवाणीमुळे (दूरदर्शन) लोक घराबाहेर पडत नाहीत.’ ही तक्रार सर्वत्र समान असल्याचे सांगून शेवाळकर सांगत की, ‘उत्साहशून्य व निष्क्रिय कार्यकर्त्यांची ती सरावाची कुरकुर असल्याचे लक्षात येते, कारण या तक्रारीस छेद देणारे कार्यकर्ते व श्रोतेही अनेक ठिकाणी भेटतात. अशाच श्रोत्यांच्या उपस्थितीमुळे शरीरात वेगळीच स्फूर्ती येते, चैतन्य संचारते आणि त्यातूनच व्याख्यानही बहरते.’ स्वत:च्या व्याख्यानाबद्दल शेवाळकर म्हणत की, श्रोत्यांचे माझे अनुभव सामान्यपणे समाधानकारक आहेत. तसेच काही मोजके अनुभव वेगळेच ज्ञान देणारे आहेत. आपले व्याख्यान पडत चाललेले आहे, श्रोत्यांवरची पकड सुटली आहे, ही जाणीव व्याख्यान सुरू असताना होणे ही बाब अतिशय क्लेशदायक ! अशा वेळी वक्त्याने प्रयत्न करून पाहिले, तर ती केविलवाणी ठरते. असाच एक अनुभव राम शेवाळकर यांना आला तो त्यांनी कायम लक्षात ठेवला.

‘अमृताचा घनु’ हा शेवाळकरांच्या निरूपणाचा कार्यक्रम मंगेशकरांच्या साथीने प्रचंड लोकप्रिय झाला होता; परंतु एकदा हाच कार्यक्रम नेहमीच्या दर्जाप्रमाणे न झाल्याचे शेवाळकर सांगत, पुण्यामध्ये दगडूशेट हलवाई यांच्या शताब्दी सोहळ्यात प्रत्यक्ष गणपतीच्या साक्षीने तो अनुभव आल्याचे शेवाळकर सांगतात. त्या कार्यक्रमास प्रचंड गर्दी जमली होती, नेहमीप्रमाणे हृदयनाथ मंगेशकरांच्या साथीने तो कार्यक्रम सुरू झाला. काही मिनिटांत लक्षात आले, की श्रोते दाद देत नाहीत, त्याचे लक्ष नाही. दुसऱ्याच क्षणी लक्षात आले, की तेथे लतादीदी आणि आशाताईंची उपस्थिती आहे. त्यांच्या गायनाच्या कार्यक्रमाची ओढ श्रोत्यांना आहे. ही गोष्ट लक्षात येताच आम्ही तो कार्यक्रम आटोपता घेतला.

व्याख्यान कसे रंगले पाहिजे, याविषयी शेवाळकर लिहितात, की एखाद्या मजबूत गायकाचे गाणे खुलत जावे, त्याप्रमाणे मुरलेल्या वक्त्याचे व्याख्यान खुलत जाते. एकदा लय सापडली आणि श्रोत्यांची नाडी हातात आली, की मग त्याच्या व्याख्यानास बहर येतो. अनेकवेळा असेही घडते की, वक्ता बहरात आला, की बोलण्याच्या ओघात त्याने त्या व्याख्यानासाठी केलेली तयारी लोप पावते. मग त्याचे विवेचन आपोआप आकार घेऊ लागते त्यातून वक्त्यास स्वत:च्या नकळत नवनवीन विचार, कल्पना, प्रतीकं स्वयंस्फूर्तीने सुचतात. अशा स्वयंस्फूर्त विवेचनातून श्रोत्यांप्रमाणे वक्ताही मनसोक्त आनंद लुटतो.

व्याख्यानाच्या निमित्ताने आलेले अनेक गंमतीदार अनुभव शेवाळकरांच्या स्मरणात होते. एकदा एका तालुका स्थळी त्यांचे ‘कालीदासाची नाटके’ या विषयावर व्याख्यान होते. शेवाळकर व्यासपीठावर पोहोचले, समोर श्रोत्यांमध्ये तरुणांची प्रचंड उपस्थिती पाहून त्यांना वेगळेच स्फुरण चढले. तरुणाईमध्ये व्याख्यानाबद्दल आवड नाही ही भ्रामक कल्पना आहे, या विचारात शेवाळकरांचे व्याख्यान सुरू झाले. मात्र, काही मिनिटांतच त्यांचा भ्रमनिरास झाला. काही वेळातच त्यांच्या लक्षात आले, की समोरचे तरुण श्रोते हे व्याख्यान ऐकण्यासाठी जमले नाहीत तर ‘कालीदासाची नाटके’ या शीर्षकामुळे त्यांचा असा समज झाला होता, की प्रत्यक्षात नाटक आहे. त्यामुळे त्यांनी प्रचंड गर्दी केली होती.

