वारकरी संप्रदायाचे तत्त्वज्ञान

वारकरी संप्रदायाचे तत्त्वज्ञान

Share this post on:

मासिक साहित्य चपराक, दिवाळी 2019

भारतीय
भक्ती संप्रदायांमध्ये वारकरी संप्रदायाचे योगदान महत्त्वाचे आहे. पंढरपूरच्या श्रीविठ्ठलाला दैवत मानणार्‍या वारकरी संप्रदायास संत ज्ञानोबा माऊली व संत नामदेवरायांनी लोकप्रियता मिळवून दिली. संत ज्ञानेश्वरांपूर्वी वारकरी संप्रदाय अस्तित्वात असला तरी त्यांनी आपल्या ग्रंथातून व कार्यातून वारकरी संप्रदायास मूर्त रूप दिले आहे. ‘हे विश्वचि माझे घर’ अशी विश्वात्मक शिकवण ज्ञानेश्वर माऊलींनी दिली आहे. सामाजिक समतेचा व वारकरी संप्रदायाच्या भक्तिमंदिराचा पाया घालणार्‍या संत ज्ञानेश्वरांचे अभंग, ओवी, गवळण, विरहिणी, भारूड यामधून त्यांचे विश्वात्मक अंतःकरण प्रतीत होते.

आम्हा सापडले वर्म । करू भागवत धर्म ॥ असे म्हणणार्‍या व सगुण भक्तीत रमणार्‍या भाववेड्या संत नामदेवांनी कीर्तनाच्या माध्यमांतून बहुजन समाजात परिवर्तन घडवून आणले. वारकरी संप्रदायाची पताका पंजाबपर्यत पोहोचविण्याचे भूषणावह कार्य नामदेवरायांनी केले आहे. पंढरपूरच्या वाळवंटात सर्व जातीपातींच्या भक्तांना कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी एकत्र केले. आपण सर्व पांडुरंगाचे भक्त समान आहोत, आपणामध्ये कोणी लहान-मोठा नाही ही समानतेची शिकवण देऊन संत नामदेवांनी वारकर्‍यांमध्ये आत्मविश्वास निर्माण केला. यावनी आक्रमणाने आपले जुलमी फास महाराष्ट्राभोवती आवळलेले असताना महाराष्ट्राची अस्मिता जागृत ठेवण्याचे कार्य शांतिब्रह्म संत एकनाथांनी केले आहे. समाजात लोकशिक्षकाची भूमिका पार पाडत असताना त्यांनी भारूड, गवळण या माध्यमातून अशिक्षित समाजात जागृती घडवून आणली.

वारकरी संप्रदायाचे कळस असणार्‍या जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांची अमृतमय अभंगवाणी आजही आपणास दिशादर्शक आहे.

असाध्य ते साध्य करिता सायास । कारण अभ्यास तुका म्हणे॥

किंवा

‘जे का रंजले गांजले।
त्यासी म्हणे जो आपुले॥
तोचि साधू ओळखावा।
देव तेथेचि जाणावा॥

ही तुकोबांची अभंगवाणी सामाजिक समतेचा पुरस्कार करत आहे. आधुनिक साहित्यावर संत तुकोबांचा मोठ्या प्रमाणावर प्रभाव आहे व यापुढेही राहील. संत मुक्ताई, संत जनाबाई, संत चोखोबा, संत गोरोबा, संत सावतामाळी, संत सेना, संत नरहरी सोनार, संत बहिणा, संत निळोबा यांचेही कार्य वारकरी संप्रदायामध्ये महत्त्वाचे आहे. समाजात प्रबोधन घडवून आणण्यात व आध्यात्मिक लोकशाही निर्माण करण्यात वारकरी संप्रदायाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. वारकरी संप्रदायाची आचारप्रणाली व विचारप्रणाली संत ज्ञानेश्वरांच्या तत्त्वज्ञानावर आधारलेली आहे.

