बाभूळकांड

बाभूळकांड

ऐश्‍वर्य पाटेकर
युवा साहित्य अकादमी पुरस्कार विजेते लेखक, नाशिक.
9822295672
मासिक ‘साहित्य चपराक’ दिवाळी अंक 2019

वारदात घडली तेव्हा एकही प्रत्यक्षदर्शी पुरावा नव्हता. भरदिवसा, भरगल्लीत बाभूळकांड घडवलं जातं अन् एकही साक्षीदार नाही! असं कसं होऊ शकतं? एकमात्र आहे की, माणसांचं जग सोयीनं आंधळं, मुकं, बहिरं होऊ शकतं याचा हा ढळढळीत पुरावा म्हणून आपण या घटनेकडं पाहू शकतो. होरपळून मेलेले पक्षी, त्यांच्या चोचीतून उठणारे अतीव वेदनेचे अंतिम चित्कार कुणीच ऐकले नाहीत! अग्नीच्या ज्वाळा आकाशाला भिडल्या असतील, त्याही कुणी पाहू नये! ही न पटण्यासारखी सबब. शेवटी पक्ष्यांचं जग माणसांच्या दृष्टिनं अतिशय क्षुल्लक! त्याची दखल ती काय घेणार? ज्यानं बाभूळकांड घडवलं त्यास ठाऊक होतं की झाड तोडण्याला गुन्हा आहे मात्र जाळण्याचा गुन्हाच कायद्याच्या दप्तरी नाही. म्हणूनच घटनास्थळी पोलीस पोहचून पंचनामा केला जात नाही.
तसंही हे पशू-पक्ष्यांचं जग माणसाच्या मुठीएवढं! त्याची का तमा बाळगायची अन् खंत करायची? ज्या बाभूळकांडात काही पशू-पक्षी बचावले, काही कायमचे जायबंदी झाले त्यांनी हे निमूटपणे स्वीकारलं. कुणाचा पाय, कुणाचा पंख, कुणाची चोच जळाली. कित्येक दगावले. त्यांची नेमकी संख्या तरी कशी सांगणार? काही आयुष्यभराचे अधू झाले. तरी आपापल्या खोप्यात निमूट. माणसाच्या जगाच्या थोडं दूर वस्ती करुन राहिले. जे घडलं त्यास भागधेय समजून त्याचा स्वीकार केला पण घडलेली घटना ही काही एखादं स्वप्न नव्हती; त्यामुळे तिचे ओरखडे वेळेवर उमटणारचं. घटना घडली त्या काळात एक चिमणी गर्भार होती. दिसामासी अंड अन् अंड्यातून पिलू.
जन्म होताच पिलाला घडलेल्या घटनेचा इतिहास कळला. ज्या बाभूळकांडात त्यानं त्याची आजी अन् बाप गमावला होता तो शांत कसा बसणार? पशू-पक्ष्यांनी जरी ते एक वाईट स्वप्न होतं त्याला घडून बरेच दिवस उलटले आहे असं समजून घेतलं होतं पण चिमणीच्या पिलानं त्या इतिहासाला चोच लावली. त्यानं त्याची चोच उघडून ब्र उच्चारला. पशु-पक्ष्यांचं अतोनात दुबळं जग हादरलं. त्यांनी तात्काळ त्याची चोच बंद केली. त्यामुळं तर पिल्लू आणखीनच कातावून उठलं. त्याचं कातावून उठण्याचं कारण नुसतं बाभूळकांड नव्हतं. त्याला आपल्या दुबळ्या समाजाची विलक्षण चीड आली. अन्यायच्या विरुद्ध आवाज उठवायचं सोडा, ती त्या घटनेला अन्यायच जर समजत नव्हती याचा पिलाला जास्त संताप आला. तो विस्तवासारखा ढणढणून चिवचिवाट करु लागला. त्यानं जोर लावून चोच उघडलीच,
‘‘का बंद करताहेत माझी चोच!’’
‘‘तू आमचं जगण मुश्कील करशील?’’
‘‘कुठलं जगणं सांगताहात तुम्ही! हे लुळंपांगळं? यास जगणं म्हणायला तरी कसे धजावतात तुम्ही!’’