कंधार येथील व्याख्यानाचा एक अनुभव शेवाळकर नेहमी सांगत. तेथील एका गॅदरिंगसाठी प्रमुख पाहुणे या नात्याने शेवाळकर नांदेडहून लोहा व नंतर लोह्याहून बस बदलून कंधारला निघाले. लोहा येथे बसमध्ये चढल्यानंतर ‘पाय ठेवायला जागा नाही’ हा अनुभव घेत ते कंधारला पोहचले. तिथे उतरल्याबरोबर काही कार्यकत्यांनी त्यांचे हार घालून स्वागत केल्याचे पाहून त्यांच्यासोबतचे अनोळखी सहप्रवासी आश्चर्यात पडले. तितक्यात बँड वाजायला सुरुवात झाली आणि कुणी तरी हाताच्या इशाऱ्याने शेवाळकरांना ‘चला’ असे सांगितले. बँड पथक मागे लेझीम पथक, मधोमध प्रमुख पाहुणे आणि संयोजक मुख्याध्यापक अशा रीतीने वाजतगाजत तो सारा लवाजमा संमेलनस्थळाकडे निघाला. रस्त्याने मुख्याध्यापक सर्वांना नमस्कार करून ‘चला, हेच ते पाहुणे…’ म्हणत शेवाळकरांकडे बोट दाखवित होते. ही परिस्थिती शेवाळकरांसाठी ओशाळवाणी होती, असेही शेवाळकर नमूद करीत.

शेवाळकर यांच्यापाशी व्याख्यानाच्या निमित्ताने आलेल्या अनुभवांची प्रचंड शिदोरी होती. त्यातले अनेक अनुभव त्यांनी शब्दबद्ध करून वाचकांसाठी खुले केले आहेत; शिवाय प्रत्येक अनुभवास शेवाळकरांचा खास मिश्कील टच असल्यामुळे त्या अनुभवांची लज्जत वाढली आहे.

एकदा राम शेवाळकर कार्यक्रमासाठी वणी येथून जळगावला जाण्यासाठी रात्रीच्या रेल्वेने निघाले. त्यासाठी पहिल्या वर्गाचे तिकीट त्यांनी काढले होते; परंतु ती पॅसेंजर आल्यावर समजले, की त्यादिवशी त्या गाडीला पहिल्या वर्गाचा डबाच नाही. अशा रीतीने झाला फजितीचा श्रीगणेशा ! धावाधाव करून पहिल्या वर्गाचे तिकीट तिसऱ्या वर्गाच्या डब्यासाठी बदल करून आणले. मिळालेल्या डब्यातील बर्थवर झोप घेतली. नांदुरा स्टेशनवर उतरून जळगाव जायचे म्हणून नांदुरा स्टेशन जवळ येताच शेवाळकर झोपेतून उठले. ते बर्थवरून खाली उतरले आणि त्यांच्या लक्षात आले, की त्याची नवी कोरी करकरीत चप्पल नाहीशी झाली आहे. कदाचित त्या पादत्राणाच्या तरुण रूपावर कुणी तरी भाळून तिच्यासह पलायन केल्याचे त्यांच्या लक्षात आले. नांदुरा स्टेशनवर ते अनवाणी उतरले. बाजारपेठ उघडताच दुसरा जोड घ्यावा व तोपर्यंत वेटिंगरूममध्ये थांबावे म्हणून ते प्रतीक्षालयात पोहचले. पाठोपाठ तपासणीस आले. त्यांना सर्वप्रथम चप्पल चोरीची कथा ऐकविली. कदाचित महाजन नावाचे ते साहेब शेवाळकरांचे नाव ऐकून असावेत. ते परत गेले आणि परत येऊन स्वत:च्या पायातील वहाणा शेवाळकरांकडे पोहचवत म्हणाले,

“ह्या घाला. जळगावचा कार्यक्रम करून परत या आणि जाताना माझी पादत्राणे परत करा.” शेवाळकरांनी ती पादत्राणे पायात सरकवली; परंतु मापाच्या बाबतीत अव्वाच्या सव्वा असा प्रकार होता. नाइलाजाने शेवाळकरांनी ती विजोड पादत्राणे स्वीकारली.