तत्त्वज्ञानाचे प्रधान प्रयोजन हे समाजामध्ये आदर्श जीवनप्रणाली निर्माण करणे हे असते. तत्त्वज्ञान ही केवळ विचारप्रणाली न राहता ती नीतिमूल्यांची जपणूक करणारी आचारप्रणाली बनावी हे भारतीय तत्त्वज्ञानाचे प्रयोजन आहे. वारकरी संप्रदाय हा भक्तिमार्गी संप्रदाय असून या भक्ती संप्रदायाने ‘अद्वैत’ तत्त्वज्ञानाचा पुरस्कार केलेला आहे. वारकरी संप्रदायाचा पाया रचण्याचे श्रेय संत ज्ञानेश्वरांना दिले जाते. संत ज्ञानेश्वरांनी ‘भावार्थदीपिका’ व ‘अमृतानुभव’ या ग्रंथातून जीव, जगत व जगदीश्वर याविषयी सांगितलेले तत्त्वज्ञान व परतत्त्वाच्या प्राप्तीसाठी सांगितलेला साधनामार्ग वारकरी संप्रदायास आधारभूत आहे. संत ज्ञानेश्वरांनी वारकरी संप्रदायाला तात्त्विक अधिष्ठान प्राप्त करून दिले. ‘एकनाथी भागवत’ व तुकाराम गाथेत ज्ञानदेवांच्या तात्त्विक दृष्टिचा विस्तार झालेला आहे.

संत ज्ञानेश्वरांच्या तत्त्वज्ञानाचा मुख्य गाभा औपनिषदिक आहे. शास्त्रनिष्ठा आणि आत्मनिष्ठा या दोन्हींचा समन्वय त्यांच्या तत्त्वदृष्टीत झालेला आहे. शंकराचार्यांच्या तत्त्वज्ञानाचा संत ज्ञानेश्वरांवर प्रभाव होता. संत ज्ञानेश्वरांच्या तत्त्वज्ञानाविषयी शं. वा. दांडेकर म्हणतात, ‘‘संत ज्ञानेश्वर हे जसे उच्च अधिकाराचे आत्मानुभवी संत होते, त्याचप्रमाणे ते फार थोर दर्जाचे तत्त्वज्ञानी होते. कित्येकांची कल्पना अशी आहे की आत्मानुभवी संत हा आत्मरस सेवनात गुंग होऊन राहतो व तत्त्वज्ञान हा एक बुद्धीचा खेळ आहे असे समजून तिकडे दुर्लक्ष करतो…’’ संत ज्ञानेश्वर महाराजांच्या तत्त्वज्ञानावर उपनिषदातील अद्वैतवेदान्ती, गौडपादीय, शांकरीय व नाथसंप्रदायी या चार प्रकारच्या तत्त्वज्ञानाचाच अधिक परिणाम झालेला आहे. संत ज्ञानेश्वर तत्त्वज्ञ म्हणून कसे श्रेष्ठ होते याचे विश्‍लेषण शं. वा. दांडेकर यांनी केले आहे.
भावार्थदीपिकेच्या (ज्ञानेश्वरीच्या) सुरूवातीला स्वसंवेद्य आत्म्याचे वर्णन आलेले आहे. आत्मा चैतन्यस्वरूप आहे. आत्म्याचे अस्तित्व सिद्ध करायला प्रमाणांची गरज नाही. आत्मा हा स्वत: सिद्ध व स्वसंवेद्य आहे. हे स्वसंवेद्य आत्मरूप हे अंतिम सत्य, म्हणजे परमात्मा म्हणून ज्ञानेश्‍वरीच्या सुरूवातीस परमात्म्याचे स्वरूप वर्णन करताना ते म्हणतात,


ॐ नमोजी आद्या ।
वेद प्रतिपाद्या ॥
जय जय स्वसंवेद्या ।
आत्मरूपा ॥

स्वसंवेद्य आत्म्याचे वर्णन करताना ‘अमृतानुभवातील’ मंगलाचरणात संत ज्ञानेश्वर म्हणतात,

यदक्षरमनाख्येयमानन्दमजकदम्।
श्रीमान्निवृत्तिनाथेति ख्यातं दैवतमाश्रये ॥

परमात्मा ज्यावेळी एकाकी,आत्मस्वरूपामध्ये मग्न झालेला असतो त्यावेळी तो अनाख्येय असतो.पण तोच ज्यावेळी स्वेच्छेने गुरू आणि शिष्य या दोघांची रूपे घेऊन या विश्वामध्ये वावरतो.ब्रह्मविद्येचा उपदेश करणारे निवृत्तिनाथ हे गुरू व मी त्यांचा आश्रित शिष्य आहे.वस्तू म्हणजे अंतिम सत्य.परमात्मा कोणत्याही प्रमाणांनी सिद्ध करता येण्यासारखा नाही.