‘‘तू आम्हाला शिकवू नकोस, कालचा पोर तू!’’
‘‘तुम्ही माझं कितीही खच्चीकरण केलं तरी मी हटणार नाही!’’
‘‘काय करायचं ठरवलं आहेस तू?’’
‘‘मी उठाव करणार!’’
त्याचं जग तर आणखीनच हादरलं. त्यांना कुठल्यातरी भीषण भयाची सूचनाच वाटली ही. त्यांना कळलं की हे पिलू मोठाच घोळ घालून ठेवील. माणसं आपल्यावर डूख धरुन आपल्याला नष्ट करायचे बेत आखतील. वाळवंटांत आपण हद्दपार झालो आहोत आणि दाण्यापाण्यावाचून आपण तडफडून तडफडून मरतो आहोत असं खूप वाईट दृश्य त्यांच्या डोळ्यासमोर तरळलं. त्यांनी चिमणीला धमकावलं. तंबीच दिली की याची नुकतीच फुटलेली चोच जराशी साळून काढ, पंखंही कमी कर अन्यथा याची चोच मोठाच घात करेल अन् पंखंही वाटेदार असतीलच! त्यांना माहिती होतं की चिमणी समजदार आहे. तीच त्याला नेमकं वठणीवर आणेल.
पिलाला समजून सांगण चिमणीसाठी अवघड होतं. तीही हे मनोमन जाणून होती पण प्रयत्न करुन पहायला काय हरकत आहे? शिवाय सगळा समाज विरोधात आहे म्हटल्यावर पिलानं हे ऐकायलाच हवं.
‘‘ताऊ! चल बाळा मी तुला उडण्याचं प्रशिक्षण देते!’’
‘‘आई, मला नाही शिकायचं उडणं!’’
‘‘अरे, असं कसं! तुला तुझे दाण मिळवावे लागतील!’’
‘‘काय करायचं ग दाणे मिळवून!’’
‘‘तुला या जगात जगता यावं म्हणून!’’
‘‘आई माझी नाही इच्छा अशा मेलेल्या जगात जगायची. जिथं अन्याय तो कळत नाही, मेलेल्यांच्या जगून तरी काय करणार?’’
‘‘अविचार करतो आहेस तू!’’
‘‘म्हणजे ज्याचा बाप, ज्याची आजी ज्या कांडात मारली गेली त्यानं बोलणं अविचार समजतेस आई तू!’’
चिमणी कळून चुकली की हे पिलू ऐकणार नाही. आई म्हणून त्याच्या जीविताची तिला धास्ती असणं साहजिकच होतं मात्र तिलाही आतून वाटायचं की आपलं पिलू रास्त आहे अन् त्यानं आपल्या भूमिकेवर ठाम रहावं! पण माणसाच्या विरोधात लढणं हे काही सोपं नव्हतं हेही ती जाणून होती. कित्येक पिढ्यांच्या गोष्टी तिला ठाऊक होत्या. हट्टाला पेटलेल्या या पिलाला समजावणार कसं? तिनं दोन दाणे चोचीत आणले अन् पिलास म्हणाली, ‘‘उघड चोच बाळा!’’
‘‘नाही आई!’’
‘‘हट्ट सोड लेका!’’
‘‘का जाळलं माणसानं बाभळीचं झाड? ज्यावर आपलं जग होतं अन् ते मोठ्या गुण्यागोविंदानं नांदत होतं अन् एका क्षणात विध्वंस घडवून आणला गेला!’’
‘‘अरे त्या झाडाचा मालक तो माणूस होता, ते त्याचं झाड होतं!’’
‘‘त्यानं त्याच्या पोटावरच्या मातीवर उगवून आणलं का आई!’’
‘‘त्याच्या सातबार्‍यावर होतं!’’
‘‘कसला सातबारा? त्या कागदावर काय माणसाचा आत्मा चिकटून ठेवला होता का?’’
‘‘तिथला रिवाज आहे तो!’’
‘‘म्हणे रिवाज! मेल्यावर असला रिवाज काय मढ्यावर घेऊन जळतो का तो माणूस?’’
