ही वाट वैखरीची

ही वाट वैखरीची

माझ्या मनात वक्तृत्वाविषयीची आवड निर्माण करण्याचे काम प्राचार्य शिवाजीराव भोसले यांनी केले. त्यांचे व्याख्यान ऐकल्यानंतर शब्दशक्तीच्या अफाट ताकतीचा प्रत्यय मला आला. जाणत्या वयात मी त्यांच्या संपर्कात आलो. प्राचार्यांनी वक्तृत्वाची जी वाट चोखाळली, त्या वाटेने जावे असे मला वाटले. मी अभियांत्रिकी शाखेचा पदवीधर. तसा माझा साहित्याशी संबंध नव्हता पण साहित्यप्रेमाने आणि वेडाने मला या क्षेत्रात आणले. गेली पंधरा वर्षे अव्याहतपणे व्याख्यानाच्या निमित्ताने माझी भ्रमंती महाराष्ट्रात आणि बृहन्महाराष्ट्रात सुरू आहे. श्रोत्यांनी आणि संयोजकांनीच मला विषय दिले आणि मी बोलत राहिलो. व्याख्यानांच्या निमित्ताने माझी ग्रामीण भागाशी नाळ जोडली गेली. जिवाभावाची अनेक माणसे या प्रवासात भेटली. गमतीशीर अनुभव आले. या भ्रमंतीमुळे जे समाजदर्शन घडले त्यामुळे माझ्या जाणिवा अधिक समृद्ध झाल्या. भेटलेल्या माणसांनी, घडलेल्या घटनांनी मला लेखनासाठी अनेक विषय दिले. माझ्यासाठी लिहिणे आणि बोलणे परस्परपूरक ठरले. या निमित्ताने मला गावोगावच्या श्रवण संस्कृतीचे दर्शन घडले. व्याख्यानाच्या निमित्ताने वाट्याला आलेल्या अशाच काही अनुभवांची ही शिदोरी खास ‘चपराक’च्या वाचकांसाठी…!

ते अगदी उमेदवारीचे दिवस होते. वक्ता होण्याच्या इर्षेने येईल ते निमंत्रण स्वीकारण्याचा मी अक्षरशः धडाका लावला होता. एका तालुक्याच्या ठिकाणी रामनवमीच्या निमित्ताने नऊ दिवस व्याख्यानमाला व्हायची. त्यात मी यावे असा संयोजकांचा आग्रह होता. सर्व व्याख्याने ऐतिहासिक, पौराणिक आणि संत साहित्याशी निगडित विषयांवर होती. संत साहित्य हा आवडीचा विषय असल्याने मी तो विषय निवडला. मी दुपारीच त्या गावी पोहोचलो. एका टुकार लॉजमध्ये माझी व्यवस्था करण्यात आली होती. भिंतीचा रंग पार उडालेला. पोपडे निघालेले, एखाद्या गूढ वास्तुत आहोत याची जाणीव करून देत आवाज करीत फिरणारे पंखे असा सगळा माहोल होता. त्या छोट्याशा गावातली बर्‍यापैकी ती बर्‍यापैकी लॉज आहे असे संयोजकांच्या बोलण्यातून येत होते. डास, झुरळ आणि ढेकणांचा तिथे मुक्त संचार होता. संयोजन समितितल्या एकाच्या घरी जेवण करून मी लॉजवर येऊन पलंगावर पहुडलो.