दीपु दावि तयारे रची।
की तेणेचि सिद्धी दीपाची ॥
तैसी सत्ता निमित्ताची ।
येणे साच ॥

दिवा लावणारा दिव्यामुळे दिसतो की दिवा लावणार्‍यामुळेच दिव्याचे अस्तित्व सिद्ध होते? असा हा परमात्मा सच्चिदानंदरूप आहे. सच्चिदानंदपदाचे विवरण करताना माऊली म्हणतात, ‘सत्, चिद् व आनंद ही तीन पदे असली तरी ही तीनही पदे स्वरूपतः एकाच वस्तूची निदर्शक आहेत’. ज्ञानदेवांनी अमृतानुभवामध्ये विविध दृष्टांत देऊन हे पटवून दिले आहे.

कांति काठिण्य कनक ।
तिन्ही मिळोनि कनक एक ॥
द्राव गोडी पियुख !
अमृत जेवि ॥
उजाळ दृति मार्दन ।
या तिहींची उणीव ॥
हे देखिजे सावेन । कापुरीं एकी ॥
अंगे कीर उजाळ ।
कीं उजाळं तेचि मवाळ ॥
दोन्ही ना परिमळ !
मात्र जे ॥
ऐसे एके कापुरपणी ।
तिन्ही इथे तिन्ही उणी ॥
ह्यापरी आटणी ।
सत्तादिकांची ॥

कांती, कठीणपणा व सुवर्णतत्त्व हे तिन्ही मिळून एक सोनेच असते. पातळपणा, गोडी व अमृततत्त्व तिन्ही मिळून एक अमृतच. शुभ्रपणा, सुगंध व मृदुता तिन्ही मिळून कापूरच. त्याचप्रमाणे सत्ता, प्रकाश व सुख (सत्-चिद्-आनंद) हे तीनही एकात आटलेले असतात. वस्तुतः सच्चिदानंद हा शब्दसुद्धा अन्ययावृत्तिवाचक आहे. परमात्मा हा त्यापलीकडचा आहे.

एवं सच्चिदानंदु ।
आत्मा हा ऐसा शब्दु ।
अन्यव्यावृत्तिसिद्धु ।
वाचकू नव्हे ॥

परमात्मा आहे व नाही यांच्या पलीकडचा आहे. मग त्यास शून्य म्हणावे असे काही दर्शनकारांना वाटते. शून्यवादाचे खंडन करताना संत ज्ञानदेव म्हणतात, शून्य म्हटले तरी शून्य म्हणणारा शिल्लक राहतोच.

तरी कांही नाहीं सर्वथा ।
ऐसी जरी व्यवस्था ॥
तरी नाही हे पृथा ।
कवणासी पै ॥
शून्य सिद्धांत बोधु ।
कोणे सत्ता होय सिद्धु ॥
नसता हा अपवादु ।
वस्तुसी जो ॥

संत ज्ञानेश्वरांनी अमृतानुभवामध्ये शून्यवादाचे खंडण करताना पुढील दृष्टांत दिला आहे.


माल्हवितां दिवे ।
माल्हविते जरी माल्हवे ॥
तरी दीप नाही हे फावे ।
कोणासी पां? ॥
की निदेचेनि आलेपणे ।
निदेलें तें जाय प्राणे ॥
तर नीद भली हे कोणे। जाणिजेल? ॥
घटु घटपणे भासे ।
तद्भभंगे भंगु आभासे ॥
सर्वथा नाही तै नसे ।
कोणी म्हणावे? ॥

दिवा मालविल्यावर ज्याने दिवा मालविला तोच मालविला तर दिवा नाही हे कोणास कळेल? झोप आल्यावर झोपेतच त्याला मरण आल्यावर झोप चांगली झाली हे कोणास समजणार? तसेच घट दिसत असला व तो नाश पावला तर त्यावेळी पाहणार्‍यासह सर्वच नाश पावले तर घट नाही असे कोण सांगणार? असा समर्पक दृष्टांत देऊन संत ज्ञानेश्वरांनी शून्यवादाचे खंडण केले आहे.