भावविभोर, गद्गद् व्हायला लावणारे अनेक प्रसंग तेवढ्याच तन्मयतेने शेवाळकर सांगत असत. एकदा बुलढाण्यास त्यांचे व्याख्यान होते. संयोजकांनी कार्यक्रमास तिकीट लावले होते. ‘ताटी उघडा ज्ञानेश्वरा’ या विषयावरील शेवाळकरांचे रंगलेले व्याख्यान संपले. कार्यक्रमास उपस्थित असलेले रा.ल.गुप्ते नावाचे कवी डोळे पाणावलेल्या स्थितीत शेवाळकरांजवळ आले. त्यांनी एक पाकीट शेवाळकरांच्या हातात दिले. त्या पाकिटात शेवाळकरांचे कौतुक करणारे पत्र आणि पाच रुपयांची नोट होती. त्यांच्या प्रेमाने शेवाळकरांनाही भरून आले.

हैद्राबाद येथे शेवाळकरांचे भासाच्या नाटकावर व्याख्यान संपताच श्रोत्यात असलेले लेले नावाचे एक म्हातारे सद्गृहस्थ शेवाळकरांजवळ आले. काहीही न बोलता त्यांनी नि:शब्दपणे शेवाळकरांना कडकडून मिठी मारली आणि अश्रुपूर्ण नयनांनी ते म्हणाले, “माझे उरलेले आयुष्य तुम्ही घ्या.” विचार करा, त्या तशा वाक्याने शब्दप्रभू, वात्सल्यमूर्ती राम शेवाळकरांची काय अवस्था झाली असेल?

नाशिक येथील साहित्य संमेलनातील परिसंवादाचा अध्यक्षीय समारोप करून महत्वाच्या कामासाठी राम शेवाळकर मुंबईला निघाले. निरोप घेण्यात, चर्चेत वेळ जाईल म्हणून सर्वांची भेट टाळून ते टॅक्सीमध्ये बसले. टॅक्सी हलकेच निघाली. तिने वेग घेण्यापूर्वीच टॅक्सीच्या काचेवर टकटक झाली. शेवाळकरांनी काच खाली केली. त्या अपरिचिताने, ‘मला तुमचा स्पर्श हवा आहे.’ म्हणत स्वत:चा हात पुढे केला. शेवाळकरांनी लगेच त्याच्याशी हस्तांदोलन केले आणि त्या परीसस्पर्शान तो इसम गद्गद होत असतानाच एक खादीधारी माणूस पुढे आला. तो माणूस काही बोलला नाही; परतु क्षणार्धात त्याने स्वत:च्या बोटातील सोन्याची अंगठी काढली आणि लगेचच ती अंगठी शेवाळकरांच्या बोटात घातली. पाणावलेल्या डोळ्यांनी तो सद्गृहस्थ दोन पावले मागे सरकला. काय झाले ते शेवाळकरांना समजलेच नाही. एका असमंजस स्थितीत शेवाळकर मूकपणे त्या अनोळखी इसमाकडे पाहत असताना त्याने स्वत:चे कार्ड शेवाळकरांना दिले. ते परभणीचे देवडे नामक पत्रकार होते.

व्याख्यानाच्या निमित्ताने शेवाळकर यांना सातासमुद्रापार जाण्याचे भाग्य लाभले. देशात अनेक ठिकाणी श्रोत्यांनी शेवाळकरांना त्यांच्या व्याख्यानानंतर अनेक वेळा जागेवर उभे राहून टाळ्यांनी मानवंदना दिली होती. असाच प्रकार अमेरिकेतील बोस्टन येथेही घडला. अमेरिकेतील शेवाळकरांचे पहिले भाषण संपते न संपते तोच सभागृहात उपस्थित असलेला चार-पाच हजारांचा जनसमुदाय स्वयंस्फूर्तीने उभा राहिला. त्यांनी धरलेला टाळ्यांचा निनाद अविरतपणे चार-पाच मिनिटे सुरू होता.

अशा सर्व अनुभवांवर शेवाळकर एका ठिकाणी दोन-तीन वाक्यांचा समारोप करताना म्हणतात की, ‘खरे म्हणजे हे पुण्य एखाद्या कालीदासाचे किंवा ज्ञानेश्वराचे! मात्र ते मोजक्यांच्या मनोभूमीत रुजविण्यात आपल्याला यश आले, एवढेच आपले श्रेय. प्रतिभावंत व सुहृदय यांच्यातील सेतुबंधन आपल्याला साधले.’ या कृतकृत्येची कमाई त्यांना आयुष्यभर पुरली.

