या लेखकांनी पाडला आयुष्यावर प्रभाव

या लेखकांनी पाडला आयुष्यावर प्रभाव

‘‘आयुष्यात दु:ख येतं ते वळवाच्या पावसासारखं पण सुख मिळतं ते गुलाब पाण्यासारखं’’, ‘‘माणसाला सुखाचं संबंध वर्ष जेवढं शहाणपण शिकवत नाहीत तेव्हढं संकटाचा एक क्षण शिकवून जातं.’’, ‘‘माणसाची इच्छा ही नंदनवनातील कल्पकता नाही तर ती वाळवंटातील हिरवळ आहे’’ ही वाक्यं म्हणजे ज्ञानपीठकार वि. स. खांडेकर उपाख्य भाऊसाहेब खांडेकर यांच्या साहित्यसागरातील मोती होत. सुविचारांची रत्ने होत.

भाऊसाहेबांनी गरीबी अनुभवली. जवळून पाहिली. त्यामुळे गरिबांसाठी, दु:खीतांसाठी आस्था निर्माण करणारं साहित्य त्यांनी निर्माण केलं.

भाऊसाहेब खांडेकर – एक नंदादीप

अ. भा. मराठी साहित्य संमेलन 1941 मध्ये सोलापूरला भरले. या रौप्यमहोत्सवी संमेलनाच्या अध्यक्षपदी वि. स. खांडेकर विराजमान झाले.

संमेलनाच्या पूर्वसंध्येस त्यांनी शाळेतील मुलांशी गप्पा मारल्या. तेव्हा ते म्हणाले, ‘‘मुलांनो, दिवाळी फराळाची चव अधिच चाखायला मिळाल्यावर जो आनंद होतो तसा अनुभव तुम्ही घेत आहात. संमेलनापूर्वीच तुम्हाला संमेलन अनुभवायला मिळत आहे.’’

संमेलनातील भाषणात ते म्हणाले,

‘‘उत्कृष्ट वाङमय हा भावनाशील हृदयाचा उचंबळून आलेला उद्गार असतो. या उद्गारात जगातले दु:ख आणि दैन्य पाहून असह्य वेदनेने तळमळणार्‍या आत्म्याचा आक्रोश हवा. जगातील ढोंगे, आणि सोंगे पाहून हसणार्‍या मनाचा खळखळाट हवा. जगातले धैर्य आणि शौर्य पाहून उत्साहाने टाळ्या पिटणार्‍या हृदयाचा उत्कट आनंदही हवा. पाण्याची टाकी उंच असते. तशी मनाची उंची व अनुभवांचा साठा हवा.’’

भाऊसाहेब खांडेकरांचे विचारही उच्च पातळीचे असत. ते म्हणत ‘‘जग एकच आहे. ते श्रीमंतांचेही नाही आणि गरिबांचेही नाही. ते माणसांचे आहे. माणुसकी हेच या जगातले अमृत आहे.’’

संमेलन संपल्यावर लवकरच ते पुन्हा सोलापुरात आले आणि त्यांनी संमेलनाचा खर्च रु. 5771.11 आणे जनतेपुढे मांडला!

भाऊसाहेब कोकणातील शिरोड्यात शिक्षक होते. पगार होता वीस रुपये. गावात वीज नव्हती. कंदील विकत घ्यावा तर त्याची किंमत होती चार रुपये. एवढा खर्च करणे कठीण वाटत होते. मग सहा पैशाची जस्ताची चिमणी विकत घेतली. त्याच्या उजेडात त्यांनी रात्रीचे वाचन-लेखन चालू ठेवले.

बहु असोत सुंदर संपन्न की महा
प्रिय आमुचा एक महाराष्ट्र देश हा

हे गीत लिहिले श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांनी. ते होते खामगावात. हे गीत रचताना ते शिरोड्याला असलेल्या भाऊसाहेब खांडेकरांना सुयोग्य शब्द सुचविण्यास सांगत. भाऊसाहेब तारेन उत्तर पाठवित असं हे गीत ‘किर्लोस्कर’ मासिकात प्रसिद्ध झाले. त्याचे मानधन रुपये अडीच ह. शा. कोल्हटकरांना मिळालं व तारेचा खर्च झाला. रु. बावीस! पण मराठीत एक अद्वितीय गीत निर्माण झाले.