परमात्मा आहे-नाहीच्या पलीकडचा असला तरी तो शून्य नाही. त्याचे अस्तित्व आहे. परमात्म्याचे अस्तित्व कसे आहे हे पटवून देण्यासाठी संत ज्ञानेश्वर पुढील दृष्टांत देतात.

जो निरंजनी निदेला ।
तो आणिकीं नाही देखिला ॥
आपुलाही निमाला ।
आठवू तया ।
परी जीवे नाहीं नोहे ।
तैसे शुद्ध असणे आहे ।
हे बोलणे न सहि ।
असे नाहीचे ॥

निर्जन अरण्यात झोपलेला मनुष्य तेथे कोणी नसल्याने दुसर्‍याचा विषय होत नाही पण त्यामुळे तो नाही असे होत नाही. तो असतोच. परमेश्वराचे अस्तित्वही असेच आहे. ज्ञानेश्वरीमध्ये या शून्यवादी बौद्धमतास गणेशाच्या हातातील स्वभावतःच मोडक्या दाताची उपमा दिली आहे.

एके हाती दंतु ।
जो स्वभावता खंडितु ।
तो बौद्धमत संकेतु ।
वार्तिकांचा ॥

संत एकनाथांनी शून्यवाद कसा स्वभावतः खंडित आहे हे ‘एकनाथी भागवत’ ग्रंथात दृष्टांत देऊन पटवून दिले आहे.


सुखसुखत्व जेथ नाहीं ।
तरी शून्यवाद आला पाही ।
शून्य जाणवले जियें ठायीं ।
ते तंव शून्य नव्हे की ॥
तैसे शून्य जेणे जाणितले ।
त्यास शून्य जाय केवी केले ।
आंख गणिता शून्य आले ।
परी गणकू शून्य नव्हे की ॥
यालागि शून्य संमतवादा ।
माथा नुधवेचि शब्दा ।
शून्य साक्षित्त्व शून्यवादा । नास्तिक्य आली ॥

स्वसंवेद्य आत्मरूप हे सर्वांच्या तळाशी आधारासारखे आहे. स्व म्हणजे देव व त्याची संवेद्यता म्हणजे देवी! तीच शिव आणि शक्ती. हीच जगाची मातापितरे होत. ब्रह्म व माया, पुरुष व प्रकृती या दोहींहून देव-देवींचे स्वरूप निराळे आहे. माया ही मिथ्या ब्रह्माची उपाधी आहे. देव आणि देवी ही निरूपाधिक आहे. देव आणि देवीस परस्सरांशी उपाधी नाही.

ऐसीं हीं निरूपाधिकें ।
जगाचीं जियें जनकें ।
तियें वंदिलीं म्या मूळिकें । देवोदेवी ॥

देव आणि देवी ही नावे भिन्न असली तरी एकच सत्ता दाखवितात.

दो ओठीं एक गोठी ।
दो डोळां एकी दिढी ।
तेविं दोघें जिहीं सृष्टी ।
एकचि जे ॥

दोन ओठ असले तरी शब्द एक, दोन डोळे असले तरी दृष्टी एक त्याप्रमाणे देव व देवी दोन पण त्यांचे अस्तित्व एकच असते.

जगाच्या स्वरूपाचा विचार करताना जगद् हे अविद्यारूप व अज्ञानकार्य आहे असे शंकराचार्य मानतात. ज्ञानेश्वरांच्या मते दृश्य जगत हे मिथ्या नाही. हे अज्ञानाचे कार्य नाही तर सच्चिदानंदप्रभूचा विलास आहे. चैतन्याची सहजक्रीडा म्हणजे जगत् आहे. जग परमेश्वराला झाकू शकत नाही. माणिकरत्नाच्या तेजाने माणिक झाकले जात नाही. पाणी पाहण्यासाठी त्याच्यावरचे लाटारूपी वस्त्र दूर करण्याची गरज नाही. अज्ञानाला अस्तित्व नाही हे दृष्टांताच्या आधारे संत ज्ञानदेव पटवून देतात.

लवणाची मासोळी ।
जरी जाली जिवाळी ॥
तरी जळी ना जळावेगळी ।
न जिये जेवीं ॥

मिठाचा मासा पाण्याबाहेर जगू शकत नाही तसेच पाण्यात विरघळण्याच्या शक्यतेमुळे तो तेथेही जगू शकत नाही. म्हणून दृश्य जगत हे मिथ्या नाही. अज्ञानकार्य नाही तर ते परमेश्वराचा क्रीडाविलास आहे.