एसटीचा प्रवास, त्यात खराब रस्ता त्यामुळे अंग शेकून निघालेले. माझा डोळा लागला. कानावर आवाज पडत होता. स्पीकरवरून व्याख्यानाची जाहिरात सुरू होती. टांग्यात बसलेला एक माणूस हातात माईक घेऊन चित्रपटाची किंवा तमाशाची जाहिरात करावी तशी जाहिरात करीत होता. गाजणारऽऽ गाजणारऽऽ गाजणारऽऽ प्रा. मिलिंद जोशी यांचे व्याख्यान राम मंदिरात गाजणारऽऽ सुरूवात घालवू नका, शेवट चुकवू नका. विषय ः आम्हा घरी धन, संत विचारांची रत्नेऽऽऽऽ आज सायंकाळी पाच वाजताऽऽऽ मला हसावं की रडावं तेच समजत नव्हतं. कानावर पडणारा तो आवाज अस्पष्टसा होईपर्यंत मी ऐकत राहिलो. त्या तंद्रीतच झोप लागली. जाग आल्यावर पाहिले घड्याळात चार वाजले होते. मी आवरायला सुरूवात केली. वेटरला सांगून चहा मागवला. पाच वाजून गेले तरी संयोजकांचा पत्ता नव्हता. साडेपाचला ती मंडळी आली. मला घेऊन ती मंदिरात गेली. तिथे वीस-पंचवीस वयस्कर बायका गाभार्‍यात

जनहित विवरी जनहित विवरी
कल्याण करी रामराया
रामराया, कल्याणकरी रामराया

अशी समर्थांची रचना सादर करत होत्या. मी रामाचे दर्शन घेतले. पुजार्‍याने मला नारळ आणि खडीसाखरेचा प्रसाद दिला. मी गाभार्‍यात प्रवेश केला तोच बायकांनी

हरे राम हरे राम, राम राम हरे हरे
हरे कृष्ण हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण हरे हरे

असं म्हणायला सुरूवात केली. गाभार्‍यात मध्यभागी एक उंच आसन होते. तिथे बसून मी व्याख्यान द्यावे अशी संयोजकांची इच्छा होती. मला बसून बोलण्याची सवय नव्हती पण पर्याय नव्हता. मंदिरात पंखे नव्हते. एप्रिलचे दिवस. गाभार्‍यावरचे पत्रे तापलेेले. त्यात मी जाकिट घातलेले. घामाच्या धारा निथळत होत्या. घाम पुसतच मी बोलत होतो. हळूहळू काही वयस्कर माणसे आली. वयस्कर बायकांपैकी काही जणींनी वाती वळण्यासाठी कापूस बरोबर आणला होता. त्यांचे काम सुरू होते. काहीजणींनी जपाची माळ आणली होती. पदराखाली ती माळ धरून, डोळे बंद करून जप करण्याच्या नादात त्या डुलकी काढून घेत होत्या. पुरूषांपैकी काहीजण मला संपूर्ण मुख दर्शन व्हावे इतक्या मोठ्याने जांभई देत होते. एकदोन माणसे मधुनच खाकरत होती. मंदिराच्या दूर कोपर्‍यात कुत्री केकाटत होती. अशा विलक्षण वातावरणात मी संत साहित्यावर बोलत होतो.

मंदिरात केवळ दर्शनासाठी आलेेले लोक जोरात घंटा वाजवून माझ्या व्याख्यानाला पार्श्‍वसंगीत देत होते. टाळ्या वाजवून रामऽऽ रामऽऽऽ म्हणत होते. तेवढ्यात वाद्यांच्या आवाजावरून एक मिरवणूक मंदिराच्या दिशेने येत आहे हे जाणवले. बँडवाले, चलो रे डोली, बिलनची नागीण वगैरे गाणी वाजवत होते. मिरवणूक मंदिराच्या जवळ आली तसा वाद्यांचा आवाज तीव्र झाला. त्या गोंगाटातही बोलणे भाग होते कारण व्याख्यान नावाचे कर्तव्य पार पाडायचे होते. ती एका वधुवराची वरात होती. मुडावळ्या बांधलेले ते दोघेही घामाने डबडबलेले होते. त्यांनी मुर्तीजवळ जात रामाला नमस्कार केला. ते दोघेही माझ्या दिशेने येत आहेत हे मला जाणवले. मी व्याख्यानाच्या शेवटाकडे आलो होतो. त्या दोघांनीही मला नमस्कार केला. मी डोळ्यानेच आशीर्वाद दिला. मला प्रदक्षिणा घालून ते जोडपं निघून गेलं. मी निश्‍वास सोडला. ‘चला सुटलो’ असा विचार मनात येत असतानाच तो नवरा मुलगा पुन्हा माझ्याजवळ आला. दहा रूपयाची नोट समोर ठेऊन पाया पडून निघून गेला. मला प्रचंड हसायला येत होतं.