शिरोड्यात राहणार्‍या भाऊसाहेबांना मुंबईतील साहित्यिक विचारीत, ‘‘तुमच्याकडे कोणत्याही सोयी-सुविधा नसताना तुमचे साहित्य एवढे सकस कसे निर्माण होते?’’

त्यावर ते उत्तर देत ‘‘तुमच्याकडे नाही अशी माझ्याकडे खास गोष्ट आहे, ती म्हणजे शिरोडे हे खेडे.’’

माणसं वाचण्याचं कौशल्य भाऊसाहेबांकडे होतं. प्रत्येक माणूस हा कादंबरीचा विषय होऊ शकतो असा त्यांचा आत्मविश्‍वास होता. मोहरांचा हंडा सापडावा तसे शिरोड्यात त्यांना कथा विषय सापडले. तात्यासाहेब केळकर म्हणाले, ‘‘भाऊसाहेबांचं साहित्य म्हणजे प्राजक्त फुलांची परडी भरून गेल्याप्रमाणं आहे.’’

ग. प्र. प्रधान सर म्हणाले होते ‘‘भाऊसाहेबांची क्रौंचवध कादंबरी वाचून मी समाजवादी झालो.

मराठीला ज्ञानपीठ पुरस्कार

मराठी भाषेतील साहित्याला प्रथम ज्ञानपीठ पुरस्कार लाभण्याचे भाग्य भाऊसाहेबांच्या ‘ययाती’मुळे प्राप्त झाले. जगात भौतिक प्रगती होत असताना नैतिक अधोगती होत आहेे हे पाहून त्यांनी ही कादंबरी लिहिली. मानवी मन ही शक्ती आहे. नीतिची प्रगती मनाच्या विकारावर अवलंबून असते. जगात शांती केवळ सत्ताधार्‍यांच्या सदिच्छेने निर्माण होऊ शकत नाही. त्यासाठी देशाचे मनोविकार नियंत्रित केले पाहिजेत. ही कादंबरी म्हणजे ययातीची कामकथा, देवयानीची संसारकथा, शर्मिष्ठेची प्रेमकथा आणि भक्तीगाथा ही आहे. कामवासना, कामभावना, प्रीतीभावना, भक्तीभावना ही एकाच वासनेची अधिक सुक्ष्म, सुंदर, उदात्त आणि उदात्त होत जाणारी रुपे आहेत.

ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल कोल्हापूरच्या खासबाग मैदानात भाऊसाहेबांचा भव्य सत्कार आयोजित केला होता. त्यावेळी नामदार यशवंतराव चव्हाण म्हणाले ‘दोन ध्रुव,’ ‘पांढरे ढग’ या कादंबर्‍यांनी भाऊसाहेबांच्या कर्तृत्वाचे पारडे भरले होते. त्यात ययातीची भर पडली आणि पारडे पूर्णपणे जड झाले. ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. त्यांच्या साहित्यात अमावस्या नाहीच. सदैव पौर्णिमाच.

लेखण्या मोडा, बंदुका हाती घ्या!

मुंबई येथे 1938 मध्ये भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते स्वातंत्र्यवीर बॅरिस्टर वि. दा. सावरकर.