पाणी कल्लोळाचेनि मिषें । आपणपें वेल्हावे तैसें ।
वस्तु वस्तुत्त्वें खेळों ये तैंसें ।
सुखें लाहो ॥

दृश्य विश्व हे क्षणभंगुर आहे हे सत्य आहे पण ते अर्धसत्य आहे. ही क्षणभंगुरता नूतनेसाठी आहे. परमात्मा प्राप्तीसाठी साधन म्हणून माऊलींनी कर्मयोग आणि भक्तियोग यांचे माहात्म्य ज्ञानेश्वरीतून विशद केले आहे. तत्कालीन समाजाचे अवलोकन करून वारकरी संतांनी कर्मयोगाचा पुरस्कार केला आहे. स्वर्गाच्या प्राप्तीसाठी यज्ञयाग, व्रतवैकल्ये व तीर्थयात्रा असे काही करू नका असे ज्ञानदेवांनी सांगितले आहे.


तुम्हीं व्रते नियमु न करावे । शरीराते न पीडावें ।
दुरी केंही न वचावें ।
तीर्थासी गा ॥

कर्मफळाच्या आसक्तीचा त्याग केलेले कर्म हेच निर्दोष म्हणजे शास्त्रविहित कर्म होय असे ज्ञानदेव म्हणतात. भक्तियोग वारकरी संप्रदायास संत नामदेव व संत ज्ञानदेवांकडून प्राप्त झाला आहे. माऊलींनी कर्मयोगाला भक्तिप्रमाणे ज्ञानाची जोड दिली. अद्वैतनिष्ठ कर्मप्रधान भक्तियोगाला सामाजिक अधिष्ठान प्रात झाले. वारकरी संप्रदायामध्ये समताधिष्ठित तत्त्वज्ञान आढळते. संत चोखोबा, संत गोरा कुंभार, संत जनाबाई यांनी केलेली अभंगरचना हे याचे चांगले उदाहरण आहे. जात-पात, उच्च-नीच असे भेद वारकरी संप्रदायात नाही. माऊली म्हणतात,

म्हणोनि कुळ जाती वर्ण ।
हें आगवेंचि गा अकारण ।
एथ अर्जुना माझेपण ।
सार्थक एक ।

वारकरी संप्रदायाचे तत्त्वज्ञान हे प्रामुख्याने ‘भावार्थदीपिका’ व ‘अमृतानुभव’ या ग्रंथातून प्रतीत होते. संतश्रेष्ठ तुकोबांपर्यत ज्ञानेश्वरांचे तत्त्वज्ञान पाझरत आले आहे. संत ज्ञानेश्वरांनी वारकरी संप्रदायास सुसंगत व तर्कशुद्ध असे तत्त्वज्ञान दिले आहे. संत ज्ञानेश्वरांच्या तत्त्वज्ञानाच्या आधारवर वारकरी संप्रदायाची इमारत उभी राहिली आहे. संपूर्ण विश्व हे विष्णुमय आहे हा वेदांताचा मुख्य सिद्धांत आहे पण वारकरी संतांनी तो केवळ व्यक्तिगत चिंतनाच्या पातळीवर ठेवला नाही. त्याला मानवतेचे अधिष्ठान दिले. ‘विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म । भेदाभेद भ्रम अमंगळ ॥ या अभंगातून जगद्गुरू संत तुकोबांचा मानवतावादी दृष्टिकोन प्रतीत होतो. आपल्याकडून कोणत्याही जीवाचा मत्सर घडू नये हीच विश्वात्मक शिकवण आहे. तुकोबांच्या वेदान्त तत्त्वज्ञानाविषयी डॉ. यशवंत साधू म्हणतात, ‘खोटे वेदांती जग मिथ्या आहे असे सांगून भोळ्या लोकांकडून द्रव्य उपटतात. वेदान्त ज्ञानांबद्दल दिशाभूल करून माया ब्रह्माची न कळणारी चर्चा करून वेदांत शास्त्राची विटंबना करतात. अशा धर्मठकांपासून सावध राहण्याविषयी तुकोबांनी बजावले आहे.’