व्याख्यान संपल्यानंतर सगळ्या बायका आणि माणसं पाया पडण्यासाठी पुढे आली तर काय करायचं? या विचाराने अस्वस्थ होतो. माझे बोलणे संपताच बायकांनी पुन्हा हरे राम हरे राम, राम राम हरे हरेचा घोष सुरू केला. त्या मंदिराचे पुजारी पुढे आले आणि म्हणाले, ‘‘आपण आताच ह. भ. प. मिलिंदमहाराज जोशी यांचे प्रवचन ऐकले. आपुलिया हिता। जो असे जागता॥ धन्य मातापिता तयाचिया॥ असं म्हणत माझा गौरव करीत त्यांनी आभार मानले. त्यांचे आभाराचे भाषण संपताच मी त्या आसनावरून धुम ठोकली आणि रामाच्या दर्शनासाठी गेलो; कारण मला नमस्कार चुकवायचे होते. त्या नवर्‍या मुलाने दहाची नोट समोर आणून ठेवली होती. समोर बसलेल्या बायकांनी आणलेल्या फुलपात्रात गहू आणि तांदूळ होते. मी आसनावरून उठलो नसतो तर त्या धान्यांच्या राशी माझ्यासमोर मांडल्या गेल्या असत्या. कार्यक्रम संपल्यानंतर संयोजक जेवण करून जाण्याचा आग्रह करीत होते. संध्याकाळचे सात वाजले होते. मी ताबडतोब पुण्याला परतण्याचा निर्णय घेतला. स्टॅन्डवर दोन सफरचंद विकत घेतली. ती खाताना सगळा प्रकार आठवून माझं मलाच हसायला येत होतं. व्याख्यानाच्या हव्यासापोटी वाट्याला आलेल्या यातनांची मालिका डोळ्यासमोरून पुढे पुढे जात होती. त्यानंतर मात्र मंदिरातील निमंत्रणे चौकशी करून, माहिती घेऊनच स्वीकारायची असं ठरवलं.

वाईला घाटावरती गणपती मंदिराबाहेर व्याख्यानमाला असते. संयोजक ही जमात वक्त्यांना कोळून प्यालेली असते असे माझे मत आहे. तिथे गेल्यानंतर संयोजकांनी सांगितले, ‘‘व्याख्यानाची वेळ सहाची आहे पण साडे सहाशिवाय कोणीही येत नाही.’’

मी सारखं घड्याळाकडं पाहतो आहे हे लक्षात आल्यावर ते म्हणाले, ‘‘जाऊया व्यासपीठावर. समोर श्रोते नसले तरी नाराज होऊ नका. कारण आमच्या इथे श्रोते बाजूच्या पायर्‍यावर बसतात. व्याख्यान आवडलं तरच समोर येऊन बसतात.’’