स्वातंत्र्यवीर सावरकर

तळपती आणि तळमळती भावनाही त्यांच्या लेखनाचा प्राण होता. त्यांनी शब्दांना केवळ सुगंध आणि कोमलताच तेवढी दिली नाही तर खड्गाची धार दिली., विद्युल्लतेचे तेज दिले. दाहकता दिली. प्रहारशक्ती दिली. साहित्य संमेलनातील अध्यक्षीय भाषणात ते म्हणाले –

‘‘साहित्य हे राष्ट्रीय जीवनाचे उपांग आहे. प्रथम संरक्षण हवे. राष्ट्राची मृत्युंजय यात्रा म्हणजे शस्त्रबळ. साहित्य नव्हे. जपानमध्ये प्राथमिक शाळेत सैनिकी प्रथम देतात. अलंकार शस्त्रानंतर. जपान, रशिया, मुस्लिम राष्ट्रे यांच्या बॉंबफेकीच्या वैमानिक हल्ल्याची काळछाया या मुंबईवर पडली आहे. आपण नृत्य, नाट्य, संगितात रंगून गेलो आहोत. मुंबईत गल्लोगल्ली जीर्ण साहित्य, नवसाहित्य, पुराणसाहित्य, पुरोगामी साहित्य, दुकाने थाटून राहीली आहेत. एक आणा मालेपासून सोळा आणे मालेपर्यंत कथा कादंबर्‍या वाचण्यात लोक गढून गेलेत. तिथे एकही बंदुकवर्ग नसावा? सैनिक महाविद्यालयत नाही? राष्ट्रसंरक्षणार्थ प्रथम रायफळ क्लबात घुसा. रडगाण्यांच्या नि रडक्यांच्या साहित्य संमेलनात नंतर. ते राष्ट्र खुरटे त्याचे साहित्यही खुरटे. पुढील दहा वर्षांत एकही सुनीत रचले नाही तरी चालेल. हजारो सैनिक खांद्यावर नव्या बंदुका टाकून टपटप चालताना दिसले पाहिजेत.’

स्वातंत्र्यप्राप्तीसाठी साहित्य

उत्तरक्रीया नाटकाच्या माध्यमातून यशवंतराव हे पात्र इंग्रज वकीलाला जे शब्द सुनावते ते वाचल्यावर सावरकरांचा बाणेदारपणा दिसून येतो. ते म्हणत,

‘‘तुम्ही अशी वल्गना करताना की ब्रिटीशांच्या साम्राज्यावर सूर्य मावळत नसतो. ब्रिटन कोणाचेही गुलाम झाले नाहीत. तर मग महाराष्ट्रही आज तरी कुणाचा गुलाम नाही. पण ब्रिटन पूर्वी कधीच कुणाचे गुलाम झाले नाहीत ही तुमची घमेंड मला तरी सांगू नका. रोमन लोकांनी ब्रिटनला आपले गुलाब केले होते कां नाही? ते रोमन सैन्य ब्रिटनला सोडून चालले तेव्हा ‘जाऊ नका, आम्हाला सोडून जाऊ नका, नाहीतर स्कॉच लोक आम्हाला मारतील, या भयाने रोमन लोकांचे पाय ब्रिटीशानीच धरले. सॅक्सन्सनी कोणाला जिंकले? ब्रिटीशांनाच! डचानी कोणाला गुलाम केले? ब्रिटनला! नॉर्मननी कोणावर स्वारी केली? ब्रिटनवर ! नॉर्मन लोक ज्याला वाईटातील वाईट शिवी द्यायचे त्याला ‘इंग्लिशमन’ म्हणजे गुलाम म्हणून म्हणत. ते दिवस इंग्रजांनी विसरू नयेत!’’

‘अठराशे सत्तावनचे स्वातंत्र्यसमर’ हे पुस्तक लिहून ते बंड नव्हते तर स्वातंत्र्यसमर होते हे मांडले. हे पुस्तक म्हणजे स्वातंत्र्यासाठी तरुणांना पेटविणारे साहित्य होते. तो इतिहास नव्हे तर क्रांतीवेद होता. पुस्तक छपाईपूर्वी त्यावर बंदी आली. सोलापूरच्या छापखान्यावरी जप्ती आली. परंतु पुस्तक हिंदुस्थानबाहेर पाठविण्यात आले. त्याची हॉलंड येथे छपाई झाली. दुसरी आवृत्ती हुतात्मा भगतसिंगांनी काढली. तिसरी आवृत्ती नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी काढली.