समाजाचा जीव भांड्यात पडल्यासारखा झाला. ते निर्धास्त झाले. हे वाटून की चिमणीनर चांगलं धमकावून काढलं असेल पिलू. उठावाचं भूत उतरवून ठेवलं असेल त्यानं. म्हणे अन्याय-बिन्याय! माणसाच्या जगात रहायचं आहे अन् त्याच्याशी पंगा घ्यायला उठलं होतं हे अविचारी पोर. माणसानं आपली भूक त्याच्या टाचेखाली धरुन ठेवलीय. भूक महत्त्वाची. अशा उठावा-बिठावानं काय दाणे मिळणार का? जे मेले त्यांची भरपाई होणार का? नव्या रक्ताचा गुण आहे हा! जागतिकीकरणानं माणसांसारखी आपल्याही पशु-पक्ष्यांची बुद्धी सडवली. मती चळवली. म्हणूनच की काय, चिमणीत चिमणी अन् कावळ्यात कावळा राहिला नाही… अशी बरीच खळखळ पंखांच्या फडफडाटात अन् चोचीच्या चिवचिवाटात चालूच होती…
पिंपळाच्या झाडावरची त्यांची सभा बरखास्त होणार तेवढ्यात पिलू त्यांच्याकडंच येताना त्यांना दिसलं. त्यांना वाटलं माफी मागेल, नमल्यासारखं दिसतंय खरं! बाजूला येऊन मुकाट बसलं. बाकीचे उगा घसा खाकरून अन् पंख झाडल्यासारखं करुन जागच्या जागी बसले. जसं काही घडलंच नाही, काही झालंच नाही असा आवही आणला गेला. पिलाची काहीच प्रतिक्रिया जाणवेना म्हणून लोकाचा विरस झाला. बरं, काही कळायलाही मार्ग नाही. लोकांची चुळबूळ वाढली पण चोचीतल्या चोचीत. काय करावं? असा आविर्भाव हरेकाच्या चेहर्‍यावर! नेमका कसा छडा लावायचा की पिलाची उठावाची आग शांत आहे की धुमसतं आहे? हे कसं कळणार? त्यांना उगाच वेठीस धरल्यासारखंही एकवार वाटून गेलं. शेवटी त्यातला एक जण न राहवून बोललाच,
‘‘पोरा, समजदार आहेस तू! असंच शहाण्यासारखं वाग!’’
त्याच्या मनाचा कल आता खरा कळणार होता. शेवटी हा प्रश्न विचारून ज्यानं कोंडी फोडली त्याला आपलीच पाठ थोपटून घ्यावीशी वाटली. मग आणखी एक दोघांनी आपल्या चोची उघडल्या,
‘‘नाहीतर काय पंखांनी उडणं शिकायचं वय तुझं!’’
‘‘अन्याय-बिन्याय असं काही नसतं!’’
‘‘विसरून जा बाभूळकांड!’’
हा प्रश्न पडताच लोक अदमास घेते झाले. त्यासाठीच तर केव्हाचा खटाटोप चालला होता. फक्त विषयाला तोंड फोडता येत नव्हतं. हाच प्रश्न सोक्षमोक्ष लावेल पिलाच्या मनात काय चालू आहे याचा! पिलानं चोच उघडली, सार्‍यांनी श्वास रोखला.
‘‘बाभळीचं झाड म्हणजे आपली पृथ्वी, आपली जमीन!’’
बॉम्ब फुटल्याचा धमाकाच होता हा! जे नको व्हायला तेच होणार. इतक्यावेळ वाटलं की पिलू जागेवर आलं असेल पण तसं काहीच झालं नाही! म्हणजे आपला विध्वंस निकट आहे. या पिलाला काहीही करुन समजावलेच पाहिजे. त्यातल्या एकानं पुढाकार घेतला,
‘‘आपलं म्हणून जे काही असतं; ते माणसाच्या जगात. आपली फक्त चोच असते, पंख असतात!’’