वक्त्याला ताण देण्याच्या सगळ्या युक्त्या त्यांना माहीत असतात. आम्ही व्यासपीठावर गेलो. व्यासपीठ म्हणजे एक उंच दगडी कट्टा. तिथे स्पीकर लावलेला. मागे बॅनर होता. परिचय-सत्कार झाला. व्याख्यानाला सुरूवात झाली. सारखे पायरीवर बसणार्‍या लोकाकडे पाहून बोलावे लागत होते. थोड्याच वेळात समोर बर्‍यापैकी लोक येऊन बसले आणि मी दीर्घ श्‍वास घेतला. तेवढ्यात एक भिकारी अगदी समोर येऊन उभा राहिला. काही केल्या तो हलायला तयार नव्हता. संयोजकांपैकी दोन-तीन जण पुढे आले आणि त्यांनी त्याला बाजूला नेले. पाहतापाहता आवार श्रोत्यांनी भरून गेले. योग्य ठिकाणी दाद मिळत होती. व्याख्यानानंतर अनेकजण आस्थेने भेटायला आले. व्याख्यानाच्या सुरूवातीला वाट्याला आलेला आलेला शीण कुठल्या कुठे निघून गेला. जाणकार आणि प्रगल्भ श्रोत्यांसमोर व्याख्यान दिल्याचा आनंद मिळाला.

खान्देशात चोपडा नावाचे गाव आहे. त्या गावातल्या व्याख्यानमालेला समृद्ध अशीच परंपरा आहे. जळगावहून पुढे या गावाला जावे लागते. या गावातील व्याख्यानमाला रात्री साडेनऊ वाजता असते. या व्याख्यानमालेचे वैशिष्ट्य म्हणजे वक्त्याच्या भोजनाची व्यवस्था हॉटेलमध्ये न करता एका श्रोत्याच्या घरी केली जाते.

चोपड्याच्या व्याख्यानाचा कार्यक्रम ठरला तेव्हा जळगावला असणार्‍या आमच्या एका ज्येष्ठ मित्राने त्यांच्या घरी येण्याचा आग्रह केला. आम्ही सकाळी सहा वाजता जळगावला पोहोचलो. त्या ज्येष्ठ मित्राच्या घरी गेलो. त्यांचा मुलगा नामवंत हृदयरोग तज्ज्ञ. घर आणि हॉस्पिटल एकाच ठिकाणी होते. घरी चहा घेतला. ते मित्र म्हणाले, ‘‘आता तुम्हाला एक खोली देतो. विश्रांती घ्या. जरा झोप झाली की जाऊ चोपड्याला.’’

मला वाटले घरातलीच एखादी खोली देतील; पण कसलं काय? त्यांनी एक मुलगा बरोबर दिला. त्या मुलाने हॉस्पिटलमधली एक खोली उघडून दिली. मला आणि माझ्या मित्राला हसू आवरत नव्हते. ते झुकणारे पलंग, शेजारी सलाईनचे स्टॅन्ड, ई. सी. जी. चा मॉनिटर असा सगळा थाट होता. ‘आलीया भोगाशी असावे सादर’ म्हणत आम्ही दोघे पलंगावर पहुडलो. रात्रभर प्रवासाचा शीण; त्यामुळे डोळा कधी लागला ते समजलेच नाही. थोड्याच वेळात तोंडावर घेतलेले पांघरूण कुणीतरी काढल्यामुळे जाग आली. पाहतो तर शेजारी नर्स उभी होती. शेजारच्या भिंतीवर टांगलेले रिकामे पॅड पाहत म्हणाली, ‘‘कधी ऍडमिट झालात? केसपेपर केला नाही का? उठून बसा. डॉक्टरच्या राऊंडची वेळ झाली.’’

एव्हाना माझा मित्रही जागा झाला. ‘‘आम्ही डॉक्टर साहेबांच्या वडिलांचे मित्र आहोत. त्यांनीच इथं झोपायला सांगितलं आहे’’, असं सांगितल्यावर त्या नर्सलाही हसू आवरेना. मी आणि माझा मित्र तर टाळ्या देऊन जोरजोरात हसत होतो. तिथेच आंघाळी केल्यानंतर, त्या मित्राच्या घरी नाष्ट्यासाठी गेल्यावर त्यांना सगळा प्रकार सांगितला. त्यांना वाईट वाटले आणि हसूही आले. त्यांच्या घरात रिन्युएशनचे काम सुरू होते म्हणून त्यांनी आमची व्यवस्था दवाखान्यातल्या एका खोलीत केली होती.