काळ्या पाण्याची शिक्षा भोगलेला एकमेव संमेलनाध्यक्ष
आपल्याला मिळालेल्या स्वातंत्र्याची किंमत समजावून घ्यायचीच असेल तर स्वातंत्र्यवीर सावरकरांच ‘माझी जन्मठेप’ हे पुस्तक वाचाव. अंदमानातील कारागृहात भोगलेल्या यातना, त्याही परिस्थितीत त्यांनी मनाचा पाळलेला संयम हे वाचल्यावर त्यांच्याबद्दलचा आदर शतगुणीत होतो. कागद लेखणी नसतानाही दगडाने भींतीवर कोरून तुरुंगात त्यांनी 8000 ओळींचे ‘कमला’ हे काव्य रचले. इंग्लंड, डोंगरी, ठाणे, येरवडा, रत्नागिरी येथील तुरुंगात मिळून 15 वर्षे 70 दिवसांचा कारावास सहन केला. शिक्षामुक्त झाल्यावर अस्पृश्यता निवारणाचे कार्य मनापासून केले.

एका समारंभात त्यांनी प्रिन्सिपॉल प्र. के. अत्रे यांना ‘आचार्य’ म्हटले. त्याच समारंभात आचार्य अत्रे सावरकरांना उद्देशून ‘स्वातंत्र्यवीर’ म्हणाले. दोन्ही पदव्या सर्वतोमुखी झाल्या.

मराठीमध्ये नवे शब्द रुढ करून, त्यांनी मराठीला समृद्ध केले. उदा. क्रमांक चित्रपट, बोलपट, नेपथ्य, वेशभूषा, दिग्दर्शक, प्राचार्य, प्राध्यापक, मुख्याध्यापक, शस्त्रसंधी, टपाल, दूरध्वनी, दूरदर्शन, ध्वनीक्षेपक, अर्थसंकल्प, विधीमंडळ, परिक्षक, तारण, संचलन, गतीमान, नेतृत्व, क्रीडांगण, सेवानिवृत्त, वेतन, महापौर, हुतात्मा, उपस्थित.

स्वातंत्र्यवीर सावरकरांचा गौरव करताना आचार्य अत्रे म्हणाले, ‘‘देशभक्ती हा दहावा रस मानला गेला तर त्या रसाचे जनक स्वातंत्र्यवीर सावरकर असतील’’ त्यांनी भूषविलेले साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद म्हणजे संमेलनाची शान वाढविणारे ठरले.

दहा हजार वर्षातून एकदाच निर्माण होणारं अफाट व्यक्तीमत्व आचार्य अत्रे

नाशिक येथे 1942 मध्ये संपन्न झालेल्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते आचार्य प्रल्हाद केशव अत्रे. त्यांचे ‘मी कसा झालो’ हे आत्मचरित्र म्हणजे माणसाच जीवनावर किती प्रेम असू शकत हे दाखविते. ते गुणांचे पूजक होते. भुंगे फुलांकडे धाव घेतात तसे ते गुणांकडे धावत. चांगल्या कार्याची ते तोंड भरून स्तुती करीत परंतु कोणी ढोंगीपणा केला तर त्याच्यावर प्रखर टीका करीत. एकाच व्यक्तीबद्दल चांगलं आणि वाईट लिहिण्याचे त्यांच्यावर प्रसंग झाले परंतु त्यांनी त्यात तडजोड केली नाही.

आचार्य अत्रे

ते म्हणत ‘‘माझ्या शब्दकोशात भय हा शब्द नाही’’ त्यांनी ‘हार आणि प्रहार’ पुस्तक लिहून याची प्रचिती दिली. महाराष्ट्र द्वेष केला म्हणून पंतप्रधान नेहरूंवर ‘जवाहर की जहर’ असा लेख लिहिला. याच व्यक्तीवर त्यांच्या निधनानंतर दहा अग्रलेख लिहून आदरांजली वाहिली. ‘कर्‍हेचे पाणी’ या आत्मचरित्रात ते म्हणतात-