‘‘तुम्ही निर्बुद्ध आहात! तुम्ही समजूनच घेतलं नाही जग! भूक लागली की दाणे वेचायचं, एवढंच तर ठाऊक तुम्हाला! चोच फक्त दाणे वेचाव्यास लागते या समजुतीनं तुम्हास दुबळं केलं. हेच तुम्ही पिढ्यान्पिढ्या ठसवलं. चोचीनं उच्चार केला जातो हे ठाऊकच नाही तुम्हाला!’’
आता काय बोलणार या नतद्रष्ट पिलासमोर! असं म्हणून ते चूप बसले. मात्र त्यांनी पिलाची दहशत घेतली की हा आपला विनाशकाल लवकरच ओढवून आणीन! काहींनी त्याच्या आईला दूषणं दिली. काही म्हणाले, ‘‘बाप नसलेलं पोर हे असंच उंडगं निपजणार!’’ त्याच्या आईला वाईट वाटलं की लोकानी तिच्या संस्कारावर बोट ठेवून तिला खोटं पाडलं. तिच्या पिलाचं योग्यच होतं पण कुणी समजून घेत नव्हतं. ती त्याच्या जवळ येवून उभी राहिली. ती आता त्याच्या सोबत होती ही जाणीव पिलाला होताच त्यास सत्तर हत्तीचं बळ आलं. आता आभाळाचा बाप आला तरी तो त्याच्या निर्णयापासून हटणार नव्हता.
‘‘मी उठाव करणार तुमच्यासह किंवा तुमच्याशिवाय!’’ गर्जनेसारखी घोषणाच त्यानं दिली.
त्याचं जग कलकल करु लागलं. त्यांच्या पायाखालची फांदी सरकली. चोची सरसावू लागलं. डोळे रागानं लाल करुन त्याच्यावर धावून आलं. प्रसंगावधान ओळखून चिमणीनं आपली पंखाची भिंत केली अन् ती दोघांमध्ये उभी राहिली. या जगास चिमणीचं हे अवसान नवं होतं. ते डोळे विस्फारून पाहू लागलं. चोची गळून पडल्यासारखं, सारेच नुसते जागच्या जागी उभे राहिले. इतका वेळ म्हातारा कावळा हे शांतपणे पाहत होता. म्हातार्‍या कावळ्याला पिलाचं म्हणणं अगदी रास्त वाटत होतं! पण त्याच्या पाठीमागं उभी राहण्याची त्याची शक्ती क्षीण झाली होती. बाभूळकांडात त्याला त्याचा एक पंख गमवावा लागला होता. त्या दु:खाची धग तो अजूनही विसरला नव्हता. त्याच्या मनाची आगही शांत झाली नव्हती. त्या होरपळीनं त्याचं होत्याचं नव्हतं केलं होतं. त्यानं पुढं येऊन पिलाला अनुमोदन दिलं.
समाज आवाक् झाला. नाहीतरी कावळ्याच्या वडीलधार्‍यापणाला त्यांच्यालेखी महत्त्व होतंच. पिलाचं उठावाचं म्हणणं, त्याचं पोरगळ म्हणून सोडून दिलं होतं पण आज आपला नेताच त्याच्याबरोबर उभा राहिला म्हटल्यावर बाकीचेही क्षणाचाही विलंब न लावता सामील झाले. सकारात्मक काहीतरी घडेल अशी खात्रीही त्यांना मनोमन वाटली. सारेच घोषणा देवू लागले. पंखाचा फडफडाट करुन क्रांतीचा आगाज बाभूळकांडात होरपळलेल्या आभाळाच्या तुकड्यापर्यंत पोहचला…
मुंग्यांचा एक मोठाच मोठा जथा आला आणि पिलाला म्हणाला की या उठावात आम्हीही तुमच्यासोबत आहोत. बाभूळकांडाची झळ आम्हालाही पोचली आहे. आम्हाला तो वचपा काढायचाच होता. एवढं म्हणून त्या थांबल्या नाहीत. त्यांनी मुंगळ्यांच्या दारावरही दस्तक दिली. मुंगळ्याचाही भला मोठा जथा हजर झाला. पिलू बेहद खूश झालं. मुंग्या आणि मुंगळ्यांचं हत्यार आपल्या उठावाचं यश निश्चित करणारं ठरू शकतं हे त्यानं जाणलं.