ते आम्हाला त्यांच्या गाडीतून चोपड्याला घेऊन गेले. गांधी नावाच्या एका वृद्ध जोडप्याच्या घरी आमची भोजनाची व्यवस्था केली होती. त्या माऊलीने रूचकर भोजन तयार केले होते. स्वतःच्या नातवाला जितक्या प्रेमाने जेवायला वाढावे तितक्या प्रेमाने त्यांनी जेवायला वाढले. त्यांना नमस्कार करून विश्रामगृहात निघताना माझेच डोळे पाणावले होते!

व्याख्यान रात्री साडेनऊला होते. नऊ वाजताच आम्ही तयार होतो. संयोजक न्यायला आले. सभास्थान म्हणजे मारूतीच्या मंदिराचा ओटाच. समोर खूप मोकळी जागा होती. नऊ वाजता तिथे चार-पाच माणसेही नव्हती. साडेनऊ वाजता हजार-दोन हजार लोक समोर होते. टाचणी पडली तरी आवाज होईल एवढी शांतता होती. अकरा-साडेअकरा वाजले तरी लोक घरी जायला तयार नव्हते. तन्मयतेने ऐकत होते. त्यांच्या रसिकत्वाला वाकून नमस्कार करावे असे वाटले.

बेळगावच्या परिसरातील मराठीप्रेमी लोक तिथे छोटी छोटी साहित्य संमेलने घेतात. ही संमेलने त्यांना ऊर्जा देत असतात. बेळगावच्या बेळगुंदी या गावात संमेलन होते. मला व्याख्यानासाठी निमंत्रित केले होते. बेळगावला एका हॉटेलात राहण्याची व्यवस्था केली होती. सदानंद चांदेकरांची आणि माझी तिथेच गाठ पडली. त्यांनाही विनोदी कार्यक्रमासाठी संमेलनात निमंत्रित केले आहे असे समजले. रात्री विश्रांती घेऊन त्या गावाला दुसर्‍यादिवशी जायचे होते. ठरल्याप्रमाणे गाडी आली. मी आणि चांदेकर निघालो. त्या गावात पोहोचल्यानंतर एका वृद्ध व्यक्तिचे निधन झाल्याची वार्ता कानावर पडली.

‘‘ह्यांची अंत्ययात्रा गेल्याशिवाय संमेलनाला सुरूवात होणार नाही. तासभर लागेल,’’

संयोजकांनी सांगितले.

आम्हाला कसलीच अडचण नव्हती. एका गृहस्थाच्या घरी आमची व्यवस्था करण्यात आली होती. आमच्या देखभालीसाठी असणारा कार्यकर्ता इतरांना फोन करून सांगत होता, ‘‘ते संमेलनवाले साहेब गावात आले आणि तो म्हातारा माणूस मेला की वो…’’ माझा आणि चांदेकरांचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता. साहित्याचे आणि साहित्यिकांचे समाजावर काय काय परिणाम होतात याचा प्रथमच उलगडा झाला होता.

त्या गृहस्थांची अंत्ययात्रा गेल्यानंतर मग शोभायात्रा, ग्रंथदिंडी निघाली. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात जे प्रोटोकॉल पाळले जातात ते पाळत उद्घाटन झाले. सगळं गाव संमेलनसाठी लोटलं होतं. लोकांचा उत्साह अमाप होता. त्यामागे साहित्याचे आणि भाषेचे प्रेम होते. दुपारी आलेल्या सर्वांना मोफत भोजन होते. भोजनानंतर श्रोत्यांची संख्या अजिबात कमी झाली नाही. उलट वाढतच गेली. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आपली भाषा, साहित्य आणि संस्कृती जपणार्‍या या लोकांना आदराने अभिवादन करून मी परतलो.