‘‘मी जीवनाचा एक यात्रेकरू आहे. कसली ना कसली तरी पताका माझ्या खांद्यावर नेहमी असतेच. जन्मापासून माझ्या पायाला एकदा जे चक्र लागले आहे ते एकसारख फिरतेच आहे. जीवनाची मला विलक्षण जिज्ञासा आहे. सारे मला दिसले पाहिजे. सारे मला समजले पाहिजे, सारे मला आले पाहिजे हीच एक माझ्या जीवाची तडफड असते. जीवन म्हणजे प्रचंड मौज आहे. त्याचा कितीही आस्वाद घ्या, कंटाळा कधी येत नाही आणि तृप्ती होत नाही. जीवनाचा मला लोभ नाही, पण ओढ आहे. चोहोकडून ते मला हाका मारते आहे. बोलावते आहे. अनंत हस्तानी त्याला मिठी मारून ते आपल्यात सामावून घ्यावे असे वाटते. शाळेतून सुटलेल्या पोरांंच्या झुंडीप्रमाणे सार्‍या देहकलांना जीवनाकडे धूम ठोकावीशी वाटते.’’

लोकाना हसायला शिकविणारा साहित्यिक
सासवडला जन्मलेल्या अत्रे यांनी संस्कार घेतले ते घराणे, इतिहास व निसर्ग यापासून. त्या संस्काराचा वारसा त्यांनी सांभाळला. त्यात भर घातली. कारण अत्र्यांचा स्वभाव संस्कारशील तर मन संवेदनशील होते. पाण्यासारखे निर्मळ असलेले त्यांचे मन दिसेल ते टिपत राहिले. त्यातून त्यांचे जीवन समृद्ध आणि प्रवृत्ती झुबकेदार बनत गेल्या. नद्या, डोंगर, झाडे, किल्ले, देवळे यांच्या संगतीत ते वाढले. सकाळी अंगावर सोनेरी उन्हे घ्यायची, रात्री चांदण्या पाहत अंगणात झोपी जायचे. मध्यरात्री भैरोबाची सनई कानी पडायची. उशाला अष्टौप्रहर पुरंदर किल्ल्याचा पहारा असायचा. शेजारी सोपानदेवांची भक्तीवीणा सदैव वाजत असायची. या वातावरणात त्यांच्यामध्ये साहित्याची गोडी निर्माण झाली.

आचार्य अत्रे यांनी जीवनातील विविध क्षेत्रात नुसता प्रवेश केला असे नाही, तर त्या-त्या क्षेत्रातील शिखरे त्यांनी काबीज केली. कवी, विडंबनकार, शिक्षक, शिक्षणशास्त्रज्ञ, नाटककार, चित्रपटकार, पत्रकार, वक्ता, राजकारणी, साहित्यिक अशा अनेकविध नात्यांनी उभ्या आडव्या धाग्याप्रमाणे अत्रे हे नाव मराठी मनात गुंफलेले आहे.

साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष पदावरुन बोलताना ते म्हणाले, ‘जगातील ग्लान वदने प्रफुल्लीत करणे हे काम माझ्या लेखणीने केले’ विनोदी वक्ता म्हणून आचार्य अत्रे यांची ख्याती होती. सोपा विनोद हे त्यांचे वैशिष्ट्य होते. आपल्या साहित्यातून, सिनेमातून, नाटकातून, काव्यातून विनोदगंगा महाराष्ट्राच्या दर्‍याखोर्‍यात त्यांनी वहात ठेवली. विनोदाचे विविध प्रकार हाताळले. आपल्या प्रतिभेच्या जोरावर साहित्यात विनोदाचे रंगीबेरंगी इंद्रधनूष्य आचार्य अत्रे यांनी निर्माण केले. रसिकांची दु:खे कमी केली. तणावातून मुक्तता केली. आचार्य अत्रे म्हणजे महाराष्ट्राला सतत हसत ठेवणारे हास्यसम्राट होते.