पिलू आपल्या समाजाला उद्देशून म्हणालं, ‘‘मुंग्या आणि मुंगळे आपल्या सोबत आहेत याची जराशीही भणक माणसाला लागता कामा नये. अन्यथा क्रेझी लाईन खडूनं तो लक्षणरेषा यांच्याभोवती उमटवून यांचं काम तमाम करु शकतो. माणूस मर्यादा हेरून वार करायला महापटाईत आहेत.’’
सगळ्यांनी गुप्तता पाळण्याचा शब्द पिलास दिला. मुंग्या आणि मुंगळ्यांच्या रूपानं मिळालेली ही कुमक खूप मोठं हत्यार आहे माणसाच्या विरुद्ध वापरासाठी. आपल्याला हत्याराची जमवाजमव करायची आवश्यकताच नाही. माणूस हत्याराची जमवाजमव करेल मात्र ती कुचकामी ठरेल! तलवारीनं, बंदुकीनं, पिस्तुलानं तो मुंग्यांवर कसा काय वार करु शकेल? त्याला उगाच एक गोष्ट आठवली. राजाच्या नाकावर बसणार्‍या माशीची! राजानं सेवकास आज्ञा दिली, माशीला ठार करण्याची. सेवकानं क्षणाचाही विलंब दवडू न देता तलवारीचा वार केला. माशी उडून गेली. राजाचं नाक मात्र कापलं गेलं! पिलानं सेवकाला बोल लावण्यापेक्षा एकजात माणसाच्या निर्बुद्धपणाचा अनुमान काढला; त्यास हसूही आलं…
बाभूळकांड ज्या तारखेला घडवलं गेलं होतं तोच दिवस उठावाचा ठरला. जो आजपर्यंत काळा दिवस म्हणून आपण पाळत आलो तोच दिवस क्रांतीचा दिवस म्हणून पाळायचा. म्हणजे ठरलं असं की जो म्हातारा कावळा आहे, ज्यास वडीलधारेपणाचा मान आहे तो बाभळीचा दामोका म्हणजे ‘बी’ बाभूळ जाळल्या गेली; खरंतर उखडल्या गेली असंच म्हणायला हवं! तर त्याचं जागेवर ते लावण्यात येईल. शांततेच्या मार्गानं हा प्रश्न सुटला तर युद्ध करायची आवश्यकता नाही हे पिलाच्या आईनं म्हणजे चिमणीनं ठरवलं. सगळ्यांना ते मान्यही झालं. मात्र असं काही माणूस जर मानायला तयार नसला तर युद्ध अटळ आणि ते होणारच ही पिलाची पुष्टी!
इकडं माणसानंही अतोनात जनता जमा करुन ठेवली होती. त्याला युद्ध हवंच होतं… सैन्याचे दोन तट. एक माणसाचा अन् एक पशु-पक्ष्यांचा…
अचानक वार्‍याचा नूर पालटला. ते बेफाम वाहू लागलं. ढगांनी रौरौवत भीषण चेहरे धारण केले. क्षितिजाच्या नेपथ्यावर विजेनं ज्वाळांचं तांडव सुरु केलं कारण पृथ्वीच्या इतिहासात पहिल्यादा असं काही घडत होतं. मानव आणि पक्षी यांच्यात घनघोर युद्ध होणार होतं…
वार्‍याचा नूर जरा शांत झाला पिलू माणसांच्या जमावाला सामोरं गेलं. त्यानं शक्य होईल तितक्या मोठ्या आवाजात माणसांना बाभूळकांडाची हकीकत सांगितली. त्यातील कित्येक माणसाची हृदयं द्रवली, कित्येकांच्या डोळ्यात पाणी आलं. ती माणसं युद्धाच्या बाजूला झाली. साहजिकच त्या माणसामध्ये माणूस शिल्लक होता. आता पक्त तो क्रूर माणूस अन् त्याच्या नात्यागोत्यातली माणसं उरली होती. जी त्याच्या पापात वाटेकरी होण्यास आली होती. पिलाला माणसाच्या जगाचं हे फार वाईट वाटलं की वाईट वागलेल्या माणसाच्या कृत्याचं समर्थन करण्यासाठी त्याच्या जातीपातीतली माणसं त्याच्याबरोबर उभी राहतात! ज्यांचा या कृत्याशी कुठलाही संबंध नव्हता तरी त्याच्या पाठी उभे राहिले पण त्याच्या मनाला ही खूप मोठी तस्सली मिळाली की आपली हकीकत ऐकून ज्यांच्यात माणुसकी शिल्लक आहे अशी माणसं तरी बाजूला झाली. शेवटी युद्ध अटळ आहे. हे त्यानं पाहिलं. आईनंही त्यास संमती दर्शवली अन् पिलानं युद्धशंख फुकलं.