येडे निमाणी हे इस्लामपूर-कोल्हापूरच्या मधले असेच एक अनोखे गाव. या गावातली व्याख्यानमालाही रात्री आठच्या सुमारास असते. या व्याख्यानमालेसाठी आजूबाजूच्या गावातून लोक येतात. नियोजनातील शिस्त आणि श्रोत्यांचे गांभिर्य वाखाणण्यासारखे असते. व्याख्यान दहाच्या सुमारास संपते. दुसर्‍या गावाहून आलेले श्रोते त्यांच्या गावी पोहोचणार कधी? घरी जाऊन जेवणार कधी? याचा विचार करून येडे निपाणीतील लोकच या श्रोत्यांच्या भोजनाची व्यवस्था करतात. भोजन असेतसे नसते. पश्‍चिम महाराष्ट्राच्या संस्कृतीला साजेल असेच असते. चारीठाव स्वयंपाक केलेला असतो. पाहुण्यांचीही व्यवस्था याच श्रोत्यांबरोबर केली जाते. मी सहज संयोजकांना विचारले, ‘‘ही लोक या श्रोत्यांची व्यवस्था करतात त्यासाठी त्यांना गळ घालावी लागते का?’’

ते म्हणाले, ‘‘इथले लोक ही गोष्ट प्रेमाने आणि आनंदाने करतात. पुढील पाच व्याख्यानमालांचे बुकिंग आताच झाले आहे.’’ ही दानत पाहून मी भारावून गेलो. पुण्यासारख्या मोठ्या शहरात व्याख्यान संपले की संयोजक काढता पाय घेतात, पाहुण्यांच्या चहा-पाण्याची, भोजनाची जबाबदारी नको म्हणून! ग्रामीण महाराष्ट्रात उलटी गंगा वाहताना दिसते. श्रोत्यांना भोजन आणि विचारभोजन देणार्‍या व्याख्यानमालेच्या संयोजकाचे गाव ही येडे निपाणीची खास ओळख म्हणावी लागेल.

प्रत्येक व्याख्यान हे वक्त्यासाठी नवे आव्हानच असते. एक-दोन तासाच्या व्याख्यानासाठी पाच-दहा तासाचा प्रवास करावा लागतो. वैयक्तिक जीवनातील अडीअडचणी बाजूला ठेऊन त्याचा कसलाही ताण येऊ न देता प्रसन्न मुद्रेने सभेला सामोरे जावे लागते. सारखी आसपास माणसे घोटाळत असतात. त्यामुळे व्याख्यानापूर्वी चिंतनासाठी आवश्यक असणारा एकांत वाट्याला येत नाही. समारंभापूर्वी संयोजकांनी परवानगी न घेता इकडे भेट, तिकडे उद्घाटन असे असंख्य कार्यक्रम ठरवलेले असतात. त्यात बराच शक्तिपात होतो. अति आदरातिथ्याचाही अनेकदा बराच त्रास होतो; पण लोकप्रेमाला शरण जाण्यात धन्यता मानण्याखेरीज पर्याय नसतो. वक्त्याला भाषणापूर्वी दुपारच्या भोजनात जे सगळे पदार्थ दिले जातात त्यात आंबट दह्याची कोशिंबीर असते. आंबट ताक असते. तळलेले पदार्थ असतात. तेलाचा तवंग आलेल्या आणि खूप तेलाची फोडणी घातलेल्या भाज्या असतात. गोड पदार्थ आग्रह करून करून वाढले जातात. त्या वक्त्याची सत्वपरीक्षाच असते. घसा आणि पोट सांभाळणे हे एक दिव्यच वाटते. वक्त्याने पोटभरू खाऊ नये किमान व्याख्यानापूर्वी; असा एक संकेत आहे. तो धुडकावला जातो. हे सारे लोक मुद्दाम करतात असे नाही. त्यामागे प्रेम, आपुलकी, जिव्हाळा असतो. पाहुणे आपल्या घरी जेवायला येणार आहेत याचा आनंद असतो. सुरूवातीला हा आग्रह मोडवायचा नाही; पण आता आग्रहाला बळी पडायचे नाही असा निग्रह केल्यामुळे फारसा त्रास होत नाही.