पु. ल. एक आनंदयात्रा

एकदा शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे पु. लं. ना. म्हणाले, ‘‘पु. ल. तुम्ही म्हणजे हास्यविनोद करणारे. तुमच्या घरात नेहमी हास्याचे फवारे उडत असतील नाही? तुम्ही विनोद सांगताय. सुनिताबाई हसताहेत.’’ त्यावर पु लं नी उत्तर दिलं ‘‘बाबासाहेब, तुम्ही म्हणजे थोर इतिहासकार, तुमच्या घरात सारखं युद्ध चालत असेल नाही! निर्मलाताई लाटण घेऊन मागे लागल्यात आणि तुम्ही ‘नको नको’ करून या दालनातून त्या दालनात पळत आहात!’’ अशा पुलंच्या कोट्यांनी मराठी माणसाला हसत खेळत रहायला शिकविलं.

पु. ल. देशपांडे

जो जे वांच्छिल तो ते लिहो!
इचलकरंजी येथे 1974 मध्ये झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमलनाचे अध्यक्ष होते. पु. ल. देशपांडे. त्यांना मराठी रसिकांनी उत्स्फूर्तपणे पदवी दिली होती ‘अवघ्या महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व’. साहित्यिकाला आपले विचार मुक्तपणे मांडता आले पाहिजेत हे सांगताना ते म्हणाले, ‘‘जो जे वांछील तो ते लिहो ।’’

संमेलनाचा पदभार ज्येष्ठ लेखिका दुर्गाबाई भागवतांकडे सोपविताना ते म्हणाले,

‘‘हे म्हणजे सामान्य फौजदारानं डीआयजीकडं अधिकार सोपविल्यासारख झालं !’’


सहृदयी विनोद

मराठीत खूप विनोदी लेखक झाले पण पु. ल.च्या विनोदाचं वैशिष्ट्य म्हणजे तो हिंसक वा वैषयिक नव्हता. त्यात रसिकता होती. पु. लं. मध्ये एक लहान मूल सातत्याने दडलेले होते. त्यात हळूवार खोड्या करण्याची प्रवृत्ती होती. त्यांच्या ऐंशीव्या वाढदिवसानिमित्त त्यांचे अभिष्टचिंतन करण्यासाठी मी त्यांच्या मालती माधव या भांडारकर रस्त्यावील निवासस्थानी गेलो. रांगेत माझ्यापुढे एक लहान मुलगा होता. भाई व्हील चेअरमध्ये बसून शुभेच्छांचा स्वीकार करीत होते.

लहान मुलांसारखे त्यांचे डोळे लुकलुकत होते. खोडी काढण्याची संधी शोधत होते. माझ्या समोरचा मुलगा भाईंना म्हणाला, ‘‘आज माझाही वाढदिवस आहे’’

‘‘कितवा? ऐंशीवा का रे?’’

‘‘नाही आठवा’’

तेवढ्यात सुनिताबाईंचे मुंबईकर नातेवाईक आले. त्यांचं ठाकूर आडनाव जाणून पु. ल. लगेच एका खोलीकडे हात दाखवून म्हणाले ‘ठाकूरद्वार तिकडे आहे!’

पु.लं.च्या विनोदाला कारुण्याची झालर होती. त्यामुळेच चार्ली चॅपलीन हे त्यांचे आवडते नट होते. लग्नसमारंभात धावपळ करणारा नारायण आपल्याला खूप हसवतो. रात्री उशीरा त्याची बायको त्याच्या अंगावर पांघरूण घालते व वाचकांच्या मनामध्ये माणुसकीचा झरा पाझरू लागतो.

कोणताही गाजावाजा न करता पु. लंनी अनेक चांगल्या कार्यासाठी देणग्या दिल्या. रक्त काढण्याच्या यंत्रासाठी लीलाताई मुळगावकरांना रु. 40,000 दिले. के. ई. एम. हॉस्पिटलात अधिक खाटांची व्यवस्था करण्यासाठी रु. 65 लाख दिले. वडार इमारतीच्या लोकांना 45 घरे बांधून दिली. परितक्त्या स्त्रियांना मुद्रणालय काढून दिलं. रामोशी पारधी प्रकल्पास सहाय्य केले. बाबा आमटे यांच्या आनंदवनास सर्वतोपरी सहाय्य केले. विडी कामगार महिलांना घर बांधण्यास मदत केली. अर्जुनाचा भाला सदैव बाणांनं भरलेला तसे पुल आणि सुनिताबाई यांचे हात सदैव दानतीनच भरलेले. पु. लं. च्या साहित्यात मराठी जगतात आनंदाचे बगीचे उभारले. मंगेश पाडगावकरांनी त्यांच्याबद्दल पुढील ओळी रचल्या.