असं घनघोर युद्ध झालं की पृथ्वीही तिच्या आसाभोवती अतिशय वेगानं फिरली. तलवारी नाचू लागल्या. बंदुकीच्या फैरी उठू लागल्या. जरा वेळ काहीच दिसेना. असा जीवघेणा धुराळा उडाला. मग लक्षात आलं की मुंग्या आणि मुंगळे माणसांना असं काही भिडले होते की माणसांचे हाल पाहवत नव्हते. ते बावचळल्यासारखे करु लागले. मुंग्यांचे अन् मुंगळ्यांचे चावेच इतके तीक्ष्ण, अंग खाजवायचे की युद्ध करायचे? अगदी बोसळले! पिसाळल्यासारखं करु लागले. तलवारी अन् बंदूकी अंधाधुंदी चालवू लागले. त्यांचीच माणसं धारातीर्थी पडू लागली. नुसता रौंदाळा. आता मात्र मुंग्यांनी मोक्याच्या जागा हेरून चढाई केली. मग तर माणसं रडकुंडीला आली. नात्यागोत्यातली जी माणसं जिवंत उरली त्यांनी युद्धभूमीतून पळ काढला. उरला एकटाच ज्यानं ‘बाभूळकांड’ घडवलं होतं. त्यानं शस्त्र खाली टाकलं अन् गडबडा लोळू लागला…
वडीलधार्‍या कावळ्यानं बाभळीचं बी जमिनीवर आळं करुन लावलं. बाभूळकांडात मेलेल्यांचं स्मरण करुन, त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
युद्ध जिंकल्याच्या घोषणा देऊन विजयोत्सव साजरा करण्यात आला.
अर्थात मी ही गोष्ट तुम्हाला सांगितली म्हणजे ही गोष्ट माझी असं तुम्हाला वाटेल! मात्र हे अजिबात खरं नाही. ज्या पिलानं हा उठाव घडवून आणला ते पिलू आयुष्यभर पिलू म्हणून कसं राहील! माणसाचं मूल जसं मोठं होतं तसंच त्याचंही झालं. जागतिकीकरणाच्या राक्षसाशी तो पुन्हा एकदा लढला होता. आणखी दोन उठाव त्याच्या नावावर आहेत. आज तिथं म्हणजे बाभूळकांडाच्या ठिकाणी जी बाभूळ उभी राहिली आहे तिला भेट द्यायला बरेच लोक जातात. तेव्हा पिलाचा नातू आपल्या आजोबाच्या शौर्याची गोष्ट त्यांना सांगत असतो. तीच मी तुम्हाला सांगितली…
– खरी की खोटी त्यालाच माहिती…!
– ऐश्‍वर्य पाटेकर
युवा साहित्य अकादमी पुरस्कार विजेते लेखक, नाशिक.
9822295672
मासिक ‘साहित्य चपराक’ दिवाळी अंक 2019

चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email - Chaprak Email ID

One Thought to “बाभूळकांड”

  1. prabhakar pathade.Nipani.karanatak.

    prathamach.aapali site adhalali.
    chaprak lagech vachle.Bhbhul he rupak
    sadar kathaa sundar rekhagtale aahe.Agadi
    talamaline lekhan aavadale. aapale prakashan upakram aadarshaniy aahe.

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

हे ही अवश्य वाचा