वक्तृत्व आणि आरोग्य यांचा खूप जवळचा संबंध आहे. शरीरसाधनेशिवाय वक्तृत्वसाधना शक्य नाही. प्रवास, दगदग करून व्याख्यानाला सामोरे जाण्यासाठी आणि दीड दोन तास उभे राहून बोलण्यासाठी अंगात रग असावी लागते. व्यासपीठावर असणारे प्रखर दिवे, त्याभोवती घोटाळणारे नानाविध किडे या सार्‍यांचे भान राखत सभेला सामोरे जावे लागते. कधीतरी खाल्लेला बडीसोपचा तुकडा बोलता बोलता जिभेवर येऊन थांबतो आणि वक्त्याची चलबिचल वाढते. व्यासपीठावर लावलेल्या असंख्य उदबत्त्यांनी आणि धुपांनी हैराण होण्याची वेळही वक्त्यांवर येते. वर्षानुवर्षे धूळ न पुसलेल्या पोडियमला सामोरे जाताना व्याख्यान एक संकट वाटते.

वक्तृत्व हा केवळ शब्दांचा आणि विचारांचा खेळ नाही. तो खेळताना शारीरिक, मानसिक आणि भावनिक मेळही जमावा लागतो. वक्तृत्वात एक गाव जिंकण्याची एकदाच संधी मिळते. ती गमावली तर फारसे हाती लागत नाही. मी पहाटे पाचलाही व्याख्यान दिले. रात्री नऊलाही बोललो. तीन दिवसांच्या, पाच दिवसांच्या आणि आठ दिवसांच्या अशा सर्व प्रकारच्या व्याख्यानमाला माझ्या वाट्याला आल्या हा भाग्ययोग! स्वयंपाक हा जसा सतत केल्यामुळे जमतो तसेच भाषणांचेही आहे. एखाद्या सुगरणीचे कौशल्य वक्त्याच्या ठायी असावे लागते. वक्तृत्व म्हणजे केवळ शब्दांची आतषबाजी नसते तर ती जीवनाची उपासना असते.

– प्रा. मिलिंद जोशी
कार्याध्यक्ष, महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे
भ्रमणध्वनी – 9850270823
पूर्वप्रसिद्धी – चपराक दिवाळी अंक

चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email - Chaprak Email ID

8 Thoughts to “ही वाट वैखरीची”

 1. धनंजय गुडसूरकर

  अमोघ वक्तृवासोबतच अनुभवही तसेच…

 2. काव्यपरी

  खूप अनोखे अनुभव…खरेच आहे वक्तृत्वाने श्रोत्यांच्या मनाचा ठाव घेणे आणि सगळे मेळ बसवत व्यक्त होणे गरजेचे असते

 3. प्रल्हाद दुधाळ

  खूप मनोरंजक अनुभव, वाचताना हसूही येत होते. वक्त्याला काय काय सोसावे लागते ना?

 4. Suhas Parale bibavewadi Pune

  अविस्मरणीय अनुभव.पण पुढील काळात कसं वागावं हे शिकवणारा शिक्षक.

 5. priya dharurkar

  अनुभव कथन मस्तच शब्दांकित केले आहे,डोळ्यासमोर प्रसंग उभे होत होते.👍👌

 6. राहुल मोकाशी

  अतिशय अविस्मरणीय अनुभव.👌👌👌

 7. Ramesh Wagh

  व्वा,भन्नाट अनुभव आहेत.

 8. विनोद खटके

  बारामतीत गेल्या वर्षी मिलीं5 जोशी यांचे व्याख्यान अतिशय सुंदर झाले होते तसेच लोकसत्ता मध्ये येणारे बोधीवृक्ष मधील लेखही मनाला दिशा देणारे तुमच्या लेखन आणि वक्तृत्वाला सलाम

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

हे ही अवश्य वाचा