पु. ल. स्पर्श होताच दु:खे पळाली
नवा सूर आनंदयात्रा मिळाली
निराशेतून माणसे मुक्त झाली
जगू लागली हास्यगंगेत न्हाली
काटेरी वाटेतून गुलाब फुलविले

वर उल्लेखलेल्या साहित्य संमेलनाध्यक्षांच्या जीवनाकडे पाहिले तर अस लक्षात येत की त्यांचे बालपण गरिबीत गेले. अर्थप्राप्तीसाठीची वाट खडतर होती. परंतु प्रत्येकापुढे एक भव्यदिव्य ध्येय होते. ते गाठण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती होती. असा एक सुविचार आहे.

‘सर्व उत्तर जवळ असतील तर आत्मविश्‍वास प्राप्त होत नाही पण सर्व प्रश्‍नांना सामोरे जाण्याची तयारी असेल तर तो प्राप्त होतो’ या सर्व साहित्यनायकांनी अथक प्रयत्नांनी अडथळ्यांची शर्यत पूर्ण केली आणि यशाची शिखरेे पादाक्रांत केली. प्रेरणादायी, आनंददायी साहित्य निर्माण केले. लक्ष्मी प्रसन्न होईल का याची विवंचना न करता सरस्वतीची आराधना केली. सरस्वतीच्या वीणेतून आनंददायी झंकार उमटले. या साहित्यकृतीतून पृथ्वीवरील मराठी जगत सदैव आनंददायी होत राहील. व्यंकटेश माडगूळकरांनी म्हटलय पुस्तक ही उद्योगपतीपेक्षाही फार उदार असतात. ती देताना कधीच हात आखडता घेत नाहीत.

प्राचार्य श्याम भुर्के
94220 33500
मासिक साहित्य चपराक, मार्च 2010

चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email - Chaprak Email ID

5 Thoughts to “या लेखकांनी पाडला आयुष्यावर प्रभाव”

  1. Shubhangi Kaware

    खूप खूप छान वाटले लेख वाचून…शाळा, कॉलेज आणि ग्रंथालय, वरील लेखातील सर्व उल्लेखिलेल्या लेखकांची पुस्तके आत्ता पुन्हा वाचतोय अशी अनुभूती यावी अशी लेखाची जबरदस्त मांडणी ..लेखक आणि चपराक टीम ,,,, धन्यवाद.

  2. Vinod s.Panchbhai

    खूपच चतुरस्त्र लेखन. बरीच. नवीन माहिती मिळाली .

  3. Prashaant Thakare

    आचार्य अत्रे, स्वातंत्र्यवीर सावरकर, पु.ल. यांच्याबद्दल उभ्या महाराष्ट्राला अभिमान आहेच. आज हा लेख वाचून तो अभिमान अधिकच दृढ झाला!

  4. Bapu Rajale

    प्रेरणादायी आणि नवं साहित्य प्रेमींसाठी दिशादर्शक लेख….शब्द न शब्द वाचता वाचता दोन तास कसे निघून गेले , कळलेच नाही.
    .. खूप खूप धन्यवाद सर.

  5. सुहास परळे बिबवेवाडी पुणे

    अतिशय ओघवत्या भाषेत मांडलेले चार जेष्ठ आणि श्रेष्ठ संमेलन अध्यक्षांचे संमेलनातील योगदान आणि त्यांची साहित्य सेवा, यांची माहिती म्हणजे एक अपूर्व मेजवानीच जणु. धन्यवाद सर

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

हे ही अवश्य वाचा