माया ब्रह्म ऐसे म्हणती धर्मठक ।
आपणासारिखे लोक मागविले॥
विषयी लंपट शिकवी कुविद्या ।
मनामागे मांद्या होऊनि फिरे ॥

वेदान्ताचे खोटे प्रतिपादन करून समाजाचे शोषण करणारे विषयलंपट लोक आजही कमी नाहीत. अशा लोकांनीच वेदांतशास्त्राला बदनाम केले आहे.

संत ज्ञानेश्वरांच्या तत्त्वज्ञानाविषयी बा. रं. सुंठणकर म्हणतात, ‘संत ज्ञानेश्वर हे महाराष्ट्रातील सर्वश्रेष्ठ तत्त्वज्ञानी होऊन गेले. किंबहुना असेही म्हणता येईल की, 13 व्या शतकाच्या अखेरीस मध्ययुगातील हिंदी तत्त्वज्ञानाची परिणती महाराष्ट्रात ज्ञानेश्वरांच्या तत्त्वज्ञानात झाली होती. ज्ञानेश्वरांनी त्यांच्या पूर्वी अस्तित्वात असलेल्या सर्व तत्त्वज्ञानाचे आलोकन केले होते. सांख्यमत, शंकर, रामानुज, निंबार्क यांच्या पद्धती, काश्मिरी शैवमत, नाथपंथाचे तत्त्वज्ञान इ. सर्व तत्त्वप्रणालींचा खोल अभ्यास करून त्यांनी आपले तत्त्वज्ञान मांडले… त्यांच्या पद्धतीचा विकास करणारा तत्त्वज्ञ त्यांच्या परंपरेत पुढे निर्माण झाला नाही. नाही तर स्पिनोझा किंवा बक्ले यांच्याप्रमाणे तेही आधुनिक तत्त्वज्ञानाचे जनक म्हणून चमकले असते.’ आधुनिक तत्त्वज्ञानाचे जनक म्हणून संत ज्ञानेश्वरांची इतिहासात नोंद झाली असती हे बा. रं. सुंठणकर यांचे विधान सर्वार्थाने महत्त्वाचे आहे.

वारकरी संप्रदायाचे तत्त्वज्ञान विशद करताना संतसाहित्याचे गाढे अभ्यासक गं. बा. सरदार म्हणतात, ‘गीतेवर सुबोध व सुविस्तृत टीका लिहून संत ज्ञानेश्वरांनी हे तत्त्वज्ञान मराठीत आणले. एवढेच नव्हे तर आपल्या प्रतिभासामर्थ्याने सामान्य जनतेसमोर त्यांनी ध्येयजीवनाचा एक उज्ज्वल व स्फूर्तिदायक आदर्श निर्माण करून ठेवला. तत्त्वज्ञ, योगी, संत व साहित्यिक अशी त्यांची चतुर्विध भूमिका होती. तत्त्वज्ञानाची विवेकपरता, योग्याची निरामयता, संतांची भूतदया व साहित्यिकाची सौंदर्यदृष्टी हे गुण त्यांच्या ठिकाणी एकवटले होते’.

संतसाहित्याची फलश्रुती विशद करणार्‍या गं. बा. सरदार यांनी संत ज्ञानेश्वरांच्या तत्त्वज्ञानाचा गौरव केला आहे. सर्वसामान्यांपर्यत ज्ञानेश्वरांशी अद्वैत तत्त्वज्ञान पोहोचविले याविषयी वि. रा. करंदीकर म्हणतात, ‘मराठी वाङ्मयाच्या प्रारंभकाळातच तत्त्वज्ञानपर लेखन करण्याची एक विशिष्ट पद्धती ज्ञानदेवांनी घालून दिली. त्यांनी भावार्थदीपिकेसारखी गीताटीका लिहिली आणि अमृतानुभवासारखा स्वतंत्र ग्रंथही लिहिला… सर्वसाधारण माणसाला रूचेल आणि समजेल अशा पद्धतीने श्रीकृष्णाची गीता त्यांना सांगावयाची होती. त्यामुळे तत्त्वज्ञानातील गहन सिद्धांतांच्या शास्त्रीय विवेचनात ते शिरलेच नाहीत. तत्त्वज्ञान हे जीवनामध्ये प्रत्यक्ष आचरणात आणण्यासाठी आहे. तो केवळ तर्काचा किंवा विवेचनाचा विषय नव्हे अशी ज्ञानदेवांच्या मनाची धारणा होती. अद्वैताचा सिद्धांतही साधकबाधक प्रमाणांनी सिद्ध करण्याच्या जंजाळात न शिरता साक्षात्कारी पुरूषाला येणारा त्या अद्वैताचा अनुभव त्यांनी बोलका केला. सर्वसामान्य माणसांपर्यत तत्त्वज्ञानातील सिद्धांत पोहोचण्याची ज्ञानदेवांची ही एक निराळीच किंबहुना अपूर्व अशी पद्धत होती’.