राम शेवाळकर यांच्या नावावर पाऊणशेपेक्षा अधिक पुस्तकांची संख्या आहे. प्रत्येक पुस्तक लिखाणाच्यावेळी झालेल्या प्रसववेदना हा शेवाळकर यांनाच ठाऊक ! शिवाय त्यांच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे अनुभवही शेवाळकरांच्या शिदोरीत असणार. शेवाळकरांच्या रसिकांना मात्र त्यांच्या दोन पुस्तकांच्या प्रकाशन सोहळ्याचे प्रचंड अप्रूप आणि तितकाच अभिमान वाटतो. कोणत्याही मराठी रसिकाची मान ताठ करणारे दोन प्रसंग! त्यांतील पहिला सोहळा म्हणजे ‘अमृताचा घनु’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याचा. वास्तविक पाहता पंडित हृदयनाथ मंगेशकरांसोबत झालेला हा कार्यक्रम प्रचंड गाजला. लाखो रसिकांनी तो प्रत्यक्ष अनुभवला. हजारो लोकांनी तो ध्वनिमुद्रकावर ऐकला; पण अमृताच्या गोडी प्रमाणे ह्या कार्यक्रमाची गोडीही तितकीच अवीट ! हृदयनाथांनी शेवाळकरांना त्या कार्यक्रमावर पुस्तक लिहिण्याचे सुचविले.

राम शेवाळकरांनी ते पुस्तक लिहिले. त्या पुस्तकाचे प्रकाशन दीनानाथ सभागृहात गानकोकिळा लता मंगेशकर यांच्या हस्ते होण्याचा तो क्षण. सभागृहातील प्रमुख पाहुणे, कार्यकर्ते यांचे स्वागत बुक्का लावून आणि पांढरी टोपी घालून आगळ्यावेगळ्या ढंगाने झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी ‘ग्यानबा तुकाराम’ हा जयघोष करीत एक पालखी व्यासपीठावर आणली. ती पालखी प्रेक्षकांमधून व्यासपीठावर पोहचेपर्यंत उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात तिचे स्वागत केले. पालखी व्यासपीठावर ठेवण्यात आली. पालखीत एक कलश होता. तो काढून ठेवला. कलशावर असलेले फुलांचे आवरण दूर करीत लतादीदींनी कलशामध्ये ठेवलेला ‘अमृताचा घनु’ हा ग्रंथ बाहेर काढला. प्रेक्षकांना दाखविला. नंतर त्याच कलशामध्ये असलेली मोगऱ्याची पांढरीशुभ्र फुले प्रेक्षकांवर उधळली. एका मंगलमय, उत्साहवर्धक वातावरणात आणि न भूतो न भविष्यती अशा डौलाने त्या पुस्तकाचे प्रकाशन झाले.

डिसेंबर २००७ मध्ये राम शेवाळकर यांच्या ‘पाणीयावरी मकरी’ या आत्मचरित्र ग्रंथाचे प्रकाशन झाले. या प्रसंगाचाही असाच आगळावेगळा बाज होता. देशाचे प्रथम नागरिक, ज्यांचे दर्शन सामान्य नागरिकांस केवळ प्रसार माध्यमांच्याद्वारे होते असे व्यक्तिमत्त्व म्हणजे भारताच्या महामहिम राष्ट्रपती ह्यांच्या हस्ते पुस्तक प्रकाशन झाले. या कार्यक्रमास आणखी एक सोनेरी किनार अशी, की महामहिम राष्ट्रपती सौ. प्रतिभाताई पाटील या महाराष्ट्रीयन मराठमोळ्या महिलेच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन झाले, केवढा हा सोनेरी क्षण! कविकल्पना प्रत्यक्षात उतरल्याचा तो सोनेरी क्षण! राम शेवाळकर यांच्यासोबत त्यांच्या लेखणीसाठी आणि कुटुंबीयांसाठी एक गौरवास्पद क्षण!

नागेश सू. शेवाळकर, पुणे.
संपर्क ९४२३१३९०७१.

Author: चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email -

View all posts by चपराक >

4 Comments

  1. खूपच भावविभोर करणारे प्रसंग अधोरेखित केलेत शेवाळकर सर!
    नागपूरला असताना मी सुद्धा सरांच्या व्याख्यानाचा एकदा आस्वाद घेतला आहे. एवढा सुंदर लेख लिहिल्याबद्दल आपले अभिनंदन!

  2. अप्रतिम. शेवळकरांचे सर्व साहित्य वाचावे अशी आस निर्माण करणारा लेख.

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

error: Content is protected !!