वारकरी संप्रदाय समता, बंधुता व मानवता या मूल्यांची जोपासना करणारा संप्रदाय आहे. संत ज्ञानेश्वरांनी वारकरी संप्रदायास तात्त्विक अधिष्ठान दिले आहे. वारकरी संतांनी आपल्या विचारातून, कार्यातून समाजात प्रबोधन घडवून आणले. कीर्तन व प्रवचन, भारूड, गवळण या माध्यमातून समाजात विठ्ठल भक्तीचा मार्ग दाखविला. पंढरपूरच्या वारीला ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम’ असा गजर करत लाखो वारकरी पंढरपूरच्या पांडुरंगास भेटण्यासाठी दरवर्षी नित्यनेमाने जातात. वारीच्या माध्यमातून काही सामाजिक उपक्रम देखील राबवले जातात. संत ज्ञानेश्वर व जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा प्रभाव वर्तमानातील कीर्तनकारांवर असला तरी व्यावसायिक दृष्टिकोन व सुसंस्कृतपणाचा अभाव काही अपवाद वगळता आपणास जाणवतो. काही कीर्तनकारबुवा विनोदी शैलीतून कीर्तन व प्रवचन करतात. थोड्या वेळाचे मनोरंजन म्हणून अशा कीर्तनकारांना भक्तांचा अफाट प्रतिसाद व भरीव मानधन मिळते. अशा कीर्तनकारांनी गाडगेमहाराजांचा आदर्श घेऊन धनाचा लोभ सोडला पाहिजे. काही व्यावसायिक वाहिन्या कीर्तनाचा गजर करतानाच यातील भक्त आपल्याकडे आकृष्ट करत आहेत. अर्थात अशा झपाट्याने बदलत्या काळात सर्व क्षेत्रांचे मार्केटिंग झाले असताना त्याला कीर्तन कसे अपवाद असेल? वारकरी संप्रदायाच्या तत्त्वज्ञानापासून काही कीर्तनकार दूर गेल्यामुळे आध्यात्मिक क्षेत्रात व्यावसायिकतेला व विनोदी शैलीला बळ मिळाले असे आपणास म्हणता येईल.

संदर्भ ग्रंथ
* सार्थ ज्ञानेश्वरी- मामासाहेब दांडेकर, वारकरी शिक्षण संस्था, आळंदी * अनुभवामृत- ज्योत्स्नाटीका- बहिरट, सुविद्या प्रकाशन * एकनाथी भागवत- संपा कामत. रा. कृ, केशव भिकाजी ढवळे प्रकाशन, मुंबई * संत मंडळाचे ऐतिहासिक कार्य- सुंठणकर बा. रं. पॉप्युलर बुक डेपो * संतवाड्मयाची सामाजिक फलश्रुती- सरदार गं. बा, श्रीविद्या प्रकाशन * सांस्कृतिक संचित- करंदीकर वि. रा, मॅजेस्टिक प्रकाशन
* तुकाराम गाथेतील वेदान्त तत्त्वज्ञान (शोधनिबंध)-डॉ. यशवंत साधू * वारकरी संत चरित्रात्मक कादंबरी- राजेंद्र थोरात, संस्कृती प्रकाशन, पुणे * वारकरी संत दर्शन- राजेंद्र थोरात, संस्कृती प्रकाशन, पुणे

– प्रा.डॉ. राजेंद्र थोरात
संस्कार मंदिर महाविद्यालय, वारजे, पुणे
9850017495
मासिक साहित्य चपराक, दिवाळी 2019

Author: चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email -

View all posts by चपराक >

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

error: Content is protected !!